भयचकीत सत्यकथा :- सुपारी.
लेखक :- जितेंद्र एस. डावरे
मोबाईल :- ९८७०२७१२८४.
सन १९६० सालातील घटना.... रात्रीचे दहा वाजून गेले होते, रघू पाटील वाड्यात ओसरीवर एकटेच विचार करीत बसले होते, आज सर्व गावकर्यांच्या विनंती मागणीनुसार सुप्रसिद्ध अभिनेते दादा साटम व संगीत पार्टी चे
" अफजल खानाचा वध" हे महाराष्ट्रात गाजलेले नाटक आज त्यांच्या बोरगांवात ठेवण्यात आले होते, स्वतः पाटील मुंबईला जावून त्यांच्या एका नातेवाईकांच्या ओळखीने दादा साटम यांची भेट घेऊन दादांना नाटकाची सुपारी देवून आले होते.
प्रथम अशा आडगांवी नाटकाचे प्रयोग करण्यास दादांनी आढेवेढे घेतले खरे, परंतू दौऱ्याचा संपूर्ण खर्च करण्याची पाटलांची तयारी आणि आग्रह पाहून दादा साटमांनी नाटकाची सुपारी घेवून प्रयोगाची तारिख ठरवली.
कालपासून मेहनतीने , गावातल्या चावडीसमोरील पटांगणात तरुण मुलांनी स्टेज उभारला होता, पाटलांच्या घरीच सर्व कलाकारांची जेवणाची सोय करण्यात आली होती.
सायंकाळपर्यंत वाट पहात पहात न राहवून पाटलांनी त्यांच्या मुलाला अगोदरच्या गावाजवळील फाट्यावर पाठवुन दिले होते, अनेक धडाडीचे तरुण रस्त्यांवर गँसबत्ती घेवून ताटकळत उभे राहिले होते मात्र नाटक पार्टीची काहीच खबरबात मिळत नव्हती, नाटक झाले नाही तर सगळ्यांचा भ्रमनिरास होणार होता, मध्यरात्रीच्या सुमारास सुध्दा लोकांचा उत्साह कमी झाला नव्हता.
आणि अचानक, संगीत पार्टी ची बसगाडी बोरगावच्या दिशेने येताना दिसताच लोकांनी एकच जल्लोष सुरू केला. पाटलांनी तर सुटकेचा श्वास सोडला. गावांत वाड्यावर येताच दादांनी पाटलांची विनम्रपणे माफी मागून, बसगाडी रस्त्यात बंद पडल्याने विलंब झाल्याचे सांगितले, लोकांनी पाहीले तर सर्वच कलाकार हे मेकअप वेशभूषा करून तयारच होते, दादांनी पाटलांना सांगितले की, प्रयोगाला आणखी विलंब होवू नये म्हणून सर्व तयारी गाडीतच केली होती,
आता मात्र, जास्त वेळ न दवडता दादांनी ते सर्व वाटेतच जेवल्याचे आणि त्वरित नाट्य प्रयोग सुरु करीत असल्याचे सांगितले. लोक सुध्दा अधिर झाले असल्याने प्रयोग सुरू करण्यात आला.
स्वतः दादा साटमांनी छत्रपती शिवरायांची भूमिका आणि अफजलखानाची भूमिका धिप्पाड कलाकार बाळू पैलवान ह्यांनी जबरदस्त वठवली. महाराजांनी वाघनख्यांनी पोट फाडताक्षणी अफजलखानाच्या अस्मानभेदक किंकाळीने भल्याभल्यांना धसका बसून घाम फुटला.
नाट्यप्रयोग संपल्यानंतर दादांना व सह कलाकारांना भेटण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली, मात्र दादांनी पाटलांना, त्यांच्या व गावच्या लोकांच्या रसिकतेला दाद देवून, आणि आता त्वरित पुढील दौर्यावर निघणार असल्याचे सांगितले, पाटलांचा व लोकांचा जेवणाचा आग्रह डावलून लवकर निघायचे असल्याने फार आग्रहामुळे कलाकार मंडळी केवळ भरपूर पाणी प्यायली. नंतर सर्वांचे आभार मानत दादा साटमांसह पार्टी पुढील कार्यक्रमास निघुन गेली.
लोक आपापल्या घरी जाऊन नाटकातील प्रसंगांची सकाळ होईपर्यंत चर्चा करित होते, पाटील निवांत होत झोपाळ्यावर बसून विचार करित असतानाच् त्यांचा काल पुढील गावांत पाठवलेला मुलगा घाबरत ओरडत वाड्यात परत आला आणि जमिनीवर बसला अन् आवंढे गिळत सांगू लागला,.... " बाबा,........ अवो, लय वंगाळ जालंय... त्ये आपल्या गावाला येता येता काल रातच्यालाच नाटकाची बस घाटात दरीत कोसळून लय मोटा आपघात झालाय, सगळी बसमदली मंडळी खल्लास जाली, सगळी प्रेतं तालुक्याला हासपिटल ला ठिवली हाईत, आता काय आपल्या गावाला नाटक बगायला मिळणार न्हाई...... "
पाटलांच्या डोळ्यांसमोर मात्र बाळू पैलवानचा अफजलखानाच्या गेट अप मधील खुनशी चेहरा आणि..... दादा साटमांची शिवरायांच्या भुमिकेतील करारी मुद्रा दिसत होती.........
( कथा काल्पनिक असून कथेतील पात्रे /स्थळे, व प्रसंग काल्पनिक आहेत, कोठे समानता आढळल्यास केवळ योगायोग समजावा)