कथा : शोध - भाग 01
लेखक : स्वानंद गोगटे
हस्तिनापूर मधून महाराज युधिष्ठीर त्यांचा राज्यकारभार बघत होते. ते आणि त्यांचे चार दिग्विजयी भाऊ मिळून राज्य सांभाळीत असत. महाभारत युद्धानंतर पांडव जरी विजयी झाले असले तरी त्यांनी बरेच दुःख भोगले होते. त्यांची तरुण मुले अश्वत्थामा च्या हातून मारली गेली होती, घरातील वृद्ध आता सन्यासाश्रमात निघून गेले होते पण त्याच वेळी माता गांधारी ने त्यांना दिलेला शाप अजूनही त्यांच्या मनात नागासारखा फणा काढून बसला होता. राज्यकारभार सुरळीत होता पण सुख मात्र नव्हते.
आयुष्यात सर्वकाही प्राप्त होऊन सुद्धा काहीही हाताशी न लागल्याची भावना आता पाचही पांडुपुत्रांच्या मनात होती. आता महाभारत युद्ध होऊनही ३६ वर्ष होऊन गेली होती. तरीही मनातील ती जखम अजूनही भळभळतीच होती.
त्याच वेळी त्यांच्या दरबारात द्वारकेहून दूत आला. श्रीकृष्णाचे अवतारकार्य समाप्त झाल्याची अत्यंत अशुभ बातमी त्याने आणली होती. श्रीकृष्णाच्या मृत्यू नंतर द्वारका नगरी देखील समुद्राखाली गेली होती. अकृराने त्यांना एक गुप्त संदेश दिला होता त्यात त्याने द्वारका ही समुद्रात फिरत राहणार असून कधीही गरज लागली तर मदतीला हजर राहिन असे सांगितले होते. त्याचप्रमाणे एक संपर्क साधण्याचे यंत्र आणि ते कसे वापरायचे याचे निर्देशही दिले होते.
श्रीकृष्ण, पांडवांचा मामेभाऊ, त्यांचा सखा, सल्लागार, रक्षणकर्ता, जीवाला जीव देणारा असा आप्त आता या जगात नाही ही बातमीच पांडवांना जास्त घायाळ करणारी होती. पांचाली साठी तर तिचा जीवच कोणीतरी हिरावून घेतल्यासारखी अवस्था झाली होती. पांचाली ची अब्रू वाचवायला जिथे तिचे पाचही रणधुरंधर पती कमी पडले होते तिथे केशवानेच तिची अब्रू वाचवली होती. अर्जुनही काही वेगळ्या मनस्थितीत नव्हता. आज महाभारताच्या युद्धात अर्जुन जिवंत होता तो केवळ आणि केवळ श्रीकृष्णाच्या रणनीती, चातुर्य आणि दैवी शक्तीच्या जोरावर या बाबत त्याच्या मनात अजिबात द्वंद्व नव्हते. जेव्हा जेव्हा त्याच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण झाली अगदी ती भीष्म पितामहांवर शिखंडी च्या आडून बाण चालवणे असो किंवा निशस्त्र अश्या कर्णावर बाण चालवणे असो किंवा अगदी सुरवातीला आपल्याच आप्तस्वकीयांविरोधात युद्धाला उभे राहणे असो, प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्णानेच त्याला सांभाळले होते, तत्वज्ञान सांगून समजावले होते आणि त्याच्या मनातील संभ्रम दूर केला होता.
