#सुलेखालेख - भाग ::-- पाचवा
सुलेखा माठलीला येताच लगेच सारे गाडीनं सतोन्याला निघाले. मागोमाग पोलीसताफा, व इतर पथकं ही आलीत. छगननं दाखवलेल्या रेतीच्या ढिगातली जागा कोरण्यात आली. रात्रीच्या लाईटच्या उजेडात सांगाडा बाहेर दिसू लागताच भिमा, अर्जुनरावांनी हुंदका फोडला. सांगाडा ओळखण्याचा प्रश्नच नव्हता पण छगननं ज्या सांगाड्यातून वस्तू काढल्या होत्या त्या राधेशामच्याच होत्या. व तोच सांगाडा छगननं दाखवल्यावर हुंदका येणं साहजिकच होतं. पोलीसपथकातील फोटोग्राफरनं पटापट फोटो चमकवले. इतर सर्व प्रक्रिया पार पाडत पोलीसांनी छगन ,डेपो मालक बबनराव ,कायम रेती वाहणारे डंपर चालक, अर्जुनराव भिमा, व सुलेखा साऱ्यांचे जबाब घेतले.कुणावर वहीम असल्याबाबत ही जबाब नोंदवले.
दोन महिन्यांपासून गायब आपला चुलतभाऊ या स्थितीत आढळेल असं स्वप्नातही वाटलं नसल्याने अर्जुनराव हुंदक्यावर हुंदके देत होते.
सुलेखाच्या काळजात काहीच भाव नसले तरी आपल्याला मुक्त करणारा स्वत:च असा मुक्त होईल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे डोळ्यात आसवे तरळलीच.दोन महिन्यापूर्वीच घटस्फोट देत आपणास मुक्त करण्यासाठी त्यानं माठलीला येत असल्याचं कळवलं होतं. पण त्या दिवशी रजा मिळणार नसल्यानं दुसऱ्या दिवशी येतेय असं सांगत आपण दुसऱ्या दिवशी आलोही .पण दुसऱ्या दिवसापासूनच राधेशाम व आलेख दोन्ही गायब. याचा शोध लागला पण आलेखचं काय?
पोलीसांना आलेख व राधेशाममध्येच काही तरी झालं असावं याचाच संशय बळावला. अर्जुनरावानं जबाबात तसं सुलेखावरुन त्याच्यात बेबनाव असल्याचं नमुद ही केलं होतं. म्हणजे आलेखनं याचा काटा काढत स्वत: काही काळासाठी गायब झाला असावा वा सुलेखानं तर घटस्फोट देत नाही म्हणून....आलेखच्याच मदतीनं...?
पोलीस सुलेखाला पुन्हा पुन्हा याबाबत प्रश्नाची सरबत्ती करू लागले.
पण सुलेखा प्रत्येकवेळी राधेश्याम व तिच्यात जे घडलं होतं ते जसंच्या तसं सांगत आली. सुलेखा सत्य बोलतेय व ती यात नसावी इतपत पोलीसाची खात्री झाली.
सुलेखाला जरी घटस्फोट हवा होता तरी तो न देताच राधेश्याम गेला म्हणून तिनं कपाळावरील रेखलेलं कुंकू कुणाचं का असेना पण पुसलं. हातातला हिरवा चुडा तडकला. अर्जुनरावांनी साऱ्या विधी केल्या तो पावेतो ती थांबली. दसवं झालं नी सुलेखाला जरी राधेशामनं फारकत दिली नाही तरी त्याच्या जाण्यानं ती मुक्त झाली. मात्र ज्याच्यासाठी सुलेखा फारकत घेत होती तझ आलेख आता लवकर परतावा ही आस तिला पुन्हा पुन्हा जागू लागली. दसव्याच्या राती तिला मागच्या साऱ्या घटना आठवू लागल्या.
.
.
.
