# सुलेखालेख- भाग ::-- चौथा
वा....पा........
पारणे हे सोळा सतरा हजार लोकवस्तीचं बाजारपेठेचं तालुक्यास तोड देणारं गाव. आजुबाजूच्या दहा बाराखेड्याचं बाजाराचं गाव. धार्मिक तिर्थक्षेत्र ही.गावाच अनेक देवळे राऊळे. महादेवाची भरपूर देवळं.गावाच्या पश्मिमेला एक किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य केद्र नदीकाठाला अगदी खेटून. सुलेखा निंबाळे ही आरोग्य सेविका लागल्यापासून आरोग्य केद्रातील क्वाटर्समध्येच राहत होती.
माळमाथ्यावरील परतीचा पाऊस उत्तरेला सरकत सरकत संध्याकाळी पाचच्या सुमारास पारण्याला धडकलाच. तसं अमावास्येला दुपारी तीन वाजेपासूनच आभाळ घाऱ्याघुऱ्या करत गर्जत होतं. वारा अख्ख्या गावास आपल्या चपेटीत घेऊ पाहत होता. बहुतेक नुसतं वादळ येऊन निघून चाललं असंच साऱ्यांना वाटत असतांना उत्तरेकडून येणारा परतीचा पाऊस हा छेद देत दक्षिणेकडून पाचच्या सुमारास नभानं काळा दडा धरला व पारण्याकडं सरकू लागला. धडधड खाडखाड करत धारा, वारा, गारा बरसल्या.
प्राथमिक आरोग्य केद्राचं वाल कंपाऊंडचं काम दोन महिन्यापूर्वीच झालेलं. वाल कंपाऊंड बांधलं व केंद्र बंदीस्त होत त्यास सुस्वरुपता येत त्याचं सौंदर्य वाढलं. महाजन डाॅक्टरांनी हौसेनं स्वखर्चानं त्यात लाॅन व बाग उठवली. आधीच लावलेल्या काही झाडांना बाधा न पोहोचवता नवीन झाडे, वेली लावल्या. वाल कंपाऊंडची दक्षिणेकडील नदी काठाकडील भिंतीला लागून नदीकाठच्या पिवळ्या मातीत हिरवीगार हरळी(दरडी) उगली.महाजन डाॅक्टरांनी पाळलेले ससे लाॅन व बागेत खेळता खेळता हरळी खायला त्या कोपऱ्यात जात. पण मागच्या पोळ्यानंतर या सशात एक सशांची नवीन जोडी येऊ लागली. या जोडीकडे पाहणारा पाहतच राही. पांढरी शुभ्र कापसागत, लाल डोळे असलेली ही जोडी रात्री या कोपऱ्यात सतत दिसू लागली. दिवसा मात्र कुणाच्याच नजरेला पडत नसे.
" डाॅक्टर साहेब ही नवीन जोडी आणली का आणखी"
" नाही.बहुतेक तापी काठावरील ऊसाच्या फडातील रानटी ससे असावेत ते! माझ्या पाळलेल्या सशात व इथली हरळी खायला येत असावीत!"
त्या जोडीनं वाल कंपाऊंड च्या दक्षिण भिंतीजवळील जागेत बीळं तयार करायला सुरुवात केली. पाळलेले ससे ही मग तिथेच बीळं तयार करू लागली. एका महिन्यात या सशांनी ती जागा खोलवर पोखरली.
सुलेखा रात्री जेवण आटोपून बागेत वा लाॅनवर सहकारी नर्सेस सोबत फिरायला आली की नवख्या जोडीतला एक ससा तिच्याकडं पाहत राही. नंतर नंतर तो जवळ येऊ लागला. सुलेखाच्या आसपास घुटमळू लागला. पोळ्यापासून एका महिन्यातच त्यानं जणू सुलेखास लळा लावला. जेवण झालं की सुलेखा बागेत जाई व त्या सशाजवळ बसे. कधी कधी तो तिच्या क्वाटर्सपर्यंत येई व रात्रभर अवती भोवती फिरे. पण पहाट व्हायच्या आधीच ती जोडी गायब झालेली असे. सुलेखाला त्या सशाकडं पाहून सतत वाटे की हा काही तरी सांगू पाहतोय! त्याच्या लालबुंद चमकणाऱ्या नजरेत काही तरी व्यथा, वेदना दडल्यात असंच तिला वाटे व तिला आलेख आठवे.
