पार्टी

लेखन :- शशांक सुर्वे
मार्चचा महिना .....कडक उन्हाने सगळी जमीन भाजून काढली होती.....तप्त उन्हाने यमाई पठारावरची हिरवळ जवळपास करपवून टाकली होती तरीही तिथल्या आजूबाजूच्या डेरेदार झाडांनी तिथला गारवा आणि निसर्गसौन्दर्य अजून टिकवून ठेवलं होतं.....नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले यमाई पठार पावसाळ्यात वेगवेगळ्या फुलांनी बहरून जायचे पण उन्हाळ्यात मात्र एखाद्या विस्तीर्ण वाळवंटासारखा त्या पठाराची दशा असायची.....तरीही आसपासच्या स्थानिक लोकांची तिथे बरीच रेलचेल असायची.....त्या थोड्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्रीच्या वेळी सगळ्या शहराचे एक विहंगम दृश्य दिसायचे.....त्यामुळे स्थानिक लोक तिथे रात्री पार्टी करण्यासाठी वैगेरे यायचे.....त्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्री शहराचे दृश्य म्हणजे एखाद्या हॉलिवूड सिनेमात दाखवतात तश्या आकाशगंगे सारखे लूकलुकते दिसायचे.....अनुपला तो एकांत आवडत असे तिथे तो अगदी तासन्तास बसून मित्रांच्या बरोबर रात्री गप्पा मारत असे.....अनुपच्या घरापासून यमाई पठार 10 km लांब होते त्यामुळे तिथे त्यांचे क्रिकेटचे सामने किंवा बर्थडे पार्टी होत असत.....पठारावर नगरपालिकेने दोन तीन मोठे लाईट्स आणि काही सिमेंटचे बेंच बसवल्यामुळे तशी रात्रीची कसलीच अडचण येत नसे.....
27 मार्च अनुपच्या मित्राचा म्हणजे प्रकाशचा वाढदिवस.....त्या दिवशी प्रकाशचा वाढदिवस मित्रांनी दणक्यात साजरा केला नेमका त्याच दिवशी अनुप काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता.....2 दिवसानंतर जेव्हा अनुप परत आला तेव्हा समोर प्रकाश दिसताच अनुपच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला
भावा "पार्टी"??
प्रकाशने सुद्धा हातात हात देऊन स्मितहास्य करून मंजुरी दिली आणि रात्री यमाई पठारावर "बिर्याणी पार्टी" चे नियोजन लागले.....साहजिक अनुप आणि प्रकाश दोघेच जाणार होते....दोघे अगदी लहानपणापासूनचे मित्र आणि वाढदिवशी वैयक्तिक पार्टी करण्याची प्रथा त्यांनी अगदी लहानपणापासून जपली होती..त्या निमित्ताने अनेक जुन्या गोष्टीना उजाळा मिळायचा....ठरल्या प्रमाणे दोघेही 7 वाजता कामावरून आले आणि आपल्या आवडत्या क्लासिक बिर्याणी हाऊस मधून मस्त गरमागरम बिर्याणी आणि फ्राय चिकनचा डबा भरून घेतला.....आणि दोघे तिथून निघाले.....वाटेत मस्त गाडीवर गप्पा मारत 20 च्या स्पीडने त्यांची बाईक चालली होती.....छोटी छोटी वेडीवाकडी वळणे पार करत करत त्यांची बाईक यमाई पठाराकडे चालली......साहजिक एक रंजक विषय निघाला होता त्यात दोघांच्या हसत खेळत गप्पा रंगल्या होत्या....यमाई पठार एक पर्यटन स्थळ होत त्यामुळे सुरवातीलाच एक कमान उभारली होती......गावापासून 3 km तर मस्त गप्पा रंगल्या होत्या पण जस ती कमान पार केली दोघेही काही वेळ अचानक शांत झाले.....पार्टी करायला ते सारखे यमाई पठारावर जात होते पण आता मात्र काहीसं वेगळं वातावरण त्या दोघांना जाणवत होतं...हवामानात बदल होऊन उष्ण हवामान कोंदट पावसाळी असल्यासारखं भासत होतं...आजूबाजूच्या परिचित टेकड्यांनी आपले आकार,जागा,रंग सगळं काही बदललं होत....