वारसदार भाग @ ११
ठरल्याप्रमाणे रात्री ३ च्या सुमारास गावाबाहेरच्या स्मशानभूमीत जाण्याचं नियोजन सुरू झालं. घरात सुनील, त्याचे आई - बाबा, लहान बहीण अपेक्षा, सुरेखा आणि महादेव हे सर्वजण हॉल मध्ये होते.. सुरेखा सोबत आई, अपेक्षा आणि एक पुरुष व्यक्ती सोबत असायला हवा म्हणून महादेवने घरी थांबावे, अस सुनील ने त्याला सांगितलं.. आणि सुनील स्वतः त्याच्या बाबांसोबत स्मशानभूमीत जाण्यासाठी तयारी करू लागला. त्यावर महादेव ने पुढाकार घेऊन सुचवले की, सुनील ..! तु आणि मी, आपण दोघे जाऊ, बाबांना घरी राहू दे...
नाही ..! महादेव, तु घरी थांब.. आम्ही जाऊन येतो, उगाचच आमच्यामुळे तुला काही त्रास नाही झाला पाहिजे.. तिथे काही ही होऊ शकत, सुनील म्हणाला.. त्यावर महादेव थोडस भावनिक होऊन बोलला, बस काय..! मित्रा, हीच किमंत ठेवली आपल्या मैत्रीची, इतके दिवस आपण सुखात एकमेकांसोबत होतो आणि आज तुझ्यावर दुःखाच आभाळ कोसळलंय तर मी मागे कसा हटू शकतो ? तूच सांग.. माझ्या जागी जर तु असतास तर तु मला अस सोडून गेला असतास का ? नाही ना मग तर झालं, जायचं तर आपणच, बाबांना घरी थांबू दे..
महादेवच्या शब्दांनी सुनील भावुक झाला आणि त्याने महादेवला घट्ट मिठी मारली. अखेर ठरलं, सुनील आणि महादेव जाणार..दोघेही तयारी करू लागले, स्मशान मध्ये घेऊन जाणाऱ्या वस्तू एका थैली मध्ये ठेवल्या.. आता त्यांचं लक्ष फक्त घड्याळात ३ कधी वाजतात ह्यावर होत. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सूचना त्यांच्या लक्षात होत्या. स्मशानात जाताना त्रास होईल पण घाबरू नका, शारीरिक इजा काही होणार नाही फक्त तुम्ही तुमचं मनोबल खच्च होऊ देऊ नका. त्या विधी पूर्ण न होण्यासाठी तुम्हाला त्रास देण्याच काम ते करत राहतील, अडथळे निर्माण होतील पण तुम्ही लक्ष देऊ नका.. काम पूर्ण झाल्यावर मागे वळून पाहू नका, सरळ घरी निघा... ह्या सर्व सूचना त्यांच्या डोक्यात अगदी फिट्ट होत्या..
रात्रीच जेवण महादेव सुनीलच्या घरीच जेवला आणि त्याने त्याच्या घरी फोन करून सांगितले की आजची रात्र तो सुनीलच्या घरीच थांबणार आहे.. मध्ये मध्ये एक दोन वेळा अजिंक्यचे फोन येऊन गेले होते त्यावर महादेवच बोलणं ही झालं होतं व त्याने अजिंक्यला इथली परिस्थिती कळवली होती.
***
रात्रीच्या वेळी अजिंक्य एकटाच त्याच्या आरामदायी खुर्चीवर बसून सुनीलच्या घरी घडलेल्या गोष्टींच्या विचारात मग्न होता. त्याला पडलेल्या स्वप्नांचा हळू हळू उलगडा होऊ लागला. लहान मूल त्याला एका आकृतीने जपून ठेवले आहे, ते लहान मूल म्हणजे सुरेखा दीदीचे बाळ आणि ती आकृती म्हणजे कोणीतरी व्यक्ती आहे, जी त्या लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात स्वतः दिदीचं...म्हणजे ओह माय गॉड..! कदाचित माझ्याकडून नकळत का होईना, काहीतरी मदतच होऊ शकते म्हणूनच मला स्वप्न पडले. मला लवकरात लवकर तिथे पोहचलच पाहिजे. अजिंक्यने बॅग तर भरूनच ठेवली होती तो फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होता, झोप त्याला लागणार नव्हती म्हणून फक्त बेडवर जाऊन पडून राहिला..
