सुलेखालेख- भाग ::-- तिसरा
भाद्रपदची अमावास्या माळमाथ्यावर उगवली तसा वातावरणात एकदम असह्य उकाडा जाणवू लागला. तसा अख्खा भाद्रपदच तापला होता. दुपारनंतर उन्हे कलली तसा घामोटा वाढला,वारा तर साफ पडलेला. घामाच्या धारा पुसत छगन रेतीच्या डेपोजवळ रखवाली करत थांबलेला. बबनरावांचा रेतीचा धंदा एकदम तेजीत. तापीतून रेती काढण्याचा त्यांनी ठेका घेतलेला. उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीला ही बरीच रेती काढत त्यांनी दोन तीन ठिकाणी डेपो( ढिग) केलेले. तापी पल्याड माठली, सज्जीपूर व माळमाथ्यावर सतोन्याला डेपो करत पावसाळ्यात हीच रेती मुंगबारी पिंपळनेरमार्गे नाशिकला जाई. माळमाथ्याच्या काटवान भागात सतोन्याला असाच मोठा थप्पा बबनरावांनी मारून छगनला रखवालदार म्हणून ठेवलेलं. ढिगारा आता बराच कमी झालेला. छगन रेतीच्या डेपोची रखवाली करता करता जवळच टेकाडावर उभारलेल्या पवन उर्जेच्या टाॅवरचं रात्रीचं वाचमन चं काम ही पाही. त्यामुळं रात्री टाॅवरजवळच त्याची पथारी असे.
तीनच्या सुमारास घामाच्या धारा जिवाची काहिली उठवू लागल्या. उत्तरेला पांढऱ्या मेंढी अभ्राच्या गुब्बाऱ्याचा काळा ठिपका होत तो ठिपका वाढत वाढत वर सरकू लागला. आभाळात चुकार पाखरे घिरट्या घालत ओरडू लागले.अचानक पडलेला वारा वाहण्यास सुरुवात झाली.ज्वारी बाजरीच्या शेतात भुतभवरी फिरत धाटे गरागर फिरू लागले.भुईमुग चवळीचे डख्शे फुगडी घालत जागेवरच फेर धरु लागले.बाजुच्या शेताच्या बांधावरील लिंबाच्या आधारानं वाढलेला फांगोड्याचा वेल झोके घेत तुटायला आला. पावसाला सुरूवात झाली. परतीचा पाऊस, राणीकाजलचा पाऊस जाता जाताही माळमाथ्यास झोडपू लागला. अचानक घामोटा ,उष्मा पळाला व गारवा सुटला. आभाळातून धो धो पाऊस कोसळू लागला. जिकडे जिकडे पाण्याचे लोट उताराकडं लागत शेतात शिरले. चाऱ्या गढूळ पाण्यानं भरत वाहत्या झाल्या. बाजरीची कणसं पाण्याच्या मारानं खाली झोपली. ज्वारीच्या पोघ्यातून पाणी मुळाकडं सरकलं. रेतीच्या ढिगाऱ्यावरुन पावसाचं पाणी खाली येतांना रेती खाली आणू लागलं. छगन पत्र्याच्या शेडमधून पावसाचं रौद्र रूप पाहत होता. पमीनं कालच तोडून धाब्यावर टाकलेल्या चवळीच्या शेंगा उतरवल्या असतील का या धास्तीनं तो गावाकडं पाहू लागला.आता पाऊस गेला असं वाटत असतांना आज पाऊस आलाच या विचारात असतांनाच त्याला रेतीच्या ढिगाऱ्यात पांढरं पाढरं काही तर दिसलं. पावसानं रेती खाली वाहत ढासळत आत दबलेलं काही तरी उघडं पडत होतं. तो पडत्या पावसात तिकडंच बारकाईनं पाहू लागला. आता पाऊस ऐन बहरात होता. पांढरा आकार जास्तच उघडा पडत असल्याचं पावसाच्या सैनधार धारात दिसत होतं. त्याची जिज्ञासा चाळवली. त्यानं छत्री घेतली व शेडमधून तो ढिगाऱ्याकडं निघाला. वाऱ्या पावसानं छत्री ओढू लागली. तोल सांभाळत तो रेतीच्या डेपोवर पांढऱ्या आकाराकडं चढला. जवळ जाताच पावसाच्या थंड हुडहुडीत धडधड व थुडथुडी एकदम वाढली. तरी त्यानं हिम्मत करुन एका हातात छत्री सावरत दुसऱ्या हाताने आजुबाजूची रेती कोरली. तो जागेवरच