वारसदार भाग १४
घाईघाईने, धावत पळत अजिंक्य आणि सुनील घराजवळ पोहचले.. आता थोड्यावेळापूर्वी त्यांच्यासोबत जे काही अनैसर्गिक कृत्य घडले होते, त्याचे ते एकमेव साक्षीदार होते, स्वतःचा जीव वाचवून कसेबसे ते घरी सुखरूप पोहचले होते. त्यांनी दरवाज्यावर थाप मारली, आतून सुनीलच्या आईने दरवाजा उघडला.. त्या दोघांना घामाघूम पाहून त्यांनी काळजीने त्या दोघांना तिथेच विचारलं, काय रे .. तुम्ही एवढे घामाघूम कसे ? काही विचित्र अनुभव आला का ? आत या पटकन..! त्यांनी त्या दोघांना आतमध्ये घेतलं.. घरामध्ये सुरेखा डोळे मिटून पडून होती, महादेव आणि सुनीलचे बाबा तिच्या शेजारीच बसले होते.
अजिंक्य आणि महादेवने घरात पाऊल टाकताच सुरेखाने डोळे उघडले आणि त्यांच्यावर पुरुषी आवाजात ओरडली, ये. हरामखोरांनो बाहेर निघा इथून, घरात यायचं नाही तुम्ही, तुम्ही जे सोबत आणलं आहे ते आधी बाहेर फेका... एकप्रकारे तो त्यांना धमकीच देत होता पण त्याच्या धमकीपेक्षा त्याची भीती अजिंक्यला जास्त दिसून आली. अजिंक्यने खिशातून पिशवी बाहेर काढली आणि तो सुरेखाकडे चालत जाऊ लागला.. तो सैतान चवताळून सिसकऱ्या देत बोलू लागला, ये जवळ नको येऊस, जवळ नको येऊस माझ्या...! पण अजिंक्य अजिबात काही ऐकत नव्हता आणि सुरेखा जवळ जाऊन त्याने पिशवीतील अंगारा काढून तिच्या माथ्यावर लावला.. अन ती शांत झाली, सुरेखा पूर्वस्थितीत आली, आई बाबा..! अपेक्षा कशी आहे, बरी आहे का ? रडत रडत ती बोलत होती. शरीरात जास्त त्राण नसल्याने ती अशक्त होती..
गुरुजींच्या घरी घडलेला सगळं प्रकार सुनीलने सगळ्यांना सांगितला, सुरेखा पण शांतपणे ऐकत होती. सध्या ती नॉर्मल झाली होती. तिची आई तिला जेवण भरवत होती. सुनीलचे बोलून झाल्यावर महादेव बोलला, म्हणजे आजची रात्र खूप महत्त्वाची आहे, आजच्या विधी मध्ये कसलीच चूक होता कामा नये.
अजिंक्य : - हो बरोबर, शिवाय ह्या विधीमुळे दिदीवर असलेला सैतानाचा प्रभाव भरपूर प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळेच आपल्याला जास्त सावध राहावं लागेल.
सुनीलचे बाबा : - ह्यावेळेस मी पण येणार तुमच्यासोबत स्मशानात ..!
सुनील : - नाही बाबा ..! तुमची जास्त गरज घरी आहे..शिवाय तुमच्यासोबत महादेव पण असेल. ह्यावेळेस मी आणि अजिंक्य जाऊ स्मशानात... अजिंक्य ..! येशील ना सोबत..?
सुनील ..! विचारतोस काय ? तु विचारलं जरी नसतंस ना, तरी पण मी आलोच असतो. ठरलं तर मग, आज रात्री सुनील आणि मी स्मशानात जाऊ आणि महादेव तु इथेच थांब, काकांसोबत...अजिंक्य म्हणाला. महादेवने होकारार्थी मान डोलवली.
