चार्ली-चार्ली

लेखन :- शशांक सुर्वे
राजवीर 10 वर्षाचा हुशार मुलगा होता तो खूपच शांत आणि संयमी होता पण आज मात्र त्याचा संयमाचा बांध फुटला होता.....डोळ्याबरोबर नाकातून गळणारे पाणी शर्टाच्या बाहीने पुसत त्याने आपली एक नोटबुक काढली तो थोडा रागातच होता त्याचा राग वहीच्या पानांवर निघत होता खर-खर पाने पालटली जात होती एका पानावर त्याची नजर खिळली......तश्या त्या स्टेप त्याला लक्षात होत्या पण खात्री करून घेण्यासाठी त्याने वही उघडली आणि त्या विधी वाचू लागला.....आरश्यासमोर बसून समोर एक मेणबत्ती पेटवली आणि हातात एक पेन्सिल आणि पांढरा ड्रॉईंग पेपर धरून तो मेणबत्तीच्या त्या स्थिर ज्योतिकडे बघत आपले डोळे पुसत हुंदके आवरत डोळे बंद करून शांत अंतकरणाने ते शब्द उच्चारले "चार्ली-चार्ली"...."चार्ली-चार्ली"...राजवीर हा कमालीचा मुलगा होता त्याचा फोकस कमालीचा होता......त्याने परत हाक मारली "चार्ली-चार्ली"......आता मात्र राजवीरचे कान सुन्न झाले.....घुssssss असा दीर्घ आवाज त्याच्या कानात घुमू लागला......खोलीतले वातावरण थोडे गंभीर आणि नकरात्मक होऊ लागलं.....खोलीमधल्या बल्बची चालू बंद स्तिथी आणि भपकन विझलेली ती मेणबत्ती हे सांगायला पुरेशी होती की राजवीर दुसऱ्या दुनियेत जाण्यात यशस्वी झाला आहे.......
आताच्या स्पर्धेच्या युगात आपले जे लाड झाले नाहीत ते ते लाड करण्यात पालक अग्रेसर असतात सोबत आपल्याला जे काही शिकता आलं नाही ते ते मुलांनी शिकावं ही देखील अपेक्षा पालकांची असते सोबत 90 ते 100 टक्के ह्या तारेवरच्या टक्केवारीच्या कसरतीवर अनेक मुलांचे आयुष्य झुलत असते अश्या अनेक अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला राजवीर होता.....संजय आणि ज्योती ह्यांनी आधीपासूनच जे लक्ष त्याच्यासाठी ठरवलं होतं ते लक्ष पूर्ण करण्यासाठी कमालीचा दबाव राजवीर वर असायचा.....ज्योतीच्या बहिणीच्या मुलीपेक्षा एखादं-दुसरा टक्का राजवीरचा कमी झाल्यास डोळे वटारले जायचे त्याच्याशी संवाद कमी केला जायचा राजवीरला हे सगळं समजत होत...परीक्षेपेक्षा त्याला निकालाचा दिवस खूप जडजड वाटत असे.....राजवीर आईचा लाडका होता.. आपली आई मार्क कमी पडल्यावर आपल्यावर नाराज होते अबोला धरते हे त्याला सहन होत नव्हतं त्याचं बालमन आतून कोमेजून जात होतं.....तो अभ्यास करण्यात आपलं सगळं झोकून देत असे पण त्याच्या 92 टक्क्यांची आणि त्याच्या मावशीच्या मुलीच्या 95 टक्क्यांची तुलना होत असे.....मग दुसऱ्या दिवशीपासून ज्योतीने त्याला पहाटे उठवून अभ्यासला बसवण्याचा त्याच्यावर प्रत्येक मिनिटाला नजर ठेवण्याचा अभ्यास सोडून राजवीर दुसरं काही करत असेल तर त्याच्यावर जोरात ओरडण्याचा प्रसंगी एखादा धपाटा मारण्याचा खेळ सुरू व्हायचा.....सकाळी अभ्यास नंतर क्लास,शाळा आणि नंतर परत क्लास.....एखाद्या मध्यम वर्गीय जबाबदार कर्जबाजारी व्यक्तीची कर्ज फेडण्यासाठी डे,नाईट शिफ्ट करून जी धडपड सुरू असते तशीच काहीशी धडपड राजवीरची सुरू होती....त्याच्यापुढे फक्त आणि फक्त शाळा,अभ्यास,टक्के ह्याच चर्चा होत होत्या एक कमालीचे दडपण त्याच्या बाल मनावर होते......पण पालकांच्या दबावामुळे त्याची मानसिकता अशीच झाली होती.....आकड्यांच्या खेळातला तो एक असा खेळाडू होता ज्याच्या डोळ्यांवर फक्त आणि फक्त अभ्यासाचा चष्मा होता.....ज्योतीने राजवीरच्या करिअर बाबतीत स्वतःला खूप कडक करून घेतले होते बाकी ती एक चांगली आई होती......थोडाफार सामाजिक स्पर्धेचा रंग तिच्या मनावर चढला होता पण आतून ती एक प्रेमळ आई होती.....पण तिच्या प्रेमाचा वर्षाव राजवीरवर आजकल थोडा कमीच होत होता......
