कलावंतीण - भाग - २
त्या दिवशी सकाळी हिमांशू नेहमीपेक्षा लवकरच व्यवस्थित आवरून तयार झाला होता, गावाकडे जाण्यासाठी माझ्यापेक्षा तो जास्त उत्साही वाटत होता. मी काल वॉशिंग करुन आणलेल्या गाडीमध्ये आमच्या बॅग्स भरल्या, आणि सुहासचा निरोप घेवून आम्ही निघालो. दोनशे किलोमीटरचा प्रवास होता तो. शहराचे ट्रॅफिक मागे पडताच गाडी मोकळ्या रस्त्यावर वेगाने धावू लागली.
हिमांशू कारच्या म्युजिक सिस्टम वर त्याच्या आवडीची गाणी ऐकत बसला होता.
एका वळणावर गाडी हायवे सोडून एका कच्या डांबरी रोडवर वळवली, आणि तेथून पुढे माझ्या गाडीचा वेग चांगलाच मंदावला. आज अनेक वर्षांनंतर मी त्या रोडवरून चाललो होतो, वाटेतल्या ओळखीच्या खुणा निरखून पाहत मी हळूहळू 'संग्रामपुर' जवळ पोहोचलो. हिमांशू पण खिडकीच्या काचेतून बाहेरील दृश्य न्याहाळत होता.
गावाबाहेरच्या नदीवर आता एक छोटा पुल बनवलेला दिसत होता.
"नाना! तिकडे बघा, ते झाडं." हिमांशूने आवाज दिला.
हिमांशूने दाखवलेले ते झाड पाहताच काळजात कसे तरी झाले.
नदीपात्रा पासून काही अंतरावर असणारे ते सर्वात मोठे झाड आता फक्त उंचीनेच मोठे राहिले होते. एकही पान आणि पारंबी शिल्लक न राहिलेल्या, पुर्णपणे सुकलेल्या व वाळवी लागलेल्या त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या काळ्या कुट्ट फांद्या पाहणाऱ्यांच्या मनात भय उत्पन्न करत होत्या.
"आजूबाजूची सगळे झाडे हिरवीगार आहेत, मग हे एकच झाड का असे झालेय नाना?" हिमांशूला प्रश्न पडला.
"त्याला कलावंतीणीचा शाप लागला असेल" अगदी सहजपणे माझ्या तोंडातून वाक्य निघून गेले. माझे मन एका क्षणातच त्या भुतकाळातून फिरून आले होते. गेले अनेक वर्षे ज्या घटनेची साधी आठवणही आलेली नव्हती, ती अचानकच कशी ध्यानात आली ते समजले नाही.
"कलावंतीण म्हणजे काय हो नाना?"
"अं..! लेडी डान्सर म्हणता येईल तिला, ठिक आहे, ते बघ पुढे मंदीराचे शिखर, आपण लवकरच गावात पोहोचतोय."
आमची गाडी आता वेशीच्या कमानी मधून आत गेली होती.
गाव आधीपेक्षा बरेच बदललेले दिसले, एकेकाळी गजबजलेले जुने वाडे आता पडीक भकास दिसत होते. काही मंडळी शहरात स्थायिक झाले होते, काहीजण आपापल्या शेतामध्ये बंगले बांधून राहत होते, एकंदरीत गावातली वर्दळ आता कमी झालेली होती.
आमचे भाऊबंद सुद्धा असेच शेताजवळच्या वस्तीवर नवीन घरात राहायला गेलेले होते.
आम्हाला पुढील काही दिवस आता त्यांच्या घरी मुक्काम करावा लागणार होता.
★★★★★★★★★★★★
"आपल्या संग्रामपुर गावचे भूषण यशस्वी उद्योजक 'रामराव उर्फ नानासाहेब देशमुख' यांचा आज आपण सत्कार करणार आहोत. त्यांनी लहान असतानाच शहरामध्ये जाऊन त्यांचे उच्च शिक्षण पुर्ण केले, आणि त्यानंतर उद्योग धंद्यामध्ये त्यांचा ठसा उमटवला."
पुढे आणखी दहा पंधरा मिनिटे चाललेल्या भाषणामध्ये सरपंच आणि इतर पाहुणे उपस्थित गावकऱ्यांना माझ्याविषयी आणि गावातील इतर विकास कामाबद्दल माहिती देत होते,
त्यानंतर माझे आभाराचे भाषण होवून अखेर टाळ्यांच्या कडकडाटात माझा सत्कार समारंभ पार पडला.