***
क्वा क्वा ... करत सुरेखाचं बाळ रडत होत, उगी उगी ...! बाळाला सांभाळत सुरेखाची सासू म्हणजे नंदिनीबाई सरपोतदार वाड्याबाहेर अंगणात आल्या.. आज महिना होऊन गेला पण सुरेखा आणि बाळाची एकदाही भेट झाली नाही. शिवाय बाळाला सुरेखाजवळ घेऊन जाणं ही शक्य नव्हतं, अस अण्णा मांत्रिक ह्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे बाळाची सगळी जबाबदारी सुरेखाच्या सासूबाई म्हणजे बाळाची आजी पार पाडत होती. नंदिनीबाईचे मिस्टर आधीच एका अपघातात त्यांना सोडून गेले होते.. एकुलता एक मुलगा विश्वास, सुरेखा आणि त्या एवढे तिघेच आतापर्यंत राहत होते. शिवाय त्यांचा मानलेला भाऊ अण्णा अधून मधून वाड्यावर येऊन भेट देत होता. विश्वास चे वडील गेल्यानंतर अण्णांनीच सगळी मालमत्ता, शेतजमीन सांभाळली होती. विश्वास ला चांगल्याप्रकारे शिक्षण दिल. एकंदरीत सरपोतदार घराचा सगळा लेखाजोखा अण्णा सांभाळत होते. तेवढा विश्वासचं होता नंदिनीबाईंना मानलेल्या भावावर....
वाड्याच्या बाहेर सुरेखाचा नवरा विश्वास सरपोतदार त्यांना आतमध्ये येताना दिसला. मुळात विश्वास हा नामांकित कंपनीमध्ये एका मोठा पदावर कार्यरत होता त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ हा बाहेरगावीच असायचा. आज तो तीन महिन्यांनी त्याच्या घरी परतला होता. बाळाला बघून त्याने आनंदाने त्याला जवळ घेतले आणि सुरेखाला आवाज देऊ लागला. खरतर विश्वासला सुरेखाबद्दल काहीच माहीत नव्हते.
सुरेखा... सुरेखा... कुठे आहेस. बाहेर ये, अग बघ मी आलोय..! पण समोरून काहीच प्रतिक्रिया नव्हती. त्याला वाटलं सुरेखा बाहेर गेली असेल म्हणून त्याने आईला विचारलं.
विश्वासची आई हुंदके देत रडू लागली, त्याने तिला सावरलं, आई काय झालं, मला कळेल का ? तु रडत का आहेस ? आणि सुरेखा कुठे आहे ? विश्वास म्हणाला..
अरे पोरा तु कामासाठी गेलास आणि इथे आमच्यावर आभाळ कोसळलं, एवढी संपत्ती असून देईल त्याचा काहीच उपयोग नाही, म्हणत विश्वासच्या आईने त्याला सुरेखाबद्दल सगळं सांगायला सुरुवात केली.. अगदी ती तिच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रम पासून, माहेरी गेल्यानंतर जेव्हा बाळ झालं आणि आता तिची काय परिस्थिती आहे, हे सगळं सांगितलं. कारण सुरेखाची सासू रोज तिच्या आई ला फोन करून सगळी माहिती घेत होती. खरतर तिला सुरेखाला भेटायची खुप इच्छा होती पण बाळाला काही दिवस आईपासून लांबच ठेवायचं होत, तिच्या आतील सैतानापासून बाळाच्या जीवाला धोका आहे. हे अण्णांनी सांगितलं होतं. अण्णा तेच मांत्रिक होते ज्यांनी सुरेखाचा सुरुवातीला इलाज केला पण त्यात त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. ते सुरेखाच्या सासूचे मानलेले बंधू होते. अगदी परिवारातील व्यक्ती, नेहमी येऊन जाऊन असायचे.
विश्वास हे सगळं ऐकून वाड्याच्या पायऱ्यावरच बसला.. हातात ते लहान लेकरू जे महिन्याभरापासून आईच्या प्रेमापासून वंचित होत. शिवाय त्याला स्वतःचा सुद्धा राग आला, बायको सोबत एवढं झालं असताना सध्या सगळ्यात जास्त तिला माझी गरज आहे आणि मी ...
