भास्कर...

©® लेखक: रूद्रदमन
8265077252
मी स्वभावाने अत्यंत मनमिळावू... कोणत्याही कार्यक्रमात गेलो की लोकांशी मैत्री करणे हा माझा छंदच... गप्पांची गाडी एकदा का रूळावर आली, की त्याचे रूपांतर गूढ आणि थरारक विषयात कसे करायचे यात मी जणू पीएचडीच केली आहे.... असाच एक किस्सा मी एका मित्राकडून ऐकला, जो त्याच्याच गावात घडला होता... हा अनुभव मी ज्याच्या बरोबर घडला त्याच्या शब्दांत मांडतोय...
माझे नाव कुणाल... मी एका शेतकरी कुटुंबात जन्मलो.... परिस्थिती बेताचीच.... आई-वडील, एक मोठी बहीण आणि मी असे आमचे छोटे कुटुंब.... शेती ही मोजकीच त्यामुळे तिच्यावर जेमतेम मीठ-मिरचीचा प्रपंच होत असे... आई वडील जास्त करून दुसऱ्यांच्या शेतीवर कामाला जात असत..
पण मला शिक्षणाची ओढ होती... फाटलेल्या पॅंटवर ठिगळ लावून का होईना मी शाळेत जायचोच... मनात एक खात्री होती की शिक्षणाशिवाय हे दारिद्र्य संपणार नाही... आणि ते उमजल्यामुळेच मी स्वतःला अभ्यासात झोकून दिले...
अखेर नियती प्रसन्न झाली आणि माझी निवड नवोदय विद्यालया साठी झाली.... घर सोडताना मन द्विधा होते, पण बहिणीचे ते जुने फाटके कपडे आणि माझी गरिबी मला खुणावत होती... नवोदयला गेल्यावर घरातील एक जणाच्या जेवणाचा खर्च वाचला, याचे समाधान मोठे होते...
सुरुवातीला मी वर्षातून तीनदा घरी येत असे... पण पुढे ध्येयाने झपाटलो आणि फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच घरी येऊ लागलो.... त्या काळी मोबाईल हे गरिबांसाठी दिवास्वप्नच होते... केवळ पत्रांद्वारे खुशाली कळायची... एकदा बहिणीचे पत्र आले.... तिने रक्षाबंधनाला येण्यासाठी खूप विनंती केली होती....
लग्नाचे वय झालेल्या बहिणीचा हट्ट मी मोडू शकलो नाही... मनात विचार आला..
तिला न कळवता, दोन दिवस आधीच मी गावात येऊन धडकलो... तिला झालेला आनंद पाहून माझे मन भरून आले होते...
दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होते....
राखीचा मुहूर्त उशिरा असल्यामुळे सोहळा उरकायला संध्याकाळचे चार वाजले... थोडा वेळ गावात चक्कर मारून येतो असे आईला सांगून मी बाहेर पडलो.... गावात शांतता होती... बहुतेक जण शेजारच्या गावात जत्रेसाठी गेले होते.... पाय आपोआप नदीकडे वळले.... पाऊस चांगला झाल्याने नदी ला बऱ्यापैकी पाणी होते... काठावरच्या एका शिळेवर बसून मी मावळत्या सूर्याचा केशरी प्रकाश न्याहाळत होतो.... सूर्य मावळला तसा काळोख दाटून येण्यास सुरुवात झाली.. थोड्याच वेळात त्या निसर्गरम्य देखाव्याला तो आपल्या कवेत घेणार असल्याचे मला जाणवले...
घरी जाण्यासाठी मी उठलो आणि गावाच्या दिशेने चालू लागलो, इतक्यात मागून हाक आली,
"कुणाल, कधी आलास रे?"
मी वळून पाहिले, तो भास्कर होता.... माझा जुना शाळकरी मित्र...
नदीच्या काठावर उभा राहून बोलत होता..
