आता नवीन कथा ....!!
कथा : रामसेतू : भाग 01
लेखक : स्वानंद गोगटे©
सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या सागरी मोहिमा बंद असतात, जगभरातील प्रत्येक देशात त्यांच्या देशातील वातावरणाप्रमाणे शक्यतो हेच करतात. आपल्या भारतात सामान्यतः जुन ते सप्टेंबर हा पावसाळा असतो, आणि त्या काळात शक्यतो कोणतीही सागरी मोहीम काढत नाहीत. या काळात शक्यतो नौदलाच्या ऑफिसर आणि कॅडेटस् चे ट्रेनिंग, बोटींची डागडुजी इत्यादी गोष्टी केल्या जातात. भारतीय नौदलाची अशी अनेक प्रशिक्षण केंद्र भारतभर पसरली आहेत. यातीलच एक आहे INS हमला जे मुंबई येथे स्थित आहे.
मुंबई, एक उत्तम असे नैसर्गिक बंदर हे अनेक शतकांपासून व्यापार आणि सामरिक दृष्टीने महत्त्वाचे बंदर आहे. सुरवातीला सात बेटांमध्ये विभागलेले हे बंदर, ब्रिटिश काळात समुद्र मागे हटवून एकसंध जमिनीमध्ये परिवर्तित केले गेले. आणि त्याच सुमारास नौदलाच्या सोयीसाठी इथे एक भव्य नौदल तळ उभारण्यात आला. त्यातीलच INS हमला हे नौदलाचे प्रशिक्षण केंद्र.
साधारण 2021 च्या जून मध्ये कॅप्टन राजवीर मुंबई मध्ये INS हमला वर आला. एवढी वर्ष कॅप्टन म्हणून काम केल्यावर त्याचे आता कोमोडोर पदावर प्रोमोशन होणार होते. आणि त्याच्याच ट्रेनिंग साठी तो INS हमला वर आला होता. तसा तो या आधी देखील मुंबईमध्ये 2 वेळा येऊन गेला होता पण पावसाळ्यात तो पहिल्यांदाच मुंबई मध्ये येत होता. इतके दिवस ऐकून असलेला मुंबईचा पाऊस तो आता प्रत्यक्षात अनुभवणार होता.
राजवीर चे ट्रेनिंग साधारण 3 महिने चालणार होते, त्या नंतर तो त्याच्या मुख्य पोर्ट ला म्हणजेच विशाखापट्टणम ला जाऊन पुढील चार्ज घेणार होता. त्यामुळे आता कमीत कमी 3 महिने तरी ही मुंबईच त्याचे घर होती. मुंबई आणि मुंबईकर, या दोन्हीबद्दल तो ऐकून होता. मुंबईकरांच्या सतत धावपळीच्या आयुष्याबद्दल, कधीही न थांबणाऱ्या जीवनाच्या शर्यतीबद्दल तो ऐकून होता. आता तो प्रत्यक्षात ते अनुभवणार होता.
INS हमला वर आल्यावर कॅडेट गणेश त्याचा असिस्टंट म्हणून देण्यात आला होता. गणेश मूळचा कोल्हापूरचा रांगडा गडी पण गेली 4 वर्षे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर INS हमला वर कॅडेट म्हणून काम करत होता. काँट्रॅक्ट वर असणारे हे कॅडेट नौदलाच्या सेवेत जरी असले तरी नौसैनिक नसतात. त्यांचे मुख्य काम हे सर्व व्यवस्था बघणे हे असते. गणेश त्याचे काम अत्यंत चोख करीत होता. राजवीर ला काय हवे नको ते बघणे हे त्याचे मुख्य काम असे. राजवीर ची राहण्याची व्यवस्था दक्षिण मुंबईत मधील कुलाब्यातील एका प्रशस्त अश्या बंगल्यात केली होती. तो बंगला नौदलाच्याच मालकीचा होता आणि ट्रेनिंग साठी आलेल्या कॅप्टन आणि त्या वरील अधिकाऱ्यांसाठी तो राखीव होता. नियुक्ती झाल्यापासून गणेश देखील याच बंगल्यातील सर्व्हन्ट क्वार्टर मध्ये राहायला आला होता.