विश्वासची आई त्याला सांभाळत, पोरा..! स्वतःला दोष देऊ नकोस, अण्णांनी खूप प्रयत्न केले तिला वाचवण्यासाठी पण सुरेखावर तो सैतान खूप जास्त प्रभावी ठरला आहे तो खूप ताकदवान आहे. विश्वासने बाळाला आईजवळ दिले आणि तो पुन्हा मागे फिरला.. अरे पोरा ..! कुठे चाललास, आई मी सुरेखाच्या घरी जातोय, मी जोपर्यंत तिला बघत नाही, तोपर्यंत मला करमणार नाही, म्हणून त्याने बाईकला किक मारली आणि निघाला..
***
आज अण्णाचं कार्य होत, त्यामुळे आज त्यांच्या घरी बरीच लोक जमली होती. छोटस घर, त्यात फक्त देवीदेवतांचे फोटो होते.. अर्थात ते मांत्रिक होते म्हणून, अण्णांनी गरीबीतच दिवस काढले होते, तसंही मांत्रिकाला मिळून मिळून असा किती पैसा मिळतो.
घरात एका टेबलावर त्यांचा फोटो त्यावर हार चढवलेला. बाजूला अगरबत्ती लावली होती. बाहेर सगळे माणसं सफेद कापडे परिधान करून अण्णांच्या कुटुंबाला सांत्वन द्यायला आले होते. त्यांच्या कुटुंबात फक्त त्यांची बायको आणि त्यांचा सहा वर्षाचा लहान मुलगा होता. सुरेखाला वाचवण्यासाठी अण्णांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली होती, एवढं करून सुद्धा सरपोतदार घराण्यातील कोणीही तिथे आले नव्हते म्हणून जमलेले लोक सरपोतदार घराण्याला नावं ठेवत होते. पण सरपोतदार परिवार आधीच खूप मोठ्या प्रसंगात अडकलाय ह्याची जाणीव बाहेरच्या लोकांना काय असणार म्हणून नंदिनीबाईंनी आधीच अण्णांच्या बायकोला न येण्याचं कारण ही स्पष्ट केलं होतं.
***
आज रात्री स्मशानात जाण्यासाठी सुनील आणि अजिंक्य दोघे तयार होते. त्याचसोबत सुरेखाची काळजी घेण्यासाठी सुनीलचे आई बाबा आणि महादेव घरी थांबणार होते.
अजिंक्य : - हे बघा ..! गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य ह्या थैलीत आहे, शिवाय ह्या विधी फक्त सुनीलच्याच हस्ते होतील त्यामुळे सुनील..! तु विशेष काळजी घे, कारण विधी तु करणार आहेस आणि व्यत्यय भरपूर येतील. आणि दीदी बद्दल अजून कोणाला माहीत आहे
निशा, सरिता आणि प्रियाला, महादेव म्हणाला. सुरेखाची आई मध्येच बोलली, सुरेखाच्या सासर कडच्या मंडळींना पण माहीत आहे म्हणजे तिथे फक्त तिची सासू आणि दिदीचं बाळ आहे, सासरे आधीच देवाघरी गेलेत आणि जावई कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सुरेखा ... सुरेखा...! धापा टाकत विश्वास मोहितेंच्या घरी पोहचला. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर येऊन खिळल्या..विश्वास आणि सुरेखाची नजरानजर झाली. सुरेखा खूप बारीक झाली होती, चमडी काळी पडली होती, गाल आत गेले होते, चेहरा सुकला होता, डोळ्याभोवती काळी वर्तुळे तयार झाली होती आणि फारच अशक्त दिसत होती. सुरेखाची अवस्था पाहून विश्वासला रडू कोसळले. विश्वासला समोर पाहून सुरेखालाही आनंद झाला आणि नवरा समोर असल्याने तिला धीर ही आला. विश्वासने तिला प्रेमाने जवळ घेतले.. दोघे रडत होते, खरतर तो क्षण एखाद्या हिंदी सिनेमा सारखा दिसत होता. सुरेखाच्या आई बाबांनी दोघांना सावरलं.
