#वारसदार भाग १५
***
हॉलमध्ये सुरेखा आज कितीतरी दिवसांनी फ्रेश वाटत होती, पण शरीरावर आणि मनावर झालेल्या आघातामुळे ती अजूनही कमजोर होती.. तिच्या सोबत विश्वास बसला होता.. बाकीचे सगळे म्हणजे सुनीलचे बाबा, सुनील, अजिंक्य आणि महादेव हे सगळे तिथेच हॉलमध्ये बसून पुढे काय आणि कसं नियोजन करायचं त्यावर बोलत होते. तेवढ्यात चहा घेऊन सरिता किचनमधून बाहेर आली आणि सगळ्यांना चहा देऊ लागली. तर निशा सुनीलच्या घरातील पसारा आवरत होती. खरंतर प्रियाने काल रात्रीच निशा आणि सरीताला फोन करून विधी बद्दल सांगितलं होतं, अर्थात तस तिला गुरुजींनीचं करायला सांगितलं होतं. जेणेकरून दोघी सावध राहतील. निशा आणि सरिता सकाळीच सुनीलच्या घरी त्याला भेटायला आणि दिदीची विचारपूस करायला आल्या होत्या.
किचनमधून हात पदराला पुसत सुनीलची आई बाहेर आली, बस झालं पोरींनो..! आल्यापासून तुम्ही काम करत आहात. थोडावेळ विश्रांती घ्या.. काम काय होतचं राहतील. आणि तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, माझं बरचसं काम तुम्ही हलकं केलंत, त्यामुळे मला आराम भेटला.
सरिता : - अहो..! आई, आभार कसले, आम्ही सुनीलचे मित्रच आहोत आणि अश्या प्रसंगी मित्र नाही येणार तर कोण येणार...
सुनीलच्या आईला सरीताचं वागणं आणि बोलणं दोन्ही आवडलं.. तिने सरिताला जवळ घेतलं आणि तिच्याबद्दल विचारपूस करू लागली. निशा महादेवच्या बाजूला येऊन बसली. सगळेजण हॉलमध्ये बसून चर्चा करत होते..
ट्रिंग ट्रिंग .... सुनीलने फोन उचलला. पलीकडून ओळखीचा आवाज आला. हॅलो ..! प्रिया बोल कशी आहेस ? आणि गुरुजींची तब्येत आता ठीक आहे ना ?
प्रिया : - हो ..! मी ठीक आहे आणि बाबा पण बरे आहेत, हळू हळू ठीक होत आहेत. बरं मी ह्यासाठी फोन केला होता, की बाबा विचारत होते, कालचा विधी बरोबर संपन्न झाला ना ..! काही चूक किंवा काही व्यत्यय तर नाही आला ना ...
विधी एकदम बरोबर आणि अचूक झाला आहे, प्रिया..! शिवाय थोडाफार व्यत्यय आला पण तो आम्ही बाजूला केला आता तर दीदी ठीक पण झाली आहे, आमच्याशी व्यवस्थित बोलत आहे, सुनील आनंदाने तिला सगळं सांगत होता.
ओके, मस्तच म्हणजे त्या सैतानाचा खात्मा लवकरच होईल आता त्या विधीमुळे तो आणि त्याची असुरी शक्ती बऱ्यापैकी संपली असेल. आता आज रात्री शेवटचा विधी करून, कायमचा त्या सैतानाचा बंदोबस्त करून टाकूया, प्रिया म्हणाली..पाठीमागून गुरुजींचा आवाज आला, प्रिया मला दे फोन मला बोलायच आहे..
सुनील एक मिनीट थांब, बाबांना बोलायच आहे तुझ्याशी, प्रिया म्हणाली. तिथे अजिंक्य असेल तर त्याला दे फोन, मला अजिंक्य सोबत बोलायच आहे, पुन्हा गुरुजी बोलले.. प्रियाने तस सुनीलला सांगितलं. फोनवर अजिंक्य आला.. प्रिया फोन गुरुजींजवळ घेऊन गेली.
