सुलेखालेख भाग::-- दुसरा
पोळ्याला घरी आलेली सुलेखा दोन दिवसांनी ड्युटीवर परतली. परततांना मात्र कालच्या प्रकरणांने डोळ्यात महापूरच आला. तसा एक महिन्यापासून महापूर ओसरण्याचं नाव घेतच नव्हता. पण हा महापूर कुणासाठी होता हे मात्र तिला संभ्रमात टाकत होतं. ड्रेसींगटेबल समोर उभी राहत कपाळावर टिकली लावतांना ती थरारली. नाहीतरी या दुवाड गल्कास आता काहीच अर्थ उरला नव्हता. आरशात तिला अस्पष्टशी छबी तयार होत असल्याचा भास झाला. ती भासातली छबी तिची उदासी कमी करू लागली. तिनं बोटांच्या चिमटीतली गल्का कपाळाला न लावता तशीच समोर आरशाला डकवली व करंड्यातून कुंकवाचं बोट भरत भांगेत मळवट भरला. जणू आलेख कागदावर सुरेख आकृती उठू लागली. त्या उदासीत आलेखाच्या आठवणीनं तिला गारव्याचा भास झाला.
" आलेख! ये ना रे! का असा रूसलास!एक महिना होऊन गेला का असला हा रुसवा?" आलेखच्या आठवणीची कळ काळजात सुरी फिरवू लागली. ती विठ्ठल आबा व वडिलांना भेटत पारण्याला निघाली.
हाय वे वरुन ढाब्याजवळून बसवर जातांना सुलेखाला पाहताच विठ्ठल उमाळेला ही आपल्या आलेखाच्या काळजीनं काळजात काहूर माजलं. डोळ्याला धार लागली.
" आलेख पोरा! कसली असली नाराजी रे! या वयात मला ढाब्यावर बसवून कुठल्या जत्रेत हरवलास रे! परत ना! भोलेबाबा केदारनाथ! माझ्या काळजाच्या तुकड्यास जेथे असेल तेथे सुखी ठेव व लवकर परतण्याची सुबुद्धी दे!" त्यांनी उगवतीकडं पाहत हात जोडत प्रार्थना केली. ते आलेखाच्या आठवणीतच विचारात हरवले.
.
.
.
सोमा उमाळे व विठ्ठल उमाळे दोन भाऊ. मोठा सोमा उमाळे व लहान विठ्ठल बऱ्हाणपूर अंकलेश्वर हाय वे ला लागून माठलीत गुण्या गोविंदानं राहत होते. जवळच तालुक्याला फर्निचरचं मोठं दुकान. सोमा उमाळे दुकानावर थांबे व सारा व्यवहार सांभाळी. विठ्ठल माठलीतला फर्निचरच्या कारखान्यावर राबे. लाकडाच्या वस्तू बनवण्यात माहीर. पूर्वी सातपुड्यात भरपूर लाकूड मिळे. फाॅरेस्टचे कूप फुटले की हे भाऊ लाकूड खरेदी करत. विठ्ठल उमाळे खालच्या कारागिरांना हाताशी घेत पलंगापासून तर दिवाण,सोफा, ड्रेसींग टेबल, टी पाॅय सारं सारं घडवे. त्याकाळी जिल्ह्यात त्याच्या कामास तोड नव्हती. विठ्ठल उमाळे रात्रंदिवस या कामात मग्न राही. त्याला इतर व्यवहाराशी काहीच देणंघेणं नव्हतं जणू. सोमा उमाळे या कारखान्यातल्या वस्तूना तालुक्यातील दुकानात विकणं व इतर सर्व आर्थिक व्यवहार सांभाळायचा. यावर भुमीहीन असलेल्या दोन्ही भावांनी हळूहळू पंधरा एकर काळी कसदार जमीन घेतली. खरेदीचा सारा मामला सोमा उमाळेलाच माहीत. विठ्ठल उमाळेला कारखान्यात राबणं एवढंच माहीत. सोमा उमाळेस चित्रा व दुर्गा दोन मुली तर विठ्ठल उमाळेस बराच उशीरा आलेखच्या रूपात पुत्रप्राप्ती झाली. घराला वारस मिळाला म्हणून दोन्ही भाऊ खूश. सोमा उमाळे पुतण्याला लाडात वाढवू लागला.
