जळालेली मिल (भाग - ०१)
लेखक - समीर गडेकर
दिवसभर धरतीला ऊन पाजुन थकलेला सुर्यनारायण आपल्या उतरत्या उन्हातला तांबूस गुलाल माळराणावर फेकत आता मावळतीच्या प्रवासाला निघाला होता. हिरवा शालू परिधान करून दिवसभर मटकणार्या रानातल्या पिकांनी आता काळी गोधडी ओढुन नुकतच अंग टाकलं होतं. मनुष्यवस्तीचं ओझं अंगावर पेलवण्याच्या जबाबदारीतून अजुन तरि मुक्त असलेल्या त्या विस्तीर्ण माळराणावरुन जाणाऱ्या चिंचोळ्या पायवाटेवर आता फक्त सायकलच्या पायडलचा होणारा टरक् टरक् आवाज त्या स्तब्ध शांततेचा भंग करत होता. बायकोने बांधून दिलेली चुलीवरील गरम गरम भाकरी आणि तरोट्याची भाजी ठेवलेला, कापडाच्या पिशवीत बांधुन सायकलच्या हँडलला अडकवलेल्या डब्याचा सायकलच्या हँडलवर आदळून होणारा थड्थड् आवाज त्या संगीतात भर घालत होता.
घरात अठराविश्वे दारिद्र्य पोसुन, आयुष्यभर विविध दु:खे अंगाखांद्यावर खेळवत गरिबीशी जणू लग्नगाठ बांधलेला एक मध्यमवयीन तरुण आज नियतीच्या छाताडावर पाय ठेवून, सगळ्या चिंता आणि निराशा विस्मृतीच्या डोहांत बुडवून परिस्थितीशी दोन हात करायला नव्या दमाने निघाला होता. पायाने सायकलला गती देत तोंडाने गाणं गुणगुणत पुढ्यात येणारा थंड वार्याच्या झोतांचा वर्षाव अंगावर प्रेमाने स्वीकारत तो वाट तुडवीत होता. बायको, दोन लहान मुले, म्हातारी आजारी आई या जबाबदारीचा संसार नेटाने पेलवत असलेला नारायण आज आपल्या रात्रपाळीच्या नव्या नोकरीवर रुजू व्हायला निघाला होता.
"अरे संसार संसार. जसा तवा चुल्ह्यावर आधी चटके . . . . . . . . . . . हु. . . . . . हु"
गुणगणत असतांनाच अचानक मागून कोणीतरी आवाज दिला. तो दचकला. भानावर आला. कचकन ब्रेक दाबले. सायकल थांबली. त्याने मागे वळून बघितले. दूरवर काळोखात पसरलेल्या परिसरात कोणीही दिसत नव्हतं. कुणीतरी दुसऱ्याला आवाज दिला असेल बहुतेक. त्याने मागे कॅरियर बघितले मागे अडकवलेले अंथरून पांघरून व्यवस्थित होते. आता मात्र त्याने सायकलचा वेग वाढवला. पुढून येणारा वारा कापत तो वेगाने निघाला.
थोड्याच वेळात तो गावाबाहेर पोहोचला. आता तो विस्तीर्ण जागेत वेटोळे घालून बसलेल्या, जबडा उघडून सावजाची वाट पहात असलेल्या, एका अजस्त्र अजगराच्या पुढ्यात उभा होता.
चक्रधर मिल? चक्रधर मिल? हो. हो. चक्रधर मिलचं. रात्रीच्या काळोखात सुनसान वातावरणात ती मिल ऐका भयान सर्पाप्रमाणे भासत होती. दोन वर्षापूर्वी ही मिल आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यात पंधरा लोकांचा बळी गेला होता. या भयाण जागेत आता त्याला संपूर्ण रात्र घालवायची होती. तेही आजचीच रात्र नाही तर आजपासून प्रत्येक रात्र.
मिलचे मालक चक्रधर साळवे यांनी नारायणची हलाखीची परिस्थिती पाहून थोडा जास्त पगार देऊन त्याला रात्रपाळीवर राखणदाराची नोकरी देऊ केली होती. थोड्याच दिवसात संपूर्ण मिल पाडून नवीन बांधकाम सुरू होणार होते. त्यासाठी लागणारी सर्व सामग्री मिलच्या एका बाजूला येऊन पडली होती. त्यावर लक्ष ठेवायला तिथे नारायणला राखणदार नेमले होते.