हडबडला. रेतीत मानवी हाडाचा सांगाडा समोर दिसू लागला. तोच वाऱ्यानं हातातील छत्री उलटी होत उडाली. एरवी त्यानं उडूच दिली नसती पण हाडाच्या सांगाड्यात अडकलेल्या वस्तूनं तो माहीत झाला. त्यानं हाताच्या मनगटाच्या हाडातून ब्रेसलेट काढलं व कवटी मानेच्या सांध्यातून बाजूला करत गळ्यातली चैनही काढली. दोन्ही वस्तू आजुबाजुला सावधानतेनं पाहत घाईत खिशात कोंबल्या व तो मानवी हाडाचा सांगाडा तसाच रेतीच्या ढिगाऱ्यात रेती टाकत तो पुरु लागला. पावसासोबत घामानं तो पुरता भिजला पण धुराऊ पाऊस आज आपली कडकी साफ करतोय पाहून तो मनात आनंदला. एव्हाना पावसाचा जोर मंदावला. तो तडक घराकडं निघाला. रस्त्यात टेकडीच्या वाटेनं परततांना वादळानं शेतातली पडलेली झाडे, वाकलेले खांब दिसत होते. पण आता त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं. घरी पारी पमी व निल्याला शिव्या हासडत पन्हाळातून अंगणात वाहिलेल्या चवळीच्या शेंगा गोळा करत होती. पोरांनी पावसात उड्या मारण्याच्या नादात धाब्यावर टाकलेल्या शेंगा तशाच राहू दिल्या होत्या. छगननं पारीला उरल्या सुरल्या शेंगा तशाच ठेवायला लावत घाईत घरात बोलवलं. त्यानं खिशातून सोन्याचे ते डाग काढत तिच्या हातावर ठेवताच पारी हरखली पण लगेच सावध होत ती कुठून आणलेत म्हणून खोदून खोदून विचारू लागली. छगननं सर्व सांगताच ती थोडी धास्तावली.
" अहो ,पण डेपोत तो सांगाडा कुणी पुरला असेल? काही घातपात?"
" पारे! नदीपात्रात वाहून आलेलं प्रेत वा सांगाडा रेतीसोबत डम्परमध्ये आला असेल . पण ते महत्वाचं नाही. आपला फायदा होतोय हे महत्वाचं!"
पारी काळजीनं गोंधळली. ती चैन व ब्रेसलेटकडं पाहू लागली. चैन चार-पाच तोळ्याची व ब्रेसलेटही तेवढंच जड. तिनं कोपऱ्यातली उतरंड उतरवत तळातल्या मिरचीच्या रांजणात ते डाग ठेवले व उतरंड रचत ती रांधायला लागली.
छगननं जेवण आटोपलं व अंधार पडताच तो खुशीत डेपोकडं निघाला. गल्लीतल्या विजेच्या खांबाजवळ पाऊस पडल्यानं सोसे, पिंजारे दाटी करत उडत होते. हे आता रात्रभर उडणार व सकाळी पोल खाली पंखाचा खच पडेल हे छगननं ताडलं. माणसाचं जीवनही असच. तोऱ्यात ताठात माणूस हयातभर उडत राहतो व शेवटी दहन होत राख किंवा दफन होत सांगाडा होऊन कुठं तरी पडतो. सांगाडा आठवताच तो पावलं उचलत डेपोकडं निघाला. गाव टाकताच पश्चिमेला तलाव लागला. तलावाच्या काठानं तो जाऊ लागला. तलाव दुपारच्या पावसानं अधिक फुगला होता. तलाव मागे पडताच गाडवाट लागली. एका बाजूला उंच टेकडी व दुसऱ्या बाजूला शेतबांधावर साबरी, शेरीच्या झाडाची दाटी. विजेरीच्या उजेडात तो झपाझप चालू लागला. तोच साबरीच्या ( निवडुंग) बांधाकडून घोरपड सरपटत टेकडीकडं पळाली. बिळात पाणी घुसलं असावं बहुतेक म्हणून ती भेदरल्यागत इकडं तिकडं धावत होती. शेवटी ती टेकडवरच्या मोठमोठ्या दगडात दडली. टेकडीवरच्या मोठमोठ्या शिळा छगनला तपास बसलेल्या जटाधारी साधूसारख्या भासू लागल्या. वर्षानुवर्षे या शिळा थंडी, ऊन, वारा, पाऊस याला न डगमगता जागच्या हालत नाही तोवर जणू साधुंचं तप चालूच राहणार.
