कथा : रामसेतू
रात्री सगळीकडे शांतता पसरली होती. आज सर्वांनी जेवणं खोलीतच मागवली होती. त्यामुळे कोणी खोलीबाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता. प्रत्येक खोलीबाहेर कमांडो उभेच होते. त्यामुळे सुरक्षा सुद्धा अगदी चोख होती.
रात्री सुमारे 01.00 च्या सुमारास चंद्रा आणि सुर्या ने आजूबाजूचा अंदाज घेऊन आपल्याकडील मास्टर चावीने प्रोफेसरांच्या खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत सर्वत्र अंधार होता, चंद्रा आणि सूर्याने अलगद खोलीत प्रवेश केला, हातातील टॉर्च त्यांनी सगळीकडे मारला. बेड वर त्यांना एक व्यक्ती झोपलेली दिसली. प्रोफेसर बहुदा गाढ झोपेत होते. सूर्याने त्याच्या जवळील गन ला सायलेन्सर लावला आणि प्रोफेसरांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. अंधार होता त्या मुळे गोळ्या प्रोफेसरला लागल्या आहाइत की नाही हे चेक करायला चंद्रा ने खोलीतील दिवा लावला.
समोरील दृश्य बघून ते चकित झाले. बेडवर ते ज्याला एक व्यक्ती किंवा प्रोफेसर झोपले आहेत असे समजत होते त्या ठिकाणी प्रत्यक्षात उशा रचून तसा आभास निर्माण करण्यात आला होता. प्रोफेसर खोलीत नव्हतेच. सूर्याने वैतागून खोलीत शोधाशोध सुरू केली. प्रोफेसर चे सामान खोलीतच होते पण प्रोफेसर खोलीतून गायब झाले होते. त्याच प्रमाणे तो नकाशा देखील खोलीतून गायब होता. आता शिवा ला हे सर्व कसे सांगायचे हाच प्रश्न दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. दरवाज्याबाहेर आपण दोघे उभे असताना, प्रोफेसर खोलीतून गायब झालेच कसे हा प्रश्न दोघांनाही पडला होता. आणि या सर्वामध्ये राजवीर चा हात नक्की होता हे पण त्यांनी ओळखले होते. राजवीर त्यांनी कल्पना केली होती त्यापेक्षा ही जास्त हुशार निघाला होता.
जेव्हा सर्वजण आपापल्या खोलीत गेले तेव्हा इकडे राजवीर ने मुद्दाम आपली खोली प्रोफेसरांच्या खोलीपासून लांबची घेतली होती. सर्वजण झोपायला गेल्यावर त्याने खोलीत जाऊन पोर्टेबल टेलिपोर्टर बाहेर काढला. तो आपल्या मनगटावर बांधून राजवीर सरळ प्रोफेसरांच्या खोलीत दाखल झाला. आल्यावर त्याने त्याचा संशय प्रोफेसरांना बोलून दाखवला आणि त्यांच्या खोलीबाहेर उभे असलेले नेव्हल कमांडो थोडे संशयास्पद वागत असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्या नंतर राजवीर ने तो टेलिपोर्टर, प्रोफेसरांच्या हातावर बांधला आणि स्वतःच्या खोलीचे लोकेशन त्यात फीड करून बटन दाबले. त्या नंतर स्वतः बाल्कनी मधील रेलिंग चा आधार घेऊन शेजारच्या खोलीत जिथे सुंदरन आणि राघव होते त्या खोलीत गेला आणि मग चंद्रा आणि सुर्या प्रोफेसरांच्या खोलीत शिरल्याची वेळ साधून तो आपल्या खोलीत आला. येताना त्याने सुंदरन आणि राघव ला उठवून बरोबर आणायला विसरला नव्हता.
