#भयकथा मध्यरात्री भेटलेली ती....
मुंबईचा कोस्टल एरिया हा कुलाब्यापासून वर्सोवा पर्यंत एका रेषेमध्ये जोडला गेलेला आहे.. हा जिथे संपतो तिथेच यारी रोड ला मी राहतो म्हणजे वर्सोवा ला. एक वर्षापूर्वी एक विचित्र घटना माझ्या आयुष्यात घडली. ती मी कधीच कोणाशी शेअर केली नाही, माझ्या मनाच्या एका कोपर्यात मी नेहमी दडपून ठेवली. पण आता राहवत नाही मला ती घडलेली विचित्र घटना तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची आहे. एक वर्षांपूर्वी मी आणि माझ्या मित्राने एक स्पोर्ट्स बाईक विकत घेतली होती. आमचा पाच जणांचा मित्रांचा ग्रुप जे स्पोर्ट्स बाईक चे वेडे आहेत. आम्ही ठरवलं की एका रात्री वर्सोवा ते जुहू छान बाईक राईड मारायची. गेल्या आठवड्यापासून आमच आपलं चाललेला प्लान प्रत्यक्षात काही उतरत नव्हता शेवटी एका शनिवारी आम्ही रात्री अकरा वाजता बाईकने जुहू बीच ला जायचे ठरवले आणि तेथे एका हॉटेल मध्ये कॉकटेल आणि डिनर घ्यायचे ठरवले . ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री अकरा वाजता जुहू बीच ला जाण्यासाठी निघालो छानसा रम्य असा प्रवास करत आम्ही जुहू बीच ला "सी प्रिन्सेस " म्हणून मोठे हॉटेल आहे तिथे ठरल्याप्रमाणे पोहोचलो. डिनर घेऊन बाहेर पडेपर्यंत रात्रीचे दीड वाजले. आम्ही आमच्या बाईक्स होटेल सी प्रिन्सेस समोरच समुद्र किनारी लावल्या आणि तिथे अजून तासभर टाईमपास केला. इतक्यात माझ्या मित्राच्या डोक्यात कल्पना आली की आपण बाईक रस्त्यावरून नं काढत आज समुद्रकिनाऱ्यातून काढावी. माझ्या मित्राला मी वेड्यात काढलं कारण जर पोलिसांनी पाहिले असते तर नक्कीच पोलिसांनी आमच्या बाईक जप्त केल्या असत्या आणि आम्हाला देखील आत टाकले असते.
पण नंतर सगळे ह्या गोष्टीला तयार झाले पण मी तयार होतो त्याच्यानंतर सगळेजण मला "गांडफाट्या " म्हणून चिडवायला लागले आणि मग काय माझा इगो डिवचला गेला आणि आमच्यामध्ये पैज लागली. आणि तिथेच सुरू झाली ती भयाण रात्र आणि माझा थरकाप उडवणारे ते तीन तास. मी आणि माझा मित्र, तीन चा काउन्ट डाउन म्हणून दोघेही बाइक घेऊन वाऱ्याचा वेगाने किनाऱ्यावरून बाईक पळू लागलो. दोन एक किलोमीटर पुढे जाताचं माझा मित्र जोरात ओरडू लागला अरे पोलीस लाईट मारतायत.. पोलीस आले बघ आणि बघताच क्षणी तो तिथून धूम ठोकून किनार्यावरून रस्त्यावर बाईक घेऊन गेला. मी मात्र बाईक सरळ धावत नेली. मी आपलं वेगळ्याच धुंदीत होतो की ही बेट मी जिंकलो आणि आता मित्रांसमोर मी फुशारकी मारायला तयार होतो या विचारात असतानाच अचानक माझ्या बाईक समोर एक मुलगी येऊन थबकली. मी बाईक ब्रेक जोरात मारला बघतो तर काय एक पांढरा स्कर्ट घातलेली, मोकळे केस सोडलेली, घाबरलेली, पाणवलेल्या डोळ्यांनी एक बावीस पंचविशीची मुलगी माझ्याकडे बघत होती. पहिले तर मी एकदम घाबरून गेलो मला तर वाटलं ॲक्सिडेंट होऊन या मुलीला कुठे दुखापत तर नाही ना झाली. मी तिला काही विचारायला जाणार इतक्यातच ती माझ्या समोर येऊन तिने माझा हात पकडला आणि आणि मला विनवणी करू लागली
" मुझे प्लीज मदत किजीये, मुझे आपकी मदत की जरूरत है मुझे यहांसे लेके चलिये"
मी तिला विचारले " हुआ क्या हे?
तर ती म्हणाली "मैं वोह आपको बाद मैं बताती हूं पहिले आप मुझे मेरे घरं लेके चलिये "..
मी तिला विचारलं आपका नाम क्या है और आपको किस बात का डर है? ती म्हणाली
"मेरा नाम नैना सुभेदार है".. मी तिला विचारलं मराठी आहेस का आणि कुठे राहतेस?