परीक्षेला अजून 2 महिने बाकी होते.....रविवारचा दिवस होता....कालच राजवीरने itc चा एक्ट्रा मार्काचा पेपर दिला होता त्यामुळे आज त्याला थोडं हलकं हलकं वाटत होतं.......डोक्यावर कॅप चढवून हातात बॅट घेऊन राजवीर खेळायला निघाला इतक्यात आतून त्याच्या आईचा आवाज आला
"राज चल अभ्यासला बस....पेपर जवळ आले ना तुझे"
"अग मम्मा थोडा वेळ खेळू दे नंतर करतो ना मी अभ्यास"
"काही नाही.....टेस्ट मध्ये फक्त 87 टक्के पडलेत तुला....मला फायनलला 95 प्लस हवेत....ते काही नाही चल अभ्यासला बस"
लटका नाराजीचा आवाज कुजबुजत राजवीर आत गेला.....बाहेरून मुलांचा खेळण्याचा आवाज येत होता.....समोर पुस्तक तर होत पण राजवीरचे सगळे लक्ष बाहेरच होत.....कित्येक दिवस तो बाहेरच्या त्याच्या मित्रांशी बोललाच नव्हता....त्यांना भेटलाही नव्हता.....त्याला खेळायचं होतं......ज्योतीविषयी आपल्या आईविषयी त्याला प्रचंड राग आला होता......हातातले पुस्तक त्याने बाजूच्या बेड वर जोरात आपटले त्याला आता ह्या अभ्यासाचा कंटाळा आला होता.....त्याच्या जिज्ञासू बालमनाला काहीतरी नवीन करायचं होतं......त्याच्या शाळेत सुद्धा जेमतेम त्याच्या घरच्या सारखीच परिस्थिती होती त्यात त्याचा "अ" वर्ग असल्याने सगळी हुशार मुलेच राजवीरच्या वर्गात होती.....खेळ वैगेरे असला काही प्रकार नव्हता.....मोबाईल,इंटरनेटचा काहीसा वापर राजवीर करत होता ते पण अभ्यासासाठीच....त्यातच त्याच्या जिज्ञासू मनाने "चार्ली-चार्ली" हा गेम youtube वर शोधला..... हा गेम तसा adult होता म्हणजे पारलौकिक शक्तीशी संवाद साधण्याचा तो खेळ.....पण त्या व्हिडीओखाली निघेटिव्ह कमेंटच जास्त दिसत होत्या अनेकांनी हा गेम ट्राय करून फसगत झाल्याने व्हिडिओ बनवणाऱ्याला शिव्या हसडल्या होत्या.....लाईक कमेंट्स साठी कोणीही काहीही खेळ करते आजकल सोशल मीडियावर......पण राजवीरला न जानो त्या अमेरिकन थोड्या विक्षिप्त दिसणाऱ्या बाईचे विचार पटले त्याने सगळ्या चार्ली चार्ली गेमच्या स्टेप लिहून घेतल्या......वास्तविक त्याला कोणी मित्र नव्हता......अभ्यास....अभ्यास.....अभ्यास हे भूत त्याच्या मानगुटीवर अस काही बसवलं होत की मानवी जीवनाशी त्याचा संपर्क कमीच होता......आज मात्र त्याच्या भावना टोकाच्या झाल्या होत्या.....त्या विक्षिप्त अमेरिकन बाईने सांगितल्याप्रमाणे "चार्ली-चार्ली" गेम मधून तुम्हाला चांगले वाईट मित्र मिळू शकतात पण ते मनुष्य नसून मृतात्मे असतील.....त्या बाईने आपल्या आनंदी असल्याचं सिक्रेट ह्या गेम मध्ये असल्याचं सांगितलं ती पारलौकिक आत्म्यांशी संवाद साधून खुश होती......