खोलीत आल्या आल्या त्याने हरीश आणि हर्षल ला बोलावून घेतले आणि संभाव्य धोक्याची बातमी त्यांना दिली. त्या सर्वांनी ताबडतोब हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला. फक्त ते करण्यात एक धोका हा होता की ते हॉटेल सोडताना त्यांच्या नेव्ही कमांडो ना सांगावे लागलेच असते आणि ते वायरलेस वरून चंद्रा आणि सूर्याला देखील कळले असते. राजवीर आता तो धोका पत्करायला तयार नव्हता. तसेपण प्रोफेसर खोलीत नाहीत हे कळल्यावर चंद्रा आणि सुर्या कसून या सर्वांचा शोध घेणार हे उघडच होते. त्यामुळे या सहा जणांनी एक एक करत रिसेप्शन पाशी जाऊन हळूच हॉटेल बाहेर गेले आणि हॉटेल सोडले. रात्री दीड वाजता सर्वजण हॉटेल पासून चालत , लपत छपत रामेश्वरम मंदिराच्या दिशेने चालले होते. आता नेव्ही च्या कोणत्याच अधिकाऱ्याला किंवा व्यवस्थेला या मोहिमेत सामील करून घेता आले नसते. कारण तो निरोप कोणत्याही मार्गाने त्यांच्या शत्रू पर्यंत पोहचलाच असता.
राजवीर ने फक्त एक खबरदारी म्हणूंत्यांच्या विशाखापट्टणम येथील वरिष्ठ अधीकार्यांच्या कानावर ही गोष्ट घालून ठेवली आणि अगदीच काही मदत लागली तर करण्यासाठी सांगितले.
इकडे सुर्या आणि चंद्रा पिसाळल्यासारखे झाले होते. त्यांची सावजे त्यांच्या हातून निसटून जाण्यात यशस्वी झाली होती. असे या आधी कधी झाले नव्हते. घातक तुकडीतील सदस्यांना एखादे काम दिल्यावर ते पूर्ण झाले नाही किंवा त्यात अपयश आले असे कधी झाले नव्हते. पण या वेळी त्यांची गाठ नौदलातील एका अत्यंत तिक्ष्ण अश्या राजवीर आणि त्याच्या टीम बरोबर होती. आणि त्याचमुळे या दोघांचा अंदाज चुकला.
रात्रीच्या दीड वाजता कोणते वाहन पण मिळण्याची शक्यता नव्हती. तरीसुद्धा राजवीर रस्त्यावरून पाहत होता. अचानक एक बस त्याला रस्त्यावरून येताना दिसली. बस मध्ये जोरदार भजन चालू होते. रामेश्वरम मंदिरात दर्शनाला जाणारे ते भाविक होते. राजवीर ने हात दाखवून बस थांबवली. आणि रामेश्वरम मंदिरापर्यंत लिफ्ट मागितली. आधी त्या सर्वांनी नकारच दिला, कारण अनोळखी व्यक्ती, अनोळखी प्रदेशात, अडणीड्या वेळी , विश्वास कसा ठेवणार पण त्याच वेळी हरीश ला त्या भाविकांमधले काही जण हे गुजरातीमध्ये बोलताना ऐकायला आले. मग काय विचारता, हरीश जो स्वतः एक गुजरातीच होता, त्याने शुद्ध गुजरातीतून संवाद चालू केला. आता आपल्या राज्यातील एक माणूस मदत मागतो आहे म्हटल्यावर त्या समस्त गुजराती भाविकांची मने पालटली आणि त्यांनी या सहा जणांना आत घेऊन बस रामेश्वरम मंदिराच्या दिशेने चालू केली.
या सहा जणांनी आपली खरी ओळख कुणालाच दिली नाही, ते सुद्धा या भाविकांबरोबर भजन करायला लागले आणि त्यांच्यातील एक होऊनच ते मार्गक्रमण करत राहिले.