सर्वांचे आभार व्यक्त करत मी पण घराकडे परत आलो.
हिमांशू गावाकडील वातावरणात चांगलाच रमला होता, त्याला त्याच्या वयाचे काही मित्र मंडळी पण भेटली होती, तसेच अनेक वर्षांनंतर आल्याने नातलगांचाही आग्रह असल्याने आम्ही गावातील आमचा मुक्काम आणखी काही दिवस वाढवायचे ठरवले.
हिमांशू वेळ मिळेल तेव्हा मला बाहेर जाण्याचा आग्रह करत असे. आम्ही शेतामध्ये, रान माळावर भटकायचो. माझ्या लहानपणी गावाच्या आसपास जी लहान सहान मंदिरे होती, ते पुन्हा पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. त्यादिवशी सकाळीच मी भटकंती साठी बाहेर पडलो, हिमांशू पण सोबत निघाला होता. फिरता फिरता आम्ही नदीच्या काठावर पोहोचलो, हिमांशूची नजर तिराच्या पलीकडे असणाऱ्या त्या सुकलेल्या झाडावर पडली, तो एकटक तिकडेच पाहु लागला.
"नाना! तुम्ही त्यादिवशी काहीतरी सांगत होतात, त्या पलीकडच्या झाडाविषयी, त्याला कुठल्यातरी कलावंतीणीचा शाप लागला की असच काहीतरी म्हणाले होते, ते सांगा ना!"
हिमांशूचा प्रश्न ऐकून मी पुन्हा भुतकाळात गेलो.
"आता मला तितकेसे नेमके आठवत नाही बाळ! पण मी जेव्हा तुझ्या एवढा होतो ना, तेव्हा हे झाड असे नव्हते. हिरवेगार, टवटवीत, उन्हाच्या वेळी दाट सावली देणारे होते. जमीनीपर्यंत पोहोचणाऱ्या पारंब्या होत्या त्याच्या. पण नंतर तेथे एक घटना घडली आणि त्यानंतर हे झाड कायमचे सुकून गेले बघ"
मी माझ्या स्मरणशक्तीला ताण देऊ लागलो.
"काय झाले होते नेमके नाना? मी गावात आल्यापासून त्या झाडाबद्दल विचार करत आहे, गावातील काही मुलांना पण मी त्याबद्दल विचारले, पण कोणालाही त्याबद्दल माहिती नाही"
"आजकालच्या मुलांना त्याबद्दल कसे माहित असणार हिमांशू? ती घटना तेव्हाची आहे जेव्हा मी तुझ्या पेक्षाही लहान होतो."
★★★★★★★★★★★★★★★★
"रामा! आज संध्याकाळी काय करतोय रे?" वसंताने विचारले.
"काही नाही मळ्यात जाणार होतो "
"मळ्यातून आल्यावर माझ्याबर येतोस का? गावात तमाशा येणार हाये आज?"
"तमाशा? पण तिथं आपल्या सारखे लहान मुलं जात नसतात, मोठी माणसं जातात, कोणी आपल्याला तिथं पाहिलं तर?"
"अरे काय नाही व्हतं, चल तु फक्त, सहा वाजता जाऊ, आठच्या आत परत येऊ घरी, मी पण कधी बघितला नाही तमाशा कसा असतोय ते"
"बरं! येतो मी संध्याकाळी तुझ्या घरी, जाऊ आपण."
राम ने वसंतला होकार दिला.
संध्याकाळी मळ्यातून परत यायला रामला जरा उशीरच झाला होता, ठरल्याप्रमाणे राम वसंताच्या घरी गेला, पण वसंत कुठेतरी बाहेर गेला असल्याची माहिती त्याला मिळाली.तो कुठे गेला होता हे फक्त रामलाच माहिती होते.
पण ते ठिकाण गावाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात होते, तेथे आपण एकट्याने कसे जावे? असा प्रश्न त्याला पडला.
शेवटी हताश होऊन घरी परत आल्यानंतर त्याला यशवंतची आठवण आली. यशवंत हा त्याच्या शेजारच्या वाड्यात राहणारा, त्याच्याच भावकी मधला. भारदस्त पैलवान गडी असणारा यशवंत वयाने रामपेक्षा बराच मोठा असला तरी दोघांचे चांगले जमायचे. थोडावेळ विचार करून तो त्याच्या घरी गेला.