सुनील ने अजिंक्य आणि महादेवची विश्वास सोबत ओळख करून दिली. विश्वासने थोडस पाणी आणि चहा घेतला आणि पुन्हा सुरेखाच्या शेजारी जाऊन बसला. अजिंक्यने थोडक्यात सगळं काही विश्वासला सांगितलं. आज रात्री अजिंक्य आणि सुनील सोबत विश्वासही स्मशानात येण्यासाठी त्यांच्या मागे लागला. भाऊजी..! तुम्ही घरी थांबा, तसंही दिदीला तुमची जास्त गरज आहे. आणि स्मशानात सगळ्या विधी ह्या माझ्या हातून घडणार आहेत तर तुम्ही तिथे येऊन काय करणार, त्यापेक्षा तुम्ही घरीच दिदीजवळ थांबा, सुनील म्हणाला.
सुनीलचे म्हणणे तसे बरोबरच होते शिवाय विश्वासलाही सुरेखाला एकट सुद्धा सोडायच नव्हतं. त्याने जास्त न बोलता सुनीलच ऐकलं. आता बाकीच्यांसोबत विश्वास देखील घरीच थांबणार होता.
प्रिया सोबत गुरुजी आहे त्यामुळे प्रियाची काही काळजी नाही पण निशा आणि सरिता त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे. उगाचच जोखीम नको, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य ..! काळजी करु नकोस, निशा आणि सरिता कडे गुरुजींनी दिलेला धागा आहे, जो त्यांनी आम्हाला सर्वांना दिला होता, महादेव म्हणाला. अच्छा ग्रेट, आता फक्त विश्वास जीजूंची आई राहिली आहे त्यांना आपण सुरक्षित ठेवण्यासाठी काहीतरी करायला हवं.. त्यावर विश्वास बोलला, काही गरज नाही, अजिंक्य ..! आमच्या वाड्याभोवती माझ्या मानलेल्या मामांनी म्हणजे अण्णांनी खूप आधीच एक सुरक्षा कवच बांधून ठेवलेलं आहे, ज्यामुळे वाईट शक्तींचा वावर आमच्या घरात होत नाही.
अजिंक्य स्वतःचीच पुटपुटला, स्ट्रेंज..! तुमच्या घरात सुरक्षा कवच आहे म्हणून तुमच्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही.. ओके.. गुड.. म्हणजे आई पण सुरक्षित आहेत. ठीक आहे म्हणजे आपल्या ओळखीतले, माहितीतले सगळेच कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी सुरक्षित आहेत. म्हणजे आजची कामगिरी चोख झालीच पाहिजे..
सुनील, महादेव व अजिंक्य बाजूला होऊन रात्रीची तयारी करत बसले. सुनीलची आई किचनमध्ये गेली आणि बाबा जावई विश्वासला घेऊन आतल्या खोलीत अपेक्षाकडे गेले. बाबा अपेक्षा कडे बघून खूप दुःखी आणि विश्वासजवळ रडू लागले व बोलू लागले, बघा जावईबापू..! काय ही वेळ आली आहे आमच्या कुटुंबावर...! एक मुलगी सैतानाच्या तावडीत आणि दुसरी मुलगी कोमामध्ये गेली. सासरेबुवांना सांभाळून विश्वास ने त्यांना धीर दिला.
सुनीलने पिशवीतून कागद बाहेर काढला ज्यावर गुरुजींनी त्या सगळ्या विधी लिहिल्या होत्या व तो त्या क्रमवारी वाचू लागला. विश्वास सुरेखा जवळ येऊन तिला तिच्या तब्येतीची विचारपूस करू लागला, ठीक आहे मी आता..! तुम्ही आलात ना, आता मला थोडं बरं वाटतंय, अहो.. आपलं बाळ कस आहे, मला ह्या जाळ्यातून लवकर बाहेर काढा, मला आपल्या बाळाला भेटायचंय, मी त्याला अजून बघितलंच नाही..