गुरुजी : अजिंक्य..! कालचा विधी झाला.. खूप चांगलं झालं. पोरीवरून सैतानाच्या असुरी सावलीचा प्रभाव कमी झाला असेल पण शेवटचा विधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही गाफील राहू नका.. आपण त्याला डिवचले आहे तो पुन्हा आपल्यावर नक्कीच वार करेल आणि ह्यावेळी जास्त वेगाने तो प्रहार असेल.
अजिंक्य : - म्हणजे गुरूजी..! त्याची शक्ती कमी झाली असणार ना , आता आपल्याला कसली भीती असणार.. फक्त शेवटचा विधी तुम्ही करून त्याला कायमच नष्ट करा.
गुरुजी : - अजिंक्य बाळा ...! एवढं सोपं नाहीये.., त्याला नष्ट करणं.. आणि त्याची शक्ती आपण फक्त कमी केली आहे..अजून आपण त्याला पुर्णतः नष्ट केलं नाही आणि विसरू नको तो सैतान आहे, तो काही ही करू शकतो.
गुरुजींच म्हणणं अजिंक्यला पटलं, मग गुरुजी आता आपण काय करायचं, अजिंक्य बोलला..
गुरुजी : - आपला शेवटचा विधी होईपर्यंत आपण सगळे सावध राहूया.. शिवाय, हा विधी त्या असुरी सैतानाला मुळापासून नष्ट करण्याचं सामर्थ्य ठेवतो त्यामुळे विधी खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करायला हवा.. आतापर्यंत त्या घरात नकारात्मक शक्तीचा वावर होता त्यामुळे ती जागा सुद्धा त्यांचीच झाली आहे. आणि म्हणून आपल्याला तिथे आपला विधी झाल्यानंतर सकारात्मक ऊर्जा बांधून ठेवावी लागणार, जेणेकरून जागा मुक्त होईल. त्यासाठी योगी पुरुषच हवा..
अजिंक्य : - अच्छा गुरुजी ...! म्हणूनच तुम्ही स्वतःहा हा विधी करणार आहात, अस आम्हाला सांगितलंत..
आता मात्र, गुरुजी थोडं निराशाने बोलू लागले, अजिंक्य माझी तब्येत मला साथ देत नाही, त्यात मला पॅरॅलीसीसीचा झटका आल्याने मला पलंगावरून उठता ही येत नाही. शिवाय हा विधी मोहितेंच्या घरीच करायचा आहे.. विधीसाठी लागणारी शारीरिक शक्ती आता माझ्या वयोमानानुसार मला मानवणार ही नाही.
अजिंक्य थोडं बिथरून, गुरुजी काय बोलताय तुम्ही, अहो तुमच्या विना ही विधी कोण करणार.. आणि इथपर्यंत आलेला हा प्रवास कसा संपवणार.. ? तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा गुरुजी.. कारण आता माझी मती पण भ्रष्ट झाली, अजिंक्य बावरला.
गुरुजी काही बोलणार तितक्यात त्यांना पॅरॅलीसीसीचा पुन्हा एक झटका आला आणि त्यांच्या हातून फोन पडला, प्रिया जोरात ओरडली, बाबा...!
इथून गुरुजी.. गुरुजी करत अजिंक्य फोनवर ओरडत होता. प्रियाने फोन उचलून गुरुजींना झटका आला आहे म्हणून अजिंक्यला सांगितलं. फोन कट झाला. सगळ्यांच्या नजरा अजिंक्यवर होत्या, त्याच्या बाजूला सगळेजण उभे होते. काय झालं ? अजिंक्य, महादेव म्हणाला.. गुरुजींना पॅरॅलीसीसीचा झटका आला आहे, आपल्याला त्यांना बघायला जावं लागेल, अजिंक्य म्हणाला.
