#वारसदार भाग @ १३
डॉ. सापळेंनी गुरुजींना घरी पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितली होती. गुरुजींना घरी आणण्यात आलं होतं तिथे प्रिया गुरुजींची काळजी घेत होती. पण अर्ध्यावर सोडलेलं काम गुरुजींना शांत बसू देत नव्हतं कारण त्यांना परिस्थितीचं गांभीर्य माहीत होतं. त्यांनी प्रियाला सांगून विधीसाठी लागणाऱ्या सर्व सामग्री घेऊन येण्यास सांगितलं.
***
बराच वेळ होऊन गेला अजून सुरेखा बाथरूम मधून बाहेर आली नव्हती, म्हणून सुरेखाची आई तिथे गेली. बाहेर हॉल मध्ये सुनीलचे बाबा, सुनील, अजिंक्य आणि महादेव बोलत बसले होते.. छोटी बहीण अपेक्षा नेहमीप्रमाणे बेडरूम मध्ये होती.. सुनील आणि महादेव अजिंक्य ला आतापर्यंत घडलेला सगळा प्रकार सांगत होते..
अचानक जोरात किंकाळी आली, किंकाळी बाथरूमच्या दिशेने आली, हॉलमध्ये बसलेले सगळे पुरुष मंडळी त्या दिशेने धावले.. सुरेखाला पाहून सुरेखाची आई किंचाळली होती. सुरेखाचे केस चेहऱ्यावर समोर आलेले, त्यामुळे चेहरा दिसत नव्हता, हात एकदम ताठ, हाताची बोटे वाकडी झाली होती, शरीर पांढरं पडलेलं दिसत होतं.. आणि कोणालाही सहज घायाळ करणार क्रूर हसू, तिच्या होंठावर फुटलं होत.. खरच फारच भयानक दृश्य होत ते...
सुरेखा कोणालाही काहीच न बोलता, बाथरूमच्या बाहेर चालत आली आणि बेशुद्ध पडली.. सुनीलने तिला पकडलं आणि हॉल मध्ये असलेल्या बेडवर घेऊन जाण्यासाठी तिला उचलू लागला, शरीराने बारीक असलेली सुरेखा त्याच्याकडून साधी हलत सुद्धा नव्हती, जणू काही तीचं वजन आता दुप्पटीने वाढलं आहे, अस वाटू लागलं. महादेव आणि सुनीलच्या बाबांनी सुनील ला मदत करून तिला बेड पर्यंत पोहचवल आणि तिला झोपवलं. ती ह्यावेळेस गप्प होती कारण हा सगळा चमत्कार गुरुजींच्या रुद्राक्ष माळेचा होता, ती माळ सुरेखाच्या गळ्यात होती म्हणून सैतान तिच्यावर ह्यावेळेस जास्त हावी होऊ शकला नाही.
हे बघ अजिंक्य ..! असा प्रकार सुरू आहे महिन्याभरापासून, सुनील म्हणाला. शिवाय गुरुजींनी दोन दिवसांचा अवधी दिला होता, त्यात कालचा आणि आजचा दिवस तर गुरुजींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेलो होतो तर त्यातच गेला म्हणजे राहिला फक्त उद्याचा दिवस..स्मशानात जाऊन एक विधी करायचा आहे, त्यासाठी काही सामग्री लागणार, सामग्री गुरुजी त्यांच्यासोबतच घेऊन येणार होते पण गुरुजींच हे अस झालं, महादेव बोलला.
अजिंक्य दोघांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होता आणि त्याच लक्ष सुरेखावर सुद्धा होत.. तिला बघून त्याला विलक्षण काहीतरी जाणवत होतं. कदाचित त्याच्यात असलेली अदृश्य शक्ती त्याला त्याबद्दल सूचना देत असेल पण तो त्याबद्दल अनभिज्ञ होता. पण एकंदरीत त्याला घडलेला प्रकार व्यवस्थित कळला होता. एक पाऊल सुनील कडे टाकत अजिंक्य उद्गारला, सुनील..! तु बोल, पुढे काय करायचं, आतापर्यंत महादेव तुझ्यासोबत उभा होता, आता हा अजिंक्य सुद्धा तुझ्या सोबत आहे. हा अजिंक्य, आज तुला शब्द देतो, की वाटेल ते करू पण सुरेखा दीदी ला ह्या जाळ्यातून सुखरूप बाहेर काढू..