सुमारे पंधरा मिनिटात ते सर्वजण रामेश्वरम मंदिराच्या आवारात उभे होते. मंदिर सकाळी पाच वाजता उघडत पण भाविक तिकडे रात्रीपासूनच गर्दी करतात. आज सुद्धा भाविकांची अशीच गर्दी होती. सुमारे हजारभर भाविक भक्तिमय वातावरणात शिस्तीत रांगेत उभे होते. या सहा जणांनी मंदिराच्या आवारात एक फेरफटका मारायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी आवारात फिरायला सुरवात केली. नेहमीप्रमाणे एक स्थानिक गाईड त्यांच्या जवळ आला आणि मंदिराची हिस्ट्री सांगू का म्हणून मागे लागला.
राजवीर ने दोनदा तीनदा त्याला नको म्हणून सांगितले, तरीसुद्धा तो गाईड चिवटपणे मागे मागे येत होता. शेवटी राजवीर ने एकदाच त्याला हो म्हणून सांगितलं. मग तो गाईड सुरू झाला बोलायला. इंटरनेट वर उपलब्ध मंदिराविषयीची माहिती थोड्याफार फरकाने त्याने सांगायला सुरुवात केली. मंदिराची माहिती सांगत असताना त्याने सर्वांना मंदिराच्या मागच्या बाजूस नेले. त्या बाजूने समुद्र दिसत होता. आता तो म्हणाला मी तुम्हाला एक मजा दाखवतो. असं म्हणून त्याने खिशातून एक लेझर काढला. लहान मुलांच्या खेळातल्या त्या लेझर ने आता हा काय जादूचे प्रयोग करणार म्हणून सर्वजण थोडेसे चिडचिड होऊन बघत होते. त्या गाईड ने हातातील लेझर चालू करून तो सरळ मंदिराच्या कळसावरील कलशावर मारला. तिथे लेझर पडताच तो परावर्तित होऊन समुद्राच्या दिशेने गेला. आणि त्याच वेळी समुद्रात काही अंतरावर त्यांना एक ठिकाणी तो लेझर आपटून परावर्तित झाल्याचे दिसले. बहुदा एखादा खडक होता तो.
या वर त्या गाईड ने सांगायला सुरवात केली, "आता जो आपण लेझर मारला तो खर तर भौतिकशास्त्रातील नियमानुसार ज्या पृष्ठभागावर लेझर पडतोय त्याच्या वक्रतेनुसार आणि लेझर च्या सोर्स नुसार या लेझर ने आपली परावर्तन क्रिया बदलली पाहिजे पण या मंदिराची खासियत हीच आहे की तुमची कोणत्याही दुसऱ्या कोनातून लेझर मारा, परावर्तित लेझर हे एकाच दिशेने होतात, समुद्राच्या दिशेने. आणि समुद्रात सुदधा एक खांब बांधलेला आहे त्यावर परफेक्ट हे लेझर जाऊन पडतात आणि परावर्तित होतात. आता भौतिकशास्त्राचा साधा नियम या ठिकाणी कसा लागू होत नाही ते काही आपल्याला कळत नाही."
गाईड चे बोलणे चालू असतानाच राजवीर आणि टीम आश्चर्यचकित होऊन हा चमत्कार पाहत होते. हरीश ने आपल्याजवळ असलेला प्रोफेसरांचा नकाशा काढून बघितले तर लेझर ची दिशा आणि नकाशात दाखवलेली सरळ रेष या दोन्ही एकाच दिशेने जात होत्या. याचाच अर्थ नकाशात जी काळी रेष दाखवली होती ती हा लेझरचा झोतच होता.
सुंदरन ने राजवीर च्या कानात जाऊन सांगितले की त्यांना ताबडतोब तो समुद्रातील खांब बघायचा आहे. त्यावर गाईड ने सांगितले, "ज्या दगडावर तो खांब आहे त्या दगडावर केवळ ओहोटी असतानाच जायला मिळते आणि ओहोटीच्या वेळेतच तो खांब आपल्याला पूर्णपणे दिसतो."
