वारसदार भाग @ ३
ग्रॅज्युएशन नंतरच्या पुढील शिक्षणासाठी निशा शहरातील एका मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी खटपट करत होती. बर निशा एकदम शार्प, न घाबरणारी, आरे ला कारे म्हणून उत्तर देणारी, तिला तिच्या आयुष्यात स्वतःच अस वेगळं अस्तित्व निर्माण करायच होत त्यामुळे ती खूप शिकून स्वतःहाचा व्यवसाय सुरू करणार होती. त्यासाठी तिने कॉलेज काळातच व्यवसाया संबंधीत बरेचसे सेमिनार्स पण अटेंड केले होते. निशा आणि महादेवचं कॉलेज पासूनच एकमेकांवर प्रेम जडलं होतं पण महादेव श्रीमंत परिवारातून येतो अन आपले आई वडील हे खेड्यात राहतात आणि आपण तर इथे फक्त मामा मामींकडे शिक्षणासाठी राहतोय. हे दोन्ही परिवार आपल्या प्रेमाला सहमती देतील का ? हाच प्रश्न तिला नेहमी भेडसावत होता. कित्येकदा तर महादेव नेच पुढाकार घेऊन तिच्या आई बाबांना भेटून आपल्याबद्दल सगळं सांगतो म्हणून दर्शवल. पण नेहमीप्रमाणे निशा चा स्वाभिमान आड येत होता, तीच म्हणणं हेच होत की आधी मला स्वतःच्या पायावर उभ राहू दे त्यानंतर आपण आपापल्या घरी सांगूया. आणि त्यासाठी महादेव ही तिच्या सोबत नेहमी असायचा.
ट्रिंगsss... ट्रिंगsss..
हा बोल प्रिया ...! तिकडून प्रियाने सरिताला जे काही सांगितलं होत, अगदी जसच्या तस निशाला सांगू लागली. आणि येताना महादेव ला ही सोबत घेऊन ये, म्हणून फोन ठेवून दिला.
सगळ्यांना कॉल करून झाले होते, त्यात अजिंक्य अपवाद होता, कारण प्रिया अजिंक्यला वारंवार कॉल करत होती पण त्याचा फोन आऊट ऑफ रेंज येत होता. इथे सगळ्यांच्या मनात एकच चक्र सुरू होत, की सुनील ने अचानक सर्वांना भेटायला का बोलवलं असेल ? काही झालं तर नसेल ना ? तो ठीक असेल ना ? सर्वजण आपापल्या परीने अंदाज बांधू लागले. असंख्य प्रशांची उत्तर ही उद्याच भेटणार होती.
***
डॉक्टर रूम नंबर ०४ चे पेशंट शुद्धीवर आले आहेत, डॉ. सापळेंच्या केबिन मध्ये येऊन नर्सने ही बातमी दिली. तिथे डॉक्टर सोबत मि. मोहिते ही होते. लागलीच दोघांनी तिकडे धाव घेतली. अण्णा ला काहीतरी सांगायचं होत पण धक्का एवढा जबर होता की त्यामुळे त्यांची वाचा बंद झाली होती म्हणून ते हातवारे खुणावत होते. डॉक्टरांना अण्णांच म्हणणं कळायला काहीच मार्ग नव्हता. अण्णा फक्त मि. मोहितेंकडे पाहत होते आणि पुन्हा पुन्हा हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टर ह्यांना लवकरात लवकर बर करा, ह्यांच्याकडूनच आपल्याला पुढील गोष्टींचा सुगावा लागेल, अस बोलून मि. मोहिते तिथून निघून गेले.
***
कुल्पि घ्या, कुल्पि sss ... जिलेबी वाले, भजे घ्या...घ्या, कोणी गोड शेव विकत होतं, कोणी लहान मुलं वाजवतात त्या पिपाण्या विकत होतं. तर दुसरीकडे काही बायका कानातले, रंगबिरंगी काचेच्या बांगड्या, बिंदी, पाकिटावरच्या टिकल्या, डोक्यावर बांधायच्या गुलाबी कलरच्या रिबिनी घेत होत्या. कोपऱ्यात मटण, चिकन चे स्टॉल एका लाईनीत लावले होते. थोड्या अंतरावर गावच्या वेशीवर गावच्या कुलदैवतेच भलंमोठं अस जूनं मंदिर होत. त्याच कुलदेवतेची ही जत्रा होती. जी वर्षातून एकदा भरते. पहिल्यांदाच अजिंक्य गावच्या जत्रेला आला होता. अजिंक्य चे आजोबा कायमच त्याला ह्या जत्रेसाठी येण्यास त्याच्यामागे तगादा लावत होते. एकंदरीत जत्रेचं स्वरूप, सगळीकडे असलेला हा गजबजाट त्यालाही हवाहवासा वाटू लागला, पण का कुणास ठाऊक त्याला हे सर्व आपलेस वाटू लागलं. म्हणजे ज्या गावी तो कधी गेला नाही ज्या जत्रेत तो कधी वावरला तर सोडाच पण कधी पाहिली सुद्धा नाही ते सगळं त्याला ओळखीचं वाटू लागलं.
***
अलार्म वाजला सकाळचे ६ वाजले होते. तस तर अलार्मची गरजचं नव्हती कारण अलार्म आपण सकाळी लवकर उठण्यासाठी लावतो पण इथे तर डोळ्याला डोळाच लागत नाही, ह्याच विचाराने सुनील अंथरुणावरून उठतो. बेडरूममधुन हॉल वर एक नजर फिरवून सुनील फ्रेश होण्यासाठी घाई करू लागला, आज सर्वांना भेटायचं आहे, मित्रांना सगळं सांगून टाकतो म्हणजे डोक्यावरच टेन्शन आणि काहीतरी मार्ग निघेल ह्या विचाराने तो घाई करू लागला.