अजिंक्यचे शब्द सुनीलच्या कानावर पडताच सुनीलचं अंग शहारून गेलं. सुनील अगदी जोश मध्ये येऊन बोलला, अजिंक्य..! सर्वात आधी आपल्याला गुरुजींना भेटायला हवं, तेच आपल्याला उद्याच्या होणाऱ्या विधीसाठी सामग्री देणार आहेत. महादेव पण लंगडत लंगडत उभा राहिला, चला आताच जाऊया आणि गुरुजींची भेट घेऊया, उगाचच वेळ वाया नको घालवायला. अजिंक्यने महादेवच्या खांद्यावर हात ठेवला व तो बोलू लागला, महादेवा..! यार तु ग्रेट आहेस, तु मित्र म्हणून जिंकलस भावा, तुझ्या पायाला दुखापत असतानाही तु तयार झालास, त्यातच तु जिंकलस आम्हाला पण आता मी आलोय.
आतापर्यंत आपण ही लढाई शक्तीने लढत होतो पण आता आपण ही लढाई शक्तीने आणि युक्तीने दोन्ही बाजूने लढायची. तु तुझी मैत्री निभावलीस आता माझी मैत्री निभावण्याची वेळ आली आहे, अजिंक्य हाताच्या बाह्या वर चढवत बोलला. मला सांगा, गुरुजींच घर इथून किती अंतरावर आहे.
वीस किलोमीटर असेल, महादेव म्हणाला. म्हणजे आपल्याला जाण्यासाठी अर्धा तास आणि पुन्हा येण्यासाठी अर्धा तास असे एकूण एक ते दीड तास लागेल, अजिंक्य बोलला. सुनील गुरुजींना आता कॉल कर आणि सांग की विधीसाठी लागणारी सामग्री तयार करून ठेवा आम्ही ती घ्यायला येतोय, अजिंक्यने सुनीलला सांगितलं. तस सुनीलने घरातील टेलिफोन वर काही नंबर दाबली आणि प्रियाच्या घरी कॉल केला.
सुनील : - हॅलो प्रिया ..! गुरुजींची तब्येत कशी आहे आता ?
प्रिया : - हो आता ठीक आहे पण मानेवर अजून ही पट्टा आहे त्यामुळे जास्त हालचाल करता येत नाही.
सुनील : - प्रिया आम्ही गुरुजींना भेटायला येतो आणि दिदीच्या विधीसाठी लागणाऱ्या सामग्री पण घेऊन जाईल तर ती सामग्री तयार आहे का ? गुरुजींना विचारून घे एकदा..
प्रिया : - अरे सुनील अजून तरी ती सामग्री तयार नाही कारण बाबांनी मला सकाळीच त्या वस्तू तयार करायला सांगितल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी अजून तयार नाहीत पण आज संध्याकाळपर्यंत ते तयार होईल, तुम्ही उद्या सकाळी येऊन घेऊन जाऊ शकता. आणि तस ही ती सामग्री रात्रीच्या वेळी तुमच्याजवळ ठेवणे बरोबर नाही म्हणून तर बाबांनी सांगितलं, मी स्वतः घेऊन येईल पण दुर्दैवाने त्यांच्यासोबत हे अस झालं.
प्रियाचं सगळं बोलणं ऐकून सुनीलने तिला काळजी घे स्वतःची आणि गुरुजींनी, आम्ही उद्या सकाळी येऊ अस बोलून फोन ठेवला. तिच्यासोबतच झालेलं संभाषण सुनिल घरात सांगू लागला. अच्छा म्हणजे आपल्याला उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागणार तर, हिहीहीहीहीही अस बोलून अजिंक्य बोलता बोलता थोड्यावेळ थांबला एक मिनिट, आपल्यावर कोणीतरी हसत आहे का ? अजिंक्य म्हणाला. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. नाही अजिंक्य, आम्हाला तर कसलाही आवाज येत नाही, सुनील म्हणाला. नीट ऐक ..! सुनील, बघ मला पुन्हा कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येतोय, जस की कोणीतरी आपली थट्टा उडवतंय, आवाज एकदम हिंस्त्र आहे, अगदी गुरगुरल्यासारखा, बाई आणि पुरुष दोघांचा मिळून तो आवाज आहे, अस मला जाणवतंय..
सुनीलने एकवेळ सुरेखा कडे पाहिले, ती अजूनही बेशुद्ध होती. तिचे डोळे बंद होते पण तिच्या चेहऱ्यावर विचित्र हसू उमटलं होतं, जे खूप भयानक दिसत होतं. अजिंक्यला खुणवत सुनीलने सुरेखाकडे बोट दाखवून तो बोलु लागला, अजिंक्य दीदी बेशुद्ध आहे पण तीच हसू फार भीतीदायक वाटत आहे. कारण आता तिचा चेहरा एखाद्या पुरुषांच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. तिचा तो चेहरा पाहून अजिंक्य सुद्धा थोडावेळासाठी भांबावून गेला. सगळेजण तिच्याकडे पाहू लागले, सुनील, महादेव, बाबा, आई आणि अजिंक्य एकटक तिला पाहत होते. अजिंक्यला तिच्याच दिशेने तो हसण्याचा आवाज येत होता.. आता तर त्याला थोडीफार कुजबुजू सुद्धा ऐकू येऊ लागली.. ( फक्त तीन दिवस त्यानंतर हिहीहीहेहे.. हहहहह .. कर्रर्रर्रर्रर्रर्र...) कानात अचानकपणे कर्णकर्कश आवाज घुमला आणि अजिंक्य डोक्याला हात लावून खाली बसला. बाप रे किती तो भयानक जीवघेणा आवाज...
