लहान माझी बाहुली...
हो ना मधू . मुख्य म्हणजे चिंगी देखील कंटाळली किंवा रडली वगैरे नाही एवढी माणसं बघून..
चिंगी आता सर्व गिफ्ट्स उघडून बसायचं नाही हं... राहुल उगाच दटावत होता. खरं तर कोणी काय काय प्रेझेंट आणली आहेत ह्याची त्याला सुद्धा उत्सुकता होती.
चिंगी एकेक कव्हर उघडून बाजूला ठेवत होती. किती डॉल्स, टेडी आलेले.. पण ती कशालाच हात लावत नव्हती... सर्वात खाली तीला ती बाहुली मिळाली. तसं पाहायला गेलं तर त्या बाहुलीत विशेष असं काहीच नव्हतं. खरं सांगायचं तर ती बाहुली नवीन वाटतच नव्हती. अंगावरचा फ्रॉक विटलेला, चेहऱ्यावर एखादा डाग, केसांच्या जटा. पण वाढदिवसाला कोण का देईल अशी जुनी बाहुली?
मधू ही बाहुली चिंगीची तर नाही वाटत.. कोण घेऊन आलं असेल? आपल्याकडे काम करणाऱ्या शांताबाईंनी दिली आहे का?
राहुल काही काय बोलतोय? शांताबाईंची परिस्थिती नसली तरी त्या जुनी बाहुली देतील का! त्यांनी माझ्या पुढ्यात चिंगीच्या हातावर शंभर रुपये ठेवले, मी त्यांना बोलले देखील की तुम्ही आजपासूनच आमच्याकडे कामाला आलेला आहात त्यामुळे काही नाही दिलं तरी चालेल. मधू नवऱ्याला सांगत होती.
पण ही एवढी जुनी बाहुली आली कुठून? चिंगी कोणी दिली तुला ही बाहुली? राहुल लेकीला विचारत होता. वास्तविक चिंगी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ नाही शकणार खात्री होतीच राहुल आणि मधूला. त्याप्रमाणे चिंगीने साफ दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे आणि ती त्या बाहुलीसोबत खेळत बसली.
झोपायला जाताना सुद्धा चिंगी बाहुलीला सोबत घेऊन गेली.
नेहमीप्रमाणे सकाळी मधू उठवायला आली चिंगीला. चिंगी बाळ उठ बरं. शाळेला जायचं ना नवा नवा फ्रॉक घालून. शाळेत फ्रेंड्सना चॉकलेट वाटायची.. मग सगळे तुला परत विश करणार... हैप्पी बर्थडे चिंगी...
चला चला पटापट ब्रश करा.. मधू चिंगीला लाडीगोडी लावून उठवत होती. एरवी फ्रेश दिसणारा तीचा चेहरा ओढलेला दिसत होता. काल दमलं माझं बाळ अशी मधूने स्वतःची समजूत घालून घेतली.
चिंगीला बेडवरून उतरूच नये असं वाटत होतं. झोपून राहावंसं वाटत होतं. पण शाळेत चॉकलेट वाटायची, हैप्पी बर्थडे साजरा करायची ओढ जास्त होती... कसं बसं ब्रश करून ती टेबलवर बसली. ती बाहुली चिंगीसोबत होतीच.. मम्माने बोर्नविटा रेडी ठेवला होता. जेमतेम अर्धा ग्लास पिऊन झाला की बास म्हणणारी चिंगी कुठलेही आढेवेढे न घेता एका घोटात बोर्नविटा संपवून मोकळी झाली. मम्मा अजून पाहिजे म्हणत तीने ग्लास टेबलवर आपटला.
माझं बाळ शहाणं झालं म्हणत मधूने अजून एक ग्लास बोर्नविटा दिला.
सहा वर्षांची रत्ना आपल्या घरी एकटीच खेळत होती. तीचा बाप कामावर गेला होता. तीची आई सुद्धा लोकांकडे घरकाम करायला जाते. तेवढाच फाटक्या संसाराला आधार. लहानग्या पोरीला शेजार्यांच्या भरवशावर ठेवून जायला धीर होत नाही. पण दुसरा कुठला पर्याय सुद्धा नसतो.
नवीन कुणाकडे गेल्यावर असं हावरटासारखं दुध प्यायला मागायचं नसतं अजून. बाहुलीचं तोंड आपल्या फ्रॉकला पुसत रत्ना बोलत होती.