"अरे भास्कर! मी कालच आलो... इतक्यावेळ कुठे होता.. मला दिसला नाही तो.. आणि तू जत्रेला नाही गेलास का? " मी विचारले..
तो शून्यात बघत म्हणाला, "नाही रे, यावर्षी नाही जमले जायला.... इथेच तर होतो.. तुला लपून बघत होतो.. तू जाण्यासाठी उठला की तुला धप्पा करण्यासाठी.."
तो बोलत बोलत पुढे आला... एक ओलसर शेवाळलेला वास त्याच्या आजूबाजूला दरवळत असल्यासारखे मला जाणवले.. मी त्याकडे दुर्लक्ष केले..
आम्ही जवळच्याच शिळेवर बसून गप्पा मारू लागलो..
पण तो फारसा बोलत नव्हता...
अचानक माझा हात पकडत तो म्हणाला, "कुणाल, चल पोहायला जाऊया!"
मी त्या अचानक मागणीने आणि त्याच्या हाताच्या त्या ओलसर बटबटीत स्पर्शाने दचकलो...
"अरे, आता तर पार अंधार झालाय. उद्या येऊ की..."
बोलत मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला..
तो हट्टाला पेटला, "नाही, आताच चल... या वेळच्या पाण्याची मजा तुला माहीत नाही... मी रोज याच वेळी पाण्यात असतो."
त्याचा स्पर्श त्याचा आग्रह विचित्र वाटत होता... इतक्यात दुरून बॅटरीचा प्रकाश दिसला...
"कुणाल... अरे कुणाल!" वडिलांचा आवाज आला...
मी आलो आलो म्हणून प्रतिसाद दिला....
भास्करकडे वळून म्हणालो, "मी निघतो, बाबा आलेत. उद्या नक्की भेटू."
भास्कर काहीच न बोलता नदीच्या पात्राकडे चालू लागला आणि वळून म्हणाला, "कुणाल, मी रात्री तुला भेटायला घरी येईन... भेटशील ना?"
मी केवळ हो म्हटले आणि बाबांच्या दिशेने धावलो....
बाबा खूप चिडलेले होते. "एवढ्या रात्री नदीवर काय करतोयस?" त्यांनी चिडून विचारले.....
मी त्यांना शांत करण्यासाठी बोललो, "बाबा, मी एकटा नव्हतो. भास्कर भेटला होता, त्याच्याशी गप्पा मारत होतो."
माझे बोलणे ऐकताच बाबांच्या हातातील बॅटरी क्षणभर थरथरली... त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, "चल, लवकर घर गाठूया."
घरी गेल्यावर वातावरणात एक विचित्र ताण होता... जेवताना बाबा एक शब्दही बोलले नाहीत... जेवण उरकून मी माझ्या खोलीत गेलो... थोड्या वेळाने बाबा आले आणि त्यांनी माझ्या खोलीच्या खिडक्या आणि दरवाजा लावून घेतला. "खिडकी अजिबात उघडू नकोस," असा सज्जड दम देऊन ते निघून गेले...
मध्यरात्रीची वेळ झाली असेल... घरातील सर्व जण झोपले होते... सगळीकडे स्मशानशांतता पसरलेली... अचानक खिडकीवर टक-टक असा आवाज झाला....
मी खिडकीकडे बघितले...
कोणीतरी बाहेरून खिडकी हलवत होते...
मी घाबरून विचारले, "कोण आहे?"
आवाज थांबला.... मला वाटले मांजर असेल मी सावधपणे खिडकी उघडली... समोर पाहतो तर काय, अंधारात भास्कर उभा होता... त्याचे डोळे निर्जीव दिसत होते....
चेहरा आणि केसांवरून पाणी गळत होते... जसा तो नुकताच पाण्यात पोहून आला होता..
तो म्हणाला, "कुणाल, बाहेर ये ना... मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. दरवाजा उघड..." त्याच्या बोलण्यात एक अर्जव होते..