अजिंक्य तु ठीक आहेस ना, हे घे पाणी पिऊन घे, महादेवने त्याला पाणी पाजलं. मी ठीक आहे, मी ठीक आहे, आपण उद्या सकाळीच गुरुजींच्या भेटीला जाऊ, मी घरी जातो आणि उद्या सकाळी येतो. खरंतर, अजिंक्य गावाहून थेट सुनीलच्या घरी आला होता, महादेवने सुनील बद्दल सांगितलंच होत एवढं भयानक की त्याला रहावलंच नाही. शिवाय, त्याला प्रत्यक्षात देखील बघायचं होत की नेमकं झालं तरी काय आहे.. आणि त्याची त्याला प्रचिती सुद्धा आली. तो तिथून निघून गेला सोबत महादेवला त्याने घरी सोडलं आणि उद्या सकाळी मी येतो त्यानंतर आपण सुनीलच्या घरी जाऊ अस त्याने महादेवला सांगितलं.
अजिंक्यच्या अश्या अचानक आल्याने एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे सुनीलच्या घरात अजिंक्यच्या रूपाने सकारात्मक ऊर्जा आली. ज्यामुळे घर प्रसन्न आणि उजळले. त्यामुळे घरात असलेल्या नकारात्मक शक्तीचा काही प्रमाणात का होईना वावर कमी झाला. पण बोलतात ना, अर्धवट ज्ञान आणि अपूर्ण अभ्यास जास्त धोकादायक ठरतो. तसच झालं, अजिंक्यच्या रूपाने अदृश्य शक्ती मोहितेंच्या घरात आली जरूर पण ती शक्ती तिथेच बांधून ठेवण्याची क्रिया, मंत्र हे अजिंक्यला अवगत नसल्याने किंबहुना त्याला पुरेसं ज्ञान नसल्याने अजिंक्य सोबत ती शक्ती पुन्हा घराबाहेर निघून गेली. त्यामुळे घर पुन्हा त्या असुरी काळोखात गेलं, पुन्हा घरात नकारात्मक शक्तींचा वावर सुरू झाला आणि ह्यावेळेस सैतानी शक्ती पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली झाली होती. ह्याची जराही कल्पना मोहिते परिवाराला नव्हती.
***
भयाण शांतता साधारण रात्रीचे २ - ३ वाजले असतील..दिवसभराच्या धावपळीमुळे सर्वांचा थोडावेळासाठी डोळा लागला. बाहेर कुत्रे विव्हळण्याचा आवाज, रातकिडे किर्रर्रर्र किर्रर्रर्र करत होते. त्यामुळे रात्र अगदी खायाला उठली होती. त्यात उद्या अमावस्या असल्याने आधल्या रात्रीच चंद्र नाहीसा, किंचित धूसर दिसत होता म्हणून आज जास्तच अंधार जाणवत होता.
अअअअपेपेपेक्षाआआआ.... अअअअपेपेपेक्षाआआआ करत कोणीतरी हळूच सुनीलच्या लहान बहिणीच्या कानाजवळ तिच्याच नावाने हाक देत होत.. अपेक्षाचा गाढ झोपेत होती, त्यामुळे तिला कसलीही जाणीव झाली नाही. आता अपेक्षाला स्वप्नात सुद्धा तश्याचप्रकारे कोणीतरी तिच्या कानाजवळ बसून अअअअपेपेपेक्षाआआआ म्हणून बोलवत होत.. तिने खाडकन डोळे उघडले, पण आता ती त्या आवाजाला संमोहित झाली होती त्यामुळे ती स्वतःच भान हरपुन गेली. पुन्हा तिच्या कानावर हाक आली, अगदी हळू कोणालाही आवाज न ऐकू येता, फक्त अपेक्षाने ऐकायला हवं एवढा हळू आवाज, अअपेपेपेक्षा... माझ्याकडे ये.. मी तुझी दीदी आहे...अपेक्षा भानावर नव्हती, ती बेड वरून उठली, तिच्या बाजूला तिचा भाऊ सुनील झोपला होता. अपेक्षा हळूच बेडवरून उठली आणि बेडरूम मधून हॉलच्या दिशेने जाऊ लागली. अगदी झोपेत चालावं अस तिने तिचा शरीर त्या सैतानाच्या संमोहित शक्तीच्या स्वाधीन केलं होतं. ती हॉल मध्ये पोहचली. आई आणि बाबा खाली झोपले होते. हॉलमध्ये असलेल्या बेडवर तिने नजर टाकली जिथे सुरेखा झोपायची. पण सुरेखा तिथे नव्हती.