चित्रा व दुर्गा उपवर झाल्या. सागबाऱ्यातील फर्डे परिवारातील अर्जुनराव व भिमा फर्डेशी दोन्ही मुलीचं जमवत धुमधडाक्यात लग्न जमवलं. लग्नानंतर भिमा फर्डे माठलीतच रहायला आला. अर्जुनराव व चित्रा सागबाऱ्यात तर भिमा व दुर्गा माठलीत. वारंवार माठलीत येत अर्जुनरावांनी पत्नी चित्रास व सासुबाईस फितवलं. हाय वे ला लागून असलेल्या शेतात मोठं हाॅटेल सुरू करण्यासाठी तगादा लावला. लग्न करतांनाच अर्जुनरावांनी सासऱ्यास मुलगा नाही ही बाब पक्की मनात ठसवली होती. व लग्नानंतर पंधरा एकर सासऱ्याच्या नावावरच आहे म्हटल्यावर त्यांनी स्वत: माठलीतला मुक्काम वाढवला व हाॅटेलसाठी तगादा सुरू केला. सोमा उमाळेस ही बाब खटकू लागली. आपला भाऊ विठ्ठल याचा ही शेतीत निम्मा हिस्सा आहे म्हणून पत्नी व जावयाच्या मनातलं किल्मीष ओळखत ते आपल्या नावावरची जमीन विठ्ठलच्या नावावर करण्यासाठी धडपडू लागले. त्यांचा शालक लखा निंबाळे सुरुवातीस यांच्या कारखान्यातच विठ्ठलरावासोबत राबे. पण नंतर लखानं लग्नात स्वयंपाकाचं काम सुरू केलं. उन्हाळ्यात लग्न सीझन करुन आठ महिने तो कारखान्यात राबायला येई. लखाजीस स्वयंपाक कला चांगलीच अवगत होती. मिठाई पासून हाॅटेल ढाब्यावरचं सामीष भोजनातही त्याचा हातखंडा होता. अर्जुनरावांनी लखाजीस हाताशी धरत हाॅटेलची योजना आखली. जावई, सासू आणि सोमा उमाळे यात खटके उडू लागले.
" खटा, माझ्या विठानं माझ्यासोबत रक्ताचं पाणी करत हा जोजार उभा केलाय! या साऱ्या संसारात तो भागीदार आहे. म्हणून मी निम्मा हिस्सा त्याला आधी देतो मग तुम्ही हाॅटेल टाका की काहीही करा"
पण खटा बाईस आपल्या दोन मुली व आलेख यांच्यात तीन समान भागात वाटणी करावयाची होती. अर्जुनरावाच्या मनात तर वेगळंच होतं. घरात वाद विकोपाला गेले. रात्री सोमा उमाळे लखासोबत विठ्ठलला भेटले.
संतापातच ते गरजले.
" विठ्या! जो नुसतं राबतो तो फक्त पोटाची खळगीच भरतो.ज्याला विकास करायचा असतो तो राबण्यासोबत झटतो ही.म्हणून नुसता बैलासारखा राबू नको तर मन लावून झट! उद्यापासून तुझी चूल मी वेगळी करतोय!"
विठ्ठल उमाळेस कळेना. आपला भाऊ आपणास कधीच काही बोलला नाही व आज थेट वेगळी चूल करायचं म्हणतोय.त्याला जिव्हारी लागलं व तो रडू लागला.
" दादा, कुणीतरी बैलासारखा राबतो त्यावर तर कुणीतरी झटत प्रगती करतोय!"
" मग राबत रहा बैलासारखा! पण उद्या चूल वेगळी हवीय मला!" सोमा उमाळे संतापानं बोलले व निघून गेले. त्यांना वाटलं आपला भाऊ वेगळा झाला तर लगेच आपण शेती व धंद्याची वाटणी करून मोकळं होऊ. आपण जर संतापात बोललो नाहीत तर हा वेगळं होण्याचं ऐकणार नाही व खटा अर्जुनराव याला काहीच देणार नाहीत.
सोमा उमाळेंनी शेतीच्या वाटणीची हालचाल सुरू केली. पण त्या आधीच घरात पुन्हा वाद पेटला व सोमा उमाळेस जोराचा झटका आला. इच्छा असुनही सोमा आपल्या भावाला काहीच न देता निघून गेला. विठ्ठल उमाळे ला खटाबाई व अर्जुन रावांनी पुढच्या पंधरा दिवसातच वेगळं केलं. आपल्या भावाची शेवटची इच्छा समजून विठ्ठलराव अलग झाले. त्या दिवसापासून त्यांनी कारखान्यात जाणं तर सोडलंच पण हत्यार उचलणंही सोडलं. "बैलासारखं राबणं सोड", हे भावाचं शेवटचं वाक्य त्यांना जिव्हारी लागलं.