"येसूदादा! माझ्याबर येतोस का?"
"कुठं जायचंय?"
"गावाबाहेर, तिकडं तमाशा आलाय आज. वसंताबी गेलाय तिकडं"
"हटं! उद्या शाळेपाशी कुस्तीचा आघाडा हाये. तिथं जाऊ आपण; यंदाच्याला भाग घेतोच मी आखाड्यात" यशवंताने दंड फुगवला.
"तिकडबी जावू उद्या, पण आज माझ्याबर चल की, तमाशा कसा असतोय मी बघितला नाही कधी"
"असं म्हणतोस, चल मगं..मी पण लहान असताना कधीतरी बघितला होता, आता काय नेमकं आठवत नाही त्यात काय असतं ते; पर आपण दोघेच जावू, अजुन कोणाला बरोबर घेवू नकोस"
यशवंत राम सोबत येण्यास तयार झाला. त्याने सदऱ्यावर कोट चढवला, डोक्यावर फेटा बांधून कपाळावर गंध लावलाआणि रामला घेवून चालत चालत निघाला.
अर्धा तास चालल्यानंतर ते गावाबाहेरच्या त्या मोकळ्या पटांगणात पोहोचले जेथे एक तात्पुरता मांडव उभारून तमाशाचा कार्यक्रम भरवण्यात आलेला होता.
गावातील अनेक हौशी मंडळी तेथे जमलेली होती. तसेच आजुबाजुच्या गावातील काही रसिक मंडळीसुद्धा तेथे तमाशाचे मनोरंजन पाहण्याच्या हेतूने जमलेले होते.
यशवंत आणि राम पोहोचले तेव्हा गण-गौळण रंगात आलेली होती.
"जरा उशीरचं झाला वाटतं राम्या आपल्याला" गर्दीतून वाट काढत ते दोघे रंगभुमीच्या समोरच जावून बसले.
गौळण संपली आता पुढील कार्यक्रम लावणीचा होणार होता. ढोलकीचा आवाज खणखणू लागला, हलगी तुणतूणे वाजु लागले. पेटी आणि इतर अनेकविध वाद्यांच्या साथीने सुरु असलेल्या ठसकेबाज गाण्यांच्या तालावर नऊवारी नेसलेल्या आणि भडक शृंगार केलेल्या दहा बारा तरुण नृत्यांगना त्यांची अदाकारी सादर करु लागल्या. त्यांच्या पायात बांधलेल्या चाळांचा आवाज वाद्य संगीतामध्ये वेगळाच रंग भरत होता. एका पाठोपाठ एक गाण्यांच्या चालीवर रसिक ठेका धरू लागले. टाळ्या, शिट्ट्या आणि हवेत भिरकणारे फेटे यांनी वातावरण भारावून गेले, रंगमंचावर पैशांचा वर्षाव सुरु झाला.
राम आणि यशवंतपण त्या सर्वांसोबत कार्यक्रमामध्ये रंगून गेले होते. बहुतेक प्रेक्षकांची नजर रंगमंचाच्या मधोमध असणाऱ्या प्रमुख नर्तकीवर खिळलेली होती, पण यशवंतची नजर मात्र तिच्या पाठीमागे कोपऱ्यात असणाऱ्या एका सहकलाकार नर्तकीवर होती, जिचे नृत्य कौशल्य आणि अदाकारी इतर नर्तकींच्या मानाने तितकेसे प्रभावी वाटत नव्हते. तिचे हावभाव इतर कलाकारांसारखे उत्तेजित नव्हते, जी इतर कलाकारांच्या तुलनेत नवीन असल्यासारखी जाणवत होती, आणि त्यामुळेच तिच्यावर विशेष कोणाचे लक्षही जात नव्हते; फक्त यशवंतला सोडून.
लावणी गीते संपली, वगनाट्य सुरु झाले. काही वेळ त्याने वाट पाहिली, ती आता पडद्याच्या मागे गेलेली होती.
"चल रामा!" ते दोघे गर्दीतून वाट काढत तेथून बाहेर आले आणि आपल्या वाटेला लागले.
"अजून किती दिस आहे रे हा तमाशा गावात?" यशवंत ने रामला विचारले.