इथे सुरेखाची परिस्थिती अजून निवळली नव्हती आणि आता गुरुजींना अस झालं. काय करावे काहीच कळेना. महादेव पायाने त्रस्त होता तरी तो बोलला, आपण जाऊया.. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घडून अजिंक्य स्वतःला सावरून म्हणाला, नाही कोणीच नका येऊ, फक्त मी जातो आणि येतो.. तुम्ही सगळेजण सुरेखा दीदी जवळ थांबा.. तिला सध्या आपली जास्त गरज आहे.. अजिंक्य निघण्याच्या तयारीत होताच की निशा म्हणाली, अजिंक्य थांब..! मी येते तुझ्यासोबत तिथे प्रिया एकटीच असेल तिच्यासोबत कोणीतरी हवंय ना ..! अजिंक्यला ते पटलं त्याने संमती दिली. महादेवचा निरोप घेऊन निशा अजिंक्यसोबत निघाली. अजिंक्यने निघता निघता महादेव आणि सुनील ला गुरुजींसोबत झालेलं सर्व बोलणं सांगितलं आणि तो निघाला. ते ऐकून तर सर्वानाच झटका बसला. सर्वांसमोर आता हा प्रश्न उद्धभवला की, गुरुजींविना विधी संपन्न कोण करणार...?
डॉ. सापळेंनी गुरुजींना क्लिनिकमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. प्रिया एकटीच बाहेर बसून रडत होती. निशा आणि अजिंक्यने तिथे येऊन परिस्थिती जाणून घेतली.. निशाने प्रियाला सांभाळल, अजिंक्य डॉक्टरांना भेटायला गेला. तो परत आला.. हॉस्पिटलच्या एका बेंचवर अजिंक्य निशा आणि प्रिया तिघे बसले होते..
प्रिया..! घाबरण्याचे काही कारण नाही, गुरुजी ठीक आहेत, मी आताच डॉक्टरांना भेटून आलोय. गुरुजींना आधीच एक झटका आला होता अन त्यात त्यांचं वय त्यामुळे हा फक्त साधा झटका आहे म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नाही, दोन दिवसात डिस्चार्ज मिळेल, थोडयावेळाने डॉक्टर त्यांना नॉर्मल वॉर्ड मध्ये घेऊन येतील, तेव्हा आपण त्यांना भेटू शकतो, अजिंक्य म्हणाला. अजिंक्यच ऐकून प्रियाला थोडा धीर आला, ती शांत झाली.
अजिंक्यने सांगितल्यापासून सुरेखाच्या घरात चिंतेच वातावरण निर्माण झालं. पुढे काय आणि कसं करायचं ? हा प्रश्न सर्वांच्या मनात उद्धभवला. गुरुजींबद्दल माहित पडल्यापासून विश्वास ला सुरेखाची काळजी वाटू लागली. अर्धवट राहिलेला विधी पूर्ण कोण करणार ? ह्याचीच चिंता त्याला लागली.
इकडे अजिंक्य हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये हात मागे बांधून इकडून तिकडे फिरत होता. डोक्यात फक्त एकच विचार की गुरुजी विना ही विधी कोण करणार आणि पुढे कस होईल ? त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. प्रियाला निशाने सावरले होते.
गुरुजींना आता जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं. डॉक्टरांच्या परवानगीने आता ते तिघे गुरुजींना भेटायला गेले. गुरुजींची अवस्था खूपच नाजूक झाली होती. ते काही बोलण्याच्या स्थिती मध्ये नव्हते, त्यांना फक्त आरामाची गरज होती. अजिंक्य बाहेर जाऊन डॉ. सापळेंना भेटला, गुरुजींच्या तब्येतीबद्दल चौकशी केली.
डॉ. सापळे : - अरे हो अजिंक्य..! काळजी करू नको .. गुरुजी ठीक आहेत. वय झालंय त्यांचं, ह्या वयात शरीर साथ देत नाही. पण त्यांची पुण्याई कामी आली म्हणून ते आज सुखरूप आहेत.. येत्या तीन चार दिवसात आपण काही टेस्ट करून आणि त्यानंतर गुरुजींना आपण डिस्चार्ज देऊ.