पण ती प्रचंड घाई मध्ये होती ती मला म्हणाली "हो दादा मी मराठी आहे, प्लीज मला मदत करा मला घरी घेऊन चला" एक बावीस पंचविशी ची मराठी मुलगी मला दादा पण म्हणते आणि माझ्याकडे मदतीसाठी विनवण्या देखील करते हे बघून मला देखील राहवलं नाही आणि मी काहीच विचार न करता तिला बाईकवर बसायला सांगितलं. ती माझ्या बाईक वर बसली मी तिला विचारलं कुठे राहते ती म्हणाली "सेव्हन बंगलो ".. त्याठिकाणाहून सात बंगलो काही लांब नव्हतं त्यामुळे मी जास्त लांब जावं लागणार नाही या गोष्टीवर तरी खूश होतो. मी किनाऱ्यावरून बाईक रस्त्यावर घेतली, दोन तीन किलोमीटर जरा थोडं पुढे जातोच तर बघतो तर काय दोन पोलीस काठी घेऊन उभे होते. इतक्यात पाठून ती मुलगी म्हणाली प्लिज बाईक थांबवू नका.. लवकर चला. मी तिला म्हणालो तसं नाही करता येणार लेन खूप छोटी आहे त्यांना जर संशय आला तर ते आपला पाठलाग करतील आणि आपण पकडले जाऊ . इतक्यात समोर ट्रॅफिक पोलीस चा एक जण माझा बाईक समोर येऊन थबकला त्याने मला विचारलं "काय रे काय बडबड करतोय आणि गाडीच्या आरसे नीट कर, कुठे चालला? घेतली आहेस का? बाईक बाजूला घे आणि उतर. जसं तो म्हणाला बाईक बाजूला घे मला कळलं हा खूप टाईम घेणार मी तशीच बाईक रेस केली आणि तिथून धूम ठोकली. पाठुन ती मला थँक्यू म्हणाली जरा थोडं पुढे जाऊन ती बोलली इथून समोरं च्या लेन ने राईट घ्या, लास्ट वाला "अक्षरा "नावाचा माझा बंगलो आहे.
मी तिला ओके म्हणालो आणि राईट घेऊन शेवटच्या बंगल्याच्या गेट समोर येऊन माझी बाईक थांबवली. बघितलं तर माझ्या बाईक चे आरसे विरुद्ध दिशेने फिरले होते आणि अजून पर्यंत माझा हे लक्षातच आलं नव्हतं... नंतर मला आठवलं की तो पोलिस हवालदार मला म्हणालेला की बाईकचे आरसे नीट कर. ते सरळ करत माझ्या दिशेने अड्जस्ट करत मी तिला विचारलं हाच का तुझा बंगला आणि आरशात मी पाहिलं तर पाठी बाईकवर कोणीच नव्हतं. मी वाकडेतिकडे होत माझी मान फिरून पाठी बघितलं तर खरंच कोणी नव्हतं. मी पूर्ण परिसरात बाईक वर बसल्याबसल्या नजर मारली तर दूर दूर पर्यंत कोणी दिसत नव्हतं. अरे दोन मिनिटांपूर्वी माझ्या पाठीमागे बाईक वर बसलेली एक मुलगी अचानक अशी कुठे गायब झाली? मी बाईक स्टॅन्ड वर लावून खाली उतरलो, आजूबाजूचा परिसर बघू लागलो इतक्यात समोरचं मला अक्षरा नावाची पाटी असलेला तो बंगला दिसला. मी विचार करतोय ही मुलगी अचानक गेली कुठे? मी तिला हाक मारायला गेलो तर मला तिचं नावच आठवेना. मी तिच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघालो. बेल वाजवली तर कोणी दरवाजा उघडत नव्हते इतक्यात मी दरवाजा ढकलून पाहिला तर दरवाजा उघडा होता. आता मात्र मला भीती वाटत होती. मला असं वाटू लागलं की मी कसल्यातरी नसत्या फंद्यात पडतोय की काय.
मी हळुवार दरवाजा ढकलत आत मध्ये शिरलो फोनमध्ये डिमं अंधुक लाईट चालू होती पण बर्याच काही वस्तू त्या पिवळसर अंधुक उजेडात स्पष्ट दिसत होत्या. घरातील बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या तर काही वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. तेव्हा कुठेतरी मला जाणवलं या घरांमध्ये नक्कीच काहीतरी अघटित घडलेले आहे. मी तिथे आवाज दिला कोणी आहे का? आणि इतक्यात मला तिचं नाव देखील आठवलं मी पुन्हा एकदा हाक मारली. नैना, नैना घरी आहेस का?
