द लास्ट राईड
भाग क्र :- १
तो परत तिथे अगदीच वरून धप्पकन कोसळला....आता ह्या 7 दिवसांत ह्या वातावरणाची त्याला जवळपास सवय झाली होती.....अगदीच मिट्ट काळोख....स्वतःचा हात देखील दिसत नसे इतका काळोख तिथे होता....रातकिड्यांची किरकिर,पानांचा सळसळाट अधून मधून एखाद्या प्राण्यांचे रडणे ह्यावरून त्याला अंदाज आला होता की तो कुठल्यातरी जंगलाच्या मध्यभागी पोहोचतो....पण हे सगळं विचार करायला वेळ आहे कुणाला??? इथं त्याला फक्त एक तास मिळतो ह्या एका तासातच त्याला आपलं काम पूर्ण करावं लागतं.....त्यामुळे इथे वेळ वाया घालवणे त्याच्या जीवावर येत असे....धप्पकन खाली कोसळल्यावर तो उठून उभं न राहता...जमिनीला चाचपडू लागला...वाळलेल्या पानांचा तो खडखड आवाज त्यात त्या मिट्ट अंधारात आपले हात चालवत त्याने अखेर तो दिवा मिळवला....दिवा हाताला लागताच त्याच्या तोंडातून "वाह" असे शब्द आले....त्या दिव्याचा आकार एखाद्या चहाच्या कपासारखा होता....अलादिनचा तो चिराग असतो ना?? हा अगदी तसाच आकार....फक्त त्या चिरागला रगडावे लागत असे पण ह्या दिव्याच्या दांड्यावर एक कसले तरी चिन्ह बनले होते त्या खडबडीत चिन्हावर आपल्या उजव्या हाताचा अंगठा ठेवला की हा दिवा पेट घेत असे.....त्याने तसच केलं त्या खडबडीत चिन्हावर त्याने आपला अंगठा ठेवला आणि हळूहळू तो दिवा पेटू लागला.....त्याला जाणवले की आता ह्या दिव्याचा प्रकाश थोडा मंद मंद होत आहे.....पण जास्तीचा विचार न करता त्या दिव्याच्या मर्यादित उजेडात तो चालू लागला....चिखलासारखं मऊ काहीतरी पायाला लागत होतं पाय रुतत होते पण तो चिखल नव्हता...स्वतःला सावरत तो चालत होता....दगडी बांधकाम सुरू झाले होते....कसली तरी चिरेबंदी भव्य वास्तू ह्या अंधारात उभी होती पण ही वास्तू काय आहे हे मात्र त्याला अजूनही कळलं नव्हतं....एक विचित्र अशी ओढ त्याला लागली होती....त्यामुळे आता तो ह्या दगडी वास्तूत आत शिरला ह्या दिव्याचा उजेड आता थोडा मंद झाला होता त्यामुळे उजेड मर्यादित होता हा पण त्याची सावली मात्र मोठी बनली होती.....त्याने त्या दगडी भिंतीच्या कडेने चालायला सुरवात केली....हातातील दिव्याचा मर्यादित प्रकाश होता त्यामुळे आता त्याची स्वतःची सावली गडद झाली होती....त्याला अस वाटत होतं की ही सावली आता जिवंत झाली आहे म्हणजे ती सावली अगदी विचित्र पद्धतीने हलत होती जणू त्याच्या शरीराची ती काळी सावली नसून एक वेगळीच उंच सावली त्याच्या मागून चालत होती.....त्या सावलीत आता थोडं वजन जाणवत होतं....म्हणजे कुणीतरी उंच असं काळ्या कपड्यात आपल्या मागून चालून येत आहे असा काहीसा भास त्याला झाला पण हे सगळं विचार करायला त्याला वेळ नव्हता....एक तासातली 15 मिनिटे चालण्यात वाया गेली होती....अरे हो त्याची चाल सुद्धा आता मंद झाली होती....थोडं चालल्यावर त्याला दरदरून घाम फुटला होता....तो हळूहळू अशक्त होत चालला होता.....धाप लागत होती....पण जडजड पावले टाकत तो आपल्या 44 नंबरच्या खोलीपर्यंत पोहचू पाहत होता....अच्छा इथे एकाच लाईनीत शेकडो दगडी बांधणीच्या खोल्या होत्या...त्याच्या प्रमाणे हातात दिवा घेऊन अनेक जण इथे आले होते.....कमी वेळ होता तरीही सुरवातीच्या दिवसात त्याने ही जागा बरीच फिरून काढली होती.....