भाग ०३ : कथा : रामसेतू
ते दोघेही आता रिसेप्शनवर उभे राहून नेव्ही कमांडो ची भूमिका बजावत होते, त्यांना तशाच सूचना मिळाल्या होत्या आणि त्यांच्या पुढील कामगिरीबद्दल अजून सूचना आल्या नव्हत्या.
LTTE जरी श्रीलंकेत वरकरणी संपूर्ण संपुष्टात आली असली तरी त्या संघटनेची पाळेमुळे तामिळ समाजात खोलवर रुजली होती. त्याचमुळे तामिळ लोकांची सहानुभूती अजूनही प्रभाकरन आणि त्याच्या टीम ला होती. प्रभाकरन चा एकच खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी होता तो म्हणजे शिवा, अत्यंत थंड डोक्याचा पण अत्यंत खुनशी आणि कपटी म्हणून प्रसिद्ध शिवा सध्या चेन्नई च्याच एका झोपडपट्टी मधून आपलं काम करत होता. प्रभाकरन जिवंत असताना शिवाच्या च सुपीक डोक्यातून एक अत्यंत घातक अशी तुकडी बनवायची कल्पना आली होती. जपान ने दुसऱ्या महायुद्धात जसे हाराकीरी करणारे म्हणजेच स्वतःहून मृत्यूला कवटाळणारे पण अत्यंत कडवे आणि विचारसरणीला पक्के असे सैनिक वापरले आणि अमेरिकेचा पर्ल हार्बर हा नौसेनेचा तळ उध्वस्त केला होता, त्याच धर्तीवर ही तुकडी होती. या तुकडी मधील सैनिकांचे पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले जाई, त्यांचे अत्यंत खडतर असे प्रशिक्षण होई.
त्यांचे कोणतेही पाश मागे राहून त्यांना सोपावलेल्या कार्यात अडथळा होऊ नये म्हणून त्यांच्या प्रशिक्षणाचा सर्वात शेवटी त्यांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयपणे त्यांच्या स्वतःच्या परिवाराला संपवण्याची कामगिरी देण्यात येई. जो हे काम करू शकेल तोच या घातक तुकडीचा सदस्य होई.
राजवीर वर हल्ला केलेले दोघेही, चंद्रा आणि सुर्या हे दोघेही अश्याच घातक तुकडीचा हिस्सा होते. त्या दोघांनाही मरणाचे भय नव्हते. पकडले गेलो तर ते सरळ मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होते. तसेच समजा दोघांपैकी एकजरी पकडला गेला तरी दुसर्याने कुठलाही विचार न करता पकडल्या गेलेल्या व्यक्तीला ठार करायचे असा नियमच शिवाने घालून दिला होता. जेणेकरून कुठलाही ट्रेस पोलीस किंवा अन्य सैनिकी दलांना शिवा पर्यंत पोहचवू शकणार नाही याची काळजी घेतलेली होती.
राजवीर च्या मोहिमेबद्दल शिवाला आधी पासूनच माहिती होत, कारण ज्या रामसेतू बद्दल ते या मोहिमेत काम करत होते त्याच भागात किंवा त्याच समुद्रातून शिवा च्या फेऱ्या श्रीलंकेत होत असत, जीवावर उदार होऊन, खुल्या समुद्रात, भारतीय आणि श्रीलंकन दोन्ही नौदलाच्या ताफ्याना चुकवून असंख्य वेळा शिवा श्रीलंकेत गेला होता आणि तिकडून भारतात आला होता. जर का उद्या राजवीर ची मोहीम यशस्वी झाली असती तर शिवा च्या श्रीलंकेत जाण्यायेण्यावर अनेक बंधन आली असती किंवा अनेक अडथळे आले असते म्हणूनच शिवा ने आपल्या दोन सर्वोत्तम माणसांना राजवीर आणि त्याच्या टीमला मार्गातून दूर करण्यासाठी पाठवले होते.
