वारसदार भाग @ २
लेखक : - राहुल माघाडे
गुरुजी...! तब्येतीची काळजी घ्या आणि शक्यतो प्रवास टाळा, डॉ. सापळे, पंडित अमित जोशी ( गुरुजी ) जे प्रियाचे बाबा आहेत, त्यांना बोलत होते. गुरुजी सत्तरी पार त्यामुळे रुटीन चेक अप साठी नेहमी प्रिया सोबत जायची पण आज तिला घरी काम असल्याने तिचा लहान भाऊ मयंक जो यंदा ग्रॅज्युएशन च्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. तो गुरुजींसोबत डॉ. सापळेंच्या क्लिनिक मध्ये आला होता. डॉक्टर आता वय झालंय, आतापर्यंतच सर्व आयुष्य फक्त सत्कार्यासाठी खर्ची घातलंय, आता आणखी काही नको मला. मी माझं आयुष्य छान जगलो आहे, अस म्हणत गुरुजी आणि मयंकने डॉ. सापळेंचा निरोप घेतला. घरी आल्यानंतर प्रियाने बाबांना रुटीन चेक बद्दल विचारलं, तब्येतीची विचारपूस करत त्यांना तांब्याच्या पेल्यात घोटभर पाणी आणून दिले. गुरुजींनी पाणी पिऊन हलकेच पलंगावर आरामसाठी पडले. सत्तरी ओलांडलेले वृद्ध ते, शरीर साथ देत नव्हते पण इच्छाशक्ती अगदी तरुणाई ला लाजवेल अस. बाबांना ह्या अवस्थेत बघून प्रियाने विचार केला की, सुनील बद्दल बाबांशी बोलावं का ? पण मनात आलेला प्रश्न मनाशीच ठेवून आधी सुनील ला भेटून खरी परिस्थिती काय आहे ? ते बघूया, नंतर मग ठरवूया.
***
ये राकेश..! ती अकाऊंट ची फाईल दे, मी सगळी बिल चेक केली आहेत. तु फक्त सरांच्या कॅबिन मध्ये फाईल ठेव, मला आज घरी लवकर जायचं आहे. सरिता खूप घाईघाईने ऑफिसची सर्व कामे आटपून फाईल ऑफिस बॉय राकेश कडे सोपवून घरी निघायची तयारी करत होती. सरिता खूप हुशार आणि अगदी शिस्तबद्ध, तिच्या लहानपणीच तिच्या वडिलांना देवाज्ञा झाली, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. घरी आई असते. ती पण आजारी त्यामुळे आईचं औषध पाणी आणि घरची पूर्ण जबाबदारी तीच्यावर येऊन पडली. ती नेहमी बोलते, मी मुलगी आहे अन ही माझी कमजोरी नाही, तर ताकद आहे.
ट्रिंग ट्रिंग .... सरिता ला फोन द्या, मी प्रिया बोलतेय. रिसेप्शनिस्ट निंबाळकर मॅडम नाकावरचा चष्मा वर सरकवत सरिता ला आवाज देतात. सरिता मॅडम, प्रिया चा फोन आहे.
सरिता : - काय ग...! आज अचानक ऑफिस मध्ये कॉल केलास, सर्व ठीक ना.
प्रिया : - हो ग..! तुला काही तरी सांगायचं आहे, मला काल सुनील चा कॉल आलेला. खूप गंभीर आणि त्याच्या मनात कसलं तरी दडपण होत. त्याला आपल्याला काहीतरी सांगायच आहे त्यामुळे त्याने मला सांगितलं आहे की, आपण सर्वजण नेहमीच्या ठिकाणी भेटू, ग्रुपमध्ये कॉल करून सांग.
सरिता : - हो चालेल भेटून बोलूया आपण. मी निघते, तु बाकीच्यांना कॉल कर..
प्रिया : - ( थोडं लाजून ) ऐक ना तु अजिंक्य ला कॉल कर ना, मी बाकीच्यांना कॉल करते.