सखू नानजीच्या भुईमुगाच्या शेतात पाण्याची डाब सबडब करत होती. भुईमुगाचे शेंडे चंद्रभागेच्या पाण्यात बुडालेल्या मंदीराचे घुमट दिसावेत तसेच विजेरीच्या उजेडात चमकत होते.
छगननं डेपोभोवती चक्कर मारत शिटी घुमवली. आज दररोज पेक्षा शिटी जोरात वाजल्याचा त्याला भास झाला. तो मनात हसला. त्यानं पुन्हा शिटीत हवा फुंकली व मधला बरू
फुर्रर्र करत जोरात घुमत आवाज माळमाथ्यात धुमसला. माणसाच्या आनंदी दुखी या भावनेवरच त्याच्या बऱ्याच क्रियांची परिणामकता अवलंबून असते. छगन आज खूपच आनंदीत होता . म्हणून त्याला आसमंत ही वेगळाच भासत होता. त्यानं सांगाडा पुरलेली जागा पाहिली. ती तशीच होती. हायमास्टच्या प्रकाशात आता सांगाडा दिसत नव्हता. आता रेतीचा डम्पर आला की इकडील रेती आधी भरायला लावू हे त्यानं ठरवलं. डेपो भोवती चक्कर मारून तो शेडमधील बाज व वळकटी उचलत टेकडीची वाट चढत पवन उर्जेच्या टाॅवरजवळ आला. टाॅवरपासून अंतरावर रोजच्या जागी त्यानं बाज टाकत वळकटी पसरली. एकवेळ आणखी जोरात शिटी फुंकली. आवाज घुमताच दूरच्या टाॅवरवरील वाॅचमननेही शिटी फुंकली असावी. प्रतिध्वनी सोबत शिटीचा क्षीण आवाज व क्षीण प्रतिध्वनी घुमला. छगन बाजवर बसला. टाॅवरजवळील लाईट पिवळा प्रकाश फेकत होता. तर खालच्या बाजूला रेतीच्या डेपोजवळील हायमास्ट शुभ्र तेजस्वी प्रकाश पसरवत होता. पिवळ्या व रजत तेजस्वी प्रकाशाच्या मिश्रणात परिसर न्हाहत होता. टेकडीच्या उत्तरेच्या अंगाकडील शेतात दुपारच्या पावसात पडलेली बाजरी, ज्वारी उलीच वर उठत असल्याचं छगनला जाणवत होतं. त्याच्या मनातही झोपलेल्या लिप्सा तशाच उठू लागल्या. आता पारीला घेऊन थेट धुळ्याला जायचं. पारीला कानातले झुमके,नाकातली नथनी घडायची. गरिबीनं पारीची हौस पुरवता आलीच नाही. आता तिच्यासाठी मस्त पैठणी घेऊ.....
छगन स्वप्नात रंगला. वातावरणात दुपारच्या जबरी पावसानं गारठा उठत थंडी मुरवू लागला. छगनला बैलाच्या घाट्या ऐकू आल्या. या वेळेस कुणाची बैलं आली? तो बाजल्यावर उठला व सावध झाला. पण लाईटच्या जेडात दूरदूरवर बैल दिसेनात. टाॅवरची तांब्याची केबल चोरणारे चोर नवनवीन क्लृप्त्या आखत. वाॅचमनला घाबरवत पळवून लावत व ताब्यांच्या केबलवर डल्ला मारत. मग दुसऱ्या दिवशी कंपनी त्या टावरवरच्या वाचमनलाच जाब विचारे वा हकालपट्टी करी. छगन सावध झाला. त्यानं पुन्हा शिटी फुंकली. उत्तरादाखल शिटीचा क्षीण आवाज घुमला. त्याला धीर आला व तो बाजेवर निवांत झाला. पुन्हा आधीपेक्षा मोठ्यानं घाट्यांचा आवाज घुमत जवळ जवळ येऊ लागला. तोच पूर्वेकडील गावालगतच्या तलावाकडून टिटव्या आवाज घुमवत आभाळात गिल्ला उठवू लागल्या. पश्चिमेच्या काटवान भागात ठेलारी पावसात आपल्या मेढ्यांची शेवाडं टेकडीवर आणत. तिकडणं कुत्री जोरजोरात भुंकल्याचा आवाज घुमला. छगन आता उठला व त्यानं हातात काठी घेतली. त्याचं ध्यान टेकडीखालच्या दुल्लभ पाटलाच्या बाजरीच्या शेताकडं गेलं. बाजरीच्या शेतात दोन पांढरी बैलं मस्त आडवी पडलेली बाजरी हासडत होती.