अनुपला हा बदल लक्षात आला होता पण त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केले होते....अचानक एका दुनियेतून दुसऱ्या दुनियेत प्रवेश करावा अस काहीसं वाटत होतं ती कमान म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या दुनियांचा दरवाजा असेल कदाचित म्हणून तर तिकडून पलीकडे गेल्यावर अचानक आकाशातले तारे जणू गायबच झाले होते एक काळाकुट्ट अंधार आणि त्या अंधारात हेडलाईटीच्या दिव्याचा आधार घेत चालणारी बाईक....अनुपला तर कमालीचे अस्वस्थ वाटत होते कारण रोजच्या रहदारीतला हा रस्ता वेगळा वाटत होता.....मानवनिर्मित बांधकाम त्या रस्त्याच्या आसपास कुठेच दिसत नव्हते.....रस्त्याच्या आजूबाजूला असणारी झाडे एकदम नाटकी वाटत होती एरव्ही यमाई पठार परिसरात जो थंड गार वारा वाहत असे तो वारा गायबच होता त्यामुळे न हलणारी ती झाडे एकदम नाटकी वाटत होती.....काहीतरी वेगळं आणि विचित्र वाटत होतं तिथे म्हणून तर त्या कमानीतून आत आल्यावर रंगलेल्या गप्पा अचानक बंद झाल्या.....अनुपला काहीतरी वेगळं वाटत होतं पण प्रकाश अगदीच शांत राहून गाडी चालवत होता हे बघून अनुप ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गदागदा हलवले
"अरे पक्या...काय झालं एकदम शांत झालास??"
पाठीवर पडलेल्या हाताने प्रकाश भानावर आला
"क...क...काय नाही"
प्रकाशने विषय टाळला....नेमकं काय बोलावं प्रकाशला काहीच सुचत नव्हतं.....पठार जवळ येत होतं....प्रकाशचे नाटकी बोलणे आणि नाटकी हसू अनुप बरोबर ओळखत होता......सोबत अनुपला हे सुद्धा जाणवत होते की हा रोजचा रस्ता नाही.....काहीतरी वेगळं वाटत होतं....भकास शांत वातावरण आणि काळाकुट्ट अंधार.....बाजूची डेरेदार झाडे बाईकच्या लाईटीच्या उजेडात एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसासारखी वाटत होती...आता झडप घेऊन गिळंकृत करायला तयार आहेत की काय अशी भासत होती त्यामुळे अनुप घाबरून समोर रस्त्यावर बघत होता आणि प्रकाशशी काहीतरी विषय काढून चर्चा करून त्या वातावरणावर हावी होण्याचा प्रयत्न करत होता....इतक्यात बाईकने पठाराचा चढ पार केला आणि ते दोघे मोकळ्या मैदानात आले.....हौशी लोकांची रेलचेल रात्री ही तिथे असायची पण आज त्या पठारावर कुणीच दिसत नव्हतं.....नगरपालिकेने लावलेला स्ट्रीट लाईट मर्यादित उजेड देत होता त्या उजेडात सिमेंटचा बसायचा बेंच दिसत होता अनुपला थोडं हायसं वाटलं कारण मगापासून ना ना शंकांनी त्याच्या मनात वादळ उठवले होते.....त्यातल्या एका शंकेला
"हुश्शहह आपण यमाई पठारावरच आहोत"
ह्या वाक्याने मनोमन उत्तर दिले होते.....पण सिमेंटच्या बेंचच्या आजूबाजूची हिरवळ गायब होती तिथे काळे खडक दिसत होते....दोघेही थबकले पण काही न बोलताच त्या बेंच जवळ आले....पुढचा धक्का मात्र त्या दोघांना जबर बसला....अनुपने तर प्रकाशचा दंड धरला.....त्या बेंच जवळून रात्री पूर्ण शहर लकाकताना दिसत होतं ....पण आता मात्र सगळीकडे काळोख...काळोख आणि फक्त काळोख दिसत होता....दोघांनी सगळ्या बाजूला नजर फिरवली...खाली असलेल्या शहरात एकही लाईटीचा दिवा दिसत नव्हता....फक्त उतारतिला एक चमकणारा लाईटीचा बिंदू टेकडीवरून दिसत होता.......नेमका प्रकार काय चालू आहे दोघांच्याही लक्षात येत नव्हतं
"अरे अन्या.....काय रं हे.....सगळीकडे अंधार भुडुक कसं काय??"
