सुलेखालेख - भाग ::--दहावा
गडचिरोली ला हजर होऊन सुधीर नेहेते ड्युटीवर आठ दिवस थांबले. मग जालन्याला परतले.
" सुधीर, नोकरी म्हटली की असले चढ उतार येत राहणार. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच व आखलेल्या योजनेसारखीच झाली तर जीवनात आवाहन, आव्हान राहत नाही. तुझी अजून तर सुरुवात आहे पोरा!"
" पापा, एवढी जीव तोडून मेहनत घेऊन प्रामाणिक वागूनही डिपार्टमेंट नं कदर करु नये याचीच सल वाटते!"
" झालं त्यावर जास्त विचार करत एनर्जी वाया घालवू नको! आपलं मन जर आपण योग्य होतो अशी ग्वाही देत असेल तर जगाचा मुळीच विचार करू नये! पण हो; तूर्तास तुझी आई सांगतेय त्यावर मात्र नक्कीच विचार कर! कारण जिवनातल्या प्रत्येक बाबीचं योग्य वय व टप्पा असतो! ते जर निघून गेलं तर मग त्या त्या टप्प्यावर उपभोगावयाचा आनंद निघून जातो!"
"........" सुधीरनं वडिलांना काय सांगायचंय हे ओळखलं व काहीच बोलला नाही.
लग्नाबाबत आई जरी तगादा लावत होती पण वडीलांनी त्याला अजून पर्यंत तरी कधीच फोर्स केला नव्हता. म्हणून सुधीर खाली मान घालू लागला. तो विचारात हरवला.त्याच्या आतलं लेणी शिल्प त्याच्या नजरेसमोर तरळू लागलं. कसं असतं? काही गोष्टी आपल्या मागं लागतात तेव्हा आपण पुढे पळतो तर कधी आपणास दुसऱ्याच गोष्टी हव्या असतात. त्या मिळतील याची शक्यता नसतांनाही आपण जीव तोडून त्या गोष्टीमागं पळत राहतो. पळवणं- पळत राहणं, झुरवणं - झुरत राहणं यालाच जीवन म्हणावं का?
माठलीत तसा त्याचा सामान नसल्यागतच होता. तो आणण्यासाठी जाण्यात अर्थच नव्हता. पण त्या निमीत्तानं तरी आपल्या जवळच्या माणसांना भेटता येईल, दूर पळणाऱ्या गोष्टी, मुठीत येऊ न पाहणाऱ्या गोष्टी सापडतात का! ते ही पाहता येईल; म्हणून तो निघाला. कारण अर्जुनराव अपघात प्रकरण नंतर दुसऱ्या दिवशीच मि. गावंडेंनी चार्ज घेतल्यामुळे स्वाभिमानास ठेच पोहोचल्यानं सुधीर कुणालाच न भेटता सरळ नवीन बदली झालेल्या ठिकाणी - गडचिरोलीस निघून गेला होता. पण आता त्याला साऱ्यांना एक वेळा भेटावं वाटत होतं! त्यातल्या त्यात आतून काही तरी निसटत चाललंय ही बोचरी सल ऊरात खिळा ठोकत होती म्हणून तो कन्नडचा घाट उतरत माठलीस आला.
"मि. नेहेते! एवढ्या कमी वयात, कसलाही अनुभव नसतांना आलेख- राधेशाम केस आपण ज्या पद्धतीनं हाताळली त्यावर तर मी फिदाच झालोय! आल्यापासून मी पूर्ण फाईल स्टडी केलीय! प्रत्येक निर्णय लाजवाब! तुमच्या जागी मी स्वत: असतो तरी मला तुमच्यासारखी केस साॅल करता आलीच नसती, हे नक्की! पण मला एक बाब समजत नाही की कसलेच धागेदोरे नसतांना समन्या दमन्यास पकडत आपण केसच्या मुळाशी पोहोचलात व नंतर जावेद बाबुच्या मदती नंतरही न जुळणारी कडी बरोबर कडी जुळवली. पण इतका हुशार माणूस घाटातून समन्या, धमन्या, भिमा पळून जातात तोवर गाफील राहतोच कसा? याच ठिकाणी माझी मती कुंठीत होते! का?.....का? घाटात कुचराई का? जर घाटात नेहमीसारखीच निर्णय क्षमता दाखवली असती तर केस सुटल्यागतच होती!" मि. गावंडे नेहेतेस चहा देत विचारू लागले.