अर्जुनरावांनी लखाजी निंबाळे या आपल्या मामेसासऱ्यास मदतीला घेत लगेच हाय वे लगतच्या शेतात
'हाॅटेल चित्रार्जुन' सुरू केलं. लखाजी हाॅटेलमधले सारे पदार्थ बनवू लागला. अर्जुनराव सागबाऱ्याहून ये जा करत हाॅटेल सांभाळू लागले व लहान भाऊ भिमाला फर्नीचरच्या दुकानावर नेमलं. कारखान्यात आधीचे कारागीरच राबू लागले.
सासरे वारले व अर्जुनरावांनी पंधरा एकर शेती खटाबाईच्या नावावर करत चित्रा व दुर्गास वारस लावलं. विठ्ठलरावांची वडिलोपार्जित जमीन नसल्यानं व जी घेतली ती भावाच्याच नावावर असल्यानं विठ्ठलराव सरळ उडत भुमीहीनच राहिले. आलेख जेमतेम अठरा- वीस वर्षाचा. त्याला याबाबत काहीच देणंघेणं वा खबरबात नव्हती. कारखान्यात जाणं सोडलं व दुसरं कामच नसल्यानं विठ्ठलरावांचे तीन चार महिन्यातच हाल व्हायला लागले. लखा उमाळे अर्जुनरावासोबत हाॅटेलसाठी साथीला होते. पण मेव्हणे गेले व व विठ्ठलरावाचे आपल्या बहिणीनं अर्जुनरावाने हाल सुरू केले ही बाब लखास खटकू लागली.
" खटा आक्का! या तुमच्या ऐश्वर्यात विठ्ठलरावांनी रक्त आटवलंय! मी पाहीलंय! अशा देवमाणसाचा हक्क डावलला तर पाप फेडावं लागेल! नको जास्त पण त्यांचा हिस्सा तर द्या!"
" लखा, त्यांनी रक्त आटवलंय तर तुझ्या मेव्हण्यानं त्याचा संसारही चालवला! तुझे मेव्हणे नसते तर यांना काय अक्कल होती रे! नुसतं बैलासारखं राबणं माहीत! अंगाची हुशारी होती म्हणून त्यांनी एवढं कमवलं!"
" आक्के! तोंड सांभाळ! माहेरच्या नावाला बट्टा लावू नको! ते कारखान्यात रात्रंदिवस बैलासारखे राबत राहिले, सण वार पाहिला नाही की कुठलीही हौसमौज नाही. मजुरांना आराम असायचा पण विठ्ठलरावांना नाही. तेव्हा कुठे दुकानात वेळच्या वेळी फर्नीचर पोहोचे. आमच्या मेव्हन्यांनी कधी पाचर तरी मारलीय का? नुसते आर्थीक व्यवहार पाहिलेत विठ्ठलरावांच्या कष्टावर. ते काही नाही त्यांची निम्मी वाटणी अर्जुनरावांना द्यायला लाव!"
" निम्मे नाही पण तिसरा हिस्सा द्यायला मी बांधील आहे!"
लखाजीस आपल्या बहिणीच्या स्वार्थीपणाची लाज वाटली व संताप ही. पण तिसरा हिस्सा का असेना त्यांना हायसं वाटलं.
खटाबाईनं जावयास पाच एकर द्यायला सांगितलं. पण अर्जुनरावांनी आताच वाद नको म्हणून हाॅटेलपासून थोड्या अंतरावरची हायवेला लागूनच असलेली तीनेक एकर हलकी जमीन खेळायला दिली. तीही चित्राच्याच नावावर होती. पण तात्पुरता वाद वाढत सासू बिथरायला नको म्हणून अर्जुनराव काही पावलं माघारी सरकले मोठी उडी घेण्यासाठी. त्या गडबडीत विठ्ठलरावांच्या नावावर करायचीय या सबबीवर त्यांनी यथावकाश खटाबाईच्या नावावरुन चित्रा व दुर्गाच्या नावावर करून घेतली.
अर्जुनराव व खटाबाईच्या वर्तणुकीनं लखाजी दुखावला गेला व त्यांनी चित्रार्जुन हाॅटेल सोडलं. विठ्ठलरावांना तीन एकर शेत खेळायला लावत त्यांनी आलेखला आपल्या सोबत घेत आपल्या कुटुंबासहीत शहाद्याला परतले.
