कॅब!'
-डिसेंबर महिन्यातली ती एक सर्वसाधारण संध्याकाळ होती. सुमारे साडेसहा सात वाजत आले होते.हिवाळ्याचे दिवस असल्याने दिवस लवकरच मावळतीला आला होता.
रूपाला फॅक्टरी सोडायला तसा आज काहीसा उशीरच झाला होता.
कुठल्याही मेट्रोपोलिटन सिटीत संध्याकाळचे 'सात'म्हणजे खरं तर मुळी सुद्धा उशीर नसतो.पण कुठल्याही निमशहरी गावाच्या दृष्टीनं 'सात' म्हणजे तसा ब-यापैकी उशीरच होता. त्यातही रूपा आणि तिचा नवरा ऋतुराज यांची एक फॅक्टरी घाटाच्या पश्चिमेला,घाट उतरून गेलं की,सुमारे दीडएक किलोमीटरवर असलेल्या इंडस्ट्रिअल एरियात उभारलेली होती आणि साधारणपणे साडेतीन चार किलोमीटरचा घाट चढून वर आलं की,सुमारे दीडदोन किलोमीटरवर त्यांच्या शहराची हद्द जिथे सुरू होते,त्याच भागातल्या लोकल इंडस्ट्रिअल एरियात,तिच्या नव-याची म्हणजे ऋतुराजची आणखी एक फॅक्टरी आधीच उभारलेली होती.
तर त्यांच्या दोन्ही फॅक्टरीज गावापासून तशा दूरच होत्या आणि ऋतुराज आज दिवसभर घाटा अलीकडच्या,म्हणजे गावाजवळच्या,इंडस्ट्रिअल एरियातल्या त्यांच्या फॅक्टरीत काही कामामुळे गुंतलेला असल्यानं,आज दिवसभर रूपाला एकटीलाच घाटा पलीकडच्या दुस-या फॅक्टरीत जावं लागलं होतं आणि आता संध्याकाळी उशीर झालेला असूनही ती एकटीच घरी परतत होती.
कधीकधी योगायोगही असे चमत्कारिक असतात की,त्यांवर विश्वासही बसू नये.आजही असंच काहीसं घडलं होतं.आज
ऋतुराज त्यांच्या गावाजवळच्या फॅक्टरीत दिवसभर गुंतून राहणार होता आणि हे माहीत असल्यानं त्यानं आपली कार चालका बरोबर सर्व्हिसिंगसाठी धाडली होती आणि नेमका आजच रूपालीच्या कारला काही प्रॉब्लेम आल्यानं तिलाही कार चालकाबरोबर तिची कार गराजला धाडावी लागली होती.म्हणून आता संध्याकाळी घरी परतताना तिनं फॅक्टरीच्या सिक्युरिटीकडून एक कॅब मागविली होती.
तिच्या सवयीनुसार तिनं त्या कॅबच्या नंबर प्लेटचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला आणि मगच ती त्या कॅब मधून त्यांच्या घाटमाथ्यावरच्या फॅक्टरीत परत निघाली होती.
एकतर आतापर्यन्त रूपाला तशी कॅबच्या प्रवासाची वेळ फारशी कधी आलीच नव्हती,त्यामुळे असा प्रवास आणि तोही एखाद्या अनोळखी वाहन चालका बरोबर करण्याची तिची ही,खूप काळानन्तर आलेली,पहिलीच वेळ होती.
साधारणपणे निम्माअर्धा घाट चढून झाला असतानाच कॅबचा अनोळखी चालक क्षणभर मागे वळून बघत म्हणाला मॅडम,डावी उजवीकडे वा मागं वळून मुळीच बघू नका.दोन मोटरसायकलस्वार आपला पाठलाग करताहेत आणि मला माहिती आहे की,ते वाटमारी करणारे लुटारू आहेत.
कॅब मधल्या त्या अंधुकशा प्रकाशातही रूपाला कॅब चालकाचा चेहरा सर्वस्वी वेगळा आणि काहीसा ॲबनॉर्मल वाटला.पण तिनं स्वत:ला कसंबसं सावरलं आणि ती कॅबचालकाच्या चमत्कारिक चेह-याकडे पाहण्याचं टाळून,कॅबच्या फ्रंट ग्लास(windshield/windscreen)
मधून समोरच्या अंधा-या रस्त्याकडे बघत राहिली.
घाटातला तो नागमोडी वळणावळणाचा रस्ता कॅब चालकाच्या चांगला परिचयाचा असावा.कारण तशा अंधारलेल्या वेळीही तो कॅब अतिशय आत्मविश्वासानं चालवित होता.तशा अवघड रस्त्यावरही तो ब-याच वेळा सहजतेनं मागे वळून पहात होता आणि रूपा जरी त्याची नजर टाळत असली तरीही तिला चालकाचा चमत्कारिक आणि काहीसा भेसूर म्हणावा असा चेहरा अधूनमधून थोडा का होईना पण दिसत होताच आणि ओझरता का होईना पण अनेक वेळेला दिसल्यामुळे तो चेहरा आता तिच्या आठवणीत चांगलाच ठसला होता.
शेवटी एकदाची ती त्यांच्या घाटमाथ्यावरच्या फॅक्टरीत पोचली.कॅब मधून खाली उतरली आणि चालकाला कॅबचं भाडं(fare)देण्यासाठी आपल्या मनीपर्स मध्ये हात घालत कॅबकडे वळली तो काय,तिथं कॅब नव्हतीच.एका क्षणात ती किंचितही आवाज न करता अंधारात विझून जाणा-या दिव्यासारखी अदृष्य झाली होती.