पण कोणाचाचं होकार येत नव्हता.. तो डुप्लेक्स बंगला होता.. मी पायऱ्या चढत वर जात होतो इतक्यात मला भिंतीला लागलेले रक्ताचा हाताचे ठसे दिसले. आता मात्र मी पूर्णपणे घाबरून गेलो. माझ्या कपाळावरून घामाची धार वाहू लागली. मी तसाचं घाबराघुबरा होऊन अर्धवट चढलेली पायरी वरून पुन्हा खाली उतरू लागलो आणि त्या बंगल्याच्या मेन डोअर च्या दिशेने पळू लागलो. त्या गडबडीत माझा हात भिंतीला लावलेल्या एका फ्रेम वर लागला आणि मी त्या फ्रेम सकट जिन्यावरून खाली पडलो. जिन्यावरून पडल्यामुळे माझ्या ढोपराला मार लागला होता आणि मी कळवळून उठत होतो. इतक्यात माझी नजर त्या पडलेल्या फ्रेम वर पडली ती अर्धवट फुटलेली काचेची फ्रेम मी उचलून पाहिली तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या फ्रेमवर हार घातलेला नैना चा फोटो होता. हो तीच नैना जी तासाभरापूर्वी माझ्या बाईकवर माझ्या बरोबर बसलेली. माझं तोंड सुकून गेलं, हातपाय थरथरत होते, डोक्यावर तारे चमकत होते, अंग अचानक ताप आल्यासारखं गरम झालेलं. त्या फ्रेम वर नुसता हार चं नव्हता घातला तर जन्म 1990 आणि मृत्यू 2010 असं देखील लिहिलेलं . हे बघताक्षणी माझा मेंदू एखादी व्हिडिओ फिल्म रिवाइंड होते तसा रिवाइंड होत एक तास पाठी गेला. मोकळ्या किनाऱ्यावर बाईक चालवणारा मी जिथे दोन किलोमीटरचा परिसर डोळ्यासमोर दिसतो तिथे अचानक ही मुलगी माझा बाईक सामोरं आली कुठून? मला अडवलेल्या त्या पोलिस हवालदाराने मला असे का म्हटले होते की काय बडबड करतोय? कदाचित त्याला मी बाईकवर एकटाच दिसत होतो.
माझ्या बाईकचे आरसे हे सरळ होते ते अचानक उलटे कसे झाले? जर आरसे आधीपासून सरळ असते तर कदाचित मला नैना चं प्रतिबिंब आरशात दिसलच नसतं. ती नैना ची आत्मा होती का? का माझ्या मनाचा भ्रम आहे. असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले. पण एक मला जाणवत होतं की मी येथे येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण होतं. मी स्वतःला सावरत कसा बसा उभा राहिलो. इतक्यात मला एका स्त्रीचा विव्हळण्याचा आवाज आला. मी आवाजाचा कानोसा घेतला तो आवाज बंगल्याचा वरच्या मजल्यावरून येत होता जेथे मी काही क्षणापूर्वी पायरी चढून जात होतो. मी धडपडत पुन्हा पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर जाऊ लागलो. आता विव्हळण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता वरच्या मजल्यावर चार रूम होत्या आणि त्या एका रूम मधून विव्हळण्याचा आवाज स्पष्ट येत होता. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून बघतो तर काय........
माझ्या डोळ्यासमोर एक मिडल एज स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मी दरवाजा उघडताच क्षणी ती माझ्याकडे हात करून मला एकच वाक्य बोलली " हेल्प मी"... मी पूर्ण सुन्न झालेलो.. मला काहीच कळत नव्हतं की हे काय चाललंय.. मला तर आता अक्षरशः रडायला येत होतं.. मी तिच्या जवळ गेलो बघितले तर काय.. तिच्या पोटातून रक्त वाहत होतं.. जणू कोणी तिच्या पोटावर चाकूने वार केले होते.. . जसे मी तिच्या जवळ गेलो तर तिने मला बालकनीच्या दिशेने हात करून दाखवलं.. मी तिथे बघितले तर तिथे अजुन एक पुरुष अगदी तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.. मी माझ्या डोक्याला हात लावून माझे डोकं खाजवु लागलो. मला कळतच नव्हते मी काय करू..डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं स्वतःच अंग भट्टीसारखं गरम झालं होतं.. मी माझ्या जीन्स मधला मोबाईल काढला.. मी 100 डायल देखील केलं.. पण पोलिसांना कॉल लावायची माझी हिंमत होत नव्हती. मी मोबाईल मध्ये पाहिलं तर मला माझ्या मित्रांचे 22 मिस कॉल येऊन गेलेले दिसलें.. पण माझा मोबाईल सायलेंटवर असल्यामुळे मला कॉल आलेले कळलेच नाही. मी माझ्या मित्राला फोन लावला.. कॉल च्या दुसऱ्या रिंगलाच त्याने कॉल उचलला.. फोन उचलताच त्यांनी मला शिव्या घालायला सुरुवात केली आणि मला विचारलं अरे तू आहेस कुठे? आह्मी केव्हापासून तूझी वाट बघत होतो.. मी रडत रडत त्याला काही मोजक्या शब्दात घडलेला प्रसंग सांगितला.. मला तो म्हणाला "अरे तू तिथून निघून ये, तू