अनुपने थोडा वेळ विचार करत उत्तर दिले
"आरं पक्या.....शहरात लाईट गेली असलं बघ...हा...तसच असलं...नुकतीच गेली असलं....ते जाऊ दे आपण बिर्याणी खाऊन घेऊ....उगच गार व्हायची....मग मज्जा नाही येत खाण्यात....काय म्हणतो??"
प्रकाशची नजर अनुपच्या हातातल्या पिशवी कडे गेली वास्तविक लाईट जाऊन सगळीकडे अंधार पडणे आणि वरून एकही दिव्याचा उजेड न दिसणे हे प्रकाशला पटत नव्हते तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत
"व्हय व्हय....आधी मस्त खाऊन घेऊ मग बघूया पुढचं पुढं"
बिर्याणी पार्टी निम्मित दोघे ह्या पठारावर आले की एक दोन तास तरी बेंच वर बसून दोघांच्या गप्पा रंगायच्या.....आधी वेळ असायचा पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यानीं त्यांच्याकडून वेळ ओरबाडून नेला होता त्यामुळे दोघेही महिन्यातून एकदा पठारावर येऊन लकाकणार्या शहराकडे बघत मस्त निवांत गप्पा मारायचे बिर्याणी खाऊन घरी यायचे पण आता मात्र कसल्या तरी भीतीने त्यांना घेरलं होत....आपल्या शिवाय इथे अजून कुणीतरी आहे आणि त्या अंधारातून आपल्याकडे बघत आहे असा काहीसा समांतर भास दोघांना होत होता त्यामुळे दोघांनी डब्बा उघडला आणि काहीही न बोलताच बिर्याणी खाऊ लागले.....त्यांचे हात चालत होते...बिर्याणी खायचे ठरलेले औपचारिक काम आटपून इथून निघून काय पळून जावे अस दोघांनी मनोमन ठरवलं होतं...बिर्याणी खाताना त्यांच्या माना आपोआप सगळीकडे फिरून खात्री करून घेत होत्या......सळसळ जाणवू लागली.....कुणीतरी दबक्या पावलांनी त्यांच्या दिशेने येत असल्याचा भास दोघांना झाला त्यानुसार दोघांच्याही माना त्या अंधारात त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागल्या....लाईटीचा उजेड मर्यादित होता.....गडद अंधारात नेमकं काय चालू आहे काय आपल्या दिशेने येत आहे हे दोघांनाही कळत नव्हतं.....पण जे समोरून येत होतं ते बघून दोघांचाही घास हातातच राहिला.....चारी बाजूनी चार धिप्पाड कुत्री अगदी गुरगुरतच त्या अंधारातून बाहेर पडली....त्या चोघांचे एकत्रित गुरगरने अनुप आणि प्रकाशच्या मनात धडकी भरवत होतं....नेमकी कुत्रीच होती की अजून काही?? असली भयानक कुत्री त्यांनी आयुष्यात कधीही पहिली नव्हती... काळे केसाळ चमकदार अंग पिवळेशार चमकदार डोळे आणि लांब सुळे दात....एखादी हिंस्र श्वापदे.....अनुप आणि प्रकाश प्रचंड घाबरले त्यांनी आपल्या बिर्याणीतले चिकनचे तुकडे त्यांच्या दिशेने भिरकावले.....पण ते चारीही धिप्पाड कुत्रे त्या मासांच्या तुकड्याकडे न बघता गुरगुरत दबक्या पावलांनी दोघांच्या दिशेने येत होते....