कसं काय जाणे,पण अगदी धीट असलेली रूपासुद्धा,आता बरीच घाबरली होती.तिनं ऋतुराजकडं धाव घेतली.
तिला घाबरलेलं आणि घामानं चिंब भिजलेलं बघून घाबरलेल्या ऋतुराजनं त्याच्या केबिन मधला A/C बराच वाढविला,प्यूनला गार पाणी आणायला सांगितलं आणि रूपा पाणी प्याल्यावरआणि थोडी सावरल्यावर,तिची हकीगत ऐकून ती दोघंही लगेच जवळच्याच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायला धावली.
पोलिसठाण्यातल्या ठाणे इनचार्जनं त्यांना पहिला प्रश्न विचारला-
'तुम्ही कशातून प्रवास करीत होतात?'
त्यावर रूपानं ठाणे इनचार्जना सांगितलं-
'कॅब मधून.'
ठाणे इनचार्जनं कॅबचा नंबर विचारल्यावर,तिनं जो नंबर सांगितला,तो ऐकून ठाणे इनचार्ज चकित झाला आणि म्हणाला-
'शक्यच नाही.'
'का?'-
रूपानं विचारलं.
'अहो,सुमारे पंधरा दिवसापूर्वी संध्याकाळी याच सुमारास, याच कॅबला भीषण अपघात झाला आणि कॅब चालक तत्क्षणी ती कॅब उलटून,तिला आग लागून त्या आगीत जळून ठार झालाय.मग तो कॅब चालक आणि त्याची अपघातग्रस्त कॅब तुम्हाला आज मिळेलच कशी?'-
पूर्णपणे गोंधळलेला ठाणे इनचार्ज म्हणाला.
मग त्यानं रूपाला एका मृत व्यक्तीचं छायाचित्र दाखवून विचारलं-
'तुम्हाला घेऊन येणारी कॅब आणि कॅब चालक हेच तर नव्हते?'
आता केवळ चकित होण्याचीच नव्हे तर प्रचंड घाबरण्याची पाळी रूपा आणि ऋतुराज यांची होती,कारण कॅब चालक तर तो मघाचाच होता आणि कॅबही तीच होती.रूपानं याच कॅबच्या नंबर प्लेटचा फोटो काही वेळापूर्वी काढला होता आणि ती त्याच कॅब मध्ये बसली होती.
त्या उभयतांचे घाबरलेले चेहरे बघून,ठाणे इनचार्जनं ड्यूटी कॉन्स्टेबलला गरम चहा आणायला सांगितला.डिसेंबरच्या थंडीतही घामानं डबडबलेल्या त्या दोघांना तो वाफाळलेला चहा दिला.गरम चहा घेऊन थोडं सावरलेल्या त्या पतीपत्नीला मग ठाणे इनचार्ज पुढं सांगू लागले-
'पंधरा दिवसाखाली संध्याकाळी पॅसेंजर न मिळाल्यामुळं हीच रिकामी कॅब घेऊन,हाच चालक घाट चढून गावाकडे परतत होता.या घाटात गेले काही दिवस वाटमारी करणारी एक टोळी सक्रीय झाली आहे.त्या टोळीला अटक करण्या साठी आम्ही सक्रीय आहोतच.पण अद्याप आम्ही आमच्या कामात यशस्वी झालेलो नाही.तर त्याच वाटमा-यांनी ती रिकामी कॅब,पॅसेंजर असल्याचा बहाणा करीत,थांबविली आणि कॅब चालकाला कट्ट्याचा धाक दाखवित लुटण्याचा प्रयत्न केला.'
'कॅब चालकानं आपल्या बचावाचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात कॅब चालकाला गोळी लागली.कॅब उलटून तिला आग लागली आणि त्या भयंकर आगीत जखमी झालेला आणि प्रचंड भाजलेला तो कॅब चालक तडफडून तडकाफडकी ऑन द स्पॉट मेला.गेले दहाएक दिवस झालेत,हाच कॅब चालक विशेषत:संध्याकाळी एकट्या दुकट्या पॅसेंजरला,विशेषत: एकट्या स्त्री पॅसेंजरला त्या वाटमा-यांच्या कचाट्यातून वाचवितो,त्यांच्या मुक्कामावर सुखरूप सोडतो आणि येतो तसा लगेच नाहिसाही होतो. आज तोच अनुभव तुम्हालाही आलाय.'
'तेव्हा आता तुम्हा उभयतांच्या विनन्ती अर्जावरून त्या वाटमा-यांच्या विरोधात FIR नोन्दवितो आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा विश्वास देतो.तेव्हा इथून पुढं तुम्ही उभयता घाटातून जाता येता काळजी घ्या.'
ठाणे इनचार्जनं तक्रार नोन्दवून घेतली आणि रूपा-ऋतुराज पोलिस ठाण्यातून बाहेर पडले.
आता ती दोघंही घाटातून अवेळी आणि विशेषत: एकटं जाण्याचं टाळतात.
पण कधी तशी वेळ आलीच तर आजही त्यांच्या अगदीAC कारमध्येही घाम पुसतच घाट उतरतात आणि चढतात. अगदी आजही!
('संपूर्ण.')
------------------------------
('सोबतच्या छायाचित्रातील स्थळाचा आणि कथेचा संबंध नाही.' )