छोटा राजवीर आज चिडला होता.....हट्टाला पेटला होता.....त्याने कधी लिहून ठेवलेले ते पेज उघडले आणि त्यातील स्टेप तो फोल्लो करू लागला जास्त काही विशेष नव्हते......हातात एक चित्रकलेचा पेपर दुसऱ्या हातात एक पेन आणि समोर जळती मेणबत्ती......सगळी जुळवाजुळव करून तो त्या मेणबत्ती समोर बसला......त्याला खरोखरच एका मित्राची आवश्यकता होती आणि तो मित्र तो ह्या गेम मधून निवडण्याच्या तयारीत होता......राजवीरने डोळे बंद केले.....समोर मेणबत्ती पेटवली......त्या बाईने जशी चित्रे दाखवली होती तशी चित्रे त्याने आपल्या समोर काढली हातात पेपर पेन्सिल धरून त्याने डोळे बंद केले
"चार्ली.....चार्ली......तू आहेस का इथे??.....चार्ली चार्ली मला तुला भेटायचं आहे.....चार्ली चार्ली"
ज्यांनी ज्यांनी त्या विक्षिप्त अमेरिकन बाईला शिव्या घातल्या होत्या ते लोक फक्त टाईमपास म्हणून चार्ली चार्ली हा गेम खेळत होते पण पण पण इकडे राजवीरची हाक आर्त होती.....त्याच्या मनात कोणता स्वार्थ होता ना शंका......त्यामुळे कदाचित त्याच्या खोलीतले वातावरण बदलत चालले होते.....त्याची खोली थंड गार झाली होती.......एखादा भूकंप व्हावा तश्या खोलीतल्या हलक्या वस्तू थरथर हालत होत्या......छोटा राजवीर पारलौकिक जगाशी संपर्क साधण्यात यशस्वी झाला होता का??? उत्तर "हो" असच होत.....चार्ली चार्ली ह्या पासवर्डने त्या पारलौकिक जगाचा दरवाजा उघडला गेला होता.....तिथून कोण बाहेर आलं होतं?? किंवा शरीरातून इथे असलेला राजवीर मनाने कुठे पोहोचला होता??......काही कल्पना नाही......पण बंद डोळ्यांची होणारी हालचाल आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य सांगत होते की राजवीर जिथेही होता आणि ज्याच्या सोबत होता......खूप आनंदात होता....आणि त्या पेपरवर त्याची पेन्सिल आपोआप फिरत होती त्याचे डोळे बंद होते तरी त्याचे हात काहीतरी रेखाटत होते.....चित्रकला पेपर वर पेन्सिलच्या रेघोट्या मधून एक चेहरा साकारला जात होता.....ज्योती आपल्या कामात व्यस्त होती तब्बल 2 तास राजवीर त्या जगात फिरत होता......समाधी अवस्था म्हणतात ती हीच होती जी एका 10 वर्षाच्या मुलाला गवसली होती काहीवेळांतर तो ह्या अवस्थेतून बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं......राजवीर ने खाली बघितलं.....त्याचे डोळे विस्फारले चित्रकला पेपरवर त्याचेच चित्र त्याने त्या अवस्थेत गिरवले होते.....ते चित्र बघून राजवीर जाम खुश झाला त्याला भेटलेला मुलगा होता तो.....त्याच नाव स्वप्नील होतं...तिकडे त्या जगात खूप छान ओळख झाली होती दोघांची...