का पोलिसांच्या फंद्यात पडतोय.." मी फोन कट केला आणि मी तिथून जायला निघालो तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाईने माझा पाय पकडला आणि ती पुःन्ना विव्हळत म्हणाली प्लीज.. हेल्प मी. तिने बेडवर बोट करून दाखवलं. मी नजर टाकली तर बेड वर मोबाईल होता. मला काय करू खरंच कळत नव्हतं मला मदत देखील करायची होती आणि दुसरा विचार माझ्या मनात हादेखील येत होता की मी कोणत्या नसत्या पोलिस केस मध्ये तर नाही ना अडकणार. पण मला काय झालं माहित नाही मी तो मोबाईल उचलला आणि तिच्या हातात द्यायला गेलो तर ती अस्पष्ट आवाजात म्हणाली "प्लीज कॉल डॉक्टर साळुंके.. " मी कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जाऊन डॉक्टर साळुंके चा नंबर काढला आणि डॉक्टर साळुंखे यांना फोन लावला. पहिले त्यांनी फोन उचलला नाही मी पुन्हा तोच नंबर डायल केला. झोपेल आवाजात डॉक्टर साळुंके म्हणाले "हा मीना मॅडम बोला.." मी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. डॉक्टर साळुंखे अवाक झाले प्रसंगसावधान राखून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांच्या जखमेवर टॉवेल किंवा एखादा कपडा मिळत असेल तर दोघांच्याही जखमेवर तो जोरात बांधा जेणेकरून रक्तस्त्राव होणार नाही. मी रडवेला आवाजात त्यांना हो म्हणालो आणि त्यांना विनंती केली की प्लीज लवकर या. फोन कट करत मी त्याच रूम मध्ये असलेल्या बाथरूम मध्ये शिरलो. बाथरूम मध्ये दोन टॉवेल होती.. त्या दोघांच्याही जखमेवर मी टॉवेल घट्ट गुंडाळले. त्या मीना मॅडम शुद्धीवर होत्या पण जे दुसरे गृहस्थ होते त्यांची शुद्ध हरपली होती मुळात ते जिवंत तरी होते हे देखील मला कळत नव्हतं कारण त्यांची काहीच हालचाल दिसत नव्हती. बेडच्या बाजूला लॅम्प च्या टेबलवर पाण्याची बाटली होती मी त्यांना पाणी पाजले. घड्याळात बघितलं तर पहाटेचे पाच वाजले होते. बघता बघता वीस मिनिटे झाली तरी कुणी आले नव्हते.. आता मीना मॅडमची देखील शुद्ध हरपत चालली होती.. मी त्यांच्या गालावर थाप मारून त्यांना जागा राहण्यासाठी सांगत होतो.
आता हळूहळू ती सफेद गुंडाळलेली टॉवेल देखील रक्ताने लाल झालेली. ते दोघेही अजूनही तसेच जमिनीवर विव्हळत पडले होते. मी डॉक्टर साळुंके ना फोन लावणार इतक्यातच मला ऍम्ब्युलन्स चा आवाज बाल्कनीतून आला. मी धावत खाली उतरलो. समोरच एक गृहस्थ उभे होते मी त्यांना विचारलं "डॉक्टर साळुंखे का? " ते म्हणाले हो आणि इतक्यातच दोन कंपौंडर स्ट्रेचर घेऊन समोर आले. डॉक्टर साळुंके नी विचारलं कुठे आहेत ते.. मी त्यांना माझं बोट दाखवून वरच्या दिशेने जाण्यास सांगितले. डॉक्टर साळुंके आणखी दोन कंपाउंडर धावत वर गेले. केवळ पाच मिनिटांमध्ये त्यां दोघांनाही स्ट्रेचरवर ठेऊन ॲम्बुलन्स मध्ये बसवलं गेलं. डॉक्टर साळुंके मला म्हणाले की "तुम्ही पण चला तुमची हॉस्पिटलमध्ये गरज लागेल". मी मागचा पुढचा कसलाच विचार न करता ॲम्बुलन्स मध्ये बसलो. अगदी पाच एक मिनटात वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या थोडं पुढे एका हॉस्पिटल मध्ये आम्ही उतरलो. त्या दोघांनाही माझ्यासमोरच ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले. डॉक्टर साळुंके मला म्हणाले तुम्ही इथे बसा आणि तेदेखील स्वतः ऑपरेशन थेटर मध्ये गेले. मी बाजूलाचं एका चेयर वर बसलो. मी खूप थकलो होतो, तीन तासात एवढं काही घडून गेलेलं की आयुष्यात अस काही घडेल ह्याचा तिळमात्र पण विचार केला नव्हता. मला घरी फोन लावून बाबांना सर्वकाही सांगावसं वाटत होतं पण माझी हिम्मत होत नव्हती. कारण ते टेन्शनमध्ये आले असतें. मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करतो की त्या दोघांच्याही जिवाला काही होता कामा नये. कारण त्या दोघांना काही झालं असतं तर मी अडकणार होतो कारण नैना बद्दल मी पोलिसांना किंवा इतरांना काय सांगणार होतो. जी मुलगी एक वर्ष आधीच मृत्यूमुखी पडली आहे ती मला काही तासापूर्वी कशी भेटू शकते. मुळात नैना मला खरंच भेटली होती का? का ते सगळं हॉटेलमध्ये घेतलेल्या तीन पेग व्हिस्की चा परिणाम होता? का मी नशेमध्ये होतो आणि जे काही घडलं तो माझा भास होता.
