इलाज-भाग क्र :- १
(ह्या कथेचे एकूण ३ भाग आहेत...तिन्ही लिहून तयार आहेत...रोज रात्री 8 वाजता एक एक भाग पोस्ट होईल)
त्या रात्री पावसाने नुसते थैमान घातले होते थैमान.....कुणीतरी पाण्याची कळशी डोक्यावर ओतावी ना तसा तो त्या आधीच जीर्ण असलेल्या वृद्धावर बरसत होता....पाठीतून वाकलेला हा 60-65 वर्षाचा म्हातारा थंडीने कुडकुडत फक्त आणि फक्त चालत होता....समोरची वाट मात्र काहीच दिसत नव्हती....एखादी वीज चमकली की तिच्या उजेडात हा जीर्ण देह तोंडवरचे पाणी पुसत चालत होता....पायातले चप्पल चिखलात रुतून तुटून कधीच वाहून गायब झाले होते...आधीच ब्लड कॅन्सरने त्रस्त असलेला हा म्हातारा...आजची रात्र आपली शेवटची रात्र आहे हा धो धो पाऊस आणि वादळी वारे आपल्याला वाहून घेऊन जाणार अस समजून जीवाच्या आकांताने चप चप आवाज करत चालत होता....आजूबाजूला एकही घर नव्हतं....एका तासापूर्वी रेल्वे स्टेशन वरून वाट विचारत विचारत तो दवाखाण्याकडे चालला खरा पण वाटेत पावसाने गाठले...असा भयानक पाऊस त्याने प्रथमच बघितला असावा....वादळी वाऱ्याने विद्युत वाहिन्या तुटल्याने लाईट सुद्धा गेली होती सगळीकडे मिट्ट काळोख होता....त्यात चालत चालत कुठला तरी आडोसा मिळेल ह्या आशेने हा म्हातारा चालत होता पण मुख्य रस्त्यावरून भटकून तो कधी ह्या माळरानावर आला हे त्याचं त्याला समजलं नाही....कदाचित तो उतारावर होता कारण वरून वाहत येणाऱ्या पाण्याचा लोट म्हाताऱ्याच्या पायाला लागत होता आपला तोल सावरत तो एखादे झाड वैगेरे शोधू लागला पण त्या माळरानावर एकही झाड दिसत नव्हतं.....म्हातारा प्रचंड घाबरला....वादळी वारे,पाऊस,कडाडत्या विजा ह्याचा एकत्रित आवाज त्या माळरानावर एखाद्या राक्षसी आवाजासारखा भासत होता सोबत हा मिट्ट काळोख.....तरी म्हातारा चिवाट होता....तोंडावरचे पाणी पुसत पुसत तो त्या अंधारात चौफेर नजर मारत होता....एखादी दिवाबत्ती किंवा प्रकाश दिसला की त्या दिशेने जायचं अस त्याने ठरवलं होतं...पण तो काळा काळोख इतका मिट्ट होता की कधी तो आपल्याला गिळंकृत करून ढेकर देईल सांगता येत नव्हतं....भीतीचं एक वादळ म्हाताऱ्याच्या मनात घोंघावत होते.....अचानक एक मोठा आवाज झाला....वीज पडली होती अगदी 100 मीटर अंतरावर.....सगळीकडे नुसता लख्ख प्रकाश पडला....काही सेकंद तो उजेड होता आणि त्या उजेडात त्या म्हाताऱ्याला दिसलं एक घर.....त्याच्यावरच वीज पडली होती.....म्हातारा आता ह..ह..ह...ह...ह असा जोर लावीत त्या घराच्या दिशेने जाऊ लागला.....