विसेक वर्षाचा मिसरुड फुटू पाहणारा आपल्या चुलत भाच्याचं शिक्षण त्यांनी थांबवलं. आपल्या सोबत ते आलेखला स्वयंपाकासाठी नेऊ लागले. शहादा, तळोदा, नंदुरबार व खेतीया गुजरपट्टीत लग्नसमारंभात लखाजी भरपूर कमाई करू लागला. आलेखला सारा स्वयंपाक ते शिकवू लागले. विशेष मिठाई -मावा बर्फी, काजू कतली, श्रीखंड सारे सारे प्रकार लखाजी आलेखला शिकवू लागले. लग्न सराई आटोपली की दोन्ही जण आग्रा हाय वे वर ढाब्यावर स्वयंपाक करण्यासाठी जाऊ लागले.
" आलेख दोन तीन वर्ष मेहनत घे! सर्व शिक! मग मस्तपैकी चित्रार्जुन शेजारीच स्वत:चा ढाबा सुरू कर!" ते आलेखला पुढचा प्लॅन डोक्यात पढवू लागले.
लखाजीची एकुलती एक मुलगी सुलेखा आलेखच्याच वयाची. ती नर्सिंग करु लागली.
तापीच्या पुलाखालून जाणाऱ्या पावसाळ्यासोबत बरंच पाणी वाहून गेलं. भिमाचं फर्निचरचं दुकान हळूहळू बसू लागलं. येणाऱ्या गिऱ्हाईकास दुकानात आधीसारखं सामान मिळेना. कारखान्यात विठ्ठल रावांनी जाणं सोडलं व मजूराच्या कामात ढिलाई होऊ लागली. साहित्य वेळच्या वेळी तयार होईना. जे तयार होई त्यात फिनीशींग नसायची. पुढच्या तीन वर्षात तालुक्याचं दुकान बसलं.
दोन वर्षात आलेख स्वयंपाक शिकला. त्यानं व लखा मामानं मिळालेल्या तीन एकरात साधे पत्र्याचं शेड उभारत ढाबा सुरू केला. ढाब्यास मामाच्या परवानगीनं
'सुलेखालेख' नाव टाकलं. मामाची भागीदारी रहावी म्हणून मामाची मुलगी सुलेखा व स्वत:चं नाव एक करत 'सुलेखालेख' .
ढाबा साधाच पण हाय वे ला लागून. जवळ काही अंतरावर हाॅटेल चित्रार्जुन. सुरुवातीस तिकडची गर्दी वळवणं वा हाय वे वरची रहदारी थांबवत लक्ष आकर्षित करणं जड जाऊ लागलं.
आलेख दूर पर्यंत वास जाईल अशी खमंग फोडणी देत पदार्थ बनवू लागला. सातपुडा डोंगरातून ससे, पारवे, लाव आणत खास आकर्षण ठरवत शौकीन खवय्याला वळवू लागला. मध्यप्रदेशातून गुजरातेकडं जाणारे ट्रक ससे, लाव( तितर), पारवे खाण्यासाठी सुलेखालेखवर थांबायला सुरूवात झाली. लखा मामा व आलेखनं दोन तीन महिन्यातच ढाब्याकडं रहदारीचं लक्ष वेधलं.
प्रवाशी पन्नास शंभर किमीचा प्रवास लांबवत माठली जवळ करू लागले.
हाॅटेल चित्रार्जुन बंद पडण्याच्या मार्गाकडं जोरात अधोगती करू लागलं. भिमा, अर्जुनराव संतापले. अर्जुनरावांनी फर्निचरच्या दुकानावरुन भिमास हाॅटेलवर नेमत स्वत: सागबाऱ्यात राहू लागला.
अर्जुनरावांची चुलती शांताबाई आजारी पडल्या. त्यांना राधेश्याम हा एकटा मुलगा. तो इव्हेंट मॅनेजर म्हणून चांगला सेटल होता. सुरत, अंकलेश्वर, धुळे, जळगाव या शहरात वेगवेगळे इव्हेंट मॅनेज करत बक्कड कमाई करायचा, वेगवेगळे शो, राजकीय सभा, मेळावे, मोठमोठी लग्न आयोजन करायचा.अतिशय सुंदर, देखणा, रुबाबदार, उंचपुरा धिप्पाड देहयष्टीचा.
अर्जुनराव स्वत:ची व त्याचीही जमीन व इतर व्यवहार पाही.
शांताबाई बेडवर पडताच चित्रा व सासुबाई करवी लखाजीस विनवत अर्जुनरावांनी नुकतच नर्सिंग पुरं केलेल्या सुलेखास सागबाऱ्यास नेलं. सुलेखा आपल्या आतेबहिणीच्या सोबत राहत शांताबाईची सेवा करू लागली. पण तिचं मन सारखं माठलीकडं धाव घेई.
