वारसदार भाग @ १२
सकाळीच दरवाज्यावर थाप पडली, सुनीलच्या बाबांनी आळस देत दरवाजा उघडला. समोर जोशी गुरुजी उभे होते. त्यांना आत बोलावून मोहिते फ्रेश होऊन बाहेर आले. चहापाणी झाल्यानंतर गुरुजी सरळ मुद्द्यावरच बोलू लागले, काल स्मशानातील काम झालं का ? त्यावर सुनील आणि महादेवने गुरुजींना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
सुरेखा बाजूच्याच बेडवर झोपली होती. गुरुजींनी तिच्या कडे पाहिले आणि बोलू लागेल, नाही नाही.. हे असंभव आहे, मी सांगितलेली विधी, कधीच अयशस्वी होऊ शकत नाही, नक्कीच काहीतरी चुकलंय..? सुनील आणि महादेव कडे बघत पुन्हा गुरुजी त्यांना म्हणाले, पोरांनो..! खरं सांगा, अगदी खरं माझ्यापासून काहीच लपवू नका, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या विधी केल्या होत्या का ? अर्धवट विधी तर नाही केली ना, तुम्ही ...! त्यावर महादेव म्हणाला, खरंच गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं केलं, कुठे कसलीच चूक किंवा अर्धवट विधी करून आलो नाही... गुरुजी स्वतःशीच पुटपुटले, सगळं ठरल्याप्रमाणे झालं आहे तरी सुरेखा मध्ये थोडा पण बदल का झाला नसावा ? सुनील तु सगळ्या विधी तुझ्या हाताने जेव्हा केल्या तेव्हा तुला काय काय जाणवलं, एकदा थोडक्यात सांग मला...!
गुरुजी मी जेव्हा विधी करायला सुरुवात केली तेव्हा वातावरणात बदल होऊ लागला, अगदी अंगात थंडी भरून आली, माझं पूर्ण अंग शहारून गेलं होतं, शिवाय रक्त गोठवणारी अनामिक भीती वाटू लागली. पण मला माझ्या जीवाची काही पर्वा नव्हती, माझ्या डोळ्यासमोर फक्त दीदी दिसत होती म्हणून मला भीती वाटत असताना ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व विधी करायला घेतल्या त्यानंतर महादेवने माचिस घेऊन दिदीची साडी, केस आणि काळा दोरा ह्यांना अग्नी दिली.. बाकी जे तुम्हाला आम्ही सांगितलं तस घडलं आणि घरी येताना महादेवचा पाय मुडपला.
***
अजिंक्य बाळा..! अरे उठ सकाळ झाली, तयार हो तुला शहरात जायचं आहे, तासाभरात बस येईलच... चल लवकर उठ, तयारी कर, माऊली बाबांनी अजिंक्यच्या खोलीत येऊन आवरा आवर सुरू केली.. अजिंक्य घाईघाईनेच उठला, क्षणभरासाठी त्याच्या डोळ्यासमोर महादेवने सांगितलेला सुनीलच्या घरचा प्रसंग येऊन गेला..लगेचच उठून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला, इकडे माऊली बाबा किचनमध्ये अजिंक्य साठी चहा आणि नाश्ता बनवत होते. अजिंक्य फ्रेश होऊन आल्यावर नाश्त्यासाठी किचनमध्ये आला आणि ते दोघे सोबत चहा घेऊ लागले.
गावी आल्यापासून आज आपण दोघे पहिल्यांदा एकत्र सकाळचा नास्ता करतोय, माऊली बाबा बोलले. अरे हो खरंच की, माझ्या लक्षातच आलं नाही हे, अजिंक्य बोलला.
माऊली बाबा : - बरं अजिंक्य, तु शास्त्री बुवांना भेटलास का ?
शास्त्री बुवांबद्दल आलेल्या अचानक प्रश्नांमुळे अजिंक्यला थोडस आश्चर्य वाटले. हो माऊली बाबा..! भेटलोय मी त्यांना, का काय झालं ? काही काम होत का ? त्यांच्याकडे तुमचं...! अजिंक्य म्हणाला.. छे ..! नाही बुवा माझं काय काम असणार त्यांच्याकडे, शास्त्री बुवा, तुझ्या आजोबांचे गुणी शिष्य होते, म्हणून सहजच विचारलं, माऊली बोलले..
