#सुलेखालेख -भाग ::-- आठवा
शेतातून ससे, तितर घेत पायाला दोरी अडकवत आलेख घाईत ढाब्याकडं निघाला. जिकडे तिकडे अंधार व पावसाचे साम्राज्य. मध्येच कडाकड...ssss चमचम करत विजा कडकडत होत्या. ढग रागात गुरगुरल्या गत गडगडत होतेच. तोंडावरचा पाण्याचा मारा चुकवत चिखलातून पाण्यातून वाट काढत उजव्या बाजूला टर्न घेत आलेख हाय वे वर गाडी चढवणार तोच शेतातून काळं मांजर आडवं आलं व गाडीच्या फोकसमध्ये झापड बसल्यागत जागीच मटकन बसलं. आलेखनं कचकन ब्रेक दाबत वळणावर गाडी थांबवली. मांजर जोरात म्याॅव ssss म्याॅव करत ऊसात पळालं.
हाय वे वरची वाहतूक पूर्ण सुस्तावत भयाण शांतता पसरल्यानं पाऊस व वारा मातल्यागत मनसोक्त उंडारत होते. मोडशी नाला पुढे जवळच आला. नाल्याजवळ काहीतरी वाहन उभं असल्याचं दुरुन फोकसमध्ये जाणवू लागलं. कदाचित या काठावरील रेतीच्या डेपोमधून रेती नेणारं डंपर असावं ,आलेखनं मनात आडाखा बांधला.
त्याचवेळी पावसानं पूर्ण ओला झाल्यानं हुडहुडीत त्याला सुलेखा आठवली.' सुलेखा! मी येईनच तुझ्या जिवनात पुन्हा!' तो मनातल्या मनात आश्वासीत करत गाडी नाल्याकडं नेऊ लागला. लाईटच्या उजेडात आडव्या तिडव्या पावसाच्या धारा नाचत असतांना त्याला एक आकृती दिसू लागली.लाल सर साडी, इतकी धिप्पाड व उंच बाई! बाप रे इतक्या अंधारात, पावसात अपरात्री काय करत असेल नाल्याजवळ? हाताची खूण थांबवत असल्याचं जाणवलं. आलेख घाई असुनही गाडी थांबवता झाला.
" माठलीला जायचंय...." बाई जेवढी उंच व मोठा ओढलेला घुंगट तेवढाच तिचा भसाडा आवाज वाटला.
गाडी थांबताच टाकीच्या दोन्ही बाजूस टांगलेले ससे भेदरले व हालचाल करू लागले. तितर भेदरून पाहू लागले.
"बसा पटकन!" गाडीचा तोल सांभाळत आलेख बाई मागे बसण्याची हालचाल पाहू लागला.
तोच मागून डोक्यात दाणदिशी काही तरी आवाज, वेदना व बधीर सुन्नता व कानात सणका निघाल्यागत गरगरलं. आलेखच्या हातातून गाडी सुटली. गाडी व तो जमीनीवर आडवा पडला. काय होतंय कळायच्या आतच डोक्यात शाॅक अपचे पाईप दणादण आदळू लागले. दणके इतके जोरदार होते की मारणारी पूर्ण ताकदीची असावी. आलेखची सुध डोक्यावरच्या तीन चार दणक्यातच हरपणार त्या आधीच तो पुटपुटला.....
" कोण....? का.....का....मारतेय?" विचारण्यासाठी उघडल्या गेलेल्या तोंडात डोक्यातून निघणारं उष्ण ताजं रक्त पाण्यासोबत घुसू लागलं. डोळ्यात घुसत डोळे बंद होऊ पाहत होते. गाडीच्या पेट्रोलच्या टाकीखाली दोन तीन ससे लेगगार्डच्या फटीत अडकलेले. वरचे दोन तीन ससे पाय बांधल्या स्थितीत हालचाल करू लागले. दुसऱ्या हातातल्या पाईपने हळूच वार झाला व भेदरल्या सशांनी जागीच लेड्या टाकल्या. जणू कापसाचे दोन गोळे लाल होत रस्त्यावरच पडले. एवीतेवी ढाब्यावर पोहोचताच त्यांच्यातले एक दोन कापले जाणार होतेच. वरचे दोन शांत होताच खालचे धडधडू लागले. पाईपनं पायातली अडकवली दोरी हिसका देत तुटताच खालचे ससे नाल्याकडं झेपावत धूम पळाले.