आता चारी दिशांनी त्या कुत्र्यांचे भुंकने सुरू झाले आवाज अगदी घाम फोडणारा होता ती कुत्री ठराविक अंतरावरून भुंकत होती जराही जवळ येत नव्हती अंधारातून कुणाच्या तरी आदेशाचे पालन करीत आपला आवेश आवरत कधी पुढे मागे सरकत अविरत कर्कश आवाजात भुंकत होती.....दोघांच्याही अंगावर काटा आला....जास्त वेळ थांबणे म्हणजे त्या भयाण हिंस्र कुत्र्यांची शिकार होण्यासारखं होत....त्यामुळे दोघांनीही सगळं समान आहे असं टाकून बाईकला किक मारली....प्रकाशने गाडीचा स्पीड वाढवला.....गार वाऱ्यातही दोघांचे अंग घामाने भिजले होते आणि ती काळी हिंस्र कुत्री त्यांच्या गाडीच्या मागे लागली होती......रस्त्यावर पूर्ण अंधार होता बाईकच्या हेडलाईटच्या उजेडात समोरचा रस्ता आणि मागून त्या कुत्र्यांचे चमकदार डोळे आणि पांढरेफेक आसुसलेले दात स्पष्ट दिसत होते.....अनुपची नजर आजूबाजूला गेली....मगाशी जिथून आलो तो हा रस्ता नव्हताच....हा रस्ता वेगळा होता झाडेही पूर्ण वेगळी होती...डेरेदार झाडांची जागा आता उंच अश्या नारळीच्या झाडांची घेतली होती.....सगळं वातावरण क्षणार्धात बदललं होतं.....टेकडीचा उतार गायब होऊन त्याची जागा एका सपाट न संपणाऱ्या रस्ताने घेतली होती....आजूबाजूला काही फलक दिसत होते पण त्यावरची भाषा मराठी नव्हतीच...कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतले ते फलक अनपेक्षित होते....सगळं काही अनपेक्षित भयानक घडत होतं..गाडी अविरत धावत होती....रस्ता संपत नव्हता आणि ती कुत्री काही केल्या पाठलाग सोडत नव्हती...गाडी थांबवून त्या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही...कारण थांबला की खेळच संपणार होता...अचानक मागून अनुप जोरात ओरडला
"पक्या...पक्या....ते बघ तिथं...तिथं घर दिसाय लागलं...चल लवकर तिथं"
एक मिणमिणत्या लाईटीचा उजेड एका दगडी कौलारू घरावर पडला होता.....ओसाड अश्या माळरानावर ते घर एकटच उभं होतं.....प्रकाशने बाईकचा वेग वाढवला आणि बाईक त्या दगडी कौलारू घराच्या दिशेने चालली.....त्या घराच्या दगडी भिंतीवर काहीश्या विचित्र भाषेत काहीतरी लिहल होत.....घरावर एक बोर्डही लागला होता....ते घर जसजसे जवळ येऊ लागलं तसं मागे लागलेली ती भयानक कुत्री एकेक करून अंधारात गायब होऊ लागली....दोघांनी थोडा निश्वास सोडला...दोघांनाही प्रचंड तहान लागली होती....आधीच दोघेही प्रचंड थकले होते.....सगळं अंग घामाने भिजले होते घसा कोरडा पडला होता.....दोघांनी मागे वळून बघितले मागे एक लांबलचक रस्ता दिसत होता....आजूबाजूची पांढरी माती अगदीच अनोळखी होती.....त्या कमानीतून आपण एका दुसऱ्या दुनियेत आलोय की काय असा भास अनुपला होत होता तोच काहीसा खरा ठरत होता.....ह्या पांढऱ्या मातीवरून तर हा नक्कीच महाराष्ट्र वाटत नव्हता..आणि ते अनोळखी भाषेतले फलक??..कदाचित आपण एका दुसऱ्या राज्यात आहोत किंवा एखाद्या दुसऱ्या देशात??.....