इलाज भाग क्र :- २
(ह्या कथेचा पहिला भाग वरती माझ्या नावावर क्लिक करून वाचता येईल)
आनंदा वाड्याच्या बाहेर उभा होता....न जाणो कस पण त्याला ह्या वाड्याची आता भीती वाटत नव्हती....एखादा व्यक्ती कित्येक दिवस घरापासून दूर राहिला आहे त्याला जशी घराची ओढ लागते अस काही आनंदाला त्या वाड्याकडे बघून वाटत होतं....दुपारची वेळ होती....कडक ऊन पडलं होतं....आनंदा थोडा सावधपणे त्या वाड्यात पोहोचला.....मागच्या वेळी भीतीने त्याने ह्या वाड्यात आजूबाजूला बघितले नव्हते पण आता आनंदाने ह्या वाड्यात चौफेर नजर फिरवली....खूपच सुंदर वाडा होता अस वाटत होतं की नुकताच बांधला आहे....फर्निचर पितळेची भांडी अगदी जशीच्या तशी रचून ठेवली होती.....आनंदा प्रत्येक खोलीत डोकावून बघू लागला....सगळं काही सुस्थितीत होत जस की आताच इथली साफसफाई झाली आहे....आनंदाने पूर्ण वाडा फिरून काढला पण ह्या वाड्यात एकही व्यक्ती दिसत नव्हता....एवढा आलिशान वाडा आत एवढ्या महागड्या वस्तू पण आत कुणीच कस राहत नाही?? ह्या प्रश्नाने आनंदा काही काळ चक्रावला....त्याला कसलीतरी वेगळीच चिंता होती ती म्हणजे आपला पुढचा महागडा इलाज होईल तरी कसा?? कारण पैसे तर नव्हतेच....आनंदा सतत सतत त्या उंबऱ्याजवळ जाऊन बघत होता....त्याला पूर्णपणे कल्पना होती की मागे मिळालेला सोन्याचा हार त्याला कुठल्या तरी विचित्र शक्तीने आणून दिला आहे....का दिला?? काहीच कल्पना नाही....पण पैशासाठी आणि काही चमत्कारासाठी आनंदा परत इथे आला होता..पण पूर्ण वाडा फिरल्यावर सुद्धा काहीच मिळालं नाही...आता पुढचा इलाज कसा करायचा??....आता हतबल होऊन तो त्या प्रशस्त हॉल मध्ये खांबाला डोकं टेकून विचार करीत बसला होता....आता पैसे कुठून आणायचे??...आनंदा हात जोडून विनवणी करत होता..कदाचित त्याचं कुणीतरी ऐकत असावं आणि काही मदत मिळावी..हा विचार करत असताना कसला तरी बारीक खरखर असा आवाज झाला....आनंदा इकडे तिकडे नजर फिरवत होता....बारीक आवाज होता तो....अखेर त्याने आपल्या पायाजवळ बघितले आणि झटकन पाय मागे घेतला....पायाजवळ एक छोटासा सोन्याचा दागिना अचानक प्रकट झाला होता....आनंदाने तो हातात घेतला....मातीने माखला होता तो दागिना....आनंदाने परत इकडे तिकडे बघून तो दागिना उचलला आणि सगळ्या दिशेला हात जोडून जोडून वाड्याच्या बाहेर पडला..त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचे भाव होते...परत त्याच सोनाराकडे तो दागिना विकून त्याने आपली औषधे खरेदी केली...थोडं फार चमचमीत जेवण सुद्धा केलं....रात्र झाली होती....वाड्यात जावे का?? तिथले एक एक क्षण आनंदाला आठवत होते....सगळं काही डोक्याच्या बाहेरचं होतं....एवढा टापटीप वाडा कसा असू शकतो....रात्री ऐकू येणारी ती कुजबुज परवा दिसलेले भयानक चेहरे हे सगळं आनंदा विसरू शकणार नव्हता पण न जाणो कसली तरी ओढ त्याच्या मनात होती शेवटी जे काही व्हायचं ते होऊ दे असा विचार करून एक मोठी टॉर्च खरेदी करून आनंदा परत त्या वाड्याच्या दिशेने चालू लागला....