एव्हाना दोघांचा नास्ता झाला होता.. अजिंक्यची बॅग भरून तयार होती, सर्व सामान सोबत घेतलं होतं. तितक्यात शास्त्री बुवा वाड्यावर आले.. अरे शास्त्री बुवा..! अचानकपणे तुम्ही इथे, मी आज आता शहरात जाण्यासाठी निघालो होतो, तुमची भेट घेण्यासाठी तुमच्या घरी येणारच होतो, बर झालं तुम्हीचं आलात, अजिंक्य म्हणाला. मला कळलं पंत, तुम्ही आज जाणार आहात ते, म्हणून मुद्दामच तुम्हाला भेटायला आलो, शास्त्री बुवा म्हणाले.
माऊली बाबा आणि शास्त्री बुवा एकमेकांना खाणाखुणा करत होते. अजिंक्यने ते हेरलं.. काय चाललंय तुम्हा दोघांचं, खाणाखुणा कसल्या करताय ? अजिंक्य म्हणाला.
जास्त आढेवेढे न घेता शास्त्री बुवांनी डोळ्यांनी माऊली बाबांना खुनवलं, जस की ह्याला सांगून टाकूया.. त्याअर्थी माऊली बाबा बोलू लागले, अजिंक्य बाळ ..! खरंतर तुला ह्या गोष्टी पटणार नाही पण तरी आता वेळ आलीच आहे तर तुला सांगतो, तुझे आजोबा कुणी साधी सुदी आसामी नव्हते. तर ते एक युगपुरुष होते. लोक लांबून लांबून त्यांना भेटायला येत होते.
ह्या मानवी युगात जशी सकारात्मक शक्ती असते, तशीच नकारात्मक शक्ती सुद्धा असते आणि ती फक्त योगी पुरुषालाच जाणवते, जो ह्या विद्येचा अधीन असतो. जस की तुझे आजोबा, त्यांचे शिष्य, शास्त्री बुवा आणि ....! आणि... कोण ? अजिंक्य बोलला. आणि ... तु स्वतः हा .. अजिंक्य ..! तु स्वतः हा ...! शास्त्री बुवा बोलले, म्हणूनच तुला विचित्र स्वप्न पडत होते आणि ते काही सामान्य नव्हते. शिवाय, गावी आल्यावर तुला अस ही जाणवलं असेल की, हे गाव ओळखीचं आहे म्हणून, बरोबर ना ..!
अजिंक्य : - हो, शास्त्री बुवा अगदी बरोबर..!
शास्त्री : - कारण तुझ्या आजोबांचा अंश तुझ्याच आहे, त्यांनी पाहिलेल्या, घडलेल्या क्रिया ह्या काही अंशी तुला वारसा च्या स्वरूपात मिळाल्या आहेत , हे मी तुला आधी ही सांगितले होते. आज खरंतर मी तुला भेटायला फक्त ह्याच गोष्टी सांगायला आलो होतो, कारण तु आज शहरात जाणार, पुन्हा परत कधी गावी येशील, माहीत नाही..
पण बघ तुझ्या आजोबांनी ही सर्व क्रिया स्वतः त्यांच्या मरणोत्तर घडवून आणली. तुला इथे आपल्या गावच्या कुलदैवतेच्या जत्रेला बोलवून, कारण ही जत्रा तुला वाटते तेवढी साधी नाही. तीन दिवस चालणारी जत्रा, अन गावचे कुलदैवत ह्या तीन दिवसांत जागरूक असतात. त्यांचा आशिर्वाद, त्यांची शक्ती, त्यांची दिव्यदृष्टी ही तुझ्यावर पडावी, म्हणून तुला खास इथे तुझे आजोबा तुझ्याही नकळत घेऊन आलेत. तुला दिसत नसेल पण मला दिसतंय, तुझ्या अवतीभवती एक लख्ख अस सुरक्षा कवच तयार झालं आहे, काही चमत्कारिक गोष्टी ही तुझ्या हातून घडतील आणि हे सर्व जेव्हा घडेल, तेव्हा तुला नवल नको वाटायला म्हणून हे सर्व सांगण्यासाठी मी इथे आलो होतो.
