आधीच्या भागाची लिंक वर दिली आहे👆👆
कथा : घुंगरू भाग ५ वा
लेखक : #अनुप_देशमाने
स्मिताने गपचूप पळत जाऊन ते घुंगरु आपल्या बॅग मध्ये लपवले, समीर ने टफी ला बाहेर बांधून आत आला... घरातील सर्व मंडळी बहुतेक शेतात गेलेली असावी कारण घरात कोणीच नसल्याचा भास होत होता, स्मिता आणि समीर खाली अंगणात आले आणि एकमेकांना बघू लागले, दोघे ही घामाने ओले चिंब झाले होते, खूप मोठा गुन्हा केला आहे की काय असे भाव आज त्या दोघांच्या चेहरयावर दिसत होते, तेवढ्यात आजीने आवाज दिला...
"स्मिता, समीर बाळांनो आत या"
आजी तिच्या खोली मध्ये वाती वळत बसली होती.. दोघेही आजी कडे गेले..
आजी : काय र कुठं गेले होते तुम्ही दोघे अचानक..??
स्मिता : आग आजी कुठेच नाही गावात फिरून आलो आम्ही..!!
आजी : त्या वाड्याकडे नव्हता ना गेले तुम्ही ..??
समीर : नाही नाही अजिबात नाही गेलो आम्ही तिकडे...!!
आजी : सगुणाबाई चा वाडा आहे तो...!!
स्मिता : आजी सांग ना नक्की काय आहे रहस्य त्या वाड्याचे..!!
आजी : हो सांगते आज कोणीही घरी नाही त्यामुळे सांगणार आहे मी त्या वाड्याचे रहस्य..!!
स्मिता आणि समीर ने जवळील बसकर घेतली आणीबट्यावर आसनस्थ झाले... आणि आजीचे बोलणे एकटक तिच्या कडे बघत ऐकू लागले..!!
आजी : जवळ जवळ 40 वर्षे झाले असतील , तुमचे वडील अभि लहान होता त्यावेळेसची गोष्ट आहे ती, गावात पाटीलकी खूप चालत होती, त्यात बाळू पाटील या नावाचा माणूस आपल्या गावात सावकारकी करत होता, अफाट पैसा आणि अफाट जमीन जुमला त्याच्या कडे... पण बायकोचं सुख त्याच्या नशिबात नव्हते कारण लग्न झाल्या नंतर 6 महिन्यात तिची बायको वारली, त्यानंतर तो दारूच्या आणि बाईच्या व्यसनात वाया गेला, गावातील जत्रे मध्ये एकदा त्याने नर्तिका ला प्राचारण केले... त्यातील एक नर्तिका सगुना दिसायला खुप सुंदर, एखादी अप्सरा सारखी, दुधाच्या सायी प्रमाणे तिचा कलर, कपाळ मोठे आणि त्या कपाळावर मोठे कुंकू, नाकात नथ आणि कानात मोठे झुमके, अंगावर इरकल साडी पण काष्टा नेहमी नेसायची... असा तिचा पेहराव आणि सौंदर्य पाहून गाव तिच्या प्रेमात पडले, बाळू पाटलाने तिला 2 दिवस त्याच्या वाड्यावर ठेवले होते... नंतर जत्रा संपल्यानंतर बाळू पाटलाने तिला तिच्या गावी सोडले... पण काही केल्या गावातील लोकांच्या मनातून त्या सगुना च वेड काही जाईना म्हणून सर्वांनी बाळू पाटलाकडे तिला परत आणण्याचा हट्ट धरला....बाळू पाटील देखील तिच्या सौंदर्य वरती मोहित झाला होता, त्याने लोकांना होकार देऊन दुसऱ्या दिवशी तिच्या कडे गेला... तिला भेटला पण परत रिकाम्या हाती माघारी परतला, लोकांनी त्याला विचारले तेव्हा त्याने लोकांना सांगितले की तिने अट घातली आहे की तिला एक वाडा देत असाल तर ती येणार आहे म्हणून, मग लोक नाराज होऊन परत गेली, बाळू पाटील ने त्या दिवशी आपल्या गावातील कुंभार चा वाडा जो आज सगुणाबाई चा वाडा म्हणून ओळखला जातो तो , त्या वाड्यात रामा कुंभार, त्याचे आई वडील आणि 2 मुले रहात होते त्याच रात्री बाळू पाटील ने त्यांचा मुडदा पाडला, गावातील काही लोकांना सोबतीला घेऊन त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ही लावली आणि दुसऱ्या दिवशी अशी अफवा पेटवली की कुंभार ला कर्ज जास्त झाल्यामुळे तो रात्रीतून घर सोडून गेला, आणि आता ह्या वाड्यावर माझा अधिकार आहे जो त्याने माझ्या कडे गहाण ठेवला होता, झाला त्याची राक्षस बुद्धीने तो जिंकला होता आणि सगुणाबाई चा येण्याचा मार्ग त्याने 4 निष्पाप जीवांचा बळी घेऊन मोकळा केला... 3 दिवसांनी सगुना ला घेऊन पाटील गावी आला, तिला त्या कुंभारच्या वाड्यावर रहाण्यास दिले, तिच्या वाड्यात गडी कामाला ठेवले, रोज रात्री सगुना ची नाच गाणे होयचे, गावातील आणि जवळच्या गावतील मंडळी येऊ लागले, गावात दारूचा व्यवसाय वाढू लागला, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली.......!!!