"अरे, दुल्लभ पाटलांची बैलं कशी काय राहिलीत ? आपण आलो तेव्हा तर नव्हती? बहूतेक नंतर आली असावीत! गावाच्या वाटेला लावून देऊ म्हणजे खळ्यात बरोबर जातील". छगन काठी घेत दुल्लभ पाटलाच्या शेतात निवडुंगाचा बांध ओलांडत घुसला. फड्या निवडुंगाला लालभडक बोंडे लागलेली होती. छगन बैलाकडं जाणार तोच त्याला एकाएकी जाणीव झाली . दुल्लभ पाटलाची बैलाची जोडी तर काळ्या रंगाची आहे! हे तर पांढरे! कुणाची असावीत? काही का असेना हाकलून देऊ! उगाच नुकसान नको पिकाचं.
पांढरी बैल तरणीबांड गोऱ्हेच. धष्टपुष्ट व फुरफुरणारी. छगन जवळ जात चॅक छॅक ssss करत हाकलणार तोच तोंडातल्या कणसासहीत मान फिरवत ते छगन कडं मारक्या नजरेनं खुनशी पाहू लागले.
" हॅक....कुणाची रे! हट निघा!" छगन स्वत:शी पुटपुटत हाकारू लागला.
बैलांनी जागेवरच पायानं पडलेली बाजरीची धाटं उसकटत फिसकारली. शेपटी वर करत डिरकाऊ गुरकावू लागले. त्यानं छगन अधिक चेकावला व तो काठी घेऊन त्याच्यावर धावला. तोच दोन्ही बैलांनी छगनवर चालून येत हल्ला चढवला. छगनला हे अनपेक्षित होतं. हातातली काठी सावरण्या आधीच त्यानं घाबरत मागे फिरत पळ काढला.दोन्ही बैलं हुंबरत बाजरीतून छगनवर तुटून पडली. छगन तोट्यातून पडत धडपडत निवडुंगाच्या बांधावर आला. ठराविक अंतरावर उभे राहत ते डिरकू लागले. छगननं ओळखलं आता हे आपणास निवडुंगातच घुसळतील. कितीही पळालो तरी! तोच बैलं धावून आली. छगननच्या अंगात अचानक बळ आल्यागत त्यानं एकदम उभं राहत काठी जोरात फिरवली. बैल शिंगावर घेऊन छगनला निवडुंगावर फेकणार तोच छगनची काठी बैलावर जोरात वार करू लागली. बैलं माघारली. त्यांनी शिंगानं निवडुंगांची फासाटीच उचपाटली व शिंग, पायानं माती चिखल उडवत गाडवाटेनं ते रेतीच्या डेपोकडे पळाले. छगननं धडधडती छाती शांत करत जीव तोडून टाॅवर जवळ केला.
बाजवर बसताच रोखलेला दम सोडला.
" आज मेलोच असतो जर हिम्मत करत, थांबत काठी फिरवली नसती तर!" तो मनात धास्तावला.
आता बैल रेतीचा ढिग शिंगानं व पायानं उकरत शेपटी वर करत जोरजोरात डिरकत होते. पण छगनची तिकडे जाऊन त्यांना हुसकारण्याची हिम्मत होईना.
आपण असली खोंडं पाहिलीच नव्हती! काय जंगली व धष्टपुष्ट होती!
तो बाजेवरूनच बैलाची गंमत पाहू लागला. बैल आता दुपारनंतरच्या पावसात उघड्या पडलेल्या सापळ्याजवळच्या जागेच्या आसपासच होते. ते सारखी शिंगानं रेती उकरत होते. तरी छगनची तिकडे जाण्याची छाती झालीच नाही.