अजिंक्यने डॉक्टरांसोबतच बोलणं प्रिया आणि निशा ला सांगितलं. प्रियाला बाजूला घेऊन त्याने तिला समजावून सांगितलं. प्रियाला आधार दिला.
अजिंक्य ..! तु सुनीलच्या घरी जा, तिथे तुझी जास्त गरज आहे. प्रियाजवळ मी थांबते, निशा म्हणाली. खरंतर अजिंक्य शरीराने हॉस्पिटलमध्ये होता पण मनाने अजूनही तो सुरेखा दीदी बद्दलचं विचार करत होता त्याच्या मनात चिंतेने काहूर माजलं होतं. अजिंक्यने प्रिया आणि निशा दोघांचा निरोप घेतला आणि तो निघणार तितक्यात निशाला काहीतरी आठवलं, एक मिनिटं अजिंक्य..! तु सुनीलच्या घरी जातोय तर हे घे, हे कदाचित सुनील किंवा त्याच्या बाबांचं आहे, अस म्हणत तिने तिच्या पर्स मधून लॉकेट बाहेर काढलं. गडबडीत अजिंक्यने स्वतःच्या गळ्याभोवती हात फिरवला, अरे हे लॉकेट तुझ्याकडे कसं आलं, हे तर माझं आहे.
निशा : - अरे मी सकाळी सुनीलच्या घरातील पसारा आवरत होते तेव्हा मला पलंगाखाली भेटल. मला वाटलं सुनीलच्या घरातल्यांपैकी कोणाचं असेल म्हणून मी नीट ठेवलं त्यानंतर लगेच गुरुजींबद्दल आपल्याला हे कळलं, त्यामुळे त्या घाईत द्यायलाच भेटलं नाही. आता सहज लक्षात आलं माझ्या म्हणून तुला दिलं.
ओके..! म्हणजे ते लॉकेट सुनील आणि मी स्मशानात जाण्याआधीच माझ्या गळ्यातून सुनीलच्या घरात पडलं असेल, त्यामुळे त्या रात्री मला त्या बाहुलीचा झटका लागला. म्हणजे लॉकेट नसेल तर माझ्यातील अदृश्य शक्ती माझ्यापासून दूर राहील, अजिंक्य स्वतःशीच पुटपुटला. त्याने ते लॉकेट घेतलं आणि गळ्यात घातलं त्याचक्षणी त्याच्या आजूबाजूला पिवळसर वलय निर्माण झाली. त्याला अचानक सुचलं, मी निघतो निशा..! मला एक कॉल करायचा आहे..अस म्हणतं अजिंक्य निघाला.
***
दुपारी १ वाजता ची ट्रेन होती आणि त्या गृहस्थाच्या गावाहून स्टेशन दोन तासांच्या अंतरावर होतं. त्या व्यक्तीला जेव्हा ती बातमी कळली तेव्हा त्याने तातडीने सामान भरलं आणि तो निघण्याची तयारी करू लागला. दुपारचे बारा वाजले होते, ऊन चांगलंच तपलं होत. एव्हाना सूर्य डोक्यावर आला होता. आता बारा वाजलेत आणि ट्रेन एक वाजता आहे. गाव ते स्टेशन मधील अंतर दोन तासाच आहे. तरीही मनात कसलीही शंका, कुशंका न आणता तो गृहस्थ घाईघाईने निघाला. ही ट्रेन जर सुटली तर संध्याकाळपर्यंत ट्रेन नव्हती. जरी ट्रेन नाही भेटली तरी बस ने जाऊ हाच विचार त्या गृहस्थाच्या मनात चालला होता. म्हणून लगबगीने त्याने त्याचं सामान बांधलं आणि गावच्या वेशीवर येऊन रिक्षाची वाट पाहत थांबला. तिथे पोहचल्यावर त्याला कळलं की आज तालुक्याला रिक्षाचा संप आहे. त्यामुळे रिक्षा मिळणं कठीण होतं.
