पुनवेला तो येतो...
ती एकटक चंद्राकडे पाहत होती. जुन्या आठवणी डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत होत्या. अशीच एक सुंदर रात्र होती. निळंभोर आकाश चांदण्यांनी भरलेलं होतं. माथ्यावरला पूर्णचंद्र त्या दोघांवर प्रेमाची शीतल बरसात करत होता. गच्चीच्या कट्याला रेलून दोघं उभे होते. मल्हारच्या विशाल छातीवर डोकं टेकवून सारिका ते चांदणं डोळ्यात साठवून घेत होती.
थांब ना मल्हार अजून काही दिवस... सारिका त्याला गळ घालत होती.
पण मी इथे भारतात, तू दुसऱ्या देशात... आपली काही वरचेवर भेट होणार आहे का? सारिकाची तक्रार सुरूच होती.
वरचेवर तर शक्य नाही पण मला जमेल तसं मी येईनच तुला भेटायला. मल्हार सारिकाच्या केसातून हात फिरवत बोलत होता.
आता डोळे पूस बरं. मला हसून निरोप नाही का देणार? मल्हार तीला बळेबळे समजावत होता. खरं तर सारिकाला सोडून जाणं त्याला पण कठीणच जात होतं.
तुला एक गंमत सांगू? पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल किंवा इतर कुठली संपर्क साधनं नव्हती त्यावेळी दोन प्रेमी जीव म्हणे एकमेकांना सांगायचे, आकाशात जेव्हा चंद्र उगवेल ना तेव्हा तू त्याच्याकडे बघ, मी त्याच्या मार्फत तुझ्यासाठी प्रेमाचे संदेश पाठवेन. आपण सुद्धा असंच करू. मी इथून गेल्यावर आपण एकमेकांना अजिबात कॉल किंवा मॅसेज करायचा नाही. व्हिडीओ कॉल वर सुद्धा बघायचं नाही. डायरेक्ट पुढल्या पौर्णिमेला तू गच्चीवर ये, मी सुद्धा असेन तिथून चंद्राकडे बघेन. मला नक्की खात्री आहे हा चंद्र आपली भेट नक्कीच घडवून आणेल. मल्हारने सारिकासमोर भलताच प्रस्ताव ठेवला.
नाही हा, हे अजिबात शक्य नाही, तुला कॉल करायचा नाही, मॅसेजसुद्धा करायचा नाही असलं मला अजिबात जमणार नाही. सारिका मल्हारवर उखडलीच.
बरं बरं ती नंतरची गोष्ट आहे. आता तरी मला निरोप दे. एवढं बोलून मल्हार गच्चीचं दार उघडून चालता झाला. जाताना पाठी वळून बघणं त्याने कटाक्षाने टाळलं. आपल्या चेहऱ्यावरचे भाव सारिकापासून लपवणं त्याला अवघड गेलं असतं.
एकमेकांना अजिबात कॉन्टॅक्ट करायचा नाही हे सारिकाला पटलं नव्हतं पण मल्हारने त्याचा शब्द पाळला. मल्हार गेल्यापासून सारिकाने त्याला किती कॉल केले, मॅसेज केले पण मल्हारचा नंबर बंदच येत होता.
मल्हार आणि तीची अलीकडेच ओळख झालेली असल्यामुळे तो नक्की कुठे राहतो? त्याच्या घरी कोण कोण आहे? ह्याबद्दल फार बोलणंसुद्धा झालं नव्हतं. त्यामुळे मल्हार कुठे गायब आहे ह्याबद्दल तीला माहिती मिळवणं अशक्य होतं. पुढल्या पौर्णिमेपर्यंत वाट बघण्यापलीकडे तीच्याजवळ पर्यायच उरला नव्हता.
फायनली आज ती रात्र आली. पौर्णिमेचं चंद्रबिंब आकाशात दिसू लागलं. गच्चीला कडी लावून सारिका आशेने चंद्राकडे बघत होती. त्या चंद्रामध्ये मल्हारचा चेहरा पाहत होती. जुने क्षण आठवत तीने डोळे मिटून घेतले आणि तीला मानेवर मल्हारचा उष्ण श्वास जाणवला.
मल्हार तू आलास? ती पाठी वळून बघतच होती इतक्यात मल्हारने तीचे डोळे झाकून घेतले. शुss डोळे मिटून ह्या क्षणाची फक्त अनुभूती घे. एवढं बोलून मल्हारने सारिकाच्या मानेवर हलकंसं किस केलं.
मल्हार तू खरंच आला आहेस? सारिकाचा अजूनही विश्वास बसत नव्हता.
