वारसदार भाग @ ७
केस मोकळे सोडलेले, चेहरा पांढरा पडलेला, डोळ्या खाली काळी वर्तुळे अश्या अवस्थेतील सुरेखाच ते भयावह रूप आणि त्यात तिची पडलेली पुरुषी काळी सावली पाहून सगळेच घाबरले. सुरेखाच्या तोंडून फक्त तो पुरूषी पहाडी आवाज निघत होता, निघा इथून, मुर्दा पडेल एकेकाचा, हहहहहहाहाहह.... आणि तुम्ही मोहिते...! खूप हौस आहे ना सांगायची... हे घ्या मग आता शिक्षा... अस म्हणत सुरेखाचं शरीर जमिनीवर जोरात आपटलं गेलं. त्या क्षणी सुरेखा भानावर आली आणि स्वतःच्या आवाजात कळवळू लागली, आई ग..! कंबरेला भयंकर आघात झाल्याने पोटावर ताण गेला आणि त्यात नुकतीच तीचं सिजर झालं असल्याने पोटावरील टाक्यांवर जोर गेला. तो त्रास तिला खूप असहनीय होता. ' आई बाबा, प्लिज मला वाचवा, मला खूप त्रास होतोय, मला खूप भीती वाटतेय, माझ्या अंगात तो आहे आणि तो सतत माझ्या कानापाशी कुजबुजूत असतो की, तो मला घेऊन जाईल, बाबा - सुनील, प्लिज रे वाचवा मला...'
स्वतःच्याच कानाखाली एक - दोन लगावून तो पुन्हा जोरात सुरेखावर गुरगुरला, चूप बस, अय लडकी...! हहीहीहहहहहहाहा.. तुझ्या घरचे तुला नाही वाचवू शकत, कळलं... आणि तुम्ही तिघे इथून निघा, नाहीतर..... अस म्हणत तो किन्नरी आवाज जोरात त्यांच्यावर खेचकला, निघा....ssss... आणि पुन्हा एकदा सुरेखा बेडवर पडली. पण त्याचा तो आवाज एवढा असुरी होता की त्यामुळे निशा अगदी बिथरून गेली, तिला काहीच सुचत नव्हतं, ती अगदी स्तब्ध झाली. महादेव ची नजर निशावर पडली, निशा... निशा, काय झालं. तु बरी आहेस ना..! इकडे सुनील आणि त्याचे आई बाबा, सुरेखा जवळ धावले. कारण आता सुरेखा शुद्धीत होती पण कंबरेवर पडल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. ती रडत होती. सुनील आणि त्याचे आई बाबा त्यांना सुरेखाचा त्रास बघवत नव्हता..
निशा, निशा, भानावर ये...! काय झालंय, महादेव म्हणाला. निशा भीतीने थरथर कापत महादेव ला बिलगली. प्रिया ने तिला सांभाळलतं तिला पाणी पाजले. तस प्रिया ही घाबरली होती पण तेवढी नाही, आतमध्ये छोटी बहीण अपेक्षा हुंदके देत देत रडत होती. प्रिया तिच्याकडे जाऊन तिला आधार देऊ लागली. थोडावेळापूर्वी चाललेला भयानक थरार आता शांत झाला होता. सुनील महादेव कडे आला, महादेव..! तुम्ही तिघे आता घरी जा, दुपार आहे तोवर ठीक आहे, पुन्हा संध्याकाळ झाल्यावर घरी जाताना तुम्हाला जर काही झाल तर, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे ऐकून महादेव त्याला बोलला, मित्रा..! आमची काळजी नको करुस, इतके दिवस तुझं हे दुःख तु मनात साठवून ठेवलंस, एका शब्दांनेही काही बोलला नाहीस, अर्थात त्यामागे हे अमानवी कृत्य होत, जे आम्हाला आज कळलं आहे. आता यापुढे ही लढाई आपण मिळुन लढायची. बस खूप सहन केलंस तु एकट्याने, मी आज शब्द देतो दोस्ता, जोपर्यंत सुरेखा दीदी पूर्णपणे ठीक नाही होत तोपर्यंत हा महादेव स्वस्थ बसणार नाही.