विश्वास : - सुरेखा ..! तु शांत हो बर आधी, आणि तु पूर्णपणे बरी होणार आहेस, आज रात्रीची विधी संपन्न झाली की तू बरी होशील.. आणि मग मी तुला आपल्या घरी घेऊन जाईल, आपल्या बाळाकडे..!
बाळाकडे...! मग मी आपल्या बाळाला उचलून घेईल, त्याच्याशी खेळेल आणि वेळ बघून त्याला मारून टाकेल... सुरेखाच्या आवाजात अचानकपणे बदल झाला, ती विकृत पणे हसू लागली.. हिहीहीहीह्हीईहीई...
गोड आपलं बाळ
मी करेन त्याला ठार,
मध्ये जर आलं कोणी
तो ही नाही वाचणार....
खिखिखिखिखीही.. किन्नरी कर्णकर्कश आवाजात सुरेखाच्या तोंडून तो सैतान बोलू लागला... अजिंक्य, सुनील आणि महादेव तिघांनी तिच्याकडे पाहिलं... आता ती वेगळ्या अवतारात होती, सफेद चेहरा, डोळे लालबुंद, दातातून रक्त वाहत होत पण खाली पडत नव्हतं, ती विश्वासचा हात पकडून त्याला बोलत होती, अअअहाहहो..! आपल्या बाळा ला घेऊन या, मला त्याची पाचवी पुजायची आहे, अस बोलून तीने पलंगावर शरीर टाकलं, त्यामुळे तिचे केस पलंगावरून खाली जमिनीपर्यंत लोळत होते.. ती उलटी पडली होती आणि भयानक हसत होती... खिखिखीहीहीही...ती तशीच पलंगावर पडून आपोआप हवेत तरंगू लागली.. हखिखिखिखी.. करत हसू लागली.. खूप भयानक दृश्य होत ते... कोपऱ्यातल्या भिंतीकडे वर जाऊन ती भिंतीला पाठ करून उभी राहिली..आता तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, अहो...! ह्यांना सांगा ना, रात्री स्मशानात नका जाऊ, तो मला त्रास देतोय.. सतत माझ्या कानाजवळ येऊन मला ओरडतोय की त्यांना अस सांग म्हणून...
आता सुरेखाला त्या अवस्थेत बघून विश्वास सुद्धा घाबरून गेला. त्याला काय बोलावे, काहीच सुचेना.. त्याची वाचा बंद झाली होती.
सुनील तिला बघून रागाने बोलला, ये सैताना.. माझ्या बहिणीला त्रास देणं, बंद कर.. अरे हिम्मत असेल ना मला मार, पण माझ्या बहिणीला सोड कळलं.. सुरेखाचे हावभाव पुनः बदलले पुन्हा त्या किन्नरी आवाजात सुनील कडे बघून तो बोलला, खिखीखीहीहं..तुझ्या बहिणीचा जीव घेतल्यानंतर तुझाच नंबर आहे, तुझी वेळ आली की तुझा पण आत्मा कैद करून घेईल मी, जस तुझ्या लहान बहिणीचा आत्मा कैद केलाय... हिहीहीहीही...
अपेक्षा बद्दल आठवून तर सुनीलचा राग अनावर झाला त्याने रागातच त्या सैतानाला शिव्या द्यायला सुरुवात केली.. पण तितक्यात अजिंक्यने त्याला रोखलं.. थांब सुनील..! कुठलीही चूक करु नकोस, त्या सैतानाला तेच हवंय, आपण रागात चूक करू आणि तो त्याचा फायदा उचलेल.