' आलेख! ये ना परत!' सुस्कारा सोडत ती मनातल्या मनात आक्रंदे.
परतीचा पाऊस बरसला व आरोग्य केंद्राचा नैसर्गिक उतार नदी काठाकडेच असल्यानं केंद्रातल्या साऱ्या पाण्याचा ओहोळ सशांनी बीळ करून पोखरल्या जागेकडं वाहू लागला. त्या कोपऱ्यात तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. सायंकाळी आठपर्यंत साऱ्या प्रांगणात पाणीच पाणी साठलं. भिंतीला ठेवलेल्या होल्समधून गाळ साचल्यानं पाणी पास होत नसल्यानं आता पाणी कसं काढायचं म्हणून कर्मचारी विचार करू लागले. तोच दक्षिणेकडे कंपाऊंडच्या भिंतीकडे सशांनी पोखरलेल्या जागी भिंतीच्या पायाखाली मोठा खड्डा पडला व पाणी वाहू लागलं. साचलेलं पाणी अचानक भोवरा पडत कमी कमी होऊ लागलं. डाॅक्टर महाजन सोबत सारे तिकडे जमले. वरची भिंत तशीच उभी व पायाखालचा भराव वाहत मोठा खड्डा पडलाय व तेथून पाणी पास होतंय हे लक्षात आलं. सशांनी बीळ तयार करून खालजी जमीन पोखरली म्हणूनच हे घडलं. वाहणाऱ्या पाण्यात कोपऱ्यातल्या पोलवरील उजेडात एक सांगाडा अडकलेला दिसला.
" बापरे! मानवी हाडाचा सांगाडा! काढा बरं बाहेर!" महाजन एका सहकाऱ्यास म्हणाले. सुलेखानं डोकावून पाहिलं. तिच्या अंगावर काटा आला. एकजण भिंती वरुन पलीकडे उडी मारणार तोच अडकलेला सांगाडा निघाला व पाण्याच्या लोटसोबत वाहू लागला. साचलेल्या पाण्याच्या प्रचंड लोट तापीच्या पात्राकडं सुसाट धावत होता. सांगाडा लोटसोबतच पात्रात गेला.
" आवार भिंत बांधण्याआधीच असावा की बांधकाम वेळी कोणी पुरला असावा की तापीला आलेल्या पुरात कधीतरी इथंच अडकून पडला असावा?" आपापसात चर्चा व भिती पसरली. थंड वारा व वाढणारा अंधार म्हणून जमलेले परतत आपापल्या रूममध्ये व रात्रपाळीवाले आपापल्या कामावर परतले.
सुलेखा रूमवर येत झोपण्याची तयारी करू लागली. पुढे हाॅल, मध्ये किचन व मागे बेड. बेडची खिडकी त्या जागेकडेच होती. सुलेखानं गुलशन नंदाचं उपन्यास वाचायला घेतलं. हल्ली दोन महिन्यांपासून आलेखचा पत्ता लागत नाही म्हणून तिला झोप येईना म्हणून ती उपन्यास, कादंबरी वाचत राही. वाचता वाचता कधीतरी झोप येई. आजही ती उपन्यास वाचू लागली. वाचता वाचता घड्याळानं बाराचे ठोके दिले. आज तिला ठोक्याचा आवाज जास्त जाणवला. कदाचित पावसानं हवेतला गारठा वाढल्यानं असावं. तिनं जांभई देत उपन्यास मध्ये खूणचिठ्ठी अडकवत बाजूला ठेवलं व झोपू लागली. दक्षिणेकडील खिडकीचं फाटक हवेनं हालत करकर वाजत होतं. ती उठली व हवेनं वाजणारी खिडकी लावण्यासाठी हात बाहेर काढला.अचानक वरच्या पडदीवरनं थंड पाणी हातावर टपकलं. तिच्या अंगात शिरशिरी उठली. खिडकी सटकणी अडकवत बंद केली. शाल ओढत ती झोपू लागली. अंगावरच्या शालीचा मऊ स्पर्श होताच तिला आलेख आठवला. तिला आश्चर्य वाटे. सप्तपदी ज्याच्यासोबत चाललो,ज्याचं मंगळसुत्र गळ्यात आहे तो ही दोन महिन्यांपासून आलेखसारखाच गायब. त्याचं आपणास काहीच सोयरसुतक वाटत नाही.आठवण येत नाही. पण असा एक दिवस जात नाही की आलेखची आठवण आली नाही वा आलेख परतावा म्हणून आपण केदारनाथाकडं धावा केला नाही.ही एक प्रकारची प्रतारणा असुनही आपल्या मनात अपराधीपणा वाटत नाही. उलट आलेखची सय मनात मोगरी गंध उठवत एक सुवासिकता पसरवते! पहिलं प्रेम माणूस विसरू शकत नाही हेच खरं! ती भूतकाळात शिरली.