हे देवा..! तूच मार्ग दाखव, गृहस्थ म्हणाला. आणि त्याला समोरून एक ट्रक वाला दिसला जो त्याला स्टेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार ही झाला. देवाचीच कृपा समजायची, अस मनोमनी तो उद्धगारला. आतापर्यंत बरंच अंतर त्यांनी पार केलं होत आणि अधून मधून त्यांना बरयाच वेळा कुठपर्यंत पोहचलात हे विचारण्यासाठी फोन येत होते. त्या ट्रक वाल्याने त्या गृहस्थाला दुपारी दोन वाजता स्टेशन वर पोहचवले. घाईघाईने तो गृहस्थ स्टेशनवर गेला पण वेळ निघून गेली होती. ट्रेन एक वाजता होती आणि आता तर दुपारचे दोन वाजले होते. दुसऱ्या ट्रेनची चौकशी करण्यासाठी ते तिकीट काऊंटरवर जात होते नी तितक्यातच एक सूचना आली,
" प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येणारी 12021 पंचवटी एक्सप्रेस ही आज उशिराने धावत आहे, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोई साठी आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत."
सूचना ऐकून त्या गृहस्थाने देवाचे आभार मानले. एक वाजता येणारी ट्रेन ही संध्याकाळी सात वाजता नियोजित ठिकाणी पोहचणार होती पण आता ट्रेनच उशिरा आल्यामुळे पोहचण्यात ही वेळ होईल. त्यामुळे त्याने खिश्यातुन मोबाईल काढून पुन्हा त्याच व्यक्तीला फोन करून सांगितलं. पण निसर्गाचा चमत्कार म्हणावा आज ट्रेन उशिराने धावत होती अन ती वेळेतच नियोजित ठिकाणी बरोबर सात वाजता स्टेशनला पोहचली..
***
घरी येऊन अजिंक्यने हॉस्पिटलमधील गुरुजींच्या प्रकृती बद्दल सगळी माहिती सुनीलच्या कुटुंबीयांना सांगितली. सगळे जण गुरुजींची काळजी करत होते. सुरेखा स्वतःलाच दोष देत होती, हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. विश्वासने तिला समजावलं. महादेव आणि सुनील दोघे अजिंक्य जवळ गेले आणि बोलू लागेल, आता काय करायच, कोण करेल आजचा विधी ? तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली..
अजिंक्य आहे का ? सुनीलने दरवाजा उघडला व त्याने होकारार्थी मान हलवली. हो अजिंक्य आहे, पण आपण कोण ? ,सुनील म्हणाला. तसा पलीकडून त्या व्यक्तीचा आवाज आला, मी पंडीत राघव शास्त्री ...अजिंक्य आणि माझं एकच गाव आहे, त्यानेच मला सकाळी फोन करून तातडीने बोलवलं आहे... शास्त्री बुवांच नाव ऐकताच अजिंक्य दरवाज्याजवळ आला त्याने शास्त्री बुवांना घरात घेतले. चहा नास्ता झाल्यावर अजिंक्य म्हणाला, शास्त्री बुवा इथे येताना काही त्रास तर नाही झाला ना ? प्रवास चांगला झाला ना ?
शास्त्री बुवा एक स्मित हास्य देत म्हणाले, त्रास तर नाही पण व्यत्यय भरपूर आले, चांगल्या कामाच्या आड, हे नेहमी होतच असतं म्हणा..! आणि ह्याची मला सवय झाली आहे.
काळजीपोटी अजिंक्य म्हणाला, शास्त्री बुवा..! व्यत्यय म्हणजे आणि तुम्ही खरंच ठीक आहात ना ..!
शास्त्री : - हो पंत ..! मी खरंच ठीक आहे . आणि व्यत्यय म्हणजे सकाळी तुम्ही फोन केला की लवकरात लवकर पंचवटी ला पोहचा, मला तुमची मदत हवी आहे म्हणून मी निघालो.. पण गावच्या वेशीवर आलो तर रिक्षाचा संप त्यामुळे रिक्षा नाहीत. पण जसे व्यत्यय आले तसे चमत्कार ही झाले बरं...,
म्हणजे नक्की काय झालं, अजिंक्य म्हणाला. त्यावर शास्त्री बोलले, ट्रेन उशिरा आली पण इथे मला वेळेवर पोहचवल. दुसरं म्हणजे रिक्षाचा संप होता पण त्याच वेळेस एका ट्रक वाल्याने मला स्टेशनला पोहचवलं.