घरात आलेखशी आपल्या लग्नाच्या गोष्टी सुरु असतांना आलेख स्वयंपाक शिकताच आबांनी आपलं कुटुंब पुन्हा माठलीला हलवलं. विठ्ठल मामांना अर्जुनरावांनी हाय वे ला लागून जी तीन एकर हलकी जमीन दिली होती त्यातच आबा व आलेखनं ढाबा सुरू केला. आलेखनं आबांची परवानगी घेत ढाब्यास सुलेखा व स्वत:चं नाव एक टरत ' सुलेखालेख' नाव दिलं. आबांना पोरीचं नाव ढाब्यावर दिसताच आनंद तर झालाच पण आलेखचा अभिमान ही वाटला. सुलेखाला तर लग्नाआधीच आलेखनं आपणास स्विकारल्याच्या गुदगुल्या होऊ लागल्या. आबा व आलेखनं दोन महिन्यात ढाब्यावर गर्दी खेचली. हाॅटेल चित्रार्जुन बंद पडण्याच्या बेतात आलं. अर्जुनरावांनी आपला बाडबिस्तरा सागबाऱ्यास हलवला.
अर्जुनराव , चित्रा व खटाआत्यानं विनंती करत सुलेखास आजारी शांताबाईच्या सेवेसाठी सागबाऱ्यास पाठवलं. सुलेखा आबांचं ऐकून गेली.
अर्जुनरावांनी मग काय जादू केली की धमकी पण आबांनी सुलेखाचं राधेशामशी लग्न जुळवलं. दोन महिन्यात सुलेखानं शांताबाईची छान काळजी व औषधोपचार करत तब्येत चांगली ठेवली होती. म्हणून राधेशाम तिच्यावर खूश होता. आतेबहिणीचा दिर या नात्यानं सुलेखा त्याच्याशी तेवढ्यास तेवढं पण मोकळं बोली. पण राधेशाम, अर्जुनराव, चित्रा व शांताबाईं साऱ्यांनी याचा आपापल्या परीने अर्थ घेतला असावा. त्यांचं ठिक पण आबांनी लग्नास होकार द्यावा हे कळल्यावर सुलेखाच्या अंगाची आग आग झाली. तसं राधेशामला जगातली कोणतीच मुलगी नकार देऊच शकत नव्हती. उंचपुरा ,धिप्पाड, सुंदर,गोरापान एकुलता एक भरपूर शेती व इवेंट मॅनेजमेंट मधली भरपूर कमाई पाहून कोणीच त्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. पण सुलेखाच्या मनात आलेख आधीच आरुढ असल्यानं त्याला होकार देण्याचा काहीच संबंध नव्हता.
" दादा, काय हे? मी तुमचं व चित्रामाईचं ऐकून शांताआत्या साठी आले तर तुम्ही त्याचा भलताच अर्थ काढताहेत?" सुलेखानं अर्जुनरावास भेटत सुनावलं.
" सुले, आबांचीच इच्छा असल्यावर मी कसा नकार देऊ गं राधेशामसाठी तुला!"
" साफ खोटं! आबा मुळीच तयार होणार नाहीत या लग्नाला!"
" विश्वास नसेल तर आबांनाच विचार जा! आणि आमच्या भावावर किती तरी मुली एका पायावर लग्नास तयार असतांना तू नाकारतेस? पस्तावशील तू! राणी बनून राज करशील ऐक!"
" राधेशामशी कुणीही लग्न करेल यात शंका नाही. पण मला त्यात व त्याच्या संपत्तीत अजिबात स्वारस्य नाही. राहिला प्रश्न राणीचा! तर हया सुलूनं आधीच तिचा राजा वरलाय!"
अर्जुनरावाच्या काळजात जोराची कळ उठली जी पायापासून मेंदूतच गेली नाही तर थेट माठलीत सुलेखालेख ढाब्यावरच गेल्याच्या वेदना अर्जुनरावास झाल्या.
सुलेखा निघाली. तिला पाठमोरी पाहतांना अर्जुनराव फुत्कारले. "सुले तू गेली तरी परत इथंच येणार!"
" आबा? ......"
लखाजी खाली मान घालून सुन्न.
" आबा, आलेखशी ठरल्यावर पुन्हा हा नवा डाव का मांडायला लावताय मला?"
" पोरी, ज्याच्याशी तुझा डाव ठरला होता त्याच्या भल्यासाठीच!"
" याच्यात त्याचं कोणतं भलं दिसतंय तुम्हास? दोन्ही उन्मळून पडू नाहक आम्ही!"
" उन्मळतांना कुठे तरी नवीन डिरवा फुटण्याची तरी आस असते पण जर माझं ऐकलं नाहीस तर आलेख खाक होईल बेटा! पोरी हार निश्चीत दिसत असेल तर नष्ट होण्यापेक्षा सुलाह करावा.त्यानं तात्पुरतं युद्ध थांबत असलं तरी लढत जिवंत ठेवता येते!"
