कथा : रामसेतू
भाग 05
गुजराती भाविक अत्यंत तन्मयतेने रांगेत उभे राहून भजन गात होते. राजवीर आणि त्याची टीम सुद्धा त्यांच्याबरोबर उभी होती. पण राजवीर ची नजर चहूबाजूला होती, कारण त्यांच्या मागावर असलेले ते दोघे कधीही आणि कुठूनही त्यांच्यावर हल्ला करू शकत होते. काहीही करून सकाळच्या 6.30 पर्यंत त्यांना वेळ काढायचा होता.
अचानक प्रोफेसर ना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. वयोमानाप्रमाणे त्यांना एवढी धावपळ झेपणार नव्हती याची कल्पना राजवीर ला होती पण त्याच्या कडे दुसरा कोणताही मार्गच नव्हता. पण आता प्रोफेसर ची अवस्था बघताना त्याला त्वरित काहीतरी हालचाल करणे भाग होते.
त्याचे लक्ष आजूबाजूच्या भविकांकडे गेले. बरेचसे भाविक जे दक्षिण भारतात यात्रेसाठी येतात ते रामेश्वरम ला यायच्या आधी तिरुपतीला जाऊन येतात त्या मुळे त्यांचे केस हे पूर्णपणे काढलेले असतात. हे बघून अचानक राजवीर ला कल्पना सुचली. त्याने हरीश ला मंदिराबाहेर असलेल्या एका 24 तास उघड्या असलेल्या एका मेडिकल स्टोर मध्ये पाठवलं आणि एक रेझर मागवून घेतला. तो आणल्या बरोबर त्याने प्रोफेसर ना बाजूला नेले. तो पर्यंत त्यांना पाणी वगैरे देऊन शुद्धीत आणले होते.
हरीश ने रेझर आणल्या बरोबर त्याने मागचा पुढचा विचार न करता, प्रोफेसर ची दाढी आणि मिशी दोन्ही काढून टाकली. प्रोफेसर आता बिलकुल ओळखू येत नव्हते. त्याने त्या इतर भविकांमधूनच एक लुंगी आणली होती. प्रोफेसर ने ती लुंगी नेसली आणि त्या भाविकांच्या घोळक्यात परत सामील झाले. राजवीर ने त्यांना त्याच्या डोक्यात असलेली कल्पना सांगितली होती.
प्रोफेसरांच्या वयाचा विचार करून त्याने असं ठरवलं होतं की बोटीतून त्या समुद्रातील खडकावर फक्त राजवीर, हर्षल, हरीश आणि सुंदरन हेच जातील. राघव आणि प्रोफेसर हे सरळ धनुष्यकोडी ला जाऊन या चौघांची वाट पाहतील.
त्या प्रमाणे सर्वजण तयार झाले.
त्याचवेळी राजवीर ची नजर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेली. तिकडे त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला. सुर्या होता तो. पण या वेळी तो एवढा आक्रमक वाटत नव्हता. तरीसुद्धा सावधानता बाळगत राजवीर आणि त्याची टीम सूर्याच्या नजरेत आपण येणार नाही याची काळजी घेत होते. आता सुर्या इथपर्यंत आला आहे याचाच अर्थ अजूनही काही लोक त्याच्या बरोबर असू शकतात, असा अंदाज राजवीर ने लावला. त्याला अजूनही तो सूर्याचा दुसरा साथीदार दिसत नव्हता जो त्यांच्या हॉटेल वर सुर्या बरोबर कमांडो म्हणून होता. म्हणूनच राजवीर ने ताबडतोब सर्वांना मंदिर आवाराच्या बाहेर काढायचे ठरवले.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुर्या उभा होता त्यामुळे तिथून जाण्यात धोका निश्चित होता. म्हणून मंदिराच्या मागच्या बाजूने पुजाऱ्यांना जायचा एक छोटा रस्ता होता. रामेश्वरम च्या शिवलिंगावर पहिला अभिषेक हा समुद्राच्या पाण्याने करतात आणि त्यासाठीच हा छोटा रस्ता किंवा दरवाजा म्हणा, होता जिथून मंदिराचे पुजारी समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पाणी भरून आणू शकत असे. त्याच मार्गाने सर्वजण समुद्र किनाऱ्यावर आले.
राजवीर ने राघव आणि प्रोफेसर ना किनाऱ्यावरूनच चालत मुख्य रस्त्याला लागायला सांगितले आणि तिथून मिळेल त्या वाहनाने धनुष्यकोडी पर्यंत पोहचण्याची जबाबदारी दिली. उरलेले चौघे हर्षल ने सांगितलेल्या दिशेने म्हणजेच बरोबर उलट दिशेने चालायला लागले. थोडं अंतर गेल्यावर त्यांना काही मच्छिमारांच्या बोटी दिसल्या. हर्षल ने त्यातलीच एक बोट ठरवली होती.