हुश्शहहहहह .. एक मोठा सिसकारा टाकत अजिंक्य हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर बसला.. बाप रे ..! काय आहे हे सर्व.. त्याच डोकं अगदी सुन्न पडलं होतं... थोड्यावेळासाठी तो शांतपणे विचार करू लागला, ओके म्हणजे मला मध्येच डोक्यात जी कळ आली, विचित्र स्वप्न पडली, हे सगळं इथे आल्यापासून सुरू झालं म्हणजे हे सगळं त्याच चमत्कारिक गोष्टींचा एक भाग असेल, हो ना, शास्त्री बुवा, अजिंक्य म्हणाला.
बरोबर अजिंक्य..! ह्या चमत्कारिक गोष्टींची तुला प्रचिती आली आहे आणि वेळ आल्यावर हे कसं वापरायचं ते ही तुला आपोआपच कळेल, आणि हो, कधी तुमच्या ह्या शहरातल्या गर्दीमध्ये तुला माझी गरज भासली तर मला हक्काने हाक दे, मी नक्की येईल, तुला मदत केली म्हणजे मी माझ्या गुरूंना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल..अस बोलून शास्त्री बुवा निघून गेले. माऊली बाबा ही अजिंक्य ची बॅग घेऊन उभे होते...चार - पाच दिवस गावी असल्यामुळे माऊली बाबांना अजिंक्यचा लळा लागला होता. त्यांच्या डोळ्याचे काठ भरून आले होते, अजिंक्य वाड्याबाहेर पडत असताना माऊली बाबांना अजिंक्य च्या पाठीमागे आजोबांच्या सावलीचा भास झाला. त्यांनी तिथूनच त्यांना वंदन केलं... गावच्या वेशीवर बस आली आणि अजिंक्य बस मध्ये बसून निघून गेला, पुन्हा त्याच शहरी जीवनात स्वतःच्या आयुष्याला कामा मध्ये व्यस्त करण्यासाठी...
***
सुरेखा बेडवर अगदी शांतपणे झोपून होती, तिच्या पुढ्यात गुरुजी आणि महादेव तिला पाठमोरे करून खुर्चीवर बसले होते तर समोर सोफ्यावर सुनीलचे आई बाबा, आणि सुनील हे तिघे बसले होते... महादेव आणि सुनील ने स्मशानातील सगळी हकीकत गुरुजींना सांगितली होती.
अच्छा म्हणजे अस झालं तर, आता माझ्या ध्यानात आलं, तुमची चूक कुठे झाली ते ? आणि आपल्या विधीचा उपयोग का नाही झाला ते ? जोशी गुरुजी म्हणाले.. गुरुजींना कळलं होतं की त्यांनी सांगितलेली विधी त्या दोघांनी बरोबर पार पाडली असणार फक्त एक चूक त्यांनी केली जी त्यांच्या हातून नकळतपणे झाली म्हणून विधीचा काहीएक उपयोग झाला नाही.. गुरुजी खुर्चीत थोडे पुढे सरकून बोलू लागले, सोफ्यावर बसलेले मंडळी गुरुजींचं ऐकण्यासाठी थोडं पुढे सरकले अन अचानक सुनील व त्याचे आई - बाबांचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलले, तिघांचेही डोळे विस्पारले.
कारण त्या तिघांच्या समोर आणि गुरुजींच्या बरोबर मागे सुरेखा अतिशय क्रूर नजरेने गुरुजींकडे नजर रोखून बघत होती, हात एकदम सरळ, केस मोकळे, चेहरा पांढरा पडलेला, डोळ्यात फक्त सफेद बुबुळ, असुरी हास्य आणि जीभ होंठावर घासत सुरेखा उभी होती..तिच्या मागे खिडकी असल्याने खिडकीतुन पडलेला प्रकाश तिच्यावर पडला होता त्यामुळे तिची भयावह सावली आता गुरुजी आणि महादेव वर पडली.. क्षणाचाही विलंब न करता तिने गुरुजींवर झडप घातली. आणि तिने गुरुजींची मान जोरात पकडली आणि तिच्या मुखातून तो बोलू लागला, थेरड्या ..! आता सापडलास माझ्या तावडीत, आता तुला जिवंत सोडत नसतो मी ..! हिहीहीहीहीही पुन्हा ते किन्नरी हसू... महादेव, सुनील आणि बाबा तिघांनी सुरेखाला आवरण्याचा प्रयत्न केला पण त्यातून काहीच निशपन्न झालं नाही, उलट ती जास्त चवताळली आणि अजून जोरात गुरुजींची मान आवळू लागली. गुरुजींचा जीव गुदमरण्याच्या अवस्थेत आला होता, इकडे महादेव आणि सुनील गुरुजींची सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते, पण सुरेखा त्यांच्याकडुन साधं हलत ही नव्हती. गुरुजींनी शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक मंत्र म्हंटला...
