कालचक्र...
प्रकाशन:- दि. १२.०७.२०२१
©Ankush S. Navghare ®२०२१
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
.......रात्री 12 नंतर टेरेसवर थांबायची माझी कधीच हिम्मत झाली नाही, कारण तो अंधारा कोपरा हे होते. मी कुठेतरी ऐकलं होतं की रात्र होऊ लागली की वातावरणात मृताम्यांचा वावर सुरू होतो, 12 वाजे पर्यंत ते सौम्य असतात. पण असे म्हणतात की 12 वाजून गेल्या नंतर त्यांच्यात बदल घडू लागतात, ते जास्त आक्रमक होतात. ते जिवंत असताना कितीही चांगले व्यक्ती असले तरी मृत्यूनंतर त्यांची चर्या बदलते, कारण तेव्हा त्यांच्यात कित्येक जन्माचे संस्कार आलेले असतात. त्यात कुठल्या जन्मात ते वाईट वागत जगले असतील तर ते संस्कार पण मधून मधून त्यांच्यात उमटत असतात. म्हणून गेलेली व्यक्ती जरी आपली असली तरी मृत्यू नंतर ती आपली राहत नाही. त्यात मृत्यू आत्महत्या किंवा अजून वाईट पद्धतीने झालेला असेल तर आत्मा अजूनच असंतुष्ट असतो, रागावलेला किंवा खिन्न असतो. त्यामुळे त्याच्या पासून चार हात लांबच राहिले पाहिजे. म्हणून शक्यतो गरज नसतात रात्री अपरात्री एकट बाहेर राहणं टाळल पाहिजे. अशाच अत्म्यांचा काही लोक गैरफायदा घेत असतात. त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्याचे गाजर दाखऊन त्यांच्याकडून नको ती कामे करवून घेत असतात आणि शेवटी आपल्या बरोबर आपल्या पुढच्या सात पिढ्यांचा सर्वनाश ओढवून घेतात, पण स्वार्थापुढे त्यांना हे सर्व तेव्हा दिसत नसते.
........मी शक्यतो माझे बीसीनेस कॉल अटेंड करायला ऑफिस किंवा टेरेसवर जात असतो. ऑफिस घरापासून लांब असल्याने टेरेसवरच जाणे जास्त पसंद करतो. टेरेस वर शांतता असते, थंडावा असतो म्हणून तिथे बर वाटते. माझ्यासारखे बिल्डिंग मधले अजूनही काही लोक तिथे येत असतात, पण ते त्यांच्याच नादात असतात, माझ्याशी कोणी बोलत नाही म्हणून मी पण त्यांच्याशी बोलत नाही. मला तिथे आवडते म्हणून मी बराच वेळ तिथे थांबतो पण बाकीचे सर्व एक मर्यादित वेळे नंतर म्हणजे 10 इत्यादी वाजले की आपापल्या घरी जातात. पण माझे कॉल कधी कधी लांबत असल्याने मला 11 ही वाजतात. कित्येकदा जेवायचे नसले किंवा अस्वस्थ वाटत असले की मी 12 वाजेपर्यंत पण थांबतो आणि मग नेहमीप्रमाणे सावकाश घरी जातो. त्यादिवशी असाच मी जिन्याच्या दरवाजासमोर खुर्ची लावून बसलो असतात माझे लक्ष सारख उजव्या बाजूला असलेल्या कोपर्याकडे जात होतं. तो कोपरा माझा अत्यंत आवडता कोपरा आहे, ह्यापूर्वी पण कित्येकदा मी तासंतास त्या कोपऱ्यात उभं राहून कॉलवर बोललेलो आहे. पण रात्री शक्यतो मी तिकडे थांबत नाही कारण, त्या कोपर्याच्या शेवट पर्यंत ट्यूबलाईट चा प्रकाश पोहोचत नसल्याने तो कोपरा थोडासा अंधारलेलाच राहतो. आज का कोणास ठाऊक माझं लक्ष सारख त्या कोपर्याकडेच जात होतं. जेव्हा आपलं लक्ष सारख एखाद्या ठिकाणी जाते तेव्हा तिथे नक्कीच काहीतरी गडबड असते, हे मी कुठेतरी वाचलेलं असल्याने मला माहिती आहे. असच आपल्याला कोणीतरी पाहत आहे हे आपल्या बाह्य मनाला जरी कळत नसलं तरी अंतर्मनाला कळत असते, आणि अंतर्मनाला अंतचक्षु असल्याने सूक्ष्म जगात चाललेल्या हलचाली ते टिपत असते. असच मी तिथे बसलेलो असताना माझं लक्ष सारख त्या कोपऱ्यात जात होतं, त्यामुळे मी डिस्टर्ब होत होतो. कित्येकदा