कथा : रामसेतू - भाग 02
लेखक : स्वानंद गोगटे
विमानतळावरून गाड्या निघत असतानाच राजवीर च्या तीक्ष्ण डोळ्यांना एक प्रकार नजरेस आला. प्रथमदर्शनी म्हाताऱ्या वाटणाऱ्या दोन व्यक्ती सतत राजवीर आणि टीम च्या हालचालींवर लक्ष ठेऊन होत्या. दिसायला जरी म्हातारे वाटले तरी अंगापिंडाने ते दोघेही मजबूत होते. विशाखापट्टणम पासूनच ते दोघे यांच्या मागे होते, आणि आपापसात ते एकदम हळू आवाजात बोलत होते. जशी राजवीर ची गाडी विमानतळावरून निघाली तशीच दुसरी एक गाडी सुद्धा राजवीर च्या गाडीच्या मागे निघाली. ते दोन म्हातारे या दुसऱ्या गाडी मध्ये होते. आता राजवीर ची खात्री झाली की नक्कीच यात काहीतरी काळंबेर आहे. अजून त्याने त्याच्या टीम ला या बद्दल काहीही सांगितले नव्हते. पण त्याने आपल्या टीम ला सावध राहायला सांगितले आणि स्वतः आरशामधून पाठलाग करणाऱ्या गाडीवर लक्ष ठेऊ लागला. साधारण 15 मिनिटांच्या ड्राइव्ह नंतर ते सर्व त्यांच्या नियोजित हॉटेल पाशी पोहचले. राजवीर ने गाडीतून उतरताना पाहिले तर ती गाडी त्यांच्या गाडीच्या मागेच होती आणि अचानक दोन पैकी एक म्हातारा खिडकी च्या बाहेर आला, त्याच्या हातात रिव्हॉल्व्हर होते आणि निशाणा होता हरीश वर. राजवीर ने चपळाई करून हरीश ला खाली ढकलले म्हणून तो सुसाट आलेल्या रिव्हॉल्व्हर च्या गोळी पासून वाचला. राजवीर ताबडतोब त्या म्हाताऱ्याच्या दिशेने धावणार होता पण त्या गाडीतल्या म्हाताऱ्याने राजवीर च्या दिशेने सुद्धा काही गोळ्या झाडल्या. त्यामुळे राजवीर ला आडोशाला थांबावे लागले. या संधीचा फायदा घेऊन ती गाडी आणि त्यातील ते म्हातारे पळून गेले.
राजवीर ला आणि टीम ला काहीच कळत नव्हते. अचानक त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि तो कोणी केला आणि का केला याचा काहीही संदर्भ त्यांना लागत नव्हता.
हॉटेल च्या स्टाफ ने तो पर्यंत पोलिसांना फोन केला होता. त्याप्रमाणे स्थानिक पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी राजवीर आणि टीम ची चौकशी केली, पण नौदलाचे अधिकारी असल्याने त्यांना आधी नौदलाच्या स्थानिक ऑफिस मध्ये कळवणे भाग होते. त्याप्रमाणे त्यांनी कळवले. राजवीर ने त्या दुसऱ्या गाडीचा नंबर आधीच नोट करून ठेवला होता, तो त्याने स्थानिक पोलिसांना दिला, राजवीर ला खात्री होती की तो नंबर खोटा असेल म्हणून, तरीसुद्धा त्याने त्याच्याबाजूने जेवढे सहकार्य करता येईल तेवढे केले. पण त्याच्या डोक्यातून हा प्रसंग काही केल्या जात नव्हता. त्याने ताबडतोब विशाखापट्टणम ला कॉल करून आपल्या वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. राजवीर ला काळजी घेण्यास सांगून त्याच्या टीम ला नौदलाच्या कमांडो चे संरक्षण पुरवण्याचे सांगण्यात आले.