आता तोच या जगात नाही तेव्हा आता जगून काय करायचे हाच प्रश्न सर्व पांडवांना पडला होता. हाच विचार घेऊन आज सर्व जण खलबतकक्षात जमले होते. पांचाली देखील होती हजर. युधिष्ठिराने बोलायला सुरुवात केली, "आज केशव आपल्यात नाही, आपल्याला सर्व काही मिळाले आहे पण सुख समाधान मात्र मनाप्रमाणे नाही मिळाले. आता मी सर्वांसमोर असा प्रस्ताव मांडतो आहे की मी हे राजपद सोडून संन्यास घेऊ इच्छितो आणि भीमाने यापुढे राज्यकारभार करावा." युधिष्ठिराचे हे बोलणे ऐकून सर्वच पांडव चकित झाले आणि त्यांनी एकदम बोलायला सुरुवात केली. कुणालाच युधिष्ठिराने घेतलेला हा निर्णय पटला नव्हता. शेवटी पांचालीने सर्वांना शांत केले आणि स्वतः बोलायला सुरुवात केली, "महाराज युधिष्ठिर, आपण घेतलेला निर्णय आपण पूर्ण विचार करूनच घेतला असेल यात वादच नाही, फक्त त्यात एक गोष्ट आपण विसरलात की आपण आणि आपले हे बंधू जरी शरीराने वेगवेगळे असलात तरी मनाने एकच आहात, त्याच प्रमाणे मी आणू तुम्ही पाच जरी शरीराने वेगवेगळे असलो तरी मनाने एकच आहोत. म्हणून आपण जर संन्यास घेऊ इच्छित असाल तर जरूर घ्यावा पण तुमच्याबरोबर आम्ही सर्व सुद्धा हा राजपाट सोडून संन्यास घेऊ आणि तुम्ही जिथे जाल तिथे येऊ." पांचाली च्या या बोलण्यावर सर्व उर्वरित पांडवांनी माना डोलावल्या. युधिष्ठिराने त्यांना समजवायचा पुष्कळ प्रयत्न केला पण ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी सर्वांच्या इच्छेला मान देऊन पाचही पांडव आणि पांचाली अश्या सहा ही जणांनी राजपाट सोडून संन्यास घ्यायचे ठरवले.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या नातवाला म्हणजेच परीक्षितला बोलावले, परीक्षित हा अर्जुनाचा नातू होता. अभिमन्यू आणि उत्तरा यांचा तो मुलगा. सर्व पांडवांनी आपला निर्णय परीक्षिताला सांगितला आणि अमात्यांना बोलावून परीक्षिताच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे परीक्षित हस्तिनापूरचा नवीन सम्राट बनला. युधिष्ठिराने आपल्या हातातील राजदंड परीक्षिताच्या हातात दिला आणि हस्तिनापूरच्या नवीन राजाला प्रणाम केला. युधिष्ठिरामागोमाग सर्व पांडवांनी देखील परीक्षिताला प्रणाम केला. हे बघून परीक्षित बावचळला आणि म्हणाला, "युधिष्ठिर पितामह, आपण वयाने आणि अधिकाराने दोन्हीने आम्हास वरिष्ठ आहात, माझ्यासाठी माझे पाचही आजोबा हे देवासमान आहेत तरी तुम्ही मला असा प्रणाम करून संकोचून टाकू नये."
युधिष्ठिराने सांगितले, " बेटा परीक्षित, हा प्रणाम तुला नव्हता, तर या सिंहासनाला होता. या सिंहसनाला ययाती, महाराज पुरु, महाराज भरत अश्या अनेक श्रेष्ठ आणि महान राजांची परंपरा आहे, त्या परंपरेला हा प्रणाम होता. आम्ही आमच्या परीने ही परंपरा सांभाळली, आता तू देखील या परंपरेचा एक भाग झाला आहेस, तेव्हा आता ही तुझी जबाबदारी आहे की त्या परंपरेचा मान ठेवण्यात तू कुठेही कमी पडणार नाहीस."
युधिष्ठिराचे हे बोलणे ऐकून परीक्षिताने देखील नतमस्तक होऊन त्या सिंहासनाला एकदा प्रणाम केला आणि मगच तो सिंहसनावर विराजमान झाला.
आता युधिष्ठिर आणि बाकीचे पांडव पुढील तयारीला लागले. राजवस्त्र उतरवून ठेऊन त्यांनी भगवी वस्त्र परिधान केली. आणि ते राजवाड्याबाहेर पडणार एवढ्यात भगवान परशुराम तिकडे आले. भगवान परशुरामांना पाहून सर्व पांडव आणि पांचाली थांबले आणि नतमस्तक होऊन उभे राहिले. भगवान परशुरामांनी पांडवांकडे पाहिले आणि अत्यंत क्रोधीत होऊन विचारले, " तुमची दिव्य अस्त्र आणि शस्त्र अशी त्याग करण्याची अनुमती तुम्हाला कोणी दिली ? आपण क्षत्रिय आहात आणि आपण आपली शस्त्रे अशी सहज त्यागू शकत नाही." यावर युधिष्ठिराने अत्यंत नम्र पाने विचारणा केली की ," हे मुनिवर, आपणच आम्हाला मार्गदर्शन करावे की या दिव्य शस्त्रांचे आम्ही काय करावे ते."
परशुरामांनी ध्यान लावले आणि थोड्यावेळाने जागृत होऊन त्यांनी युधिष्ठिराला सांगितले की "तुम्ही तुमची शस्त्रे ही अग्निदेवाच्या स्वाधीन करा, त्याचे पुढे काय करायचे ते अग्निदेव ठरवतील."
