#सुलेखालेख -भाग ::-- नववा
सुधीर नेहेते आलेख राधेशामची केस लवकरात लवकर निकाली काढायला पहात होते. कारण दिवाळी उलटली होती. व नंतर तुळशी विवाह होताच आईचा तगादा सुरू झाला होता. मागच्या वर्षी आपण कसंबसं लग्न ढकललं होतं. पण या वर्षी ढकलता येणारच नाही व आता आपणासही ढकलावं वाटत नाही. किती किती उच्चभ्रू स्थळं आपण नाकारली मागच्या वर्षी! उच्च विद्याविभूषित मुली ही नाकारल्या. मनात मृद् गंध उठवतील वा सुवासाचा दरवळ पसरवतील अशा भावल्याच नाही कुणी. पण एक घटस्फोटीता(?)! साधी आरोग्य सेविका...! सुलेखा..! ते ही तिच्या मनाचा थांगपत्ता नाही. तरी आपण ...? कुणास कुठे ठाव लागेल व तो घुटमळत राहील याचा नेमच नाही.
समन्या, दमन्या व भिमानं गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे मिळणं आवश्यक होतं. ती त्यांनी पहाडातील गावातच नदीकाठी खोल दरीत दडवल्याची कबुली दिली होती. त्यांना घेत ती शस्त्रे मिळवणं गरजेचं होतं.
तसेच या खून खटल्यातील प्रमुख सुत्रधार अर्जुनराव ही अजून गवसत नव्हता! यांना लवकरात लवकर कोर्टात हजर करणं भाग होतं.
नेहेते, शिंदे व इतर शिपाई जीपनं समन्या दमन्या व भिमाला घेत निघाले.
अक्कलकुव्याहून जीप देवघोई घाट चढू लागली. नेहेते घाट पाहून चक्रावले. एकदम खड्ड्याखुड्ड्याचा अंगावर येईल असा चढाव! जागोजागी एकदम ब्लाईंड कर्व्ह व चढावाचे यु टर्न! एका बाजुला आकाशाला गवसणी घालू पाहणारे उंच सुळके तर दुसऱ्या बाजूस धडकी भरवणारी खोल खोल दरी. जराही अंदाज चुकला की खोल दरीतून हाडं गोळा करणंही कठीण! समोरुन स्थानिक नवटे पोरं अंगावरच वाहन घालतात की काय इतक्या जवळून सरावाची हूल देत होती. जीप दुसऱ्या गिअरमध्येही मोसम तुटला की घर्रर्रsss करत मागे येऊ पाहत होती. घातक वळणावर जीव मुठीत धरूनच बसावं लागत होतं.
दिवाळी लवकर आल्यानं दिवाळी उलटूनही दरीत जिकडं तिकडं सिताफळं लगडलेली दिसत होती. हिरवेगार रोशा गवत लहऱ्या मारत होतं, उंच कड्यावरून पांढरेशुभ्र जलप्रपात उड्या मारत दरीकडं फेसाळत होते. हिरवी वनराई पाहून घाटाची भिती कमी होई पण दरीची खोली लगेच धडकी भरवी. घाट पार करताच पठारा सारखा भाग लागला व साऱ्यांना हायसं वाटलं. समन्या व दमन्यास मात्र पहाड घाट याचं काहीच वाटत नव्हतं. कायम पहाडाशी टकरा घेणारे ते!
सपाटी वर रस्त्याच्या कडेला आदिवासी बाया, लहान पोरं सिताफळांनी भरलेल्या डाल्या घेऊन बसलेली. गाडीनं येणारे जाणारे दिसले की सिताफळं विकत घ्यायला सांगण्यासाठी धावत होते. एवढा उत्कृष्ट प्रतिचा गावरान मेवा पण पणन , वाहतूक व साठवणीची व्यवस्था नसल्यानं कवडीमोल भावानं विकावा लागतो याचा नेहेतेंच्या मनात विषाद दाटला. हाच माल माॅलमध्ये शंभर दोनशे रू. किलोनं विकला जाईल. पण व्यापारी यांच्याकडून कवडीमोल भावात घेईल. ही पण एक फसवणूकच. नेहेतेनं डाली गाडीत ठेवायला लावली. खिशातून पाचशेची नोट काढली. बाई अचंब्यानं पाहू लागली.
" बाई, घ्या! तुमच्या कष्टाचं आहे ते! तुमच्या कष्टापुढं व मेहनतीपुढं हे काहीच नाही!"
बाईनं नोट घेतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नेहेतेंना सिताफळाच्या चवीपेक्षा ही गोड वाटला.
नर्मदेच्या काठावरील खोल दरीत डोंगरांनी वेढलेल्या समन्याच्या गावात जीप पोहोचली. त्याचवेळी जवळच्या उंच डेरेदार मव्हाच्या झाडाखालून एक ट्रॅक्स सुसाट वेगानं निघून गेली. नेहेतेंनी शिंदेकडं संशयानं पाहिलं. पण तो पावेतो गाडीच्या मागच्या बाजूला नंबरप्लेटच दिसत नव्हती. माठलीतली गौरव देसलेची ट्रॅक्स चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्याचं नेहेतेला आठवलं. पण तरी त्यांनी त्या निघून गेलेल्या ट्रॅक्सकडं दुर्लक्ष केलं. कारण आता हत्यारं ताब्यात घेऊ मग बाकी नंतर!
समन्यास घरच्यांनी स्थानीक भाषेत काही तरी सांगितलं. समन्या व दमन्याचे डोळे चमकले. पण त्यांनी नेहेतेस भाषा समजली नसल्यानं काहीच जाणवू दिलं नाही. हातातल्या बेड्या वागवत त्यांनी नदीचा काठ धरला. मागोमाग नेहेते, शिंदे! समन्या व दमन्या हूल देऊन पळणार नाहीत ही दक्षता ते घेत होते. म्हणून अंधार पडायच्या आत हत्यारं ताब्यात घेत निघणं भाग होतं. समन्या व दमन्याचा या भागात दरारा होता. जर त्याच्या लोकांनी त्यांना सोडवण्यासाठी हल्ला केला तर? शिंदेस घाम फुटला.
नदीच्या काठावर तुकड्या तुकड्याच्या चढ उताराच्या शेतीत पक्व कापणीला आलेला मका डोलत होता. तर काही ठिकाणी शेती ऐवजी रान माजलेलं. गवत, वेली, झाडोरा व इतर उंच झाडे. नदीला कमरेच्या आसपास पाणी. खोल भागातून समन्या दमन्यानं कपारीतल्या खडकातून धाऱ्या, फरशी व तलवार काढल्या. शिपायांनी हत्यारं ताब्यात घेतली. परत पाड्यावर सारे आले तोवर गावच्या पाटलानं मक्याच्या भाकरी व कोंबडं कापलेलं. नेहेतेस जेवण घेणं कसंकसंच वाटू लागलं. पण पोलीस आले की मव्हाची दारू व कोंबडं ठरलेलंच, हा शिरस्ता माहीत असल्यानं कारभाऱ्यानं आधीच सोय केलेली. रात्री परतायला उशीरच होईल म्हणून व सपाटून भूक लागल्यानं नेहेतेंनी नाईलाजानं जेवणं घेतलं. परततांना तो कारभाऱ्यास पैसे देऊ लागला.
" साहेब , जेवणाचं दाम घेण्याची आमची रीत नाही!"
नेहेतेस आपल्या उच्चभ्रू म्हटल्या जाणाऱ्या शिष्टाचाराची लाज वाटली.
" बाबा, जेवणाचं दाम नाही देत! खुशीनं देतोय!"
निघतांना समन्या दमन्यास पुन्हा भेटायला आलेल्या घरच्यांनी त्यांना काही खाणाखुणा केल्या. कारभारी त्यांच्यावर त्यांच्या भाषेत कातावत होता. नेहेतेला काही तरी बिनसतंय पण भाषेमुळं समजत नव्हतं.
" बाबा , काय झालं?" नेहेतेनं कारभाऱ्यास विश्वासात घेऊ पाहिलं.
" काही नाही साहेब! घाटात सांभाळा! रात्रीची वेळ आहे! काळजी घ्या!" बाबा नाईलाजानं काही तरी दडवत असल्याचं जाणवलं. आपण आलो तेव्हाची गाडी नेमकी कुणाची ? त्यांना शंकेची पाल चुकचुकलीच.
नेहेते पुढे बसले. मागे समन्या दमन्या व भिमास घेत शिंदे व पोलीस शिपाई बसले.
" शिंदे, बी केअरफुल!" नेहेतेंनी शिंदेस सावध केलं.
गाडीनं अंधार चिरत पठार मागे टाकलं. अकराच्या आसपास ते घाटाच्या जवळपास आले. हिवाळ्याची सुरुवात असल्यानं व पहाडात लवकरच मावळत असल्यानं अकरापर्यंत एकदम रात्र बहरुन आलेली. जिकडे तिकडे किर्र अंधार. थंड वारा व कमालीची भयाण शांतता. मध्येच एखाद्या जंगली पक्ष्याचा वा प्राण्याचा आवाज शांतता चिरत तरंग उठवतांना काळजात धडकी भरवे. समन्या व दमन्यानं डोळे मिटवले. भिमा तर घोरतच होता. त्यामुळं शिंदे व शिपाई थोडे सुस्तावले.
गाडी घाटावर आली. घाटाच्या सुरुवातीलाच एक छोटंसं पण पुरातन पार्वती मातेचं देऊळ . येणारे जाणारे या ठिकाणी थोडा वेळ थांबतच. देऊळाजवळच कपारीतून एक जिवंत झरा वाही. हा झरा उन्हाळ्यात देखील आटत नसे. थंड व गोड पाणी. ड्रायव्हर गाडी थांबवू लागला.
"सावंत गाडी थांबवू नको,सरळ घाट उतरव!"
" साहेब पुढे बैलाचा घोळका दिसतोय. तोवर पाणी तरी पिऊ!"
नेहेतेचा नाईलाज झाला. देवळांच्या मागे झऱ्याजवळच मोठं वडाचं झाड होतं. अंधारात त्याच्या पारंब्या जणू देवळास घेरत आगोश मध्ये घेऊ पाहत होत्या. देवळाच्या समोरच्या पत्र्याच्या सभामंडपाच्या खाली दहा बारा स्त्रिया शेकोटी पेटवून बसलेल्या. जीप उभी करत ड्रायव्हर उतरला. नेहेतींनी हसण्या खिदळण्यावरून सम़ोरचं कोंडाळं हे स्त्रियांचं नसून किन्नर आहेत हे ओळखलं. नेहेतेंनी मागे एक नजर मारली. समन्या दमन्या माना कलवत झोपलेले. शिंदे जांभई देत बसलेला.
देवळाच्या समोरच पंधरा वीस फुटावरच्या तीव्र उतारावरच्या टर्नवर अदमासे वीस पंचवीस बैलाचा घोळका घाट चढून वर येत होता. घाट चढून आल्यानं बैल हाशहूश करत तोंडातून फेस गाळत होते. देवळाजवळच्या झऱ्याचं काही पाणी रस्ता क्रास करत दरीत झेपावत होतं तर काही उतारावरून घाटातल्या रस्त्यावरच वाहत होतं. बैल रस्त्यात थांबत तेच पाणी पित होते. व नसलेली वाहतूक ही अडवत होते.
किन्नरांची फुल मस्ती चालू होती.
" साहेब ,पाणी प्यायचंय!" उठलेला भिमा विचारु लागला.
" होय साहेब आम्हाला पण!" समन्या दमन्यानं उठत री ओढली.
" शिंदे, कदम! सांभाळून न्या यांना"
समन्या, दमन्या भिमा झऱ्याकडं निघाले. तोच दोन चार किन्नर उठले व व गाडीत बसत
" साहब बडे साहब दिख रहे हो आप! बिदागी दो नं!" नेहेते मागे लागले.
" एवढ्या रात्री घाटात सुनसान जागी का थांबलात रे! घाटावर चढून इकडं कुठं जात आहात?"
" साहब हम नर्मदा परिक्रमा करते करते रस्ता भटक गये! सुबह घाट उतरकर डेडीयापाडा की तरफ जायेंगे! लेकीन बिदागी दो नं!"
नेहेतेची नजर पाणी पिणाऱ्या समन्या दमनाकडंच होती. समन्या दमन्या व भिमा थंडीतही भरपूर पाणी पिऊन उभे राहिले. घाटाकडून कोयलचा आवाज घुमला. उत्तरादाखल भिमानही आवाज काढला. शिंदेनी तोंडात गुळणी धरत तोंड खंगवलं. शिपाई पण पाणी पिऊ लागले. तोच घात ...घात झाला. समन्या दमन्या व भिमानं सरळ कोयलच्या आवाजाकडं पळ काढला. पाणी पिण्यासाठी वाकलेल्या पोलीसांच्या लक्षात येणार तो पर्यंत ते बैलाच्या घोळक्यात घुसले
" शिंदे ,कदम पकडा त्यांना! सावंत........ गाडी स्टार्ट कर. पण गाडीतल्या किन्नरांनी तो पावेतो गाडीची किल्लीच लंपास केली.
" साहब हमारी बिदागी दो पहले!"
" मेरी बात सुनो, वो कैदी भागे तो तुम्हारी हालत पतली कर दुॅगा! हमारा रस्ता छोडो! हमे जाने दो!"
" साहब जंगल का रास्ता है! भागनेवाले कब तक भागेंगे! आदमी साला पुरी जिंदगी भागता है केवल दो गज जमी के लिए!" एक किन्नर बोलला.
समन्या दमन्या भिमानं बैलांचा घोळका पार केला.
" समन्या, दमन्या मुकाट्यानं जागच्या जागी थांबा! नाही तर मी नाईलाजानं शूट करेन!" नेहेतेनं हात ही घातला.
किन्नराचं वेटोळं बिदागी शिवाय नेहेतेंना जाऊ देत नव्हते. शिंदे कदम पाठलाग करू लागले तोवर बैलांच्या पलीकडे टर्न च्या खालच्या उतारावर तीच सकाळची ट्रॅक्स उभी होती तिच्यावर समन्या, दमन्या, भिमा बसले नी अर्जुनरावांनी खुशीनं कोयलचा आवाज काढत गाडी पळवली. वळणावर वळणे घेत सुसाट वेगानं अर्जुनराव गाडी पळवू लागले. घटनाक्रम इतक्या जलद गतीनं घडला की नेहेतेच्या लक्षात काही येण्या आधीच ट्रॅक्स घाट उतरत पसार झाली. नेहेतेनं हवेत बार केला नी किन्नरांनी त्यांना मोकळं सोडलं. त्यांच्यातला एक उंच धिप्पाड तरी हसतच होता.
" साहब जल्दी करनेवालो को करने दो! आप धिरेसे उतरो!"
त्यानं सावंतकडं किल्ली दिली. सावंतनं गाडी सुरू केली. पण बैल हालेनात . कदम किणीकर व शिंदेनी बैलांना हाकललं. रस्ता मोकळा झाला. जीप निघाली. तोवर अर्जुनरावांनी निम्मा घाट उतरवत समन्या दमन्यास नेलं.
नेहेतेस उलघडा झाला. समन्याचे घरचे समन्यास अर्जुनराव इथंच असल्याबाबत सांगत होते. अर्जुनराव तेथून सुसाट वेगानं निघून आले पण घाटात लपून बसले असावेत. बैल उभे करणे ही त्याचीच चाल. पण ही किन्नर मंडळी आपणास का अडवत होती हे नेहेतेस कळेना.
त्यांनी संतापानं गाडी पळवायला फर्मावलं.
अर्जुनराव एका तीव्र उतारावर आले. तोच दरडीवरून दोन बैल अचानक रस्त्यात उतरले. अर्जुनरावांना घाटात रात्री हे अपेक्षीतच नव्हतं. शीर तुटलेली बैलं! अचानक गाडीसमोर बैल येताच त्यांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं. तरी ते गाडीस धपाडकडे राॅंग साईडला वळवू लागले. पण गाडी थेट दरीत दोन तीन कोलांट्या घेत एका झाडात अडकली.व उलटी फिरली. मागून समन्या दमन्या ट्राॅली उफसावी तसे उफसले जात खोलखोल दरीत खडकावर आदळले. तोच फांदी मोडत गाडी उलट सुलट होत खडकावर आदळली. पण बोनटचा भाग खडकावर आदळतांना समन्या दमन्या भिमास टरबूजाला दाबून फोडावं तसंच डोक्याचं टरबूजच फोडलं. तिघांचा एका दणक्यात मेंदूचा भुगा, चिखल,चिखलाची रबडी झाली. अर्जुनरावाचा कमरेखालचा भाग ट्रॅक्सखाली दाबला गेला. जिवाच्या आकांताने ते ओरडत पायाचा भाग काढू लागला. पण व्यर्थ.
दरीत अर्जुनरावांच्या किंकाळ्या घुमल्या. नेहेतेंची गाडी त्या टर्नवर आली. धपाडला ठोकल्यावर गाडीचा तुटलेला साईड ग्लास पडलेला होता. नेहेतेंनी गाडी थांबवायला लावली. तोच दरीत खोल खोल किंकाळी ऐकू आली.
" कोण?"
"इन्स्पेक्टर साहेब वाचवा! "
नेहेतेच्या अंगाचा थरकाप उडाला. ते समजून चुकले.
" साहेब गाडी दरीत पडलीय सारेच दबले गेलेत .काही ही करा वाचवा!"
" पळा, पळा मूर्खानो! आम्हाला तुरी देत पळता का!" कदम संतापला.
" कदम शांत बसा! आता आधीत् यांना काढायचं पहा! मोबाईल च्या टाॅर्चनं ते पाहू लागले. पण काहीच दिसेना. तोच मोबाईल मध्ये तुटकपणे नेटवर्क येत होतं. नेहेतीनी फोन करत खालून मदत मागीतली. पण तोवर त्यांना वाटत असुनही अंधारात उतरता येईना. शिंदेनं कोरडं लाकुड पाहत पेटवलं. व शक्य होईल तेवढे ते दरीत उतरण्याचा प्रयत्न करू लागले. बरच खाली उतरल्यावर त्यांना पडलेली गाडी, गाडीखाली दबलेले अर्जुनराव दिसले. आता अर्जुनराव ही बेशुद्ध होत होते. पुढं उतरणं शक्य नव्हतं. ते परतले व मदतीची व उजेड पडण्याची वाट पाहू लागले. तोच दरीत पुन्हा किंकाळ्या घुमल्या. दरीत लपलेलं अस्वल अर्जुनरावाजवळ आलं होतं. ते पडलेल्या अर्जुनरावास हुंगू लागलं. तोच अर्धवट शुद्धीत असलेल्याअर्जुनरावांनी हालचाल केली. अस्वल कातावलं व अर्जुनरावाचं तोंड भोसकू लागलं. नाक कान फाडले व डोळ्याची बुबुळच काढलीत. अर्जुनरावांचा आकांत पहाटे पर्यंत सुरू होता.
सकाळी क्रेन आली. ट्रॅक्स उचलत वर आली. नंतर चेदामेंदा झालेली तीन धुड! व नंतर पूर्ण तोंडच ओरबाडत विद्रुप केलेलं अर्जुनरावाचं धुड आलं. डोळे नाक कान पार फोडलेले. पाहताच अंगाचा थरकाप होत काटा उभा राहत होता!
नियतीकडं न्याय असतोच!
नेहेतेस रात्रीच्या उंच धिप्पाड किन्नराचं वाक्य आठवलं.
" साहब आदमी पुरी जिंदगी भागता है दो गज जमी के लिए!"
नेहेतेस किन्नर आपल्यास का अडवत होते त्याचा ही उलगडा झाला.
.
.
क्रमश