आनंदा हे तसे एका मोठ्या शहरात एकटेच रहायचे...सगळं काही निवांत चालू होतं...पण अचानक त्यांना ह्या ब्लड कॅन्सरने ग्रासले....त्याच्या गावात उपचार नव्हता....एकाच्या सल्ल्याने तो ह्या शहरात आला होता....इथे स्वस्तात कॅन्सरवर उपचार होतात म्हणून जेमतेम सगळेच पैसे घेऊन आनंदा ह्या शहरात आला पण आता ह्या पावसात सापडला होता....शेवटी त्याला हे ह्या माळरानावर एकटेच उभे असलेले घर दिसले आणि त्या घराच्या दिशेने आनंदा चालू लागला
पावसापासून वाचण्यासाठी आनंदा त्या घराच्या दिशेने चालू लागला खरा पण तिथून परत येईल का??...ह्या वाक्याचे एक वेगळेच कारण होते ..इथे आजूबाजूला वस्ती ह्या कारणास्तव नव्हती कारण ही 40-50 एकर जागा शापित आहे असं इथले लोक मानतात....म्हणून इथे आजूबाजूला एक साधे चिटपाखरू सुद्धा नव्हते....कसला तरी जबरदस्त श्राप होता ह्या जागेला म्हणून तर ह्या एवढ्या जागेत एकही झाड उगवत नव्हतं....भयानक श्राप होता ह्या जागेला.....म्हणजे कथा अशी सांगितली जाते की 1940 च्या काळात इथे एक मांत्रिक राहत होता....तंत्र विद्येने त्याने खूप सारा पैसा सोने-नाणे,हिरे मानके कमावले....सगळं काही आपल्या अघोरी शक्तीच्या जोरावर....त्याची शक्ती एवढी भयानक होती की लोक घरातील सोने नाणे आणून त्याच्या ह्या वाड्यात आणून ठेवत.....हा वाडा अगदी सोन्याने भरला होता.....धान्याची पोती रचून ठेवावी तस सोनं ह्या वाड्यात भरलं होतं.....लोक भ्रमिष्ट होऊन इथे आपले सोने ठेवून जात अशी मांत्रिक शक्ती असलेला हरिबा इथे राहत होता.....एक चांगले आयुष्य त्याने इथे घालवले....त्याचे वय वाढत चालले होते....मृत्यू घटिका आता त्याला समोर दिसत होती पण आपण कमावलेल्या सोन्या वरून त्याचा मोह सुटत नव्हता.....म्हणून त्याने एक शेवटची साधना केली.....तो स्वतःला ह्या वाड्यात कैद करवून कायमचा इथे राहणार होता.....आपल्या शक्ती ह्या वाड्यात गुंतवून ठेवणार होता....म्हणून त्याने अखेरची पूजा मांडली......आधी त्याने आजूबाजूच्या असंख्य आत्म्यांना आपल्या मंत्र शक्तीच्या जोरावर इथे ह्या वाड्यात बोलावून घेतले....नंतर आपल्या तंत्र विद्येने ह्या आत्म्यांना इथे बंदिस्त केले.....हरिबा आता त्या असंख्य आत्म्यांचा मालक होता....अनेक हजारो तृप्त,अतृप्त,अघोरी,पिशाच्च आत्मे ह्या वाड्यात कैद झाले....आता हरिबा ह्या असंख्य आत्म्यांचा मालक होता....त्याने आधी ह्या आत्म्यांचा कडून ह्या वाड्याच्या मधोमध एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात सगळे सोने पुरून टाकले.....नंतर त्या पुरलेल्या जागेवर त्याने एक यज्ञ मांडला आजूबाजूला काळेकुट्ट आत्मे फिरत होते....सगळा विधी पूर्ण झाला...यज्ञ जळत होता....हरिबा अघोरी मंत्र म्हणत होता त्याने एका आत्म्याला इशारा केला तशी ती काळीकुट्ट उंच आकृती समोर आली आणि बाजूला पडलेल्या कोयत्याने हरिबाचा शिरच्छेद केला....ते मुंडके त्या काळ्या सावलीने हरीबाने दिलेल्या आदेशानुसार यज्ञात टाकले.....तसा तो उग्र जळत असलेला यज्ञ शांत झाला...हरिबाने स्वतःचा बळी दिला पण हा त्याग नव्हता तर सुरवात होती....त्या सोन्याच्या खजिन्यामध्ये हरिबाचा जीव अडकला होता त्याच्या सुरक्षेसाठी हरिबा आता त्या असंख्य आत्म्यांचा गर्दीत सामील झाला होता....पण अजूनही तो त्या आत्म्यांचा मालक होता....आपल्या मर्जीप्रमाणे त्यांना वागवत होता...हे अतृप्त आत्मे हरिबाचे गुलाम होते,सैन्य होते....अस म्हणतात की हरिबाचा आत्मा अजूनही त्या वाड्यात आहे त्या सोन्याच्या खजिन्याची रक्षा करत आहे....जो कुणी जाईल तो परत कधीच आला नाही तिथून....