बरं ज्या साठी मला इथे बोलवलं आहे त्याबद्दल आपण बोलूया का ? शास्त्री बोलले. तस अजिंक्यने शास्त्री बुवांची सर्वांसोबत ओळख करून दिली. आणि सगळ्यांना हे ही सांगितलं की शास्त्री बुवा हे आपल्या जोशी गुरुजींचे शिष्यबंधू आहेत. शास्त्री बुवांना अजिंक्यने गुरुजींबद्दल सुद्धा सगळं सांगितलं. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
शास्त्री बुवा..! शेवटचा विधी करायचा आहे, ते ही ह्याच घरात, ते ही आज रात्री...सुनीलचे बाबा बोलले.
काळजी करू नका मोहिते साहेब, ह्या जगात नेहमी सत्याचाच विजय होतो. चला आपण बोलण्यात वेळ न दडवता मला फक्त एका ताब्यामध्ये पाणी भरून द्या. मी माझ्या दिव्यदृष्टीच्या साहाय्याने पोरीच्या मागे काय पिढा लागली आहे ते बघतो.
शास्त्री बुवांनी सुरेखा कडे पाहिलं, अगदी तीक्ष्ण नजरेने पाहिलं. सुरेखाच्या चेहऱ्याच्या आतमध्ये त्यांना खूप भयानक असा असुरी चेहरा दिसला. शास्त्री बुवांनी ध्यान लावण्यासाठी डोळे मिटले. खरतर शास्त्री बुवांना गंगाधर मोरोपंत म्हणजे अजिंक्यच्या आजोबांचा सहवास जास्त लाभला होता त्यामुळे त्यांनी गंगाधर पंतांच्या तालमीत चांगलीच विद्या ग्रहण केली होती. एका नजरेत लोकांचा भूतकाळ त्यांच्या समोर उभा राहायचा, एवढी अफाट शक्ती त्यांनी मिळवली होती.
डोळे मिटल्यानंतर क्षणातच त्यांना सुरेखाचा संपूर्ण भूतकाळ त्यांच्या दिव्यशक्तीच्या साहाय्याने दिसू लागला. डोळे बंद करूनच ते बोलू लागले, सुरेखा... अगं ये सुरेखा... कोणीतरी आवाज देतंय.. तिचा नवरा विश्वास दिसतोय मला...तिची सासू दिसतेय नंदिनीबाई.... सासरेबुवा एका अपघातामुळे सोडून गेले... एकुलता एक मुलगा विश्वास, त्याची बायको सुरेखा आणि सासू नंदिनीबाईं एवढा परिवार... लग्नानंतर सगळं ठीक होत... पण बाळाची चाहूल लागली, तेव्हापासून घराला नजर लागली...मला अजून कोणीतरी अंधुक अंधुक दिसतंय... नीटस दिसत नाही पण तो व्यक्ती तुमच्या सर्वांसमोर घराभोवती काहीतरी करतोय... हा सगळा त्रास डोहाळे जेवणाच्या दिवसापासून सुरू झालाय.... त्या सैतानाने त्याच अस्तित्व त्याच दिवशी दाखवलं पण तुम्ही सगळे खूप खूश होता म्हणून तुमच्या कडून दुर्लक्ष झाले... आठवा ... शास्त्री बुवांचे डोळे अजूनही मिटलेले होते, डोहाळे जेवनात फोटो काढले ना.. अलबम बघा एकदा..त्यानंतर बाळ पोटात होत म्हणून सगळं शांत होत...बाळ झाल्यानंतर पाचवी पण पुजू दिली नाही.. बरोबर ना.... आणि हो अत्यंत महत्त्वाचे सुरेखाच्या आत जे आहे ते स्वतःहून नाही आलं त्याला मुद्दाम इथे पाठवलं आहे, फक्त नी फक्त तिच्या बाळाला मारायला ... पण घरातले देव रक्षणकर्ते.. त्यांनी वाचवलं होत गरोदरपणात... हे त्या व्यक्तीला कळलं ज्याने त्या सैतानाला पाठवलं आहे...म्हणून त्याने तुमच्या गावच्या सगळ्या देवांना काळ्या कपड्यात बांधून ठेवलं... त्यांनतरच तो सुरेखावर हावी झाला... पण तोपर्यंत बाळ जन्माला आलं होतं... बाळ वाचलं..
