#सुलेखालेख- भाग ::-- सातवा
देशात कायदा व व्यवस्था नावाची अशी एक बाब आहे की तिनं ठरवलं तर पहाड ही दिसत नाही वा ठरवलं तर पहाडातला उंदीर नुसत्या डोळ्यानं शोधेल.
इन्स्पेक्टर नेहेते एक कर्तव्य दक्ष अधिकारी. सागबाऱ्यातला गायब राधेश्यामचा सांगाडा दोन महिन्यांनी काटवान भागात सतोन्याला रेतीच्या ढिगात सापडला व नेहेते कामाला लागले. आषाढ अमावास्येला राधेश्याम फर्डे पत्नीस मोकळं करण्यासाठी घटस्फोट देण्यासाठी सारं पेपरवर्क करत माठलीला येतो. त्याच रात्री आलेखही गायब होतो. आलेख....सुलेखा... राधेश्याम.. काही तरी नक्कीच कनेक्शन आहे. अर्जुनराव व भिमा फर्डे यात अडकले असावेत असा एकही पुरावा नाही.तरी जबाब देतांना पुन्हा पुन्हा यांच्यावरच संशयाची सुई फिरत राहते. पण पुरावा काहीच मिळत नाही. सुलेखा आलेखशी लग्न करणार होती हे तिनं आधीच स्पष्ट केलंय. पण त्याचा ही तपास नाही. कदाचित लग्नावरुनच राधेश्याम व आलेख यांचं बिनसलं असावं? ही एक शक्यता.मात्र आलेखनं राधेशामला मारलं याबाबत काहीच हाती लागत नाही. राधेशामवर धारदार शस्त्रानं दोन्ही खांद्यावर मानेच्या बाजूला वार झालेत तसेच डोक्यावर ही वार झालेत हे सांगाड्याच्यातील हाडावरुन कळलंय.
तोच आणखी गडबड उडाली. आलेखचाही सांगाडा सापडला सुलेखानं आलेखची अंगठी ओळखली. त्यावरुन ओळख पटली. त्याची कहाणी ही तशीच गुंता वाढवणारी.
.
.
चित्रा गेली व दशक्रिया विधी आटोपताच सुलेखा पारण्याला परतली. तापीवरील धरणाचे दरवाजे बंद करत पाणी अडवायला बरेच दिवस झाले होते. पाण्याचा फुगवटा होत बॅकवाटर पुर्वेकडं सरकू लागलं. पाण्याची पातळी दररोज वाढू लागली.पाणी काठाकडं सरकत आरोग्य केंद्राच्या वालकंपाऊंड पर्यंत आलं. सशांनी कोरलेल्या बिळापर्यंत! थांबलेलं शेवाळलेलं पाणी मातू लागलं व त्याचा वास पारण्यात जाणवू लागला.
दुपारी चारच्या सुमारास सुन्या फिरणाऱ्या पोरांनी काठावर पाण्यात सांगाडा पाहिला व एकच गलका केला. कुणीतरी शहाण्या बघ्यानं आऊटपोष्टला कळवलं. आरोग्य केंद्राची गर्दी दक्षिणेकडच्या भिंतीजवळ जात पाहू लागली. सांगाडा भिंतीला लागूनच पडलेला. पोलीस आले. सांगाडा शेवाळलेला.शेवाळ काढलं जाऊ लागलं.हाताच्या बोटाच्या वाकलेल्या काड्यागत हाडात काही तरी अडकलेलं दिसलं. पोलीसानं काड्याच्या सांध्यात अडकलेली अंगठी काढली. तो बाजूला होत भिंतीजवळ येत घासू लागला. खड्यातलं ' एस' अक्षर दिसू लागलं. उत्सुकतेपोटी महाजन डाॅक्टर व इतर सहकारी पाहू लागले. तोच अधिकाऱ्यांनं पोलीसाला जरबेनं खडसावलं व अंगठी ताब्यात घेतली. मात्र डाॅक्टराजवळ उभ्या सुलेखानं तोवर ती पाहत ओळखलीही व तिच्या पायाखालची जमीनच हादरली.
