चंदरनं आपली बुलेट विहीरीच्या धावेवर उभी केली नी साईड स्टॅण्ड लावत तो खाली उतरला.गाडीचा लाईट बंद होताच समोर पुर्वेला माघी पुनवेचा पुरा चांद त्याला दिसला.चांदाच्या रुपेरी आभेनं तो घरचं सारं भांडण क्षणात विसरुन त्याला तरतरी वाटू लागली.त्यानं डिक्कीतनं धावजीबा व त्याचा आणलेला डब्बा आणि दिलरुबा ढाब्यावरनं आणलेल्या ब्लेंडरच्या दोन्ही बाटल्या बाहेर काढत धावेवर पडलेली बाज सरकवत त्यावर ठेवल्या.नी गव्हास पाणी भरत असलेल्या धावजीबास हाकाटी भरली.तसा बुलेटच्या आवाजाने धावजीबास ही चंदर आल्याचं कळलंच होतं.पण गव्हाचं वाफं भरत आल्यानं तो दांड बदलवण्यासाठी थांबला होता.फावडीनं दांड बदलवुन त्यानं तीनेक वाफ्यास पाणी लावलं व तो धावेकडं आला.थाळण्यात हात पाय धुवत धुऱ्ह्यावरचा उपटून सोबत आणलेला मुळाही धुतला.चंदरनं ब्लेंडर घटाघटा रिचवत त्याला ग्लास भरून दिला.
ग्लास हातात घेत "चंदर बापू आज दोन बाटल्या?"
"बा आज घरच्यांनी माथं उठवलंय आता तु तरी नको उठवू.गपचिप पी नी चल जेवण आटपू.
कधी मधी टॅंगोचा अर्धा ग्लास मारणाऱ्या धावजीबास ब्लेंडरच्या एका ग्लासानंच किक दिली.
दोघांनी डब्बा उघडून जेवण केलं.
""बापू त्या कवठीचं तू बुजगावणं मिरचीत उभं करून चांगलं नाही केलंस!",धावजीबानं धोतराच्या सोंग्यास हात पुसत विषय छेडला.
"काय बा!आजुन दुपारचं तुझं तेच सुरु आहे की एवढ्याशा ग्लासानंच किक बसलीय?",चंदर त्राग्यात बोलला.
"तसं नाही बापू,पण मिरचीत बुजगावणं म्हणुन मेलेल्या गाई-गुराची कवठी उभी करतात पण तू तर..?"
"बा आता मी झोपतो,आता तू पाणी भर अडिच-तीनला मला उठव मग मी पाणी भरीन तू झोपायचं"म्हणत चंदर बाजेवर आडवा झाला.धावजीबा मात्र बडबडतच गव्हाकडं पाणी भरण्यासाठी गेला. जातांना तो सारखा मिरचीत उभ्या केलेल्या बुजगावण्याकडं पाहु लागला. चांदाच्या रुपेरी उजेडात त्याला दुरुनही डोळे चमकल्याचे दिसताच तो घाबरला.खाल मानेनं तो गव्हाच्या शेताकडं निघाला.
माघी पुनवेचा चांद आता वर चढत होता तसा मळ्यातील हिरवाईच्या शालूत चांद आपल्या रुपेरी प्रकाशाचा कशिदा काढत होता तर गुलाबी थंडी दहिवराचा आपला ओलेता शेवटचा हात फिरवत होती. पाण्याची नाली ज्या बांधावर होती त्यावरील बोरीच्या झाडावरील गाभुळलेल्या,पिकलेल्या बोरांचा घमघमाट सुटत होता.थंड वाऱ्याच्या झुळुकेनं अलवार देठांतून गळत बोरं नालीतल्या पाण्यात चुबुक,डुबुक टप आवाज करत होते. चांद आपला बयाजवार वर चढतच होता. चंदर बाजेवर शांत पहुडत विचार करत होता.
वडिल कृषी खात्यातून निवृत्त होताच आलेल्या रकमेतून दोन वर्षांपूर्वीच सामंत डाॅक्टरांकडून हा मळा विकत घेतला.चंदरचं एम.एस.सी अॅग्री होऊनही नोकरी नसल्यानं निदान शेती तरी पाहीन हा हेतू.या आखाजीस लगेच मळ्याच्या खालच्या अंगालाच असलेलं दिनू सराफाचं चार एकर ही घेतलं.पण चंदरचं सारं गणितच विस्कटलं.कारण लहानपणापासुन चंदरशी नातं लावलेली सुलीचं मामानं ऐनवेळी चंदर ऐवजी लहान भाच्याशी लग्न उरकलं.मामाही त्याच्या जागी राईटच.लहान भाच्यानं बी.ए.एम.एस. होताच तालुक्याला क्लिनीक टाकलं.सुलीचं बि. फाॅर्म होतच.साहजिकच मामा बेरोजगार चंदरला कल्टी मारत लहान्या भाच्याची निवड केली. मोठा असुनही चंदर राहिला व अचानक लहान्याचं आधी उरकलं.चंदरला उरात कुठं तरी खोल जखम झालीच पण ती प्रेमाऐवजी इगोची होती.कारण सुली कधी उतरलीच नव्हती.मग कोण?
..
.
कोण ती?
गोकुळ दुग्धालय...
काॅलेजचे दिवस ...
झिनी?
झिनीची झिलई.,
झिनीची मऊशार झालर...
पण नंतर काळाच्या या विशाल गर्तेत ती कुठं गायब झाली?
व आपणही शोधलं नाही.
रात्री दररोज गोकुळ दुग्धालयावर मलई मारलेलं दुध प्यायला खूप आवडायचं चंदरला.पण नंतर गल्ल्यावर बसलेली गोरीपान लाल नाकाची चन्ना चुडी घातलेली झिनीच आवडू लागली.मग नजरेला नजर देत किती तरी वेळ नुसतं पाहत बसुन राहणं.त्यात झिनीनं तिरक्या डोळ्यानं पाहत नाकाचा लाल शेंडा उडवत मुलायम हास्य दिसताच चंदर सुधबुध विसरे.एक दोन महिने चाललं असं व झिनी गायब झाली ती नंतर दिसलीच नाही.चंदर लच्छा काठेवाडास माहित पडु न देता बाहेरुन तपास ही केला पण झिनी गेली ती गेलीच.मग बि.एस्सी.अॅग्री संपलं व चंदरने ही जिल्हा सोडला.पण झिनी निघता निघेना.म्हणुन सुलीचं त्याला काहीच वाटलं नाही.लग्नानंतर लहान भावानं सुलीकरिता
लगेच मेडीकल टाकलं.आधी चंदरच मेडीकलवर बसे.पण नंतर सुली थांबू लागली.व पुढे वाद वाढू लागले.म्हणून तेथुन चंदरची गच्छती होत त्याचं पुनर्वसन मळ्यात झालं.त्यानंही मग बाटली जवळ करत तालुका सोडला व तेथून पंचवीस किमी दूर वडिलांच्या पुर्वापार गाव तुराटखेड्यातील या मळ्यात आला.घरच्यांशी अपेक्षा यानं दिवसभर देखरेख करत रात्री घरी यावं.पण यानं गावातच मेसचा डब्बा लावत मळ्यातच धावजीबा जवळ थांबू लागला. वाटलं तर पाच सहा दिवसात घरी चक्कर मारी.
आज दुपारीच त्यानं जेसीबीनं जुना सामंताचा मळा व सराफाच्या शेताच्या मधला भला मोठा बांध फोडुन शेत काढलं.पण त्या बांधात कवठी सह हाडाचा सांगाडा निघाला.तो त्यानं धावजी बा मनाई करत असतांनाही जरीला मिरचीच्या शेतात काठीनं बुजगावणं म्हणुन उभा केला होता.