बऱ्याच वेळ रेती उकरत बैलांनी सांगाडा शिंगानं बाहेर काढलाच. बैल पश्चिमेकडील रस्त्यानं निघून गेले. टिटव्या कुत्र्यांनी पुन्हा हुल्लड माजवली. छगनच्या अंगावर आज प्रथमच या जागेवर भितीनं काटा उभा राहिला. त्यानं बाजेवर गोधडी पांघरत झोपणं पसंद केलं. पण भितीनं झोप कशी येणार. तो गोधडी पांघरूण पडून राहिला व आजुबाजुला उठणारे आवाज कानानं टिपू लागला. त्याच्या शिटीतला बरू घुमणं आता बंद झालं.
बराच वेळ गेला. काहीच हालचाल जाणवेना. फक्त सखू नानजीच्या शेतातील डाबमध्ये बेडूक डरावत होती तोच आवाज घुमत होता. व दूरवरच्या टाॅवरच्या वाचमनच्या शिटीचा क्षीण आवाज.पण तरी छगन आता त्यास प्रतिसादेची शिटी देत नव्हता. थोड्या वेळाने तो हळूच उठला. इकडचा तिकडचा कानोसा घेतला. डेपोकडं नजर दौडवली व तो हबकला. हायमास्टच्या उजेडात त्याला रेतीवर लाल साडीत बाई बसलेली दिसली. तो बिचकला. या वेळेस बाई! कोण? तो घाबरला. त्यानं बाजवर झोपत पुन्हा गोधडी पांघरली. पण डोळे गोधडी आडून बाईचाच वेध घेत होते. बाई हातवारे करत रेतीच्या ढिगाऱ्याआड सांगाड्याजवळ दिसेनाशी झाली. वातावरणात पुन्हा शांतता पसरली पण छगनची छाती धडधडतच होती.
निवडुंगाच्या दडीतून दिवाभीत( घुबड ) लहान पोरासारखं कोकलू लागलं. त्या आवाजानं रात्र अधिकच भयाण वाटू लागली. छगन गोधडीतून डोळे फाडून फाडून रेतीच्या डेपोकडं पाहू लागला पण त्याला बाई दिसेना. तोच टेकडीवरच्या खडकातल्या कपारीतून कोल्ह्यानं हूक उठवली. तो आवाज ऐकताच निवडुंगातल्या दडीत घुबडानं एकसारखा हेल धरला. कोल्हेकुई व घुत्कार यात जणू कलगीतुराच रंगला. छगन घुम्यागत पडत आताशी शांत होऊ पाहत होता. तोच त्याला आपल्या पायातीजवळ काही तरी हालचाल जाणवली. छगननं श्वासाची गती कमी करत धिम्या गतीत मान व नजर हळूवार पायातीकडं वळवू लागला. नजरेच्या कक्षेत काही तरी स्पष्टता उठू लागली व तो थरथरला. लाल साडीतली बाई पायातीजवळच खाली बसलेली. पदर ओढवून घेत नजरेचा रोख छगनवरच रोखलेला. छगनची छाती भात्यागत हाफसणार तोच तो महतप्रयास करत धडधड रोखत पडण्याचा प्रयत्न करू लागला.
" सुलेखा! मी कोण? मी बृहन्नडा! मीच शिखंडी!"
.
.
.
" सुलेखा ऐक! पूर्वापार आम्ही उपेक्षीतच..... बघ विश्वास नाही बसत? ऐक...." नी मग दोन्ही हात जोडत टाळ्याचा नाद उठला
छगन घामानं की.....? पण ओलाचिंब होत पाहत, ऐकत होता.
लाल साडी टाॅवरच्या पिवळ्या प्रकाशात केसरी दिसत असली तरी आवाज मात्र एकदम भसाडा होता. छगन नजरेचा वेध चुकवत तोंडावळा पाहण्याचा प्रयत्न करणार तोच ती बाई पाठमोरी होत जोरजोरात टाळ्या वाजवू लागली.
" सुलेखा, ही तुझीच साडी, हा तुझाच साज! तुझाच हिरवा चुडा! तुझेच डूल! तुझाच गजरा न तुझीच लाली! मी का ल्यालो माहितीय? आता मला तुझ्याशी नजर मिळवायलाही भिती वाटतेय! म्हणून माझं मूळ रूप कोणतं? मी कोण? सवालात सवाल, जवाबात सवाल? आमचं जन्मणं एक सवाल? आमचं जगणं एक सवाल?"
.
.