अजिंक्य बोलू लागला, दीदी..! प्लिज खाली ये, हे बघ तु त्या सैतानापेक्षा खूप शक्तिशाली आहेस.. तु स्वतः त्याला हरवू शकतेस, फक्त तु घाबरू नकोस, तो तुला नाही घेऊन जाणार, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तो तुला घाबरवतोय तु फक्त घाबरू नकोस. तुला अजुन तुझ्या बाळाला मोठं होताना बघायचं आहे.. आम्हाला ह्यावर्षी रक्षाबंधनला तुझ्या हातून राखी बांधून घ्यायची आहे आणि ती राखी न बांधताच आम्ही तीन भाऊ तुला असे कसे जाऊ देऊ... अजिंक्यच्या शब्दांनी घरातील सगळे भावूक झाले..
सुरेखा भानावर आली, अजूनही ती भिंतीवर होती.. ती प्रचंड घाबरलेली होती, मला वाचवा, मला जगायचं आहे.. अहो..! आपल्या बाळासाठी.. मी आता नाही घाबरणार.. ये सैतान तु मला नाही घेऊन जाऊ शकत.. मला वाचवण्यासाठी माझ्याकडे माझ्या जवळची माणसं आहेत.. अजिंक्यने दिलेल्या आत्मविश्वासाने सुरेखा खुद्द त्या सैतानाला आव्हान करू लागली.. हळू हळू तिच्यातील सैतानाचा प्रभाव कमी होऊ लागला आणि ती नकळतपणे भिंतीवरून खाली उतरू लागली...
तिला विश्वासने सावरलं.. सुरेखा..! तु ठीक आहेस ना .. आम्ही आहोत तु काळजी करु नकोस..अजिंक्यची योजना कामी आली, मुळात मानसशास्त्रानुसार मन फार भित्र असतं, त्याला आपण ज्या सूचना देऊ तसंच ते वागत.. सुरेखाचा आत्मविश्वास हरवला होता.. तिला तो परत मिळवून द्यायचा होता, जेणेकरून ती स्वतःहाच सैतानासोबत दोन हात करू शकेल. बाह्य लढाई तर विधी करून अजिंक्य आणि मित्रपरिवार सुरू ठेवेलच पण अंतर्गत लढाई ही स्वतः सुरेखालाच लढावी लागेल, त्यासाठी तिचा आत्मविश्वास बळकट व्हायला हवा.. आणि अजिंक्यने नेमकं तेच केलं. काही काळापुरता का होईना, सुरेखाने त्या सैतानाला हरवलं होत.
अखेर ती वेळ आली.. सगळेजण जागीच होते.. तीन वाजण्यासाठी वीस मिनिटे बाकी होती.. अजिंक्य आणि सुनील स्मशानाच्या वाटेने निघाले.. घरी सुनीलचे आई - बाबा, महादेव, विश्वास हे सगळे सुरेखाभोवती रिंगण करून बसले होते.. आतल्या खोलीत अपेक्षाचं शरीर पडून होत..सुरेखा शांतपणे पडून होती..
अमावस्येची भयाण रात्र, चंद्राची सावली अजिबात नव्हती. समोर फक्त गडद अंधार, रस्त्याने चालत असताना फक्त दोघांच्याच पाऊलांचा आवाज पडत होता.. छप छप ... रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी होती, हळुच मध्ये एक थंडगार वाऱ्याची झुळूक यायची अन संपूर्ण अंग शहारून टाकायची.. संथ वाहणाऱ्या हवेमुळे आजूबाजूला असणाऱ्या झाडा झुडुपांमधुन सळसळणारा आवाज येत होता.. अखेर ते दोघे स्मशानाच्या गेटजवळ पोहचले.. अजिंक्यने गेट आतमध्ये लोटला.. कररररररर ... करत गेट उघडला गेला आत थोडा चिखल असल्याने दोघांनी सांभाळूनच पाऊले आत टाकली.. ते दोघे आत आले आणि मागे गेट आपोआप बंद झाला.. कर्रर्रर्रर्रर्रर ...