जर हा भास होता तर एवढे सगळं जूळून कस आलं? ह्या दोघांना वाचवण्यासाठी नैना चं मला घेऊन आली का? हे दोघे नैना चे कोण लागतात? मगाशी मला नैना दिसली तर मग आता का नाही दिसत आहे? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यामध्ये कल्लोळ माजला.. त्या दोघांना ऑपरेशन थेटर मध्ये नेऊन आता एक तास झाला होता इतक्यातच डॉक्टर साळुंके बाहेर आले डॉक्टर साळुंखे बाहेर येताच मी ताडकन उठलो मी त्यांना विचारलं डॉक्टर कसे आहेत ते? डॉक्टर साळुंके मला फक्त एवढंच बोलले की तुम्ही बसा थोडा वेळ मी आलोचं म्हणून.. मी अजून अर्धा तास वाट पाहत बसलो.. इतक्यात डॉक्टर साळुंखे, एक इन्स्पेक्टर आणि दोन कॉन्स्टेबल माझ्यासमोर बारीक नजर करून चालत येत होते जणू ते मला धरायलाच येत होते. मी हळूहळू थरथरत्या पायांनी उभा राहिलो. इतक्याच तो इन्स्पेक्टर समोर येऊन मला विचारू लागला नाव काय तुझं? त्या दोघांना तू कसा ओळखतो आणि त्या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न का केलास? लवकर बोल.. तो इन्स्पेक्टर माझ्यावर जोरात खेकसला.. इतक्यात डॉक्टर साळुंखे त्यांना म्हणाले की इन्स्पेक्टर साहेब जरा हळू.. मला तर काहीच कळेना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.. मी त-त-प-प करत त्यांना म्हणालो की अहो काय बोलत आहात तुह्मी? डॉक्टर साळुंके ना मीच फोन करून सांगितलं इथे येण्यासाठी.. इन्स्पेक्टर पुन्हा माझावर खेकसला आणि मला म्हणाला खरं सांग काय ते आणि त्याने माझी कॉलर पकडली. आता मात्र माझे हात पाय गळून पडले होते माझ्या डोळ्यासमोर मला एक अंधुकसा धूसरपणा जाणवू लागला.. मी काही बोलणार इतक्यातच समोर मला नैना दिसली...अगदी तशीच जशी मला काही तासापूर्वी दिसली होती...
त्या धूसर नजरेमध्ये नैना मला दिसत होती..पण यावेळी नैना च्या चेहर्यावर एक समाधानकारक स्मितहास्य होतं जणू तिला मला काहीतरी सांगायचं होतं पण तिला समजण्या अगोदरच काही क्षणात मी माझे डोळे मिटले आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडलो. मी डोळे उघडले तर मी एका स्ट्रेचर वर झोपलेलो होतो आणि माझ्या बाजूला माझे आई-बाबा होते. माझ्या आईने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांना बघुन माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण बोलण्याची काही ताकद नव्हती. मला कळलं हे तेच हॉस्पिटल आहे . नर्स माझं बीपी चेक करत होती जसे मी शुद्धीवर आलो आहे हे कळतात नर्स गडबडीने बाहेर गेली. माझ्या बाबांनी मला विचारलं कसं वाटतंय तुला आता? मी दबक्या आवाजात म्हणालो "ठीक वाटत आहे" पण माझा दुसरा प्रश्न हात होता की नैना कुठे आहे? माझ्या बाबांनी मला विचारलं कोण नैना.. तू डोक्यावर ताण देऊ नको शांत पडून रहा.. मी बाबांना विचारलं किती वाजले? बाबा म्हणाले सकाळचे नऊ वाजले आहेत. बाबा मला म्हणाले तू पूर्ण एक दिवस बेशुद्ध होतास राजा आणि आज सकाळी आता तुला शुद्ध आली आहे. मी अजून काही विचारायला जाणार इतक्यात डॉक्टर साळुंखे दरवाजा उघडून माझ्यासमोर आले. डॉक्टर साळुंके नि माझ्या कपाळाला हात लावून आणि माझ्या छातीला स्टेथतस्कोप ने चेक करून मला विचारलं काय मग हिरो कसं वाटतंय आता? दबक्या आवाजात मी बोललो की मी बरा आहे पण नैना कुठे आहे.. मला ती दिसलेली मी शुद्ध हरपायचा आधी..