शक्यता नाकारता येत नव्हती....एकाच रात्रीत बऱ्याच अविश्वसनीय,भयंकर आणि जीवघेण्या गोष्टी घडल्या होत्या.....काहीही घडू शकत होत.....दोघांनी गाडी त्या घराबाहेर पार्क केली घरावरी एक अनोळखी "ホテルの客" अश्या अक्षरात काहीतरी लिहलं होतं....घराचे बांधकाम भारतीय वाटत नव्हते....छप्पर उताराचे आणि बांबूनी बनले होते.....बाहेरून दगडी विटांचे बांधकाम होते....एक रूमचे घर असावे असं बाहेरून वाटत होते....अनुप आणि प्रकाश त्या घराच्या पायऱ्या चढून दरवाज्याजवळ पोहोचले.....दरवाजा जवळपास मोडकळीस आला होता.....अनुपने फक्त एक बोट लावले आणि कर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत तो दरवाजा पूर्णपणे उघडला गेला....अजून एक धक्का दोघांचेही डोळे विस्फारून गेला....बाहेरून लहान एक खोलीचे दिसणारे घर आतून मात्र एका प्रशस्त हॉल सारखे होते हा हॉल खूपच मोठा वाटत होता....दुरून परत तो कुत्र्यांचा आवाज आला आणि दोघांची पावले त्या घरात पडली.....एक मोठा हॉल मधेच एक मोठा डायनिंग टेबल ठेवला होता.....त्या मोठ्या हॉल मध्ये उजेड कमी जास्त होत होता कारण आजूबाजूला लावलेल्या मशालीची ज्योत ज्या बाजूला जाईल तिथे उजेड असा खेळ सुरू होता...मशालीच्या आगीच्या केसरी रंगात तो हॉल उजळून निघाला होता....सगळं वातावरण दोघानाही अनोळखी होत....ते त्या वातावरणात खेचले जात होते....पाऊले आपोआप आत पडत होती....हॉल च्या आजूबाजूला काही खोल्या होत्या त्यांची दारे जुन्या दरवाज्यानी बंद होती.....डाव्या बाजूला काही लाकडी ड्रम ठेवले होते त्यावर लाकडी झाकण होते.....दोघांच्याही नजरा त्या आश्रयात मानवी अस्तित्वाला शोधत होत्या....अनुपची नजर चारी दिशांना फिरत होती इतक्यात प्रकाशाची खुनावणारी थाप अनुपच्या खांद्यावर पडली आणि तो भानावर आला....समोरच्या एका स्टेज सारख्या कोपऱ्यात एक म्हातारा गुडघ्यात आपले डोके लपवून बसला होता.....होय म्हातारच होता तो.....त्याचा चेहरा जरी दिसत नसला तरी अर्धे टक्कल आणि मागे असलेल्या पांढऱ्या फेक केसांमुळे अंदाज बांधता येत होता सोबत त्याचे शरीर अगदीच अशक्त होतं.....हाडाला मांस चिटकलं होत अंगावर सुरकुत्या काळे तीळ त्या जीर्ण वृद्ध देहाची ओळख करवून देत होत्या.....तो म्हातारा गुडघ्यात तोंड लपवून पुढे मागे डुलत होता काहीतरी विचित्र भाषेत पुटपुटत होता.....त्याच्या डोक्यात एक छोटंसं छिद्र आणि त्यातून पांढरा स्त्राव वाहत होता त्याचा उग्र वास सगळीकडे पसरला होता.....खांद्याची पाठीची हाडे स्पष्ट दिसत होती.....त्याचा तो भयानक अवतार बघून अनुप आणि प्रकाशने एकमेकाकडे बघितले शेवटी धाडस करून अनुप बोलला
"व आजोबा....थोडं पाणी मिळलं का प्यायला??"