सरिता : - तुझं तर बाई वेगळंच आहे. अग शाळा संपली, कॉलेज संपलं आता तरी तुझ्या मनात काय आहे ते त्याला सांग. नाहीतर वेळ निघून जाईल आणि तु बसशील अशीच.
प्रिया : - गप ग ..! तु कर त्याला कॉल.
सरिता : - ओके, मी त्याला कॉल करते. भेटू त्याच ठिकाणी.
***
क्वा क्वा क्वा ..... " कोणाचं बाळ रडत हाय ग, आग धुरपदा बाई...! ते बाळ आपल्या सुरेखा च हाय, आग पण सुरेखा कुठंय, येडी का खुळी तु, तुला माहीत नाही का ? सुरेखा कुठं हाय ते..! का कुणास ठाऊक ह्या कोळशेवाडी ला कुणाची नजर लागली ते..! आक्ख गाव दिवसाढवळ्या बी, भसाड अन ओसाड वाटू लागलंय ". गावातल्या बायकां नदी काठावर कपडे धुत धुत एकमेकांजवळ कुजबुजत होत्या. हे तेच गाव होत, कोळशेवाडी. ज्या गावातील सकाळ ही गुरढोरांच्या हंबरडा फोडून व्हायची. पक्ष्यांच्या किलबिलाट अन घरोघरी येणाऱ्या वासुदेव ने होत होती. सूर्याची पिवळी किरणं, वाहत असलेलं नदीचं मंजुळ पाणी, मंदिरात मोठ्याथोरांचे भजन, अभंगवाणी, लहान मुलांची भांडण, खेळणं अश्या विविधतेने नटलेले होत, कोळशेवाडी...
दिवस मावळतीला झुकत होता. शेतीसाठी गेलेली माणसं घराकडे परतत होती, अन थोड्यावेळापूर्वी नदीजवळ कपडे धुणाऱ्या बायकांची घरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. चला ग सयानो...! आवरा बिगिबिगी, सायंकाळ व्हतं हाय, मटकन निघा इथून आपल्याला घरी पोहचायच आहे. धुरपदा बाई च ऐकून सगळ्या बायका घाई करू लागल्या. अस काय होत जे संध्याकाळ होत आहे कळताच सगळ्या जणी घरी जाण्यासाठी घाई करू लागल्या. खरचं कोळशेवाडी ला कोणाची नजर लागली होती का ? की फक्त ही एक अवफा होती..!
***
हे बघ..! अजिंक्य, तु आताच गावाला नको जाऊस रे, मागच्या वेळी जसे आपण सगळे फार्महाऊस ला गेलो होतो, तसा आणखी एक प्लॅन करूया नंतर तु जा गावी. महादेव अजिंक्यला फोनवर सांगत होता. महादेव स्वभावाने बिनधास्त होता, कुणाची निंदा करायला त्याला अजिबात आवडत नव्हते. जे असेल ते तोंडावर बोलून मोकळा होणार आणि वेळप्रसंगी चूक कबूल करणारा. कॉलेजनंतर त्याला कुठे जॉब करायची गरज नव्हती. कारण वडिलोपार्जित धन, दौलत होतीच. आजपर्यंत वडील एकटेच त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय चालवत होते आता महादेव ही त्यांना व्यवसायात मदत करत होता. एकंदरीत, पैसा आणि वेळ त्याच्याकडे भरपूर होता पण ह्याचा त्याला जरा ही घमंड नव्हता. मैत्री साठी तर नेहमी एका पायावर काही ही करायला तयार होता. शिवाय अजिंक्य आणि सुनील त्याचे बालपणापासूनचे मित्र, अगदी जिगरीच म्हणा. त्यांच्यासाठी तर काहीपण. अजिंक्य स्वभावाने थोडासा लाजळू. पण हिम्मत खूप जास्त एवढी की त्याच्या बोलण्याने ही समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास झपाट्याने वाढेल. शाळेपासूनच त्याला लिखाणाची आवड, त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की तो पुढे जाऊन मोठा नामवंत लेखक बनतो की काय पण अगदीच तस नाही झाल, एका नामांकित कंपनीत तो इंजिनिअर म्हणून काम करत होता आणि जमेल तसं त्याचा आवडता छंद म्हणजे लिखाणाचा हे ही त्याने मनापासून जोपासलं होत. अजिंक्य ला त्याच्या गावच्या जत्रेसाठी जावं लागणार आहे तेच सांगण्यासाठी त्याने महादेव ला फोन केला होता.