मी तिला पाहिलेलं. हा प्रश्न विचारताच डॉक्टर साळूंखेच्या चेहर्यावरचे हावभाव थोडे गंभीर झाले. ते मला म्हणाले तू आराम कर म्हणून.. इतक्यात मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला पोलीस कुठे आहेत ते मला तुरुंगात तर नाही ना टाकणार? डॉक्टर साळुंखे मला हसत म्हणाले नाही रे बाबा किती प्रश्न विचारशील जरा आराम कर.. अजून एक दिवसानंतर मला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.. त्या एका दिवसांमध्ये मी डॉक्टर साळुंके ना आणि माझ्या आई-बाबांना मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत हा प्रश्न तीन-चार वेळा विचारला पण त्यांनी काही उत्तर दिले नाही. आता या प्रसंगाला एक महिना पूर्ण झाला होता. ह्या एक महिन्यांमध्ये एक क्षण असा गेला नाही की मला नयनाचा चेहरा आणि घडलेला प्रसंग डोळ्यासमोर येणं थांबलं होतं. माझी चलबिचल अवस्था माझ्या आई-बाबांना पाहवत नव्हती. ना धड जेवण जात होतं ना कशात लक्ष लागत होतं. कारण माझ्या डोक्यातले प्रश्न हे अर्धवटच राहिले होते त्यांना उत्तरं अजूनही मिळाली नव्हती. मला आठवतंय रविवारचा दिवस होता दुपारी अचानक डोअर बेल वाजली आणि डॉक्टर साळुंखे घरी आले होते. डॉक्टर साळुंखे नीं पुन्हा मला विचारलं काय हिरो कसा आहेस? येऊ का आत? चहा पाणी झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं मला एक सांगशील.. त्या रात्री नेमकं काय झालं होतं? तू अक्षरा बंगल्यावर कसा पोहचलास? डॉक्टर साळुंके मला पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच मी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं पहिले मला सांगा मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत? डॉक्टर साळुंखे स्मितहास्य देत म्हणाले "दे बोथ आर फिट ॲण्ड फाइन नॉव .. आणि ते दुसरे गृहस्थ मीना मॅडमचे हसबंड आहेत बरं का.. " मी त्यांना म्हणालो की मला त्या दोघांनाही भेटायचे आहे तर डॉक्टर साळुंके हसत म्हणाले अरे तुला त्यांना भेटण्यापेक्षा त्यांना असं झाले की ते तुला केव्हा भेटत आहेत. मी म्हणालो मग केव्हा भेटायचं? डॉक्टर साळुंके म्हणाले काही दिवस थांब ते आताच कुठे रिकव्हर झाले आहेत. मी विचारलं त्यां दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता? डॉक्टर साळुंखे म्हणाले त्याची तू चिंता करू नकोस ज्यांनी ही त्यांची हालत केली आहे ते आता तुरुंगात आहेत. डॉक्टर साळुंखे म्हणाले "चल मग निघू मी..? " मी "हो " म्हणून मान हलवली पण अजूनही माझ्या प्रश्नाची उत्तरं मला मिळाली नव्हती आणि मी डॉक्टर साळुंखे ना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ह्यासाठी दिली नाहीत कारण पहिले मला मीना मॅडम शी ह्या विषयाबद्दल बोलायचं होतं. एक आठवडा असाच गेला बरोबर शनिवारी दुपारी मला माझ्या मोबाईल वर एक कॉल आला मी म्हणालो हॅलो कोण? समोरून आवाज आला "मीना बोलतेय.." मी काही सेकंदासाठी एकदम स्तब्ध झालो.. मी काय बोलू हे मला कळत नव्हत इतक्यात मीना मॅडम नी मला विचारलं कसा आहेस म्हणून? मी म्हणालो मी बरा आहे तुम्ही कशा आहात आणि तुमचे मिस्टर कसे आहेत. त्या म्हणाल्या एकदम फर्स्ट क्लास आणि आज आह्मी जिवंत आहोत फक्त तुझ्यामुळे.. त्यांच्या आवाज ऐकून मला असं वाटलं त्यांना कुठेतरी भरून आलं. पण त्यांनी स्वतःला सावरत मला विचारलं तुला जेवणामध्ये काय काय आवडतं? मी म्हणालो म्हणजे? तर त्या हसत म्हणाल्या की उद्या तू आमच्या घरी जेवायला येणार आहेस तुझ्या आई बाबां बरोबर.. मी म्हणालो पण तुमची तब्येत? मीना मॅडम म्हणाल्या त्याची तू चिंता करू नकोस आमची छान शी एक शेफ आहे जी तुला हवं ते खाऊ घालेल.. त्यांना मी म्हणालो असं काही नाही मला काही ही चालेल गोड पदार्थ मला आवडतात.. तर त्या हसत मला म्हणाल्या की चल मग उद्या एक वाजता बरोबर आमच्या घरी येणार