" आबा हा मरणाचा सुलाह कुणाबरोबर केलात तेवढं तर कळू द्या?"
" सुलू , बाप आहे मी तुझा! सुलाह करेन पण फितुरी नाही करणार मी! विश्वास ठेव! "
" आबा , आलेखला माहित आहे हे!"
" माझा आलेख समजूतदार आहे! भडकेल तो पण या मामाचं ऐकेल तो!"
सुलेखा रात्रभर रडली व लग्नास तयार झाली. आबांनी आलेखच्या भल्यासाठीच निर्णय घेतला असावा हे समजण्या इतपत तिचा बापावर भरवसा होता. फक्त तिला एक सवाल मोहोळ उठवत होता की राधेशामनं व अर्जुनरावानं आपल्याशी का सुलाह करावा! आपल्या आबाची परिस्थिती जेमतेम असूनही आपली निवड का केली ?
आलेखला लखा मामांनी ( आबांनी) सांगताच भर श्रावणझडीत सातपुड्यात वणवा पेटावा व पहाडातली हिरवाई झडीत जळून खाक व्हावी हीच त्याची गत झाली.
" मामा........! शकुनी....कटप्पा.....लखामामा....
परंपरा चालवण्यात कसली हौस आली?" वणव्यातला अंगार फुलला.
" काही परंपरा, निर्णय वाईट असले तरी ते प्राप्त परिस्थितीत भवितव्यासाठी घ्यावेच लागतात, आलेख!"
" मामा, माझ्या विठ्ठलासमान बापावर अन्याय झाला तो सहन करत उभारी धरण्याचं बळ देतांना तुम्हीच हा आघात का करताय...?"
"..........." लखा मामा घायाळ हरणागत रडू लागले.
" मामा, सुलू तयार झाली?"
" हो ही आणि नाही ही! पण तुच तिला समजव!"
" काळजातला शर सांभाळत मी काय दुसऱ्याचं सांत्वन करू?"
नुसतं रुदन, काळीजतोडीच्या फडफडीनं का असेना पण त्यात ही एकमेकासाठी त्यागाची, समर्पणाची ज्योत पेटू लागली.
लग्न होत सुलेखा सागबाऱ्याला आली. पण आबांनी लग्नास कोणत्या कारणासाठी होकार दिला हे ना तिला कळलं ना आलेखला. आबांनी नुसता सुलाह केला पण कारण कळूच दिलं नाही तर सुलेखा व आलेखनं आबांनवर सोडलं.
सुलेखा लग्न होऊन आली तेंव्हा सागबाऱ्यातील आंब्यांचा मोहोर जणू ढगाळ वातावरणानं गळून पडला होता. आंब्यांना आता पुन्हा नवीन डवरत मोहोरावं लागणार होतं.
सुलेखानं सुलाह म्हटल्यावर शत्रुपक्ष असला तरी साऱ्या अटी बिन बोभाट मान्य केल्या.
सुलेखा शांताबाईची काळजी घेऊ लागली. राधेशाम लग्नानंतर अंकलेश्वर, जळगाव सुरत, धुळे या ठिकाणी वेगवेगळ्या इवेंटसाठी फिरू लागला.
एक दिड महिना तो भटकंतीवरच होता. आला तरी एकाद दिवस राहत आईची तब्येतीची चौकशी व घरात लागणाऱ्या बाबी खरेदी करत तो निघून जाई. एक दोन वेळा तो सुलेखास धुळ्याला, जळगावलाही घेऊन गेला. सुलेखाशी गप्पा मारतांना तो छान बोले.
सुलेखा ही आलेखच्या आठवणीनंच दुखी असल्यानं तो जेवढं बोली तेवढंच.
अशातच दोन अडिच महिने गेले.
राधेशामचा सारा पसारा अर्जुनरावच पाहत असे. त्यामुळे की काय पण राधेशाम लग्न होऊन ही सागबाऱ्यात थांबेना.सुलेखाच्या मनात चलबिचल सुरू झाली. तिला काही तरी खटकू लागलं. त्यातच अर्जुनराव शांताकाकुच्या तब्येतीची चौकशी करण्याच्या बहाण्यानं वारंवार वाड्यावर फेऱ्या मारू लागला. पण नजर भिंगारपणे सुलेखाची झाडाझडती घेई. सुलेखाच्या मनात भिती तरळू लागली.
राधेश्याम मुक्कामाला असल्यावर तिनं विषय काढला.
" वारंवार भटकणं, बाहेर राहणं गरजेचं आहे का?"
" सुलेखा, कामच तसं आहे. मी फिरलो नाही तर वेगवेगळे इवेंट, काम कसं मिळेल?"
" कामासोबत घर, घरची माणसं ही महत्त्वाची असतात!"
" नक्कीच! पण काय झालं सुलेखा?'
" काही नाही, पण आईंची तब्येत....आणि...."
सुलेखा अडकळली.कसं सांगावं कळेना.
राधेश्यामच्या काळजात भिती उसळली. त्याच्या कपाळावर घाम फुटला. तो थरथरू लागला. त्याला दुसरीच भिती.
" सुलेखा आईची काळजी घ्यायला तू आहे ना!" राधेशाम अडखडत बोलला.
" मी आहे घरी म्हणूनच सांगतेय!"
हळूच लाल होणारी नजर वर करत ती बोलली. कारण अर्जुनरावाविषयी स्पष्ट कसं सांगावं ते तिला उमगेना.
राधेशाम मात्र पुरता गडबडला.
" सुलेखा ,मला झोप येतेय! मी झोपू का?"
" हू!" सुलेखा नाराजीनं संतापत म्हणाली.
राधेशाम झोपण्याचं नाटक करू लागला. बाजुला सुलेखा ही झोपली. पण झोप येईना म्हणून ती बाहेर गच्चीवर आली. बाहेर नभात चांद वरती आला होता. वाड्याच्या खबदाडीतलं दिवसांध केकटू लागलं. सुलेखाला एकदम भकास व उदास वाटू लागलं. दूर सातपुड्यात वणवा दिसत होता. मिणमिणत्या दिव्यासारखा. तो वणवा पाहून तर तिला अधिकच उदास वाटू लागलं. या वणव्यात किती प्राण्या - पक्ष्यांचे निवारे जळत असतील! कुणाची आई,कुणांची पिल्लं, कुणाची प्रियशी! ज्याची प्रियशी होरपळेल त्या जिवानं कुणाकडं बघून जगावं? तो जीव किती आक्रंदत असेल? तोच तिला आलेख आठवला व जागेवरच थरकापली. गच्चीच्या चौकटीस धरत तिच्या दिठीत वणवा पेटत अग्नीफुलांचा महापूर दाटला.
सुलेखा मध्ये आली. राधेशाम निवांत पहुडला होता. वणवा पेटवणारे, मजा पाहणारे काडी लावत असेच दूर निघून जातात! ती झोपली.
सुलेखाला झोपल्याचं पाहताच राधेश्याम उठला. आज थोडक्यात निभावलं. पण रोज काय उत्तर देणार आपण? आपलं मूळ रूप स्विकारेल का सुलेखा? सुलेखा तू हवीय मला! पण माझ्याकडं भरपूर असून सारं वैभव कुचकामी आहे! सांगावं का सुलेखाला? पण कसं? तो उठला
त्यानं सुलेखाचं कपाट उघडलं. कपाटात साड्याच साड्या व इतर साहित्य. त्यानं सुलेखाची लाल साडी काढली. लाल साडी अंगावर नेसली. कपाळावर कुंकू रेखला. गजरा पिननं अडकवला. लाल बिलोर मिळेनात म्हणून हिरवा चुडा भरला. सारं मॅचिंग फक्त बिलोर हिरवे. तो ड्रेसींग टेबल समोर उभा राहिला. आरशात आपलं रुप पाहताच त्यानं खालचा ओठ दातात धरला .त्याचे हात शिवशिवू लागले. त्याची हिम्मत होईना. पण हात तर शिवशिवत होते. तो सयंम ठेवू लागला पण व्यर्थ! टाळीचा आवाज वाड्याची शांतता भंग करत निनादलाच. हाच आवाज फर्डे यांच्या वाड्यातली झाकलेली इज्जत धुडकावणार होता.
टाळी वर टाळी! आवाजानं सुलेखा उठली. बाजूला लाल साडीची उभी बाई दिसताच ती किंचाळत विचारती झाली.
" को.....कोण?"
सुलेखाचा सवाल फर्ड्याच्या वाड्यालाच धडकला.
" मी...मी बृहन्नडा!
मी....मी.....शिखंडी!
मी ...मी......किन्नर!"
भसाडा आवाज ऐकताच सुलेखा घाबरली व पुन्हा जोरात ओरडली.
" कोण बृहन्नडा? कोण शिखंडी? राधेशाम? कुठ आहे तू? बघ ही कोण?"
" सुलेखा... मीच बृहन्नडा.....मीच किन्नर... मीच छ...... मीच राधेशाम! राधे नाना! मी राधा..! मी राधी नानी!"
" नाही! तू राधेशाम नाही! दुसरीच कुणी तरी!" सुलेखा तिची नजर टाळत ओरडली!"
" सुलेखा वर बघ! पहचान मुझे! मैच राधेशाम मैच राधा! मुझपर भरोसा नही? देख मै ताली बजा के दिखाता हूॅ!" आणि मग वाड्यात नुसत्या टाळ्या घुमत राहिल्या. सुलेखानं ओरडत कानावर हात ठेवत
" नाही.... नाही......" हेल काढला. पण मग भसाडा आवाज, चेहरा दिसताच ती क्रुद्ध झाली. तोवर राधेशामनं साडी सोडली व तो शांत होत नाॅर्मल होत जमिनीकडं पाहू
लागला. सुलेखा ही सावरली.
सकाळी राधेश्याम सुलेखाची नजर टाळू लागला. सुलेखाचा रात्री जे पाहिलं त्यावर विश्वास बसेना. आधी तिला आपण स्वप्न पाहिलं वा भास झाला असंच वाटलं. पण रात्रीचा प्रसंग, विस्कटलेलं कपाट व पडलेली साडी पाहून आपण जे पाहिलं तो भास वा स्वप्न नव्हतं. मग काय होतं ते? कदाचित राधेश्याम ची तब्येत बरी नसावी म्हणून तिनं डाॅक्टर बोलवायला लावला. पण राधेशाम जागचा हालेना.
" राधेशाम तब्येत खरच बरीय ना?"
" ........."
" मग रात्रीचा प्रकार काय होता नेमका?" तिला अजुनही अंधुकशी आशा होती की रात्रीचं सारं खोटं असावं वा कदाचित राधेशामनं आपली मस्करी केली असावी.
" राधेशाम काही वेडेपणाचे झटके येतात का?" सुलेखा पहिल्यांदा त्याला जवळ घेत प्रेमानं विचारू लागली.
" सुलेखा तु हवीय मला! बाकी मला काही सांगता येणार नाही!"
" मला ही तू हवाय!" म्हणत सुलेखानं आवेगानं त्यास मिठीत घेतलं.
पण सुलेखाचा स्पर्श होताच राधेशाम खीं खीं हसत टाळ्या वाजवत मै...... मै.....
बस्स सुलेखाची खात्री झाली. ती संतापानं नागिणीगत फुत्कारली.
"मेल्या हरामखोरा! का...का.....?
का माझं जीवन उध्वस्त केलं?" ती एकदम लाल होत रडत विचारू लागली.
सुलेखाचा अवतार व आवाज ऐकून राधेशाम थरथरला. तोही रडू लागला.
" सुलेखा तू ही घृणा करते का आमच्यावर?" तो लहान पोरागत एकदम दिनवाणा चेहरा करत विचारू लागला.
" हरामखोर रात्री तू शिखंडीचं जे रूप दाखवलं त्या रूपाची मी कधीच घृणा करणार नाही. कारण निर्मीकानं जर तीन पुरुष रुपे बनवली असतील तर प्रत्येक रुप स्विकारलंच पाहिजे. पण तू राधेश्याम बनून मला उध्वस्त केलं त्या तुझ्या रूपाची मला आज घिण येतेय! कारण तू तुझं मूळ रूप लपवत राधेशामच्या रुपात मला फसवलं!" आणि संतापानं तिनं त्यांच्या कानाखाली आवाज काढला.
" सुलेखा या किन्नरास तुझा आधार हवाय गं!"
" तुझं मूळ रूप लपवून तू ज्या रुपानं मला फसवलं त्यास मी कधीच माफ करणार नाही!"
ती अर्जुनरावास भेटली.
" थोडी तरी लाज वाटायला हवी होती. आपला भाऊ किन्नर असुन माझं आयुष्य उध्वस्त करतांना!"
अर्जुनराव चमकला व ततफफ करत म्हणाला
" सुले....सुले...काय बरडते मुर्खासारखं! तुझा काही तरी गैरसमज होतोय!"
" अर्जुनराव! माहीत असून तू आयुष्य उध्वस्त केलं. ही पापं फेडावी लागतील तुम्हा दोघास!"
अर्जुनराव आपला एकेरी उल्लेख ऐकताच आता सत्य लपवण्यात अर्थ नाही हे समजला व त्यानं थेट शेवटची पायरी गाठली.
" सुलेखा, देवानं जे दिलं त्यात त्याचा काय दोष! आपण त्यांना आधार द्यायला हवा! आपणच त्याची अवहेलना केली तर मग जग!"
" त्या रुपाची मी मुळीच अवहेलना करणार नाही. पण तुम्ही मूळरूप लपवून स्वत:चे तेच रूप ( षंढपणा) दाखवलं हे मी कसं माफ करणार. मी चालली माठलीला!"
" सुलेखा ऐक! शांत रहा! आम्ही स्विकारलं तसं तू ही स्विकार! सारी संपत्ती तुझ्या नावावर करतो आम्ही!"
सुलेखा छद्मी हसली.
" स्त्रीची खरी संपत्ती ही मात्वृत्व असते. नारी ही दैवी शक्ती मानली जाते पण त्या आधी नारीस नारीत्व सिद्ध करावं लागतं व ते नारीत्व मात्वृत्वानं सिद्ध होतंय त्याचं काय?"
" सुलू मी आहे ना......" अर्जुनराव सुलेखाकडं पाहत बोलला व अंदाज घेऊ लागला पण तोच त्याच्या श्रीमुखात चप्पल बसली.
" नालायक तो षंढ असला तरी त्यानं आपलं रूप दाखवण्याची उशीरा का असेना पण मर्दानगी दाखवली. मात्र नको तिथं मर्दनगी दाखवत तुझ्यातला ........! टाळ्या वाजव!"
.
.
सुलेखा माठलीत आली. रडत रडत ती आलेखला घट्ट घट्ट बिलगली. सर्वात आधी तिनं आलेखलाच सारं सांगितलं. आलेख करवी आबास कळताच पुढच्या महिन्यात फारकतसाठी आबांनी राधेशामला सुनावलं.
"आता मी मरेन पण आलेखला ही वाचवेन व माझ्या लेकीलाही!"
नंतर राधेशाम खाली मान घालत माठलीत आला. हात जोडत विनवू लागला.
" सुलेखा! आई मरणाला टेकलीय! जाता जाता तिला दु:खं नको! ती गेली की मी लगेच घटस्फोट देईन हवं तर!"
सुलेखा पाझरली. हा लबाड बोलला असला तरी शेवटी नियतीचा शिकार आहे. काही दिवसासाठी का असेना पण आपण ऐकू यात. ती पुन्हा सागबाऱ्यास गेली. पण आईला सोबत घेऊनच. एक महिना राहिली पण शांताबाई सून येताच उलट सुधरू लागल्या. राधेशाम व सुलेखा जणू शांताबाईनं लवकर या जगाचा निरोप घ्यावा याचीच वाट पाहत होते की काय! विचीत्र खोडा सारा. सुलेखास आपलीच लाज वाटू लागली.
एखाद्या जिवाच्या मरणाची वाट पाहण्याचा आपणास काय अधिकार! सुलेखा शांताबाईची मनोभावे काळजी घेऊ लागल्या.
शेवटी शांताबाई सुखानं गेल्या. सुलेखा परतली. राधेशामनं सर्व विधी आटोपून सर्व कागदं तयार करुन येण्याचं कबुल केलं.
आषाढी अमावास्येला तो येत असल्याचा सुलेखास फोन आला. तिनं आलेखला कळवलं. रजा न मिळाल्यानं ती पाडव्याला येणार होती.
पण राधेशाम व आलेख अमावास्येलाच गायब झाले....
नेमकं काय घडलं?
कसं घडलं?
का घडलं?
कुणी घडवलं?
घडवलं तर ती पापं कशी फेडणार?
नर नारी किन्नर साऱ्यांनाच सवालाचा गुंता!
.
.
.
सुलेखा विचारचक्रातून भानावर आली.
क्रमश:.....