एखादी बाजारपेठ असते ना??त्यात कस ज्याला जी गोष्ट हवी असते त्या त्या दुकानात जाऊन तो खरेदी करत असतो तस तस प्रत्येक जण हातात दिवा घेऊन ठराविक खोलीत चाललं होतं.....सुरवातीला त्याला हे सगळं चमत्कारिक वाटलं होतं कारण त्या रिकाम्या खोलीत त्या व्यक्तीच्या हातातील दिव्याचा उजेड गेला की चमत्कार व्हायचा अचानक वेगवेगळ्या गोष्टी त्या दिव्याच्या उजेडात प्रकट व्हायच्या जस की कुणाच्या हाताला पैसे लागत होते.... कुणी त्या दिव्याच्या उजेडात खाली पडलेले सोनं लुटून घेत होता.....त्याने जवळपास सगळ्याच खोल्या बघून काढल्या होता....कुणाचा त्या दिव्याच्या उजेडात प्रणय रंगला असायचा त्याचे मादक स्वर त्याच्या कानावर पडायचे.....कुणी त्या दिव्याच्या उजेडात आपल्या मृत झालेल्या पण आवडत्या व्यक्ती सोबत बोलत मन मोकळं करत असताना सुद्धा त्याने बघितले होते....कुणी समोर 5,6 दारूच्या बाटल्या संपवून बसलेले सुद्धा लोक बघितले होते...एकुणच पैसे,सोनं नाणे मिळाल्याचा आनंद...प्रणयात रंगलेले मादक सूर....बोलण्याची कुजबुज ह्याने ती वास्तू गजबजून गेली होती.....एक दोन व्यक्ती वाटेत निपचित पडलेली सुद्धा त्याने बघितली होती..त्यांच्या हातातला दिवा विझलेला असायचा...नंतर दोन उंच काळा पोशाख घातलेले चेहरा नसलेले लोक त्या दिवा विझून पडलेल्या लोकांना फरफटत नेताना सुद्धा त्याने बघितले होते.......प्रत्येक वेळी तो जेव्हा जेव्हा इथे यायचा तेव्हा एखादं दुसरी खोली रिकामी असायची किंवा त्या खोलीत दिव्याच्या मोठ्या उजेडात एखादा नवीन व्यक्ती आपलं स्वप्न प्रत्यक्षात जगताना दिसत असे.....त्या दिव्याच्या उजेडात आनंद घेत असताना दिसे.....सगळं काही चमत्कारिक होत....इथे आलं की लोकांत चमत्कारिक बदल व्हायचे....लोक एकमेकांना घासून जायचे पण कुणी कुणाशी बोलत नसत आपल्या नेमून दिलेल्या खोलीत ते आपला ठरलेला आनंद घ्यायला जात असत....तो सुद्धा आता ह्या काळ्याशार दुनियेचा हिस्सा होता....त्यामुळे तो लगबगीने रूम नंबर 44 कडे दिव्याच्या उजेडात चालत होता....काळाकुट्ट अंधार असलेल्या त्या खोलीत आल्यावर त्याने आपल्या हातातील दिवा त्या अंधाराला दाखवला आणि म्हणाला
"7 जून 1940 मध्ये फिली किनाऱ्यावर जी लढाई झाली तीचा 7 वा दिवस मला दाखव"
आणि आश्चर्य.....एखादया 3D सिनेमा प्रमाणे सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर तरंगू लागलं.....डोळे विस्फारून तो समोरचे युद्ध बघत होता...आपल्याला हव्या असलेल्या नोट्स वहीत लिहून काढत होता....एखाद्या लहान मुलाला समोर खेळण्याचे दुकान बघून जसा आनंद होतो ना....तसा काहीसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटला होता
एका तासाने अशोकने डोळे उघडले....तेव्हा तो आपल्या खोलीत होता.....त्याचे अंग घामाने भिजले होते....अंग थरथरत होते....लडखडत तो टॉयलेट जवळ गेला....त्याला उलटी झाली होती....आज ह्या प्रवासाने त्याला प्रचंड गरगरले होते....आज त्याला अशक्त वाटत होते...थकत चालला होता तो....आतून कुणीतरी कुरतडत होत त्याला....धापा टाकीत....अशोक तसाच काही वेळ बेड वर पडला आणि त्याला कधी झोप लागली त्याला कळलंच नाही.....
