वारसदार भाग @ ८
महादेव, प्रिया आणि निशा आपापल्या घरी पोहचले, प्रियाने सरिताला कॉल करून सुनीलच्या घरी घडलेला सगळा प्रकार सांगितला, सरिता तर फोनवरच रडू लागली. अर्थात सुनीलवरच तीच प्रेम दिसून येत होतं आणि त्याची ती अवस्था प्रिया तिला सांगत होती. निशा बिचारी खूप भयभीत झाली होती, घरी येऊन सरळ देव्हाऱ्यात येऊन देवाचा नामस्मरण करायला बसली.
इकडे महादेव ह्या विचारात पडला की सुनीलला कशाप्रकारे मदत करायची आणि त्याचबरोबर तो अजिंक्यला वारंवार फोन ट्राय करत होता. कारण अजिंक्य त्याचा असा एकमेव मित्र होता, जो संकटात नेहमी शांत डोक्याने विचार करून त्यावर मात करायचा. आज महादेवला अजिंक्य ची कमतरता भासत होती, शिवाय त्याला हे ही माहीत नव्हते की तो येणार केव्हा आहे.
तिकडे सुनील च्या घरी रोज कोणी ना कोणी मांत्रिक येऊन सुरेखाला बघून जायचं पण एकाही मांत्रिकामध्ये त्याच्या शक्तीचा सामना करण्याचं बळ नव्हतं. सुरेखाच्या उपचारा साठी आलेले मांत्रिक तर त्या सैतानाच्या गुरगुरण्यानेच दारातूनच पळून जायचे, काही शिव्या खाऊन जायचे, काहींनी तर बेदम मार खाल्ला. मोहिते परिवाराचे सगळे प्रयत्न संपले. सगळे मार्ग त्यांना बंद वाटू लागले.
ट्रिंग ss ट्रिंग ssss .. मोहितेंच्या घरातला फोन वाजला.. पलीकडून ओळखीचा आवाज आला.
हा... बोला डॉ. सापळे...! मोहिते साहेब, मागे मी तुम्हाला एका गुरुजींची भेट घडवून देतो, अस म्हणालो होतो तर त्याच संदर्भात मी तुम्हाला कॉल केला आहे आणि आता कशी आहे सुरेखा..?
त्यावर निराशेने उत्तर देत सुनीलचे बाबा बोलले, काय सांगू डॉक्टर साहेब, दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला आहे. तुमच्या कडे ट्रीटमेंट तर सुरूच आहे त्याचसोबत बाहेरच्या गोष्टींही सुरू आहेत तरी कोणाला काही यश आलेले नाही. आम्ही खूप परेशान आहोत, तुम्ही त्या गुरुजींचा पत्ता द्या, मी स्वतः तिथे जाऊन त्यांची भेट घेतो. डॉ. सापळे त्यांना फोनवर गुरुजींचा पत्ता आणि फोन नंबर देतात आणि फोन ठेवतात.
***
बाबा ..! तुम्हाला सुनील बद्दल सांगायचं आहे आम्ही त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा त्याने जे काही सांगितल ते अतिशय भयंकर होत. प्रिया तिच्या बाबांना म्हणजेच गुरुजींना सांगत होती. गुरुजी दोन दिवस गावाबाहेर नातेवाईकांकडे कार्यक्रमाला गेले होते, ते आज घरी आले होते. प्रियाने त्यांना सुनीलच्या घरची सगळी हकीकत सांगितली. त्यावर सर्वात आधी त्यांनी प्रियाकडे तिच्या मित्रांची आणि सुनीलच्या घरच्यांची चौकशी केली. उत्तर सकारात्मक आल्यानंतर गुरुजी पुढे बोलू लागले. बेटा ..! सुनीलच्या घरी त्याच्या बहिणीसोबत जे झालं आहे, ते साधारण केव्हा पासून सुरू आहे. बाबा..! आज बरोबर एक महिना झाला आणि तिची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, बाळंतीण झाल्यापासून तिने तिच्या बाळाला एकदाही बघितलं नाही किंवा त्याला दूध पाजलं नाही, प्रिया अत्यंत गंभीरपणे गुरुजींना सांगत होती.