"मला काय माहित"
"उद्याला पण येवू आपणं बघायला, दुसर्या कोणाला सांगू नको"
"उद्या? पण मला काय एवढा खास नाही वाटला तमाशा"
"अरं, दररोज नवनवीन कला असत्यात. उद्या येवून बघ तु" त्याने रामला पटवले.
दुसर्या दिवशी सायंकाळी पुन्हा ठरल्याप्रमाणे ते दोघे तमाशाकडे गेले. तेथे गेल्यावर यशवंतने चौकशी केली असता. पुढील गावाची यात्रा येईपर्यंत म्हणजे अजून किमान दोन महिने तमाशाचा फड त्यांच्या गावातच राहणार होता. तोपर्यंत दर आठवड्यातून तीन दिवस तमाशाचे प्रयोग होणार होते. ही सर्व माहिती समजल्यावर यशवंतला जरा बरे वाटले.
आज ते दोघे काल प्रमाणे रंगमंचाच्या अगदी समोर न बसता एका बाजुला बसले होते. जेथून त्याला सर्व नृत्यांगना मधून 'ती' व्यवस्थित दिसणार होती.
कार्यक्रम सुरु असताना अधूनमधून राम सोबत गप्पा गोष्टी करत यशवंत त्याला कंटाळा येणार नाही याची पण काळजी घेत होता. गण गौळण संपली आणि प्रमुख आकर्षण अर्थात लावणीचा कार्यक्रम सुरु झाला, आज लावणीचे गीते काल पेक्षा वेगळी होती. नाचणारे आणि वाजवणारे कलाकार आणि समोरील प्रेक्षक रंगात आले होते. आज यशवंत तिला कालच्या पेक्षा जास्त जवळून आणि निरखून पाहत होता. तिच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कलाकारावर आणि नर्तकींवर त्याची नजर पण पडत नव्हती. आणि विशेष म्हणजे आज तिला सुद्धा त्याची न हलणारी नजर जाणवली होती, आधीच नवशिकी ती, त्याच्या नजरेने अजूनच बावरली, पण काही वेळच..
समोरील प्रेक्षकांमध्ये बसलेला, डोक्यावर फेटा बांधलेला, आणि अधूनमधून नवीन उगवलेल्या मिशीच्या आकड्यांवर बोटे फिरवत असणारा तो रुबाबदार तरुण आपल्यावर नजर रोखून आहे, हे समजताच तिचे हावभाव आता किंचीतसे बदलले होते आणि हालचाली आता आधीपेक्षा जास्त डौलदार वाटत होत्या.
★★★★★★★★★★★★★★★
दुपारची वेळ होती. पारावर एकटाच बसलेला यशवंत काहीतरी विचार करत होता, तेवढ्यात राम त्याला कुठेतरी जाताना दिसला.
"ऐ रामा! हिकडं ये की, कुठं चाललास?"
"पोहायला चाललोय विहीरीवर, सिध्या वाट पाहतोय माझी तिकडं"
"उद्या जा पोहायला, आता माझ्या बरं चल, तमाशाच्या फडाकडं"
"आत्ता? ते कशाला? आज तर शनिवार हाये, तमाशा फक्त तीनच दिवस असतो ना? तो आता सोमवारी संध्याकाळी असलं! मग आज दुपारी तिकडं कशाला?" रामाने त्याची शंका विचारली.
"अरे माझ काम हाये जरा तिकडं, अंधार पडायच्या आत माघारी येऊ आपणं"
"हे बघ येसुदादा; पहिल्या दिवशी मी तुला तमाशाला घेवून गेलो होतो, पण त्यानंतर सात-आठ वेळा तु मला घेऊन गेलास. पण आता मला कंटाळा यायला लागलाय, यापुढं तुला जायचं असेल तर तु एकटाच जात जा. मी नाही येणार तुझ्याबरं" रामा कंटाळला होता.
"बरं! मग अप्पांना सांगू का? तु एवढ्या वेळा तमाशा बघाया गेला होतास म्हणून?"
"नको नको; मी येतो तुझ्या बरं. पण फक्त एवढ्या वेळेसच बरं का." अखेर रामा यशवंत सोबत येण्यासाठी तयार झाला. पण आज तिकडे कशासाठी जायचे आहे हे त्याला समजत नव्हते.