स्वप्नीलने त्याला आपला राहता बंगला आपली खेळणी आपली सायकल सगळं सगळं दाखवून दिलं होतं....दोघेजण तासभर क्रिकेट सुद्धा खेळले होते.....त्या तिथे आसपास कुणीच मोठं नव्हतं....राग करायला....ओरडायला.....अभ्यास कर म्हणून सांगायला....त्या बंगल्याच्या लॉन वर होते फक्त ते छोटे जीव....अगदी आनंदात खेळत,बागडत होते.....राजवीरला चार्ली-चार्ली मधला स्वप्नील खूप आवडला होता... स्वप्नील हे नाव राजवीरने त्या स्केच खाली लिहून ठेवलं......आज तो अगदी हसतच रूम मधून बाहेर आला ज्योतीला हे अनपेक्षित होतं......कारण अभ्यास करून आला की राजवीर उदास असायचा......पण आता मात्र उलट दिसत होतं......रोज तो हातात पुस्तक घेऊन खोलीत जायचा आणि आनंदी चेहऱ्याने बाहेर यायचा......ज्योतीला राजवीरला सांगावे लागत नव्हते की "अभ्यास कर" म्हणून तो स्वतः पुस्तके घेऊन स्टडी रूम मध्ये अभ्यासाला बसायचा......ज्योतीला ह्या गोष्टीचे थोडे नवल वाटत होते.....पण काहीही असो गेले काही दिवस राजवीर खूप आनंदी दिसत होता......त्यामुळे ज्योतीने सुद्धा त्याला ओरडणे टाळले होते.....अचानक ज्योतीला शाळेतून फोन आला..तशी ज्योती लगेच शाळेत पोहोचली...वर्गशिक्षिका मॅडम समोर बसल्या होत्या.....ज्योतिकडे बघत त्या म्हणाल्या
"ज्योती मॅडम राजवीर सोबत काय सुरू आहे??"
"काय म्हणजे???काही समजलं नाही मॅडम"
"अहो ज्योती मॅडम तुमच्या राजवीरचे शाळेत लक्षच नाहीय आजकल.....आणि हो काही दिवसांपासून तो शाळेत झोपा काढत आहे......आणि हा स्वप्नील कोण आहे?? राजवीर बाकीच्या मुलांना त्याच्याबद्दल सतत सांगत आहे.....मी स्वतःहून ऐकलं.....आणि कोणत्या तरी गेम बद्दल बोलत होता तो......तुमचं राजवीरकडे लक्ष आहे की नाही???"
ज्योती तिथे काहीच बोलली नाही कारण राजवीर सोबत काय चालू आहे ते तिला स्वतःलाच माहीत नव्हतं.....पण राजवीर अभ्यास करत नाही ह्या विचाराने ती जाम संतापली होती.....आज राजवीरला चांगलीच शिक्षा करायची ह्या विचाराने राजवीर जेव्हा घरी आला आणि आपले पुस्तके वही घेऊन स्टडी रूम कडे जाऊ लागला तेव्हा ज्योतीने त्याला आडवले....
"तुझं काय सुरू आहे राजवीर??.....मॅडम सांगत होत्या तुझं अभ्यासात लक्ष नाहीय आणि तू क्लास रूम मध्ये झोपतोस??....."
राजवीर काहीच बोलत नव्हता त्याने आपली चित्रकला वही घट्ट कवटाळली होती.....ज्योतीने हे बघितले तो काहीतरी लपवत असल्याचा संशय आला म्हणून ज्योतीने राजवीर कडून ती वही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला......पण राजवीरने तिचा हात जोरात झटकला.....तो रागाने ज्योतीकडे बघत होता.....ही नजर ज्योतीला अनपेक्षित होती.....ती दचकली
"माझ्या वहीला हात लावायचा नाही....समजलं का??"
