भरपाई..
लेखन : रुद्रदमन
8265077252
त्या रात्रीबद्दल मी सहसा कुणाशीच बोलत नाही… कारण जे मी त्या रात्री पाहिले, ते कुणाला सांगितले तर लोक त्याला माझा भ्रम किंवा मनाचा खेळ समजतील... पण आजही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एकच प्रश्न सापासारखा वळवळत राहतो..
“आयुष्यात फक्त एकदाच.. त्या रात्री माझ्या बरोबर ती घटना का घडली?”
मी गौरी…
‘विभक्त होणे’ किंवा ‘घटस्फोट’ हे शब्द समजण्याचे माझे वयही नव्हते, तेव्हाच आई-बाबांना पाश्चिमात्य संस्कृतीच्या विंचवाने दंश केला... त्या दोघांनीही आपापले वेगळे संसार थाटले, स्वतःच्या सुखाचा मार्ग निवडला, पण यात माझी जबाबदारी मात्र कुणालाच नको होती...
ती उचलली माझ्या आजोबांनी... माझ्या वडिलांचे वडील..
त्यांच्याच मायेच्या छत्राखाली मी वाढले, त्यांच्याकडेच शिकले, मोठी झाले..... पण ते गेल्यावर मात्र काही दिवसातच मला नाइलाजाने शहराची वाट धरावी लागली...
कारण? कारण माझ्या आई आणि बाबांना त्यांच्या नव्या संसारात आता नवी मुले झाली होती... त्यांच्या लेखी मी नकोशी होते… किंवा स्पष्टच सांगायचे तर, त्यांच्या आयुष्यातील एका जुन्या चुकीतून जन्माला आलेल्या या मुलीविषयी त्यांच्या मनात प्रेमाचा ओलावाही उरला नव्हता...
अरेच्चा… माफ करा हं! मी तुम्हाला माझा तो भयावह अनुभव सांगायचे सोडून, माझ्या आयुष्याचीच रडगाणी गात बसले. तुमचा वेळ न घालवता मी मूळ विषयाकडे वळते...
माझ्या जीवनात आजोबांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. त्यांनी माझ्या जाण्यापूर्वीच, गावाकडील, आमच्या दोघांच्या आठवणींनी भरलेले तो वाडा आणि त्याच्या आजूबाजूची सर्व जमीन माझ्या नावावर केली होती...
आजोबांच्या निधनानंतर, त्यांनी तयार केलेल्या मृत्युपत्राची माहिती लगेचच वकिलांनी मला दिली. खरे सांगायचे तर, संपत्तीची ओढ मला कधीच नव्हती; पण आजोबांनी प्रेमाने दिलेले ते दान मी त्यांची आठवण म्हणून मोठ्या आनंदाने स्वीकारले.
आजोबा गेल्यावर, गावात त्या घरात मी पूर्णपणे एकटी पडले. एकटीचे तिथे अजिबात मन रमत नव्हते. शेवटी, आजोबांचे सर्व कार्य झाल्यावर, मी गाव सोडून शहरात जाण्याचा विचार केला. माझे शिक्षण चांगले झाल्यामुळे मला शहरात सहजपणे नोकरी मिळेल याची मला खात्री होती..
शहरात पाऊल ठेवल्यावर, खऱ्या अर्थाने माझे भाग्य बलवान ठरले. मला काही दिवसांतच एका चांगल्या ठिकाणी रिसेप्शनिस्ट चे काम मिळाले. सुरुवातीची दोन वर्षे तर अगदी स्वप्नांसारखी गेली. माझ्यातील क्षमता ओळखून माझ्या वरिष्ठांनी मला बढतीही दिली. एकटीचे आयुष्य, भरपूर वेतन आणि एक सुरक्षित व आनंदी जीवन मी जगत होते...
मधूनमधून आजोबांची, गावाकडची आणि वाड्याची आठवण येत असे.. पण माझ्या कामाच्या धावपळीत ती लगेच दूर होत असे...
परंतु, अचानक माझ्या त्या सुखाला कोणाची तरी वाईट दृष्ट कधी लागली ते कळलेच नाही...
अचानक सर्व काही पालटले. मागच्या दोन वर्षांत एकही चूक न करणाऱ्या माझ्या हातून नंतर अनेक चुका होऊ लागल्या...
मनात नसतानाही काही निर्णय मी अनिच्छेने घेऊ लागले...
हे नक्की मी करत होते की कोणी माझ्याकडून करवून घेत होते, हे मला तेव्हा कधीच समजले नाही..
पण त्यानंतर माझे शहरातील जीवन खूप कठीण झाले... शहरातील त्या त्रासदायक गोंधळाने आणि सततच्या धावपळीने मन अगदी थकून गेले होते...
मागच्या दोन वर्षांतील आयुष्य आणि प्रगती बघता मला वाटले होते की लहानपणापासून माझ्या वाट्याला आलेला संघर्ष आता संपला आहे... पण त्याने पुन्हा भयंकर रूप धारण केले आणि माझ्यासमोर उभा राहिला होता... गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे जाऊ लागल्या, तसा मी शहर सोडून पुन्हा गावी, आजोबांच्या सहवासात घालवलेल्या घरात परत येण्याचा निर्णय घेतला...
मला खात्री होती की, जिथे आजोबांच्या प्रेमाच्या छायेत माझे बालपण गेले, तिथे तरी माझ्या मनाला थोडी शांतता मिळेल...
पण छे! जणू ‘माझे भाग्य’ आणि ‘शांतता’ यांचे जुने वैर होते..
आजोबांचे ते जुने घर… खतेतर त्याला नुसते घर म्हणण्यापेक्षा ‘वाडा’ म्हणणेच जास्त शोभून दिसेल... आजोबांनी त्यांच्या ऐन तारुण्यात, मोठ्या उमेदीने आणि आवडीने बांधलेला वाडा.. त्याला लागूनच उभे असलेले देऊळ आणि त्या देवळाच्या अगदी पाठीशी पसरलेली ती घनदाट झाडी… माझे संपूर्ण बालपण याच परिसरात गेले होते.. त्या वेळी ना कशाची भीती होती, ना कशाची चिंता; दिवस कसे अगदी निश्चिंत आणि मनमोकळे जायचे...
पण आजोबा गेल्यानंतर मी जसे गाव सोडले..त्यानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच मी त्या वाड्यात पाऊल टाकत होते. आजोबा गेल्यापासून तो वाडा तसा पोरकाच पडला होता. त्या निर्मनुष्य अंगणात प्रवेश करताच नाकात तोच बंद घराचा, कुबट आणि ओलसर मातीचा वास शिरला. एकेकाळी माझ्या हसण्या-खेळण्याने गजबजलेल्या त्या अंगणात आता फक्त भयाण शांतता होती… आणि त्या शांततेला अधिकच गडद करणारी, त्या निर्जन जागी भल्या दुपारी सुद्धा अखंड चाललेली किड्यांची ती अस्वस्थ करणारी किरकिर मनाला अजूनच विचलित करत होती..…
वाड्याची सफाई करण्यात संध्याकाळ मला सायंकाळ झाली.. काम आवारल्यानंतर मी सहज म्हणून देवळामागच्या पायवाटेने एक चक्कर मारायला निघाले... लहान असताना किती तरी वर्ष पायाखाली तुडवलेली वाट होती ती..
समोर पसरलेल्या गावात सगळीकडे स्मशानवत शांतता पसरली होती...
एका टॉर्च च्या आधाराने त्या निर्मनुष्य पायवाटेवरून चालताना एका क्षणी अचानक मला जाणीव झाली की माझ्या मागून कुणीतरी अगदी पावलावर पाऊल टाकून चालते आहे..
मी दोन-तीनदा थबकले.. त्या अगोदर कधी असे झालेले मला आठवत नव्हते.. सुरुवातीला मी भास म्हणून दुर्लक्ष करत होते.. पण सलग दोन तीन वेळा तीच अनुभूती आल्यानंतर मी एकदा झटकन मागे वळून पाहिले.. पण कुणीच नव्हते... फक्त उभी झाडे आणि त्यांच्या भोवती पसरलेला अंधार... मी हातातील टॉर्च चा फोकस सर्वत्र मारून बघितला.. पण कुठेच काही नव्हते..
“गौरी, तुझा मेंदूच तुला फसवतोय,” मी स्वतःचीच समजूत काढली आणि पुन्हा चालू लागले...
पण पुढच्याच क्षणी मागून येणारा पावलांचा आवाज अधिक स्पष्ट, अधिक जवळून आला...
सुक्या पानांवर वजनदार पाय पडल्याचा तो आवाज... तो आवाज साधा नव्हता... त्यात एक विचित्र लय होती.. अगदी माझ्या पावलांवर पाऊल टाकण्याची लय..
मी जागीच खिळले.
तसा आवाजही थांबला..
मी पुन्हा पाऊल उचलले.. आणि चालू लागले..
आवाज पुन्हा माझ्या गतीशी जुळवून घेत सुरू झाला...
खरेतर मी मनातून हादरले होते.. मनात हजारो शंका निर्माण झाल्या होत्या.. न्यूज चॅनेल वर रोजच येणाऱ्या बलात्काराच्या बातम्या डोळ्यासमोर दिसू लागल्या होत्या..
मनात उठलेले भयानक विचारांचे वादळ कमी होते की तोच
तो क्षण आला..…
माझ्या मानेवर कुणाचा तरी गरम, दुर्गंधीयुक्त श्वास रेंगाळल्यासारखे वाटले. अंगावर सर्रकन काटा आला... हात पाय लटलट कापायला लागले होते..
पुढे देवळाच्या भिंतीला लागून एक वळण होते, जिथून घर अगदी जवळ होते... मनावर ताबा मिळवू बघणाऱ्या भीतीवर नियंत्रण मिळवत मी वेगात, अगदी धावतच वळणावर पोहोचले.. तेव्हा मागून येणारा पावलांचा आवाज बंद झाला होता..
तिथे पोहोचल्यावर न राहवून मी शेवटचे मागे वळून पाहिले...
मागचे दृश्य बघून.. भीतीने माझे हृदय बंद पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती..
माझ्यापासून अगदी वीस फुटाच्या अंतरावर झाडांच्या त्या दाट सावल्यांमध्ये..
एक भीतीदायक, अमानवीय आकृती उभी होती...
तिचे ते रूप बघून माझा थरकाप उडाला... डोळे विस्फारून बाहेर येतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती..
तिचा चेहरा चुन्याचे अनेक थर दिलेल्या जुन्या पोपडे पकडलेल्या भिंती सारखा पांढराफटक होता... कपाळ विचित्रपणे मोठे आणि वर पर्यंत पसरलेले होते.... पण सर्वात भयंकर होते डोळे... ते माणसाचे डोळे नव्हतेच… अंधारात दोन जळत्या निखाऱ्यांसारखे चमकणारे, पिवळसर-नारंगी रंगाचे ते भयानक डोळे थेट माझ्याकडे रोखलेले होते...
तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून निघालेल्या रक्तासारख्या लाल रेषा, तिच्या त्या जळत्या डोळ्यांना भेदून वर कपाळापर्यंत गेल्या होत्या. चेहऱ्यावर एक विकृत, हिंस्र हास्य होते, ज्यात तिचे पुढचे दोन मोठे, एखाद्या प्राण्यासारखे दात विचित्रपणे बाहेर आलेले दिसत होते... गळ्याभोवती एखाद्या जुन्या काळातल्या विदूषकासारखा मळकट झालर असलेला पट्टा होता...
ती भेसूर आकृती कोणतीही हालचाल करत नव्हती..
जागेवरूनच विकृत हसत... त्या जळत्या पिवळ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती.. तिच्या त्या नजरेत.. हास्यात आणि ओठांच्या आणि जिभेच्या हालचालीत असलेली विकृत लालसा माझ्या मनापर्यंत पोहोचली होती..
न बोलताही तिच्या मनातील विचार माझ्या पर्यंत पोहोचत होते..
मी तिथेच गोठून गेले...
“हे काय आहे? कधीपासून हे माझ्या मागावर आहे?” या प्रश्नांनी डोके बधीर झाले होते..
तेवढ्यात… त्या आकृतीचे पाय हलू लागले...
एक...
दोन...
कोणतीही घाई नाही... ती आकृती एखाद्या निर्जीव बाहुल्याप्रमाणे संथगतीने माझ्याकडे सरकू लागली...
देवाची शपथ सांगते...
तिच्या हालचाली माणसासारख्या नव्हत्या...
माणूस धावतो तेव्हा त्यात एक लय असते... यात लय नव्हती… यात फक्त मृत्यूची थंड शांतता होती...
मृत्यूचा साक्षात्कार बघून.. माझ्या मनाने उचल खाल्ली..
माझ्या पायात जणू वारे भरले... मी धावत सुटले.. वेड्यासारखी, घशात अडकलेला श्वास गिळत...
अंगणाचा दरवाजा दिसला आणि मी जवळजवळ त्यावर आदळलेच...
वाड्यात शिरले... धाडकन दरवाजा लावला... कडी घातली...
पाठ दाराला टेकवून तशीच खाली बसले... कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या... छाती वेगाने खालीवर होत होती..
“शांत, गौरी… शांत… काही नाहीये बाहेर,” मी स्वतःलाच समजावत होते...
पण माझे हात थरथरत होते...
आणि तेवढ्यात..
दाराच्या अगदी पलीकडून एक मंद आवाज आला...
खर्… खर्… खर्…
जणू कुणीतरी लांब, तीक्ष्ण नखांनी लाकडी दरवाजा हळुवार ओरबडत आहे...
रागाने नाही...
हक्काने...
त्या बरोबर एक कर्णकर्कश गुणगुण ऐकू येऊ लागली..
मी श्वास रोखून कान लावला...
ओरबडण्याचा आवाज थांबला…
गुणगुणने बंद झाले..
आणि मग जे ऐकू आले.. त्याने माझ्या काळजाचा ठोकाच चुकवला..
दाराबाहेरून, अगदी फटीजवळून कुणीतरी कुजबुजल्यासारखे म्हणाले....
“…गौ… री… दरवाजा उघड.. मी तुझ्यासाठीच आलो आहे.. उघड दरवाजा...”
तो आवाज माणसाचा नव्हता... हे मात्र निश्चित...
जागेवरच माझे भान हरपले..
ते दुसऱ्या दिवशी सकाळीच मी शुद्धीवर आले..
त्याच दिवशी मी ते गाव सोडले.. ते आजतागायत तिथे पाऊल ठेवले नाही..
तसे ठेवण्याचे कारण किंवा हक्क मला उरलाच नाही..
कारण त्या घटने नंतर अवघ्या दोन तीन दिवसातच माझे वडील मी शहरात राहत असलेल्या ठिकाणी आले होते.. त्यांनी आजोबांच्या वाड्यावरील हक्क मी सोडत असल्याच्या कागदपत्रांवर माझ्या सह्या मागितल्या.. दहा लाख रुपये रोख मोबदला देऊ केला..
अवघ्या दोन तीन दिवसापूर्वी माझ्या जीवावर बेतलेली ती गावातील रात्र बघता.. मी उभ्या आयुष्यात तिकडे जाणार नाही हे मला स्वतःलाच उमगले होते.. मी कोणतेही आढेवेढे न घेता व्यवहार पूर्ण केला..
आज तो वाडा अस्तित्वातच नाही.. कारण मी वडिलांच्या नावावर केल्यानंतर काही महिन्यातच वाडा तसेच त्याच्या अवती भोवती असलेली जागा सरकारने विकत घेतली..
महामार्गासाठी... दीड कोटींची भरपाई देऊन...
कधी कधी असे वाटते की त्या दिवशी मी तिथे गेले नसते तर कदाचित त्या भरपाई ची मालकीण मी असते..
पण त्याच बरोबर हा पण विचार येतो की वडिलांनी दिलेल्या दहा लाख रुपयात माझे आयुष्य बदलले..
कारण त्या आधी माझ्या आयुष्यात सुरू असलेल्या सर्व त्रासदायक घटना एकाएकी बंद झाल्या..
श्रीमंती नाही पण एक आनंदी जीवन मी जगू लागले..