अशोक हा एक 45 वर्षीय प्रोफेसर होता.....इतिहास त्याचा प्रचंड आवडीचा विषय....त्यावर त्याची पकड कमालीची मजबूत होती म्हणून तर कॉलेज मध्ये हातात पुस्तक न घेता तो मुलांना इतिहास शिकवत असे.....खूपच जिज्ञासू होता अशोक....एखादा विषय निवडला की पूर्ण जाणून घेतल्या शिवाय त्याला चैनच पडत नसे....असाच वर्ल्ड वॉर हा त्याच्या आवडीचा विषय होता.....फिली किनाऱ्यावर जो मित्र राष्ट्रांनी हल्ला केला आणि युद्ध जिंकलं हे सगळं अशोकला जाणून घ्यायचं होतं...त्याच्या मते जगातील सगळ्यात उत्कृष्ठ लढाई होती ती....पण त्याच झालं असं की त्या घटनेबद्दल जेवढं सविस्तर लिहल होत ते त्या देशाच्या लायब्ररी मध्ये सुरक्षित होत....आता त्या देशाचा झालेला पराभव जगासमोर येऊ नये म्हणून त्या देशाने ती लायब्ररी लॉक केली होती.....गंमत म्हणजे फिली किनाऱ्यावर जे युद्ध झालं त्याचा इतिहास फक्त ह्या लायब्ररी मध्ये होता त्या लायब्ररीला 10 वर्षांपूर्वी आग लागून सगळे पुरावे,फोटो नष्ट झाले होते....अशोक अगदी तेव्हापासून अस्वस्थ होता....त्याला ह्या लढाई बद्दल जरा जास्तच आकर्षक होत कारण ऐकीव माहिती प्रमाणे ह्या लढाईत कुशल आखणी केली होती.....अशोक आता प्रोफेसर झाला तरी त्यांनी ह्या युद्ध घटनेवर रिसर्च चालूच होती......
एकेदिवशी त्याला आपला जुना कॉलेज मधील मित्र दीपक भेटला....क्षणभर दीपक कडे बघून अशोक ला हेवा वाटू लागला....कारण दीपक मध्ये प्रचंड बदल झाला होता...महागडी गाडी,कपडे वैगेरे घालून दीपक हा अशोक ला अचानक भेटायला आला होता ह्या अचानक भेटीचा अर्थ अशोकला काही केल्या लागतात नव्हता....तरी अशोकने दीपकचे स्वागत केले....इकडं तिकडच्या गप्पा झाल्यावर अशोकने स्वतःच विचारलं
"काय रे दिप्या एवढा मोठा कसा काय झालास??म्हणजे अचानक एवढी श्रीमंती वैगेरे"
अपेक्षित प्रश्न होता पण ह्याला दीपकने हसून उत्तर दिले
"हे बघ अशोक तू माझा खास मित्र आहे.....आता तुझ्यापासून काय लपवायच??? नाही का.....अस समज की एक चमत्कार झाला आणि माझं सगळं आयुष्य बदलून गेलं"
"चमत्कार???"
अशोकच्या ह्या प्रश्नार्थी चमत्काराला दीपकने उत्तर दिलं
"हो बाबा....फक्त शब्द म्हणून वापरत नाहीय......खरा चमत्कार....अस समज की एक जादुई दिवा हाती लागला आहे.....जो माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो"
दिपकच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव बघून अशोकला विश्वास ठेवणे भाग होते कारण दीपकच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता....ह्याच आधी नीट ऐकून घेतलं पाहिजे म्हणून अशोकने त्याचं सगळं बोलणे नीट ऐकायचे ठरवले.....आपणही थोडे सिरीयस आहोत हे दाखवण्यासाठी अशोक थोडा पुढे आला.........."आता नीट सांग मला काय प्रकार आहे"
दीपक सुद्धा थोडं पुढे झाला आणि म्हणाला
"माझ्याकडे एक असा दिवा आहे ज्याच्या प्रकाशात आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो.....हे बघ हा दिवा माझ्याजवळ कसा आला?? हे सगळं महत्वाचं नाही......तो दिवा तुला एका जुन्या घरात घेऊन जातो जिथे फक्त आणि फक्त अंधार आहे....त्यात त्या दिव्याच्या उजेडात तू तुझी मनातली इच्छा बोलून दाखवली तर ती पूर्ण होते....मी तिथून अमाप पैसा सोनं नाणे घेऊन आलोय....तुझ्या मनात जी इच्छा आहे ती तू त्या दिव्याच्या उजेडात पूर्ण करू शकतोस"
अशोक अजूनही संभ्रमित होता.....हे सगळं शक्य नव्हतं......अशोक एक प्रोफेसर होता....त्याची तार्किक बुद्धी अजूनही हे मान्य करायला तयार नव्हती....मनोमन तो दिपकला मूर्ख ठरवत होता.....
"मला माहित नाही तू हे काय सांगत आहेस?? आणि ह्या गोष्टीवर मी विश्वास कसा ठेवायचा???"
आता मात्र दिपकच्या इगो वर गोष्ट आली....त्याने एकही शब्द न बोलता आपल्या कोटाच्या खिशात हात घातला आणि एक छोट्या दगडाच्या आकाराची वस्तू अशोक पुढे ठेवली....ती वस्तू बघून अशोक चे डोळे विस्फारले....त्याने ती वस्तू हातात घेतली....सोन्याचा एक दगड होता तो....चमकदार सोनं....
"सर्वात आधी तिथून त्या जागेतून हा दगड मी उचलला होता....त्यामुळे हा दगड मी नेहमी खिश्यात ठेवतो गुडलक म्हणून"
अशोक ते सोनं न्याहाळत होता....त्याला बघून दीपक म्हणाला
"हे बघ अशोक तू माझा बालपणीचा मित्र आहेस......मला तुझी काळजी वाटत होती.....माझ्याप्रमाणे तू सुद्धा आयुष्यात काही तरी मिळवावे म्हणून तुझा पत्ता शोधत मी इथवर आलो आहे.....बाकी तुझी मर्जी"
दीपकचे हे बोलणे अशोकला खूपच आश्वासक वाटले...दीपक अगदीच स्पष्ट बोलत होता......दिपक एक चांगल्या भावनेने इथपर्यंत आला आहे......त्यामुळे त्याच्यावर एकदा विश्वास ठेवणे भाग होते
"मला काय करावे लागेल दीपक??"
"हे बघ अशोक एक दिवा तुला त्या वेगळ्या जगात पोहचवेल....तिथे गेल्यावर तुला कोणती गोष्ट हवी आहे ते तू इथे मागू शकतोस....तू तिकडून इकडे गोष्टी घेऊन येऊ शकतोस.....हा खेळ जास्त दिवस चालतो...म्हणजे तुला जे सुख हवं आहे तू ते तिथे उपभोगू शकतोस......"
"पण हा दिवा आहे कुठे नेमका???"
अशोकच्या ह्या प्रश्नावर दीपक हसला....त्याने आपल्या कोटाच्या खिशातून एक दिवा बाहेर काढला....एक रत्नजडित सोन्याचा दिवा होता तो.....त्याला बघून अशोकचे डोळे विस्फारले....त्याने तो दिवा हातात घेऊन न्याहाळायला सुरवात केली
"अरे पण हा दिवा काम कसा करतो??"
दीपकने तो दिवा आपल्या हातात घेतला आणि त्या दिव्याच्या दांड्यावर एक गोलाकार नक्षी होती तिथे बोट दाखवले
"हे बघ अशोक हो जी नक्षी आहे ना....त्यावर तू आपल्या उजव्या हाताचा अंगठा ठेवायचा....तू इथून बेशुद्ध होऊन त्या दुनियेत जाशील.....तिथे आपल्या इच्छा पूर्ण करायला तुला फक्त एक तास असेल....त्या एक तासानंतर तू परत ह्या दुनियेत येशील....एवढं सोप्प आहे हे.....मी एकदा जाऊन आलोय त्यामुळे मला परत तिथे जाता येत नाही....सो"
हे सगळं ऐकून अशोकने परत तो दिवा आपल्या हातात घेतला
"ओके म्हणजे मला एक तास आहे.....आणि माझं इथलं शरीर इथेच राहील आणि मी स्वप्नवत जगात जाईन....ते ही ह्या दिव्याच्या मदतीने"
"अगदी बरोबर आहे अशोक.....पण हे स फक्त स्वप्न नसेल तू तिथून काहीही घेऊन येऊ शकतोस.....अगदी काहीही"
दीपक ने हात पकडून अशोकला दिलासा दिला
"हे बघ अशोक.....आपण गरिबी बघितली आहे....लहानपणी तू मदत करत होतास आता मदत करायची जबाबदारी माझ्यावर आहे...."
अशोकने न काही बोलता मान डोलावली....दीपकने सगळे नियम सांगितले....मध्यरात्रीनंतर ह्या दिव्याच्या दांड्यावर जी खरवरीत लाल नक्षी आहे त्यावर आपल्या उजव्या हाताचा अंगठा ठेवायचा....तिथे गेल्यावर त्या दिव्याच्या प्रकाशात त्या खोलीत आपले स्वप्न बोलून दाखवायचे आणि तासाभरात परत यायचे असा साधा सोप्प विधी होता.....हे सगळं समजावून दीपक निघून गेला....अजूनही अशोकचे मन साशंक होते....."असलं काही असत का??....हा दिप्या मला वेड्यात काढून तर नाही गेला??....prank वैगेरे तर नसेल ना??" अस काहीसं अशोकचं डोकं चालत होत.....पण अशोकचा स्वतःच्या बुद्धीवर खूप विश्वास होता त्याला माणसं ओळखता येत होती....समोरच्याचा चेहरा त्याचे बोलणे बघून अशोक ओळखू शकत होता की हा खर बोलतोय की खोटं......पण दीपकच्या बाबतीत अशोक ठाम होता....त्याच्या एकूण बोलण्यावरून तरी वाटत होतं की तो खर बोलत आहे....शेवटी अशोक ने हे सगळं करायचं ठरवलं.....अजूनही त्याचा ह्या सगळ्यावर विश्वास नव्हताच.....त्याने ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याबद्दल हसत हसत मध्यरात्रीचा अलार्म सेट केला आणि अशोक झोपी गेला
रात्री अचानक अलार्म वाजला तसे अशोक डोळे चोळत उठला.....बाजूच्या टेबलावर तो दिवा होता....डोळ्यात झोप असलेल्या जड डोळ्यांनी त्याने तो दिवा उचलला आणि दिव्याच्या दांड्यावरच्या खडबडीत नक्षी वर आपल्या उजव्या हाताचा अंगठा ठेवला.....एखादा दंश व्हावा ना....तशी तीव्र कल अशोकच्या डोक्यात गेली...वेदना खूप तीव्र होती.....पहिली प्रतिक्रिया म्हणून अशोकने हात झटकला....पण तो दिवा अशोकच्या बोटांना चिटकून बसला होता...तीव्र कल अशोकच्या अंगात पोहोचली होती...तो उभं राहून हात झटकून तो दिवा हातातून सोडवण्याचे प्रयत्न करू लागला..त्याने तो दिवा ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण तो दिवा आता अशोकच्या शरीराचा एक अंग बनला होता....एक करंट लागल्याप्रमाणे अशोक तळमळत होता....अखेर एखादी उभी आलेली काठी खाली कोसळावी ना तसा अशोक धाडकन खाली कोसळला.....त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा सगळीकडे मिट्ट काळोख होता....एवढा गडग की समोरचे काहीच दिसत नव्हते.....अशोक घामाने भिजला होता....तो लाईटचे स्विच शोधू लागला पण लांब लांब पर्यंत काहीच हाताला लागत नव्हतं....तो जसा चालत होता तेव्हा वाळलेल्या पानांची ती खर्रर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्रर पायात वाजत होती शिवाय पानांची सळसळ आणि रातकिड्यांची किर किर दुरून येणारा तो प्राण्यांच्या पक्ष्याचा ओरडण्याचा आवाज हे सगळं ऐकून त्याला समजलं होत की तो आपल्या रूम मध्ये नाहीय......अशोक आता अजून घाबरला गडद अंधारात तो एखाद्या आंधळ्याप्रमाणे इकडे तिकडे फिरत होता.....धापा टाकत टाकत चालत असताना तो थोडा घाबरला त्याचे अंग थरथरत होते......तो त्या अंधारात
"कुणी आहे का इथे??? दीपक??? दीपक???"
अस ओरडत होता.....दूर कुठून तरी स्त्रियांचे मादक आवाज काही नाचगण्याचे आवाज येत होते.....अचानक अशोकच्या शरीरात करंट लागल्या प्रमाणे एक तीव्र वेदना झाली....शरीर ओढून उजव्या हातात एकवटल्यासारखं अशोकला वाटत होतं.....अचानक त्याच्या हाताला चिटकलेला तो दिवा पेटला.....उजेड झाला..... ह उजेड मर्यादित होता काळ्याकुट्ट अंधारात एखाद्या छोट्या दिव्याचा उजेड जेवढं दिसणे अपेक्षित होत तेवढंच दिसत होतं....अशोकने तो दिवा सगळीकडे फिरवून बघितला......काही झाडे पायात पालापाचोळा एवढंच काहीसं दिसत होतं.....बाकी सगळीकडे तो भडक अंधार होता.....आता इथून पुढे जायचं कुठे आणि कसं?? हा विचार अशोकच्या मनात येतच होता इतक्यात अचानक त्या दिव्याची जी ज्योत जळत होती ती थोडी उजव्या बाजूला झाली....अशोकने जेव्हा जेव्हा तो दिवा वेगवेगळ्या दिशेला फिरवला तेव्हा तेव्हा ती दिव्याची ज्योती एकाच बाजूला कलत होती....अशोक आता त्याच दिशेने चालू लागला.....ती ज्योत एकच साईडला झुकली होती ती एखाद्या कम्पस प्रमाणे अशोकला पुढचा रस्ता दाखवत होती.....जस जसे अशोक जवळ जात होता तस तसे मंद संगीत आणि स्त्रियांचे मादक सूर ऐकू येऊ लागले.....अशोक त्या दिव्याच्या ज्योतीचा झुकावाचा पाठलाग करत पुढे चालला होता.....गारठा वाढला होता.....समोर धुके दाटले होते....दिव्याच्या उजेडात ते धुके अजून गूढ वाटत होते.....एका ठिकाणी येऊन अशोक थबकला.....समोर एक दगडी मजबूत बांधणीचे गेट होते.....भिंत उंच होती......अशोकच्या हाताला जो दिवा चिटकलेला होता तो त्याने उंच केला जिथपर्यंत प्रकाश जात होता तिथपर्यंत उभी आडवी ती भिंत पसरली होती.....पण हा दगड काळा नव्हता लाल होता....एखाद्या मौल्यवान लाल दगडावर उजेड पडल्यावर जसा चमकतो तसा तो लाल दगड चमकत होता....अशोक त्या दगडी भिंतीच्या दरवाज्यातून आत जाऊ लागला......विचित्र होती ही जागा.....एखाद्या दुसऱ्या दुनियेत असल्यासारखी.....इथली जमीन थोडी लालसर होती....जमीन थोडी मऊ होती म्हणजे पाय ठेवल्यावर ही जमीन हलकीशी दबत होती....अशोक थोडासा घाबरला होता....इथे येऊन त्याला 20-25 मिनिटे तर झाली होती....अजून 40 मिनिटे त्याच्याजवळ होती.....अशोक चालत होता एका ठिकाणी त्याने अंधारात दिवा फिरवला आणि तो दचकला.....प्रेतांची रास लावली होतो तिथे....आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या हाताला अशोकच्या हाताप्रमाणे दिवा चिटकलेला होता..पण ते सगळे दिवे विझले होते...एकमेकांवर लाकडे रचून ठेवतात ना तशी ती प्रेते एकमेकांवर रचून ठेवली होती.....ते दृश्य बघून अशोक पुरता किंचाळला.....स्वतःविषयी त्याला भीती वाटली......तो घाबरत त्या दिव्याच्या उजेडात चालू लागला......समोर एक दरवाजा दिसत होता त्यातून उजेड दिसत होता....त्या दरवाज्यातून आत जावे का?? अशोक प्रचंड घाबरला होता....अशोक च्या मागे त्या दिव्याच्या उजेडाची त्याचीच सावली त्याच्या मागे चालत होती.....अचानक त्या सावलीची हालचाल अशोकला जाणवली.....ती सावली आकार घेत होती......हे बघून अशोक अजून घाबरला.......तो जवळपास धावत धावत त्या दरवाज्या जवळ जाऊ लागला....अचानक त्याच्या कानात ऐकू येऊ लागला एक आवाज "४४" हा आवाज सतत ऐकू येऊ लागला....सोबत त्या समोर दिसणाऱ्या घरातून माणसाचे आवाज येत होते.....अशोक जवळपास धावतच त्या मोठ्या दगडी वाड्यात शिरला.....लहान लहान 10×10 च्या खोल्या होत्या त्या.....तिथून वेगवेगळे आवाज येत होते.....त्या व्हरांड्यात हाताला दिवा चिटकलेली चालत आपल्या रूम शोधत चालत होती......काहींची अवस्था अशक्त त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं....एखाद्या झोंबी प्रमाणे ते दिव्याच्या उजेडात रूम शोधत चालले होते.....काही लोक खाली कोसळले होते आणि ते झोंबी सारखे चालणारे लोक त्यांच्या अंगावर पाय देऊन चालत होते.....आजूबाजूचे ते लाल वातावरण एखाद्या नरका सारखे होते.....पण आत दरवाजे नसलेल्या खोलीत खरा स्वर्ग होता.....सोन्याची नाणी वेचणारे तरुण.....काही खोल्यात सुंदर नग्न स्त्रिया....काहींचे चेहरे एखाद्या अभिनेत्रीशी मिळते जुळते.....काहीजण रंगीत खोलीत उंची दारू पीत होते......म्हणजे ज्या ज्या गोष्टी ते खऱ्या आयुष्यात भोगू शकत नव्हते त्या त्या गोष्टी ते लोक इथे पूर्ण करत होते.....मंद दिव्याच्या उजेडात अशोक ही दुनिया बघून घेत होता....प्रत्येक खोलीत प्रत्येक जण अशी अशी स्वप्ने पूर्ण करून घेत होते की जी फक्त स्वप्नवत होती....अशोक जस जसा पुढे जात होता तस तस त्याच्या मनातील लोभ वाढत होता....त्या सुंदर स्त्रिया,ते अमाप सोनेणाने बघून अशोक पुरता भारावून गेला होता.....त्याच्या हे लक्षात येत नव्हतं की खाली निपचित पडलेल्या मानवी देहावरून तो चालत जात आहे.....अखेर चालत चालत तो पोहोचला रूम नंबर ४४ जवळ.....एक लाल भडक दगडांची छोटी खोली... .अशोक त्या खोलीत पोहोचला त्याने एकवार आपल्या अंगठ्याच्या चिटकलेल्या दिव्याकडे बघितलं.....आता तो आपल्या आयुष्यातील इच्छा पूर्ण करू शकणार होता......त्याने आधीच काहीतरी ठरवलं होतं......त्यानुसार त्याने तो दिवा समोर धरला आणि डोळे बंद करून मनातील इच्छा बोलू लागला..........(क्रमशः)