राजवीर ने घड्याळात पाहिलं, सकाळचे 5.30 वाजले होते. अजुन एक तास वेळ होता ठरल्याप्रमाणे निघायला. तेवढ्यात त्याला समुद्रकिनाऱ्यावर सुर्या दिसला. या तिघांना पाहून त्याने त्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. राजवीर ला आता कुठलाही प्रतिकार करण्यात वेळ घालवायचा नव्हता. म्हणून त्याने तिथलाच एक मोटरबोट जी इंधन भरून तयार होती ती ताब्यात घेऊन सुरू केली. ज्या मच्छिमाराची ती बोट होती तो धावत आरडाओरडा करत अजून माणस घेऊन बोटीच्या दिशेने येऊ लागला. पण राजवीर साठी एक एक क्षण महत्वाचा होता. त्याचसाठी त्याने सरळ ती बोट समुद्रात ढकलली. नौदलाचे अधिकारी असल्याने राजवीर, हर्षल आणि हरीश या तिघांनाही समुद्राची भीती नव्हतीच. प्रश्न होता सुंदरन चा. सुंदरन हा पाण्याला घाबरतो किंवा त्याला त्याचा फोबिया आहे हे बोटीत बसल्यावर सर्वांना कळले. पण आता वेळ गेली निघून होती.
बोट वेगाने आता समुद्रात निघाली. मंदिराला मागच्या दिशेला ठेऊन ते खोल समुद्राच्या दिशेने निघालो होते. राजवीर ला आता फक्त एकच प्रश्न होता की त्यांना दिशा कशी कळणार ते. त्याचवेळी त्यांच्या नशिबाने त्यांना पुन्हा एकदा साथ दिली. राजवीर ला समुद्रात काहीतरी चमकताना दिसले. त्याने बागजितले तर तो दगडी खांबच होता ज्यावर यांना जायचे होते. लेझर हवेतून प्रवास करताना दिसत नाहीत पण ते परावर्तित झाल्यावर त्या जागी प्रकाश दिसतो, तोच प्रकाश आता त्यांना दिसत होता. कदाचित कोणत्यातरी गाईड ने टुरिस्ट लोकांना मंदिराची जादू दाखवण्यासाठी लेझर मारला होता. पण त्याच लेझर ने आता राजवीर ला मदत केली होती.
राजवीर ने ताबडतोब त्यांची मोटरबोट त्या खांबाच्या दिशेने वळवली. आता त्या चौघांकडे कोणतीही साधने नव्हती त्यामुळे दुर्बिणीतून बघून खांबाच्या दिशेनेच आपण जात आहोत ना हे तपासणे शक्य नव्हते. आणि समुद्रात थोडं अंतर गेलं की आपल्याला दिशा समजेनाश्या होतात. त्याचमुळे थोडं अंतर गेल्यावर राजवीर परत एकदा थांबला. घड्याळात सकाळचे 6.00 वाजले होते. त्याचवेळी राजवीर ला एक अद्भुत दृश्य दिसले.
नॉर्मली आपण लोकांनी सूर्य समुद्राच्या मागे अस्ताला जातो हे पहिले आहे पण हा बंगालचा उपसागर होता, जो पूर्वेला होता त्यामुळेच राजवीर ला आणि त्याच्या टीम ला सूर्याचा पहिला किरण दिसला. त्याच किरणांच्या उजेडात राजवीर च्या मागच्या बाजूला मंदिराचा कळस देखील चमकत होता आणि त्या गाईड ने सांगितल्या प्रमाणे खरच त्या कळसातून परावर्तित होणारे किरण समुद्रातील त्या खांबावर येत होते. आता दिशा शोधणे एकदमच सोपे झाले. राजवीर ने आपल्या बोटीचा वेग वाढवून त्या खांबापाशी बोटीला आणले आणि बोट बंद केली.
अजूनही पूर्ण ओहोटी झाली नव्हती त्यामुळे खांब अजूनही कमरे एवढ्या पाण्यात होता. त्या खांबाच्या आजूबाजूला नक्की किती जागा आहे याचा अंदाज अजिबात येत नव्हता. तरी देखील धीर करून राजवीर ने खांबाला पकडून पाण्यात उडी मारली. राजवीर स्वतःच्या पायावर उभा राहिला होता. त्याने आजूबाजूला फिरून अंदाज घेतला. साधारणपणे दोन फूट जागा खांबाच्या सर्वबाजूने शिल्लक होती आणि त्या नंतर त्याला पायाला जमीन लागत नव्हती. याचाच अर्थ तो खांब एखाद्या चौथऱ्यावर असणार असे राजवीर चे मत झाले.