नव्या दिनू सराफाच्या शेतात जरीला मिरची टच हिरव्या मिरच्यांनी लगडली होती.वरच्या आगऱ्यांना अजुनही पांढरी फुले व आरे लागतच होती. माणसांच्या खांद्याला मिरचीचं झाड लागे.चुकुन कोणी मळ्याकडं आला तर मिरची पाहतच उभा राही.नजर लागू नये व यदा कदाचीत झोप लागली तर चोरांना भिती वाटावी म्हणुनच त्यानं ते कवटीचं बुजगावणं उभं केलं होतं .पण ती कवठी कुणाची? व ती कोण?कशी मेली?हे माहित असलेला धावजीबा दुपारपासूनच धास्तावला होता.कारण मळा हा गावापासुन तीन चार किमी दूर भल्या मोठ्या नाल्याच्या खोऱ्यात.नाला उतरून पराटखेडं तर पाच किमी दूर.नाल्याच्या त्या बाजुला नदीवरच्या शिवधारा लिफ्ट इरिगेशनचं पाणी साऱ्या शिवारात फिरत असल्यानं ऊस, केळी मातलेली.दिवसाही ऊसाच्या फडातुन बिबटे व कोल्हे नजरेला पडत.त्यात या चंदर बापुनं या कवटीची भानगड उभी केलीय.
आता चांद बरोबर डोक्यावर आलेला.थंडी आता चांगलीच लाडात येत होती. चंदरनं शाल अंगावर ओढली.ब्लेंडर भिणतच होती.गुंगी वाढू लागली.तोच मिरचीच्या शेतात सुर्रर्रर् सायं सूं सूं करत वारा झपाटला.नाल्याच्या खबदाडातून पाण्याच्या डोहाकडन' टिटिव टिव, टिटिटिव टिव' करत कर्कश आवाज उठवत टिटव्या मळ्याकडं सरकू लागल्या.नाल्यापल्याडच्या फडातून खोकड, कोल्ह्यांनी कोल्हेकुई भणकवली. मिरचीच्या शेतात उठलेलं वाऱ्याचं भवंडर गव्हाच्या शेताकडं सरकू लागलं तसं वरच्या बांधावर असलेल्या पिंपळावरचे बगळे, करकोचे, फडफड करत उडाले तर वडा- उंबरावरचे दिवांध ,वटवाघळांनी एकच गिल्ला केला.धावजी बा सावध झाला.गुडघ्या पर्यत पात आलेल्या गव्हाच्या शेतातून कावरा बावरा होत टिटवीच्या आवाजावर पचकन थूकला.
चंदर अर्धी झोप अर्धी जाग या अवस्थेत पडुन होता.मोटार अचानक बंद झाली.थाळण्यात पडणाऱ्या पाण्याचा आवाज बंद झाला.नालीतील वाहणाऱ्या पाण्याचा आवाजही मंद मंद होत गेला. पक्ष्यांचा आवाज, फडफड विसावली.येणारं पाणी बंद होताच व विहीरीवरचा शंभर व्होल्टेजचा पिवळा बल्ब बंद पडताच लाईट गेली असेल म्हणत धावजी बा गव्हाच्या शेतातून बाहेर निघत बांधावरच अंगावरची गोधडी पांघरत झोपला.धावेवर आलाच नाही.