औरंगाबादला आई वडिलांनी जे दागिने घेतले होते त्यातली वैशिष्ट्य पूर्ण ही अंगठी होती. आलेखनं तिला शाल घेतली व ते परतले. आईकडून सुलेखानं ती अंगठी मागून घेत आबांसोबत शहरात जाऊन 'एस' नावाचा सुंदर खडा मढवून आणला. सुलेखालेख नावाच्या ढाब्याचं उद्घाटन झालं त्या खुशीत लग्नाआधीच तिनं आबांच्या मर्जीनं ती अंगठी आलेखला घातली होती. हे आठवताच तिनं आबांना व विठ्ठलरावांना तात्काळ बोलवून घेत आऊटपोष्ट गाठलं. अंगठीची ओळख दाखवताच पोलीसांनी सारी माहिती घेत लखाजी निंबाळे करुन बील पावती घेत औरंगाबादचं सराफाचं दुकान पोलीसांनी हेरलं. अंगठी वरील शिक्का व बील पावतीवरून तीच अंगठी असून बिलाची मूळ प्रत दुकानात पाहायला मिळाली. पोलीस परतले. विठ्ठलराव लखाजी सुलेखानं एकच हंबरडा फोडला.विठ्ठलरावावर तर आभाळच कोसळलं. सुलेखाची तीच गत. आतापर्यंत निदान आलेख परत येईल ही आस तरी होती पण आता आसच मावळली. केवळ नी केवळ आक्रोश!
मिसींग केस माठलीत दर्ज असल्यानं आलेखचा सापळा मिळताच नेहेते चक्रावले. राधेशामला आलेखनं मारलं असं गृहीत धरलं तर मग आलेखला कोणी मारलं असावं? आलेखला राधेशामनं मारलं गृहीत धरलं तर मग राधेशामला कोणी मारलं असावं? का एकमेकावर वार करत दोन्ही संपले असावेत? पण मग शव वेगवेगळ्या ठिकाणी कसं जाईल? याचा अर्थ यात आणखी कुणीतरी कर्ता करविता धनी वेगळाच असावा? पण मग कोण? सुलेखा? आलेखची ओळख तर तिनेच पटवली. नदीच्या पाण्यातून पारण्याला सांगाडा सापडतो म्हणजे तिथं कसा गेला? पुन्हा अर्जुनराव भिमा, सुलेखा, लखा निंबाळे साऱ्याची उलटतपासणी.
" साहेब, आलेखचा सांगाडा सुलेखाच्या नोकरीच्या गावाला सापडतो म्हणजे यात सुलेखाचाच हात असावा!"
" अर्जुनराव, जेवढं विचारलं तेवढंच सांगा! बाकी कुणाचा हात कुणाचे पाय ते आम्ही शोधूच! आषाढ अमावस्या, १४ आगस्ट रोजी आपण कुठं होता तेवढं सांगा! "
" साहेब काल काय खाल्लं ते आठवत नाही तिथं चार महिन्यापूर्वीचं कसं सांगता येईल? पण तरी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही पहाडात बैलं पहायला गेलो होतो एवढं आठवतं!"
" पहाडात कुठं?"
" समनसिंग वसावा हा बैलाचा व्यापारी आहे नर्मदाकाठावरील मोलगी परीसरात तिथं!"
" मग, घेतले बैल?"
" नाही! मनाजोगती नसल्यानं माघारी फिरलो!"
" या तुम्ही! "
अर्जुनराव मिश्कील हसत परतले.
" शिंदे ,या दोन्ही भावावर पाळत ठेवा! यांना कोण भेटतं व हे कुणाला भेटतात साऱ्या बाबी मला कळवत चला!"
अर्जुनराव लखाजीस भेटला.
" मामा! झालं ते वाईटच! आपल्यावर किती बाके प्रसंग आलेत! राधेशाम, आलेख, चित्रा सारे पुण्यात्मे एकामागून एक सोडून गेले! मी दु:खी! तुम्ही दु:खी ! सुलेखा तर दु:खीच दु:खी! यातून सावरण्याचा एकच मार्ग!"
"..........." लखाजी सुन्न पाहत मौनात.
" मामा ,तुम्हीच खुळ्यागत बसणार तर आम्ही पोरांनी कुणाकडं पहायचं!"
" दादासाहेब, मतीच गुंग झालीय! राधेशाम, आलेख नेमके.....!" लखाजीस उमाळा दाटून आला.
मामाच्या खांद्यावर हात ठेवत दिलासा देत अर्जुनराव बोलू लागले.
" मामा एक विनंती होती?"
" काय?"
" जर तुमची इच्छा असेल तर सुलेखाशी लग्नास मी तयार आहे! माझ्या चुलतभावासाठी मी सुलेखास देईन आधार!"
लखाजी उमाळेस आतून अग्नीकुंड पेटल्याचा भास झाला .तरी सयंम ठेवत ते बोलले.
" अर्जुनराव! लोक शेण घालतील माझ्या तोंडात! सुलेखा तर जिताच गाडीन मला,!"
" मामा! हवंतर मी अजून थांबतो! दु:खातून सावरू द्या तिला!"
लखाजीस त्याच्या लंपटपणाची किव व संताप वाटला.
लखाजीनं रडतच मथुराजवळ विषय काढला. पण ते सुलेखाच्या कानावर गेलंच. सुलेखा जागेवरच हंबरत फणाणली. भुजंग चाल करून येतोय ! ठेचलाच पाहिजे!
दहा पंधरा दिवसांनी पहाड उतरून समन्या व दमण्या वसावा माठलीला आले. हाॅटेल चित्रार्जुनावर ते भिमा बापूस भेटले. त्यांना पाहताच भिमा घाम पुसू लागला. भिमानं अर्जुनदादास फोन केला. भिमानं त्यांना घेत दादाच्या सांगण्यानुसार सागबाऱ्यास नेलं. त्यांचा पाठलाग होतोय हे त्याच्या लक्षातच आलं नाही.
" समन्या! इतकाही धीर निघत नाही का? आम्ही पळून चाललो का?
" दादा, चार महिने झालेत! आपली बोली महिन्याची होती!"
" अरे एक लाख तर दिलेत ना मग?"
" त्याच्यानं काय होतंय! आमच्या एका जोडीचेच लाख होतात! म्हणून अजून दोन बाकी आहेत!"
" दमन्या, समन्या मातू नका! दोनमध्ये सौदा झालाय! एक दिलेत आता एकच बाकी!"
" दोन लाखात फक्त राधेशाम बाबत ठरलं होतं पण आमची जोडी त्यात कापली गेली तिचे लाख अधिक लागतील.
" मुर्खांनो, नाव नका घेऊ! भिंतीला कान असतात! जे असेल ते! दिले जातील पण आता नाहीत!"
" दादा, इतक्या दुरुन आलोत निम्मे तरी द्या!"
" बाप्या पन्नास दे व यांना लवकर काढ!"
" बाकी?"
" दिवाळीला आम्हीच पहाडात येऊन देऊ! तुम्ही नाही यायचं!"
दमन्या व समन्या निघाले.
शिंदेच्या माणसानं सारी बातमी शिंदे व नेहेते इन्स्पेक्टर ला दिली.
'समन वसावेकडं पहाडात गेलो होतो' उलटतपासणीत अर्जुनराव बोलल्याचं त्यांना आठवलं. समन्या दमन्या येऊन भेटतात म्हणजे या प्रकरणाशी यांचा काही संबंध असावा का? नेहेतेस दमन्या व समन्याची पार्श्र्वभूमी माहीत होती. त्यांनी एक चान्स घ्यायचं ठरवलं.
पथकासहीत जीप घाट चढत पहाडात आली. दमन्या व समन्या घरीच दारूत टल्ली सापडले. त्यांना जीप मध्ये घेत माठलीत आणलं. दारू उतरल्यावर नेहेतेंनी त्यांना रिंगणात घेतलं.
" समन, दमन्या! तुम्ही अर्जुनरावाकडे आला होतात?"
" होय साहेब"
" का?"
" आमच्याकडून बैल नेले होते त्यांची रकम घेण्यासाठी!"
" मग?"
"पैसे घेतले व निघालो"
" किती? "
" पन्नास हजार!"
" समन! अर्जुनरावानं बैल केव्हा घेतले होते? कितीला घेतले होते?"
" पावसाळ्यात चार महिन्यापूर्वी. लाखाला!"
इन्स्पेक्टर नेहेतेंनी समन्याच्या कानाखाली सपदिशी वाजवली!
" समन्या, अर्जुनराव चार महिन्यापूर्वी तुमच्याकडं आले होते व बैल न घेता परत आले होते!" नेहेतेंनी अर्जुनरावानं जे सांगितलं होतं तेच खडसावून पटवलं. समन्या थरथरला.
" साहेब नंतर दुसऱ्या वेळेस घेतले होते लाखाला!" समन्या सावरू लागला.
पुन्हा कानाखाली बसली.
" लाखाला घेतले तर मग दोन लाख बाकी कसे?"
आता मात्र समन्या व दमन्या गडबडले. आपलं बोलणं साहेबास कसं कळालं,यानं त्यांची बोबडी वळली व ते ततपप करू लागले.
" दमन्या, राधेशामचं काय झालं?"
नेहेते साहेब दमन्यास विचारत समन्याचा वेध घेऊ लागले. दोन्ही घाबरले.
"समन्या दमन्या दोन लाखात किती जणाची सुपारी घेतली?" नेहेते साहेब अंदाजानं मनातली कडी जुळवत विचारते झाले.
" नाही साहेब दुसऱ्याचा काही संबंध नाही आमचा!" समन्या बोलला नी नेहेतेची बुटासहीत लाथ दोघांच्या कमरेत बसू लागली.
नेहेतेची मात्रा लागू पडली. हवेत मारलेला तीर अचूक लागला होता.
समन्या व दमन्यानं जे सांगितलं ते भयानक होतं. लगोलग अर्जुनराव भिमास अटक करण्यासाठी पथक गेलं. पण अर्जुनराव निसटले व भिका सापडला. भिकाच्याही कमरेत व मुस्काटात बसताच व समन्या दमन्या मध्ये असल्यावर भिमानं आता लपवण्यात अर्थ नाही हे ओळखलं व तो ही पोपटागत ओकला. समन्या दमन्या व भिमानं जे सांगितलं ते ऐकून नेहेते ही सुन्न झाले.
.
.
आपल्यापासून सुलेखाला दूर करण्यासाठी आलेख कारणीभूत ठरतोय हे अर्जुनरावांनी सांगताच राधेश्याम नं माठलीत अमावास्येला यायचं ठरवलं. त्यानं तसं दोन तीन दिवस आधीच सुलेखाला कळवलं होतं. सुलेखा पाडव्याला येणार होती. चतुर्दशीला आबासोबत आलेख पारण्याला गेला. त्यांनी जिल्ह्याला जात वकिलाकडून सारी तयारी केली. सुलेखा एकदम खुश होती. आपण राधेशाम पासून मुक्त होणार व सुलेखालेख खऱ्या अर्थानं एक होणार!
" आलेख! होईल ना रे सारं सुरळीत? होशील ना तू माझा?"
" सुलू परवा भेटूच! येईनच मी परत तुझ्या जिवनात! अर्ध्यातला अर्धा लाडू खायला!"
सुलेखा हसली.
" परवा सकाळीच येते मी माठलीला. तो उदयाच येईल माठलीत!"
आबा व आलेख माठलीत परतले तर सुलू ड्युटीसाठी पारण्याला. पण जिल्ह्यात दिवसभर सोबत फिरतांना अर्जुनरावांनी राधेशामला दाखवलं. जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या सुलेखास आलेखसोबत पाहताच राधेश्याम संतापला. कारण काही भावना नसल्या तरी राग, द्वेष, असुया या भावना मात्र त्याच्यात ठासून होत्याच.
" दादा, उद्या माठलीत अमावास्येचा भंडारा याचाच देतो मी!"
अर्जुनराव मनात एखदम खूश झाले. कारण सुलेखालेख ढाब्यानं त्याची हाॅटेल बंद पाडली होती, आलेखच्या वडिलांमुळेच फर्निचरचा कारखाना बंद पडला होता. नी नी राधेशामसाठी घरात आलेली सुलेखा हातात येता येता निसटू पाहत ह़ोती. महिपतकाकाचा बदला घेण्याची संधी आलेखमुळंच निसटत होती. म्हणून आधी आलेख.....
राधेश्याम दुपारीच माठलीत आला. तो लखाजी मामास भेटला . सारी कागदपत्रे दाखवली.
" मामा माफ करा! चुक घडली.पण आता सुलेखास मुक्त करतो!"
दिवसभर घनघोफ उठवत घनघोर पाऊस बरसत होता. सातपुड्यातले नाले तट्ट फुगत ओसंडत तापीला फुगवत होते. राधेशामनं माठलीतल्या गॅरेजवर बाईकच्या शाॅक अपच काम केलं. नवीन पाईप टाकत आॅईल भरलं. जुने शाॅक अपचे पाईप डिक्कीत तिरकस ठेवले. डिक्कीत आधीच कापडी पिशवी ही होती.
तो चित्रार्जुन व सुलेखालेखवर ही भरपूर बसला थोडीफार रिचवली ही.
सुलेखालेखवर वऱ्हाडातून आलेली गाडी थांबली होती. आलेख व मामा त्यांना स्टार्ट अप देत मेन कोर्स विचारू लागले.
" दिन्या इथले ससे तितर पारवे खूप प्रसिद्ध आहेत. ससेच खाऊ!"
" मालक आज गावात भंडारा होता म्हणून तितर पारवे ससे दिवसाच संपले!" मामा अदबीनं सांगू लागले.
" नाही! मालकास बोलवा! आम्हास ससेच हवेत!"
आलेख टेबलाजवळआला.
" दादा, ससे मिळतील पण निदान तास तरी लागेल! कारण रॅबीट फाॅर्मवर जात ससे आणावे लागतील!"
" एक तास सोडून दोन तास लागू दे! पण ससेच हवेत!"
" ठिक आहे मग! तो पावेतो बसा मी आणतोच!" सांगत आलेख बाईकवर निघू लागला.
" आलेख आज अमोशा आहे व पाऊसही मरणाचा! जाऊ दे त्यांना नकार दे, ते खातील चिकन मटण काही तरी!"
" मामा तुम्ही त्यांना स्टार्ट अप व दारू देत रहा मी ससे तीतर पारवे आणतो तोवर. कारण उद्याही लागतीलच ससे तीतर!"
आलेख पहाडालगतच्या फाॅर्म हाऊसवर निघाला.
काल जिल्ह्याहून परस्पर पहाडात गेलेले अर्जुनराव नुकतेच परतले होते.
" दादा, भंडाऱ्याचं जनावर गेलंय! मी मोडशी नाल्यातच कांड करतो!
" राधेश्याम जा! सांभाळून पण! भंडाऱ्याचा बळी निसटायला नको! आम्ही निवांत येतो!" अर्जुनराव चित्रार्जुन मध्ये जेवण करणाऱ्या समन्या दमन्या कडं पाहत बोलले.
राधेश्याम मोडशी नाल्याजवळ आला. नाल्याचं पाणी फरशीवर चढण्याच्या तयारीत. महापुरात पहाडातून भली मोठमोठाली लाकडं वाहत येत होती. फरशी अलीकडं रेती भरलेले दोन डंपर उभे होते. त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. पण डंपरमध्ये कुणीच दिसेना. म्हणून त्यानं सुकटेचा श्वास सोडला. आलेखला यायला उशीर होता. तोवर त्यानं बाईक डंपरच्या आडोशाला रस्त्याच्या कडेला उभी केली. डिक्कीतून कापडी पिशवी काढली. पिशवीतील सुलेखाची तीच लाल साडी बाहेर काढत त्यानं नेसली. मोगऱ्याचा गजरा पिन नं अडकवला. चुडा भरला व त्यानं पडत्या पावसात अंधारात टाळी वाजवली. गडगडणाऱ्या नभापेक्षाही टाळ्याचा निनाद त्यास मोठा वाटला. त्यानं डिक्कीतून शाॅक अपचे दणकट पाईप हातात घेतले व डंपरच्या आड तो आलेख येण्याची वाट पाहू लागला
.
.
.
..
क्रमशः.