आता हळूहळू पाणी कमी होत होत. सुमारे पंधरा मिनिटात खांबाच्या आजूबाजूचा चौथरा पूर्णपणे दिसायला लागला. सुंदरन ने घाबरत घाबरत त्या चौथऱ्यावर पाय ठेवला. राजवीर चा एक हात सतत हातात पकडून ठेवत सुंदरन ने खांबाचे निरीक्षण सुरू केले. खांब आता एवढी वर्ष पाण्यात राहून देखील अत्यंत चांगल्या अवस्थेत होता. त्यांच्यावरील कोरीवकाम अजूनही जसेच्या तसे होते. सुंदरन ला आता असा अंदाज बांधता येत नव्हता की हा खांब किती जुना आहे ते, तसेच या खांबाच्या महत्व रामसेतूच्या बाबतीत काय आहे हे देखील समजत नव्हते.
अचानक हरीश ला काय वाटले कुणास ठाऊक पण त्याने खांबावर चढायला सुरुवात केली. तो राजवीर ला म्हणाला की आपण वरच्या बाजूने देखील बघूया काय आहे ते. त्या प्रमाणे हरीश वरती चढायला लागला. खांब एवढा मोठा नव्हता की एक माणूस त्याच्यावर उभा राहील. हरीश ने खांबावरील नक्षीकामाचा आधार घेत स्वतःला वरपर्यंत नेले. खांबाच्या वरच्या बाजूला त्याला आधी काहीच दिसत नव्हते. पण हरीश ने हाताने तिकडे थोडी साफसफाई केली असता, त्याला एक तबकडी दिसली. आणि त्या तबकडीच्या एका बाजूला एक अणकुचीदार बाण बनवला होता.
हर्षल ला खांबाच्या वरच्या भागात एक आरसा सदृश्य वस्तू देखील दिसली जिच्यावरून ते लेझर परावर्तित होत असत. हर्षल ने राजवीर ला तो मॅप उघडून बघायला सांगितले. मॅप मध्ये जी रेषा खांबापासून निघून धनुष्यकोडी च्या दिशेने जात होती त्या दिशेला काही दिसत आहे का हे बघायला हर्षल ने वर चढलेल्या हरीश ला सांगितले पण तसे काहीच दिसत नव्हते.
राजवीर ने हरीश ला ती वरची तबकडी हलते आहे का ते बघायला सांगितले. त्या प्रमाणे चेक करताच हरीश च्या लक्षात आले की वरची तबकडी ही काही अंशात फिरू शकते आहे. त्याच प्रमाणे तबकडी बरोबर तो जो आरसा वरच्या भागात आहे तो पण फिरतो आहे. राजवीर ने हरीश ला तबकडी फिरवायला सांगितली.
तबकडी फिरवायला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत, ती सुमारे 90 अंशात वळून स्थिर झाली. त्याच बरोबर तो आरसा देखील काही अंशात फिरला. जसा तो आरसा फिरला तस त्यांना धनुष्यकोडी च्या दिशेला काहीतरी चमकताना दिसले. मंदिराच्या कळसावरून परावर्तित होणाऱ्या किरणांना या आरक्षणे धनुष्यकोडी पर्यंत पाठवलं होत.
त्याचबरोबर जसे ती तबकडी 90 अंशात फिरून स्थिर झाली, तशी खांबाच्या मध्ये एक दरवाज्यासारखा भाग बाजूला झाला. आणि आतमध्ये एक राजदंड सारखी वस्तू होती. सुंदरन ने काळजीपूर्वक तो दंड बाहेर काढला. त्या दंडाचे निरीक्षण सुंदरन करत होता. त्याला त्या दंडावर बरेच कोरीवकाम आढळले पण त्याच बरोबर सर्वात खाली काही फिरकीच्या बोल्ट ला असतात तश्या आऱ्या होत्या. हा दांडा नक्कीच कोणत्या तरी यंत्राचा भाग होता. आता ते यंत्र कोणते हे धनुष्यकोडी ला जाऊनच कळले असते.
राजवीर ला आणि इतरांना वेळ किती गेला या सर्वात याचा अंदाजच येत नव्हता. जेव्हा आला तेव्हा समुद्राला भरती सुरू झाली होती. आणि पाणी गुढघ्यापर्यंत आले सुद्धा होते. मोठ्या मुश्किलीने सुंदरन ला आलेला पॅनिक अटॅक थांबवून त्याला या तिघांनी बोटीत बसवले. सुंदरनच्या मागोमाग राजवीर, हर्षल आणि हरीश हे तिघंही बोटीत बसले आणि राजवीर ने बोट धनुष्यकोडी च्या दिशेने ते निघाले.
इकडे राघव आणि प्रोफेसर धनुष्यकोडी ला पोहचले आणि राजवीर ची वाट पाहू लागले. राघव ला इमर्जन्सी वॉशरूम ला जावं लागलं. राघव गेला आहे हे बघून प्रोफेसर ने खिशातून एक जुना 3310 काढला आणि कॉल लावला. समोरच्या व्यक्तीने दुसऱ्या रिंगला कॉल उचलला. इकडे प्रोफेसर नी बोलायला सुरुवात केली, "हॅलो, शिवा बोलतोय"
क्रमशः