काय एक महिना ...! म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे, आधीच त्याने सांगितलं आहे की सातव्या दिवशी तो तिचा प्राण घेईल, आपल्याला काहीतरी करावं लागेल बेटा...! मला त्यांच्या घरी घेऊन चल उद्या, गुरुजी म्हणाले. शिवाय उद्या मला काही विधी करण्यासाठी सामग्री लागतील, त्या तु आता जाऊन बाजारातून घेऊन ये. प्रियाने होकारार्थी मान डोलवली आणि ती बाजारात जाण्यासाठी निघाली.
***
शास्त्री बुवा म्हणाले, अरे विचार जे काही विचारायचं असेल ते. त्यावर अजिंक्यने मोठा श्वास घेतला आणि सगळं बोलु लागला, शास्त्री बुवा, मी इथे आल्यापासून मला विचित्र स्वप्न पडत आहेत, आणि असे स्वप्न मला शहरात असताना कधीच नाही पडले.
जस की, बुवा म्हणाले. अजिंक्यने त्याचे दोन्ही स्वप्न शास्त्रींना सांगितले हे ऐकून शास्त्री बुवा हडबडून गेले आणि नकळतपणे त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, " वारसदार ".. हो वारसदार..!
अजिंक्य : - काय ...! वारसदार म्हणजे ..?
अजिंक्य बाळा ...! मी बोललो होतो ना तुझ्या आजोबांची कीर्ती अख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती, त्यांच्या सारखी विद्या ही त्यांचीच आणि त्यांच्या सारखी हिम्मत आजपर्यंत गावात कोणामध्ये नाही. अशी कोणतीच गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य नव्हती. तुझे आजोबा म्हणजे एकप्रकारे काळ्या वाईट शक्तींचा कर्दनकाळ होते, कर्दनकाळ ...! हे सांगत असताना शास्त्री बुवा खूप खुश झाले होते. पुढे ते बोलू लागले, त्यांच्यासारखा महंत दुसरा कोणी झाला नाही आणि कोणी होणार ही नाही....आता तुला असे स्वप्न इथे आल्यानंतरच का पडली किंवा अशी विचित्र स्वप्न का आली. तर तुझ्या आजोबांच्या अलौकिक विद्येचा वारसा हा तुझ्याही नकळतपणे तुला मिळाला आहे.
शेवटी सृष्टीच्या विधात्याने या महान विद्येचा वारसा सांभाळण्यासाठी मोरोपंत घराण्यातून तुझी म्हणजे अजिंक्य मोरोपंतची निवड केली. महान दिव्यदृष्टी असलेले पं. गंगाधर मोरोपंत ह्यांचा नातू अजिंक्य मोरोपंत, आता ह्या महान विद्येचा वारसदार म्हणून निवडला गेला आहे. हे विधात्या, तुझी लीला अपरंपार आहे, आज मी धन्य झालो...धन्य झालो...! अस म्हणत शास्त्री बुवा आतल्या खोलीमध्ये गेले.
" वारसदार " ..! कसला वारसा भेटला आहे मला, अजिंक्य स्वतःशीच पुटपुटला. कारण २१ व्या शतकातील पोर ते, त्याला काय माहित असणार... ज्योतिष शास्त्र, भानामती, करणी, वैगेरे. त्याला तर हे ही माहीत नव्हतं की शास्त्री बुवा कसल्या विद्येबद्दल बोलताय, आणि काय वारसा हक्क मध्ये त्याला त्याच्या आजोबांकडून भेटलंय.
अजिंक्य बाळा...! शास्त्री बुवा आतल्या खोलीतुन बाहेर आले, त्याच्यासोबत हातात लहानशी संदुक होती. अजिंक्य, तु थोड्यावेळापुर्वी मला विचारलं होतस ना, शहरात जाताना एकदा माझी भेट घेऊन जा अस मी तुला का बोललो ? त्याच उत्तर मी आता देतो. खरंतर पहिल्या दिवशी मी जेव्हा तुला गावात पाहिले, तेव्हाच मला जाणवलं की मोरोपंतांचा वारसा तुझ्या अंगी संचारला असेल कारण तुझ्या भोवती एक वेगळंच सरंक्षण चक्र तयार होत, जे सामान्य लोकांना दिसणार नाही ते फक्त मला दिसलं. अरे म्हणून तर मी तुला जत्रेमध्ये एवढ्या गर्दीत ओळखू शकलो. अजिंक्य फक्त शांतपणे ऐकत होता,
आता राहीला प्रश्न, तुला पडलेल्या स्वप्नांचं रहस्य आणि असे विचित्र स्वप्न तुला का पडले ? मुळात, तु मोरोपंत आहेस, त्यात आता तुला कळलंच असेल की तू साधारण मनुष्य नाहीस तर अलौकिक विद्या संपादन केलेल्या एका महान व्यक्तीचा नातू आहेस. त्यांचे अंश हे तुझ्या मध्ये आहेत, त्यांनी आत्मसात केलेली विद्येचा एकमेव वारसदार तु आहेस. त्यामुळे त्याच शक्तींमुळे तुझ्या स्वप्नात येणाऱ्या गोष्टी तुला कसली तरी चाहूल देत आहेत. त्या तुला मार्ग दाखवत आहेत किंवा अस ही असेल की तुला कोणीतरी मदतीसाठी बोलवत आहे.
मदतीसाठी...! मग मला ते नीट कळत का नाही आहे ? शास्त्री बुवा ..! अर्धवट आणि धूसर धूसर का दिसत आहे सगळं, मला तर काहीच कळत नाही, हे अस का घडत आहे, अजिंक्य थोडं निराश होऊन बोलला. कारण तुला तुझ्या शक्तींची जाणीव नाही झाली, अजून तुला हळू हळू सगळ्या गोष्टी कळत जातील.... थोडं विचार कर स्वप्नांबद्दल काय आठवतंय का ? शास्त्री बुवा म्हणाले. त्याआधी हे संदुक घे, तुझ्या आजोबांनी माझ्याकडे सुपूर्द केलं होतं की ज्या दिवशी माझा वारसदार तुला समजेल त्यादिवशी हे त्याला दे...! आता मोरोपंतांचा वारसदार तु आहेस, तर ही तुझी अमानत सांभाळून ठेव.
संदुक हातात घेतल्यावर अजिंक्यच्या आजूबाजूला लक्ख प्रकाश पडला, जणू काही त्याच्या रक्षणासाठी स्वर्गातून देव स्वतः धर्तीवर अवतरले आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज निर्माण झालं होतं, डोळ्यात विशिष्ट चमक आली होती. तथास्तु ...! बोलून शास्त्रीबुवा स्तब्ध झाले.
डोळे बंद करून, डोक्यावर थोडा ताण देऊन अजिंक्य स्वप्नांत घडलेल्या घटना आठवू लागला पण ह्यावेळेस मात्र त्याला सगळं व्यवस्थित दिसू लागलं, शास्त्री बुवा ...! मला थोडं कळतंय, कोणीतरी लहान मुलगा संकटात आहे, त्याला कोणीतरी खेचण्याचा प्रयत्न करत आहे, पण एक व्यक्ती त्याला घट्ट पकडून आहे, आणि तो व्यक्ती दुसरा, तिसरा कोणी नसून मीच आहे... बाप रे ...! हे कसं शक्य आहे, माझंच प्रतिबिंब मला दिसलं.
शाब्बास पोरा ...! दिव्यदृष्टी ही शक्ती फार अलौकिक आहे सर्वांना नाही भेटत, तु खूप भाग्यवान आहेस की ह्या शक्तीला धारण करण्यासाठी तु पात्र आहेस, शास्त्री बुवा बोलले.
.
.
.
.
क्रमशः