चंद्रा आणि सूर्याला एकदम साध्या सूचना होत्या, राजवीर आणि त्याच्या टीम ला जीवे मारण्याच्या. आता हे काम ते कसे करणार याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना होते. शिवाला फक्त काम झाल्याशी मतलब होते.
इकडे मिटिंग रूम मध्ये चर्चा सुरूच होती. सुंदरन ने पुढे बोलायला सुरुवात केली, "या मोहिमेचा मुख्य उद्देश हा रामसेतू चा संपूर्ण अभ्यास करणं, या शिल्पांमध्ये दाखवलेल्या त्या काठीचा शोध घेणं, आणि शक्य झाल्यास परत एकदा रामसेतू समुद्राच्या पृष्ठभागावर आणून दाखवणं हा आहे. त्या साठी आपल्याला सुरवात ही चेन्नई मधूनच करावी लागेल. चेन्नई मध्येच एक इतिहासाचे प्रोफेसर आहेत त्यांनी देखील या विषयात बरेच संशोधन केले आहे असे आम्हाला समजले आहे. तरी आपण लगेच त्यांना भेटायला जायचे आहे."
असे म्हणून सुंदरन आणि राघव ने सर्वांना चलण्याचा इशारा केला आणि पुढच्या 10 मिनिटात ते सर्व दोन गाड्यांमध्ये बसून निघाले होते.
राजवीर ला परत एकदा शंका आली होती, त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या नौदलाच्या कमांडो पैकी दोघे त्याला वेगळे वाटले होते, त्यांचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला होता. त्यांना कुठे बघितलं आहे हे त्याला आठवत नव्हते पण त्याच्या मनात शंकेची पाल जरूर चुकचुकली होती.
सुमारे पंधरा मिनिटांच्या ड्राइव्ह नंतर सर्व जण एका जुन्या घरासमोर उभे होते. त्या घराच्या एकंदर अवस्थेवरून तिकडे कोणी राहत असेल की नाही अशी शंका सुद्धा सर्वांच्या मनात आली, पण तेवढ्यात दरवाजा उघडून एक वयस्कर गृहस्थ बाहेर आले आणि त्यांनी सर्वांचे हसून स्वागत केले. सुंदरन ने ओळख करून दिली, "हे प्रोफेसर राजशेखर, चेन्नई च्या एडवर्ड महाविद्यालयात हे इतिहासाचे प्रोफेसर होते त्याच प्रमाणे भारतीय पुरातत्व खात्याच्या विविध शोध मोहिमांमध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी हे कायमच हजर होते"
प्रोफेसर राजशेखर नी सर्वांना नमस्कार केला आणि घरात घेऊन गेले. घर एकदम साधं होत, बऱ्याच दिवसात तिकडे साधी साफसफाई झाल्याचे देखील चिन्ह नव्हते. प्रोफेसर सर्वांना त्यांच्या अभ्यासिकेत घेऊन गेले. अभ्यासिका कसली, एक लायब्ररी च होती जणू ती, सगळ्या भिंतीवर अगदी छतापर्यंत उंच अशी कपाट होती आणि त्यात असंख्य ग्रंथ नीट रचून ठेवलेले होते. खोलीच्या मधोमध एक टेबल होत आणि त्यावर सुद्धा पुस्तकांचा ढीग होता.
प्रोफेसर म्हणाले, "सुंदरन चा कॉल आला त्या नंतर लगेचच मी आपल्याला आवश्यक ते सर्व बाहेर काढून ठेवलं, उगाच वेळ जायला नको"
असं म्हणून त्यांनी एक जाडजूड पुस्तक हातात घेतल आणि बोलायला सुरुवात केली. "माझ्या अभ्यासानुसार धनुष्यकोडी पर्यंत सर्वसामान्य माणसांना जाता येत पण त्याच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही, पण खरा रामसेतू त्याच्या पुढेच सुरू होतो. आता आपल्यासमोर मी एक नकाशा ठेवणार आहे, हा नकाशा मला तामिळनाडूच्या जंगली भागात असलेल्या एका आदिवासी जमाती कडून प्राप्त झाला. त्यांच्या मते हा नकाशा श्रीरामाचा प्रसाद आहे"
राजवीर ने विचारलं, "पण त्या आदिवासींकडे हा नकाशा कुठून आला?"