दोघेही घाबरले, एकमेकांना धीर देत ते स्मशानाच्या मध्यभागी आले.. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक मोठं रिंगण केलं, त्यात ते दोघे बसले. सोबत आणलेल्या थैलीतून त्यांनी एक एक साहित्य बाहेर काढलं.. आतापर्यंत सर्व व्यवस्थित होत. शेवटची वस्तू बाहेर काढण्यासाठी सुनीलने थैलीमध्ये हात टाकला अन ती वस्तू बाहेर काढली..ती वस्तू होती मानवी रक्त..हो खुद्द गुरुजींचं रक्त होत ते.. ह्या विधीसाठी पवित्र आणि समृद्ध विद्या असलेल्या महान योगीच रक्त लागणार होतं आणि गुरुजींनी ते एका छोट्याश्या चंचूपात्रात दिल.. त्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला.. चोहीबाजूला अंधार अतिशय तीव्र पसरला..फक्त ज्या रिंगणात ते दोघे बसले होते, तिथे मंद प्रकाश होता.. स्मशानात असलेल्या घड्याळात तीनचा टोला पडला.. अजिंक्यने सुनील ला इशारा केला.. सुनीलने गुरुजींनी दिलेला कागद तोंडपाठ करून घेतला होता, त्यामुळे तो विधी न बघता करू लागला.. भयाण काळोखात विधी सुरू झाला..
सुनीलने चंदनाच्या काड्या पेटवल्या, त्यात धूप टाकली त्यामुळे चोहीबाजूला धूर पसरला.. नंतर काळी बाहुली घेतली, तिला हळद कुंकू लावलं. तिच्यावर थोडस तेल शिपडलं. त्यानंतर सुरेखाचे थोडे कापलेले केस त्या बाहुली ला गुंडाळले आणि ती बाहुली जमिनीवर ठेवली.. बाजूला चंदनाच्या काड्या जळत होत्या..
सुरेखाने डोळे उघडले.. ह्यावेळेस तिचे डोळे अगदी लालबुंद आणि शरीर निळं पडायला सुरुवात झाली.. विश्वासने पाहिलं आणि तो घाबरला पण बायकोच्या अश्या अवस्थेला पाहून त्याला तिची साथ सोडू वाटत नव्हती.. म्हणून तो तिथेच बसून राहिला.. घरातील सगळेच उठले.. सगळे तिच्या अवतीभवतीच होते.. त्यांचं आधीच ठरलं होतं, आजची रात्र सुरेखाला एकांत भेटू द्यायचा नाही.. तिची नजर सर्वांवर गरगर फिरू लागली.
सुरेखाने जेव्हा घरी डोळे उघडले अगदी तेव्हाच त्याच वेळेला स्मशानात त्या काळ्या बाहुलीने सुद्धा डोळे उघडले. तीचे डोळे सुद्धा लालबुंद आणि काळी बाहुली निळी पडली.. अन थेट ती बाहुली अजिंक्य आणि सुनील समोर उभी राहिली. दोघेही अक्षरशः भीतीने कावरेबावरे झाले. त्यांना कळत नव्हते की पुढे काय करायचं पण अजिंक्यने सुनील ला सांगितले, की सुनील गुरुजींनी आपल्याला सांगितलं होत, व्यत्यय येतील, तु तुझे मंत्र म्हणायचे सुरू ठेव. मी बघतो काय करायचं ते... तस अजिंक्यने सुनीलचा हात घट्ट पकडला.. आता ती बाहुली अजिंक्यकडे नजर रोखून पाहू लागली..
इथे सुरेखाने सगळ्या घरात हाहाकार माजवला होता.. ती एका भयानक अवस्थेत ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर उड्या मारत होती.. आणि जोरजोरात किंचाळत होती. तिच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत होत.. थांबवा हे सगळं, नाहीतर कोणालाच जिवंत नाही सोडणार मी, थांबवा हे सगळं.. त्या दोन्ही हरामखोरांना घरी बोलवा.. नाहीतर त्यांचा मुर्दा मी त्याच स्मशानात पाडीन.. हिहीहीहीहं ...त्याच्या चेहरा रागाने लालबुंद झाला होता..