मला त्याला निघून जा असे म्हणावेसे वाटत होते पण नाही करू शकलो.. मी त्याला मुख्य दरवाजापाशी यायला सांगितले...
मी हॉलमध्ये आलो आणि दरवाजाची कडी काढणार, तोच मला जाणवले की दरवाजाला तर आतून मोठे कुलूप लावलेले होते...
दरवाजावर टकटक करत बाहेर उभ्या भास्कर ने लवकर दरवाज उघडण्याची विनंती केली..
मी त्याला आतून लावलेल्या कुलूप विषयी सांगत, मी यावेळी बाहेर येण्यास असमर्थ असल्याचे सांगितले...
माझ्या त्या नकारा बरोबरच बाहेर काही तरी बदलले...
भास्करचा आवाज आता बदलला होता. तो आता विनंती करत नव्हता, तर ओरडत होता...
"दरवाजा उघड कुणाल... उघड..."
तो जोराने दरवाजावर धडका मारू लागला... त्याचा आवाज आता घोगरा आणि अमानवीय वाटू लागला होता.... मी नखशिखांत घाबरलो आणि दरवाजा पासून दूर जाऊ लागलो...
मागे सरकताना माझा हात टेबलावरच्या ग्लासवर आदळला आणि तो काचेचा ग्लास जोरात जमिनीवर आपटून फुटला...
त्याच्या आवाजाबरोबर बाबा मागच्या खोलीतून धावत बाहेर आले...
"कुणाल! काय करतोयस?" ते जोरात ओरडले...
बाबांचा आवाज ऐकताच बाहेरून दरवाजावर पडणाऱ्या धडका थांबल्या.... सगळीकडे एक जीवघेणी शांतता पसरली...
त्या घनघोर शांततेत एक जड पावलांचा आवाज घरापासून दूर जाताना ऐकू आला आणि त्या पाठोपाठ एक भयानक ध्वनी माझ्या कानात घुमला...
"वाचलास कुणाल... आज वाचलास..."
ते शब्द ऐकून माझा थरकाप उडाला होता...
मी भिंतीला चिटकून थरथर कापत उभा होतो...
बाबांनी मला जवळ घेतले आणि शांत केले.... मी त्यांना सगळे सांगितले....
बाबा गंभीरपणे म्हणाले, "कुणाल, जेव्हा तू संध्याकाळी भास्करचं नाव घेतलंस, तेव्हाच काळजात धस्स झालं होतं. पण तुला घाबरवायचं नव्हतं म्हणून मी तेव्हा शांत राहिलो आणि रात्री दरवाजाला आतून कुलूप लावलं."
भास्कर विषयी अनेक प्रश्न माझ्या मनात रेंगाळू लागले होते..
मी बाबांना विचारले, "पण बाबा,भास्कर असा का वागत होता?"
बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, "भास्कर दोन महिन्यांपूर्वीच नदीत बुडून मेला होता रे... त्याचं प्रेत तीन दिवसांनी सापडलं होतं.."
माझ्या पायाखालची जमीनच सरकली... बाबा पुढे सांगू लागले, "त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरा शेजारी राहणारा विशाल सुद्धा गावात परतल्यावर दुसऱ्याच दिवशी नदीत मृतावस्थेत सापडला होता.... तुला तर माहीतच आहे विशाल पण बाहेर शिकायला होता... आज तो तुझ्यासाठी आला होता..."
सर्व ऐकून मला तर भोवळ यायचीच बाकी होती... त्यादिवशी माझ्या नशिबाने आणि बाबांच्या सतर्कतेने मला खऱ्या अर्थाने पुनर्जन्म मिळाला होता...
समाप्त...
©® लेखक: रूद्रदमन
8265077252
#मराठीभयकथा
#HorrorMarathi
#TrueHorror
#मराठीकथा