राजवीर च्याच सांगण्यावरून मोकळ्या वेळात राजवीर ला मुंबई दाखवण्याचे अतिरिक्त काम देखील गणेश करत असे. राजवीर ला मुंबई प्रचंड आवडली, आवडली कसली, प्रेमातच पडला होता तो, पुढे मागे निवृत्ती नंतर मुंबई मध्येच घर घेऊन राहायचा विचार सुद्धा त्याच्या मनात येऊन गेला. विशेषतः मरिन ड्राइव्ह वर जाऊन संध्याकाळी निवांत बसणे हा राजवीर चा आवडता छंद बनला होता.
असं करता करता जुलै चा मध्य आला, ट्रेनिंग अर्ध पूर्ण झाले होते.
त्याच वेळी त्याला विशाखापट्टणम च्या त्याच्या ऑफिस मधून एक ई-मेल आला. कॉन्फिडेनशियल असे लिहिलेला तो मेल राजवीर ने ताबडतोब वाचला. मेल वाचून तो चक्रावूनच गेला. कारण त्यात बाकी काहीच लिहिले नव्हते, फक्त ताबडतोब विशाखापट्टणम ला रुजू व्हायचा आदेश त्याला दिला होता. विशेष म्हणजे त्याचा उल्लेख त्या मेल मध्ये कॉमोडोर राजवीर म्हणून केला होता. खर म्हणजे नौदलाच्या प्रथेप्रमाणे ट्रेनिंग पूर्ण करून आपल्या होम पोर्ट वर जाऊन चार्ज घेतल्या शिवाय तुम्हाला तुमची बढतीची पोस्ट आपल्या नावासमोर लावता येत नसे. पण या मेल मध्ये पूर्व विभागीय नौदल प्रमुखांनीच त्याला कॉमोडोर असे संबोधले होते. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या इमेल मध्ये INS हमला चे प्रमुख प्रशिक्षक तर CC मध्ये होतेच त्याच प्रमाणे प्रधानमंत्री कार्यालयाला सुद्धा यामध्ये मार्क केले होते. राजवीर समजून गेला होता की त्याला नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामासाठी बोलावले असेल. त्याने ताबडतोब तयारी केली आणि तो विशाखापट्टणम ला रवाना झाला.
विशाखापट्टणम ला पोहचल्यावर तो ताबडतोब नौदल कार्यालयात गेला. तो तिथे पोहचतच होता तेव्हा त्याला ताबडतोब नौदलाच्या ईस्टर्न कमांड प्रमुखांच्या ऑफिस मध्ये बोलावण्यात आले. राजवीर जेव्हा तिथे पोहचला तेव्हा तिथे उपस्थित लोकांना बघून तो थोडा खुश पण झाला. त्याची टीम तिकडे हजर होती. हर्षल आणि हरीश दोघे ही तिथे हजर होते,
आल्या आल्या राजवीर समोर एक फाईल दिली गेली. गोपनीय असा शेरा असलेली ती फाईल राजवीर च्या आधी तिथे उपस्थित त्याच्या टीम ने वाचली नव्हती. म्हणूनच राजवीर आणि टीम ला एकत्रच मोहिमेबद्दल सांगायला सुरुवात केली.
बाजूला असलेल्या टीव्ही वर एक व्हिडिओ चालू केला गेला. स्क्रीनवर डॉ राघव आणि डॉ सुंदरन दिसू लागले. दोघांनीही सर्वांना अभिवादन केले आणि बोलायला सुरवात केली. डॉ सुंदरन यांनी राजवीर ला प्रश्न विचारला, "कॅप्टन राजवीर, तुम्हाला रामसेतू बद्दल काय माहिती आहे?"
डॉ सुंदरन ना मध्येच थांबवत हरीश म्हणाला, "डॉ, आता ते कोमोडोर राजवीर आहेत, कॅप्टन नाहीत"
सुंदरन ने ओशाळल्या सारखे होऊन माफी मागीतली, पण राजवीर ने त्यांना सांगितले, " तुम्ही मला नुसतं राजवीर म्हणा डॉ. आपण एकत्र काम केले आहे, तुमचा तेवढा अधिकार आहे"
सुंदरन ने हसून आपले बोलणे परत सुरू केले, " तर राजवीर, तुम्हाला रामसेतू बद्दल काय माहिती आहे ?"
राजवीर ने बोलायला सुरुवात केली, "माझ्या माहितीनुसार ती एक नैसर्गिक भूरचना आहे जी भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे. बऱ्याच लोकांच्या मान्यतेनुसार रामायणात लिहिलेला लंकेवर स्वारी करण्यासाठी श्रीरामाने बांधलेला सागरी पूल तो हाच, आणि परदेशी संशोधकांनी याला ऍडम्स ब्रिज असे नाव दिले आहे"
सुंदरन म्हणाले, " वा राजवीर, गुगल वर उपलब्ध केलेली माहिती तुमच्याकडे आहे असे दिसते. पण जर का मी तुम्हाला सांगितले की हा जो रामसेतू किंवा ऍडम्स ब्रिज आहे तो नैसर्गिक नाही तर मानव निर्मित आहे तर तुमचा विश्वास बसेल का?"