राजवीर आणि टीम वर हल्ला केल्यानंतर ती गाडी सरळ चेन्नई सेंट्रल या रेल्वे स्टेशन जवळ गेली. तिथे गाडीत बसलेल्या दोन म्हाताऱ्यांना सोडून गाडी निघून गेली. त्या दोघा म्हाताऱ्या माणसांनी चहूबाजूला पाहिले, कोणाचे लक्ष नाही असे बघत हळू हळू स्टेशन वरील प्रसाधनगृह गाठले, पाच मिनिटांनंतर प्रसाधनगृहातून 2 तगड्या तरुणांनी बाहेर पाय ठेवला. त्यांच्या अंगावर पांढरा टीशर्ट आणि काळी जीन्स होती. डोळ्यांवर काळे गॉगल होते. डोक्यावर मिलिटरी रंगाची टोपी होती, कुणालाही ते मिलिटरी चे जवान वाटले असते. त्यांच्यातल्या एकाने आपल्या खिशातून एक फोन काढला. अत्यंत जुना असा तो नोकिया 3310 फोन होता. त्याने त्या फोनमधून एक नंबर डायल केला., दुसऱ्या रिंगलाच फोन उचलला गेला, समोरून कोणीच बोलले नाही पण या माणसाने झालेले सर्व कथन केले आणि पुढील सूचनेची वाट पाहू लागला. मध्ये एक 15 सेकंदाच्या पॉज नंतर त्यांना ताबडतोब चेन्नई सेंट्रल स्टेशन च्या बाहेर उभ्या असलेल्या एका काळ्या गाडीत बसायला सांगितले. त्याचबरोबर हा वापरत असलेला फोन आणि सिम कार्ड नष्ट करायला सांगण्यात आले.
गाडीत बसल्यावर त्यांच्या ड्रायव्हर ने त्यांना एक लिफाफा दिला. त्या लिफाफ्यात दोघांचेही नेव्ही कमांडो चे ओळखपत्र, कमांडो टीम मध्ये जॉईन होण्याचे लेखी पत्र होते. तसेच एक दुसरा नोकिया 3310 फोन त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर नेव्ही कमांडो चे कपडे सुद्धा देण्यात आले. या दोघांनी गाडीतच कपडे बदलले, ओळखपत्र खिशात ठेवले आणि नेमणुकीचे पत्र हातात ठेवले. त्यांच्या ड्रायव्हर ने त्यांना एक फोन लावून दिला. समोरून त्यांना तामिळ मध्ये सूचना मिळत होत्या, बहुतेक या दोघांना तामिळ येत असावे, कारण त्या सूचना ऐकल्यावर होकारार्थी माना ते हलवत होते. त्या दोघांनाही राजवीर ज्या हॉटेल मध्ये उतरला आहे त्या हॉटेल मध्ये जाऊन नेव्ही कमांडो च्या टीम मध्ये जॉईन व्हायचे होते आणि पुढील सूचना मिळेपर्यंत एक नेव्ही कमांडो म्हणूनच राहायचे होते.
तसेच त्यांना शेवटची सूचना इंग्रजी मध्ये दिली, "Eliminate the driver once you reach hotel." बहुदा ड्रायव्हर ला इंग्रजी येत नसावे. त्या दोघांनीही हसून तामिळ मध्ये ड्रायव्हर ला हॉटेल कडे गाडी न्यायला सांगितली. हॉटेल पासून सुमारे अर्धा किलोमीटर आधीच गाडी थांबवायला सांगितली, रस्ता सुनसान आहे हे बघून दोघेही खाली उतरले आणि ड्रायव्हर ला काही कळायच्या आतच त्या दोघांनी आपल्याकडील सायलेन्सर लावलेल्या गन मधून 6 गोळ्या ड्रायव्हर च्या आरपार केल्या. ड्रायव्हर ने जागीच आपले प्राण सोडले.
त्या नंतर ते दोघेही चालत हॉटेल पाशी गेले. तिकडे हॉटेल च्या गेट वरतीच नेव्ही चे कमांडो होते. त्या कमांडोच्या अधिकाऱ्याला भेटून त्यांनी नेमणूक पत्र त्याला दिले आणि त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हॉटेलच्या रिसेप्शन एरिया मध्ये ड्युटी करायला लागले.
राजवीर आणि टीम ने रूम मध्ये गेल्यावर लगेच राघव आणि सुंदरन ना कॉल लावला आणि तिथल्या परिस्थिती ची जाणीव करून दिली. आणि सावधगिरी बाळगत येण्याची सूचना केली. त्याचवेळी राजवीर च्या खोलीचा दरवाजा उघडून राघव आणि सुंदरन आत आले, आणि हसत हसत राघव ने फोन कट केला. राजवीर च्या येण्या अगोदरच राघव आणि सुंदरन हॉटेल मध्ये आले होते.