त्याप्रमाणे सांगून भगवान परशुराम यांनी मंत्रोच्चार सुरू केले आणि थोड्याच वेळात तिथे साक्षात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेवांनी परशुरामांनी सांगितलेले सर्व ऐकले व म्हणाले, " हे मुनिवर, युधिष्ठिराचे खरे शास्त्र हे त्याचे सत्यवचन हेच होते पण महाभारत युद्धात ते देखील संपले आहे तरीसुद्धा युधिष्ठिर हा भाला खूप सुंदर चालवत असे म्हणूनच त्याचा भाला त्याने मला द्यावा. भिमाची गदा, अर्जुनाचे गांडीव, आणि नकुल सहादेवाची खड्ग त्यांनी माझ्याकडे सोपवावीत. मी या दिव्य शस्त्रांचा केवळ एक पालनकर्ता असेन आणि ज्यावेळी कोणी महान योद्धा वायूदेव आणि महादेव यांना प्रसन्न करून माझ्या पर्यंत पोहचेल त्यालाच आणि फक्त त्यालाच ही शस्त्रे मिळतील." असं बोलून वायूदेव शस्त्रे घेऊन अंतर्धान पावले.
इकडे भगवान परशुरामांनी पांडवांना भगवान केदारनाथाच्या दिशेने जाण्यास सांगितले आणि तिथून पुढे स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान ठेवण्याचे आदेश दिले. पांडवांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मार्गक्रमण सुरू केले. हस्तिनापूर येथून निघाल्यावर सर्वप्रथम त्यांना हरिद्वार येथे गंगेचे दर्शन झाले. त्या ठिकाणी गंगास्नान करून त्यांनी केदारनाथ च्या दिशेने आपली चाल सुरू ठेवली. भगवान केदारनाथाच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि काही काळ मंदिर परिसरातच वास्तव्य केले. त्या ठिकाणी युधिष्ठिराने अनुष्ठान करून स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान ठेवण्याची अनुमती मागितली. त्यानंतर त्यांनी आपला उत्तर दिशेने प्रवास सुरु ठेवला. एक एक करून पांडवांपैकी एक एक पांडव मार्गात प्राण सोडत गेला, त्याला त्याच्या मृत्यूचे कारण युधिष्ठिराने सांगितले पण आपली मार्गक्रमणा सुरूच ठेवली.
सर्वात शेवटी युधिष्ठिराला सुद्धा पेच टाकला देवांनी पण युधिष्ठिराने आपल्या निग्रहाने आणि धर्माच्या पालनाने सर्व अडथळे पार केले आणि स्वर्गात आपल्या आप्तस्वकीयांसोबत जागा मिळवली. महाभारताचा एक अध्याय संपला.
इकडे अग्निदेवाच्या स्वाधीन सर्व दिव्य शस्त्र केल्या नंतर, अग्निदेवांनी वायूदेव आणि महादेव यांच्यासमोर ती शस्त्रे ठेवली आणि त्यांचे पुढे काय करायचे हे सांगितले. त्या प्रमाणे महादेवांनी केदारनाथ परिसरात ती शस्त्रे लपवली आणि आता योध्याची वाट सर्व पाहू लागले की जो ही शस्त्रे धारण करण्यास लायक असेल. ज्याच्या अंगात क्षत्रियाचे रक्त असेल, जो मनाने सच्चा आणि दुसऱ्यांचे भले करणारा असेल, जो आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तयार असेल, जो स्वतःच्या बहादुरीच्या जोरावर या शस्त्रांशिवाय देखील तेवढाच पराक्रम गाजवेल आणि स्वतःचे आणि स्वतःच्या कुळाचे नाव मोठे करेल, त्याचप्रमाणे ज्याचा विविध शस्त्र आणि शास्त्र अश्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास असेल अश्या योध्याची....!!!
अशी वाट पाहत असताना कित्येक शतके लोटली तरी हरकत नव्हती...!!
इसवी सन २०१३ :
जून २०१३ हा महिना कोणीच विसरू शकत नाही, केदारनाथ परिसरात झालेल्या महाप्रलयाचे दृश्य अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीये, विक्रांत अजूनही काहीवेळा दचकून जागा होतो, स्वप्नात त्याला अजूनही बऱ्याचवेळा सगळीकडे पडलेला कचरा, आणि त्याच कचऱ्यात , कचऱ्यासारखी पडलेली माणसांची आणि जनावरांची प्रेत दिसतात.