अंघोळ वगैरे आटपून चिंगी शाळेसाठी रेडी झाली खरी. पण तीचा चेहरा मलूल दिसत होता. चिंगी बरं वाटत नाही का तुला? काही होतं आहे का? पोट दुखतंय का? हवं तर नको जाऊस शाळेत. आपण डॉक्टर आंटीकडे जाऊ. मधूला काळजी वाटत होती.
नको मम्मा चल जाऊ शाळेला. चिंगीला आज शाळा बुडवून बर्थडे सेलिब्रेशन मिस करायचं नव्हतं.
चिंगीला शाळेत सोडून मधू घरी आली. घरभर नुसता पसारा होता चिंगीच्या खेळण्यांचा. मधूसाठी ही रोजच्या सवयीची गोष्ट होती. सगळी खेळणी खोक्यात भरून ठेवताना ती जुनी बाहुली सुद्धा हाताला आली. पण का कुणास ठाऊक मधूला त्या बाहुलीला हात लावावसंच वाटत नव्हतं. तीने त्या बाहुलीला एका कोपऱ्यात ठेऊन दिलं आणि ती तीच्या कामाला लागली.
आज मधूला घरात उत्साहच जाणवत नव्हता. कदाचित कालचा थकवा असेल म्हणून तीने दुर्लक्ष केलं. टीव्हीवर डेली सोप बघत एकीकडे ती कामं करत होती.
थोडया वेळाने आपलं आटपून ती चिंगीला आणायला शाळेत गेली. तीला वाटलेलं आपल्याला पाहून नेहमीसारखं चिंगी धावत धावत येईल. शाळेत चॉकलेट वाटली ते सांगेल. पण चिंगी खूप थकलेली दिसत होती. घरी आल्याआल्या ती झोपून गेली. झोपेतच मधूने तीचे कपडे बदलले.
झोपून उठल्यावर ममा भूक लागली म्हणत ती रडू लागली. मधूने तीला पोळी भाजी भरवली. एरवी तीच्या मागे लागून तीला एकेक घास भरवावा लागतो. पण आज तीने अजून एक जास्तीची पोळी संपवली. मधूला थोडं वेगळं जाणवत होतं पण नेमकं काय ते कळत नव्हतं. मुलगी पोटभर जेवली ह्या आनंदात तीने चिंगीचं तोंड पुसलं. पण त्याचवेळी त्या अभद्र बाहुलीच्या तोंडाला लागलेलं उष्टं तीच्या नजरेतून सुटलं नाही.
पोटभर जेवण झालेलं आहे. त्यामुळे शहाण्या बाळासारखं पटकन झोपा बरं आता. रत्ना आपल्या बाहुलीला सांगत होती. थोड्याच वेळात रत्ना बाहुलीला कुशीत घेऊन जमिनीवरच आडवी झाली.
पुढील दोन दिवस मधूला वेगळाच अनुभव येत होता, भूक लागली म्हणून चिंगी आपण होऊन खात पीत होती, ते सुद्धा नेहमीपेक्षा जास्तच. पण टवटवीत दिसण्याऐवजी ती अधिकच मलूल दिसत होती.
त्या दिवशी चिंगी शाळेतून घरी आली. आणि आल्या आल्या चक्कर येऊन पडली. सुदैवाने राहुल घरीच होता त्यामुळे मधू आणि राहुल चिंगीला घेऊन फॅमिली डॉक्टरकडे घेऊन आले.
व्यवस्थित जेवत नाही का चिंगी? किती अशक्त दिसते आहे! डॉक्टरनी राहुलला विचारलं. राहुलने मधूकडे बघितलं.
डॉक्टर खरं तर असं बोलणं योग्य नाही, पण गेले काही दिवस ती रोजच्यापेक्षा जास्त जेवते आहे. मधू बोलली.
मग तीला उलट्या, जुलाब वगैरे काही त्रास होतो आहे का? डॉक्टर चिंगीबद्दल जाणून घेत होते.
नाही हॊ डॉक्टर असलं काहीच होत नाही आहे तीला. व्यवस्थित खाते पिते तरी मलूल झाल्यासारखी का दिसते आहे तेच कळत नाही आहे. बोलता बोलता मधूचा कंठ दाटून आला. राहुलने तीला जवळ घेऊन थोपटलं.
डॉक्टरांनी चिंगीला सलाईनमधून एक इंजेक्शन दिलं. काही औषधं लिहून दिली आणि दोन दिवसांनी परत भेटायला बोलावलं.
घरी आल्यावर चिंगी बाहुलीला जवळ घेऊन बसली व भूक लागली म्हणू लागली. मधूने तीला डाळ तांदुळाची खिचडी आणि टोमॅटो सार भरवलं. नेहमीपेक्षा जास्त जेवण भरवून झाल्यावर मधूने तीला ब्रश करून दिलं, औषधं दिली आणि झोपायला बेडरूममध्ये घेऊन आली. ती बाहुली होतीच चिंगीसोबत. मधूने चिंगीला झोपवल्यावर त्या बाहुलीला जरा रागातच बाजूला टाकलं. पण बाहुलीच्या तोंडाला लागलेलं टोमॅटो सार पाहून मधूच्या काळजात चर्र झालं.
आहह त्या टोमॅटोचं सार किती तिखट लागत होतं. थांब साखर देते हं तुला. रत्ना बाहुलीला समजावत होती. दोन चमचे साखर खाल्यावर रत्नाला बरं वाटलं. सांडलीस ना साखर! आई घरी आल्यावर तुला ओरडणार. जमिनीवर पडलेली साखर उचलताना रत्ना आपल्या बाहुलीला दटावत होती.
दिवसेंदिवस चिंगी अशक्त दिसू लागली होती. डॉक्टर बदलून बघितले पण चिंगीची तब्येत खालावतच होती. कणाकणाने पोटची पोर झीजतांना बघून मधू आणि राहुलच्या काळजाचं पाणी होत होतं. अखेर खंगून खंगून एक दिवस चिंगीने प्राण सोडले.
बाईसाहेब मी आजपासून कामावर येणार नाही. मधू आपल्या लेकीचे दिवसवार जड अंत:करणाने करत होती आणि अशा वेळी शांताबाई अचानक काम सोडून निघून आल्या.
शांताबाईंच्या पाठोपाठ ती अभद्र बाहुली घरातून गायब झाल्याचं मात्र राहुल किंवा मधू कुणाच्याच लक्षात आलं नाही.
शांताबाई घरी आल्या. घरात रत्ना एकटीच खेळत होती. आईला आलेलं पाहून रत्ना धावत येऊन बिलगली. शांताबाईंनी सोबत आणलेली ती बाहुली बाजूला ठेवून दिली. चिंगीच्या घरी राहायला गेल्यापासून ती बाहुली चांगली धष्टपुष्ट दिसू लागली होती.
आई आज बासुंदी मस्त होती. उद्या काय असेल खायला? रत्नाने निरागसपणे विचारलं.
आता काही दिवस तुला घरातलंच जेवावं लागेल रत्ना. चिंगीचं आज तेरावं होतं म्हणून तीच्या आवडीची बासुंदी पुरी बनवली होती. नवीन काम मिळायला दोन तीन दिवस तर लागतीलच ना! शांताबाई जड मनाने बोलत होत्या.
बरं आई चालेल... रत्ना समंजसपणे हॊ बोलली. पण आता काही दिवस आपल्या पोरीला आपण चांगलं चुंगलं खाऊ घालू शकत नाही म्हणून शांताबाईंच्या मनाला रुखरुख लागून राहिली.
पुढल्याच आठवड्यात शांताबाईंना बाजारात शर्मा आंटी भेटल्या. त्यांचा मुलगा फॉरेनवरून आपल्या बायकोला आणि दोन वर्षाच्या हरजीतला घेऊन पहाटे येणार होता त्यामुळे घरकामात मदत करायला येण्यासाठी आंटीनी शांताबाईंना गळ घातली.
दुसऱ्या दिवशी शांताबाई शर्मा आंटीच्या घरी रुजू झाल्या. घरभर हरजीतच्या खेळण्यांचा नुसता पसारा होता. शांताबाईंनी सोबत आणलेली बाहुली त्या खेळण्यात ठेवलेली कुणाला समजलं सुद्धा नाही.
आता पुढील काही दिवस रत्नाच्या खाण्यापिण्याची ददात मिटली ह्या आनंदात शांताबाईंनी घरकामाला सुरुवात केली.
समाप्त
राजेंद्र भट
©®
११ सप्टेंबर २०२५