नारायणने सायकल उभी केली. कुलूप घातले. चावी खिशात टाकून त्याने डबा आणि इतर साहित्य हाती घेतले. इमारतीचे गेटही तेवढेच प्रशस्त होते. एखाद्या तुरुंगाच्या दरवाजा प्रमाणे त्याला ते गेट भासत होते. संपूर्ण मिलवर भिरभिर नजर टाकत नारायण उभा होता. अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या मिलची दोन्ही टोके एकावेळी नजरेत बसणे कठीण होते. त्या भयाण आणि म्रुतकाय प्रदेशात आता एक सजीव आकृती प्रवेश करण्यास निघाली होती.
ते गेट ठिकठिकाणी गंजलेलं होतं. बाहेरच्या भागात बरचसं गवत वाढलेलं होतं. संपुर्णत: काळी पडलेलि ती वास्तु म्हणजे जळुन शिल्लक ऊरलेला ऐक सांगाडाच. मिलच्या भिंती काहि ठिकाणी खचलेल्या होत्या तर बर्याच भागात भिंतींचे मोठाले पोपडे निघुन आतमधल्या विटा दिसुन येत होत्या. खिडक्यांची तावदानं जळुन नुसती भोकं शिल्लक होति. मिलच्या दोन्ही टोकांच्या भागातिल भिंतिंजवळ कमरेपर्यंत ऊंचीच तण वाढलं होतं. ईमारतीच्या छतावर ऐका विशिष्ट भागात काहि पक्षी घिरट्या घालत होते. जमिनीवरति काहि ठिकाणि कचरा साचलेला होता. त्यात फरशीचे - विटांचे तुकडे, सिमेंटच्या भिंतींचे निघालेले पापुद्रे तर काहि कोळसे पडलेले होते. आपल्या आयुष्याचं प्रतिकात्मक स्वरुप नारायण त्या भग्न वास्तुमधे पाहत होता. ती तुलना करुन त्या भयान वातावरणातहि त्याच्या ओठांवर ऐक लाचार हसु फुललं.
गेटच्या बाजुला ऐक प्रचंड विस्तार असणारं झाड होतं. गेटवर ऐक मोठा लाईट लावला असल्याने त्या भागात थोडा प्रकाश होता. त्या प्रकाशातहि झाडाच्या सावलिमुळे ऐका कोंट्यात अंधार निर्माण झाला होता.
जुन्या काळातील ते अवाढव्य लोखंडी गेट त्याने हाताने ढकललं. गेटचा कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज शांत वातावरणात घुमला. आत मध्ये येऊन त्याने गेट बंद केले. मुख्य दाराकडे आता तो निघाला. पावलांचा टपक् टपक् आवाज वातावरणात स्पष्ट ऐकायला येत होता. वारा सु सु करत पिंगा घालत होता. चालत असताना मध्येच गेटचा होणारा कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज त्याने पुन्हा ऐकला. त्याची पावलं जागीच खीळली. त्याने मागे वळून बघितलं. गेट बंद होतं. कदाचित भास असेल म्हणून त्याने दुर्लक्ष करून तो मागावर निघाला.
आगीत होरपळून काळी ठिक्कर पडलेल्या त्या अतृप्त मिलने त्याचं पहिले स्वागत आता केलं होतं.
. . . . . . . . . . . .
मेन गेटभोवतालचा थोडा प्रकाश असलेल्या भागातुन बाहेर पडुन दोन पावले आता ऐका दैत्याच्या कुशीत सामावण्यासाठि निघाली. भयाण शांतता, दुरपर्यंत सुनसान भाग, चालतांना टक् टक् वाजणारि पावले, रात्रीची गस्त घालणारा वारा यात विश्वातिल शेवटचा उरलेला मनुष्य जणु त्या किर्र वातावरणात हालचाल करतोय असच ऐक द्रुष्य तिथे निर्माण झालं होतं.