महादेवच्या शब्दाने सुनील ला काय बोलावे काहीच सुचेना, त्याच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, त्याने चटकन त्याला मिठी मारली. अन अलगद सुनील च्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्यांना अस बघून प्रिया आणि निशा ही त्यात सामील झाल्या. मैत्रीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे मित्र, आज सुनीलचे आई वडील जवळून पाहत होते, त्यांना सुनीलचा अभिमान वाटू लागला की त्याने मैत्री ही स्वार्थी नाही तर निस्वार्थ मित्रांसोबत केली आहे, त्याचे मित्र हे फक्त नावाला मित्र नसून जिवाभावाचे सोबती आहेत.
सर्वांनी एकमेकांचे अश्रू पुसत आता पुढे काय करायचं ह्यावर मार्ग शोधू लागले. तस सुनील ला आठवलं की अजिंक्य आला नव्हता, त्याने महादेव कडे अजिंक्य ची चौकशी केली. महादेवने अजिंक्य गावी जत्रेसाठी गेला असल्याचे सुनील ला सांगितले. खूप दिवस झाले रे त्याला भेटलो नाही, तुम्ही तरी दीदी च्या लग्नात आले होतात पण त्याला तर दीदी च लग्न झालं आहे, हे सुद्धा माहीत नाही. त्यावेळेस तो कामानिमित्त परदेशात होता, म्हणून त्याला जमलं नाही, सुनील म्हणाला.
बरं सुनील..! दीदीच वागणं केव्हापासून अस झालं आहे आणि दिवसभर ती अशीच असते का ? प्रिया म्हणाली. त्यावर सुनील ने उत्तर दिले, प्रिया..! आम्हाला कोणाला काही कळण्या आधीच हे सगळं झालं, कस झालं, कुठे घडलं काही माहीत नाही. जे आम्हाला आता पर्यंत दिसलं, जाणवलं ते सगळं तुमच्या समोर मांडून ठेवलं आहे. डॉक्टर केले पण त्यांच्याकडून ही केस सोल्व्ह होतं नव्हती, शेवटी त्यांनीच सांगितलं की बाहेरच वारं असेल तर एकदा बघून घ्या, सोबत आपण मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा सुरू ठेवूच. तेव्हा अण्णा नावाचे मांत्रिक आणले होते, तरी काही फरक पडला नाही. उलट त्यांनाच जीव गमवावा लागला.
हे तेच अण्णा आहेत का ? जे डॉ सापळेंच्या क्लिनिक मध्ये मृत्युमुखी पडले, महादेव बोलला. सुनील ने होकारार्थी मान डोलवली. निशा आतल्या बेडरूममध्ये अपेक्षा सोबत बसली होती. हॉल मध्ये सुनील चे बाबा, सुनील, महादेव, प्रिया आणि बेडवर सुरेखा शांतपणे पडून होती, ती सर्वांकडे टकमक पाहत होती, पण कोणाशी बोलण्यासाठी तीच्या अंगात जराही त्राण उरलं नव्हतं. कमजोर झाली होती. सुनील ची आई किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती.
महादेव, निशा आणि प्रियाने सुनील चा निरोप घेतला आणि लवकरच आम्ही पुन्हा येऊ अस म्हणत ते तिघे निघाले. शिवाय प्रियाने ही तिच्या बाबांना ही हकीकत सांगेल, अशी सुनील ला हमी दिली. सुनील तु घाबरू नकोस, आता तू एकटा नाहीस, आम्ही आहोत, महादेव म्हणाला. उद्या पुन्हा येऊ म्हणत ते तिघेही निघाले.
***
दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन अजिंक्य वाड्या बाहेर पडला, ते थेट पं. शास्त्री बुवांच्या घराजवळ येऊन थांबला.
शास्त्री बुवा... ठक ठक ठक ... हो शास्त्री बुवा...! आहात का घरात ? म्हणत अजिंक्य दार ठोठावु लागला. आतून आवाज आला, हो.. आलो आलो, म्हणत शास्त्री बुवांनी, चर्रचर चरर्रर्रर्रर्रर्र.... आवाज करत दरवाजा उघडला गेला. अहो..! पंत ... तुम्ही आम्हा गरिबांच्या घरी, या या... अस म्हणत शास्त्रीबुवांनी अजिंक्य ला आत बोलवले. चहा पाणी झाल्यानंतर अजिंक्य आणि शास्त्री बुवा बाहेर व्हरंड्यात बाजेवर बसले. शास्त्री बुवां अडकित्ता आणि सुपारी घेऊन बसले. सुपारीचे एक एक खांड फोडत ते अजिंक्य ला विचारू लागले, बोला...! पंत... काय विशेष.. कस वाटलं आपलं गाव आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या गावची जत्रा...