पुन्हा तो आवाज आला अअपेपेपेक्षाआ... मी तिथे नाहीये हिहीहीखिखिखी... तिकडे बघ समोर कपाटाच्या बाजूला असलेल्या कोपऱ्यात.. अपेक्षाने तिथे नजर टाकली आणि खरंच सुरेखा तिथे उभी होती... आणि ते ही जमिनीवर पाय न ठेवता अगदी हवेत...! केस मोकळे सोडलेले, असुरी हसू आणि डोळे लालबुंद होते तिचे...बाहेर कुत्रे जास्तच विव्हळू लागले, एकसारखे मोहितेंच्या घराकडे बघून भुंकू लागले पण त्या सैतानी ताकदीमुळे बाहेरील आवाज घरात येत नव्हता.. बाहेर थंडगार वारा सुटला होता, तरी देखील घराच्या आत कोणाला काहीच खबर नव्हती. सुरेखाने अपेक्षाकडे हात करून तिला स्वतःजवळ बोलावले.. अपेक्षाचे डोळे अगदी सताड उघडे होते, पापण्यांची जराही हालचाल होत नव्हती. सुरेखाच्या इशाऱ्यावर अपेक्षा तिच्याजवळ जाऊ लागली. ती पोहचली.. तिला पुन्हा आज्ञा आली, अपेक्षा... माझ्या गळ्यात पडलेली ही माळ काढून बाहेर फेकून दे...! मालकाची आज्ञा मानावी, तशी अपेक्षा पुढे सरसावली.
बाप रे ... काय भयंकर स्वप्न पडलं हुश्श...! अजिंक्य खडबडून झोपेतुन उठला, बाजूला ठेवलेलं पाणी प्यायला. घड्याळात पाहिले तर सकाळचे ५ वाजले होते. जेव्हापासून गावी गेलोय तेव्हापासून हे विचित्र स्वप्न पडत आहेत, केव्हा संपेल हे सगळं, कुणास ठावूक ? आजोबांचा वारसदार असेल मी, पण त्यांच्याऐवढा पराक्रमी आणि विद्वान तर मुळीच नाही. झटक्यात त्याला त्या स्वप्नाची प्रचिती आली, हे स्वप्न खरं नसायला हवं नाहीतर अनर्थ होईल.. ताबडतोब गुरुजींना भेटलं पाहिजे. तसही प्रियाच्या घरी कधी गेलो नाही, पहिल्यांदाच हा योग जुळतोय.. थोडस लाजून अजिंक्यला कॉलेजमध्ये असलेली प्रिया आठवली, नेहमी पंजाबी ड्रेस, साधी सरळ, मोजक बोलणारी, वेळप्रसंगी सावध, शांत स्वभावाची प्रिया, खरंतर त्याला ही ती आवडायची पण उगाचच प्रेमाच्या स्पर्धेत बाद झालो तर प्रेमळ मैत्रीही गमावून बसू म्हणून दोघेही एकमेकांसमोर कधी स्पष्टपणे व्यक्त झाले नाहीत. प्रियाच्या आठवणीत अजिंक्य त्याच्या स्वप्नात विसावला ते थेट सकाळी ७ वा. च्या गजरानेचं उठला.. तयारी करून तो महादेवच्या घरी पोहचला. तिथे त्या दोघांनी सकाळचा नास्ता उरकला आणि दोघेही सुनीलच्या घरी जाण्यासाठी निघाले.
***
प्रिया बेटी..! सुनीलच्या घरून अजून कोणी आलं की नाही ? गुरुजी प्रियाला म्हणाला. नाही बाबा ..! अजून तरी कोणी नाही आलं, मी सुनील ला टेलिफोन केला होता पण फोन कनेक्ट झाला नाही. कदाचित फोन ची लाईन डेड झाली असेल.
आतापर्यंत त्यांनी यायला हवं, उशीर करून चालणार नाही. कालची रात्र त्यांची कशी गेली असेल कुणास ठाऊक, गुरुजी गंभीरपणे म्हणाले. बाबा काळजी नका करू तुम्ही येईल सुनील, कदाचित काहीतरी काम असेल त्यामुळे त्याला उशीर झाला असेल.
टिंगडींग ...टिंगडींग ..! बघा आला वाटत सुनील, प्रिया बोलत बोलत दरवाज्याच्या दिशेने निघाली.
