THE OTHER ME
ही घटना शब्दांत व्यक्त करत असतांना आजही माझ्या बोटांत कंप आणि छातीत धडधड वाढत आहे... कारण तो केवळ भास नव्हता… तर माझ्यासोबत घडलेले एक विक्राळ वास्तव होते...
कधी कधी मानवी आकलना पलीकडच्या गोष्टी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांसमोर घडतात, तेव्हा आपण जगतो त्या अस्तित्वाचीच व्याख्या बदलून जाते...
ती मागच्या नोव्हेंबरची, हाडे गोठवणारी रात्र होती.. कामावरून निघायला मला खूप उशीर झाला होता... हायवेवर धुक्याची इतकी दाट चादर पसरली होती की, हेडलाईटचा प्रकाशही काही फुटांवरच थिजल्यासारखा वाटत होता... गाडी चालवताना आजूबाजूला जग आहे की नाही, याचा विसर पडावा इतकी भयानक शांतता होती... फक्त इंजिनचा आवाज आणि काचेवर आदळणारे पांढरे शुभ्र धुके...
अचानक, हेडलाईटच्या अंधुक प्रकाशात रस्त्याच्या मधोमध एक आकृती चमकली... मी करकचून ब्रेक दाबले... टायरच्या किंचाळण्याने आजूबाजूला पसरलेली शांतता भंग पावली...
गाडी थांबली, अवेळी रस्त्यावर वाट अडवून कोण उभे असेल.. मनात हजारो शंका डोकावून गेल्या..
रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या आकृतीवर नजर स्थिरावताच माझ्या काळजात लख्ख वीज चमकली.. कारण ती आकृती दुसरी-तिसरी कुणी नसून... मी स्वतः होतो—रुद्र!
तोच चेहरा, तीच देहयष्टी. पण एकच फरक होता.. तो सुद्धा भयानक...
त्याचे डोळे... तिथे बुबुळे नव्हतीच.. डोळ्यांच्या जागी दोन अंतहीन, काळोख्या पोकळ्या होत्या. जीव गिळून टाकणारी ती विवरे!
त्या पोकळ्यांकडे पाहताच माझ्या अंगावर शेकडो सुया टोचल्या सारखा काटा उभा राहिला...
मी अनाहूतपणे ताठ होत मागे टेकलो.... कारण ते काळोखे डोळे.. माझ्या शरीराकडे नाही, तर माझ्या आत डोकावत होते.. माझ्या अस्तित्वाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारी एक भयावह शक्ती त्यांच्यात होती...
क्षणभर माझ्या छातीत जड दबाव जाणवला.. जणू त्या पोकळीने माझ्या आत्म्याला जखडण्यास सुरुवात केली होती...
शुद्ध हरपलेल्या अवस्थेत मी गाडीतून खाली उतरलो. पाय लटपटत होते... मी घाबरून पुन्हा मागे सरकलो.. आणि तेवढ्यात त्या आकृतीने तोंड उघडले...
आवाज माझाच होता. पण तो कोरडा, रखरखीत, खोल विहिरीतून घुमत आला होता..
"तुला शोधणे सोपे नव्हते... रुद्र..."
त्या आवाजातील ओढ माझ्या मज्जारज्जूत भीतीची थंड लाट पसरवत गेली..
मी थरथरत्या स्वरात पुटपुटलो, "कोण... कोण आहेस तू? आणि माझ्यासारखा का दिसतोयस? तुझे डोळे कुठे आहेत? काय पाहिजे आहे तुला? "
तो एका झटक्यात माझ्या दिशेने सरकला..चालला नाही, तर हवेत तरंगल्यासारखा सरकला. "रुद्र..मी 'तू'च आहे... पण या जगातला नाही. मी एका समांतर विश्वातून (Parallel Universe) आलोय."
त्याचा तो मनावर भीतीचा प्रचंड आघात करणारा आवाज.. तो ऐकून माझ्या घशाला कोरड पडली होती...
"समांतर विश्व?", मी थरथरत कापऱ्या आवाजात प्रश्न केला..
तो हसला, पण ते हास्य विकृत होते.. भयानक होते...
"तुला काय वाटले? हे एकच जग अस्तित्वात आहे? नाही रुद्र, अशी अनंत विश्वं आहेत... पाण्याच्या बुडबुड्यांसारखी. एकमेकांच्या शेजारी, पण एकमेकांना स्पर्श न करणारी. त्या प्रत्येक विश्वात एक वेगळे जग आहे, आणि त्या प्रत्येक जगात एक वेगळा 'रुद्र' आहे.. अगदी तुझ्या सारखाच.. जसा मी आहे.."
माझ्या मेंदूत झिणझिण्या आल्या.. तो पुढे बोलतच राहिला, "एखाद्या विश्वात तू करोडपती आहेस, तर दुसऱ्यात भिकारी. एका विश्वात तू वैज्ञानिक आहेस , तर दुसऱ्यात तुझा जन्मतःच मृत्यू झालाय... अश्याच एका विश्वातील मी आहे.. अगदी तुझ्यासारखा.. तूच.. पण माझे जग... माझे जग आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे... तिथे ऊर्जा देणारी शक्ती आता लोप पावत चालली आहे.. जसे जसे दिवस जात आहेत.. अंधार अधिक गडद होऊ लागला आहे.. थोड्याच कालावधीत एक वेळ अशी येणार आहे की तिथे फक्त काळोखाचे साम्राज्य उरेल."
काही क्षण तो थांबला. त्याच्या डोळ्यांच्या जागी असलेल्या त्या पोकळ्या अधिक गडद, अधिक विशाल झाल्या...
चेहऱ्यावर एक क्रूर, भयावह हास्य आणत तो पुढे सरकला..
"रुद्र, म्हणूनच मला जगण्यासाठी एका नवीन विश्वाची आणि एका सक्षम शरीराची गरज होती... आणि त्यासाठी मी हा प्रवास सुरू केला. असंख्य विश्वांतल्या असंख्य 'रुद्रांना' मी न्याहाळले."
तो बोलत बोलत माझ्या अगदी जवळ आला. त्याच्या शरीरातून कुजलेल्या मांसासारखा दुर्गंधीयुक्त वास येत होता...
"काही रुद्र इतके शक्तिशाली होते की त्यांचा ताबा घेणे केवळ अशक्य होते. काही मात्र इतके कमकुवत होते की माझ्या आत्म्याचा भार ते क्षणभरही सोसू शकले नसते. पण मग... मला तू सापडलास.."
त्याने स्वतःचे बोट माझ्या छातीवर रोखले. बोट जिथे टेकले, तिथे मला थंडगार वेदना झाली...
"तू... तू अगदी योग्य आहेस. ना जास्त शूर, ना जास्त भित्रा. तुझ्या मनाची चौकट आता अशी मोडकळीस आली आहे की, मी त्यात सहज प्रवेश करू शकतो."
"या कोट्यवधी विश्वांमधल्या रुद्रांच्या गर्दीतून, मला सामावून घेण्यासाठी... माझे नवीन शरीर बनण्यासाठी... फक्त तुझी निवड झाली आहे! रुद्र.. "
हे ऐकताच, मी केवळ संकटात नाही, तर अस्तित्वाच्या अखेरच्या टोकावर उभा असल्याचे मला उमजले... तेवढ्यात तो वेगाने माझ्याकडे झुकला... त्याचा चेहरा धुक्यासारखा विरघळून पुन्हा जुळत होता...
"तुझे अस्तित्व आता माझे होणार आहे..." त्याची कुजबूज माझ्या कानात नाही, तर थेट माझ्या आत्म्यात घुमली...
"दूर हो!" मी ओरडलो.
त्यावर तो थांबला नाही. उलट, एक भयानक आवाज झाला 'कटकट'...
जणू काहीतरी तडकत होते.. अचानक त्याच्या चेहऱ्याच्या मधोमध एक तडा गेला. जणू एखादा आरसाच फुटत होता आणि त्यातून रक्तवर्णी धूर बाहेर पडू लागला.. त्यातून निघणारी दुर्गंधी माझ्या नाकाला झोंबू लागली होती..
माझ्या अंगात होते नव्हते तेवढा त्राण एकवटून मी गाडीत घुसलो आणि सुसाट गाडी पळवली. आरशात पाहिले, तर तो तिथेच उभा होता… हात हलवत, जणू त्याला माहित होते की मी कुठेही पळालो तरी सुटका नाही... बघता बघता माझ्या डोळ्यासमोर आरश्यात दिसणारी त्याची आकृती हवेत विरघळली..
मी घरी पोहोचलो, पण ती रात्र तिथेच संपली नाही... दोन दिवस भीतीपोटी मी घराबाहेर पडलो नाही.. माझ्या आत मध्ये काही तरी होत होते.. काहीतरी बदलत होते.. अगदी हळुवार पने.. शरीरात मनात एक वेगळीच शांतता पसरली होती.. पण ती शांतता वादळापूर्वीची शांतता होती... हे मला लवकरच उमगले...
तिसऱ्या रात्री… बाथरूममध्ये चेहरा धुतल्यावर मी आरशात पाहिले आणि पुढच्या क्षणी माझा श्वास अडखळला....
रक्तातली उष्णता तिथेच गोठली.
आरशात मी होतो, पण माझी हालचाल होत नव्हती... आरशातला 'रुद्र' स्थिर होता. त्याचे डोळे पुन्हा तेच… काळेभोर पोकळ खड्डे...
"मी सांगितले होते ना... कोट्यवधी रुद्रांमधून तुझी निवड मी केली आहे,"
त्याचा आवाज आता थेट माझ्या मेंदूत घुमत होता. "पळायचा प्रयत्न करू नकोस. तुझे शरीरच आता माझे घर आहे."
त्याच क्षणी आरशावर कोळ्याच्या जाळ्यासारखे तडे गेले... त्या तड्यांमधून मला त्या इतर विश्वांचे दर्शन झाले.. वेगवेगळी जग असलेली.. असंख्य रंगाने भरलेली.. मानवी ज्ञानाच्या पलीकडे असलेली ती विश्वे.. त्यातीलच एका जगामध्ये अंधार पसरलेला होता.. आग लागलेली शहरे होती.. अती प्रगत भीमकाय इमारती कोसळत होत्या... गडद अंधारातही आगीच्या प्रकाशामुळे, कोसळणाऱ्या इमारतींचे धुळीचे प्रचंड लोळ स्पष्ट दिसत होते...
आणि त्या सर्वांच्या केंद्रस्थानी तो होता... तो दुसरा रुद्र...
अचानक आरशाच्या त्या प्रत्येक तुकड्यात तोच दिसू लागला.. प्रत्येक तुकड्यात त्याचे रूप बदलत होते.. क्षणाक्षणाला अधिक भयावह होत होते..
"आपण दोघे आता एक आहोत.. रुद्र.. मी तुझ्यात आणि तू माझ्यात.." अचानक माझ्या मनात एक घोगरा आवाज उमटला..
एक वेगळीच दुर्गंधी नाकात शिरली.. त्या रात्री अनुभवली होती अगदी तशीच..
मी जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत बाहेर धावलो...
आज या घटनेला वर्ष झाले आहे...
वरकरणी सगळे शांत आहे... आज पण मी मीच आहे.. लोक पण मला रुद्र म्हणूनच ओळखतात... पण आरशात पाहताना मला आता भीती वाटते... कारण कधीकधी… अगदी क्षणापुरते… आरशातल्या माझ्या प्रतिमेच्या ओठांवर एक असे क्रूर स्मित दिसते, जे मी केलेलेच नसते... बऱ्याच वेळी मी बोलतो तेव्हा शब्द माझे असतात, पण आवाजाचा पोत बदललेला असतो.. जरा जास्तच जड, जरा जास्तच परका..
रोज रात्री जेव्हा मी डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा शांतता नसते... माझ्या आतून, माझ्याच आवाजाचा एक थंड, खोल कुजबुजणारा स्वर ऐकू येतो.. "आपले... आपले हे नवीन जग... किती शांत आणि सुंदर आहे, नाही का, रुद्र?"
त्या कुजबुजीत तो माझा उल्लेख ‘रुद्र’ म्हणून करतो... जणू मी कोणी वेगळी व्यक्ती आहे.
सर्वात भयानक गोष्ट म्हणजे, आता ही शंका फक्त बाहेरच्या जगावर नाही, तर माझ्या स्वतःच्या अस्तित्वावर आहे. मला आठवतंय, मी हायवेवरून पळून आलो होतो. पण प्रश्न हा आहे.. पळून आलेला 'मी' कोण होता?
मला खरे काय आहे, ते माहित नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की कळते.. जेव्हा मी आरशात बघून हसतो, तेव्हा ते स्मित माझे नसते. ते त्या दुसऱ्या रुद्रचे असते.. क्रूर समाधानाने ओतप्रेत भरलेले..
त्यामुळे, जर तुम्ही कधी रात्री बेरात्री एकटे प्रवास करत असाल, रस्त्यावर दाट धुके पसरलेले असेल आणि हेडलाईटच्या प्रकाशात अचानक तुम्हाला तुमचाच चेहरा असलेली तुमचीच प्रतिकृती समोर उभी दिसली..... तर सावध व्हा!
कदाचित, कुठल्यातरी अंधाऱ्या समांतर विश्वातल्या 'तुम्ही'ने तुमच्या शरीराची निवड केली असेल, आणि तो आता तुमच्या आत येऊन, तुमच्याच अस्तित्वावर शांतपणे हसण्याची तयारी करत असेल!