राजवीर काहीच बोलला नाही, तो फक्त ऐकत होता, तसे तो लहानपणापासून हे ऐकत आला होता की तो रामसेतू हा भगवान श्रीरामांनी बांधला वगैरे पण त्याचा या वर विश्वास बसत नसे पूर्वी. पण द्वारकेच्या मोहिमेपासून त्याच्या डोक्यात हे कुठेतरी पक्के बसले होते की काही गोष्टी अशक्य वाटत असल्या तरी शक्य असू शकतात, म्हणूनच त्याने गप्प बसून सुंदरन चे पुढील बोलणे ऐकू लागला.
डॉ. सुंदरन ने पुढे बोलायला सुरुवात केली, " तुम्हाला हे माहीत आहे का की उत्तराखंड मधील केदारनाथ आणि तामिळनाडू मधील रामेश्वरम ही दोन्ही ज्योतिर्लिंग आहेत. पण त्याच बरोबर हे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहेत की ही दोन मंदिरे हो शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या मूळ चारधाम यात्रेमधील दोन आहेत. आदी शंकराचार्यांनी भारत भ्रमण करताना देशाच्या चार कोपऱ्यात चार मंदिरे स्थापन केली. उत्तर दिशेला उत्तराखंड मध्ये केदारनाथ, दक्षिणेला तामिळनाडू मध्ये रामेश्वरम, पूर्वेला ओरिसा मध्ये जगन्नाथपुरी आणि पश्चिमेला गुजराथ मध्ये सोमनाथ. या मंदिराची अजून एक खासियत म्हणजे सोमनाथ मंदिरातील पुजारी हा ओडिशा चा असतो, आणि पुरी ला एक गुजराती पुजारी असतो, तसेच केदारनाथ ला तामिळ पुजारी आहेत आणि रामेश्वरम ला उत्तराखंडातील. आता अजून एक खासियत म्हणजे या पैकी केदारनाथ आणि रामेश्वरम ही दोन्ही मंदिरे एकाच अक्षांशवर आहेत. अगदी अर्ध्या अंशाचाही फरक नाही.
या प्रत्येक मंदिरावर विविध शिल्प आहेत, आणि जगभरातून लोक या विविध शिल्पांचा अभ्यास करायला येतात. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे देखील अशीच शिष्यवृत्ती दिली जाते पुरातन मंदिरांच्या अभ्यासासाठी. गेल्यावर्षी रामेश्वरम मंदिराच्या अभ्यासासाठी एक ग्रुप रामेश्वरम ला गेला होता तेव्हा त्यांना रामेश्वरम मंदिरावरील शिल्पांमध्ये काही शिल्प ही स्थानिक शिल्पकलेच्या इतिहासाशी साधर्म्य दाखवणारी दिसली नाहीत, एका भिंतीवरील या शिल्पांमध्ये चक्क केदारनाथ मंदिर दाखवले गेले आहे आणि त्याच बरोबर अजून एका मानवनिर्मित आश्चर्याबद्दल त्यात शिल्प घडवले आहे. त्या बद्दल आपण नंतर बोलूया."
तर जसे रामेश्वरम च्या मंदिरात केदारनाथ मंदिराबद्दल शिल्प आहेत तसेच केदारनाथ मंदिराच्या एका भिंतीवर आम्हाला रामेश्वरम संदर्भातील काही शिल्प दिसली. त्या शिल्पांचा अभ्यास केल्यावर आम्ही खालील निष्कर्षाप्रत पोहचलो आहोत की
1. रामसेतू हा नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे
2. रामसेतू हा कायमच समुद्राखाली राहील असा बांधण्यात आला होता आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला समुद्रपृष्ठाच्या वर आणण्याची सोय केली गेली होती.
3. अगदी जवळच्या इतिहासात रामसेतूचा उल्लेख राजस्थान येथे सापडतो, चितोड चे महारावल रतनसिंग यांची पत्नी पद्मिनी ही श्रीलंकेची राजकुमारी होती आणि त्यांची वरात लग्न झाल्यावर रामसेतुवरून भारतात प्रवेशती झाल्याचा उल्लेख आहे.