त्यांनी लगेच रिसेप्शन वर फोन करून एक मिटिंग रूम बुक केली आणि सर्वजण त्या रूम कडे निघाले. रूम मध्ये पोहोचल्यावर सुंदरन ने आपला लॅपटॉप स्क्रीन ला कनेक्ट केला. स्क्रीन वर एका क्षणात एका भिंतीचा फोटो आला. सुंदरन बोलू लागला ," हीच ती केदारनाथ मंदिरातील भिंत. तुम्ही बघाल तर यावर सर्वात वरच्या ओळीत भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमानजी दिसत आहेत, सीता माता नाहीयेत कारण त्या लंकेत असणार, दुसऱ्या ओळीत ही वानरे हातात दगड घेऊन जात आहेत. तिसऱ्या ओळीत थोडं वेगळं चित्र आहे. नॉर्मली वानरांनी श्रीरामाचे नाव घेऊन दगड पाण्यात टाकले आणि मग ते तरंगले अशी गोष्ट आपण ऐकतो किंवा वाचतो. पण इथे तुम्ही बघाल तर समुद्रकिनारी सर्व दगड नुसते आणून ठेवलेले दिसतात आणि समुद्राच्या बाजूला बघाल तर बोटीसारखे काहीतरी दिसते ज्यावर क्रेनसदृश्य यंत्र आहे आणि त्याच्या मध्ये एक दगड अडकवलेला आहे असं दिसतंय, आता या चित्राचा अर्थ आम्ही असा काढला आहे की वानरांनी ते दगड समुद्र किनाऱ्यावर आणल्यावर त्यांच्यातीलच काही प्रगत वानरांनी यांत्रिक क्रेन जी त्यांनी बोटीवर उभी केली होती त्याच्या मदतीने हा पूल बांधला."
या वर राजवीर म्हणाला, "पण केवळ या एका पुराव्यावर किंवा शिल्पावर म्हणा, तुम्ही ही मोहीम आखली आहे का ?"
या वर राघव ने बोलायला सुरुवात केली. " नाही, नुसता हा एकच पुरावा नाहीये, अजूनही आहेत बरेच. आता ही चौथी ओळ पहा, यात चक्क एक कविता लिहिली आहे आणि तीही तामिळ मध्ये, तुमच्या माहिती साठी हा त्याचा देवनागरी अनुवाद,
'नल और निल , उठाए अपने कदम
हर दस गज की दूरी पर रखे एक निशान
बीचमे रखे चट्टान और रेत का अनोखा संगम
बना दिया सेतु , लंकापति की मिट गयी शान
आता या कवितेनुसार आम्ही चेक केलं तर खरच प्रत्येक एक गज म्हणजेच साधारण नऊ मीटर अंतरावर आम्हाला संपूर्ण रामसेतू मध्ये दगडांचे खांब दिसून आले आहेत, आता ते खांब म्हणून दिसत नाहीयेत पण आपण नीट बघितलं तर ते दगड इतर तिथल्या दगडांपेक्षा वेगळे आहेत, वेगळे अशासाठी की त्या दगडांची रचना ही सेतूच्या आतल्या बाजूला सपाट आणि बाहेरच्या बाजूने टोकेरी अशी आहे. आणि असे दगड आपल्याला प्रत्येक नऊ मीटर अंतरावर धनुष्यकोडी ते श्रीलंका येथपर्यंत दिसतात. आता तुम्ही म्हणाल त्यात नवल काय तर हे जे तंत्रज्ञान आहे ते पूर्णपणे मानवी आहे, कारण समुद्रात नैसर्गिकरित्या जेव्हा दगडांची झीज होते त्यात असे एका बाजूला सपाट आणि एका बाजूला टोकेरी असे दगड नाही बनत, बाहेरची बाजू टोकेरी असण्याचे एक कारण मला असे दिसते की जेव्हा हा सेतू पाण्याच्या वर असेल तेव्हा त्यावर दोन्ही बाजूने लाटा आदळत असतील, आणि टोकेरी खांब असल्यामुळे लाट फुटत असेल आणि पुलाला त्याचा त्रास होत नसेल."
"आता सगळ्यात शेवटची ओळ नीट पहा या शिल्पांमधील, त्यात तुम्हाला काय दिसत आहे?, कोणी सांगेल, हर्षल?"