गाडीपासून रस्त्यावर पडलेल्या स्थितीत दूर सरकत आलेखनं पुन्हा विचारलंच
" कोण....? का ...का.. मारतोय?"
" साला ...आलेख तू सवाल बहोत करता है! मरते मरते तो शांती रख! क्यो जवाब ढुॅंढता है! जवाब मालूम करके क्या करेंगा! मै पूरी जिंदगी जिते जिते जवाब ढूॅढ रहा हू की मै कोण? और तू मरते मरते और भी सवाल रख रहा है!" बुटासहीत लाथ रक्ताळलेल्या तोंडावर होती व पाईपनं आलेखच्या गुडघ्यावर वार होत होते.
" राधेशाम.....! तू.....? का मारतोय रे?" गुडघ्यातल्या असह्य वेदना सोसत आलेख आवाजावरुन पटलेली ओळख खातरजमेत बदलू लागला. कारण साडीमुळं घोळ झाला तरी आवाजानं ओळख पटलीच.
" नाही राधेशाम नाही! मी बृहन्नडा.....! मी शिखंडी....! मी किन्नर....! सुलूनं मला सांगितलं होतं रे! काय माहीतीय का? " वाड्यातल्या उंच भिंतीआड अंधारात साडी नेसून टाळ्या वाजवून काय हाशील! तुझं मूळ रूप उजेडात जगाला दाखवून नसलेली मर्दानगी दाखवत मला मुक्त कर! घटस्फोट दे!"..... म्हणूनच मी तयार झालो होतो. पण सुलूला तू फितवतोय यानंच माझ्यातला राधेशाम पुन्हा आक्रमक झाला. काल तुला तिच्यासोबत जिल्ह्याला पाहिलं नी बस ठरवलं .....सुलू माझी नाही झाली तर तुलाही भेटू देणार नाही.....मी कोण?.... बृहन्नडा? शिखंडी? किन्नर? नाही राधेनाना? नाहीच, राधी? राधीनानी?"
"रा.धे..शा...म......सा..ला......छ.....! पाठीमागून डाव साधला!"
आलेखचा आवाज तुटू लागला.
" साला ! आहेच मी छ....! बघ ...वाजवून दाखवतो टाळी...!ऐक.... पण सुलूला तरी... तुला भेटू देणार नाही"
" राधे...सुलू व माझ्यात तू आला होता! तरी आम्ही त्यागी बनलो. पण....पण... तु असा पोचट ऊस निघा..ल्या..वर... "
पुन्हा राधेशाम चेकाळला व आता त्यानं आलेखच्या मर्मावरच जोराचा वार केला!
" ॐनैनम छिंदन्ति शस्त्राणि! नैनं दाहती पावक:! न चैनं क्लेदयान्त्यापो! न शोषयति मारुत:!
मूर्खा आमचे आत्मे एक आहेत....."
ज्योत मालवता मालवता जोरात फडफडली असावी.
" ए साल्या थांब...थांब....ऐक...जाऊ नको...!" नी मग संतापात राधेशामनं आलेखचा पाय धरत जोरात गरगर फिरवत आता पर्यंत न वापरलेल्या पूर्ण ताकदीनिशी फेकलं.
दुरून माणसाचा व बैलांचा आवाज येऊ लागला. उद्याच्या आठवडे बाजारात बैलं घेऊन जाणारे येत असतील हे ओळखत राधेशाम घाई करत रस्त्यावर पडलेली आलेखची मोटार सायकल उभी करत ढकलत मोडशी नाल्यात टाकू लागला. फरशीवरून पडताच वाहणाऱ्या पुरात धपकन आवाज आला. महापुरात मोटार सायकल वाहू लागली. पूरच तसा उफाणाचा होता. मग रस्त्यावरचे पडलेले ससे पाण्यात भिरकावले. बाकी रक्त तर पडणाऱ्या पावसात वाहतच होतं. तोच माठलीकडून अर्जुनराव, भिमा बाईकवर आले. मागोमाग लगेच समन्या दमन्या सोबत पंधरा वीस बैलाचा घोळका हाकलतच आले.
" राधेशाम...? हे काय? साडी का नेसली मूर्खा? काम झालं का?"
" दादा, साल्याला मुक्त केलं...! बघ रक्त वाहतंय!" राधेशाम पदरानं घाम व रक्त पुसत म्हणाला.
रस्त्यात पाण्यासोबत लाल रक्त पडलेलं व वाहतांना दिसत होतं!
" राधेशाम बाॅडी कुठंय रे!" अर्जुनराव व भिमा विचारतायेत तोवर समन्यानं पाठीमागं खोचलेला धाऱ्या राधेश्याम वर दणदिशी हाणला.
" समन्या थांब थांब! आधी आलेखची बाॅडी कुठंय ते तर विचारु दे!"
पण समन्या व दमन्याच्या डोळ्यात तोवर खून उतरला होता.
" दादा,या मूर्खांना सांग मी आलेख नाही!" राधेशाम खांद्यावर ओझरता धाऱ्याचा घाव बसल्यानं निघणारी रक्ताची धार दाबत म्हणाला. पण तेवढ्यात दमण्यानं मागून तलवार उपसली.
राधेशाम बैलाच्या घोळक्यात शिरला.त्याला कळेना हे का हल्ला करत आहेत. पण त्याला शंका यायला लागली.
" राधेश्याम ,आलेखची बाॅडी कुठंय रे रस्त्याच्या चारीतही दिसत नाही!" अर्जुनराव पुन्हा विचारते झाले.
" मी मी......बाॅडी मोटर सायकल सोबत नाल्यात फेकली!"
दमन्यानं तोच तलवारीचा वार बैलाच्या घोळक्यात उभ्या राधेश्याम वर केला.
राधेशामनं हूल दिली व अर्जुनरावाच्या पाठीमागं पळाला. चुकलेला वार बैलाच्या मानेवर पूर्णू ताकदीनिशी बसताच अर्धी मान कापली जात आडदांड ताकदीचा बैल बेफान होत तडफडू लागला. रक्ताच्या चिरकांड्याच चिरकांड्या उडाल्या. गाव दिवाळीत दमन्या एका घावात पाडा ( हेला)मारणारा गडी!
वार चुकला हे लक्षात येताच उधाणलेल्या बैलाच्या घोळक्यात धाऱ्या धरुन एकीकडून समन्या तर तलवार धरुन दुसरीकडं नाल्यात दमन्या. अंधार असला तरी बाईकच्या उजेडाचा फोकस भिमा रेस देत समोर टाकू लागला. दोघांची खूनशी नजर व फुललेले श्वास जाणवू लागले. आता जवळ जात पुन्हा दमन्यानं तलवार उपसली तोच समन्यानं धाऱ्याच्या बांबूनं ठुशी मारत राधेशामला दमन्याकडं ढकललं. पुन्हा राधेशामनं जीवाचा आकांत मांडत वार चुकवला व दुसऱ्या बैलाचं शीरच धडावेगळं झालं. आता बैलाचा घोळका पूर्ण बिचकला व तितर बीतर होत फरशी सोडून पुढे सरकत उभा राहिला.
" दमन्या, समन्या दोन लाख देऊ पण शिकार सोडू नका!" अर्जुन रावच्या पाठीमागं भिऊन लपलेल्या राधेशामला त्यांच्याकडं ढकलत अर्जुनराव थंड स्वरात उद्गारले.