.
.
आलेखला आबांनी स्वयंपाक शिकवण्यासाठी सोबत घेत आपल्या मुळगावी परतले. माठलीत असेपर्यंत आलेखबाबत कधीच विशेष काही मनात उमललं नाही. पण शहाद्याला आपल्या घरी सोबत राहू लागल्यावर मनात वसंत फुलावा व कोकिळकुजन सुरू व्हावं तसंच सुरू झालं. आधी असं का होतय व हे नेमकं काय ते कळेना. लग्न सीजन आटोपल्यावर आबा व आलेख सोनगीर ढाब्यावर कामास जाऊ लागले. मग आठ आठ दिवस घरी येणं होईना. आई नंतर येणाऱ्या सारंगखेड्यातल्या, मंदाण्यातल्या यात्रेतून तर कधी सोनगिराहून वेगवेगळी भांडी घेऊ लागली. कधी घागर, कधी ताट,ताटल्या, हंडे, कोट्या वेगवेगळी भांडी घेऊ लागली. शेजारणी व वडीलांना मोठ्या हारीखानं दाखवू लागली.
" माझ्या सुलूसाठी घेतलीत! पुढच्या वर्ष दोन वर्षात लग्न करतांना एकदम जड नको जायला म्हणून आताच तयारी करतेय!"
" मथुरे! पण कुणी मुलगा नजरेत आहे का?"
" वहिणी, कुणी कशाला! आमचा भाचा आलेख आहे ना!" लखाजी मध्येच बोलले व मथुरानंही खुशीनं दुजोरा दिला.
मागच्या दारी उष्टी भांडी घासणाऱ्या सुलूनं हे ऐकलं व तिला हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हात चांदणं पडल्याचा भास झाला. तिच्या गालावर लाली चढली. ती भांड्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवत घरातलं बोलणं ऐकू लागली. कोऱ्या भुईत वळवाचा पाऊस मुरताच मृदगंध उठावा तसंच सुलूच्या मनात अलवार भावना फुलल्या.
रात्री यात्रेतून आलेख परतला. त्याला पाहताच बाहेरच्या ओसरीवर गप्पा मारणारी आई वाढायला उठू लागली.
" आई तू मार गप्पा! मी वाढते त्याला!" सुलू म्हणाली उठली.
मथुराबाई थांबली तशीच.
मधल्या घरात लाकडाचा पाट टाकत सुलेखानं ताट तयार केला.आलेख मुकाट्यानं जेवू लागला. सुलेखानं पाण्याचा तांब्या आणत ठेवला व समोर बसली. आलेख घासावर घास ढकलत होता. खाली मुंडी घालत ताटातलं संपवत होता.
सुलेखा समोर बसत निवांत त्याच्याकडं पाहत होती.
" आमचा भाचा आलेख आहे ना!" आबांचं वाक्य आठवत ती आलेखला आज वेगळ्याच नजरेनं न्याहाळत होती.
" सुले, कुणी जेवत असेल तर घास मोजू नयेत माणसानं!" सुले आपल्याकडं एकसारखी पाहतेय म्हणून आलेख बोलला.
" तुला मी घास मोजतेय असं कुणी सांगितलं?"
" मग घुरून घुरून काय पाहतेय!"
" काही नाही. ताटातलं वाढलेलं सर्वच खाऊ नये माणसानं! आपल्या माणसासाठी थोडं फार उरू द्यावं!"
आलेख थरथरला व सुलूकडं अविश्वासानं पाहू लागला.