ते दोघे गावाबाहेर जेथे तमाशाचा फड होता तिकडे चालत निघाले. रमत गमत गप्पा मारत अर्धातास ते चालले असतील, फड अजुनही पंधरा मिनिटांच्या अंतरावर होता, पण त्या वाटेवरच यशवंतला त्यांचे फडाच्या दिशेने जाण्याचे कारण, म्हणजेच 'ती' पाठमोरी दिसली.
डोक्यावर सरपणाची मोळी घेवून झपझप पाऊले टाकत ती फडाच्या दिशेने निघाली होती. आज तिने कोणताही विशेष साजशृंगार केलेला नव्हता. अंगावर साधे जरीचे लुगडे होते, हातात चार काचेच्या बांगड्या,पायात छोटे पैंजण होते, गळ्यामध्ये धातुचा एकही दागिना नव्हता, फक्त एक जाडसर काळा धागा बांधलेला होता. बर्याच अंतरावरून डोक्यावर ओझे घेवून येत असावी, म्हणुनच चेहर्यावर घामाची धार दिसत होती.
मागुन पाहुनच त्याने तिला ओळखले होते, तरी जवळ जाऊन खात्री करुन घेतली.
"अगं ऐ कलावती! एवढ्या उन्हातून फिरु नगस; आजारी पडलीस तर तमाशाचा समदा रंग निघून जाईल."
आवाज ऐकून तिने चमकून बाजूला पाहिले. रामाचा हात हातात घेतलेला यशवंत तिला दिसला, हाच तो, कार्यक्रमात आपल्याकडे एकटक पाहणारा, तिने त्याला ओळखले.
"तुला कारं माजी एवढी काळजी? आणि तमाशाचा रंग जायला मी काय नायिका नाही. समजलं का?"
"नायिका नाही हे मला माहित हाये, पण मी तर तमाशाला फक्त तुझा नाच बघण्यासाठीच येतो; आणि तुम्ही आमच्या गावात पाव्हणं बनुन आलात मगं तुमची काळजी आम्हालाच कराया लागलं नव्हं."
"व्हयं का? मगं माज्या डोसक्यावरचं वझं घेऊन चालतोस का फडा पर्यंत?" ती उपरोधाने म्हणाली.
"दे की, मी तयार हाये; फक्त तुज्यासाठी"
"राहु दे पाटील; माजं वझं मला जड नाही; तु एक दिसं उचलशील, पण रोज तर मलाच उचलायचय ना"
असे बोलून ती पुन्हा तरातरा पुढे निघाली. पण आज यशवंत मागे हटणार नव्हता. त्याच्या सोबत असणार्या रामाला काय बोलावे हे सुचत नव्हते, तो फक्त मुकाटपणे त्यांच्या सोबत चालत होता.
"ऐ कलावते! अगं ऐक की, नाव काय हाये तुझं?"
"रत्ना!" तिने चालता चालता उत्तर दिले.
"रत्ना! नाव तर चांगलं हाये; देवानं रुप पण ठिकठाक दिलंय. तमाशात पण अजून मुरलेली वाटत नाही; दुसर्या नर्तकीं सारखा तुला अजून ताल पण धरता येत नाही. कशासाठी आलीस फडामंदी? का नाचतेस पायात चाळ बांधून तमाशाच्या मंचावर लोकांसमोर? एकदा सांग की?"
त्याने सहजपणे विचारले, सुरुवातीला जरी तिला त्याचा किंचीत राग आलेला असला तरी तो आता मावळला होता.
"तीन छोट्या बहिणी हायेत पाठीशी; एक लहान भाऊ, बाप सदा नशेत असतो, काम धंदा काही करत नाही. माय दुसर्यांच्या शेतात राबते. सगळ्यांचं जीवन साधं-सरळ नसतं, तुम्हाला एवढं समजलं तरी पुरेसं हाये! चला, माजा फड आला; सांजच्या स्वयपाका साठी सरपाण गोळा करायला रानात गेले होते, माजी वाट पाहत हायेत माज्या सख्या"
फडाच्या मागे काही अंतरावर दहा-बारा पालं रोवून मुक्काम थाटला होता सगळ्या तमासगिरांनी. तेथे जावून डोक्यावरील ओझे खाली टाकून, आत कुठेतरी ती गायब झाली. यशवंत आणि रामा काहीवेळ जागेवरच थांबून तेथील लगबग पाहत होते. पण थोड्यावेळाने ते पण माघारी गावाच्या दिशेने माघारी फिरले.
क्रमशः