***
दरवाज्यातून आत आल्यावर महादेव आणि अजिंक्यने भयानक दृष्य पाहिलं.. हॉल मध्ये सर्व वस्तूंचा पसारा पडला होता आणि जमिनीवर काही प्रमाणात रक्ताचे थेंब सांडलेले दिसत होते.. सुनीलचे आई बाबा आणि सुनील तिघे रडत होते. सुरेखा बेडवर बसून काहीच माहीत नसल्यासारखी त्यांच्याकडे बघत होती.. तिच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. अजिंक्यने सुनीलकडे धाव घेतली, सुनील ..! काय झालं, अरे तुम्ही रडत का आहात ? सुनील काहीच बोलत नव्हता त्याने फक्त सुरेखाकडे बोट केलं, महादेवला आधीच त्या सैतानाचा राग होता, रागाच्या भरात लंगडत का होईना महादेव सुरेखाच्या अंगावर धावून गेला आणि घात झाला..
त्या सैतानाने महादेवला फक्त नजरेने घायाळ केलं आणि उचलून जमिनीवर आपटलं.. हिहीहीहंखिहखी ... मूर्ख माणसा, माझ्यावर धावून येतो, थांब तुझा पण अंत जवळच आला आहे, तुला पण जिवंत सोडत नाही. अस म्हणत त्या सैतानाने त्याच्यावर पुन्हा वार केला पण ह्यावेळेस वार चुकला, कारण सैतानी शक्तीच्या आणि महादेवच्या मध्ये अजिंक्य उभा राहिला. बघताच क्षणी संपूर्ण घरात लख्ख प्रकाश पसरला जणू काही साक्षात देवाने साक्षांत्कार दिला असावा. मोठ्या मोठ्या आवाजात शंखनाद होऊ लागला, आणि पिवळसर रंगामध्ये अगदी मजबूत अस दैव्यशक्तीचं कवच अजिंक्यच्या आजूबाजूला निर्माण झालं. अजिंक्यला स्वतःला सुद्धा काही कळत नव्हते. त्या शक्तीचा प्रकाश एवढा शक्तिशाली होता की सुरेखाचे डोळे ते सहन करू शकत नव्हते आणि तो सैतान काही काळापुरता का होईना गेला.. आता तिथे सुरेखा होती जी वेदनेने विव्हळत होती. तिच्या डाव्या हाताला धारदार सुऱ्याने वार केल्यासारखे निशाण होते.. आई बाबांनी तिला सांभाळलं तिच्या हातावर मलमपट्टी लावली.
खरंतर काल रात्री अजिंक्यने पाहिलेले स्वप्न हे वास्तविकरित्या खरं होत. कारण काल रात्री तेच घडलं होत जे अजिंक्यला स्वप्नात दिसलं होत. जेव्हा अपेक्षाला आज्ञा आली, की माझ्या गळ्यातील माळ काढून बाहेर फेकून दे, तसच अपेक्षाने केलं. माळ काढून बाहेर फेकून दिली अन ती भानावर आली. आणि जोरात किंचाळली, कारण सुरेखा भयानक रुपात तिच्या समोर उभी होती, ते ही जमिनीवर पाय न ठेवता अगदी हवेत... अस दृश्य बघून कोणताही साधारण व्यक्ती घाबरून किंचाळेलच. तिच्या किंकाळीने घरातील सगळे दचकून उठले पण तोपर्यंत सैतानाने त्याच काम केलं होतं, अपेक्षाचा आत्मा हिसकावून तो त्याने बंदीस्त करून घेतला. अपेक्षाचं शरीर जमिनीवर कोसळलं.
आता आतल्या बेडरूममध्ये अपेक्षाच शरीर होत जे फक्त कोमामध्ये गेलेल्या एका रुग्णासारखं पडून होत. सकाळीच डॉ. सापळेंनी घरी येऊन अपेक्षाला तपासून ती कोमामध्ये गेली आहे, अस डॉक्टरी भाषेतील उत्तर देऊन थप्पा मारला. पण डॉक्टर हे मोहितेंच्या ओळखीचे आणि मित्र सुद्धा होते शिवाय सुरेखाची केस ही त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यांनी सरळच सांगितलं की तिचा आत्मा त्या सैतानानेचं कैद केला आहे, त्यामुळे हे अस झालं आहे, आम्ही त्याला मेडिकल भाषेत पेशंट कोमामध्ये गेला आहे, अस म्हणतो.
आता अजिंक्य आणि महादेवला झालेला सगळा प्रकार कळला. त्या दोघांनी सुनील ला आणि त्याच्या आई बाबांना शांत केलं, महादेवने सर्वांसाठी चहा बनवला..