ईमारतीच्या मुख्यद्वाराजवळ तो पोहचला. मुख्यद्वाराच्या पुढे एेक साधारण आकाराचा पोर्च होता. तो पोर्च म्हणजेच पहिल्या माळ्यासाठि बाल्कनी. तो बाल्कनीचा भाग नेहमिची जागा म्हणुन त्याच्या नजरेत भरला. मुख्यद्वाराच्या बाजुला पायर्या होत्या. तिथुन वर जाउन तो त्या बाल्कनीत पोहचला. तो प्रशस्त भाग होता. वाराहि छान येत होता. थोडा उजेडहि होता. आणि मुख्य म्हणजे सामानावर लक्ष ठेवणे तिथुन सोयिस्कर होते.
बाल्कनीच्या कठड्याला टेकुन तो बसला. हातातिल सामान बाजुला ठेवले. पाय मोकळे सोडले. आल्हाददायि थंड हवेत शरिराला थोडि उसंत मिळुन डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले. आकाशातिल चांदण्या पाहत तो शुन्यात गेला. कधि भुतकाळातील आठवणींची तर कधी भविष्यातिल अंदाजाची चित्रे त्याच्या डोळ्यासमोर तरंगत होति. विचारात गुंग असतांनाच त्याने मान वळवली. नजर गेटकडे गेली आणि विचारांच्या तंद्रितुन तो ताडकन जागा झाला. डोळु फाडुन पाहत राहिला.
गेटबाहेर ऊभी केलेलि सायकल आता आतमधे येऊन ति मिलच्या मुख्यद्वारापुढे रस्ताच्या मधोमध ऊभी होति. ते पाहुन तो दचकला. डोक्यात साशंकतेचा भुंगा सैरावरा धावायला लागला.
"चांगलं आठवतेय. सायकल बाहेर ऊभी केलि होती. तेहि कुलुप घालुन. आत कशी आलि?" तो स्वत:शीच पुटपटला. काहि वेळ स्तब्ध होऊन विचारांच्या सागरात ऊठलेले तरंग शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण "सायकल बाहेरच ठेवली होती" हा फायनल निर्णय त्याच्या स्मरणशक्तीने दिला.
अखेर तो जड पावलांनी ऊठला. खालि गेला. सायकलचे कुलुप चेक केले. बंद होते. ईतक्यात त्याचे लक्ष खालि गेले. चेन पडलेलि होती. ती बसवायला तो खालि बसला. त्या कामात व्यस्त असतांना अचानक ऐक डोळे दिपवणारा ऊजेड भपकन त्याच्या पुढ्यात निर्माण झाला. तो झटकन मागे सरकला. एेक हात जमिनीला टेकवुन दुसरा हात त्याने डोळ्यांवर धरला.
हळुहळु प्रकाश दुर होत गेला. ऐक कंदिल आणि त्या पाठोपाठ ऐक मानवी चेहरा त्याच्या द्रुष्टिपथात आला. डोक्याला मुंडासे बांधलेला, चेहर्यावर सुरकुत्या पडलेला, धोतर बंडि घातलेला, ऐक जग जग म्हातारा त्याच्याकडे पाहुन, दात काढत हसत होता. नारायण घाबरला.
"क…...क…….क…….कोण तुम्ही?"
"घाबरु नका मालक. म्या हाय. गेटवरला चौकिदार"
"पण चौकिदार तर मला नेमलाय ईथे"
"अहो मालक मि म्हातारा झालोय. अंग थकलयं. ईथं किमति सामान ठेवलयं. कुणि आलय तं म्या काय करु शकणार? मला कोण घाबरणार? ऐक तरणा गडि म्हणुन तुमास्नी ठेवलं आसलं. अन हो हि सायकलबी म्याच आत आणली. बाहिर कोणाचा काय भरवसा?"
"बरं बरं तो कंदिल मागं घ्या आधि" नारायणच्या जिवात जिव अाला.
"हो मालक. हि माहि खोलि". गेटच्या बाजुला ऐक छोटि खोलि होति. मि ईथचं झोपतो."
नारायण सोबत खोलित गेला. दोघांमधे गप्पा गोष्टी होउन गट्टी जमलि. डबाहि त्यांनी सोबत खाल्ला. काहि वेळाने नारायण आपल्या जागेवर झोपायला निघुन गेला.
ईमारतिच्या अगदि टोकावर बसलेलि ऐक काळि आक्रुति खालिल संपुर्ण द्रुष्य पाहुन दात विचकावित हसत होति.
क्रमश: