#सुलेखालेख- भाग ::-- सहावा
राधेश्यामच्या दसव्याला केलेलं मुंडण तुकतुकीत असतांनाच कमळी मधुरानं चित्रा गेली. दशक्रिया विधी होताच नातेवाईक परतू लागले. घरात आता निवडक मंडळी थांबलेली. जसजशी माणसाची गर्दी कमी होऊ लागली तसतशा खटाबाई तरुण लेकीच्या दु:खान आक्रोश करू लागल्या. चित्रा जाण्याच्या तीन दिवस आधीची संध्याकाळ खटाबाईस आठवली.
" आई! रताळं हे मूळ किती राकट दगडी वजनदार असतं ना?"
" चित्रे! काय झालं? मध्येच त्याच काय?" खटाबाई खेकड्याचं सूप चमच्यानं पाजत विचारू लागल्या.
" आई ते पिवळं पाणी ही माझी पिवळी कावीळ कमी नाही करणार आता! नकोय मला ते."
" पोरी थोडं का असेना पण कडूमडू करत घोट!"
" आई, मी काय म्हणत होते ते राहिलंच! रताळं कितीही आप्रुक असलं, वजनदार असलं तरी एकदा का त्याला कावी लागली की ते रताळ कामातूनच जातं.माझंही तसंच झालं बघ! माझ्या वडिलांनी ,काकांनी किती कमवून ठेवलंय! शिवाय फर्डे कंपनी पण तालेवार.पण तरी एवढं ऐश्वर्य असतांना या काविळीनं मला ग्रासलं. ती हटता हटणार नाही. का? माहितीय का तुला?"
" चित्रे दळभद्री बोलू नको सांजवेळी.तुला काहीच होणार नाही.बघ तू ठणठणीत बरी होशील!"
" आई ! आशेचा दिवा किती ही देखणा व हवासा असला तरी तो दिवाच! जरा वारा आला की विझणार! म्हणून आता आशेचा दिवा नकोय मला.वास्तवतेचा विखार ओळखलाय मी. आई खरं सांगू का! नियती दिसत नाही व तिच्या हातातील काठीही दिसत नाही.पण तिचा वार वर्मी बसतो. आपण वडिलांचं न ऐकता काकांना व आलेखला संपत्तीवरून बेदखल केलं. नियतीनं काठी उगारली बघ!"
खटाबाई व जवळच बसलेले अर्जुनराव जागेवरच हबकले. काळजावरच वार! तो ही घरातूनच.
.
.
हे आठवलं व खटाबाई दुर्गास बिलगत रडू लागल्या.
अर्जुनरावांनी रबीची शेती सागबाऱ्यातील जालमसिंग वसावास बटाईनं कसायला दिली. जालमसिंग बिजवाई घेण्यासाठी नेमका त्याचवेळी आला. भिमा बापूनं रबीच्या पेरणीसाठी फाऊंडेशनचं हरभऱ्याचं बियाणं काढून दिलं.
" बापू, हे हायब्रीड बियाणं नको. गावठी हरभरा पेरायचाय. घरातलं गावठी वाणाचा हरभरा द्या!" बटाईनं शेत कसणारा जालमसिंग म्हणाला.
वाड्याच्या ज्योत्यावर गावातल्या पाच सहा माणसासोबत बसलेल्या अर्जुनरावांनी हे ऐकलं व त्यांची तळपायांची आग मस्तकात गेली. पण तरी ते संयम बाळगत तिकडे कानाडोळा करू लागले.
" जालम, हे हायब्रीड बियाणं चांगलं आहे हेच ने!"
" बापू गावठी वाण नसेल तर राहू द्या मी कुठून तरी घेतो हवंतर! पण हे असलं संकरीत बियाणं मी पेरणार नाही!" जालम बोलला नी त्याच वेळी सुलेखा आईसोबत माठलीहून येत वाड्याच्या पायऱ्या चढत होती.अर्जुनराव ताडकन उठले खाडखाड चालत जात जालमसिंगाच्या कानाखाली छपाकदिशी लगावली.
" चल निघ! नाही द्यायचं शेत! फूट इथून!
अर्जुनरावांनी कानात का वाजवली हे जालमलाच काय पण बसलेल्या लोकांनाही कळालं नाही. त्यांना वाटलं पत्नी वियोगानं अर्जुनरावांची मनस्थिती बिघडली असावी.
खटाबाईचं रडणं , जालमसिंगचं पुन्हा पुन्हा हायब्रीड, संकरीत बोलणं व त्यात सुलेखाची एन्ट्री यातच अर्जुनराव बिथरले. त्यांनी जालमला हाकललं व ते थेट वाड्याच्या वरच्या मजल्यावर आले. कपाटाली बिअर, व्हिस्की कुठलाच ब्रॅण्ड न घेता त्यांनी भरलेल्या पिंपातून मव्हाची घेतली व घटाघटा घोटत राहिले. किक बसेपर्यंत रिचवणं घोटणं सुरूच. सरायला आलेल्या अश्विनाची थंडी त्यांना लवकर किक देऊ लागली. वरच्या मजल्यावरच्या ओसरीवर फडताळात त्यांना महिपत काकाची तसबीर दिसली व त्यांचं माथं भणाणलं. हातातला भरलेला काचेचा ग्लास भिरकावला गेला व काचेच्या तुकड्याच्या खचात महिपत काकाही भिरभिरत खाली आले. तसबिरीची काच विखुरली व फोटोचा कागद फाटत वाऱ्यावर भिरभिरत खाली आला.
" काका......! हायब्रीड.....संकरीत....कलम....हे
शब्द आमच्या धमनीतलं, नसातलं रक्त तापवतात.आमचं अस्तित्व, आमचं मूळ शोधण्याची जिज्ञासा जागवतात. त्या मूर्ख जालमला काय माहीत!
.
.
नशेत झिंगणाऱ्या अर्जुनरावावर मव्हाचा अमंल चढण्यासोबत अतीतचा अंमल चढू लागला. मग एकेक स्टेशन ते मागं मागं धावू लागले.
.
.
चित्रा, सोमा उमाळे, विठ्ठल उमाळे, आलेख, सुलेखा, राधेश्याम हे तर जवळचे थांबे! पण दूरचे थांबे! ते तर आपल्या मुळावर घाव घालतात. 'माणसाचं मूळ अस्तीत्व काय?' हा प्रश्न मेंदूलाच झिणझिण्या आणतो. महागड्या मादक पदार्थाची नशाही खर्रकन उतरवतात.
.
.
राधेशाम तुला जसा प्रश्न पडला होता की मी कोण? भावा तसाच प्रश्न तर मला लहानपणापासून सतावतोय रे! आज मी जे वागतोय त्याचं मूळ त्यात अडकलंय. अर्जुनराव धमन्यातलं रक्त डोळ्यात उतरवत भूतकाळातले थांबे धुंडाळू लागले.
.
.
श्रीपती फर्डे एकुलते एक वारस! सारे ऐश्वर्य, ऐशोआराम, संपत्ती तरुण उमलत्या वयातच पायाशी. साहजिकच त्याचा माज ही रक्तात उसळू लागला. दुपार रात्र नशा उतरेना. नवी नवरी लक्ष्मीच्या रुपात घरात.
वैशाखवणवा तापू लागला. दुपारी तऱ्हाट होत श्रीपती वाड्यात झोपलेले. गावात काही किन्नर येत बिदागी मागू लागले. एकेक घर करत ते वाड्यावर आले घरातल्या लक्ष्मीनं माप भरून धान्य दिलं. पण नवखी सून पाहताच त्याच्या बिदागीच्या आशा वाढल्या व ते टाळ्या वाजवत गलका करू लागले. बाईनं बिदागी देऊनही हे हालत नाही यानं नशेतल्या श्रीपतीचा पारा चढला.
" अय ! जे दिलंय ते घ्या नी निघा!" श्रीपती गरजले.
मालकच आला पाहून ते अधिकच दंगा करू लागले. नव्या नवरीसमोर आपण थोडा तमाशा केला तर मालक मागू ते देतील म्हणून ते हुल्लड करू लागले.
श्रीपतीची झोप व नशा यात खोडा येतोय म्हणून त्यानं संतापानं एकाची गचांडी धरत ढकललं. बिदागी तर नाहीच उलट गचांडी धरली म्हणून सारे एक झाले व अधीकच हुडदंग माजला. श्रीपतीनं ढकलाढकलीत एकास लाथ घातली व तो उंच ओट्यावरून खाली कोसळत उन्हात रक्तबंबाळ झाला. ते पाहून सारे बिथरले व त्यांनीही हल्ला चढवला. त्यातच श्रीपतीनं आधीच जखमी झालेल्याच्या डोक्यातच हातात आलेल्या काठीनं दणका दिला. बाकी पळाले. पडलेला गयावया करू लागला. पण चिथावलेला व नशेतल्या श्रीपतीनं त्यास मजबूत चोपलं.
" माकडांनो! का उगाच दुसऱ्याला भार बनत त्रास देतात!"
जखमी झालेला पाणी पाणी करत कळवळला.
" मालक पोटासाठी दारात येतो! कळणार नाही तुम्हाला.पण तुमच्या वंशात ही जन्मास यावा व तुम्हास, तुमच्या पिढीस त्याचं दु:खं कळावं! ही आमची हाय आहे! ती खाली जाणार नाही!"
श्रीपतीनं हे ऐकलं व पुन्हा काठी आणली.
" जेवढं माराल तेवढं दु:खं वाढो तुमचं!" तो मार खात कळवळत निघून गेला.
काळाची चक्रे फिरली. श्रीपती तो प्रसंग विसरला. श्रीपतीस दलपत व महिपत दोन मुलं झाली. मुलं वाढू लागली. दलपत एकदम आडदांड सावळा व राठ चेहऱ्याचा. चेहऱ्यावर देवीच्या व्रणागत व्रण. महिपत नितांत सुंदर, कोरीव ताशीव संगमरवरी लेण्यागत सुकुमार!
दोघा पोरांचं लग्न झालं व श्रीपती दारुनं गेले. किन्नराचा प्रसंग हाय ,शाप कुणाच्याच ध्यानीमनी नाही.
दलपतची पत्नी सुंदरा नावाप्रमाणंच सुंदर लावण्या! तर महिपतची पत्नी शांताबाई एकदम साधी. पाहणाऱ्या नवीन माणसास शांता व दलपत ही जोडी आणि महिपत व सुंदरा ही जोडी वाटे. सटवाई कधी कधी चुकत असावी का? का निसर्ग मागची देणी चुकविण्यासाठी सटवाईलाच टाक लिहीतांना मुद्दाम चुकावयास लावत असावा!
लग्नानंतर सहा महिन्यात वाडा धुमसू लागला. सुंदरा, दलपत, महिपत शांता सारे सारेच नियतीचे अगतिक बाहुले. सटवाईनं भरलेल्या किल्लीवर चालणारे! सुंदरास दलपतरावाची कमजोरी समजली. महिपत व दलपतनं आपल्या आईकडून किन्नराची हाय ऐकली होती. पण ती सत्यात उतरली हे लग्नानंतर कळलं.बहुतेक दलपतनं कळू दिलं नसावं. वाड्यात त्याही स्थितीत काही ही न ठरवता गपगुमान काही करार आपोआप ठरले. समजोते आपोआप न करता झाले.
दलपतचं व्यंग झाकलं गेलं केवळ सुंदराबाईनं चुप्पी धरल्यानं.
सुंदराबाईस अर्जुनराव व भिमा झाला. मग शांताबाईस राधेशाम.
वाड्याची इज्जत शाबूत राहिली. दलपतराव ताठ मानेनं जगू लागले पण वाड्याबाहेर. सुंदराबाईच्या नजरेत नाही! तसं पाहता सुंदराबाई ही स्वत:समोर कधीच नजर वर करु शकल्या नाहीत. सारीच हतबलता.
अर्जुन व भिमा वाढू लागले. अर्जुन आपल्या महिपत काकागतचं रुपवान तर भिमा आपल्या आईगत! बिचारे शेजारी गावकरी सहज बोलत
'दोन्ही पोरं बापावर गेली नाहीत हे बरं झालं!'
पण त्यांचं हे साधं वाक्य सुंदरा महिपत यांना खले व त्यांची नजर झुके.
अर्जुनराव व भिमा पंधरा-सोळा वर्षाचे झाले. वाड्यातली हतबलता चाणाक्ष अर्जुनला समजलीच. धमन्यातलं रक्त तापलं,खदखदू, धुमसू लागलं. डोळ्यात, अंतरात द्वेष संताप कळ दाटू लागली. जाळ पेटू लागला. बापाला पाहताच घृणा तिरस्कार वाटू लागला. लहानपणापासून अंधाऱ्या रात्री ऐकलेल्या टाळ्यांच्या आवाजाचे संदर्भ वाढत्या वयात कळताच घृणा....तिरस्कार! आई बाबत नुसता जाळ.
अर्जुन व भिमास गावात वा बाहेर कुठे चुकून जरी किन्नर दिसला तरी अर्जुन जागच्या जागी धुमसत राही.
अर्जुन व भिमानं यातून कायमची सुटका करण्याचं ठरवलं. अर्जुननं दक्षिण भारताची सहल आयोजीत केली. आई, वडील, काका,काकू भिमा व तो निघाला. आठ दहा दिवस बंगलोर, म्हैसुर गोवळकोंडा, उटी कोडाईकॅनाल, चेन्नई, कन्याकुमारी फिरले. परततांना चेन्नई च्या चौपाटीवर अपघातात दलपत राव, महिपतराव व सुंदराबाई पाण्यात बुडून गेल्या. शांताबाई मात्र वाचल्या. अर्जुन भिमाचा प्रश्नच नव्हता. दलपतराव घृणा तिरस्कारानं तर महिपतराव व सुंदराबाई राग संताप, उद्वेगानं गेल्या.
अर्जुन व भिमाचं चित्रा व दुर्गाशी जुळलं. सोमा उमाळेस मुलगा नाही ही अर्जुनरावास संधी वाटली. विठ्ठल उमाळेस त्यांनी सासु व चित्रास हाती घेत कटवलं.
सुलेखा....! लग्नात चित्रा व त्याच्या पुढं फुलं उधळत स्टेजकडं नेणारी सुलेखा! चित्रासोबतच मनात ठसली. म्हणून तर लखा मामाच्या मदतीनं चित्रार्जुन सुरू केलं. पण लखा मामा नितीचा शाबूत निघाला व निम्मा हिस्सा विठ्ठल उमाळेस देण्याची खटा बहिणीस गळ घालू लागला. मग तात्पुरती तीन एकर दिली. लखा मामा आलेखला घेऊन गेला व दोन वर्षात आलेखला तयार करु लागला. तोवर तर सारी जमीन चित्रा दुर्गाच्या नावावर करुन घेतली. मध्यंतरी उपरती झाल्यागत सासुबाई तीन सारखे वाटे करत आलेखला देऊ पाहत होती. पण आलेखला द्यायला जमीन होतीच कुठे!
जमीन नावावर होताच व फर्नीचरचं दुकान बसताच अर्जुनरावांनी आपले जुने हिशोब करण्यासाठी सागबाऱ्यात मुक्काम हलवला. तिथं तर वेगळंच प्रकरण!
इव्हेंट करत फिरणारा राधेशाम हल्ली विक्षीप्त वागू लागला. अर्जुनरावांच्या लक्षात येऊ लागलं. पण हे कसं शक्य म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण रात्री वाडा पुन्हा टाळ्यांनी निनादू लागला. अर्जुनरावांची खात्री झाली. पुन्हा वाड्यात किन्नर! पुन्हा तीच घृणा! तोच तिरस्कार! पण आता अर्जुनरावांनी जुनी खाती उघडण्यासाठी संयम ठेवत जुनी खाती उघडत हिशोब चुकता करण्याचं ठरवलं!
धमन्यातलं रक्त तापलं. वाढ्यात ठेवलेल्या मक्याच्या बियाण्यावरच्या हिरव्या रंगातली 'हायब्रीड....संकरीत....' ही अक्षरं सुटी होत त्याच्या नजरेसमोर नाचू लागली. अर्जुन व भिमा मध्ये....सुंदराबाई व महिपत आजुबाजुला....दलपत टाळ्या पिटतोय!
अर्जुनरावास घाम फुटला. त्यांनी घृणा तिरस्कार सहन करू पण हिशोब चुकता करूच! दोन खाती एकदम क्लोज करू!
" राधेशाम....!"
" दादा... मला आता राहणं शक्य नाही! मला तसली वस्ती असेल तिथं सोडा! मला इथं राहून तुम्हास त्रास नाही द्यायचा!" राधेशाम रडत विनवू लागला.
" राधेशाम.... भावा ...तू मूर्ख आहेस का! या वाड्यानं...महिपतकाकानं आमच्या वडिलांना सांभाळलं तर मग त्याच महिपत काकाच्या मुलास आम्ही का नाही सांभाळणार? तू कुठंच जाणार नाही! फक्त दलपतराव आयुष्यभर गप बसले तसंच तू ही रहा! बघ लवकरच तुझं लग्न ही करतो!"
" दादा! नको कुणाच्या आयुष्याशी खेळणं!"
" राधेशाम! आमची आई मौन पाळत या वाड्यात राहिली तशीच राहणारी शोधू आपण!"
" दादा ,पण तुम्ही मला स्विकारणार तसं तिनं स्विकारलं नाही तर उगाच हसं होईल? "
" राधेशाम तू फक्त तुझं न्यून जगास समजू देऊ नको! बाकी मी सांभाळेन सारं!"
माठलीत आलेखनं सुलेखालेख ढाबा सुरू केला व अर्जुनरावांचं नाव वाचून पित्त खवळलं. त्यानं चित्रा सासूबाईच्या मदतीनं शांताकाकूसाठी सुलेखास सागबाऱ्यात आणलं. सुलेखा वाड्यात आली व राधेशामला कल्पना दिली. राधेशाम सुलेखात आधार शोधू लागला. त्याच वेळी सुलेखालेख ढाबा जोरात चालू लागला.
" मामा!". लखा मामास माठलीत मामाच्याच घरी अर्जुनराव भेटले.
" बोला दादासाहेब?"
" आमच्या राधेश्याम साठी सुलेखा कशी वाटेल हो?"
" दादासाहेब, सुलेखासाठी मी मुलगा शोधलाय! म्हणून तेवढं सोडून बोला!"
" मामा, शोधलेला मुलगा विसरा व राधेशामबाबतच बोला! सुंदर राधेशाम! जमीनदार राधेशाम! भरपूर कमावणारा राधेश्याम! तुमच्या सुलेखाचं नशीब फडफडलं समजा!"
" अर्जुनराव! सांगितलं ना मी! सुलेखाचं आलेखशी पक्कं ठरलंय!"
" मामा! त्या आलेखची ढाब्यातली भट्टी व भांडी मी माझ्या शेतातून उद्याच फेकतो! मग?"
" अर्जुनराव भांडी फेकली तरी त्याच्यात कसब आहे तो कुठेही असले ढाबे उभे करेल!"
" मामा मला असली धमकी देण्याची लुटूपुटची लढाई नाही आवडत! थेट हल्ला करणारा मी! शेवटचं फुल आणि फायनल सांगतो! सुलेखाचं जमवणार तुमी पण आलेखच राहिला नाही तर? पांढरं कपाळ पाहणं या वयात सोसेल तुम्हाला?"
लखा मामा घाबरला,थरथरला.
" अर्जुनराव या थराला तुम्ही जाऊच शकत नाही!"
" मामा......! जो न्मदात्या आईस मारू शकतो ,जो बापाचं नावं देणाऱ्यास व बापास मारू शकतो त्याला चुलत साल्यास मारणं अवघड नाही! आणि हा हे ऐकून तुम्ही पंगा करणार तर नाहक सुलेखा कुवारका जाईल!"
लखा मामाच्या काळजात काटाच उभा राहिला.
" मामा! मी जसं तुम्हास समजावलं तसंच तिला व त्यालाही समजवा! आलेखला भरपूर मिळतील व सुखी राहील व सुलेखास श्रीमंत नवरा! मी तेवढ्यात लग्नाची तयारी करतो! बाकी तुमची सुलेखा राणी होणार हे निश्चीत.
मामा घाबरला व राधेशाम सुलेखाचं लग्न झालं. फर्ड्याच्या वाड्यात इतिहासाची पुनरावृत्ती घडणार!
महिपत - सुंदराई...
अर्जुनराव- सुलेखा...!
बिचारे दलपतराव व राधेशाम! पिटा टाळ्या!
हा अर्जुन काकाचा बदला घेणार म्हणून तर घृणा वाटत असुनही राधेशामला त्यानं वाड्यात थांबवलं होतं.
सुलेखास माहीत पडताच सुंदरबाईसारखं मौन धारण करत परिस्थितीला शरण जाणं तिला जमलं नाही व ती अर्जुनरावास चप्पलेनं हाणत माठलीत परतली.
राधेशाम बिथरला व तो पुन्हा मूळ रुपात येण्यासाठी घाई करू लागला. तो घटस्फोट देत सुलेखाला मोकळं करायला तयार झाला.
पण मग जुनी खाती उघडूनही बंद कशी होणार? हिशोबाचं काय? महिपत काकाची देणी कशी चुकवणार?
" राधेश्याम! काय करतोय तू!"
" दादासाहेब झाला तमाशा पुरे! सुलेखा मला नाही स्विकारणार! म्हणून मी सर्व कागद तयार करुन माठलीला जात तिला घटस्फोट देतोय!"
" राधेशाम! सुलेखा राहत होती रे! अजुनही ती परत येईलही पण तो आलेख....! आलेखच घोळ करतोय!"
" म्हणजे दादासाहेब?"
" भावा, तो आलेखच आपल्या सुलेखाला फितवतोय! त्याच्या चिथावणीमुळं ती येत नाही!"
". मग दादासाहेब?" राधेशामचं माथं व पित्त खवळलं! किन्नर असला तरी अंगात ताकद व इतर भावना होत्याच.
" एकच राधेश्याम आता! तो आलेख संपला पाहिजे!"
" त्यानं काय होईल?"
" तो संपला की सुलेखा वाड्यात आलीच समज!"
" असं असेल तर मग तो संपला असंच समज दादासाहेब!"
" भावा, आता तु माझा भाऊ शोभतोस!"
.
.
राधेशाम खवळला व तो घटस्फोट देण्याच्या बहाण्यानं आलेखचा काटा काढण्यासाठी माठलीत आला.
मोठ्या माशानं छोट्या माशाला पकडण्यासाठी निघावं. त्यानं तो पकडावा ही! पण छोटा मासा तोंडात असतांनाच मोठा मासा गळाला लागावा अगदी असंच काही तरी घडलं होतं
पण नेमकं काय?
आलेख व राधेशामचं नेमकं काय झालं?
पुन्हा गुंता!
.
.
क्रमशः.....