टॉर्चच्या उजेडात आनंदा त्या वाड्याजवळ पोहोचला...भयाण शांतता..क्षणभर थांबून त्याने त्या वाड्यावर टॉर्च मारून निरखून पाहिले....कसलीच हालचाल नव्हती....वाडा अगदी थंडगार होता....आनंदाने जशी पहिली पायरी चढली तसा एक थंड हवेचा झुळूक सोबत एक मंद मोगऱ्याचा सुवास त्याच्या नाकात शिरला....काही कळायच्या आत वाड्यात सगळीकडे लख्ख प्रकाश पसरला....वाडयात सगळीकडचे कंदील आपोआप पेटले सगळा वाडा उजळून निघाला.....हे काही नवनवीन होत होते....पण आनंदा घाबरला नाही....आपल्याला आर्थिक मदत करणारा हा वाडा आपल्याला मारुच शकत नाही असं आनंदाला वाटत होतं....पण हा वाडा आनंदाच्या एका चुकीसाठी टपून बसला होता त्याला गिळंकृत करायला...आनंदा आत आला हॉल मध्ये एक काळी लाकडी खुर्ची कुणीतरी आणून ठेवली होती....इथे येण्यासाठी कोणतेही वाहन नव्हतं त्यामुळे आनंदा चालत चालत आला होता त्यामुळे त्याचे पाय दुखत होते समोर ती आलिशान खुर्ची बघून आनंदा त्या खुर्चीवर आरामात बसला....त्याची गोळ्यांची वेळ झाली होती त्याचे अंग थरथरत होते आनंदाने बॅग मधून गोळी काढली आणि बॅग मधील बॉटल चे पाणी पिऊन टाकले....आनंदाला दरदरून घाम फुटला होता....अचानक त्याला कसला तरी आवाज येत होता....आवाज खूपच मधुर आणि लयबद्ध होता.....पैंजनाचा आवाज होता तो.....सोन्याचे पैंजण होते ते आणि तिचा देह सोन्याहून उजळ होता.....ती हळुवार चालत आनंदाच्या दिशेने येत होती....वातावरणात एक मादक सुगंध पसरला होता....समोरून जगात नसेल इतकी सुंदर स्त्री येत होती....पूर्णपणे नग्न,मोकळे केस तिच्या अंगावर पुरातन सोन्याचे दागिने होते ती चालताना त्या दागिन्यांवरचे मोती हलत होते...तिचे काळेभोर लांबसडक कुरळे केस हलकेच हवेवर उडत होते....आपल्या लालभडक ओठावर आपल्या हाताचा अंगठा फिरवत डोळ्यात मादकता आणून ती सुंदर स्त्री आनंदाच्या अगदीच समोर उभी होती आनंदा तिला न्याहाळत होता....आपला नाजूक गुलाबी हात आनंदाच्या मळकट सुरकूतलेल्या चेहऱ्यावर फिरवीत ती स्त्री आनंदाच्या मांडीवर बसली....त्या स्त्री देहातून इतका मादक सुवास येत होता की कितीही मनाचा पक्का मनुष्य असता तरी त्याचा तोल गेला असता....पण आनंदाने तिला बघून मान फिरवली...अचानक समोरून एक दुसरी सुंदर स्त्री आली ती सुद्धा नग्न होती ती पंचपक्वान्नांने भरलेले ताट घेऊन आनंदासमोर ठेवून आनंदाच्या दुसऱ्या बाजूला उभी राहिली.....आनंदाने त्या ताटाकडे बघितलं...आयुष्यात त्याने कधी इतकं सुंदर ताट बघितलं नसेल....जेवणाचा वास नाकाजवळ दरवळत होता....पण आनंदाने परत मान फिरवली....हे बघून मांडीवर बसलेल्या सुंदरीने आनंदाचा हात पकडून आपल्या कंबरेवर ठेवला....आनंदाने तो हात झटकला आणि ताडकन उठून तो बाजूच्या एका खोलीत जाऊन दार लावून बसला...त्या स्त्रिया एकमेकांकडे बघू लागल्या काहीसे हताश भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते परत प्रयत्न..बाहेर त्या दोन सुंदर स्त्रिया आता एक विशिष्ट स्वरातले गाणे म्हणत होत्या क्षणभर आनंदा मोहित झाला पण त्याने उशी कानावर दाबून कान बंद केले....त्याच्या डोळ्यांसमोर त्या सुंदर नग्न स्त्रियांचा देह येत होता तरीही आनंदाने दार उघडले नाही....काही वेळानंतर त्या गाण्याचा सुमधुर आवाज येऊ लागला.....हे गाणं मोहित करणारे होते....खजिन्याच्या आशेने इथे वावरणाऱ्या काही लोकांनी हे गाणं ऐकूनच ह्या वाड्यात प्रवेश केला होता आणि आपला जीव गमावला होता पण आनंदाला हे गाणं ऐकून सुद्धा काहीच वाटत नव्हतं त्याने कानात बोटं घालून कान बंद केले....काही वेळानंतर हे गाणं बंद झालं होतं....सगळीकडे भयानक शांतता होती....आनंदाने परत दार उघडून बघितलं तर त्या हॉल मध्ये कुणीच नव्हतं....दाराच्या फटीतून आनंदा हे सगळं बघत होता....आनंदा हळूहळू त्या हॉल मध्ये पोहोचला तिथे बरोबर मध्ये एक मोत्याचा हार ठेवला होता त्यालाही माती लागली होती.....तो हार उचलून आनंदा चारी दिशांना नमस्कार करत करत परत त्या रूम मध्ये जाऊन झोपी गेला.....परत शहरात जाऊन त्याने स्वतःवर ट्रीटमेंट करून घेतली.....आता मात्र ह्या वाड्याकडे परत येण्याची ओढ त्याला सतावू लागली...दिवसेंदिवस तो वाडा आनंदाला स्वतःकडे आकर्षित करत होता..एक वेगळंच आकर्षण होतं हे....सुरवातीला भीती दाखवणारा हा वाडा आनंदाला मदत करत होता...आनंदाच्या तब्बेतीत सुद्धा सुधारणा होत होती....हे सगळं काय घडतंय ह्याची आनंदाला कल्पना नव्हती पण जे काही घडत होते ते चांगलं घडत होतं....रात्री परत आनंदा त्या वाड्यात आला...लांबूनच वाड्यात कंदीलाचा उजेड दिसत होता....आनंदा दाराजवळ आला तेव्हा त्याच्या परत लक्षात आलं की आपण इथं का आलोत.....इथे विचित्र प्रकार घडत आहेत कालच्या त्या नग्न सुंदर स्त्रिया??.....हे सगळं अमानवी आहे पण नंतर आणखी त्याच्या मनात विचार आला की हा वाडा तर आपल्याला पैशाची मदत करत आहे अजून उपचारासाठी खूप पैसे लागणार आहेत....आपला इलाज शेवट टप्पात आला आहे त्यामुळे आपण हा वाडा सोडता कामा नये....आनंदा परत त्या वाड्यात शिरला सावध पणे सगळीकडे नजर फिरवू लागला....वाड्यात शांतता होती....त्या मुख्य हॉल मध्ये ग्रामोफोन चालू होता...त्यावर मधुर संगीत चालू होतं....आता ह्या सगळ्या गोष्टीची आनंदाला सवय झाली होती हा वाडा आपल्याला हानी पोहचवणार नाही अशी काहीशी आनंदाची समजूत होती पण त्याला हे माहीत नव्हतं की हा वाडा आनंदाची परीक्षा घेत आहे.....ह्या वाड्याने 1,2 वेळेला आनंदाला गिळण्याचा प्रयत्न केला पण आनंदाने ती संधी येऊनच दिली नाही....मुळात आनंदा एवढा स्वार्थी नव्हताच की दिलेलं ओरबाडून खाइल असा....जे हा वाडा देईल ते तो घेत राहिला.....देणाऱ्या अदृश्य हाताचे आभार मानत राहिला.....