फोनवर जमवाजमवी सुरू झाली, निशा, महादेव, प्रिया, सरिता हे सगळे जमले. अजिंक्य गावी असल्याने तो येऊ शकणार नव्हता हे महादेव ने सर्वांना सांगितले. आता सगळे जण सुनील ची वाट बघत होते. त्याचं नेहमीच्या ठिकाणी त्यांच्या कॉलेजच्या बाहेर थोडं अंतरावर एक चहाची टपरी होती. तिथेच ते सर्वजण कॉलेज सुटल्यावर भेटायचे.
***
बाबा मी जाऊन येते, माझा मित्र आहे ना सुनील त्याला आज आम्हा सर्वांना भेटायचं आहे काहीतरी काम आहे म्हणे...! अस बोलून लगबगीनं प्रिया तिच्या बाबांना सांगून निघतच होती. तितक्यातच गुरुजींनी तिला अडवलं आणि विचारलं. त्याला सगळं नीट विचार, मी तयारी करून ठेवतो आणि अस म्हणतंच गुरुजींनी देव्हाऱ्यातला धागा प्रियाच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधला आणि आणखी पाच धागे तिच्या हातावर ठेवत, पुढे ते बोलले, की हे धागे तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटणार तेव्हा सर्व मित्रांनी उजव्या हाताच्या मनगटावर बांधून घ्या, उपयोगी पडेल. एवढं बोलून ते आत देवघरात संध्याकाळच्या पूजेसाठी गेले. प्रिया विचारातच पडली की, बाबांना अचानक मध्येच हे काय सुचलं, मुळात त्यांना काय माहीत ? की सुनील आम्हाला काय सांगणार आहे ते. पण तिने जास्त विचार न करता गुरुजींनी दिलेले धागे एका कागदामध्ये गुंडाळून तो कागद पर्स मध्ये टाकून सर्वांना भेटायला निघाली. आजच्या जनरेशन ची मुलगी ती, तिला काय कळतंय. ज्योतिषशास्त्रानुसार, उजव्या हाताच्या मनगटावर धागा बांधणे म्हणजे वाईट शक्तींपासून दूर राहणे, अडकलेली कामे होणे, शिवाय, वाईट नजर लागत नाही. पण हे आजकालच्या तरुण पिढीला रुचत नाही. असो....!
***
किती वेळ झाला यार, कुठे राहिला हा सुनील..! निशा जरा वैतागूनच बोलली. कारण वेळेचं बंधन न पाळणारे तिला बिलकुल आवडत नाहीत. सर्व जण सुनीलची वाट पाहतच होते अन तितक्यात सुनील तिथे पोहचला. त्याला पाहून सर्वजण थक्क झाले. त्याची ती अवस्था, ग्रुप मध्ये सर्वात हँडसम असलेला सुनील, नेहमी आत्मविश्वासाने भरलेला, शरीरयष्टी पण धस्टपुस्ट, व्यायामाची सवय असल्याने पिळदार शरीर होत त्याच. पण हे काय आता तर तो पूर्णपणे वेगळ्याच अवतारात आला होता. शरीर बारीक, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे, गाल आत गेलेले, त्यात त्याचा चेहरा अगदी हतबल झालेला दिसत होता. साधारण दोन वर्षांनी सुनील त्याच्या ग्रुप ला भेटला होता. ह्या दोन वर्षात त्याच्या सोबत काय झालं होतं हे त्याचं त्यालाच माहीत. मित्रांना एवढ्या दिवसांनी बघितल्यावर त्याने महादेव ला घट्ट मिठी मारली आणि काही न बोलता अगदी ठसाठसा रडू लागला. अस वाटत होतं कित्येक दिवसांचं दुःख त्याने त्याच्या मनात साचून ठेवलं होतं. त्याची अशी अवस्था बघून सर्वांच्यांचं डोळ्यात पाणी आलं. शेवटी मैत्री च मोल फक्त त्यांनाच जाणवू शकतं ज्यांना त्या मैत्रीची कदर आहे. सुखात सगळेच साथ देतील पण फक्त दुःखात जो साथ देईल तोच खरा मित्र... ही तीच गॅंग होती, जी शाळेत असो वा कॉलेजमध्ये पण एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायची. एकमेकांच्या सुख दुःखासाठी हवं ते करण्याची धमक होती ह्या मित्रांमध्ये. आणि ह्या सर्व ग्रुपला बांधून ठेवण्याचं सगळं श्रेय जात ते अजिंक्य ला... पण आज सुनीलच्या ह्या कठीण प्रसंगात तो नाही शिवाय त्याला ह्याबद्दल काही कल्पनाच नाही.
अरे सुनील..! झालं तरी काय आहे आणि तु येऊन रडतोयस का ? आम्हाला एकदा नीट सांग, आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपण सगळेजण मिळवून सोडवूया. शाळेत, कॉलेज मध्ये असताना आपण एकमेकांना एवढं सहकार्य केलंय. आणि आता खऱ्या आयुष्यात आम्ही साथ नाही देणार तर कोण देणार..? सरिता, निशा आणि प्रिया ह्या तिन्ही सोबतच सुनील ला समजावू लागल्या. पण सुनील च डोकं अजूनही महादेवाच्या खांद्यावर होत. रडण्याच्या हुदक्यांचा आवाज काही कमी होत नव्हता. त्याला महादेव ने कसबस शांत केलं आणि त्याला सर्वजण सविस्तरपणे विचारू लागले...
.
.
.
.
.
.
.
क्रमशः