विक्रांत चे पोस्टिंग मराठा लाईट Infantry मध्ये झाले होते. मेजर जनरल सम्राट भोसले यांचे जेष्ठ चिरंजीव असलेला विक्रांत भोसले आपले NDA चे ट्रेनिंग संपवून लेफ्टनंट विक्रांत म्हणून मराठा लाईट infantry मध्ये २०१० मध्ये रुजू झाला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक मोहीम अंगावर घेत त्याने आपले छाप संपूर्ण बटालियन मध्ये सोडली होती. तीन वर्षात त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर एक प्रमोशन सुद्धा घेतले होते आणि आता कॅप्टन विक्रांत म्हणून तो कार्यरत होता.
ज्यावेळी केदारनाथला ढगफुटी झाली आणि महाप्रलय आला, तेव्हा विक्रांत ची बटालियन उत्तराखंड मध्येच होती. कौसानी येथील कुमाओ बटालियन च्या मुख्यालयात त्यांचे दोन्ही बटालियन चे एकत्र युद्धसराव आयोजित केले होते. असे सराव पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. पण सराव सुरू झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी ही बातमी आली आणि केदारनाथ बचाव मोहिमेसाठी मराठा लाईट infantry ला पाचारण करण्यात आले. विक्रांत आणि त्याची टीम दिवसभर केदारनाथ मंदिर परिसरात फिरून या प्रलयात वाचलेल्या लोकांचा शोध घेत असत, आणि वाचलेले लोक आणि मृत लोकांची प्रेत अश्या दोन्हीना ते हेलिकॉप्टर च्या साहयाने ऋषिकेश ला नेत असत.
दिवसभर अश्या वातावरणात राहिल्याने विक्रांत च्या डोळ्यासमोर सतत तेच येत असे, कित्येक दिवस तो शांत झोपु शकला नव्हता. शिवाजी महाराजांच्या घराण्याचा वारसा सांगणाऱ्या भोसले कुळात जन्माला आलेला विक्रांत तेवढाच भावनिक देखील होता, म्हणूनच शत्रूचा कर्दनकाळ असलेला विक्रांत जखमी आणि निशस्त्र असलेल्या शत्रुसैनिकाला देखील तेवढीच दया दाखवत असे. त्याचमुळे हे केदारनाथ परिसरातील मृत्यूचे तांडव त्याला अस्वस्थ करून सोडत होते.
आता बचावकार्य संपून सुद्धा 3 महिने झाले होते. आता विक्रांत हळूहळू सावरू लागला होता.
त्याला राहून राहून एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत होते ते म्हणजे या महाप्रलयात तग धरून राहिलेले भगवान केदारनाथाचे मंदिर. साधा एक दगड सुद्धा निखळला नव्हता त्या मंदिराचा. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने हा भगवान केदारनाथाचा एक चमत्कारच होता. पण विक्रांत मात्र केवळ चमत्कार आहे असे मानणार्यातला नव्हता. त्याच्या दृष्टीने मंदिराची रचना हा भाग सुद्धा तेवढाच महत्वाचा होता. जरी तो आर्किटेक्ट नसला तरी या मंदिराची रचना अद्भुत आहे हे त्याने ओळखले होते.
आता सुद्धा पहाटे पहाटे त्याला अश्याच एका भयानक स्वप्नाने जाग आली होती. मनावर असलेले दडपण दूर करण्याच्या हेतूने त्याने पायात बूट चढवले आणि पहाटेच्या थंड वातावरणात तो चालत त्याच्या खोलीबाहेर फिरायला लागला. अचानक त्याचा फोन वाजला. विक्रांत ने आश्चर्याने बघितले तर दिल्लीचा नंबर होता. मुळात विक्रांत चा नंबर त्या माणसाला कसा मिळाला हेही एक कोडेच होते, असो, बघू काय बोलतोय ते या उद्देशाने विक्रांत ने फोन उचलला, " हॅलो, कॅप्टन विक्रांत स्पिकिंग"
समोरून आवाज आला, "हॅलो कॅप्टन विक्रांत, मी सुंदरन, भारतीय पुरातत्व खात्याचा प्रमुख आहे, आपली भेट नियोजित झाली आहे, तुम्हाला तसा आदेश तुमच्या मुख्यालयातून मिळेलच. मी स्वतः तुम्हाला भेटायला येत आहे, आपण दुपारी भेटूच"
आता विक्रांत पुरता गोंधळला, कारण भारतीय पुरातत्व खात्याच्या प्रमुखाला एका आर्मी कॅप्टन कडे काय काम असणार हाच प्रश्न त्याच्या डोक्यात होता.
क्रमशः