राधेशामची साडीच ओली झाली.
" दादा.....!.....दा.......का?.....मी काय अपराध केलाय!"
समन्याच्या धाऱ्या खांद्याच्या एका बाजूत घुसला व हाड काडकन वाजलं. राधेशामच्या किंकाळी नं घरट्यात झडीनं थिजलेली पाखरं पहाट झाली असावी म्हणून किलबिलत नाहीत पण कलकलतच उठली व आकाशात घिरट्या घालू लागली.
लगेच दमन्यानं तलवार ऐवजी फरशी काढली व उलटी करत दुसऱ्या बाजुचं बखोटं वाजवलं. राधेश्याम किंचाळत नाल्याजवळचं रान उठवू लागला. पण अमावास्या, मरणाचा पाऊस व रात्रीची सुनसान वेळ मदतीला कोणीच येईना. तो पुन्हा दादा बापूच्या पायात पडत बिलगत हंबरला.
" दादा, बापू आलेखचा माझ्याकडून काटा काढत माझाच काटा काढण्याचं कारण काय ? का.....का....?"
तोवर डोक्यात उलटी फरशी मधोमध बसली. आता पुढे गेलेलं बैलाचं घोळकं हळूहळू पुन्हा माघारी येऊ लागलं. एक दोन बैल पडलेल्या बैलांचं उष्ण पाणीमिश्रीत रक्त जिभेनं चाटू लागले. चव चाखताच वर तोंड करत फिसकारू लागले.
.
.
" का?.....का....?". राधेश्याम...तुझा जन्मदात्या महिपतचा बदला मला शांत बसू देईना! मी मला आरशात पाहीलं की मला तुझा की माझा महिपत बाप दिसे! ' पोरगं काकावर गेलंय' हे वाक्य काळजात तप्त सुरी फिरवे! मग बापाच्या अंधारात वाजल्या जाणाऱ्या टाळ्या! त्या टाळ्यांची त्यामुळे मला घृणाच वाटू लागली. मग उडवला बापाला.....नी आईला...नी माझ्या....सं....क....रीत..... महिपत बा...! जाऊ दे तू समजून घे! पण तरी ही मला झोप येईना. त्यातच तू वयात आला व तुझ्या टाळ्या पुन्हा वाड्यात निनादल्या. मला तर टाळ्यांची घृणा! तरी मी संयम बाळगत टाळ्या सहन करण्याचं ठरवत जन्माचा बदला घ्यायचं ठरवलं. पण एकाच दगडात दोन खाती बंद करायचं ठरवलं. आलेखपासून सुलेखाला दूर करायचं. सोबत सुलेखाला वाड्यात आणून महिपत काकानं खेळलेला डाव पुन्हा खेळायचं ठरवलं. पण ...पण सुलेखा...नादान ती... नाही ऐकली .मग नाईलाज झाला. मग तुझ्याकडूनच आलेखचा काटा काढला. आता बघ,आलेख गेला. मग तुझ्या टाळ्या मी का सहन करू?तूच सांग! म्हणूनच कालच पहाडात जात दमन्या व समन्याला गाठलं."
" दादा, वेळ जातोय! आधी काम उरकू मग तुझी कथा नंतर सांग त्याला!" दमन्या घाईला आला.
" दमन्या मूर्ख आहे का तू? थांब थोडा! माझा भाऊ कोणताच प्रश्न घेऊन मरायला नको! आधी त्याला मला नीट समजवू दे!" डोक्यात हराम चढला तर माणूस हैवान तरी बनतो वा लहान पोरासारखा! तीच गत अर्जुनरावाची झाली होती.
" दादा, मला जीवदान दे! मी वाड्यात नाही राहणार! मी चालला जाईन पंथात! पण मला वाचव!" रानगव्यासारखी ताकद असणारा राधेशाम आक्रोश करत विनवू लागला.
" राधेश्याम, टाळ्याच्या आवाजाची घृणा म्हणून नाव लावलेल्या बापाला सोडलं नाही तर तुला कसं सोडेन. आलेख व तू गेला की सुलेखा दोन तीन महिने आक्रोश करेल मग लखा मामास मी समजूत घालेन व दुसरी....!"
" दादा, पहाट होईल उरकव पटकन!" समन्या कलकलला.
" आवरा बाबांनो, आता उशीर झाला! पाठवा यास पंथाला!" अर्जुननं राधेशामला त्यांच्याकडं ढकललं.
दमन्या शिवशिवला. त्यानं एकच उलटी फरशी पुन्हा डोक्याच्या मधोमध रपकवली व राधेशाम जागेवरच टाचा घासू लागला. तोवर माठलीकडून मोटार सायकलचा आवाज येऊ लागला. अर्जुनराव, भिमा घाबरले व ते मोटार सायकल काढत पळ काढू लागले.
" दादा, थांबा! फक्त आधी बैल ढकलू लागा मग पळा!"
दोघे उतरले. चौघांनी एकेक बैलाचं धूड फरशीवरून नाल्याच्या पुरात ढकललं. अर्जुनराव भिमा पळाले. समन्या दमन्यानं बैलाचं पडलेलं शीर पाण्यात भिरकावलं. राधेशामची
बाजूला उभी मोटार सायकल पुराच्या पाण्यात ढकलली. तोवर बैलाचा घोळका राधेशाम पडला होता त्या जागेभोवती उभा राहिला व माठलीकडून आलेली मोटार सायकल फरशीवर उभी राहिली. समन्या दमन्याची धडधड वाढली. राधेशाम अजुन तसाच घोळक्यात पडलाय वाटतं. पण त्यांनी प्रसंगावधान राखत ते बैलांआड बसले.
बाईक वरून दोन जण उतरले. व एकेक डंपरवर बसत दोन्ही उभे असलेले डंपर घेऊन माठलीकडं निघाले. बाईक वाल्यानंही बाईक फिरवत डंपरमागे निघून गेला. थोड्या वेळानं शांत होताच सासूल घेत दमन्या व समन्या उठले. त्यांनी बैलांना पुढे हाकललं व एकदम घाबरले. बैलाच्या घोळक्यात पडलेला राधेशाम दिसेना.
" दमन्या, काम तमाम केलं होतं ना? मग?"
" सम्या, माझा दणका सणकून होता पण कळत नाही. साला उठूच शकत नाही जागेवरून! पण गेला कुठं मग?"
" जाऊ दे कदाचित तडफडत नाल्याकडं सरकलं असावं व नाल्यातल्या पाण्यात पडलं असावं! चल निघ पटकन.इथं थांबणं धोक्याचं आहे!"
समन्या दमन्यानं बैल पुन्हा पहाडाकडंच परतवले. एका तासानं अर्जुनराव व भिमा बाईकनं पुन्हा त्या जागेवर आले. सारी जागा त्यांनी पाहिली.त्यांना काहीच दिसेना. पाण्यानं रक्त वाहून गेलंय याची खात्री केली. व ते समन्या दमन्याच्या मागोमाग पहाडात चढले. पहाटे पुन्हा जोराचा पाऊस कोसळला व नाल्याची जागा एकदम साफ झाली. नालाही दोन बैलं, दोन गाड्या गिळंकृत करून जणू काही झालंच नाही असा बेमालूम तुफानी वाहत होता.
.
.
भिमा व समन्या दमन्यानी सारं सांगतात इन्स्पेक्टर नेहेते नं पुन्हा टायरमध्ये घालून ही दोघांच्या बाॅडी वेगवेगळ्या ठिकाणी कशा गेल्या हे समजेना. कारण नाल्यात टाकल्या असतील तर वाहत तापीत जायला हव्या होत्या. नवीन वर्षाचा रेतीचा ठेका अजुन सुरुच झाला नव्हता. व आलेखचं प्रेत तापीत सापडलं ते उलट्या दिशेला व बॅरेजच्या पलीकडं सापडलं होतं. मग प्रेते कुणी टाकली असावीत? सवाल व सुटू पाहणारा गुंता अजुन गुंथनकालाच वाढवत होता.
अर्जुनराव अजुन हाती लागले नव्हते.
नेहेतेंच्या डोक्यात सतत याच केसचा किडा किरकिरू लागला. भिमा, समन्या दमन्यांनी आतापर्यंत सांगण्यासारखं होतं ते सारं ओकलं होतं व त्यात सत्यता ही होती. पण मग दोन्ही प्रेते तेथून कुणी नेली असावीत? उभी असलेली डंपर्स यातच काही गोम आहे.
नेहेतेंनी माळमाथ्यावरील रेतीच्या डेपोमालक बबनरावाच्या डंपरवरील ड्रायव्हर्सना आणायला पथक रवाना केलं.
जावेद मियाॅ व बाबू भोयर हे पन्नासीच्या वयाचे दोन्ही ड्रायव्हर चौकीत आले. दोन्ही लटपटत होते. मागचं प्रकरण पुन्हा उकरलंय म्हणून ते घाबरू लागले. नेहेतेंनी पोलीशी खाक्या दाखवण्याआधीच ते गयावया करू लागले.
" जावेद मियाॅ, बाबू मी जे विचारतो ते जर खरं सांगितलं तर तुमची लगेच सुटका होईल अन्यथा तुमची दोघांची खटीया खडीच समजा!"
जावेद व बाबू दोन्ही घाम पुसत कावरे बावरे पाहू लागले.
"जावेद मियाॅ तुम रुखो, बाबूराव तुम्ही बाहेर बसा!"
"जावेद मिया, तुमच्या मालकाच्या रेती डेपोत जे प्रेत सापडलं त्या राधेशामचा खून झालाय! आणि त्यावेळी तू तिथंच होता!"
" साहब, मै बालबच्चेवाला आदमी हू! अल्ला का पाक बंदा हू! मुझजे ऐसे बुरे करम नही होंगे साहब!"
" मिया बिलकुल सही फर्माया! तुमचं डंपर तेथून पहाट फुटायच्या आधी काढलं होतं? मग ते तुम्ही कुठं नेलं होतं?"
" साहब, डंपर तो उस दिन नदी के उस तरफ के डेपो से रात को ही भरा था. लेकीन टाईट चेकींग चलने कारण हमारे मालीक के आदमी का फोन आया तो हमने नाले मे डंपर खडा कर दिया और माठली के चित्रार्जुन होटल पे खाना खा के पिछे पत्रे के निचे सो गये! रात के लगबग एक दो बजे फिरसे मालीक का आदमी आया. उसने बाईकपर मुझे और बाबू को डंपर के पास छोडा. वहा से डंपर लेके हम निकल पडे!"
" उस वक्त वहा पे तुमने कुछ देखा क्या?"
" साहब चार महिने बीत गये! सही ढंग से याद नही.बल्की कुछ बैल खडे थे शायद!"
" मग डंपर कुठं नेलं?”
" साहब माठलीसे होकर आगे तप्ती का पूल आनेवालाही था की फिरसे चेकींग करनेवालोने पिछा सुरू किया.हमारे आदमी का फोन आया. मैनै पूल के पास से ही पुरब की ओर जानेवाला रस्ता लगा लिया और बाबू सिधे निकल गया. स्काॅडवाली गाडी दूर तक मेरा पिछा करती रही. ट्रॅफीक न होने के कारण मैनै डंपर पुरी स्पीड से भगाया. उनकी गाडी बहोत पिछे रह गयी. आगे पारणा आया. मैने सोचा पिछा ऐसे ही चलता रहा तो उजाला हो जायेगा फिर भागना मुश्कील होगा. गाडी बहोत पिछे रह गयी. आगे सरकारी अस्पताल दिखा. मैने डंपर वही घुमाया. वहा दिवार का काम चल रहा था. रेत के ठिले पडे थे. मैने डंपर एक कोने मे लगाया.वहा दिवार बनाना बाकी था और गड्डा दिखा. डंपर रिव्हर्स करके वही रेत ढाल दी और खाली डंपर फिरसे पूल की तरफ भगाया! आगे चेकींग वालो की गाडी मिली .लेकीन खाली डंपर देखकर वह आगे निकल गये."
" और बाबू का डंपर का क्या हुआ?"
" साहब बाबू पूल क्राॅस करके सिधा सतोना डेपो पर चला गया!"
" तुम्हने डंपर पर चढकर देखा था क्या?"
" नही साहब! माठली के आगे ही पिछा करना सुरु हो गया था. आगे जाकर डंपर खाली करके सिधा निकल पडे!"
नेहेतेंनी नंतर बाबुला आत घेतलं. त्यानं ही जवळपास जावेदसारखेच जवाब दिले.
नेहेतेंनी दोघांना जाऊ दिलं. नेहेतेची कडी थोडी जुळू लागली. नेहेतेंनी शिंदेला घेतलं व विठ्ठल उमाळेचं घर गाठलं. सुलेखा आलेखच्या साऱ्या विधी आटोपून आणखी रजा वाढवण्यासाठी आजच पारण्याला गेली होती. नेहेतेंनी मग सरळ पारण्यालाच जाणं पसंद केलं.
नेहेते मूळचे जालन्याचे. तीन महिन्यापूर्वीच त्यांची धुळ्याहून माठलीला बदली झालेली. सहलीस आलेल्या पोरांची केस झाली त्याच वेळी. घरचे मागच्या वर्षीच सुधीर नेहेतेच्या लग्नाची घाई करत होते. पण मनाजोगती मुलगी पटेना म्हणून मागच्या वर्षी लग्न बाकी होतं!
गाडी पारण्याच्या आरोग्य केंद्रात घुसली. नेहेते एम.ओ.महाजन यांची भेट घेणार होते. पण महाथन डाॅ. नेमके तालुक्याला गेलेले. मग त्यांनी सुलेखालाच बोलवलं.
आपल्याच वयाची आरोग्य सेविका असलेल्या सुलेखाची ही जवळपास तिसरी चौथी भेट असावी. पण आता पर्यंत घरचे कोणी ना कोणी असायचेच. जवाब घेतेवेळी फक्त अपवाद. आता सुलेखा पारण्याला भेटत होती. समोरून खाली मान घालत सुलेखा आली. गोरीपान शेलाट्या बांध्याची सुलेखा पाहता क्षणीच नजरेत भरणारी. पण हल्ली चेहऱ्यावरचा नूर उडालेला. पार रयाच गेलेली. लेणीशिल्पाचा वरचा रंग मुलामा उडाला तरी कोरीव रचनेनं लेणीशिल्प लक्ष आकर्षीत करतंच! तीच गत.
" बसा मॅडम! खरं तर मी तुमच्या एम. ओ. ला भेटायला आलो होतो .पण नंतर तुमचीही भेट घ्यायचीच होती. या चार महिन्यात तुमच्याशी ज्या घटना घडल्या त्या खरच क्लेश दायक आहेत! त्याच्यानं मन:स्थिती बिघडणं सामाजिकच आहे!.......पण..."
सुलेखानची नजर दक्षिणेकडं नदी पात्राकडं स्थीर होती. त्या स्थीर नजरेत टपोऱ्या मोत्याची लड तरारली.
" मॅडम, जाणाऱ्याचं दु:खं आहेच ! पण निदान त्यांना न्याय मिळावा म्हणून मला काही माहिती हवीय! सांगाडा सापडला ती जागा दाखवाल?"
सुपरव्हायजर व सोबत एक दोन कर्मचारी घेत सारे दक्षिणेकडच्या भिंतीकडं निघाले.
" साहेब, पाणी अडवल्यावर इथंच....!"
नेहेते जागेचं निरीक्षण करू लागले. तापी काठावर चिल्लारी मातलेली.
" वालकंपाऊंड केव्हा बांधलं?"
" साहेब आताच,चार महिन्यापूर्वी!"
" मग हे खबदाड कसलं पडलंय?"
" साहेब परतीच्या पावसात खालची जमीन सशांनी पोखरल्यानं पाण्यामुळं खालचा भराव खचला!"
" साहेब त्या वेळी ही एक सांगाडा येथून पाण्यात वाहून गेला होता!" सुलेखा प्रथमच बोलली.
नेहेते चमकले. "हेच....हेच.. !"
नेहेतेंनी सर्व जागा पाहिली व त्यांचा अंदाज खरा ठरत साऱ्या कड्या भराभर जुळल्या.
निघतांना नेहेतेंची नजर सुलेखावर गेलीच. लेणीशिल्प....! मागच्या वर्षी किती लेण्या धुंडाळल्या आपण! पण शिल्प मनात बसलंच नाही! मनाचा ही वेगळाच मंत्रा असतो. कधी कधी सारी बंधनं झुगारत कुठं अडकून थांबेल काही खरं नाही.
परततांना नेहेते गाडीत साऱ्या कड्या जुळवू लागले. राधेशामनं एका डंपरवर आलेखला फेकलं असावं! वा नंतर दम तोडतांनाही माणसात तीव्र बळ एकवटतं. त्या तिरमिरीत झरपडत आलेख धुंदीत चढला असावा! तसाच राधेशामही सारे बैल व बाईक फेकण्यात गर्क असतांना दुसऱ्या डंपरवर चढला असावा व दम तोडला असावा! आलेख असलेला डंपर जावेदनं पाठलाग टाळण्यासाठी पारण्याला आरोग्य केंद्रात घालत उपसला! पण नेमका याच ठिकाणी उपसावा यामागं
'सुलेखा मी पुन्हा येईन गं!' ही इंटेनसिटी तर नसावी? सुलेखा असलेल्या ठिकाणीच मृत्यूनंतर येणं यामागे सुलेखा आलेखचं नितांत प्रेम दिसून येत! त्यामुळेच पावसात सांगाडा वाहून गेला पण तो तापी काठावरील चिल्लारीत कुठं तरी थांबला असावा अडकून! ते कुणाच्याच लक्षात आलं नसावं! कारण आपण ती जागा पाहिली आता तर दाट चिल्लारी. बॅरेजला पाणी अडवण्यात आल्यावर पाणी हळूहळू वाढलं असावं व तो सापळा वाढणाऱ्या पाण्यासोबत की सुलेखासाठी पुन्हा त्याच जागी आला असावा!
बाबून सरळ डंपर सतोन्याच्या डेपोवर उपसलं व राधेशामची बाॅडी डेपोत दाबली गेली. परतीच्या पावसात त्याचाही सांगाडा उघडा पडला. कदाचित तो उघडा पडला म्हणून त्याच दिवशी आलेखचाही सांगाडा लगोलग बाहेर आला!"
खरच सांगाड्यास सांप्रत भावना नसतात! पण गतकालीन जाणीवा डकलेल्याच असतात! त्या शिवाय एवढा योगायोग व सहसंबंध असावा का? गत जाणीवा श्रेष्ठ की आपल्या मुलामा उखडू पाहणाऱ्या लेणीशिल्पाबाबतच्या सांप्रत भावना?"
सारा गुंता सोडून पूर्ण झाला असं वाटत असतांना आपण आपल्या भावना नको तेथे रुजवत का पुन्हा गुंथनकाला वाढवत आहोत? पण हे आपल्या हातात नाही ना! अडकणं, अडकून थांबणं! कुणासाठी तरी....! कुणी सोडून गेलं तरी कधी काळी लुटलेल्या लाघव वेळेसाठी कोण मैना.....कोण राघू कातर होत अडकून पडतोच!
.
.
क्रमश