प्रोफेसर म्हणाले, "मुळात एक सांगा, की भगवान श्रीरामाला लंकेत जाऊन रावणाला ठरवण्यासाठी कोणी साहाय्य केले ?"
"कोणी म्हणजे काय ? वानरांनी म्हणजेच माकडांनी" हरीश आणि हर्षल एकत्रच बोलले.
प्रोफेसर हसत हसत म्हणाले, "आता मला सांगा, उत्क्रांतीच्या नियमानुसार माकडा पासून मानव तयार व्हायला काही लाख वर्षे कमीत कमी लागली, आता रामायणाचा काळ बघितला तर तो आज पासून साधारण 10000 वर्षे आधीचा आहे, मग मला सांगा एवढ्या कमी कालावधीत ती वानरे किंवा माकडे गेली कुठे? त्यांक्सचे एवढ्या कमी कालावधीत मानवात तर रूपांतर नाही होऊ शकत नाही, मग त्या वानरसेनेचे काय झाले?"
कोणीच काही बोलले नाही. प्रोफेसरच मग बोलू लागले, "मुळात भगवान श्रीरामाला मदत करणारी वानरे होती हा समज आपण काढून टाकला पाहिजे आपल्या डोक्यातून. ते सुद्धा मानवच होते, आणि जंगलात राहणारे आदिवासी किंवा ज्यांना वनवासी म्हणतो ते होते. राग नका मानू पण उत्तर भारतीय लोकांनी दक्षिण भारतातील वर्णाने काळ्या, मोठा चेहरा असलेल्या, वनात राहणाऱ्या लोकांना सरळ सरळ वानर किंवा माकड म्हणून टाकलं, असो, तर हा नकाशा मला अश्याच एका वनवासी जमातीतून मिळाला. गेल्या कित्येक पिढ्या हा नकाशा त्यांच्या कडे पूजेत आहे. त्यांच्या मानण्या नुसार हा नकाशा त्यांना भगवान श्री रामाने दिला आहे. आता या गोष्टीत मला तथ्य वाटत नसले तरी हा नकाशा सुमारे दीड हजार वर्षे जुना आहे हे नक्की, आम्ही या नकाशाच्या कागदाचे कार्बन डेटिंग करून पाहिले आहे."
"आपण या नकाशात नीट पाहिले तर आपल्याला यात दिसते की यात एक ओम काढलेला दिसतो. असे मानून चालूया की हा ओम एक हिंदू देवस्थान दर्शवतो, पण त्याच्या शेजारी वक्राकार रेषा काढली आहे ती काय आहे ते कळत नाहीये. आणि या ओम पासून एक दुसरी सरळ रेषा या वक्राकार रेषेला छेदून जाते आहे आणि एका जागी थांबते आहे. त्या ठिकाणी आपल्याला अनेक छोटी छोटी वर्तुळ दिसत आहेत, त्या वर्तुळांमधून ती रेषा सरळ एका छोट्या त्रिकोणाकडे गेली आहे आणि तिथून परत डावीकडे फिरून सरळ"
हरीश जो स्वतः नकाशा तज्ञ होता त्याने एकाग्र पणे तो नकाशा पाहायला सुरवात केली. खरं म्हणजे कोणाच्याच डोक्यात काहीही प्रकाश पडत नव्हता. अचानक हरीश ने जोरात येस असे ओरडून स्वतःचा लॅपटॉप चा स्क्रीन सर्वांसमोर केला. त्यावर सर्वांना रामेश्वरम चा नकाशा दिसत होता. हरीश ने सांगितले, "तो जो ओम आहे तो रामेश्वरम मंदिराच्या जागी आहे असे मानले तर आपलं काम सोपं होतंय. ती जी वक्राकार रेषा आहे ती आपला समुद्र तट आहे, जो रामेश्वरम मंदिराच्या जवळ आहे. आता या मॅप मध्ये जी सरळ रेषा काढली आहे ती मार्ग दाखवते आणि