सुधीरला नव्यानं आलेले गावंडे माणूस भला वाटला. एरवी त्यानं आॅफीसच्या शिंदे व कदम यांना सुलेखालेख वरच भेटत निघायचं ठरवलं होतं. पण तो आल्याचं कळताच गावंडेंनी आवर्जून आग्रहानं बोलवत भेट घेतली होती.
" मि. गावंडे ! आपण माझ्यापेक्षा वयानं, अनुभवानं थोर आहात! आपण निश्चीतच अनेक पावसाळे अनुभवले असतील! त्यामानानं आमची तर सुरुवात आहे! पण एक निश्चीत, की नियतीच्या न्याय व्यवस्थेला मानवी न्यायव्यवस्थेवर भरवसा नसावा! कदाचित त्यामुळेच यश मिळवून ही डिपार्टमेंटला आमचं यश दिसलं नाही !"
" मि. नेहेते मला समजलं नाही!"
" मि. गावंडे, जाऊ द्या झाल्या गोष्टी आता पुन्हा घडणे सुधरणे नाही! डिपार्टमेंटच्या दृष्टीनं आम्ही चुकलो. झाल्या चुकातून आम्ही बोध घेऊ!"
.
.
सुधीरला घाटातील अकराच्या सुमारातील उंच पुरा धिप्पाड किन्नर आठवला! "साहब आदमी पुरी जिंदगी दो गज जमी के लिए भागता है!",
"साहब उनको भागने दो, तुम उनके पिछे मत भागो!" ही त्याची वाक्ये आठवली. त्यावेळेस त्यांच्यावर गोळी झाडावी इतका संताप आला. पण आतून लहानपणीचे आईचे बोल आठवले.
" सुधीर , किन्नरावर आधीच देवानं अन्याय केला असतो! म्हणून ते कसे ही वागलेत तरी आपण तरी त्यांना दुखवू नये! त्याची हाय ( बददुवा) चांगली नसते बाळा!"
आईची ही शिकवण आठवली व आपण सारा संताप जिरवत
'समन्या दमन्या पळून पळून कुठपर्यंत पळतील! आपण लगेच त्यांना दबोचूच!' या आत्मविश्वासानं आपण थोडी ढिलाई केली. दुसरी बाब म्हणजे केस संदर्भात आपण ज्या वेळेस दुर्गाबाईस भेटलो होतो तेव्हा दुर्गाबाईनं ही भिमाकरवी ऐकलेला त्याच्या कुळाचा शाप सांगितलेला होता. श्रीपती फर्डेचं एका किन्नरास ओसरीवरुन ढकलणं व मारणं व त्यानं तळतळत शाप देणं...हे सारं त्यावेळी आठवलं व क्षणासाठी आपण कर्तव्यावर असतांनाही मानवी संवेदनानं घुटमळलो. पण जे झालं ते योग्यच! कारण ते किन्नर नर्मदा परिक्रमा करतांना रस्ता चुकत घाटात येणं यात नियती असावी. आपण स्वत:, शिंदे कदम , सावंत, किणीकर या साऱ्यांना अपघातातून वाचवण्यासाठी अलग करण्यासाठीच ती सारी व्यवस्था असावी की काय? पण सुधीर नेहेतेंनी बाकी सर्व मनात ठेवलं. कायदा व्यवस्था, प्रशासनास या बाबी गौण असतात.