मी म्हटलं होतं ना हा चंद्रच आपली भेट घडवून आणेल असं. सारिकाला घट्ट मिठीत घेऊन मल्हार बोलत होता. गेल्या महिन्याभरातला विरह त्या एका स्पर्शाने पुसल्यासारखं सारिकाला आता जाणवत होतं. पहाट होईपर्यंत दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला, भरपूर गप्पा मारल्या. मला आता निघायला हवं म्हणत मल्हार घाईघाईने जायला निघाला. निघण्याअगोदर सारिकाला बोलला, आता आपली भेट पुढल्या पौर्णिमेला.
खरंच तू मला लगेच भेटायला येणार? सारिकाचा आनंद तीच्या बोलण्यातून नुसता ओसंडून वाहत होता.
हो पण त्या अगोदर मला एक वचन दे, मी इथून जाईपर्यंत तू डोळे उघडणार नाहीस. नाहीतर आपण एकत्र घालवलेला हा सुंदर वेळ केवळ एक स्वप्नं ठरेल. सारिकासोबत बोलता बोलता मल्हार आला तसा अचानक गायब झाला.
काही वेळाने सारिकाने डोळे उघडून पाहिलं, गच्चीवर ती एकटीच होती, गच्चीला आतून कडी होती. याचा अर्थ मल्हार आला, आपल्या सोबत एवढा वेळ थांबला, हा केवळ एक भास होता? भासच असेल हा, मल्हारची वाट बघता बघता आपला डोळा लागला आणि आपण त्याचं स्वप्नं बघत होतो एवढा वेळ.
पण जर का हे स्वप्नं होतं तर आपल्या शरीरावर अजूनही त्याच्या स्पर्शाचे रोमांच उमटलेले आहेत, ओठावर त्याच्या सिगारेटची चव रेंगाळते आहे त्याचं काय? म्हणजे मल्हार खरंच येऊन गेला आणि जाताना पुढल्या पौर्णिमेला भेटण्याचं वचन देऊन गेला.
सारिकाला तर काही समजेनासंच झालं होतं. त्याच मनःस्थितीमध्ये ती घरात आली आणि मल्हारचा विचार करत गादीवर विसावली. विचार करून डोकं फुटायची वेळ आली, पण काही केल्या मल्हारचं गूढ काही तीला उलगडलं नाही.स्वतःच्याही नकळत सारिकाने मल्हारबद्दल विचार करणं सोडून दिलं.
पण मल्हार मात्र सारिकाच्याच विचारात गर्क असतो. त्या रात्री सुद्धा असंच झालं होतं. सारिकाला भेटायला म्हणून मल्हार बाईक वरून निघाला. बाईकने एवढं लांब येण्यापेक्षा बसने ये असं सारिका बजावून सांगत होती. पण मल्हारने तीचं म्हणणं धुडकावून लावलं. त्याच्यासाठी दोन तास बाईक चालवणं काही मोठी गोष्ट नव्हती.
रस्ता बऱ्यापैकी सुनसान होता. पौर्णिमा असल्यामुळे वाट मस्त उजळून निघाली होती. मल्हारच्या डोक्यात सारिकाचे विचार सुरु होते. सारिकाचा चेहरा ह्या चंद्रासारखा नितळ गोरापान आणि गोलाकार आहे. त्याला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून हनुवटीवर छोटासा तीळ सुद्धा आहे. त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसते. सारिका आणि ह्या चंद्रामध्ये तुलना करायची झाली तर उजवं कोण ठरेल? अर्थातच माझी सारिका. मल्हार स्वतःशीच हसला. त्याने सहजच चंद्राकडे बघितलं, ह्या क्षणी त्याला त्या चंद्राच्या जागी सारिका दिसत होती. भान हरपून तो चंद्राकडे बघत होता. त्या भरात आपला गाडीवरचा कंट्रोल सुटल्याचं त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही.
मल्हारची बाईक रस्ता सोडून खोल दरीत कोसळली तेव्हा तो भानावर आला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपण आता सारिकाला कधीच भेटू शकणार नाही ह्या जाणीवेने तो कासावीस झाला. चंद्राकडे बघत बघत त्याने शेवटचा श्वास घेतला. त्या क्षणी सुद्धा त्याला चंद्राच्या जागी सारिकाच दिसत होती. ठरवल्या प्रमाणे मी तुला भेटायला नक्की येणार सारिका...
त्या रात्री मेल्यावरदेखील मल्हार सारिकाला भेटायला आला आणि नंतर सुद्धा येतच राहिला.
समाप्त
राजेंद्र भट
©®
९ नोव्हेंबर २०२५