तिथला खजिना शोधून काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण नंतर त्यांचे हाड सुद्धा कुणाला सापडले नाही....अस म्हणतात हा वाडा म्हणजे एक राक्षस आहे हा वाडा लोकांना गिळंकृत करतो....स्थानिक तर ह्या अपशकुनी वाड्याकडे बघत सुद्धा नाहीत...आसपास भटकत सुद्धा नाहीत...ज्यांनी ह्या वाड्यात प्रवेश केला ते परत आलेच नाहीत म्हणून तर सरकारने ही जागा निषिद्ध यादीत टाकली होती....आजूबाजूला काटेरी तारा लावल्या होत्या पण न जाणो आजच्या वादळाने ह्या तारा उखडून गेल्या होत्या...एवढ्या मोठ्या पावसाने माती वाहून गेल्याने खांब उखडून पडल्या होत्या....सगळं काही विचित्र अनपेक्षित घडलं होतं आणि वाड्याजवळ पोहोचला आनंदा.....वाड्याला आत्मा रुपी नवीन सेवेकरी मिळणार होता....पण ह्या सगळ्याची कल्पना आनंदाला नव्हती....तो एक रोगी होता....रोगी माणसाला स्वतःचे भान कधीच नसते....दुखण्याने त्याचे शरीर खंगुण गेले असते तरी जगण्याची एक आशा मनात असतेच....
आनंदा हळूहळू त्या वाड्याजवळ जाऊ लागला....वाड्याजवळ जाताना त्याची नजर त्या वाड्याकडे होती....आनंदा जवळ जाताच विजांचा कडकडाट वाढला काही सेकंद पूर्ण आकाश लख्ख प्रकाशने उजळून जायचं तेव्हा तो काळा दगडी वाडा स्पष्ट दिसत असे....पाऊस थांबला होता पण पायजवळून जणू ओढा वाहत होता.... पाऊस बंद झाल्याने पाण्याचा खळ खळ आवाज कानावर पडत होता....अचानक त्या वाहत्या पाण्यात कुणी चालण्याचा आवाज करत होत....हा आवाज जिथून येत असे त्या दिशेने आनंदाची मान वळत असे....आधीच ह्या पावसाने तो गारठला होता म्हणून त्याची पावले वाड्याच्या दिशेने चालत होती....आनंदा सावधपणे पाऊल टाकत होता कारण त्याच्या पायात चप्पल नव्हते....पण ह्या अंधारात हा सावधपणा काहीच कामाचा नव्हता सर्रर्रर्रर्र कण एक कळ त्याच्या मस्तकात घुसली.....पायाला काहीतरी कापले होते....आ...आ...आ....आई ग.....एक पाय काहीवेळ हवेत उचलून आनंदा परत आपला जीर्ण देह त्या वाड्याच्या दिशेने नेऊ लागला....अधून मधून विजा चमकत होत्या भिजलेला वाडा उजळून निघत होता.....आता सगळं पाणी सुद्धा वाहून गेले होते त्यामुळे एक भयानक शांतता वातावरणात होती....ओल्या गवतावरून कुणीतरी सर्रर्रर्रर्र सर्रर्रर्रर्र आवाज करत आनंदाच्या बाजूने जात होतं....आनंदा थोडा शहराला होता...जेव्हा वीज चमकत होती तेव्हा त्याला दिसायचं की आजूबाजूला तर कुणीच नाही....परत थोडं मनाला सावरत आनंदा चालू लागायचा.....वाडा आता जवळ येत होता....वरती बघत बघत आनंदा चालला होता....अचानक तो जागेवरच थबकला....त्या वाड्याची जी कमान होती त्यावर कुणीतरी बसलं होतं. ..चमकलेल्या विजेच्या उजेडात आनंदाने स्पष्ट बघितलं होत....डोळे अंधारात चमकत होते रोखून आनंदाकडे बघत होते....एक शेपटी सारखा भाग खाली लोम्बत होता....हे दर्शन फक्त काही सेकंदाचे होते....पुढच्या वेळी जेव्हा वीज चमकली तेव्हा तिथे कुणीच नव्हते....आत जावे की नाही???.....आनंदाला प्रश्न पडला पण पुढच्या क्षणी त्याला दिसले की त्या वाड्यात कसला तरी दिवा लागला आहे....म्हणजे ह्या वाड्यात कुणीतरी आहे....आनंदा परत एका आशेने वाड्याच्या दिशेने चालू लागला....कुडकुडत होता तो...त्याचे पहिले पाऊल वाड्याच्या दगडी फरशीवर पडले....आता तो त्या उजेडाच्या दिशेने जाऊ लागला.....पायऱ्या चढत चढत तो ह्या मोठ्या चिरेबंदी वाड्याच्या मुख्य दरवाज्याजवळ आला....दारातच एक जुना चमकदार कंदील ठेवला होता.....आनंदा दारातच उभा राहिला....डावीकडे उजवीकडे मान फिरवीत फिरवीत तो आत नजर फिरवू लागला.....कसलीतरी कुजबुज त्याला ऐकू येत होती.....शेवटी त्याला राहवलं नाही आपल्या कापर्या आवाजात त्याने हाळी मारली
"कुणी हाय का घरात???"