एखाद्या प्रौढ व्यक्तीची रागीट नजर ज्योती अनुभवत होती.....राजवीर घाईघाईने रूममध्ये गेला.....हातात मेणबत्ती,चित्रकला वही हे सगळं ज्योती साठी अनपेक्षित होतं कारण राजवीरला चित्रकलेची आवड नव्हती....ज्योती दबक्या पावलांनी रूम जवळ गेली आणि अलगद दरवाजा उघडून चोरट्या नजरेने राजवीर काय करत आहे ते न्याहाळू लागली.....मेणबत्ती पेटली होती......राजवीर चित्रकला वही उघडून एका स्केच वर हात ठेवून "चार्ली-चार्ली.....चार्ली-चार्ली" अस काहीसं म्हणत होता......अस म्हणता म्हणताच तो एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध झाला....मेणबत्ती विझली होती....ज्योती हळूच त्याच्या जवळ येऊन उभी राहिली त्याच्या हातात पेन्सिल होती आणि एका नवीन पानावर त्याचा हात अगदी यंत्रवत पद्धतीने रेघोट्या ओढत होता.....आणि त्या रेघोट्या मधून एक चित्र तयार होत होतं.....राजवीरच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते तो खूप खुश दिसत होता.....अर्धा तास झाला तसा त्याचा हात थांबला.....हे बघून ज्योती खोलीच्या बाहेर गेली काही वेळाने राजवीर बाहेर आला आणि त्याने सरळ ज्योतीला मिठीच मारली त्या मिठीचा अर्थ काय होता ह्याची ज्योतीला कल्पना नव्हती.....काहीतरी विचित्र चालू होतं हे मात्र नक्की होतं......ज्योती राजवीरकडे बघून स्मितहास्य करत होती.....ती त्याच्या बरोबर एकही शब्द बोलली नाही......ज्योतीने ठरवलं होतं की उद्याच त्याला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे......
दुसऱ्या दिवशी राजवीर थोडा उदास वाटत होता सतत त्याच्या आईबाबांच्या जवळ घुटमळत होता.....तो अस आज पहिल्यांदा वागत होता एरव्ही मार आणि ओरडा बसेल म्हणून राजवीर तसा आईवडिलांपासून लांबच असायचा पण आज तो आई पप्पाच्या जवळ वावरत होता आणि आज प्रथम त्याने शाळेला जाताना दोघांच्या पाया ही पडला.....ज्योतीला हे सगळं चमत्कारिक वाटत होतं.....राजवीर नेमका काय करत आहे?? ह्या प्रश्नाचे उत्तर तिने स्वतः शोधायला सुरवात केली....राजवीर शाळेला आणि संजय जॉबला गेलेलं पाहून ती सरळ राजवीरच्या स्टडी रूम मध्ये पोहोचली.....तिला ती चित्रकला वही हवी होती.....राजवीरने ती लपवून ठेवली होती शेवटी अथक परिश्रमाने ती वही तिला कपाटाच्या खाली चिटकवलेली आढळली.....तिने ती वही घेतली आणि पाहिलं पेज उघडलं त्यात पूर्ण पान भरून रेघोट्या ओढल्या होत्या पण त्या रेघोट्याच्या मधून एका मुलाचे चित्र दिसत होते त्याच्या खाली स्वप्नील अस राजवीरच्या अक्षरात लिहलं होत.....ज्योतीने दुसरं पान उघडलं एक बंगला रेखाटला होता आणि त्याच्या बाहेर दोन मुले खेळत होती एकाचा चेहरा तर राजवीर सारखा दिसत होता आणि दुसऱ्या मुलाचा चेहरा त्या पहिल्या पानावरच्या मुलासारखा दिसत होता......ज्योतीने दुसरं पान उघडलं त्यातही तीच दोन मुले खेळत होती.....ज्योती हळूहळू पाने पालटत होती.....त्या चित्रातला तो मुलगा राजवीरला हळूहळू आपल्या बंगल्याच्या जवळ जवळ नेत होता......25 चित्रे राजवीरने रेखाटली होती.....आणि प्रत्येक चित्रात राजवीर हळूहळू त्या बंगल्याच्या जवळ चालला होता......ह्याचा नेमका अर्थ काय होता??......काहीच कल्पना नव्हती......राजवीर चित्रकलेत हुशार नव्हता पण त्याची ही चित्रे एखाद्या निष्णात चित्रकाराला लाजवतील इतकी उच्च दर्जाची होती अगदी हुबेहूब सगळं काही रेखाटल होत अगदी एखाद्या फोटो सारखं... हे बघून ज्योती थोडी घाबरली......