" आपलं माणूस येईल तेव्हा थोडं काय तर अर्धा ताट उरू देईल!"
" अवतीभवती वावरणाऱ्यात, असणाऱ्यातून आपली माणसं शोधता आली पाहिजेत!
आलेखची नजर सुलूच्या नजरेत खोल उतरली.
त्यानं तोंडातला बुंदीचा अर्धा लाडू तसाच ताटात ठेवला व तांब्या उचलत तो हात धुण्यासाठी मागच्या दारी निघाला.
सुलूनं हसतच ताटाला हात जोडले व ताटातला बुंदीचा अर्धा लाडू आनंदानं उचलला व तोंडात टाकणार तोच आलेख मागून आला.
" सुले काय हे!"
" का? कळत नाही का?"
आलेख पुढे सरकला व अर्ध्यातला अर्धा लाडू ओठातून त्याच्या तोंडात अलगद आला.
" सुले! काय गं आटोपलं नाही का अजून!" ओसरीवरून मथुराबाई विचारती झाली.
मामीच्या हाकेनं आलेख घाबरला व तो निघू लागला.
" माकडा इतका का घाबरतो! लाडू तर पुर्ण खा!" सुलू हसतच म्हणाली.
सुलू व आलेखचं विश्वच बदललं. मथुरा बाई व लखाजी तर आधीच तयारीला लागले होते.
शहाद्यातील जवळच्या नातेवाईकाचं लग्न औरंगाबादला होतं. लखाजी व आलेखलाच स्वयंपाक करण्याची जबाबदारी दिलेली. लग्नाचंही सहकुटुंब आमंत्रण. आधी लखाजी व आलेख गेले. नंतर वऱ्हाडासोबत सुलेखा व मथुराबाई गेल्या. लग्न आटोपल्यावर सुलेखा व आलेख थांबले. आलेख सोबत औरंगाबादेत फिरतांना सुलेखा सहज म्हणाली.
" आलेख आई आबा आपल्या लग्नासाठी एवढ्या वस्तू घेत आहेत तर तुला नाही वाटत का मला काही द्यावं!"
" मामा मामी वेडे आहेत!"
" अरे ,काल इथून आईनं बरेच दागिने घडविले आपल्या लग्नासाठी!"
" मग आणखी मी काय घेऊ?"
" मुर्खा मी मागावं नी मग तू द्यावं यात काय अर्थ!"
आलेखला समोर शालीचा मोठा शोरुम दिसला. त्यानं सुलूचा हात पकडला व शोरुममध्ये नेलं. एक मस्त शाल त्यानं घेतली.
ट्रॅव्हल्सनं परततांना सुलू तीच शाल पांघरून परतली.
.
.
सुलेखा एकदम दचकून उठली. रुममधल्या उंदरासाठी आलेल्या मांजरीच्या धक्क्यानं वर पडदीवर ठेवलेली तांब्याची घागर आवाज करत खाली पडली होती. सुलेखानं तिला हात लावत आधी घुमणारा नाद बंद केला व उचलली. तीच घागर होती जी आईनं सोनगीरच्या बाजारातून तिच्या लग्नासाठी घेतली होती. आलेखशी तर लग्न झालंच नाही पण राधेशामशी झाल्यावर आईनं घेतलेली एकही भांडी त्यांनी नेली नाहीत. ती माठलीला तशीच आई आबाकडं राहिली. पारण्याला आलो तेव्हा आईनं सोबत दिली. सुलेखाला आठवलं व तिच्या डोळ्यात आसवं तरळली. माणूस जिवनात किती स्वप्ने रंगवतो! स्वप्नात कुणा कुणाला रंगवतो! पण प्रत्यक्षात सारेच रंग टिकत नाहीत! काही विरतात तर काही बेरंग होत रंगीन जीवनच बेरंग करतात.
पलंगावर येताच शालीच्या स्पर्शात तिला वेगवेगळे शाश्वत मुलायम रंग जाणवू लागले. आलेख! या मुलायम स्पर्शातला तुझा रंगच फक्त शाश्वत वाटतो!
.
.