सुरेखाचं अस बोलणं ऐकून सुनीलची आई घाबरली, तिला तिच्या मुलाची काळजी वाटू लागली.. त्या काळजीपोटी तिने धसका घेतला आणि ती बेशुद्ध झाली.. सुनीलच्या बाबांनी तिला आतल्या खोलीत अपेक्षाच्या शेजारी झोपवलं आणि दार लावून घेतलं..
***
सुनील अजून किती बाकी आहे, अजिंक्य बोलला. झालंच शेवटचा विधी बाकी आहे, ती बाहुली लागले मला, सुनील बोलला.. अजिंक्यने त्या बाहुलीला हात लावला पण अतिशय तीव्र असा झटका अजिंक्यला लागला.. सुनील सुद्धा अचंबित झाला कारण अजिंक्यला झटका कसा काय लागू शकतो.. तो तर खरा वारसदार आहे, चांगल्या शक्तींचा स्रोत आहे.. पण ती वेळ ह्या सर्व गोष्टींवर विचार करण्याची नव्हती.. सुनील ला आठवलं, गुरुजी बोलले होते.. तस त्याने गुरुजींच्या रक्ताचं चंचूपात्र बाहेर काढलं त्यात थोडस रक्त त्या बाहुली वर शिंपडलं आणि बाहुली जमिनीवर पडली.
तिकडे सुरेखा भिंतीवरून इकडेतिकडे उड्या मारत होती. बाहुलीवर रक्त शिंपडल्यावर ही सुद्धा खाली जमिनीवर कोसळली. त्या सैतानाला काही कळायच्या आतच स्मशानात सुनीलने त्या काळ्या निळ्या बाहुलीला चंदनाच्या पेटत्या काड्यावर टाकलं.. मोठा शंखनाद व्हावा, असा जोरात आवाज आला.. त्या आवाजाने सुरेखाच्या आतील सैतान कमजोर झाला.. आणि त्याचा काही अंश हा त्या दिवशी संपला...पण अजूनही काही अंश हा संपायचा बाकी आहे त्यासाठी शेवटचा विधी हा सुरेखाच्या घरात करायचा आहे, हे आधीच गुरुजींनी सुनील आणि अजिंक्यला सांगितलं होतं.. आणि त्यासाठी त्यांना स्वतः ती विधी करायला यावं लागणार होतं..
स्मशानातील आपलं काम संपवून सुनील आणि अजिंक्य घरी परतले.. मनात एकच धाकधूक होती आपण केलेला विधी संपन्न झाला आहे की नाही ह्याची खात्री त्यांना घरी जाऊनच कळणार होती.. ते दोघे आत आले... सकाळचे ४ वाजले होते त्यांनी आत प्रवेश केला, पूर्ण घर अस्ताव्यस्त झालेले होते.. आतापर्यंत आईला पण शुद्ध आली होती.. इकडे सुरेखाचं डोकं मांडीवर घेऊन विश्वास बसला होता..सुरेखाचं शरीर बऱ्यापैकी पूर्वरत झालं होतं फक्त ते अजून पूर्णपणे गेलं नव्हतं.. पुन्हा ते येणार होत त्याचा दिलेला शब्द पूर्ण करायला कारण दोन दिवसांनी म्हणजे उद्या बरोबर सात दिवस होणार होते.. आणि त्याच वाचन पूर्ण करण्यासाठी तो येईलच, हे गुरुजींना सुद्धा ठाऊक होतं म्हणून त्यांनी शेवटचा विधी मी स्वतः करेन म्हणून सांगितलं.....कारण गुरुजींना आतापर्यंत कळलं होतं की, सुरेखाच्या आतमध्ये कोणतं भूत आहे ते...
.
.
.
.
.
क्रमशः