तो आवाज ऐकून तो जीर्ण झालेला देह शांत झाला.....आणि आपले गुडघ्यात लपवलेला चेहरा वर न काढता एक हात बाहेर काढून त्या लाकडी ड्रम कडे बोट दाखवले.....त्या हाताकडे दोघे काहीवेळ बघतच राहिले.....लांब बोटे त्यावर लांब काळी नखे मानवी वाटत नव्हतीच.....दोघांनी लगेच तिथून काढता पाय घेतला......घसा कोरडा पडला होता....तहानेने पूर्ण अंग थरथरत होते त्यामुळे दोघेजण त्या लाकडी ड्रम जवळ पोहचले.....एक विचित्र असा वास त्या ड्रम मधून येत होता पण तहान तर प्रचंड लागली होती त्यामुळे प्रकाशने ड्रमचे झाकण उघडले......समोर जे काही होतं ते बघून दोघेही भीतीने जवळपास खालीच कोसळले....ड्रम रक्ताने काठोकाठ भरला होता एक दोन मानवी मुंडकी त्या लाल भडक रक्तावर तरंगत होती.....बसल्या बसल्या अनुपचे लक्ष समोरच्या खोलीवर गेले त्या खोलीचे दार उघडले गेले होती.....मानवी हाडांचा कवट्यांचा खच च्या खच त्या खोलीत तुडुंब कोंबून भरला होता ...बाहेर येऊ पाहत होता.....अनुप आणि प्रकाश आता जोरजोरात किंचाळू लागले....कित्येक लोकांची हाडे होती ती
कट कट कर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्र
घमेजलेल्या त्या दोन चेहऱ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने बघितले......मशालीच्या उजेडात तो अगदी अमानवी वाटत होता.....तो म्हातारा आता त्यांच्या समोर उभा होता.....आपला जबडा फूटभर ताणवून उघड्या जबड्याने आणि काळ्या उभ्या डोळ्यांनी तो त्या दोघांच्याकडे बघत होता.....त्या जबड्यात छोटे छोटे असंख्य दात होते....हातांनी आकार बदलला होता 7,8 फुटी देहाचे हात लांबून आता जमिनीला टेकत होते.....त्या हातांची बोटे लांबलचक पसरली होती.....अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून उपाशी असलेला तो अशक्त देह....मानवी मांस खाऊन जगत असावा आणि बक्षीस म्हणून हाडांचा संग्रह करून ठेवत असावा.....कित्येक दिवसापासून तो उपाशी असावा अंदाज नव्हता....लांब उघडलेला जबडा त्या दोघांचे लचके तोडायला रक्त प्यायला आसुसला होता......समोरच दृश्य बघून अनुप आणि प्रकाश जिवाच्या आकांताने बाहेर पळत सुटले.....मागोमाग तो अमानवी म्हातारा हातांचा आणि पायाचा आधार घेत एखाद्या चारपाई प्राण्याप्रमाणे चिरररररररर चिरररररररर अस किंचाळत त्यांच्या मागे धावत येत होता.....अनुप आणि प्रकाश घराबाहेर पडले.....दोघांचाही श्वास चढला होता.....प्रकाश जोरजोरात रडत होता रडतच त्याने बाईक स्टार्ट केली....आणि रस्त्यावर आणली.....बाईक वेगाने धावत होती तितक्याच वेगाने ते अमानवी आपला जबडा फूटभर उघडा ठेवून त्यांच्या मागे येत होतं.....