आतून काहीच उत्तर येत नव्हतं....एक दोन वेळा हाच प्रश्न करून झाल्यावर मात्र आनंदाचा धीर सुटला आणि दारात ठेवलेला कंदील घेऊन तो ह्या वाड्यात शिरला....वाड्यात शिरताच एक थंड हवेचा झोका त्याला चाटून गेला....दातावर दात आपटत होते...."कुणी....कुणी हाय का घरात??" अश्या आरोळ्या देतच आनंदा वाड्यात शिरला....वाड्याच्या मधोमध व्हरांड्यात एक शेकोटी जळत होती...आधीच कॅन्सरने जीर्ण देह आणि त्यात ही थंडी....आनंदा मटकन खाली शेकोटीजवळ बसला....आपलं अंग गरम करत करत तो आजूबाजूला नजर मारत होता.....त्या शेकोटीचा उजेड काही ठराविक भाग प्रकाशित करत होता....बाकी सगळीकडे कुट्ट अंधार होता....त्या उजेडात त्या वाड्याचा काही भाग दिसत होता....तो भाग अगदीच नीटनेटका होता....म्हणजे इथे कुणीतरी राहत आहे अशी समजूत आनंदाची झाली.....बसल्या बसल्या तो "वाट चुकलेला वाटसरु तुमच्या दारी आलाय जी".....अस त्या अंधारात ऐकू जाईल असे बोलत होता पण उत्तर काही येत नव्हतं....पण आनंदाला अस जाणवत होतं की ह्या शेकोटीच्या गोलाकार मर्यादित उजेडाच्या पलीकडे कुणीतरी उभं आहे आणि आपल्याला बघत आहे...हलकीशी कुजबुज त्याला ऐकू येत होती....इतका वेळ एवढ्या हाका मारून कुणीच कसं बाहेर येत नाही??....आनंदा थोडा गोंधळला.....त्या जळत्या शेकोटीमुळे आनंदा आता जरा गरम झाला होता त्यामुळे आता आनंदा उठून उभा राहिला....ज्या दिशेने कुजबुज ऐकू येत होती त्या दिशेने आनंदा हातात कंदील घेऊन चालू लागला....ह्या अंधारात असंख्य लोक गच्च भरले आहेत असं आनंदाला जाणवत होतं....त्याचा सिक्स सेन्स त्याला काहीतरी सांगत होता....त्याचे दबके पाऊल पडत होते....हातातला कंदील वर धरून तो त्या अंधारात चालू लागला....त्या शांततेत असंख्य श्वासांचा आवाज येत होता कुणीतरी त्या अंधारातुन चालत येत होतं....अगदी उंचीपूरी आकृती वाटत होती.....त्याला बघण्यासाठी आनंदाने आपल्या हातातला कंदील वर उचलला.....तो आता समोर आला होता.....त्याला बघून आनंदाचा आवाज गळ्यातच अडकला.....हातपाय थरथरू लागले....दबक्या आवाजात आनंदा किंचाळला....एक बीभत्स चेहऱ्याचा माणूस.....ज्याचा अर्धा चेहरा डाव्या बाजूला लटकत होता....डोक्यात एक कुदळ घुसली होती....अर्धा चेहरा रक्ताने माखला होता....त्याचे डोळे चमकत होते....त्याला बघून आनंदा किंचाळला...."भ...भ...भ....भूत" एवढेच कापरे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले...आणि तो मागे फिरला....तो बीभत्स चेहऱ्याचा माणूस आनंदाच्या दिशेने पुढे सरकत होता...त्याला तस बघून आनंदाने आपली दिशा बदलली....तो त्या अंधारात दुसरीकडे धावू लागला....तेव्हा त्याला जाणवलं की कुणीतरी त्याचा पाय घट्ट पकडला आहे....आनंदाने घाबरत घाबरत कंदिलचा उजेड खाली नेला....आता मात्र आनंदा प्रचंड घाबरला....एक तुटलेल्या हाताच्या पंज्याने त्याचा पाय पकडला होता....आनंदा सर्व ताकतीनिशी आपली सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत होता पण ती पकड कमालीची मजबूत होती....आनंदाला हलताही येत नव्हता....अचानक आनंदाच्या ह्रदयाची धडधड वाढली....कारण त्या अंधारातून लोक बाहेर येत होते....समोर जे काही होतं ते सगळं अमानवी होतं....असंख्य छिन्नविच्छिन्न देह त्या अंधारातून बाहेर पडत होते त्याची त्वचा पांढरीफेक होती त्यामुळे कंदिलाच्या मंद उजेडात सुद्धा त्यांचे शुभ्र अस्तित्व आनंदाला दिसत होते....आनंदाने चौफेर नजर फिरवली....डोकं गरगरू लागलं.....छिन्नविच्छिन्न देह चारी बाजूने चालत येत होते....अनेकांच्या डोक्यात कुदळ मारून त्यांच्या डोक्याचे दोन भाग केल्यासारखे भासत होते....अस्थाव्यस्त देह होते ते अस वाटत होते कुणीतरी भयानक पद्धतीने ह्यांना संपवले आहे....कुणाची आतडी बाहेर आली होती कुणाच्या धडावर शीर नव्हते....कुणी दोन तुकड्यात फरफटत आनंदाजवळ येऊ पाहत होते...आनंदा हे सगळं बघून जिवाच्या आकांताने ओरडू लागला....तो सगळा हॉल गच्च भरला होता अश्या भुतांनी....अचानक उजवा कोपरा रिकामा होऊ लागला....एक आगीचा लोट त्या रिकाम्या जागेतून येत असल्याचे भासत होते....आनंदा पुरता गोठला होता....त्याच्या ह्रदयाची धडधड एवढी वाढली होती की समोरचं हे जे काही आहे ते बघून कोणत्याही क्षणी त्याच ह्रदय फुटू शकणार होतं....समोरून एका काळ्या वेशात एक आकृती येत होती....ती येत असताना ह्या बाजूच्या चित्रविचित्र भयानक आकृत्या बाजूला सरकत होत्या....जणू ह्या काळ्या वेशातल्या व्यक्तीचे ते गुलाम असावेत ती आकृती येताच सगळ्या आकृत्या बाजूला सरकल्या.....काळी आकार बदलणारी धिप्पाड आकृती जी एक प्रकारे हवेत तरंगतच इथे येत होती....पण आनंदाला समोरची ती आकृती भयानक वाटत होती....एखाद्याचा जीव गेला असता बघून.....ती आकृती मानवी वाटत होती पण तिच्या मानेवर शीर नव्हते....ते शीर बाजूला तरंगत होते आणि एखाद्या विस्तवा सारखे पेटत होते.....आनंदा हे सगळं बघून प्रचंड घाबरला....त्याची शुद्ध हरपत चालली होती....अचानक तो खाली कोसळला....तोंडातून रक्ताची उलटी होऊन तो बेशुद्ध पडला...त्याचं अंग थरथरत शांत झालं....बेशुद्ध झाला होता तो
आनंदाला काहीच कल्पना नव्हती की हा वाडा शापित आहे....ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात कुदळ घुसली होती ते सर्व जण इथे सोन्याचा खजाना शोधायला आले होते आणि हरिबाच्या अधीन ज्या काळ्या शक्ती होत्या त्यांनी मोठ्या निर्दयी पण ह्या लोकांना ठार केले होते....इथे मरून पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना हरिबाने इथेच ह्या वाड्यात कैद करून ठेवले होते सेवेकरी म्हणून....आणि ती शीर नसलेल्या व्यक्तीची आकृती प्रत्यक्ष हरिबाची होती....आपलं शीर त्याने यज्ञात अर्पण करून ह्या वाड्याला बाधित केलं होतं.....अजूनही त्याचा सोन्यावरचा मोह संपला नव्हता....तो अजूनही ह्या सोन्याची रखवाली करत होता.....