आनंदा आता मुख्य हॉल मध्ये आला....समोर जे काही दिसले ते बघून आनंदाचे डोळे विस्फारले....हॉल मध्ये एक पायरी उतरून जाण्याइतकी एक चौरस जागा होती....त्या जागेच्या खाली हरिबाने सगळा खजिना पुरला होता.....कालपर्यंत सामान्य असलेली ती जमीन एका काचेसारखी नितळ झाली होती म्हणजे खाली जो अमाप सोन्याचा खजिना पुरला होता तो खाली दिसत होता....ती दगडी जमीन काचेसारखी नितळ झाली होती....आतले अमाप सोने अगदी काही फुटावर दिसत होते....काही मिनिटे आनंदा त्या सोन्याची झळाळी अनुभवत होता डोळ्यात साठवत होता....काही मिनिटांनी परत ती जमीन पूर्ववत झाली परत तिथे दगडी फरशी आली.....एक दोन दगड काढले की अमाप खजिना आनंदाला मिळणार होता....तो कायमचा श्रीमंत होणार होता....ह्या वाड्यात आल्यापासून त्याचा कॅन्सर सुद्धा बरा होत चालला होता...आणि आता हा खजिना घेऊन आनंदा श्रीमंतीत जगू शकत होता.....काही वेळ थक्क राहिल्यानंतर आनंदा भानावर आला....एक दोन कंदील विझले गेले आणि डाव्या कोपऱ्यात अंधार झाला....डाव्या कोपऱ्यातून परत कुजबुज ऐकू येऊ लागली.....अचानक शांतता आणि डाव्या कोपऱ्यातून त्या अंधारातून एक कुदळ बरोबर आनंदाच्या समोर येऊन पडली....आनंदा क्षणभर विचार करू लागला....त्याच्या डोक्यातून ते अमाप सोने जात नव्हते.....थरथरता हात त्या कुदळी कडे जात होता अचानक आनंदाने सर्रर्रर्रर्र कन हात मागे ओढला
"न्हाई न्हाई......उपकार केलेल्याला लुटणार्याची जात न्हाई आमची....तुम्ही जो कुणी बी असशील....तुम्ही मला माझ्या इलाजाला पैस दिलाईसा तुम्ही माझं मालक हैसा....तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवणं म्हणजे पाप हाय जी....त्यो माझा शंकर मला माफ करणार न्हाई....आयुष्यभर प्रमाणिक आयुष्य जगलो आता मरताना ह्यो बट्टा लागून न्हाई मरायचा मी....ही दौलत मला काय कामाची?? उभं आयुष्य रानात काम करून गेलं आता हे श्रीमंतीचं आयुष्य न्हाई झेपायचं मला....माफ करा तुम्ही जो कुणी असशील त्यांना माझं हेच सांगणं हाय....मी हे पाप न्हाई करू शकत....मला माफ करा"
आनंदा त्या अंधारात बघून बोलत होता....आनंदा त्या अंधारातून उत्तराची वाट बघत होता.....सर्रर्रर्रर्र कन ती कुदळ मागे अंधारात गायब झाली.....अंधार हळूहळू गायब होऊ लागला.....एक काळी आकृती त्या अंधारातून पुढे आली....म्हणजे ती आकृती हवेत तरंगत होती....5 फुटाच्या उंचीवरून आनंदाकडे बघत होती....आनंदा हे बघून घाबरला नाही....त्याने त्या आकृतीपुढे हात जोडले....त्या आकृतीचा चेहरा अस्पष्ट होता हवेच्या झोताने बदलत होता काळ्या धुराच्या रूपातील ती आकृती आनंदाकडे बघून म्हणाली कर्कश कापर्या आवाजात बोलू लागली
"मी इथला मालक आहे....माझं नाव हरिबा आहे...."
आनंदा गुडघ्यावर बसला तश्या त्याच्या आसपास अनेक काळ्या आकृती जमा झाल्या....आनंदाने आजूबाजूला बघितलं....चेहरा नसलेल्या पण मानवी आकार असलेल्या त्या आकृत्या अगदी दाटीवाटीने त्या हॉल मध्ये जमा झाल्या होत्या....परत तो करारी आवाज त्या हॉल मध्ये घुमला
"आयुष्यात माणसाला एक आशा असते ती म्हणजे धन दौलत....मी लहान असताना खुप कष्ट सोसले....उपाशी रात्री काढल्या..राबून काही मिळत नाही..नंतर मी भेटलेल्या एका साधूच्या उपदेशाने तंत्र साधना केली आणि मांत्रिक झालो....ह्या विद्येच्या जोरावर हे सगळं वैभव मिळवलं....पारलौकिक जगातून तंत्र विद्येच्या सहाय्याने अनेक दास दासी बनवल्या ज्या माझ्या शब्दखातर काहीही करतील....पण एका गोष्टीत माझा जीव अडकून होता ते म्हणजे सोनं.....काहीतरी होत सोन्यात ह्यासाठी मी एवढा का वेडा होतो कल्पना नाही....पण आयुष्य भर खूप सांभाळलं.....मेल्यानंतर सुद्धा मी आणि माझे हे नोकर मिळून ह्या सगळ्या सोन्याची रक्षा करत होतो....पण आता नाही माझा अंतिम क्षण जवळ आला...माझा इथला कार्यकाळ संपला....माझ्या आत्माला पुढच्या प्रवासाला निघालं पाहिजे.....कितिदिवस इथे गुंतून राहणार?? मुक्ती मिळालीच पाहिजे....पण मला माझ्या ह्या सोन्याच्या देखभालीसाठी एक वारस हवा होता...ज्याच्या मनात स्वार्थ नसेल तोच व्यक्ती मला ह्या सोन्याचा वारस म्हणून निवडायचा होता....आणि माझा शोध आता संपला आहे....तूच होणार इथला वारस"
"काय??....म्या....नाही जी नाही....मी आजारी म्हातारा किती दिवस ह्या तुमच्या सोन्याची देखभाल करणार??..."
हरिबा उडत उडत आनंदाजवळ आला
"तू जेवढं जगशील तेवढं माझ्या सोन्याचे रक्षण कर नंतर तू हा वारसा दुसऱ्याला दे.....मी माझ्या काही शक्ती ज्या मी खूप साधना करून कमावल्या आहेत...त्या शक्ती मी तुला देतो"
आनंदा गयावया करू लागला....हरिबा आनंदाच्या जवळ येऊ लागला....आनंदा आता काकुळतीला आला होता....तो एक सामान्य आयुष्य जगत होता ह्या शक्ती वैगेरे असलं त्याला काहीच नको होतं....हरिबाने आपले तोंड उघडले....त्याचा जबडा वाढत चालला होता...फूटभर तरी हरिबाचा जबडा लांबडा झाला होता हे बघून आनंदा घाबरला मागे सरकू लागला....हरिबाच्या सेवकांनी म्हणजेच त्या काळ्या आकृतींनी आनंदाला मागून पकडले....हरिबाच्या तोंडून एक काळा धूर निघू लागला.....तो हॉल त्या काळ्या धुराने गच्च भरला.....तो धूर आता आनंदाच्या भोवती गोळा झाला.....आनंदाचे तोंड उघडले गेले सगळा काळा धूर ती काळी विद्या जी हरिबाने आयुष्यभर साधना करून कमावली होती ती धुरात परावर्तित होऊन आनंदाच्या तोंडात जाऊ लागली....आनंदाचे डोळे विस्फारले होते....अचानक एवढी ऊर्जा अंगात घुसत असल्याने तो तळमळत होता पण त्या काळ्या आकृतींनी त्याला मागून घट्ट पकडले होते....आनंदाच्या नसा ताणल्या होत्या....डोळे सताड उघडे होते सगळा काळा धूर आनंदाच्या तोंडातून शरीरात समावू लागला....आनंदाला ही ताकत आता जाणवत होती....त्याचं शरीर काटक बनलं होतं....त्यांने आजूबाजूला बघितलं....