आहेस मी तुला ऍड्रेस मेसेज करते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मी उठलो. मीना मॅडम आणि त्यांच्या मिस्टरांना भेटण्यापेक्षा मला माझ्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांचे वादळ क्षमवायचे होते म्हणून मी त्या दोघांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो. मीना मॅडमच्या घरी माझी आई येऊ शकली नव्हती पण माझे वडील माझ्या बरोबर आले होते. मी पुन्हा एकदा अक्षरा बंगल्यावर पोहचलो आणि मनात धस्स झालं कारण त्या दिवशी ची रात्र मला आठवत होतीं. मीना मॅडम नी दरवाजा उघडला आणि मला घट्ट मिठी मारली. मीना मॅडमच्या मिठीत एक प्रकारे मला माझ्या आईची च उब जाणवली. असं वाटलं की रक्ताचं नाही पण काहीतरी जन्मोजन्मीच जात आहे आमच्या दोघात . मी सोफ्यावर बसलो, ते घर पुन्हा एकदा माझ्या नजरेत सामावत होतो, त्या रात्रीचं घर आणि आताचं घरं या मध्ये खूप जमीन-अस्मानाचा फरक होता. मी मीना मॅडम ना विचारलं "तुमचे मिस्टर "? मीना मॅडम म्हणाल्या ते त्यांच्या रूम मध्ये आहेत सध्या व्हील चेअर वर आहेत आणि डॉक्टरानी आराम करायला सांगितला आहे असं बोलून त्यानी मला आणि माझ्या वडिलांना चहा आणि स्नॅक्स ऑफर केला
इतक्यात माझं बाजूला लक्ष गेलं नैनाच्या शो पीस सारख्या फ्रेम वर.. मी ती फ्रेम हातात घेतली. त्या फोटोमध्ये नयना खूपच सुंदर दिसत होती.. तोच निरागस चेहरा आणि तेचं निरागस हास्य.. अर्धा तासातच आमचा जेवणाचा कार्यक्रम आटपला. आश्चर्य म्हणजे या अर्धा तासाच्या जेवणामध्ये त्या प्रसंगाबद्दल एक शब्दही नाही काढला गेला बोलण होतं ते फक्त आपापल्या जीवनाबद्दल. मी तोंड धुऊन आणि हात पुसून पुन्हा सोफ्यावर बसलो. मिना मॅडम आल्या आणि म्हणाल्या वर आमच्या रूम मध्ये येतोस का? ह्यांना तुला भेटायचं आहे म्हणून. मी बाबांकडे बघितले.. बाबा म्हणाले जा तू भेटून ये मी इथेच बसतो. मीना मॅडम आणि मी त्याच पायऱ्यांवरून चढून वर गेलो. त्या भिंतीला आता नैनाची ती फ्रेम नव्हती जी माझ्या कडून फुटलेली. मी मिना मॅडमच्या रूममध्ये गेलो त्यांचे मिस्टर व्हील चेयर वर शांत बसले होते त्यांनी मला जवळ बोलावलं आणि माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि मला बोलले "ब्रेव्ह बॉय " आणि माझ्या गालावर हात ठेवून मला थरथरत्या ओठानी म्हणाले "थँक्यू..थँक्यू सो मच " हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते आणि बघताक्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपाटप ओघळले. इथे मीना मॅडमचे देखील डोळे पाणावले होते. मीना मॅडम मला म्हणाल्या ये मी तुला नयनाची रूम दाखवते. मीना मॅडमना नयना बद्दल भरपूर काही विचारायचं होतं पण कसं विचारू.. माझ धाडसचं होत नव्हतं. बाजूचीचं रूम नैनाची होती. ती रूम इतकी सुंदर सजवलेली की जणूकाही नयना त्या रूम मध्ये अजूनही राहते असा भास मला झाला. नैना चे अनेक फोटो तिथे होते पण त्यातली मी एक फ्रेम उचलली ज्या फोटोमध्ये नयनांनी अगदी तोच सफेद टॉप आणि ब्लू जीन्स वाला ड्रेस घातलेला. इतक्यात मीना मॅडमनी मला विचारलं "तूला त्यादिवशी नैना नी चं इथे आणलं होतं ना? मीना मॅडमचा हा प्रश्न ऐकताच माझ्या अंगावर शहारे उठले आणि मी त्यांना एकटक बघतच राहिलो. मीना मॅडम नी ती प्रेम माझ्या हातातून घेतली आणि त्या फोटोवर हात फिरवून मला नयना बद्दल सांगू लागल्या. माझी एकुलती एक मुलगी. लहानपणापासूनच बिनधास्त आणि बोल्ड. हॉर्स रायडिंग, स्काय ड्रायव्हिंग, टेनिस स्वतःहून शिकली आणि एन्जॉय करायची. तसं स्विमिंग सोडून सगळ काही शिकलेली, पाण्याची तिला