आनंदाला सुद्धा ठार करून इथे बंदीस्त करण्याचे ठरले होते पण तसं काही झालं नाही कारण आनंदाच्या मनात इथल्या सोन्याबद्दल कोणताच वाईट विचार नव्हता....त्याला इथल्या सोन्याबद्दल माहिती सुद्धा नव्हते....त्यामुळे कदाचित हरिबाने त्याला ठार केले नव्हते...रक्ताची उलटी करून आनंदा बेशुद्ध कोसळला होता....अधून मधून आनंदाचे डोळे उघडत होते....कसलीतरी कुजबुज त्याला ऐकू येत होती.....आज आपला शेवटचा दिवस आहे असं समजून त्याच्या डोळ्यांतून अश्रू सुद्धा वाहत होते....अखेर त्याचे डोळे मिटले
एक तीव्र सूर्यप्रकाश आनंदाच्या डोळ्यांवर पडला....त्यानेच त्याला जाग आली....ताडकन तो उठून बसला....त्याने जी रक्ताची उलटी केली होती त्यातच तो लोळत होता....त्याने आजूबाजूला बघितलं सुंदर दगडी भक्कम वाडा.....आनंदा कॅन्सरच्या लास्ट स्टेजला होता....अंगात अगदी थोडेच त्राण होते....त्याचा आधार घेत तो उभा राहिला....आपले कपडे सावरत त्याने एकवार नजर सगळीकडे फिरवली....अजूनही तिथलं वातावरण जडजड वाटत होतं...कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असं भासत होतं.....डोकं बधिर झालं होतं....अचानक त्याला रात्रीची दृशे ते भयानक चेहरे आठवले.....ते चेहरे आठवतच आनंदा तार तार चालू लागला....त्याचं अंग थरथरत होतं....कधी एकदा ह्या वाड्यातून बाहेर पडतो अस त्याला झालं होतं....अंगातले सगळे बळ एकवटून तो मुख्य दाराच्या दिशेने चालत होता....अचानक तो त्या दाराजवळ थबकला.....10 वाजले होते ऊन पडले होते....त्या उन्हात समोरचे विस्तीर्ण मैदान दिसत होते....बाहेर पडणारे पाय अचानक गोठले कारण उंबऱ्यावर काहीतरी चमकदार होतं.....सोन्याचा हार होता तो.....तो हार बघूनच आनंदा जागेवर थांबला होता....क्षणभर तो सगळं काही विसरला....त्याने आजूबाजूला बघितलं....तो सोन्याचा हार हातात घेतला....आजूबाजूला कुणीच नव्हतं....त्याने एक दोनदा हाक मारून बोलावण्याचा प्रयत्नही केला त्या शांत वातावरणात त्याचा आवाज घुमत होता पण एकदाही प्रतिसाद आला नाही....तो घाबरून आधी वाड्याच्या बाहेर आला....आणि वाड्याच्या आजूबाजूला फिरून कुणी दिसत का ते बघत होता पण आजूबाजूला कुणीच नव्हतं....अचानक त्याच लक्ष आपल्या कंबरेला गेलं....त्याचा बटवा कुठे पडला होता....आनंदा ह्या शहरात कॅन्सरच्या इलाज साठी आला होता....त्याने साठवलेली रक्कम इथे येईपर्यंत त्याच्याजवळ होती....कुठे पडली?? कुणी चोरली?? की पावसात वाहून गेली काहीच कल्पना नव्हती....आता आपला इलाज कसा होणार?? आपण बरं कसं होणार???बरे करणारे पैसे तर गेले.....आनंदा हवालदिल झाला....त्याला आता रडू कोसळत होतं....अचानक त्याच्या लक्षात आलं की आपल्या हातात हा सोन्याचा हार आहे....डोळे पुसून त्याने त्या सोन्याच्या हारावरची माती झटकली....बाजूच्या एका डबक्यात तो हार स्वच्छ धुतला आणि ह्या वाड्यापासून लांब जाऊ लागला....मागे बघत इकडे तिकडे बघत हार छातीला घट्ट आवळून आनंदा चालत होता....2,3 किलोमीटर चालल्यावर मुख्य रस्ता आला.....