***
एकदम काळाकुट्ट अंधारात सुनील आणि महादेव घराच्या बाहेर निघून स्मशानाभूमीच्या वाटेने निघाले. सोबत विधी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची थैली होतीच. सुरुवातीला सर्व ठीक वाटत होतं पण घरापासून काही अंतर पार केल्यावर वातावरणात बदल जाणवू लागला.
अमावस्येची भयाण रात, अंधाऱ्या रात्री त्या सामसूम रस्त्यावर फक्त हे दोघेचं चालत होते. त्यात रस्त्यावरचे काही दिवे चालू तर काही बंद होते. मध्येच हळूच थंड वाऱ्याची झुळूक दोघांच्या अंगाला शहारून जायची. रातकिडे किर किर करत होते, कुत्रे एकाच ठिकाणी बघून भुंकत होते. ह्या भयाण शांततेत फक्त दोघांच्या पावलांचा आवाज येत होता. अखेर ते दोघे स्मशानात येऊन पोहचले. तिथे आधीच एक प्रेत जळत होतं, ते बघून ह्यांची खूपच टरकली.
महादेव : - सुनील ..! तिकडे लक्ष देऊ नको, आपण आपलं काम करूया आणि निघुया.
सुनील : - हो रे... पण वातावरणात किती बदल झालाय आणि त्यात आपण स्मशानात आहोत. ही शांतता काळीज चिरर करते.
दोघांनी जरा ही वेळ न दडवता स्मशानाच्या बरोबर मध्यभागी एक कापड अंथरले. त्यावर पाच लिंबू, हळद कुंकू, एक नारळ, सुरेखाच्या डोक्यावरचा केस, तिची जुनी साडी आणि काळा दोरा इत्यादी साहित्य त्या कापडावर मांडून ठेवले. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे बरोबर तीन वाजता विधी सुरू करायची होती.. ३ वाजायला फक्त २ मिनिटे उरली होती.. स्मशानात असलेल्या घड्याळात ३ चा टोला पडला. तस ह्या दोघांनी एक रिंगण केलं, त्यात नारळ, सोडून बाकी सगळ्या वस्तू ठेवल्या. त्यातील चार लिंबू मधोमध कापून सुनीलने त्यात हळद कुंकू भरून चारही दिशेला फेकले. सुरेखाची साडी, केस आणि काळा दोरा ह्यांना अग्नी द्यायचा होता, त्यासाठी महादेवने खिशातून माचीस काढली आणि तो अग्नी देऊ लागला. आणि तिथेच चूक झाली. कारण ही सर्व विधी फक्त मोहिते परिवारांच्या हस्तेच होऊ शकते, दुसऱ्या बाहेरील व्यक्तीच्या हातून ही विधी पूर्ण केली तर विधी अपूर्णच राहील, हे आधीचं गुरुजींनी जाणीवपूर्वक सांगितलं होतं..पण घाई गडबडीत दोघांच्याही डोक्यातून ते निसटून गेलं.
महादेवने जसा अग्नी दिला, त्या वस्तू जळू लागल्या अन त्याचक्षणी बाजूला जळत असलेलं प्रेत त्यातील अग्नी उंच उंच भडका घेऊ लागल्या. त्या स्मशानात जोरात किंकाळी गुंजली, आहहहaaassss एवढ्या जोरात की महादेव आणि सुनीलच्या कानठळ्या बसल्या. भीतीने त्यांचं शरीर गारठलं. वस्तू जळत होत्या, बाजूला जळत असलेल्या प्रेतातून उंचच उंच भडका होत होता, अगदी भयानक दृश्य झालं होतं..
मध्यरात्रीचे ३ वाजून २५ मिनिटे झाली, अन इकडे सुरेखाने डोळे उघडले. तिचे डोळे एकदम लालबुंद झाले होते, शरीर थंड पडलं होतं आणि ती बेडवरून उठली.. मुळात सुनील आणि महादेव स्मशानात गेले असल्याने घरी आई बाबा सगळेच जागी होते.. सुरेखाला त्या अवस्थेत पाहून सगळे घाबरले. त्यात सुनीलचे बाबा थोडे धीट होते, त्यांनी तिला पकडलं, सुरेखा..! पोरी काय होतंय, कुठे चाललीस, बस खाली.. म्हणून मोहितेंनी तिला पुन्हा बेडवर बसवल. तिची आई तिच्याजवळ येऊन तिला गोंजारु लागली.
ये.. चल बाजूला हो..! मर्दानी पुरुषी आवाजात सुरेखा त्यांच्यावर खेसकली, आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता तिने खांदा झटकून बाजूला केला आणि मोहितेंना ढकललं. लहान बहीण अपेक्षा आधीच भित्री त्यामुळे ती आतल्या खोलीतुनच हे सगळं दृष्य बघत होती. हहहह हहहह हम्म ahaha त्यांना घरी बोलवाsssss एक जोरात श्वास घेऊन तो ओरडला त्याचा आवाज एवढा मोठा होता की पार स्मशानापर्यंत ती किंकाळी गुंजली.
तिकडे महादेव आणि सुनीलची विधी पूर्ण झाली होती फक्त शेवटचं ते नारळ आणि एक लिंबू राहील होत, जे त्या स्मशानातच ठेवून पाठीमागे न बघता घरी जायचं होतं. त्यामुळे त्यांनी ते नारळ आणि लिंबू हातात घेतलं त्यावर हळद कुंकू लावलं आणि ते खाली ठेवणार तितक्यात जोराने वारा वाहू लागला.. रातकिड्यांचा किर किर्रर्रर्रर्र आवाज येऊ लागला, बाजूला जळत असलेल्या प्रेतातून जोरात कवटी फुटल्याचा आवाज आला. टाकककkkk... सुनील आणि महादेव दोघेही प्रचंड घाबरलेले होते. नारळ ठेवून ते स्मशानाच्या बाहेर धावतच आले पण त्यांना अस जाणवू लागलं की त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे, आजूबाजूला सतत त्याच्या कानावर कोणाचे तरी आवाज कुजबुजल्या सारखे येत होते पण दिसत काही नव्हतं.
इकडे सुरेखा वेगळ्याच रुपात होती, मोकळे केस, लालबुंद डोळे आणि मर्दासारखी ती उभी राहिली. अंगाने सडपातळ असणारी सुरेखाची सावली एखाद्या पहिलवान माणसा सारखी भिंतीवर पडली होती. खिडकीतून बाहेर स्मशाना कडे बोट दाखवत ती त्याच्या आवाजात गुरगुरली, ये.. त्यांना परत बोलवा, नाहीतर बघा.. मी ह्या मुलीला आताच मारून टाकेल..अस म्हणत त्या सैतानी ताकदीने तिच्या शरीराला हवेत फेकलं आणि भिंतीवर आदळलं.
सुरेखा रडत होती, आई बाबांना बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं, तिच्या शरीरावर झालेल्या इजांमुळे तिच्यात आता जास्त बोलायची ताकद ही राहिली नव्हती, ती फक्त एवढंच बोलली, आई बाबा मला वाचवा.. अन तिने डोळे बंद केले.. पुन्हा तिचे डोळे उघडले पण आता ती नव्हती तर तो होता, अगदी विचित्र भाषेत शिव्या देत तो गुरगुरला, माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही, हे शरीर मी हवं तसं वापरू शकतो. काल जो थेरडा आला होता त्याला पण मी जिवंत नाही सोडणार, फक्त माझ्या तावडीत सापडू दे.. म्हणत सुरेखाचं शरीर निद्राव्यस्थेत गेलं.
दारावरची बेल वाजली, सुनील आणि महादेव पण घरी पोहचले.. मोठ्या बहिणीची अशी अवस्था पाहून सुनील रडू लागला तर महादेव ला त्या सैतानाचा राग आला. महादेव हे काय रे तुझ्या पायाला काय झालं ? मोहिते बोलले. महादेव लंगडत लंगडत पुढे आला, काही नाही काका ..! आम्ही घरी येत असताना पाय मुडपला त्यामुळे पाय थोडा ठणकतोय. महादेव खाली बसला आणि सुनीलच्या आईने त्याच्या पायाची मालिश करून दिली, त्याला थोडं बरं वाटलं पण पाय खाली ठेवता येत नव्हता.. एव्हाना सकाळचे ५ वाजत आले होते, सुरेखा झोपेतच होती. सुनीलच्या बाबांनी सुरेखा जवळ तिच्या आई ला झोपवलं आणि हॉल मध्येच बाकीचे सगळे झोपले.
.
.
.
.
क्रमशः