चंदर गुंगीनं व झोपेनं म्लान होऊ लागला तोच त्याला पाण्याच्या कुंड्यातून बुड बुड बुड आवाज आला.जणू कोणी तरी हंडा भरत असावं.पुन्हा बुड बुड बुड तसाच आवाज.चंदर शेत शिवारास नवखा होता. पण त्यानं घेतली असल्यानं झोपेत दुर्लक्ष करत शाल गच्च लपेटली.कुणी तरी कुंड्यातून हंड्यावर हंडे भरत होता.त्यानंतर त्याला पायातील साखळ्या व हातातील कड्यांचा आवाज आपल्या बाजेकडं सरकत असल्याचं जाणवलं. आता झोप त्याचा ताबा घेऊ लागली. आवाज छन, छन ,कड, कड , करत बोरीकडं सरकू लागला.कुणीतरी बोरीच्या झाडांची खालची फांदी धरुन गदागदा हालवत असावं व गदरलेली, पिवळी बोरं टपाटपा पाडत असावं.पण पण चंदर गाढ निद्रेत विसावला.मग बोरं वेचून पदरात घेत एकेक हंडा डोक्यावर व कंबरेवर घेत छन छन आवाज दक्षिणेकडील ऊसाच्या फडाच्या बांधवाटेनं नाल्याकडं सरकत असल्याचं घोरणाऱ्या चंदरला स्वप्न दिसू लागलं.तीनला लाईट आली.थंडीनं जाग येताच चंदरनं मोटार सुरू केली व गव्हाच्या शेताकडं आला.धावजीबास हाका मारत उठवलं.धावजीबा मग लंघु शंका करून पुन्हा झोपला. तर चंदर पाणी भरु लागला.त्यानं मोबाईलवर 'झिनी रे झिनी,चदरीया झिनी रे झिनी!'हे गाणं लावत मोबाईल बांधावर ठेवला. पहाटेच्या थंड, शांत वातावरणात गाण्याचा कमी आवाजही शिवार दणकावत होता. चांद आता रुपेरी छटा टाकत तांबुस होत मावळतीकडं उतरत होता.धावजीबा एरवी घोरायला लागला होता.
चंदरचं पाणी भरणं सुरुच होतं.
तोच पुन्हा टिटवीचा कल्लोळ उठला.ऊसाच्या फडात वाऱ्याची सळसळ उठली.गव्हाच्या शेतात थंड सुरकी उठली.चंदरचं विहीरीकडं लक्ष गेलं.फडातून बाई विहीरीकडं सरकत असल्याचं त्याला दिसलं.चांदाच्या प्रकाशात चंदर टक लावून पाहू लागला.बाई डोक्यावर दोन, कंबरेवर एक तर दुसऱ्या हातात एक हंडा सांभाळत लयीत ती विहीरीवर आली, पाणी भरलं;नंतर बोरीकडं वळली. बोराची फांदी हलवत बोरं पाडली व वेचून बोरं खात धावेवर थांबली.चंदरला झोपेत असंच स्वप्न पडल्याचं आठवलं.कोण ही?इतक्या पहाटे पाणी भरायला?मग त्याला नाल्याच्या पल्याड दूर नदीकडच्या अनकाई टेकाडावर काठेवाड असतात हे ऐकलेलं आठवलं.कदाचित त्यापैकीच कुणी असावी असा विचार करत तो पाणी भरत विहीरीकडं टुकुर टुकुर पाहू लागला.
बाईनं यथावकाश हंडे उचलले तितक्यात चंदर वाफं भरल्यानं दांड पालटवू लागला.तितक्यात ती बाई दिसेनासी झाली.मात्र बुजगावणं उभं केलेल्या जागी मिरचीच्या शेतात टिटव्या जिवाच्या आकांतांने कलकल करू लागल्या व थोड्याच वेळात उगवतीला धुक्यात लपेटलेली तांबडी आभा फुटली.
उठलेल्या धावजीबानं सरळ घरची वाट धरली ती पुन्हा मळ्यात पाय ठेवायचा नाही या निश्चयानंच.
पण झिनी तर आता रोज मळ्यात येणारच होती व तेथून तुराटखेड्यात.......
चंदरनं बांध फोडून तिला मोकळं केल्यावर ती बदला घेण्यासाठी बुजगावण्यातून मळ्यात वावरणारच होती.
क्रमश: