द लास्ट राईड
भाग क्र :- २
पहिल्या भागाची लिंक
https://www.facebook.com/share/p/1E819mGZYx/
इथून जाताना लोक बराच पैसा,सोनं घेऊन जात होते कुणी आपली शारीरिक भूक भागवत होते पण ह्या जागेच्या इतिहासातली पहिली घटना होती की कुणाला तर वर्ल्ड वॉर चा इतिहास जाणून घ्यायचा होता.....अशोकला वर्ल्ड वॉर वरील लिखाण खूप आवडायचे ह्यावर लिहलेली ओळ आन ओळ त्याने वाचून काढली होती.....त्याला इतिहासाची खूप आवड होती.....खास करून 1940 साली झालेल्या वर्ल्ड वॉर बद्दल जाऊन घ्यायला त्याला विशेष आवडे.....पण त्यावर जेवढी पुस्तके लिहली गेली होती ती एका लायब्ररी मध्ये ठेवली होती आता काही वर्षांपूर्वी विरोधकांनी त्या पूर्ण लायब्ररीला आग लावली होती....सगळा इतिहास सगळी पुस्तके जळून खाक झाली होती.....फ्रांस देशात जाऊन त्या लायब्ररी मध्ये प्रवेश घेऊन एक अन एक शब्द वाचून काढायचं अशोकच स्वप्न आता एक स्वप्नच राहील होतं.....पण आता इथे येऊन त्याच्या आशा परत एकदा पल्लवित झाल्या....अशोक आपल्या आयुष्यात खुश होता......त्याची बौद्धिक भूक थोडी जास्त होती..त्यात 1940 चे फिली किनाऱ्यावरचे युद्ध त्याला खूप रंजक वाटत होतं.....मित्र सेनेने फिली किनारा काबीज केला पण पुढे काय झालं???हे त्याला जाणून घ्यायचं होतं....कारण हे युद्ध खूप मोठं चाललं होतं.....अशोक रूम नंबर 44 मध्ये आला....रूम मध्ये येताच त्याच्या बोटापासून तो दिवा वेगळा झाला....तो दिवा अशोकने समोरच्या एका टेबलावर ठेवला आणि त्याने त्या खोलीत आपली इच्छा बोलू दाखवली
"मला 7 जून 1940 साली फिली किनाऱ्यावर झालेले पूर्ण युद्ध दाखवा....त्याचे परिणाम सुद्धा दाखवा"
एवढे बोलताच पूर्ण खोलीत धूर पसरला.....अशोक त्या धुरात हरवून गेला होता.....हाताचा पंखा करून अशोक तो धूर हटवू पाहत होता अचानक त्याला बंदुकांचे तसेच गाड्यांचे लोकांच्या विव्हळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले.....त्याच्या बाजूने सैनिक पळत होते...कुणाला गोळी लागून मरून पडत होते... शेकडो गोळ्या झाडल्या जात होत्या.....सगळं काही अशोकच्या समोर होत होते....तो मोठ्या स्क्रीन वर सिनेमा बघावा ना तस ते युद्ध बघत होता....अगदी 3d मध्ये...सैनिक रणगाडे सगळं काही त्या छोट्या खोलीत धावत होतं....समुद्राच्या किनाऱ्यावर हे सगळं युद्ध सुरू होतं....अशोक तिथून त्या किनाऱ्यावरच पोहोचला होता सगळं बघत होता....शेकडो मृतदेह पाण्यावर तरंगत होते रक्तामुळे किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा सुद्धा लाल भडक बनून येत होत्या..त्याने आता कॅप्टन फिलिपला पण बघितले होते ज्यांनी ह्या युद्धाची रणनीती आखली होती....हे सगळं प्रत्यक्ष बघून अशोक च्या डोळ्यात फक्त आनंदाश्रू होते.....जनरल फिलिपला तो अगदीच जवळून बघत होता....आपण जे जे बघत आहोत ते ते अशोक एका वहीत लिहून काढत होता....जास्त वर्णन करून लिहण्याची त्याला गरज भासली नाही कारण वर्णन समोर घडत होते.....वर खाली बघत बघत अशोक बेफाम पण लिहीत होता.....सैनिक लढत होते अचानक समोरचे दृश्य धूसर होऊ लागले.....सगळें सैनिक हवेत विरघळून जात होते....अशोकने आपल्या शरीराकडे बघितले ते सुद्धा हवेत विरघळत होते.....अशोक घाबरून धावू लागला.....पण त्याचे पूर्ण शरीर हवेत विरघळत होते.....अशोकला खाडकन जाग आली तेव्हा तो आपल्या खोलीत होता.....त्याने घड्याळाकडे बघितले त्या घड्याळामध्ये बरोबर एक तास झाला होता.....म्हणजे वेळ संपली होती....टेबलावर तो विझलेला दिवा होता.....अशोक परत आपल्या खऱ्या आयुष्यात आला होता.....एक कमालीचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते....समोर एक वही होती.....त्याने ती वही उघडली त्यात खरोखरच अशोकने युद्धाचे वर्णन केले होते.....अशोकने आपल्या शरीराकडे बघितले त्याच्या अंगावर रक्ताचे काही डाग होते....साहाजिक ती लढाई अशोकच्या समोर होती आणि अगदी खरीखुरी होती....एक दोन सैनिकांचे रक्त अशोकच्या अंगावर होते.........
भन्नाट होतं हे सगळं.....आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं अशोकला वाटत होतं...ज्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात अशोकने पूर्ण आयुष्य घालवले ते सगळं आता अशोकच्या समोर घडत होते.....पण त्याने ती लढाई पूर्ण कुठे बघितली होती??? 1 तास होता त्याच्याकडे त्यातले फक्त 15 मिनिटे तो ही लढाई बघू शकला होता......म्हणजे दीपक जे बोलत होता ते खरे होतं......हा दिवा आणि ती जागा आपल्याला आयुष्यात सगळं काही देऊ शकते.....अशोकला धनाची कधीच आस नव्हती....तो आहे त्यात अगदीच खुश होता.....आता दिवा हाती आलाच आहे तर आधी तो सगळा इतिहास लिहून काढू.....कारण हा महत्वाचा दस्तऐवज ठरेल सगळं काही फिक्स होत.. .अशोकने सकाळची लेक्चर्स वैगेरे आवरती घेतली आणि कधी एकदा रात्र होते अस त्याला झालं होतं.....तो इथे एकटा राहत होता आता मध्यरात्र व्हायची वाट अशोक बघू लागला....त्याने गजर सेट केला....मध्यरात्र झाली होती.....गजर वाजला तसा अशोक जागा झाला....पहिल्या वेळेस त्याने ४४ नंबर पोहोचण्यास वेळ लावला होता कारण अशोक तेव्हा खूप घाबरला होता पण त्यानंतर त्याने जे बघितलं होत ते विलक्षण होतं....ह्यावेळी मात्र अशोकमध्ये भीतीचा लवलेश नव्हता उलट एक वेगळाच उत्साह त्याच्या चेहऱ्यावर होता......डाव्या हातात वही उजव्या हातात तो दिवा....अशोकने उजव्या हातात तो दिवा पकडला आणि आपला अंगठा त्या नक्षी वर ठेवला.....अंगात एक करंट संचारला अशोकच्या तोंडून हलकेच आआह असे शब्द आले जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो त्या गडद अंधारात होता......अशोक त्या अंधारात चाचपडू लागला.....हाताला वाळलेल्या झाडांची पाने आणि मानवी त्वचे सारखी मऊसर जमीन लागली.....अशोक वेगाने चाचपडत होता.....अखेर त्याला त्या अंधारात तो दिवा सापडला....अशोक लगबगीने सगळं करत होता....त्याने त्या नक्षीवर आपला अंगठा लावला तो दिवा पेटता झाला....अशोकच्या सभोवती प्रकाश झाला आणि त्याच्या मागे ती त्याची हलती सावली......अशोक चालू लागला आता वाटेत पडलेले लोक त्याला अस्वस्थ करत नव्हते....तो आपल्या रूम नंबर ४४ कडे वेगाने चालला होता....त्या लाल दगडी इमारती मध्ये येताच आतून येणारे मादक स्त्रियांचे आवाज तसेच अशक्त होऊन धापा टाकीत वाटेत पडलेल्या लोकांचे आवाज अशोकला जराही अस्वस्थ करत नव्हते दिव्याच्या उजेडात तो आपली रूम नंबर ४४ शोधू लागला अखेर त्याला ती रूम सापडली तो झटकन त्या रूम मध्ये गेला आत जाताच तो दिवा हातापासून वेगळा झाला....पेटता दिवा अशोकने समोरच्या टेबलावर ठेवून दिला....त्याने आजही त्या फिली किनाऱ्यावरचे युद्ध दाखवण्यास विनंती केली.....अशोकच्या विनंती नुसार त्या दिव्याच्या उजेडात त्या ४४ नंबर खोलीने अशोकला युद्धाच्या मधोमध उभे केले....सगळं युद्ध तो अनुभवत होता.....आपल्या वही मध्ये सगळी नोंद करत होता....त्या सैनिकांच्या बरोबर तो ही चालत होता.....फिली किनाऱ्यावर चे युद्ध वर्ल्ड वॉर मधील सगळ्यात महत्वाचे युद्ध होते....जे तब्बल 10 दिवस रंगले होते.....अशोक जवळपास 8 दिवस रूम नंबर ४४ मध्ये येऊन हे युद्ध बघत होता......एक विचित्र अशी ओढ होती ह्या लाल जागेत म्हणजे 8 दिवस अशोकने स्वतःला खऱ्या आयुष्यापासून दूर ठेवले होते म्हणजे 8 दिवस तो घरातून बाहेर पडला नव्हता.....एका वेगळ्याच धुंदीत त्याने हे 8 दिवस काढले होते......अशोक कमालीचा अशक्त झाला होता त्याच वजन 80 किलो वरून आता 38 किलो वर आले होते....ती जागा आपल्याला आतून कुरतडत आहे ह्याचे काहीच भान अशोकला नव्हते....4,5 दिवस तो घरातून बाहेर सुद्धा पडला नव्हता....त्याला सगळ्या गोष्टींचा विसर पडत चालला होता....कदाचित हा त्या जागेचा प्रभाव असावा.....अशोकला आता नीट उभं सुद्धा राहता येतं नव्हतं.....तरीही तो ह्या युद्धाच्या 10 व्या दिवशी काय झालं हे जाणून घेण्यास उत्सुक होता......5 व्या दिवसानंतरच अशोक त्या जागेत लडखडत चालला होता....अगदी तिथे खाली पडलेल्या लोकांच्या अंगावर पाय देऊन धडपडत तो रूम नंबर ४४ पर्यंत पोहोचत होता...आता तर त्याच्या दिव्याची ज्योत सुद्धा मंद झाली होती.....तरीही तो 10 व्या दिवशी मध्यरात्री त्या लाल घरात जायला तयार होता
रात्र झाली होती.....आज अशोकला कमालीचे अशक्त वाटत होते...त्याला आपली दैनंदिन जीवनातील कामे सुद्धा नीट करता येत नव्हती....2 दिवस तो बरा होता.....त्याला आवश्यक तो किराणा माल सुद्धा घेऊन आला होता पण 10 व्या दिवशी हातापायात मुंग्या आल्यावर तो अवयव कसा बधिर झाल्या सारखा भासतो तसे अशोकचे शरीर भासत होते....आज त्याने दिवसभर वेदनेत काढले होते....आजूबाजूला पडलेले रक्त तो पुसत होता..ते पुसताना त्याचे हात थरथरत होते खाली बघितल्या वर सुद्धा त्याला चक्कर मारत होती....10 वाजत आले होते....अचानक दरवाज्यावरची बेल वाजली....अशोक घाबरला.....कोण असेल??दार उघडताना तो 2 वेळेस धडपडला.....अखेर कसे बसे त्याने दार उघडले....समोर दीपक उभा होता.....अशोकला अस अशक्त बघून दीपक घाबरला....
"अरे अशोक काय हे??? केवढा बारीक झाला आहेस तू?? तुझी तब्बेत ठीक आहे ना??....."
अशोक धापा टाकत बोलत होता त्याला श्वास लागला होता
"अरे काही नाही थोडा आजारी होतो....तब्बेत ठीक नव्हती"
"तेच म्हंटलं जरा विचारपूस करावी.....त्या दिव्याचा वापर करून काही फायदा करून घेतलास की नाही??"
दीपकच्या ह्या प्रश्नाला अशोककडे उत्तर नव्हते.....आता ह्याला काय सांगावे?? तिथून सोने नाणे न आणता आपण इतिहास बघायला जातोय हे सांगणे म्हणजे आपला कुठे तरी पराभव झाल्या सारखं अशोकला वाटत होतं......
"अरे नाही रे प्रयत्न चालू आहेत ती जागा मी समजून घेत आहे आधी बघू आता पुढे.....तू काय घेणार चहा की कॉफी??.....अरे हो तुला कॉफी आवडते ना....घेऊन येतो थांब"
"अरे अशोक तुला नीट उभं राहता येईना.....चल बर आधी आपण डॉक्टर कडे जाऊ"
दवाखाना डॉक्टर हे शब्द ऐकून अशोकने आपली सगळी शक्ती एकवटली
"अरे नाही ठीक आहे मी.....तू बस बघू आधी....मी कॉफी बनवून आणतो"
अशोक लडखडत होता...त्याचा सूर जरा नाराजीचा होता कारण अजून 2 तासांनी त्याला तिकडे जायचं होतं ना.....पण हा दीपक येऊन बसला होता.....ह्याला कसतरी करून इथून घालवले पाहिजे होतं.... म्हणून अशोक लगबगीने कॉफी बनवू लागला....दीपक टेबलावर बसला होता....टेबलावरच दिवा ठेवला होता.....अशोक थरथरत धापा टाकीत कॉफी चे दोन मग घेऊन येत होता.....त्याचे हात थरथरत होते....त्यामुळे थोडी कॉफी खाली सांडत होती.....टेबलावर कॉफी चे दोन मग ठेवून अशोक दिपकच्या समोरच्या खुर्चीवर बसला....थरथरत्या हातांनी त्याने कॉफीचा मग उचलला आणि कॉफी चे घोट घेऊ लागला.....तिकडे दीपक सुद्धा कॉफी पिऊ लागला दीपकची करडी नजर अशोकवर होती.....अशोक कमालीचा विचित्र वागत होता.....लूज कपड्यात गुंडाळलेले त्याचे शरीर बघून दीपकने अशोकची आतापर्यंत 10 वेळा चौकशी केली असेल पण अशोकने दर वेळी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.....मध्यरात्र व्हायला अजून अर्धा तास बाकी होता.....अशोक सतत घड्याळात बघत होता....कॉफीचा मग बाजूला ठेवून अशोक दीपकला म्हणाला
"तू माझ्या लास्ट राईडला आला आहेस ना??"
अशोकच्या तोंडून अस वाक्य ऐकून दीपक थोडा दचकला.....
"क.....क.....काय बोलतो आहेस हे.....कसली लास्ट राईड"
अशोक हसत हसत म्हणाला
"अरे आज मी मरणार.....मग माझ्या जिवाच्या बदल्यात तुला मोठं गिफ्ट मिळणार"
दीपकच्या चेहऱ्याचा रंग उडाला....तो उठून उभा राहिला.....तो काही बोलणार इतक्यात त्याची जीभ त्याला जडजड वाटू लागली.....दीपक बधिर झाला होता म्हणजे त्याला बोलता येत नव्हती....त्याचे हातपाय काम करत नव्हते....अचानक दीपक जमिनीवर कोसळला.....तोंडातुन त्याच्या शब्दा ऐवजी फक्त गरम वाफ बाहेर पडत होती......तो जमिनीवर कोसळला होता
हाडांचा सांगाडा बनलेला अशोक जोरजोरात हसत होता....त्याने आपल्या अशक्त अंगातली सगळी ताकत एकवटली आणि दीपक ला उचलून परत खुर्चीवर बसवले.....दिपकची जीभ बाहेर आली होती तोंडातून लाळ गळत होती.....एखाद्या लकवा मारलेल्या माणसाप्रमाणे तो फक्त मान हलवत अशोक कडे बघत होता.....अशोक त्याच्याकडे बघून परत हसू लागला.....दीपकचे फक्त डोळे हलत होते....आपल्या अंगातील सगळं बळ एकवून दीपक अशोकचा हात धरू पाहत होता पण तो हात अशोकने झटकला आणि दीपक कडे बघत म्हणाला
"घोडा शांत व्हावा म्हणून त्याला जे औषध देतात ना.....त्यात थोडे बेकायदेशीर केमिकल मिसळून मी तुझ्या कॉफीत घातले होते....त्यामुळे काही तास तू कोणतीही हालचाल करू शकणार नाहीस...म्हणजे तू लॉक झाला आहेस एका जागी...हे मला करावं लागलं कारण माझ्या ह्या हालतीला तू जबाबदार आहे.....आता मी एवढा अशक्त आहे की तुझा प्रतिकार करू शकत नाही...आता मी काय सांगतो ते ऐकावं लागेल......अरे हो माझ्या लास्ट राईडला आला आहेस ना तू???........पण तस नाही होणार आता"
दीपकच्या अंगातील ते कंपन वाढू लागला........तो अशोक कडे बघत रागाने थरथरत आहे हे सगळं बघून अशोक म्हणाला
"हे सगळं व्यर्थ आहे दीपक....मला मारून त्या सैतानाला खुश करणार होता ना......त्यानेच तुला हे वैभव दिल आहे ना.......पण तुझ्यासाठी बॅड न्यूज आहे मी आता मरणार नाही...मी आता सावरलो आहे"
अस बोलून अशोक समोरच्या गणपतीच्या फोटोला नमस्कार करू लागला.......
"तुझ्या ह्या दिव्याचा खेळाचा आज शेवट दिवस होता ना??.....पण तुझ्या ह्या सगळ्या दिव्याच्या खेळाची हकीकत मी कालच 9 व्या दिवशी जाणून घेतली होती.....अरे हो 9 हा लकी नंबर आहे....आठव्या रात्री मी त्या स्वप्नातून बाहेर आलो.....खूपच अशक्त होतो.....इतकं की मला चालताही येत नव्हतं.....अरे हो तुझा हा दिवा मानवी रक्तावर चालतो ना?? मानवी रक्त त्याचे इंधन आहे......"
"आता तुला प्रश्न पडला असेल की हा अशोक ह्या चक्रातून बाहेर कसा पडला असेल??......मला ही प्रश्न पडला आहे म्हणजे मला त्या 9 दिवशी स्वतःचे भान नव्हते सतत मी रात्रीची वाट बघत होतो......एका अश्या मृगजळात अडकलो होतो जिथे तुमची शिकार होते......तिथून मी बाहेर कसा पडलो???......तर आठव्या दिवशी सकाळी मी माझ्या डोक्यात त्या दिव्याच्या उजेडात दिसणारे युद्ध बघत आठवत चाललो होतो.....मला रात्रीची ओढ लागली..4,6 दिवसांनी मी घरातून बाहेर पडलो होतो...एक दोन जण येऊन माझ्याशी बोलत होते "एवढे अशक्त कसे झाला" अस विचारत होता पण माझं कश्याकडे लक्ष नव्हतं........मी थोडं समान घेण्यासाठी बाजारात चाललो होतो.....रोज गणपतीच्या दर्शनाने माझ्या दिवसाची सुरुवात होत होती पण मी ह्या दिवसात गणपतीला जणू विसरलो होतो.....रस्त्याने चालताना बाजूला गणपती मंदिर होतं पण लहानपणी पासून गणेशभक्त असलेला मी.....गणपती हे नाव लक्षात सुद्धा राहिलं नाही....मी त्या गणपती कडे बघितलं सुद्धा नाही......मी चालत असताना कुणीतरी समोरून चालत येत होतं.....मी माझ्या धुंदीत होतो....अचानक कुणीतरी माझ्या कपाळाला शेंदूर लावला आणि कानात म्हणाला "सावर आता स्वतःला".......एक तीव्र करंट शरीरात संचारला.....झटक्यात मी भानावर आलो.....इकडं तिकडं बघितलं कुणीच दिसलं नाही...पण त्याची एक झलक मी बघितली तो एका साधूच्या वेशात होता...त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते..त्याचा हस्तस्पर्श माझ्या कपाळावर लागला आणि मी भानावर आलो......समोरच्या आरश्यात स्वतःला बघितलं.....खूपच शोषले होते मला.....अशक्त,दुबळा झालो होतो मी......कुणीतरी झटक्यात मला खऱ्या आयुष्यात परत आणलं होतं.......तू दिलेला दिवा कसा मला गिळंकृत करत आहे हे मला जाणवले.....मी माझ्या शरीराकडे बघत होतो.....कुणीतरी पिळून काढत होतं......पण कोण????तू तर मित्र माझा.....तू मला सधन होण्यासाठी मदत करत आहेस.....पण तो दिवा मला अशक्त करत होता......न जाणो कसा पण त्या संमोहना मधून बाहेर आलो होतो.....पण माझं जिज्ञासू मन मला शांत बसू देत नव्हतं......हा सगळा प्रकार मला जाणून घ्यायचा होता.....त्यासाठी एकच उपाय होता तिथे जाण्याचा.......
त्या दिवशी मध्यरात्री मी मी त्या अंधाऱ्या जागेत गेलो.....ह्या वेळी मात्र एक उग्र वास येत होता.....सडका.....आजूबाजूला मरून पडलेले लोक मला अस्वस्थ करत होतो.....उद्या परवा मी ह्या मृतदेहाच्या ढिगाऱ्यात असेन का???मी स्वतःला सावरत सावरत त्या रूम नंबर ४४ मध्ये गेलो हाताच्या अंगठ्याला तो दिवा चिटकलेला होताच त्याला मी हा प्रश्न केला
"ह्या जागेचा इतिहास काय?? आणि इथून बाहेर कसं पडायचं??"
मला विश्वास बसत नाही दीपक स्वतः मोठं होण्यासाठी तू मला एका निद्रिस्त सैतानाच्या पोटात पाठवलंस???.....अरे हो तुला कुठं माहीत ना की ती जागा काय आहे?? काय होत तिथे??तर ऐकून घे.....ती अंधारी जागा म्हणजे एका मायावी सैतानाचे पोट आहे.......तो आता अशक्त होऊन पाताळात पडला आहे.....कधी तरी जिवंत होईल तो.....पण शेकडो वर्षांपासून तो निद्रिस्त आहे.....त्याला जिवंत ठेवते ते म्हणजे मानवी रक्त...तुझ्यासारखे सैतानाला मानणारे अजूनही त्याला रक्त पुरवतात आमच्या स्वरूपात...तो दिवा जेव्हा अंगठ्याचा चिटकतो तेव्हा हळूहळू करत रक्त शोषून घेतो आणि आपल्या मालकाला जिवंत ठेवतो....बदल्यात तो मायावी सैतान ज्याने ही जिवंत ब्लडबँक इथे पोहचवली आहे त्याचे नशीब बदलून टाकतो....जसे तुझे आता बदलले आहे.....काय माहित माझ्या आधी सुद्धा तू किती लोकांना ह्या दृष्टचक्रात अडकवले असशील.....सगळं सगळं मी दिव्याच्या उजेडात वाचत होतो.....मी सुद्धा आता एक ब्लड बँक होतो.....मनात एक विचार येऊन गेला "किती दृष्ट असतात ना माणसं" पण शेवटी लोभ हा सुद्धा एक मानवी स्वभाव आहे हा......सोबत अजून एक मानवी स्वभाव आहे तो म्हणजे सूड घेणे"
दीपकच्या शरीरात अशोकने दिलेले विष पूर्णपणे भिनले होते त्याच्या फक्त डोळ्यांची हालचाल होत होती....जीभ जड झाल्याने तोंडातून फक्त ऊऊ ऊऊ उऊउमह असे आवाज येत होते.....मोबाईल मध्ये गजर होताच अशोक हसला आणि टेबलाच्या दुसऱ्या बाजूला खुर्चीवर बसला.....अशक्त अशोक अजूनही स्मितहास्य करत होता......मध्यरात्र झाली होती.....टेबलावर दोघांच्या मधोमध तो दिवा होता....आज अशोकचा शेवटचा दिवस होता.....दीपक कडे बघत अशोक हसला आणि म्हणाला......
"मी ह्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढला आहे म्हणजे ह्या दिव्यानेच मला तो मार्ग दाखवला आहे"
अस बोलून अशोकने आपला उजवा हात टेबलावर ठेवला....तो हात बघून दीपकचे डोळे विस्फारले....त्याच्या तोंडून तो उऊउ उऊउ हा आवाज वाढला होता कारण अशोकने आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून टाकला होता.....त्या दुसऱ्या दुनियेत जाण्याचे माध्यम अशोकने कापून टाकले होते.....दीपकची बेचैनी बघून अशोक जोर जोरात हसू लागला
"मी.....मी....हे बोट कापून त्या जगात जाण्याचा रस्ता तोडून टाकला आहे......पण तुला हे सगळं लक्षात नसेल कारण ती जागा 10 दिवस माणसाला भ्रमित ठेवते.....त्याला ह्या आयुष्यातले काहीच लक्षात नसते........"
अस बोलून अशोकने दीपकचा उजवा हात पकडला....आणि त्याचा अंगठा पकडून त्या दिव्याच्या जिथे ते मंत्र कोरले होते त्या जागी दीपकचा अंगठा ठेवला....दिपकच्या अंगात जोरदार करंट संचारला.....आणि तो टेबलावर बेशुद्ध झाला.....दिपकच्या बोटाला तो कंदील दिवा चिटकला होता....अशोक समजून चुकला की दीपक आता त्या पाताळात त्या लाल जागेत गेला आहे आता तो एका तासाने भ्रमित होऊन बाहेर पडेल...अशोकने दीपकला उचलले आणि तो ज्या गाडीने आला होता त्या गाडीत खाली नेऊन बसवले.....एका तासाने जेव्हा दीपक जागा झाला तेव्हा गाडी घेऊन घरी गेला..त्याला काहीच लक्षात नव्हतं ..अशोक नावाचा कुणी मित्र आहे हे सुद्धा दीपक च्या लक्षात नव्हतं...चार पाच दिवस अशोकने दीपकवर नजर ठेवली.....आता तो अशक्त बनला होता....तो चोरून दिपकच्या घरी सुद्धा गेला....त्याच्या खोलीत त्याने तिथून बरेच सोने आणले होते.....6,7 दिवसांनी दीपक प्रचंड अशक्त झाला.....त्याचे वजन निम्म्याहून कमी झाले होते.....क्षणभर अशोकला वाटले की दिपकचा अंगठा कापून त्याला मुक्त करावे पण परत अशोकच्या मनात आले ह्याने किती जणांनी आयुष्य बरबाद केली असतील स्वतःच्या स्वार्थासाठी.....10 व्या दिवशी अशोक दिपकच्या लास्ट राईड ला तिथे उपस्थित होता....दीपक इकडून तिकडे गेला खरा पण परत आलाच नाही....अशोक समजून चुकला होता की दीपक आता परत कधीच येणार नाही....
11 व्या दिवशीपासून अशोकच्या डोक्यात निरनिराळे विचार दाटू लागले....त्या रूम नंबर ४४ च्या वर्णनावरून अशोकने एक फॅन्टसी पुस्तक लिहले जे प्रचंड चालले.....खूप सारा पैसा,प्रसिद्धी अशोकच्या चरणी लोटांगण घालत होती.....अशोक आता एक यशस्वी लेखक बनला होता.......हे त्याचे नशीब होते की दीपक रुपी एक ब्लड बँक पोहचवल्याचे बक्षीस???......(समाप्त)