थोड्यावेळापूर्वी अजिंक्य सोबत झालेल्या चमत्कारिक गोष्टी सर्वांनी पाहिल्या होत्या. महादेवने अजिंक्यला त्याबाबत विचारलं आणि मग अजिंक्यने सगळी कथा सांगायला सुरुवात केली. गावी गेल्यापासून, रात्री पडलेलं विचित्र स्वप्न, तिथे भेटलेले शास्त्री बुवा, त्याचे माऊली बाबा, गावच्या कुलदैवतेची जत्रा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजोबांकडून मिळालेला चमत्कारिक वारसा ज्याचा वारसदार तुमचा मित्र म्हणजे अजिंक्य आहे. हे सगळं ऐकून सगळेच अचंबित झाले.
सुरेखा पूर्वावस्थेत येऊन रडत होती, माझ्यामुळे माझ्या लहान बहिणीवर ही वेळ आली. अस म्हणतं ती स्वतःलाच दोष देत होती. सुनीलने तिला सांभाळले, दीदी तु काळजी नको करुस आणि वाईट पण वाटून घेऊन नकोस, फक्त आजचा दिवस, आम्ही तुला आणि अपेक्षाला दोघांना सुखरूप ह्या सैतानी जाळ्यातून बाहेर काढू.. आता तर आमच्यासोबत अजिंक्य पण आहे.. सुरेखाने अजिंक्यकडे तिरकस नजरेने पाहिले.. पण ती जास्त वेळ अजिंक्यकडे नजर रोखून धरू शकत नव्हती. कारण, अजिंक्य कोणी साधा आसामी नव्हता हे तिच्या आतील सैतानाला देखील कळून चुकले.. त्याच्या भोवती निर्माण झालेलं सुरक्षाकवच अगदी सूर्याच्या किरणांसारख प्रखर होत.. आणि सूर्याकडे नजर रोखून धरल्याने काय होत, हे सर्वांना माहीत आहे.
चला खूप झालं, आपल्याला प्रियाच्या घरी लवकरात लवकर जावं लागेल, गुरुजींकडून अजून काही उपाय भेटतोय का ? ते बघावं लागेल.. महादेव तुझ्या पायाला दुखापत आहे तु इथेच थांब, काका काकूंकडे लक्ष दे, मी आणि सुनील आम्ही दोघे जातो, अजिंक्य म्हणाला.
अजिंक्यच म्हणणं सर्वांना पटलं, तातडीने सुनील आणि अजिंक्य प्रियाच्या घरी निघाले.. निघताना अजिंक्यने महादेव च्या हातात एक माळ दिली, हो तीच गुरुजींची रुद्राक्ष माळ जी काल रात्री अपेक्षाने बाहेर फेकली होती. सुनीलच्या घरी येताना अजिंक्यला ती माळ बाहेर पडलेली दिसली होती त्यावरूनच त्याला थोडाफार अंदाज आला होता की आतमध्ये नक्कीच काहीतरी विचित्र घडलं असणार..
***
ये सुनील ..! अरे किती वेळ झाला, बाबा तुमची केव्हापासून वाट बघत होते, आणि महादेव कुठेय ? प्रिया बोलता बोलता शांत झाली कारण सुनील सोबत अजिंक्य सुद्धा आला होता. तिला तर माहीतच नव्हतं की अजिंक्य गावी जाऊन परत सुद्धा आला.. ती मनातून खुश झाली, कारण पहिल्यांदा अजिंक्य तिच्या घरी आला होता. थोडी बिथरली, त्याला पाहून उगाचच ड्रेस व्यवस्थित करू लागली, हळूच समोर आलेली केसांची लट, कानामागे घेऊन गेली. ती स्तब्ध होती. तीच लक्ष फक्त अजिंक्यवर होत. अजिंक्यच्या नजरेने ते हेरलं आणि प्रियाला समोर पाहून त्यालाही फार आनंद झाला. पण आनंद व्यक्त करायची ती वेळ नव्हती.
आम्ही आत येऊ का ? प्रिया.. आम्ही आत येऊ का ? सुनील पुन्हा म्हणाला. हो हो .! या ना प्लिज.. सॉरी हा .. प्रिया गोंधळली होती. तिला काय करावं आणि काय बोलावं कळत नव्हतं, एकतर अजिंक्य तिच्या घरी पहिल्यांदाच आलेला त्यात ती बावळटा सारखी वागत होती. स्वतःशीच पुटपुटत, शी.. मी कशी दिसतेय ?
ते दोघे आतमध्ये येऊन बसले.. गुरुजींना पॅरॅलीसीसीचा झटका आल्याने ते त्यांच्या खोलीत आराम करत होते. तितक्यात प्रिया आली.. सुनील तुम्हाला बाबांनी आतमध्ये बोलवलंय, प्रिया बोलली.
गुरुजींची खोली अगदी प्रशस्त, देव्हारा नेहमी प्रकाशमान, दिव्याची वात टोकदार पणे पेटत होती.. बाजूलाच काळ्या कलरमध्ये धुपबत्ती होती, जी जळत होती त्यामुळे त्याखोलीत धूर झाला होता. म्हणजे गुरुजींची खोली अगदी प्रसन्न आणि सकारात्मक शक्तीचा उगमस्थान वाटत होती.