घड्याळ ठोके देतच होतं. ती आता झोपण्याचा प्रयत्न करू लागली. बाहेर जोराचा वारा सुटल्याचा आवाज येत होता. खिडकी जोरात वाजली व एकदम उघडली. ती एकदम घाबरली. खिडकी तर आपण सटकणी लावून बंद केली होती. मग वारा असला तरी कशी उघडली. ती तशीच पडून राहिली. तिची नजर खिडकीकडंच होती. सताड उघड्या खिडकीतून थंड वारा व पिवळा प्रकाश मिश्रीत अंधार जणू डोकावत होता. ती घाबरत घाबरत उठली व खिडकी लावणार तोच तिला समोर आपल्यावर रोखलेली नजर दिसली. सुलेखाच्या सर्वांगातून जोराचा झटका लागत थंडगार लहर दौडत मेंदूकडं शिरली. एकदम फाटकं बंद करावीत की तशीच पलटत पळावं याच विचारात ती असतांना तिचे पाय जागीच थबकले.
" सुलू......!............! आलो बघ मी!"
" आ.....आ...ले...ख!"
" सुलू होय! तुझाच आलेख! भेटण्यासाठी आतूर होतो गं! पण त्या राधे नानानं......."
तोच कुणाचा तरी आवाज आला व ती नजर......आलेख......निघाला.
" सिस्टर! काय झालं? मोठ्यानं का ओरडलात? आणि एवढ्या रात्री खिडकी उघडी ठेवून का उभ्या अशा?"
सुलेखा एकदम भानावर आली. तिचं सर्वांग घामानं डबडबत होतं. खिडकीत नजर पाहताच तिच्या तोंडातून आरोळी बाहेर निघाली होती व ती ऐकून रात्रपाळीचे सहकारी आवाजाच्या दिशेन येत विचारत होते.
" काही नाही खिडकीतून मांजर आली व भांडी खाली पाडली. त्या आवाजानं दचकले!"
" सिस्टर खिडकी लावा व झोपा! घाबरू नका!" सहकारी निघाले.
सुलेखा झोपलीच नाही. ती सारखी खिडकीकडेच पाहत होती. पुन्हा आलेख येईल यानं ती खिडकीकडंच पाहत होती. आपणास भास तर झाला नाही? नाही, भास नाहीच. आपल्याशी तो स्पष्ट बोलला. का तो सांगाडा दिसला व आपणास आलेखचेच विचार येत असल्यानं भास झाला असावा. पण मग आजच का भास व्हावा!
नंतर बराच वेळ जागून ही पुन्हा आलेख आलाच नाही.
" आतूर होतो गं मी! पण राधेशाम नाना...." या वाक्यानं ती दिवसभर सैरभैर झाली. दिवसा तिचं कामात चित्त लागेना. ती दुपारी मागच्या बाजूला चक्कर टाकून आली. खिडकीकडं पाहिलं. पण नेहमीसारखंच सारं जागच्या जागी. इतक्या दिवसांपासून नेमका रात्रीच का आलेख दिसावा? आलेख बाबत काही घडलं तर नसावं! राधेशामबाबत तो काही तरी सांगत होता.
सायंकाळी भिमाबापू सुलेखाला घ्यायला आले.
" सुलेखा लखा मामांनी व अर्जुन दादानं तुला लगेच घेऊन यायला पाठवलंय!"
" बापू ,एवढं अचानक? का, काही झालं का?"
" तसं काही नाही पण चल लवकर!"
सुलेखा घाबरली. कालच्या प्रसंगानं तिनं लगेच तयारी केली व ती निघाली.
अर्जुन रावांनी छगन राधेशामच्या वस्तू घेऊन आला तेव्हाच मनात राधेशामबाबत जे घडलं ते पूर्ण नाही पण तो गेलाय हे तरी उघड करायची योग्य वेळ आली हे जाणलं. त्यानं आपल्या भावास सुलेखाला आणायला पाठवलं. कारण चित्रा आता काही घटकेचीच सोबती म्हटल्यावर सुलेखाला राधेशामपासुन मोकळं करावंच लागेल. तेव्हाच तर आपल्या पुढच्या काही लाईनी क्लिअर होतील!
.
.
त्यानं छगनला थांबवत पोलीसांनाही कळवलं. सुलेखा आली की ते सारे माळमाथ्याकडं सतोन्याला निघणार होते.
.
.
क्रमशः...