आता समोर ते विद्रुप चेहरे नव्हते समोर एक लोकांचा समुह दिसत होता जो इथे हरिबाने बंदिस्त केला होता....समोर सगळ्या आत्मा होत्या पण आता त्या मनुष्यासारख्या आनंदाला वाटत होत्या....काही वेगवेगळी पिशाच्च हरीबाने आपल्या शक्तीने पकडून ठेवल्या होत्या त्यात पंख असलेले असुर,रूप बदलणाऱ्या सुंदर मोहिनी स्त्रिया अनेक अमानवी दिसणारे जीव सुद्धा समोर दिसत होते....ह्या सगळ्यांचा ताबा आता आपल्याकडे आहे असं आनंदाला जाणवलं होतं तो आता ह्या सगळ्या बंदिस्त शक्तींचा मालक होता.....आनंदाने स्वतःच्या हाताकडे बघितलं हाताच्या शिरा काळ्या पडल्या होत्या....काळ्या शक्ती शरीरात उतरल्या होत्या.....त्याने समोर तरंगणाऱ्या हरिबाच्या आकृतीकडे बघून नमस्कार केले आणि म्हणाला
"मालक मी तुम्हाला वचन देतो की शेवटच्या श्वास अस पर्यंत तुमच्या सोन्याच्या खजिन्याच रक्षण करीन"
हरिबाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आणि तो धूर स्वरूपात उडून हवेत विरून गेला पुढच्या प्रवासाला निघाला....हरिबाने आता स्वतःच्या आत्म्याला मुक्त केलं होतं.....
आता आनंदा ह्या वाड्याचा आणि अनेक अघोरी काळ्या शक्तींचा मालक होता....हरिबाच्या शक्तींचा वारस होता....आनंदा जमलेल्या सगळ्या आत्म्यांना इशारा केला.....हे आत्मे बंदिस्त होते आणि हरिबा नंतर आता आनंदाला जोडले गेले होते त्यामुळे हा संवाद आतून होत होता....आनंदाने इशारा केला तसे ते आत्मे इथून गायब झाले म्हणजे परत ह्या वाड्याचा एक भाग झाले....त्या हॉल मध्ये आनंदा एकटा होता....एक वेगळेच समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते.....समोर ठेवलेल्या एका आलिशान खुर्चीवर तो आरामात बसला.....कसल्या तरी विचारात तो हरवून गेला होता....त्याने आपल्या खिशातून आपलं पाकीट काढलं त्या पाकिटाला काळ्या धाग्याने गुंडाळले होते....आनंदाने आपल्या हातातील काळा दोरा सुद्धा ओढून काढला....डाव्या पायातला काळा दोरा सुद्धा ओढून काढला....त्याने आपल्या शेंडीला सुद्धा एक छोटा काळा दोरा गुंडाळला होता तो सुद्धा काढून टाकला.....त्याने पाकीट उघडले....काही पैसे,atm कार्ड असा ऐवज त्या पाकिटात होता....त्याने एक पासपोर्ट साईझ फोटो आतल्या कप्प्यातुन बाहेर काढला आणि त्या पासपोर्ट साईझ फोटोकडे बघू लागला....एक 30-32 वर्ष्याच्या तरुणाचा फोटो होता तो.....तो फोटो बघताच आनंदाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले....हातपाय थरथरू लागले....त्याने डोळे बंद केले आणि वाड्यातील दोन पिशाच्याना बोलावून घेतले....अमानवी काळेकुट्ट मानवी देह सोबत वटवाघळा सारखे पंख असलेले दोन विद्रुप पिशाच्च आनंदा समोर आले.....आनंदाने त्या दोन पिशाच्याना तो तरुणाचा फोटो दाखवा....आणि आंतरिक भाषेतून न बोलता आनंदा त्या दोन पिशाच्च सोबत संवाद साधू लागला.....ते पिशाच्च गुरगुरत होते....खट खट खट असे दात खात होते....आनंदाने डोळ्यांनी इशारा केला तसे ते पिशाच्च दारातून बाहेर उडाले आणि आनंदाने एक दीर्घ श्वास सोडला...........(क्रमशः)