अर्जुनरावांनी लखाजीस काय जादू केली की काही तरी कुरापत केली पण लखाजी नाईलाजानं तयार होत सुलेखा व राधेशाम फर्डेच्या लग्नास तयार झाला. तसं राधेशामच्या स्थळात बोट घालता येईल नाव ठेवता येईल असं कारण नव्हतंच. बक्कड पैसा कमावणारा ,शेती असणारा ,एकटा, पहायला तर राजबिंडा गोरापान.
अर्जुनरावांनी काय भोवरी फिरवली देव जाणो ; पण लखाजीच्या मनात आलेख असतांना ते तयार झाले. लग्नात एक अनामिक अनिश्चीतता जाणवत होती. जणू राधेशाम ही या लग्नास तयार नसावा.सुलेखाला राधेशाम हवा की नको तेच कळेना पण आपण मागं काही तरी विसरतोय! काही तरी अनमोल मागे राहतंय या विचारचक्रातच ती आजारी शांताबाई साठी की वडिलांच्या इच्छेसाठी की राधेश्याम साठी पण ती लग्नास तयार झालीच. पण शहादे व माठली करांना लग्नात जेवणावर ताव देतांना कळेना की राधेश्याम व अर्जुनरावांनी एका किरकोळ आचाऱ्यांच्या मुलीस होकार दिलाच कसा? भरल्या पोटानं ढेकर देतांना ' कदाचित आपसी नातेसंबंध म्हणून होकार दिला असावा' अशी खाल्ल्या मिठाला जागत त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली.
आलेख मनातून उखडल्यागत ढाबा सांभाळू लागले. पण तीन महिन्यांत सुलेखा माठलीला परतली. व नंतर पारणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून लागली. त्यानंतर ती पारण्याला राहत माठलीला येई पण सागबाऱ्यात परतलीच नाही. आलेख पुन्हा खुशीनं ढाब्यावर झटू लागला. आता अर्जुनराव व त्याच्यात धूसफूस सुरूच होती. अर्जुनरावांनी चित्राच्या नावावरची ढाब्याची जमीन आलेखकडून परत घेण्याच्या कुरापती सुरू केल्या. पण माठलीतील लोकांचा विरोध, लखाजीची उघड उघड तंबी यानं अर्जुनराव पुन्हा थंडावले.
आषाढी अमावास्येला रात्री वऱ्हाडाकडून आलेली कंपनीतील पार्टी ढाब्यावर जेवणाला थांबली. पिणं सुरू झालं. स्टार्ट अप म्हणून लथपथ व फ्राय खात त्यांनी सशाची आर्डर दिली. ढाब्यात ससे नसल्यानं डोंगराच्या पायथ्याला एकानं रॅबीट फाॅर्म सुरू केलं होतं तेथून ससे आणण्यासाठी बाईकनं आलेख निघू लागला.
" आलेख, अमावास्या आहे आज व त्यात मरणाचा पाऊस कोसळतोय नको जाऊ! त्यांना ससे नाहीत सरळ सांग.दुसरी आॅर्डर देतील ते!"
" मामा, यू गेलो नी यू आलो.तेवढ्यात यांना स्टार्ट अप देत रहा!"
आलेख गेला एक तास दोन तास झाला तरी परतेना. पार्टीनं टेबलाची मोडतोड करत हुडदंग माजवला व बील न देताच राडा करत निघून गेले.
आज एक महिना होऊनही आलेख परतलाच नाही. ज्या दिवशी आलेख गेला त्याच दिवसापासून राधेश्याम ही गायब!
दोघांची शोधाशोध सुरूच पण ना राधेशामचा तपास; ना आलेखचा.
पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतायेत पण यश मिळत नाही.
.
.
.
विठ्ठलरावांच्या डोळ्यातून बसल्या बसल्या धारा ओघळू लागल्या. एकुलतं एक पोरगं कुठे असेल? कसा असेल?
केदारनाथा माझ्या आलेखला सुखी ठेव व लवकरात लवकर परत पाठव!
.
.
.
पण आलेख?
केदारनाथच्या मनात असतं तर बन्या व दिनूला रात्री लिंबाच्या झाडाजवळ पडलेल्या माणसाचं नाव आठवलंच असतं! त्यानं तर त्यांना निरोप द्यायला सुलेखालेख ढाब्यावर पाठलंच होतं!
पण सारं व्यर्थ!
क्रमशः