शास्त्री बुवा ..! आधी तर तुम्ही मला अहो.. जाहो म्हणून बोलून नका, एकतर मी वयाने तुमच्या पेक्षा लहान आहे, अगदी तुमच्या मुलाप्रमाणे, त्यामुळे तुम्ही मला नावानेच हाक मारा. वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दलचा हा आदर पाहून
शास्त्री बुवांना थोड्यावेळासाठी अजिंक्य मध्ये त्याचे आजोबा म्हणजे गंगाधर पंतच दिसले. कारण गंगाधर भटजी हे शास्त्री बुवांचे गुरुजी शिवाय त्यांचा मूळ स्वभाव ही शास्त्री बुवांना चांगलाच ठाऊक होता. अजिंक्यचा स्वभाव हा सरळ असल्याने त्याला इकडच्या तिकडच्या गोष्टीं उकरण्याची सवय नव्हती, त्याने सरळ मुद्द्याचा विषय बोलू लागला.
शास्त्री बुवा..! तस गाव चांगलंच आहे, खूप दिवसांनी मी स्वतःच्या गावी आल्याने मला ही फार आनंद झाला आहे. शिवाय गावची जत्रा मला फार आधीपासून पहायची होतीच, अगदी आजोबा हयात असल्यापासून पण कामानिमित्त ते कधी जुळून नाही आलं.
बरं ..! अजिंक्य तु सध्या शहरात असतोस तर तिथे काय करतो ? शास्त्री बुवांनी विचारलं. तसा मी इंजिनिअर आहे त्याचसोबत मला लिखाणाची ही आवड आहे, अजिंक्य बोलला. अरे वा..! उत्तमच की म्हणजे नोकरी सोबत तु तुझा आवडत छंद ही जोपासला आहेस म्हणा...शास्त्री बुवांनी सुपारीचं एक खांड फोडत अजिंक्य ला दिल.
अजिंक्य : - बुवा तुम्हाला एक विचारू का ?
शास्त्री : - अगदी निःसंकोचपणे विचार ..!
अजिंक्य : - म्हणजे तुम्ही त्या दिवशी अस बोलला होतात की शहरात जाताना एकदा मला भेटून जा... अस सहजच बोलला होतात की त्यामागे काही रहस्य आहे...!
अजिंक्यच्या अचानकपणे आलेल्या प्रश्नामुळे शास्त्री बुवा थोडावेळ शांत झाले.
शास्त्री : - अरे हो...! ते तर मी सहजच बोललो होतो, कारण तु माझ्या गुरुजींचा नातू, त्यात तु कधी गावी येत नाहीस शिवाय गावच्या जत्रेमध्ये तर तू कधी आला सुद्धा नाहीस म्हणून सहजच भेट बोललो त्यामुळे आपलं दोघांमध्ये थोडाफार संभाषण झालं असत म्हणून... का रे ..! तु अस अचानक मला विचारलंस, सगळं ठीक आहे ना ..!
मनातल्या मनात अजिंक्य बडबडु लागला, सांगू का ..! का माझ्या स्वप्नांबद्दल बुवांना ? नको नको..! ते काय विचार करतील माझ्या बद्दल, शहरात राहणारा मुलगा आणि अश्या गोष्टींवर विश्वास ठेवतो वैगरे...
काय रे ..! अजिंक्य कुठे हरवलास...? काय झालं, पाणी देऊ का ? बुवा म्हणाले. समोर पाण्याचा ग्लास होता, अजिंक्य ने गडबडीत पाणी घटघट पिऊन घेतलं आणि बुवांकडे त्याच्या मनातील खंत बोलून दाखवली.
शास्त्री बुवा ..! मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे.
*
*
*
*
क्रमशः