अनुप ओरडत होता प्रकाशला बाईक पळव पळव म्हणून जिवाच्या आकांताने सांगत होता कारण तो अमानवी म्हातारा काही अंतरावरच हातापायांनी धावत येत होता....वेगाने धावताना रस्त्यावर त्याच्या हातापायांची हाडे आपटत होती त्याचा खट खट खट असा आवाज घुमत होता....त्याचे हात लवचिक होते त्याने तो हल्ला करत होता...अचानक अनुप किंचाळला.....त्या म्हाताऱ्याने आपल्या लांबलचक नखांचा वार अनुप वर केला ....बाईक स्पीड मध्ये असल्यामुळे पाठीवर दोन तीन नखांचे ओरखडे पडून त्यातून हलके रक्त वाहू लागले.....कर्कश गर्जना करत तो म्हातारा कोणत्याही क्षणी झडप घालून त्या दोघांचा फडशा पडायला तयार होता.....दोघांनाही काहीच सुचत नव्हतं मागून काळ धावतच येत होता.......इतक्यात प्रकाशने 80 च्या स्पीड वर धावणाऱ्या गाडीला अर्जंट ब्रेक लावला.....समोर एक जण गाडी बाजूला उभी करून रस्त्याच्या मधेच दोघांना थांबण्यासाठी हात करत उभा होता......त्याच्या हातात पाण्याची बाटली होती दुसऱ्या हाताने तो थांबायचा इशारा करत होता......घाबरलेल्या प्रकाशने डिस्क ब्रेक दाबला होता त्यामुळे गाडी थोडी लडबडून दोघेही अलगद त्या समोर उभा असलेल्या तरुणापुढे कोसळले......तसा तो तरुण पुढे आला....हातातली 2 लिटर ची पाण्याची बाटली खाली ठेऊन त्यांच्याजवळ गेला आधी त्याने गाडी उचलली
"आव....दादा....जरा हळू की राव.....एवढ्या तर्राट कुठं निघालाईसा....हात करालतो की राव"
कपाळावर अष्टगंधाचे दोन पट्टे ओढलेल्या तरुणाकडे अनुप आणि प्रकाशचे लक्षच नव्हतं....त्यांचं लक्ष समोरच्या रस्त्यावर होतं....गाडी बरोबर मागे येणारा त्या म्हाताऱ्याला त्यांची नजर शोधत होती...दोघे प्रचंड घाबरले होते....भीती त्यांच्या चेहऱ्यावर घामाच्या रूपातून वाहत होती...दोघांची ती अवस्था बघून त्या तरुणाने रस्त्यावर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि त्यांच्या दिशेने केली.....अनुप आणि प्रकाश त्या तरुणाकडे बघत होते तो सामान्य वाटत होता....बाटलीतील पाणी बघून अनुपने ती बाटली घेतली आणि थरथरत्या हातांनी टोपण उघडत घटाघटा पिऊ लागला.....आपली तहान शांत होताच त्याने ती बाटली प्रकाशकडे दिली....प्रकाशसुद्धा घटाघट ते पाणी पिऊ लागला त्याचा वेग बघून तो तरुण म्हणाला
"ए भावा....जरा पाणी ठिव त्यात....वाईच्या गणपतीच्या मूर्तीवरच तीर्थ आहे त्ये.....घरातल्या लोकांना पण द्यायला पाहिजे की"
प्रकाशने बाटलीला टोपण लावले.....त्या तरुणाने परत एकदा दोघांच्याकडे बघितले आणि सॅक मधून एक लाडूचे पाकीट काढले
"बाकी काय नाही हे लाडूचे पाकीट आहे बघा....हे खावा जरा.....वाघ मागं लागल्या सारखं कुठनं आलाईसा अस??"