अजिंक्य : - महादेव, प्लान नंतर बनवू रे, आधी गावची जत्रा आहे तिथे जाऊन येतो नंतर बघू आणि गावी मोबाईल ला रेंज नसेल त्यामुळे तुला कॉल केला. त्या सुनील चा काय फोन लागत नाही. त्याला पण सांग.
महादेव : - ठीक आहे बाबा जा ह्यावेळेस पण लवकर ये आपण मस्त प्लॅन करू..
हो नक्की...! महादेव, चल मी ठेवतो फोन माझी ट्रेन आली आहे. बाय बोलून अजिंक्य ने फोन कट केला.
***
डोळे मिटून
ओम नमः नमाय नमो..
ओम नमः नमाय नमो..
ओम नमः नमाय नमो..
स्वःहहहहहह....
" बोल, कोण आहेस तू..? काय हवंय तुला ...? बोल लल्लल्लल्लल .... डोक्यावर केशरी कपडा गुंडाळून, तोंडावर पांढऱ्या रंगाच्या रेषा ओढलेला चेहरा, भुवयाच्या बरोबर मध्यभागी गडद काळ्या रंगाचा टीका, हातात वेताची काठी अन काळ्या रंगाचा पेहराव करून अण्णा दीर्घ श्वास घेऊन कठोर आवाजात त्या मिश्कीलपणे हसणाऱ्या व्यक्ती कडे बघून बोलू लागला. पन त्यांच्या प्रश्नाला काहीच प्रतिसाद आला नाही. पुन्हा अण्णा ने हातातल्या वेताच्या काठीने रागातचं वार करत त्याला डिवचले. पण त्याला काहिच फरक पडला नव्हता. उलट रागाच्या आवेशाने तो अण्णा कडे नजर रोखून पाहू लागला अन चवताळलेल्या नजरेने अगदी घोगऱ्या आवाजात तो बोलू लागला. " ये भटा..! माझ्या मध्ये येऊ नकोस, तुझी शक्ती मर्यादित आहे पण मी असिमीत आहे त्यामुळे मला दिवचू नको...हाहाहाहहहह... खिई खि खि खि ....
तु असशील रे कोणीही पण मी तुला इथून बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.. अण्णा रागातच बोलले आणि डोळे मिटून काहीतरी पुटपुटू लागले. पण अचानक पणे त्यांना काही आठवत नव्हते, अस वाटू लागलं की ते काहीतरी विसरत आहेत अन अचानक घरातली वीज चालू बंद होऊ लागली, खिडक्यांची आपोआप उघडझाप होऊ लागली, ये म्हाताऱ्या अजून पण सांगतोय, जीव प्यारा असेल तर निघ इथून, नाहीतर उगाच प्राणाला मुकशील, पुन्हा तोच घोगरा आवाज उद्गारला. अण्णा ध्यान लावण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना व्यत्यय येत होता. अन जे नको व्हायला पाहिजे तेच झालं त्याने डाव साधला, अण्णाला त्याने त्याच्या सैतानी शक्तीने उचलून घराच्या बाहेर फेकले, तो हादरा एवढा जोरदार होता की त्यामुळे अण्णांचा आवाज गेला आणि त्याच सोबत डोक्याला जबर मार ही लागला. त्यांना ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. इकडे पुन्हा तेच गुरगुरन, तेच सैतानी हसू, तेच हाहाहाहहहह... खिई खि खि खि ....
.
.
.
.
..
क्रमशः