त्यानुसार हा मार्ग समुद्रात जातो. आता ती जी वर्तुळ काढली आहेत त्या ठिकाणी काहीही असू शकते कारण तो खोल समुद्राचा भाग आहे, त्या ठिकाणी समुद्र सुमारे 150 ते 200 मीटर खोल आहे. कदाचित तिकडे एखादा भवरा असेल पाण्यात किंवा एखादा खड्डा असेल समुद्राच्या तळाशी, काहीही असू शकते. त्या वर्तुळापासून रेषा निघून ज्या त्रिकोणापाशी येते तो धनुष्यकोडी चा त्रिकोण आहे. आणि तिथूनच पुढे रामसेतू सुरू होतो. कदाचित आपल्याला रामसेतुपर्यंत जाण्यासाठी हा नकाशाच उपयोगी पडेल."
हरीश चे बोलणे संपल्यावर सर्वांनाच उत्साह आला होता. सर्वजण ताबडतोब निघाले, राजवीर ने पुढे होऊन अभ्यासिकेचा दरवाजा उघडला आणि समोर उभा असलेल्या कमांडोला बघून तो दचकला, हा त्या दोन अनोळखी कमांडो पैकीच एक होता, राजवीर ने प्रश्नांर्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने हसून काही नाही अश्या अर्थाने मान हलवली आणि परत गाडीत जाऊन बसला. इकडे राजवीर आणि मंडळी पण गाडीत बसली आणि सरळ रामेश्वरम च्या दिशेने निघाले.
सूर्याच्या खिशात असलेल्या मोबाईल वर अचानक एक मेसेज आला, त्यामध्ये प्रोफेसरकडचा नकाशा ताब्यात घेण्याच्या सूचना होत्या. आणि नकाशा ताब्यात आलाय नंतर प्रोफेसर आणि बाकीच्यांना संपवण्यासाठी सांगण्यात आले होते. सूर्याने तो मेसेज चंद्रा ला दाखवला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून मान हलवली.
राजवीर त्याच गाफीत बसला होता. त्याचे लक्ष या दोन कमांडोकडेच होत. गाडीच्या मधल्या आरश्या मधून त्याला मागे गाडीत काय चालू आहे ते दिसत होतं, या दोन्ही कमांडो चे काहीतरी वेगळे चालू आहे आणि आपल्याला या दोघांपासून सावध राहायला लागेल याची राजवीर ला जवळ जवळ खात्री पटली होती.
दोन्ही गाड्या आता चेन्नई शहर सोडून हायवे वरून सुसाट धावत होत्या. सुमारे 10 तासांच्या प्रवासानंतर ते सर्वजण रामेश्वरम ला पोहचले. आल्या आल्या देवळात जाऊन चेक करायचे कोणालाच त्राण नसल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जायचा निर्णय घेतला.
त्या नंतर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये आराम करायला गेले. प्रोफेसर कुठल्या रूम मध्ये आहे हे बघून सुर्या आणि चंद्रा ने त्या खोलीच्या बाहेर पहारा देण्याची ड्युटी मिळवली. आता त्यांना जे काही करायचे होते ते आजच्याच रात्री करायचे होते, हे त्यांना कळून चुकले होते. त्याचप्रमाणे राजवीर ला आपला कदाचित संशय आला आहे याची कुणकुण देखील सूर्याला वाटत होती. पण त्यांना ज्या सूचना आल्या होत्या त्या नुसार केवळ नकाशा हस्तगत करणे आणि मग सर्वांना संपवणे हे एवढेच त्यांना दिसत होते.
क्रमशः