हा काहीतरी वेगळा आणि भयानक प्रकार वाटत होता.....तिच्या मनात अनेकानेक विचार ज्योतीच्या मनात घुटमळत होते त्यातल्या एका विचाराने ज्योती एकदम शहराली.....तिच्या डोळ्यांतून अक्षरशः अश्रू वाहू लागले तिला हा सगळा प्रकार जाणून घ्यायचा होता..तिने काल राजवीर करत असलेला सगळा प्रकार बघितला होता...तिने हॉल मधून एक मेणबत्ती आणली.....आणि पेटवून एका हातात राजवीरची ती चित्रकला वही घेऊन दुसऱ्या हातात पेन्सिल पकडली..तिने आपला हात स्वप्नीलच्या स्केच वर ठेवला...तिच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नव्हते त्यातच तिने "चार्ली-चार्ली.....चार्ली-चार्ली" असा तो मंत्र म्हणायला सुरवात केली......अचानक मेणबत्ती विझली......राजवीर प्रमाणे ज्योती एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध झाली तिचे डोळे घट्ट बंद झाले त्याच अवस्थेत तिने आपला हात स्वप्नीलच्या स्केच वरून बाजूला केला तिचे हात आपोआप पाने पालटून कोऱ्या पानावर आली आणि हातातली पेन्सिल आपोआप रेघोट्या ओढू लागली......तिचे डोळे उघडले गेले तेव्हा ती राजवीरच्या रूम मध्ये नव्हती ती त्याच बंगल्यासमोर उभी होती ज्याचे चित्र राजवीरने रेखाटले होते....अगदी प्रशस्त मोठा बंगला होता तो सगळीकडे शांतता होती पण त्या बंगल्याच्या आतून ओरडण्याचा जोरात भांडण्याचा आवाज येत होता.....ज्योती हळूहळू पायऱ्या चढून त्या बंगल्याच्या हॉल मध्ये गेली एक स्त्री पुरुष आवेशाने भांडत होते....ज्योतीची नजर त्या हॉल मधील एका फोटो कडे गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की भांडणारे दोघे नवरा बायको आहेत.....तो पुरुष त्या स्त्रीला बेल्टने मारत होता आणि ती मार खाणारी स्त्री त्या पुरुषाला नको त्या शिव्या देत होती....विशेष म्हणजे ज्योती अगदी त्यांच्या जवळ उभी होती पण त्या दोघांना ह्याचे भान नव्हते.....ज्योतीला काहीच समजत नव्हते अचानक मागून आवाज आला
"त्या दोघांना तुम्ही दिसणार नाही......तुम्ही ज्या प्रश्नाचे उत्तर शोधायला आला आहात त्याचे उत्तर म्हणून हे सगळं तयार केलं गेलं आहे"
ज्योतीने वळून मागे बघितलं.....चित्रातला स्वप्नील अगदी प्रत्यक्षात तिच्या समोर उभा होता...तो अगदीच राजवीरचा समवयस्क वाटत होता......ज्योतीकडे बघत तो म्हणाला
"ते भांडणारे माझे आईवडील आहेत.....ते सतत भांडत असतात......ते अजून जिवंत आहेत पण मी नाही.....तुम्ही ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत इथे आलात की मी कोण आहे?? त्याचे उत्तर म्हणून ह्या पारलौकिक जगाने हे सगळं चित्र तुमच्या समोर उभं केलं आहे....तर ते सतत भांडणारे माझे आईवडील आहेत.....मी 10 वर्षाचा होतो आईवडील सतत भांडत असायचे त्यांच्या सततच्या वादाला कंटाळून मी नेहमी घराबाहेर रहायचो पण त्यांना माझी फिकीर नव्हती...आणि त्यांच्या अश्या स्वभावामुळे मलाही त्यांची भीती वाटायची....एकदा आईवडील असेच भांडत होते आणि मी रागाने घराबाहेर पडलो माझ्या मनात असंख्य विचार उमटत होते.....त्याच्यात मी एवढा मग्न होतो की रस्त्याच्या मध्ये कधी आलो कळलंच नाही आणि एका ट्रक खाली चिरडलो गेलो"