एक व्यक्तीकडे लिफ्ट मागून आनंदा आता शहरात आला....त्याचं काळीज धडधड उडत होतं...पैशाची सोय नाही झाली तर??.....आनंदा आता एका सोन्याच्या दुकानात आला त्याने सोनारासमोर तो हार ठेवला तो हार बघून सोनाराने आश्चर्याने आनंदाकडे बघितले कारण तो हार 200 वर्ष तरी जुना होता....त्याकडे निरखून बघत असताना आनंदा थोडा अस्वस्थ झाला...उगाच अपराधी भावना येऊन त्याने सोनारापुढे आपले दवाखान्याचे रिपोर्ट ठेवले
"आमच्या पूर्वजांचा हार हाय ह्यो....मला उपचार घ्यायला पैशे पाहिजेत म्हणून ईकायला काढलाय"
सोनाराने ते रिपोर्ट एकवार बघितले आणि कोणते प्रश्न केले नाहीत.....5 लाख आनंदाच्या हातावर ठेवले...आनंदा ती रक्कम घेऊन भलताच खुश झाला...आधी तो एका चांगल्या दवाखान्यात ऍडमिट झाला....थोडी रक्कम तिथे भरली.....डॉक्टरने तुम्ही बरे व्हाल अस सांगताच आनंदाच्या डोळ्यातून अश्रू आले....एक वेगळंच बळ त्याच्यात आलं....चार पाच दिवस तो ह्या दवाखान्यात ऍडमिट होता....त्याला थोडं बर वाटत होतं....पैसा अमाप खर्च होत होता.....पाच लाख जवळपास संपत आले होते.....आनंदा कॅन्सर मधून अचानक पणे बरा होऊ लागला पण न जाणो त्याला त्या वाड्याकडे जायची ओढ लागली....हे अस का होतंय त्याला कल्पना नव्हती पण सतत त्याला वाटत होते की त्या वाड्यात परत जावे....आणि रात्री झोपेत त्याला त्या वाड्याची स्वप्ने पडू लागली....कुणीतरी रात्री त्याच्या कानात कसलेसे मंत्र पुटपुटत असे....कदाचित त्यामुळे त्या शापित वाड्या विषयी ओढ निर्माण झाली असावी....आनंदाच्या तब्बेतीत चमत्कारिक रित्या बदल होत होते तो चालू फिरू शकत होता....कदाचित त्या वाड्याची इच्छा असावी की आनंदाने इथे परत यावे....आनंदाचे सगळे पैसे संपले होते....डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की पूर्ण महिना एक दिवस आड चेकअप साठी यावे लागेल....आनंदाचे तर सगळे पैसे संपले होते....औषधांचा आणि पुढील ट्रीटमेंटचा अजून 4 लाख तरी खर्च होणार होता.....त्या भयानक वाड्यात परत जावे का?? एकवार ते कुदळीने फोडलेली डोकी आनंदासमोर आली तो शहारला....पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरले....
"जर मारून टाकायचे असते तर केव्हाच त्या वाड्याने मला खाऊन टाकलं असतं....पण तसं झालं नाही....उलट त्या वाड्यानं आपली पैसे देऊन मदतच केली"
असा एक विचार करून आनंदा परत त्या वाड्याच्या दिशेने निघाला....तब्बेतीत थोडी सुधारणा झाली होती....आनंदा माळरान तुडवीत त्या वाड्यासमोर परत पोहोचला....त्याला गरज होती पैशाची....दुसऱ्या वेळी हा वाडा आपली मदत करेल का?? ह्या प्रश्नाचं वादळ घेऊन आनंदा त्या वाड्याच्या दारात उभा होता....आणि वाड्याच्या आतून अंधारातून त्या काळ्या शक्ती आनंदा आत येण्याची वाटच बघत होत्या.....जेवढे जास्त आत्मे इथे वाड्यात कैद होतील तितकाच मजबूत नीटनेटका हा वाडा टिकून राहणार होता....ह्या वेळी आनंदाला गिळंकृत करण्यास हा वाडा तयार होता.....(क्रमशः)