खूपच भीती वाटायची. वाहत्या पाण्याचा तर तिला फोबिया होता आणि ह्याच फोबियाने तिचा जीव घेतला. मागच्याच वर्षी कॉलेजच्या सुट्टीमध्ये तिचे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी ऋषिकेशला ट्रेक आणि रिवर राफ्टींग साठी गेले. मी तिला बराच वेळा सांगितलं की जर तुला मुळात वाहत्या पाण्याचा फोबिया आहे तर तू कशाला करायला जाते रिव्हर राफ्टिंग. पण ती ऐकली असती तर नैना कसली. ती मला म्हणाली "ममा मला हाच तर माझा एकुलताएक फोबिया घालवायचा आहे म्हणून जातेय ना? प्लीज मला जाऊ दे. आतापर्यंत मी तिला कधीच नाही म्हटलं होतं पण कदाचित मी त्या दिवशी तिला नाही म्हणाले असते. सगळं काही व्यवस्थित होतं पण अचानक त्याच दिवशी ऋषिकेश नदीला पूर आला होता आणि त्यामध्ये माझी नैना रिवर राफ्टींग एक्सीडेंट मध्ये वाहून गेली. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिची बॉडी जवळच्याच नदीकिनारी सापडली. हे सगळं सांगताना मीना मॅडमच्या डोळ्यातून अश्रू त्या फ्रेम वर येऊन पडले. हाचं ड्रेस घातलेला तिने त्या दिवशी आणि त्या दिवशीच्या सकाळी मला व्हाट्सअप वर तिने हाच फोटो सेल्फी काढून पाठवलेला.
मी मीना मॅडमना विचारलं तुम्हाला कसं कळलं की त्यादिवशी नैना चं मला इथे घेऊन आलेली. मीना मॅडम म्हणाल्या नैना चं अस्तित्व हे मला नेहमीच जाणवत आलंय.. पहिले मला भास वाटायचा पण नंतर असे अनेक प्रसंग घडले ज्यात नैना ने तिच्या आत्म्याद्वारे तिचं अस्तित्व दाखवलं होतं. कधी कधी मनात येत की नैनाच्या आत्म्याला शांती मिळाली आहे की नाही, विधीप्रमाणे आह्मी तिचे अंतिमसंस्कार देखील केले होते. मी ह्यांना तिच्या आत्म्याचा अस्तित्वा बद्दल अनेक वेळा सांगितलं पण ह्यांना खरं नाही वाटतं पण मागच्या रविवारी डॉक्टर साळुंखे नीं मला फोन वर सांगितलं की तू सारखं सारखं नैना बद्दल विचारत होता. तेव्हा मला संशय आला की नक्कीच माझ्याबरोबर होणारे नैनाचे प्रसंग तुझ्यासोबत ही झाले असणार. आताही मला असं वाटतंय कि इथे रूम मध्ये ती बसून आपल्या गोष्टी ऐकत असेल आणि तिच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत असतील. मीना मॅडम ना त्यादिवशी घडलेला प्रसंग मी सांगितला.. मीना मॅडम मला म्हणाल्या तू सांगितलेला हा प्रसंग मी नेहमीच लक्षात ठेवीन, हा प्रसंग मला माझी मुलगी या जगात असल्याचा भास देत राहिल. मी मीना मॅडम ना विचारलं "पण त्यादिवशी नक्की तुमच्यावर तो प्राणघातक हल्ला कोणी केला होता? " मीना मॅडम म्हणाल्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यातली मुलं रेंट वर राहत होतीं. ते दोघे चोरी करण्याच्या हेतूने रात्री घरी शिरले होते. त्या दिवशी मी ह्याच रूम मध्ये नैनाचे फोटो अल्बम बघता बघता झोपले. इतक्यात मला ह्यांचा ओरडण्याचा आवाज आला. आमच्या रूम मधले दागिने नेताना मी त्यांना पकडलं, प्रतिकार करताना त्यांच्यापैकी एकाला मी ओळखलं आणि म्हणून आमचा काटा काढण्यासाठी त्या मुलाने आमच्यावर चाकूने हल्ला केला पण त्यानंतर ज्या चमत्कारिक रीतीने जे आह्मी वाचलो ते जगासाठी विश्वास ठेवण्यासारखं नसलं तरी मला शंभर टक्के विश्वास आहे. नैना हे जग सोडून गेली असली तरी तिचं अस्तित्व हे माझ्यासाठी नेहमीच अमर होतं, आहे आणि राहील.
त्यानंतर मीना मॅडमशी माझं नातं हे आई मुलासारखं झालं. मी मिना मॅडमला "ममा" बोलायला लागलो. आजही जेव्हा मी अक्षरा बंगला समोरून माझ्या बाईकने जातो तेव्हा गेट सामोरं नैना माझ्याकडे बघून स्मितहास्य देताना दिसते . तोच सफेद ड्रेस, तेच गोड स्मित हास्य आणि तोचं सुंदर चेहरा.
The End