बाई जीव तोडून बोलत होती. बोलता बोलता भसाडा आवाज कधी बायकी व्हायचा तर कधी आणखीनच भसाडा. छगनला आपला श्वास केव्हाही दगा देईल याची जाणीव झाली तरी श्वासाची गती सयंमीत ठेवत तो पडून राहिला. तोच बाई खालून उठत छगनच्या पायातीलाच बाजल्यावर बसली. छगनच्या तळपायाला गुदगुल्या जाणवू लागल्या व न कळत त्याच्या मुखातूनही सवालच प्रकटला
" कोण?"
" मी कोण? मीच मला विचारत फिरतोय मी कोण? त्यात पुन्हा तु ही विचारतोय कोण? मूर्खा दुपारी माझ्या वस्तू नेल्यात त्यावरचं माझं नाव नाही वाचलं का? मुकाट्यानं त्या जिथल्या तिथं पोहोचव! का उगाच उकरत बसला जुनी मढी? जुनी हाडे? जुने सांगाडे? सांगाड्यांना भावना, वेदना, नसल्या तरी गतकालीन जाणिवा नेणिवा अतृप्त लिप्सा, वासना चिकटलेल्या असतातच. म्हणून शहाण्यांनी झाकली मढी उकरू नयेत! आता पुन्हा त्याच सवालांचे जवाब मला हवेत. अर्जुनदादा, भिमा का? का मारतायेत मला? याचं उत्तर मला हवंय.त्यासाठी माझ्या वस्तू मुकाट्यानं माठलीला चित्रार्जुन हाॅटेलवर पोहोचव! आणि तेवढं वस्तुवरचं नाव वाच! त्या नावानंच अर्जुनदादा मला लवकर ओळखेल! बृहन्नडा, शिखंडी असल्या नावाची त्याला ही सुलेखा सारखीच चीड आहे रे!"
छगनची वळकटी आता पूर्ण सबडब झाली. तो थरथरला. छाती आता भात्यागत हाफसू लागली. हवेच्या ( श्वासाच्या) दाबानं व भितीनं भाता फुटेल की काय!
" उद्याच माझ्या वस्तू चित्रार्जुन हाॅटेल, माठली या ठिकाणी पोहोचत्या व्हायला हव्यात नाही तर मदमस्तवाल सांड निवडुंगाच्या जाळीतच फासटतील!"
.
.
" मी कोण? मी बृहन्नडा! मी शिखंडी! मी किन्नर! अरे बजा रे ताली बजा! आज से नचना है, नाचना है! राधे नाना..... राधे नानी...!'
पहाट फुटायच्या आधीच छगननं घर जवळ करत रडतच पारीला उठवलं. घरी येतांना तो निवडुंग, साबरी, शेरीच्या जाळीतच अडकत आला होता की काय पण अंग खरचटलेलं, कपडे फाटलेले.
" पारी उतरण उतरव व त्या वस्तू काढ! भले उपाशी राहू पण नको त्या आपणास!"
पारी नवऱ्याची हालत पाहून समजली. तिनं काहीच न विचारता त्या काढून दिल्या. बल्बच्या उजेडात त्यानं ब्रेसलेट घासलं. नाव दिसू लागलं .
' राधेशाम'
चैनवरच्या बदामावर 'R.F'.
छगन बबनरावाच्या माठलीजवळच्या रेतीच्या डेपोवर बऱ्याच वेळा डंपरनं जाई. कारण त्याची सासरवाडी तिकडचीच असल्यानं रेतीच्या डंपरनं तो माठलीच्या डेपोपर्यंत जाई. त्यावेळेस चित्रार्जुन हाॅटेल ही पाहिलं होतं. त्यानं सकाळ होताच तापी ओलांडत माठलीतलं चित्रार्जुन हाॅटेल गाठलं. अर्जुनरावाचा तपास केला. अर्जुनरावांची पत्नी चित्रा ही कमळीमधुरा ( कावीळ)नं पंधरा दिवसांपासून आजारी होती व मरणाच्या दारातच होती. अर्जुनरावानं त्याही स्थितीत राधेशाम हे नाव ऐकताच तातडीनं आलेल्या माणसाची भेट घेतली. छगननं वस्तू बाहेर काढताच अर्जुनरावांचे डोळे विस्फारले. त्यानं ब्रेसलेट व त्यावरचं नाव पाहताच छगनला एकांतात घेतलं.
.
.
क्रमश:...