स्मिता : का थांबली आजी पुढे बोल काय झालं पुढे...??
आजी : थांबा काहीतरी समोरन गेल्याचा भास झाला मला आता..!!
समीर आणि स्मिता प्रथमच घाबरले, आजी लागोलाग बाहेर येऊन बघू लागली होती, आत समीर स्मिताकडे रागाने बघत होता, तिने आणलेल्या घुंगरुमुळे हा भास झाला आहे हा तिला सांगत होता...खूप वेळ झाले आजी काही येईना म्हणून दोघेही बाहेर गेले... तर आजी वाड्याच्या दारात उभी होती स्थब्ध... दोघे ही तिच्या जवळ गेले आणि समोरील दृश्य पाहताच रडू लागले, कारण बाहेर बांधून ठेवलेला टफी मृत अवस्थेत होता, त्याचे पूर्ण शरीर ताठ झाले होते, जीभ बाहेर पडली होती, डोळे उघडे होते... आता मात्र स्मिता खूप घाबरली, तिने आपला मोबाईल काढला आणि लगेच वडिलांना ला फोन केला.... काही वेळातच सर्व जण घरी परतले, सर्वाना टफी गेल्याचे खुप दुःख झाले, टफी ला अभि आणि विक्रांत ने शेतात खड्डा करून पुरून आले... त्यादिवशी समीर आणि स्मिता जेवले नाहीत....त्यांचं मन कशातच रमेना गेले होते, रात्रीचे 9 वाजत आले होते, सर्वजण झोपेच्या तयारीत होते...
सीमा : स्मिता आणि समीर लवकर झोपा रे, आज जेवण देखील केलं नाही तुम्ही, टफी गेल्याच खूप दुःख मला पण आहे तरी तुम्ही जास्त जागु नका आज अमावस्या आहे लवकर झोपा....good night dears म्हणून सीमा आत झोपण्यास गेली,
सगळीकडे आता शांतता होती,...
स्मिता : समीर आपल्यामुळे टफी गेला का रे..??
समीर ; काय माहिती ग, पण त्याने तुझ्याकडे बघत खूप भुंकत होता हे मात्र नक्की होते..!!
स्मिता : आपण उगीच गेलो का रे त्या वाड्यात..?? बिचारा टफी आपल्यामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला... आणि स्मिता रडू लागली..
समीर ने तिला जवळ घेत शांत केले... स्मिता ने आपला मोबाईल काढला आणि त्या वाड्यातील काढलेले फोटो ती बघू लागली, आजीने सांगितलेले वर्णन प्रमाणे त्या फोटोतील स्त्री होती, पण एक लहान मूल हातात ताट घेऊन का उभे होते ह्या विचारात आता ती पडली...
समीर : स्मिता जास्त विचार नको करू झोप आज खूप दमलो आहोत आपण... उद्या बोलू आजी बरोबर नाहीतर तिला सांगू घुंगरु बद्दल...
स्मिता ने होकारार्थी मान करून झोपण्यास गेली...काहिकेल्या स्मिता ला झोप काही येईना गेली होती, ह्या कुशिवरून त्या कुशीवर ती करत होती, रात्रीचे आता 12 वाजून गेले होते, अचानक स्मिता उठली आणि चोर पावलांनी तिच्या बॅग कडे गेली.... बॅग मध्ये हात घालून तिने घुंगराला स्पर्श केला, हो ते त्याच जागीच होते... वाड्यातील सर्वजण झोपले होते, अमावस्या असल्यामुळे अंधार फार जाणवत होता, परत हळुवार पणे उठून ती तिच्या झोपेच्या जागेकडे निघाली असता तिच्या कानावर परत तोच आवाज आला....
"छम छम छम छम...... छम छाम छुम छम छम"
आता स्मिता न घाबरता बाहेर आली, आणि हळुवार पणे ओरडली....
"सगुणाबाई आहात ना तुम्ही....??"
बस एवढंच बोलता क्षणी वारा अचानक पणे वाड्यात घुसला, घुंगराचा आवाज आता मोठ्याने ऐकू येऊ लागला... स्मिता ने आपले दोन्ही हात कानावर ठेवले......आणि जोर जोरात ओरडू लागली.. तिच्या ओरडण्याने सर्वजण जागे झाले, काय झाले काय झाले म्हणून विचारू लागले....पण काही केल्या स्मिता सांगेना... सीमा तिला आत घेऊन गेली, तिला पिण्यास पाणी दिले आणि तिच्या जवळ झोपली....
(काही पार्ट मोठे तर काही लहान लिहावे लागतात कारण सगळे ट्विस्ट किंवा भयंकर एकाच पार्ट वाचण्यास मज्जा येत नसते, ऑफिस वर्क सांभाळत मी लिखाण करत आहे, जसा वेळ मिळेल तसे मी लिहीत आहे त्यामुळे थोडा उशीर होत आहे समजून घ्या आणि मला माफ करा🙏🙏)
क्रमशः
#घुंगरु भाग ५ वा
#अनुप_देशमाने