ज्योती हे ऐकून प्रचंड घाबरली......तिला आता ह्या दुसऱ्या दुनियेबद्दल खात्री पटली होती आणि एका मृत आत्म्याला भेटायला राजवीर इथे का येतो?? का एक प्रश्न तिला पडला होता तिच्या मनी पडलेला हा प्रश्न समोरच्या स्वप्नीलने बरोबर ओळखला
"राजवीर आणि मी काही वेगळे नाही.....राजवीरने मला सगळं सांगितलं की तुम्ही त्याच्यावर अभ्यासासाठी खूप दबाव आणता त्यामुळे तो एकटा पडला होता आणि त्यानेच हा मार्ग निवडला आहे"
आता ज्योती अजून घाबरली तिने स्वप्नील समोर हात जोडले....ती काही बोलत नसली तरी तिचे अश्रू सर्व काही सांगत होते....त्या दुनियेतील स्वप्नीलला तिच्या मनीचे सगळे भाव कळत होते
"माफ करा पण ह्यातून आता त्याला बाहेर पडता येणार नाही......आजच त्याचा शेवटचा दिवस आहे.....तो आता तुमचं जग सोडून ह्या जगात येणार आहे अगदी कायमचा....त्याला कुणीही अडवू शकत नाही....माझा सवंगडी म्हणून इथे येईल....कुणाला तरी त्याग करावाच लागणार आहे.....पण इथले नियम बदलत नाहीत......मी राजवीरला सांगितले होते की तू सतत इथे मला भेटू नको पण 20 दिवसांची मर्यादा त्याने ओलांडली.....त्याला तुमच्या सोबत रहायचंच नाहीय त्यामुळे एक बळी तर निश्चित जाणारच आहे"
ज्योती गुडघ्यावर बसून रडत होती......तिचे खऱ्या आयुष्यातले रेघोट्या ओढणारे हात थांबले.....5,6 तास झाले होते.....राजवीर शाळेतून घरी आला.....आणि घरी येऊन आईला शोधू लागला पण ती कुठेच दिसत नव्हती.....त्याने ज्योतीला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच दिसत नव्हती अखेर दमून तो आपल्या स्टडी रूम मध्ये आला.....आत येताच तो थबकला....ज्योती मांडी घालून हातात त्याची चित्रकला वही घेऊन बसली होती.....ती स्तब्ध होती...डोळे बंद होते....राजवीरने तिला जागं करण्यासाठी हलवलं....तर ती खाली कोसळली....राजवीर तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती...पेन्सिल पडण्याच्या आवाजाने राजवीरचे लक्ष वहिकडे गेलं काहीतरी रेघोट्या दिसत होत्या राजवीरने ते चित्र हातात घेतलं आणि त्याचे डोळे विस्फारले एक आर्त किंकाळी त्याच्या तोंडून फुटली......त्या चित्रात तोच बंगला होता.....आणि त्या बंगल्याच्या समोरच्या खिडकीमध्ये.....खिडकीमध्ये स्वप्नील आणि ज्योती म्हणजे त्याची आई दिसत होती.....चित्रात ज्योतीने स्वप्नीलच्या डोक्यावर हात ठेवला होता म्हणजे राजवीरच्या जागी आता त्या दुनियेत ज्योती आता स्वप्नील सोबत राहणार होती.....राजवीर आता सगळं समजून चुकला होता..त्याला रडू कोसळलं होतं....त्याने मागची पाने पालटून बघितली....पहिल्या पानावरचे स्वप्नीलचे स्केच गायब झालं होतं...बाकीची सगळी चित्रे गायब झाली होती...एकच चित्र दिसत होतं जे त्याच्या आईने आज रेखाटलं होतं....बाकीची सगळी चित्रे गायब झाल्यामुळे राजवीरचा आता त्या दुनियेशी संपर्क तुटला होता.....त्या चित्राच्या एका कोपऱ्यात लिहलं होत की
"बाळा राजवीर....आईचे तुझ्यावर कायम प्रेम होते आणि राहील.....काळजी घे स्वतःची"
खालचा तो मजकूर वाचून राजवीरला रडू कोसळलं..राजवीरच्या जागी ज्योतीने आपला बळी दिला होता..आपल्याकडून झालेली चूक राजवीरच्या लक्षात येत होती पण तिकडे त्या दुनियेत स्वप्नील मात्र खूप आनंदात होता त्याला एक पालक आई स्वरुपात मिळाली होती......आणि राजवीरबद्दल केलेली चूक सुधारून स्वप्नीलला ते प्रेम देण्यासाठी ज्योतीही तयार होती.............(समाप्त)