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्...
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्...
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्...
तीन वेळा मंत्र म्हंटल्यानंतर गुरुजींची त्या सैतानी शक्तीपासून सुटका झाली.. गुरुजींनी मोकळा श्वास घेतला, मान चांगलीच लचकली होती, सुनीलच्या बाबांनी गुरुजींना उठवून सोफ्यावर बसवले.. हिहीहीहाहा... म्हाताऱ्या वाचलास, मी अजून पण सांगतोय इथून निघ, नाहीतर जीवाला मुकशील.. हेहेहेहेहेईहीई करत त्या सैतानाने सुरेखाच्या थोबाडात मारली, आता सुरेखा बोलू लागली, आई - बाबा, मला खूप त्रास होतोय, मला वाचवा, मला नाही सहन होत हे आता, आई ग ..! मला खूप त्रास होतोय ग ...
सुरेखाचं विव्हळण ऐकून सुरेखाची आई, सुनील, त्याची लहान बहीण अपेक्षा सगळेच रडू लागले. गुरुजींची अशी अवस्था झाल्याने मोहिते आता निराश आणि हतबल झाले होते.. सुरेखा तिच्या मूळ अवस्थेत आल्याने गुरुजींनी ताबडतोब स्वतःला सावरून त्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळ काढून सुरेखाच्या गळ्यात घातली. आणि एक सुटकेचा निःश्वास सोडला.
गुरुजी : - ही रुद्राक्ष माळ सुरेखाच्या आतील सैतानाला तिच्यावर जास्त त्याचा प्रभाव पडू देणार नाही त्याला शरीरात आतल्या आत दाबून ठेवेल, त्याला जास्त वर येऊ देणार नाही. त्यामुळे आपल्या कार्यात त्याचा अडथळा येणार नाही.
आज आणि उद्या हे दोन दिवस सोडून पर्वा अमावस्या आहे. आपल्याला पुन्हा त्या विधी कराव्या लागतील, कारण अग्नीची विधी ही महादेवाच्या हातून झाली जी सुनीलच्या हातून झाली पाहिजे होती. कारण, मोहिते परिवारातील व्यक्तींच्याच नावे ही विधी संपन्न होईल, असे मंत्र मी फुकले होते. शिवाय, त्याच सोबत आपल्याला अजून काही विधी कराव्या लागतील, त्यासाठी काही सामग्री लागतील, त्या माझ्या घरी आहेत, त्या मी घेऊन येईलच, तोपर्यंत तुम्ही सगळे सुरेखा वर लक्ष ठेवा.
चला मी निघतो, विधीसाठी लागणारे साहित्य मी एका पिशवीत जमा करून घेतो आणि दोन दिवसांनी येतो मग पुढची विधी करूया.. तोपर्यंत सांगितल्याप्रमाणे सुरेखावर लक्ष असू द्या...सर्वांनी होकारार्थी मान हलवली, शिवाय सुनीलच्या बाबांनी गुरुजींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथे कळलं की मानेवर असलेल्या शिरांवर जास्त ताण बसल्याने त्यांना पट्टा लावावा लागेल..
हॉस्पिटलमध्ये पूर्ण एक दिवस गेला, गुरुजींना घरी सोडून मोहिते घरी आले. महादेव ही फ्रेश होण्यासाठी घरी गेला..गुरुजी घरी गेल्यानंतर त्यांना मानेचा त्रास जास्तच जाणवू लागला. प्रिया पुन्हा त्यांना डॉ. सापळेंच्या क्लिनिक ला घेऊन गेली. एक्स रे वैगेरे काढले गेले, वयोमानाप्रमाणे शरीर तितक साथ देत नाही आणि त्यांना अर्धांगवायू चा झटका आला.. शरीराचा अर्धा भाग निकामी झाला. एक हात आणि पाय निकामी झाला, त्यात मानेवर पट्टा होताच.
मोहिते कुटुंबात चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं, महादेव ही तिथेच होता.. पुढे कस करायचं गुरुजींची तब्येत पण खालावत चालली होती, त्यात उद्या अमावास्या आहे. विधी पूर्ण करायची आहे आणि गुरुजी आजारी आहेत म्हणजे ते येणार नाहीत तर कस होईल. सगळेच निराश होते, जो तो आपल्या परीने विचार करत होता.. काय करावे सुचेना.. तोच दरवाज्याची बेल वाजली..
टिडिंग ... टिडिंग... कोण हवंय आपल्याला ? सुनीलची आई सेफ्टी दरवाज्यातूनच बोलली.. तसा बाहेरून आवाज आला. हे मोहित्यांच घर आहे ना .. म्हणजे सुनील मोहिते इथेच राहतो ना ..! सुनीलच्या आईने हो म्हणून कळवलं. अच्छा ..! मग, सुनील आहे का घरात ? त्याला सांगा त्याचा मित्र अजिंक्य आला आहे ..! हो तो अजिंक्य होता.. अजिंक्यच नाव ऐकताच महादेव आणि सुनील दोघेही दरवाज्याकडे धावले, आणि त्यांनी घाईघाईने दरवाजा उघडून अजिंक्य ला घराच्या बाहेरच कडाडून मिठी मारली... दोघेही अजिंक्यला पाहून खूप खुश झाले.. तीन मित्र जेव्हा एकत्र असतात तर त्यांना कोणी हरवू शकत नाही मग संकट कितीही मोठं असू द्या, अशीच काहीशी गत आज त्या तिघांच्या हावभावाहून दिसून येत होती.
अजिंक्य आत आला अन त्याच संपूर्ण शरीर शहारलं. त्याला घरात पाऊल टाकताच एका वेगळ्या आभासी दुनियेत आल्या सारखा जाणवलं. नकळतपणे त्याचा हात भिंतीवर स्पर्श करू लागला, हो त्याच भिंतीवर जिथे सुरेखाचं शरीर त्या सैतानी शक्तीने किती तरी वेळा फेकलं होत, आदळलं होत.. अजिंक्यच्या नजरेखालून सुरेखा सोबत घडलेल्या घटना अप्रत्यक्षपणे जाऊ लागल्या, त्याला क्षणार्धात सगळ्या गोष्टी जाणवू लागल्या. सुरेखाला आतापर्यंत किती त्रास सहन करावा लागला इत्यादी वैगरे सगळं काही तो समजू शकत होता...त्याची नजर आता सुरेखाला शोधत होती अन सुरेखा त्यावेळी अंघोळ करण्यासाठी गेली होती.. तरीही अजिंक्यची नजर काहीतरी शोधत होती.
अंघोळीसाठी आत गेलेली सुरेखा बाहेर येत नव्हती. खरंतर अजिंक्यने घरात पाऊल टाकताच क्षणी एक अदृश्य शक्ती मोहितेंच्या घरात शिरली गेली, ज्यामुळे घर प्रकाशमान झालं, कुठे काही दिवसांपूर्वी घर भकास आणि आकासलेलं वाटत होतं, आज अजिंक्यच्या येण्याने पुन्हा घरात प्रसन्न वातावरण निर्माण झालं. आणि हे सुरेखाच्या आत असलेल्या सैतानाला सुद्धा कळलं की कोणीतरी दिव्यपुरुषाने ह्या घरात प्रदार्पण केलं आहे आणि त्याच्या समवेत जाणं म्हणजे स्वतःचा अंत करून घेण्यासारखं आहे. म्हणून सुरेखा बाथरूम मध्येच थांबली. अजिंक्यने सुरेखाच्या मनातील ही गोष्ट हेरली होती म्हणून अजिंक्य सुरेखाची वाट बघत होता पण ती बाहेर येण्याचं नाव घेत नव्हती..
अजिंक्यला थोडस आठवलं थोड्यावेळापूर्वी जेव्हा तो घरात येत होता तेव्हा घराच्या एका बाजूला ज्या ठिकाणी बाथरूम आहे, तिथे त्याला नवविवाहित असलेल्या हिरव्या चुडीदार बांगड्यांमध्ये एका बाई चा हात जोरात मागे जाताना दिसला. आणि हे ह्याआधी सुद्धा कुठेतरी घडलेलं आहे, अस त्याला राहून राहून वाटत होतं. पण त्याला आठवत नव्हतं की हे सर्व त्याने कुठे पाहिलं आहे. शेवटी डोक्यावर थोडा ताण दिल्यावर त्याला आठवलंच की हे तेच स्वप्न आहे जे मला गावी असताना पडलं होतं, हे तेच स्वप्न आहे ज्यांनी मला अस्वस्थ केलं होतं