हर्षल ने लगेच ओहोटीच्या वेळा बघितल्या. आणि उद्या सकाळी 7.30 वाजता पूर्ण ओहोटी असणार आहे हे सांगितले. राजवीर ने त्या गाईड लाच विचारले की "दिवसाच्या उजेडात हा लेझरचा चमत्कार दिसतो का ?"
त्यावर गाईड म्हणाला, "सर अहो आता उजेड नसल्याने आम्ही हे लेझर चे खेळ दाखवतो, पण दिवसा सूर्य असतो की आणि जो प्रकार लेझर च्या बाबतीत घडतो तोच प्रकार सुर्यकिरणांच्या बाबतीत देखील घडतो. दिवसाच्या कोणत्याही वेळी कळसावर पडलेले सूर्यकिरण परावर्तित होतात या समुद्रातील खांबाच्या दिशेनेच. त्यामुळे आपल्याला हे ओळखणे एकदम सोपं जातं की आपण योग्य दिशेला जात आहोत की नाही ते. समुद्रात गेल्यावर जो पर्यंत आपल्याला कळसावरून परावर्तित होणारे सूर्यकिरण दिसत आहेत तो पर्यंत आपण योग्य मार्गावर आहोत हे ओळखायचे"
राजवीर ने ताबडतोब हरीश आणि हर्षल ला बोटीची व्यवस्था करण्यासाठी पाठवले. सकाळी 7.30 ला त्यांना त्या समुद्रातील खडकावर जायचेच होते. त्यामुळे सकाळी 6.30 वाजता बोट घेऊन त्यांनी निघायचे असे ठरले.
राजवीर ने घड्याळात पाहिलं तर फक्त 3.30 वाजले होते. अजून सुमारे तीन तास वेळ काढायचा होता. आणि त्याच वेळी चंद्रा आणि सूर्याचा धोका होताच. आता वेळ काढण्यासाठी ते सर्व जण फिरून परत मंदिराच्या मुख्य आवारात आले आणि त्या गुजराती भाविकांच्या घोळक्यात ते सामील झाले.
इकडे चंद्रा आणि सुर्या ने घाबरून धीर करून शिवा ला मेसेज टाकला, "target Missed" आता शिवा काय करतो हे त्यांच्या मनात येत होते. त्यांनी सुद्धा ताबडतोब ते हॉटेल सोडले आणि त्यांच्या संस्थेच्या एका सेफ हाऊस मध्ये गेले. त्यांनी पूर्णपणे खबरदारी घेऊन देखील त्यांच्या वाट्याला अपयश आले होते. आणि त्याच अपयशाच्या आगीत ते होरपळत होते. शिवा ला सूर्याचा मेसेज मिळाला. त्याने थंड डोक्याने एक मेसेज सुर्या ला पाठवला. त्यात त्याने अत्यंत थंड डोक्याने चंद्राला संपवण्याची सूचना दिली होती आणि ते काम झाल्यावर स्वतः येऊन शिवा ला भेटण्याचे सांगितले होते. आता शिवा स्वतः या मोहिमेत सहभागी होणार होता.
शिवा चा मेसेज आल्यावर चंद्राने उत्सुकतेने विचारले की बॉस काय म्हणाला ते, त्यावर सुर्या ने हसून चंद्राकडे पाहिले आणि हसत हसत म्हणाला, "
अभिनंदन
चंद्रा, तू तुझ्या आई वडिलांना भेटायला जात आहेस" असं म्हणून हातातल्या गन ने चंद्राच्या डोक्यातून गोळी आरपार घालवली. आता सुर्या शिवा बरोबर काम करणार होता. शिवा किती खतरनाक आहे हे सूर्याला कळले होते. आणि तो तयार होता काहीही झाले तरी शिवाला यश मिळवून देण्यात हातभार लावायला.क्रमशः