हर्षल ने स्क्रीन च्या जवळ जाऊन नीट काळजीपूर्वक बघत बोलायला सुरुवात केली, "यात सेतू पूर्ण बांधून झालेला दिसत आहे, आणि वानरसेना त्यावरून जाताना दिसत आहे. सर्वात पुढे श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमानजी आहेत"
हर्षल एवढं बोलून जागेवर आला, आणि त्याचवेळी राजवीर जो एव्हढा वेळ निरीक्षण करत होता त्याने बोलायला सुरुवात केली, "पण जर सगळी वानरसेना या ब्रिज किंवा सेतू वरून लंकेत गेली तर हे मागे सेनेपासून काही अंतरावर दोघे कोण उभे आहेत आणि त्यांच्या हातात हा दांडका कसला आहे, त्यांच्या बाजूला मागे हे एक मंदिर दिसत आहे"
सुंदरन ने बोलायला सुरुवात केली, "राजवीर तुझी निरीक्षणशक्ती खरच छान आहे, ते जे दोघे आहेत ते आमच्या मते नल आणि निल आहेत जे श्रीरामाच्या वानरसेनेमधील अभियंते किंवा इंजिनिअर होते आणि सेतू बांधण्याचे सगळं क्रेडिट सर्व पुस्तकांमधून या दोघांनाच दिल आहे अगदी वाल्मिकी रामयणापासून ते तुलसीदासजीं च्या रामयणा पर्यंत. त्यांच्या हातात जो दांडका दिसत आहे तो कदाचित एक औजार किंवा एक लिव्हर आहे ज्याच्या मदतीने हा पूल किंवा सेतू समुद्रावर तरंगत ठेवला आहे. मागे जे मंदिर दिसतंय ते बहुतेक रामेश्वरम मंदिर असेल"
"पण रामेश्वरम मंदिर रामायण कालीन आहे असे पुरावे kuthe aahet" हरीश ने प्रश्न विचारला, त्यावर राघव बोलला, "पण ही भिंत रामायण कालीन आहे असे कुठे आम्ही बोललो, ही भिंत साधारणपणे 1100 वर्ष जुनी आहे. आताचे जे रामेश्वरम मंदिर आहे ते १२व्या शतकात पंड्या राजघराण्यातील राजांनी बांधलं, पण त्याच्या आधीपासून रामेश्वरम मंदिर हे होतंच, पंड्या राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला." त्याचमुळे या 1100 वर्ष जुन्या शिल्पांमध्ये रामेश्वरम मंदिर असणे यात गैर अजिबात नाही."
"आतापर्यंत आपण जे काही बोललो ते केवळ या भिंतीवरील शिल्पांचा मदतीने बोललो" सुंदरन ने पुढे बोलायला सुरुवात केली, "पण आता आपण मुख्य पुराव्याकडे येऊया. आपणा सर्वांना माहिती आहेच की अयोध्या येथे राम मंदिराची जागा ही कित्येक शतके बाबरी मशीद म्हणून ओळखली जाते असे, पण त्याच्या आधी अयोध्येत भव्य असे राम मंदिर होते. न्यायालयाच्या आदेशाने जेव्हा भारतीय पुरातत्व खात्याने या परिसरात उत्खनन केले तेव्हा त्यांना मंदिर असल्याचे कित्येक पुरावे मिळाले पण त्याच बरोबर अजून गोष्ट मिळाली ती म्हणजे एक रेशमी वस्त्र आणि त्यावर लिहिलेल एक आमंत्रण. साधारणपणे 13 व्या शतकाच्या शेवटी आलेले ते आमंत्रण होते महारावल रतनसिंह यांच्या लग्नाचे. आपल्या भारतात आपण लग्नकार्याच्या आधी देवळात जाऊन पत्रिका ठेवतो तशीच ही पत्रिका. या पत्रिकेत स्पष्टपणे रामसेतू चा उल्लेख आढळतो की महारावल रतन सिंह आणि महाराणी पद्मिनी यांची वरात रामसेतुवरून रामेश्वरम येथपर्यंत आली आणि मग तिथून महाराणी पद्मिनी चे पिता परत श्रीलंकेत गेले."
"आता जर का रामसेतू अस्तित्वात च नसता तर ही वरात आली कुठून?"
राजवीर आता खरच विचारात पडला, त्याला त्याच्यासमोर काय मोहीम आहे ते कळून चुकलं होत पण सुरवात कुठून करावी हे कळत नव्हतं. त्यातच त्याच्या डोक्यातून त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचे विचार जात नव्हते. कधी नव्हे ते राजवीर गोंधळून गेला होता.
क्रमशः