" गावंडे साहेब ती एक घटना होती व घडून गेली!"
नेहेतेंनी निरोप घेतला. जवळ थांबलेल्या शिंदे, कदमला मात्र भरून आलं. कारण आतापर्यंत नेहेतेसारखा देवमाणूस त्यांना भेटलाच नव्हता. शिंदेस घेत ते सुलेखालेख ढाब्यावर आले. ढाब्याच्या नावाच्या पाटीवरचा 'लेख' उखडत खाली लटकत होता. फक्त सुलेखा नावच जागेवर दिसत होतं. विठ्ठल उमाळे हल्ली ढाब्यावर येतच नव्हते. लखाजी धावतच बाहेर येत " साहेब या! केव्हा आलात?" म्हणत साहेबास मध्ये बोलवू लागले.
" लखाजीराव, आजच आलो.बदली झाली म्हणून सहज भेटायला आलो! मागच्या तीन चार महिन्यात केस निकालात काढण्यासाठी नाहक तुम्हा साऱ्यांना संशयाच्या भोवऱ्यात आरोपी म्हणून पाहत नाहक त्रास झालाय.म्हणून आता सारं साफ झाल्यावर भेटत मनातल मळ निघावा म्हणून..."
" नाही साहेब! उलट आपण होता म्हणून ....." निंबाळेंनी आपलेच दात आपलेच ओठ..म्हणून मनात असुनही बोलण्याचं टाळलं पण आतून साहेबांविषयी पूर्ण कृतज्ञतेचे भाव उमडत होते.
शिंदे ढाब्यात नजर दौडवत पाहत होता. आधी आलेख असतांना तो बऱ्याचदा ढाब्यावर येई. आलेख असतांना ढाब्यावर सतत राबता राही. सतत फोडणीचा खमंग वास, गलबला राही. पण आता सारीच रोनक गेली होती. कोपऱ्यात ठेवलेल्या बाजरी गव्हाच्या पोत्यात उंदरं फिरत होती. कांद्याच्या गोणीतून हिरवी पात डोकावत होती. काऊंटरवरही धूळीचं साम्राज्य पसरल्यागत दिसत होतं. शिंदेसही भरून आलं. हाडाचा स्वयंपाकी असुनही आलेखच्या जाण्यानं लखाजीही खचला होता हे लगेच जाणवत होतं.
" लखाजीराव एक वैयक्तीक विचारायचं होतं तुम्हाला?"
" विचारा साहेब!"
" अर्थात पटलं नाही तर स्पष्ट सांगत विषय इथच संपवा!"
" साहेब विचारा!"
" आलेख राधेशामचं वाईट झालं. त्याबाबत अतीव दुःख आहेच. पण घडणाऱ्या घटना विसरायच्या असतात, हे मी तुम्हास समजावणं उचीत नाही. तरी पण सुलेखा बाबत काय ठरवलंय?" विचारतांना मात्र गुन्हेगाराच्या छातीत धडकी भरवणाऱ्या सुधीरच्या छातीतच धडकी भरली.
" साहेब मनातलं बोललात आपण! विनंती करतो आपणास, आपणच जर सुलेखाला समजवलं तर? चला घरी विठ्ठल दाजींना ही भेटा व सुलेखासही चार समजुतीच्या गोष्टी सांगा" लखाजी निंबाळे बोलले पण सुधीरचीच गोची झाली. विषय पुढे सरकवणं त्याच्या जिवावर येऊ लागलं. पण निंबाळे समजला व मनात दु:खाची छटा छटत पोरीच्या भवितव्याबाबत आशेचे किरण दिसू लागले.
लखाजीनं शिंदे व साहेबांना घरीच नेलं. सुलेखा रजा वाढवत माठलीलाच थांबली होती. साहेबांना घराच्या पायऱ्या चढतांना पाहताच विठ्ठलराव थरथरले.
" बाबा, घाबरु नका! आज मी कुणी साहेब म्हणून नाही तर माणुसकीच्या नात्यानं भेटायला आलोय!"
विठ्ठलरावाच्या डोळ्यात आसवाची दाटी झाली. ते बसल्या जागी गदगदू लागले. नेहेतेंनी विठ्ठलरावांच्या खांद्यावर हात ठेवत मायेचा आधार व भरोसा दिला.
" बाबा, आलेखच्या जाण्यानं आपण सर्वस्व गमावलंय. ते दु:खं कधीच भरणारं नाही. पण निदान आलेखला न्याय मिळाला हे ही तितकंच....! कधीही गरज भासली तर आलेखच्या जागी नक्कीच आठवा! हा सुधीर धावत येईलच! " सुधीरला ही भरून आलं व पुढे बोलणं अवघड झालं.
घरातून मथुरा बाईनं चहा आणला. चहा घेतल्यावर सुधीर धडधडत्या छातीनं सुलेखास भेटला. शिंदे विठ्ठलराव लखाजी सारे बाहेर थांबले. घरात फक्त मथुराबाई व सुलेखा.
एरवी वर्दीतल्या सुधीर साहेबासमोर सारेच लटपटत. आज सुधीरनं पांढरी पॅण्ट त्यावर काॅटनच काळं शर्ट घातलं होतं. सुधीरला पाहत सुलेखा घरातून उठत मागच्या दारी जाऊ लागली.
" सुलेखा मॅडम! थांबा थोडं! आपणाशीच बोलायचंय!"
सुलेखास वाटलं.सारं निस्तरल्यावर, संपल्यावर आणखी नवीन काय तपास बाकी राहिला?
"सुलेखाच्या रडून रडून लाल झालेल्या नजरेनं सुधीरवर कटाक्ष टाकला.
लेणीशिल्पावर नजर खिळवत पाहतच रहावं असं कायम वाटत असतांना आताच्या धारदार नजरेनं मात्र सुधीरचीच नजर खाली झुकली.
" सुलेखा मॅडम, माझ्या परीनं केस संदर्भात जे शक्य होतं तेवढं मी केलं. शल्य एकच राहिल की मी आलेख वा राधेशामला परत नाही आणू शकलो! ते जर शक्य असतं तर ते ही नक्कीच केलं असतं. पण प्रारब्ध, प्राक्तन वा नियती या ही काही बाबी असतात. त्याच्यापुढं कोणत्याच देशाची कायदाव्यवस्था लुडबुड करू शकत नाही!"
" साहेब, आपण जे केलं तेच आमच्यासाठी भरपूर आहे. पण तरी तुमच्याकडून एक आस सतत होती. काही ही करून कसं ही करून साहेब आलेखला शोधतीलच. अजुनही भास होतो की आपण कुठून तरी आलेखला परत आणणार! मन मोठं विचीत्र असतं माणसाचं! ते जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करते व जे संपलंय त्याला मिळवण्यासाठी वेड्यासारखं धावत राहत!" सुलेखा शून्य नजरेनं पाहत काळजातलं दु:खं बाहेर काढत होती.
" माफ खरा मॅडम! मी ही एक माणूस आहे व मलाही मर्यादा आहेत!"
" नाही साहेब, आपण होता म्हणून निभावलं! तुमचे तर उपकार आहेत आमच्या साऱ्यावर!"
साहेबानं संशयीत आरोपी म्हणून बोलवलं पण त्याच्यात उपजत शक्ती होती की काय कोण खरं बोलतोय व कोण खोटं बोलतोय हे लगेच ओळखत ते निरपराध माणसास लगेच आदर देत सन्मानानं वागवत व खोटं बोलणाऱ्याची गय करत नसत. म्हणून दोन तीन वेळा संशयाची सुई सुलेखा, लखाजीवर फिरत असतांनाही खात्री पटताच त्यांनी त्यांना कधीच त्रास दिला नाही. तर अर्जुनराव भिमा आडदांड व आर्थिक दृष्ट्या गबर असतांनाही खात्री होताच त्यांची गय केली नाही. हे सुलेखा जाणून होती.