मी त्यादिशेने पाहिले पण मला काहीच दिसल नाही. फक्त आधारलेला तो कोपरा दिसत होता. मध्येच कुठेतरी लांबवर कुत्रे व्हीवळण्याचा आवाज ऐकू येत होता. आज नेहमीपेक्षा हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. मी घड्याळाकडे पाहिलं तर बारा वाजून 10 मिनिटे झाली होता. सहज म्हणूंन मोबाईल मध्ये पंचांग काढून पाहिलं तर पौर्णिमा चालू होऊन 4 तास उलटून गेले होते. पौर्णिमा अमावास्येला चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल जास्त असल्याने त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, रक्तावर आणि मनावर होत असतो आणि त्यामुळे काहींचे बीपी कमीजास्त होऊन त्यांना वेगवेगळे भास होण्याची शक्यता असते. 12 वाजून गेल्यामुळे वाटलं की आता घरी जायला हवं म्हणून मी उठलो, आणि जायला निघालो, पण परत कुतूहल म्हणून सहज एक नजर त्या कोपर्याकडे टाकली आणि तितक्यातच अचानक लाईट गेल्यामुळे चंद्र प्रकाशात मला जे दिसलं ते पाहून क्षणभर मला माझे शरीर थंड पडल्याचा भास झाला, हात पाय गळून गेलासारखे झाले, पण सुदैवाने हातात असलेल्या मोबाईलची लाईट सुरू केली आणि झपाझप पावले टाकत जिन्याच्या दिशेने निघालो. त्यानंतर परत मागे वळून पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही. कसाबसा धापा टाकत रूमवर आलो. पायातील त्राणच निघून गेले होते. आजवर अशा खूप गोष्टी ऐकल्या होत्या पण, कधी भीती वाटली नव्हती, पण म्हणतात ना की एकदम जवळून अशा गोष्टींचा सामना होतो तेव्हा माणूस कितीही धीट असो क्षणभर का होईना गर्भागळीत होतोच. घरी येऊन सोफ्यावर बसलो आणि सहज माझं लक्ष एक ठिकाणी गेलं आणि सर्व आठवणी मनपटलावर जमा झाल्या.
.......साधारण 10 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. बिल्डिंग मध्ये सर्वाना त्याच्या प्रेमाबद्दल माहिती होत. तो खूप हुशार, दिसायला देखणा आणि त्याने स्वतःच्या हिमतीवर व्यवसायात नाव कमावलं होत. ती मुलगी कोणी डॉक्टर आहे अशी कुजबुज होती. लवकरच ते लग्न करणार होते. त्याने स्वतःला आर्थिक दृष्टया सिद्ध केलेच होते. ती डॉक्टर असली तरी तो पण चांगला पैसे कमवत होता. म्हणजे स्वतःच्या कुटुंबाच पालनपोषण नक्कीच करू शकत होता. पण नंतर त्यांच्या नात्याला कोणाची नजर लागली माहीत नाही. सर्वकाही विस्कटल आणि एक दिवस दुःखाच्या भरात येऊन त्याने स्वतःला रूम मधेच कोंडून घेतलं होतं. दुसऱ्यादिवशी तो दरवाजा का उघडत नाही हे पहाण्यासाठी जेव्हा दरवाजा तोडाला तेव्हा त्याचे उघडे असलेले डोळे आणि वर गेलेली बुबुळे, बाहेर आलेली जीभ असा पंख्याच्या हुकला लटकलेला त्याचा मृतदेह पाहून सर्वांची बोबडीच वळली होती. पोस्ट मोरटोम मध्ये कळलं की त्याचा मृत्यू बरोबर 12 वाजून 30 मिनिटांनी झाला होता. त्या दिवसानंतर त्याचे इतर कुटुंबीय त्या बिल्डिंग मधून सर्वकाही विकून दुसऱ्या ठिकाणी राहायला निघून गेले होते, पण तो फ्लॅट मात्र तसाच पडून राहिला होता. काही लोक म्हणायचे की त्यांना तो तिथे दिसला होता, काही म्हणायचे की त्या फ्लॅटमधून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज यायचा. हे सर्व माहिती पडल्याने कित्येक वर्षे तो फ्लॅट कोणीही न घेतल्याने तसाच पडून आहे. पण मला मात्र असा कुठलाच अनुभव आजपर्यंत आलेला नाही.
.......मी सोफ्यावर बसून विचार करत होतो आणि त्याच्यासाठी हळहळत होतो. का त्याने इतकं टोकाच पाऊल उचलल असेल. जीवनात असे प्रसंग घडतात पण अस करायला नको होत. अचानक टेरेसवरचा प्रसंग डोळ्यासमोर आला, जो पाहून मला भीती वाटली होती. तो माझ्याकडेच पाहत होता. एकदम खिन्न चेहरा, त्यावर पाश्चातापाचे खोल भाव होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती. गाल खोल गेले होते आणि चेहर्यावर कमालीची अस्वस्थता होती. जणूकाही तो माझ्याकडे मदतीची याचना करत होता, जणूकाही मला ह्यातून मुक्त कर असे म्हणत होता, पण मी त्याला काय मदत करणार होतो, त्याला पाहुन मलाही खूप वाईट वाटत होते तसेच मध्येच अस्वस्थता आणि भीती पण वाटत होती. असे म्हणतात की आत्महत्या केलेल्या माणसाचा आत्मा परत परत त्याच वेळेच्या गतीत फिरत राहतो. त्याने केलेल्या त्या कृत्यातून त्याची कधीच सुटका होत नाही. जो पर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही तो पर्यंत त्या वेळेत ती घटना परत परत घडत राहते. तो त्याच वेळी रोज आत्महत्या करत राहतो. म्हणून अस करताना हजारदा विचार करायचा असतो, कारण पाहायला गेले तर जीवन खूप सुंदर आहे, अविचार सोडून आनंदाने जगता आले पाहिजे. जिवंत असताना इतर ऑपशन असतात पण मेल्यानंतर इतर काहीच ऑपशन नसल्याने आणि मरण ओढवून घेतल्याने देवाकडून मिळालेली शिक्षा म्हणून जो पर्यंत त्या आत्म्याची खरी मरणाची वेळ येत नाही तो पर्यंत तो भटकत तरी राहतो किंवा तीच क्रिया रोज रोज करत असह्य वेदना सहन करत राहतो. एक प्रकारच्या काळाच्या चक्रात तो अडकून पडतो. विचार करता करता परत सहज माझं लक्ष भिंतीवरल्या घड्याळा कडे गेले, 12 वाजून 29 मिनिटे झाली होती. स्टॅण्ड वरचे काहीतरी काढायचे म्हणून मी टेबलवर चढलो, आणि वर असलेल्या पंख्याच्या हुकला लावलेल्या दोऱ्यात माझी मान अडकवली आणि पायाखाली असलेले टेबल ढकलून दिले. मानेवर प्रचंड ताण आलेला, तिच्यातून कटकन आवाज आला, कदाचित एखादे हाड मोडले असावे असे वाटले, हळू हळू श्वास कोंडू लागला होता, नंतर जीव गुदमरला, शेवटी मला खूपच असह्य वेदना होऊ लागल्याने शेवटचा प्रयत्न म्हणून मी हातपाय झाडू लागलो. पण आता वेळ निघून गेली होती. काही वेळातच मला हवेत तरंगल्यासारख वाटू लागलं. माझा आत्मा हळूहळू हवेत विरघळत होता. मनात आले की आजच्यापुरते तरी मी ह्या न संपणाऱ्या असह्य वेदनेतून मुक्त झालोय. पण अजूनही प्रचंड भय आहे कारण उद्या परत ह्याच प्रसंगातून मला जावे लागणार आहे. धन्यवाद..
...अंकुश सू. नवघरे.