गुरुजींच्या खोलीत प्रवेश करताच अजिंक्यच संपूर्ण शरीर शहारलं. त्याच्या अवतीभवती लख्ख प्रकाशमान आणि पिवळसर तांबूस वलये निर्माण झाली.. जणू काही त्याच कोणीतरी रक्षण करतंय.. अजिंक्यला आत येताना पाहून स्वतः गुरूजी अचंबित झाले. त्यांनी अजिंक्यला पाहूनच नकळतपणे त्यांचे हात त्याला नमस्कार करण्यासाठी जोडले गेले. त्यांच्यातोंडुन एकच शब्द बाहेर निघाला, गुरुदेव..!
अजिंक्य म्हणाला, काय गुरुदेव ..! नाही गुरुजी, मी अजिंक्य, सुनील आणि प्रियाचा मित्र ... त्याने त्याची ओळख सांगितली. त्यावर गुरुजी बोललेलं, माफ करा, कदाचित वय झाल्याने काहीतरीच तोंडून निघालं, पण का कुणास ठाऊक तुम्हाला बघितल्यावर मला तुमच्यात वेगळीच शक्ती दिसून आली. अजिंक्यच्या आजूबाजूची वलये त्याच्या रक्षणासाठी अजूनही त्याच प्रखरतेने होती.
अजिंक्यला ही मनातून वाटलं, की गुरुजी कोणी साधी आसामी नाही, त्यांना चमत्कारिक गोष्टींबद्दल भरपूर ज्ञान आहे म्हणून तर ते सुनील ला मदत करत आहेत. अजिंक्यने त्याचा सगळा भूतकाळ आणि गावची माहिती अगदी त्याच्या आजोबांबद्दल ही सगळ सांगितलं.
गुरुजी : - काय .? तुम्ही गंगाधर मोरोपंत ह्यांचे नातू आहात..
अजिंक्य : - हो गुरुजी काय झालं..
अजिंक्यला पाहून गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं. अजिंक्यच्या डोळ्यामध्ये साक्षात त्यानं गंगाधर मोरोपंतची छटा दिसली. गुरुजींनी हात जोडून नमन केले. आणि सांगू लागले.. अजिंक्य बाळा ..! कदाचित तुम्ही आम्हाला ओळखत नसणार, कारण तेव्हा तुम्ही फार लहान होता अगदी पाळण्यात.. तुमचे आजोबा म्हणजे गंगाधर मोरोपंत हे माझे परमपूज्यनीय गुरुजी आहेत. त्यांनीच मला ही विद्या शिकवली..तुझे आजोबा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा उगमस्रोत होते..
अजिंक्य : - म्हणजे पं राघव शास्त्रींना तुम्ही ओळखता..
अजिंक्यचं वाक्य तोडून गुरुजी म्हणाले, राघव माझा शिष्यबंधू, तसा तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता. आम्ही दोघांनी एकाच वेळी मोरोपंत गुरुजींकडून विद्या ग्रहण केली. त्यांनी आम्हाला खूप शिकवलं, चांगल्याप्रकारे घडवलं म्हणून आज ही आम्ही आमच्या विद्येमध्ये निपुण आहोत. बरेच दिवस झाले शास्त्री सोबत बोलणं ही नाही झालं आणि भेटही झाली नाही. मोरोपंत गुरुजींच्या शेवटच्या क्षणी सुद्धा मला त्यांची भेट घेता आली नाही. कारण त्यांच्या निधनाची वार्ता मला उशिरा कळाली. माऊली अजून पण तिथे काम करतो का ? आमचा चांगला मित्र होता तेव्हा तो..
गुरुजींच्या आठवणी अजिंक्य समोर नवीन आणि अगदी जवळच्या वाटू लागल्या... त्यांचं बोलणं झाल्यावर गुरुजी महत्त्वाच्या विषयावर वळले. तत्पुर्वी सुनीलने काल रात्री अपेक्षा सोबतचा घडलेला सगळा प्रकार गुरुजींना सांगितला. घाबरू नका, अपेक्षाला काही नाही होणार तिचा जीव अजिंक्य तुम्हीच वाचवू शकता पण सध्या ते जास्त महत्त्वाचं नाहीये त्यामुळे आधी सुरेखाला आपल्याला वाचवायचं आहे, गुरुजी बोलले.