इकडे सुरेखाचे डोळे सैरभैर पाहू लागले...तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला, सफेद पांढरा पडला, डोळे लालबुंद होऊ लागले.. शास्त्री पुढे बोलू लागले, तो अंधुक दिसणारा चेहरा थोडा थोडा स्पष्ट होऊ लागला... तो हसत होता, मोठ्यामोठ्याने... आणखीन मोठ्या मोठ्याने.... हा तो दिसतोय मला...पण लाचार दिसतोय.. केलेल्या कृत्याची माफी मागताना दिसतोय... आणि ज्याने हे कृत्य केलं तो आहे...
अन तितक्यात सुरेखा ओरडली.... ये... भटा.... हिहीहीहीहीही मी आलोय... शास्त्री बुवांनी डोळे उघडले. सुरेखा मान खाली टाकून बसली होती.. तिचे केस हवेत उडत होते. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर येऊन पडल्या होत्या. शास्त्री बुवा अगदी शांत स्मित हास्य करत सुरेखाच्या पुढ्यात बसले होते. त्यांनी पाण्याने भरलेल्या तांब्यातुन थोडस पाणी हातावर घेतलं आणि काहीतरी मंत्र पुटपुटत तिच्यावर ते पाणी शिंपडल, बोल कोण आहेस तू..? का झपाटून ठेवलं आहेस पोरीला ? पाण्याच्या स्पर्शाने सुरेखा किंकाळली, ये भटा..! माझ्या मध्ये येऊ नकोस.. तो म्हातारा गुरुजी त्याची काय अवस्था केली मी, माहीत नाही वाटत तुला, माझ्या शक्तीला कसलीही सीमा नाही, कळलं कोणालाही सहज मारून टाकु शकतो मी...! खिखिखिहिह्हीही..करत सुरेखाच्या मुखातून अक्षरशः लाव्हा उसळाव्यात तसा तो सैतान बोलत होता.
आज शेवटची अमावस्येची रात्र आहे, आज मी हिला घेऊन जाणार सोबत तिच्या लहान बहिणीला पण घेऊन जाणार.. हाहाहहहह करत सुरेखा विचित्र हसू लागली. घरातले सगळेच घाबरले होते.. विश्वासला आपल्या बायकोच अस रूप बघून त्या सैतानाचा राग आला तो तिच्याकडे रागात धावून आला. शास्त्री बुवा काही बोलणार तितक्यातच त्या सैतानाने विश्वासला एका हाताने उचलून हवेत खाली जमिनीवर फेकले.. त्यामुळे विश्वासाची पाठ चांगलीच सुजली. शास्त्री बुवांनी तिच्यावर पुन्हा ते पाणी शिंपडले आणि ह्यावेळेस त्यांनी एका पुडीतून राख काढून तिच्या अंगावर फेकली.. सुरेखा ओरडली.. हे भटा..! काय केलंस हे.. राखेमुळे सुरेखाच्या आतील दानवाला जोरदार झटका बसला आणि सुरेखा भानावर आली.. विश्वासला ह्या अवस्थेत बघून सुरेखा हळहळली..
शास्त्री बुवांनी थोडाही विलंब न करता त्यांनी सोबत आणलेला द्रव रूपातील काढा सुरेखाला पाजला.
.
.
.
.
.
क्रमशः