4. त्या नंतर मधल्या काळात रामसेतू समुद्रपृष्ठावर आणण्याबद्दल आलेले ज्ञान लुप्त झाले असावे आणि म्हणूनच त्या बद्दल वेगवेगळे तर्क करण्यात आले
5. एक तर्क असा की रामसेतू हा भूकंपामुळे समुद्रपृष्ठाच्या खाली बुडाला.
आता डॉ राघव या बद्दल अजून माहिती देतील, राघव ने पुढे बोलायला सुरुवात केली, " आम्ही जेव्हा भारतीय महाद्वीपच्या आजुबाजूचा समुद्रतळ तपासला तेव्हा गेल्या 10000 वर्षात एवढा मोठा भूकंप झाल्याची कुठलीच मोठी खूण आम्हाला आढळली नाही.
साधारणपणे धनुष्यकोडी च्या पुढे श्रीलंकेत पोहचेपर्यंत हा रामसेतू आहे, तो साधारण पणे13 किलोमीटर चा आहे. एवढा मोठा भूभाग पाण्याखाली बुडला जाईल असा मोठा भूकंप झाल्याची कोणतीच खूण इकडे नाही. एवढा भूभाग एकावेळी पाण्याखाली जाण्यासाठी कमीत कमी 12 ते 13 रिष्टर स्केल चा भूकंप व्हायला पाहिजे आणि असा भूकंप जर झाला तर भारतच उरणार नाही."
आता परत सुंदरन ने बोलायला सुरुवात केली, "राजवीर आता तुमच्यावर जो मोहीम टाकायचा आमचा विचार आहे ती अशी की प्रत्यक्ष रामसेतू च्या ठिकाणी जाऊन हे संशोधन करणे की रामसेतू हा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, आणि मानवनिर्मित असेल तर तो समुद्र पृष्ठावर कसा येत असे, आणि समजा ते तंत्र अजूनही योग्य स्थितीत असेल तर त्याचा वापर करून रामसेतू समुद्रातून वर आणणे."
"तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता"
राजवीर ने आपल्या टीम कडे पाहिले आणि बोलायला सुरवात केली, "डॉक्टर, या कामात आम्ही जास्तीत जास्त एखाद्या पाणबुडीमार्फत त्या भागाचे निरीक्षण करू शकू, किंवा आमच्या पैकी कोणीतरी स्वतः पाणबुड्या बनून जाऊन निरीक्षण करू शकेल पण त्यातून साध्य काय होणारे?"
सुंदरन म्हणाले, "राजवीर जरी तुम्ही नौदलाचे अधिकारी असलात आणि समुद्राबद्दल तुमचे ज्ञान चांगले असले तरी तुमची योग्यता आम्हाला माहीत आहे, आणि तुम्ही या प्रकरणी देखील ती उपयोगात आणाल ही आम्हाला खात्री आहे. तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते द्यायला भारत सरकार प्रतीबद्ध आहे असे भारत सरकारच्या वतीने मी आपल्याला वचन देतो. आपण चेन्नई ला परवा भेटणार आहोत, तेव्हा तुमच्या टीम ला पण तुम्ही बरोबर आणा, आम्ही दोघंही परत एकदा तुमच्या बरोबर या मोहिमेवर येणार आहोत."
असं म्हणून सुंदरन ने व्हिडीओ कॉल कट केला. 2 मिनिटे खोलीत कोणीच बोलले नाही, जे काही ऐकले ते पचवायला त्यांना दोन मिनिटे गेली. त्या नंतर हरीश सर्वप्रथम बोलला, "राजवीर सर, कधी निघायचं चेन्नई ला जायला?"
राजवीर ने हसत हरीश कडे पाहिलं आणि सांगितलं, "ताबडतोब"
आणि सुंदरन चा कॉल चालू असताना राजवीर ने मॅम्बो च्या पोर्टेबल टेलिपोर्टर चा कम्युनिकेटर चालू केला होता, त्यामुळे मॅम्बो ला आणि टॅम्बो ला दोघांनाही या मोहिमेबद्दल पूर्ण माहिती मिळाली होती. तसेच त्यांच्या मार्फत अकृराकडे देखील ही माहिती पोहचेल याची काळजी राजवीर ने घेतली होती. आता चेन्नई ला काय वाढून ठेवले आहे त्याबद्दलचे विचार राजवीर च्या डोक्यात चालू होते.
क्रमशः