थरथरत्या हातांनी ते प्रसादाच्या लाडवाचे पाकीट घेऊन अनुप बोलू लागला
"ते....ते....भूत....भूत"
अनुपच्या तोंडून पुढचे शब्द फुटेनात....त्या तरुणाने समोरच्या रस्त्याकडे बघितले
"भूत??.....कुठं हाय भूत??....कुणी न्हाई बघा इथं.....बाकी ह्यो रस्ता खूपच हरामखोर आहे राव....मी पण 2,3 तास गाडी चालवायलोय....वाटच सापडना राव....वाईतन कोल्हापूरला यायला निघालो तर एक बेनं भेटलं वाटत....लिफ्ट दिली त्याला आणि जवळचा रस्ता जवळचा रस्ता करत करत त्या रांxच्यान ह्या रोडवर आणून सोडलं बघा....भलतंच विचित्र झिपरं हुत त्ये...काय बाय विचित्र बडबडत हूत.....बर जवळचा रस्ता म्हणत 3 तास ह्या असल्याच एका रोडवर फिरालोय आपला... एक गाव दिसणा की घर.....मग कंटाळून इथं थांबलो...पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत हुतो तवर तुमची गाडी भेटली बघा"
पाणी पोटात गेल्यावर आणि दोन दोन प्रसादाचे लाडू खाऊन अनुप आणि प्रकाशला बर वाटत होतं....त्यांचा श्वास आत सामान्य झाला होता.....दोघेही उठून उभे राहिले होते तरीही त्यांच्या मनात अजून भीती होतीच.....तो तरुण त्या दोघांना त्यांच्या ह्या अवस्थेबद्दल सतत विचारत होता पण हे सगळं सांगण्यापेक्षा इथून आधी निघालं पाहिजे ह्या विचाराने अनुप त्याच्या सॅक कडे बघत बोलला....कारण कदाचित ह्यामुळे ते जे काही अमानवी होत ते वाटेतच थांबलं होत
"भाऊ....एवढी मदत केली अजून एक मदत कराल का??"
तो तरुण ती बाटली सॅक मध्ये ठेवत बोलला
"आव बोला की बिनधास्त"
सॅक कडे बोट करत अनुप बोलला
"तो तुमच्या सॅक मध्ये गणपतीचा फोटो आहे ना....तो घरच्या रस्त्यापर्यंत माझ्याजवळ द्याल का??"
तो तरुण आपल्याच हातावर टाळी मारत म्हणाला
"हातीच्या मारी.....काय राव....लाजवताय व्हय आम्हाला....आव साहेब गणपती बाप्पा सर्वांचा हाय....हे घ्या"
बाईकला किक मारून त्या दोन गाड्या त्या रस्त्यावरून चालू लागल्या.....अनुप आणि प्रकाशने आपल्यावर घडलेला प्रसंग त्या तरुणाला सांगितला नाही.....अनुप तो गणपतीचा फोटो छातीला कवटाळून मागे बसला होता.....देवाचे आभार मानत देवाचे नाव घेत ते तिघे आता यमाई पठाराच्या मुख्य कमानीजवळ पोहोचले.....ती कमान बघून प्रकाश जोरात ओरडलाच
"आर अन्या...आलो रे आलो....कमानीजवळ आलो आपण"
प्रकाशचे अश्रूंनी डबडबले डोळे बघून तो तरुण आश्चर्यचकित झाला होता....पण अनुप आणि प्रकाश बरोबर जे घडलं ते त्यांचं त्यांनाच माहीत होतं.....कमानीतून बाहेर पडताच तिघांना एकदम मोकळा श्वास घेतल्यासारख वाटत होतं....जणू कित्येक दिवसांची धावती शिक्षा आता पूर्ण झाल्याचं समाधान.....कमानीतून बाहेर निघाल्यावर प्रकाश त्या तरुणाला त्यांच्यासोबत जे घडलं ते सांगायला सुरुवात केली....अनुपने मागे बघितले तर कमानीच्या आत अंधारात आठ चमकदार डोळे आणि त्या फूटभर पसरलेल्या जबड्यातले चमकदार स्पष्ट दिसत होते.....हा पाठलाग इथपर्यंतच होता............(समाप्त)