प्रिया..! ती सामग्रीची थैली घेऊन ये, एका थैलीमध्ये प्रियाने सर्व सामग्री आणून दिली आणि सोबत एक कागद दिला त्यावर गुरुजींनी सगळी विधी लिहून ठेवली होती, त्याप्रमाणेच सगळं करायचं आणि फक्त सुनीलनेच ह्या विधी करायच्या, हे जाणीवपूर्वक सांगितलं.. अजिंक्य तुम्ही त्याला मदत करू शकता पण क्रिया सुनीलनेच करायच्या, गुरुजी म्हणाले. काही साहित्य एका पिशवीतून गुरुजींनी अजिंक्य आणि सुनीलकडे दिले आणि म्हणाले, हे तुमचं घरी जाईपर्यंत रक्षण करेन, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला कसलीही इजा होणार नाही पण जर तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकलात तर जीवाला मुकाल, कारण त्याला माहित आहे तुम्ही इथे माझ्याकडे कश्यासाठी आला आहात ते..? आणि तो तुम्हाला घरी जाईपर्यंत व्यत्यय आणणारच...!
गुरुजींचे बोल ऐकून सुनीलची छाती धडधडू लागली, अजिंक्यने त्याला धीर दिला. गुरुजींनी दिलेली सामग्री आणि स्वतःच्या बचावासाठी दिलेले साहित्य घेऊन ते दोघे गुरुजींच्या घराबाहेर पडले.. पहिलाच धक्का, वातावरणात बदल झाला, काळेभोर आभाळ, गडगडू लागलं. दोघांच्याही कानात कोणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला..आवाज वाढला, ये.. हरामखोरांनो.. फेका, तुमच्याकडे जे आहे ते.. फेका..लवकर.. चोहीकडुन त्या दोघांना तसाच कर्णकर्कश आवाज येऊ लागला. दोघे बधिर झाले.
त्यांनी एकमेकांना धीर देत गाडी पकडली. घरी लवकर पोहचता यावं म्हणून त्यांनी टॅक्सी केली.. आतापर्यंत सगळं सुरळीत होत. अचानकपणे टॅक्सी एका पुलावर येऊन उभी राहिली.. शहरातल्या गर्दीतून वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी टॅक्सी थांबली.. अजिंक्यने टॅक्सीवाल्याला विचारले, भाऊ..! तुम्ही गाडी इथे का थांबवली..? लवकर चला आम्हाला पटकन घरी पोहचायचे आहे..
टॅक्सी वाला किन्नरी आवाजात समोर बघूनच बोलला, साहेब ..! तुम्हाला लवकर जायचं आहे आणि मला तुम्हाला जाऊ द्यायचं नाहीये... मागे वळून खिखीखी करत तो हसू लागला.., त्याचा चेहरा सफेद पडला होता, डोळ्यात फक्त पांढरे बुबुळ होते. अगदी विचित्र पध्दतीने तो गुरगुरत होता.. दोघेही हे दृश्य पाहून चांगलेच घाबरले.. पुन्हा तो त्यांच्यावर गुरगुरला, मला माहित आहे तुम्ही कुठे चाललात, हाहाहाहाआ आणि मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुमच्याकडे जे आहे ते आताच्या आता बाहेर फेकून द्या.. नाहीतर ... खिखिखी करत तो हसू लागला.
अजिंक्यने सुनीलच्या हातून सामग्रीची पिशवी स्वतःजवळ घेतली. तसा त्या टॅक्सी वाल्याने अजिंक्यचा गळा आवळण्यासाठी त्याच्या गळ्याजवळ हात नेला. आणि तिथेच घोडचूक झाली. अजिंक्यला शास्त्री बुवांनी एक संदुक दिली होती हे सांगून की हे तुझ्या आजोबांनी मला तुला द्यायला सांगितलं आहे. वेळप्रसंगी ह्यामध्ये जे आहे ते तुझं रक्षण करेन.. त्या संदूक मध्ये आजोबांचं लॉकेट होत जे अजिंक्यने सुनीलच्या घरी येण्याआधीच परिधान केलं होतं. गळा दाबण्यासाठी आलेल्या टॅक्सी वाल्याच्या हाताला जोरदार झटका बसला आणि त्या सैतानाच्या विखाळ्यातून तो सुटला पण अजून तो पूर्णपणे भानावर आला नव्हता.. अजिंक्यने त्याला पाणी पाजलं आणि सांगितलं, जितक्या लवकर तुला गाडी चालवता येईल तितक्या लवकर आम्हाला घरी पोहचवा. अजिंक्यची आज्ञा जणू काही त्यांनी मानली आणि तो गाडी घेऊन सरळ सुनीलच्या घरापाशी येऊन थांबला. त्याला पैसे किती द्यायचे त्यासाठी त्याला विचारलं तर त्याला स्वतःला सुद्धा सांगता येत नव्हतं.. सुनीलने त्याला त्याचे पैसे दिले आणि अजिंक्य आणि सुनील दोघे गेटच्या आत आले मागे वळून त्यांनी टॅक्सी वाल्याला पाहिलं तर तो तिथून गायब झाला होता..
.
.
.
.
क्रमशः