" मॅडम एक विचारू?"
"..............?"
" जे झालं ते विसरता नाही का येणार!" सुधीरची धडधड कमाल पातळी गाठू लागली.
"तोच फुका प्रयत्न आम्ही रात्रंदिवस करतोय साहेब! पण एखाद्याला श्वास घ्यायचं विसरायला सांगणं जेवढं सोपं तेवढं श्वास घेणं विसरणं सोपं असतं का?"
" सुलेखा.....ऐक....भूतकाळाची किनार दुखरी असली तरी भविष्यकाळ हसरा करणं हे आपल्या हातात असतं!"
' सुलेखा.....!' आपणास भास झाला असावा. आपण आलेखशिवाय दुसऱ्या गोष्टीचा विचार करत नाही म्हणून भास.
" सुलेखा! आलेख परत येणार नाही! विठ्ठल बाबा, लखाजीराव तरी सारं दु:खं विसरत भविष्याकडं पहायला लागलेत! तसा तु ही विचार कर!"
आता तिची खात्री झाली. ती थरथरली. साहेबाच्या नजरेत नजर देत ती विचारती झाली.
" नेमकं काय करावं मी साहेब?"
सुधीर आता गडबडला.
" कुठल्याही दुखावर काळ हे एक मोठं औषध आहे. काळाबरोबर चालत तु ही ....."
सुलेखाचा संयमाचा बांध फुटला. ती आक्रोशू लागली. ते पाहून सुधीर घाबरला.
" मॅडम, मी लखाजीरावाची इच्छा व्यक्त करून दाखवली. बाकी आपणास जे योग्य वाटेल ते ठरवण्यास स्वतंत्र आहात! तुमच्यावर मी निर्णय लादणार नाही!"
परत फिरलेल्या साहेबाची तिला किव वाटली.
सुधीर उठला. एखादा माणूस एखाद्याच्या काळजात इतकं खोल बसण्यासाठी काय करत असेल! आपण अभ्यासाचा भार वाहण्यातच तारुण्य घालवलं. त्या जोरावर आयुष्यात भरपूर मिळवलं पण सर्वच नाही मिळवता येत त्यावर ही उणीव सुधीरच्या अहमतेस आज कुरतडायला लागली.
निरोप घेतांना न राहवून तो हात जोडत बोललाच
" लखाजीराव, दोन वर्षांपासून भरपूर स्थळं पाहिली. पण मन मानेना. मन पहिल्यांदाच आपल्या गावात रमलं होतं,मानलं होतं. पहा सुलेखा आलेख ला विसरली तर!" त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं.
माठलीतून निघतांना आतून खोलखोल काही तरी कुरतडलं जाण्याची जिवघेणी वेदना सोबत घेत सुधीर परतू लागला. एखाद्या गावाशी , माणसाशी कसा ऋणानुबंध जुळेल याचा नेम नसतो. काळजात बसलेला गाव उजाळणं काय असतं, ते तो आज अनुभवत होता. अंतरातलं कुणी दुरावणं वा निसटणं याची जाणीवच जास्त वेदनादायी असते. ती व्यक्ती दुरावली या पेक्षा ही!
सुधीरनं आईस आता मी सांगितल्याशिवाय एक ही बायोडाटा पाठवायचा नाही हे डोळ्यात आसवं आणत विनवलं व तो गडचिरोलीस निघून गेला. आई हादरलीच.
दिवसा कामात त्याला विसर पडे पण रात्री लेणी शिल्पाचं पावित्र्य, नितांत सुंदर सहजता आठवली की जन्मच फुकाचा वाटे. दिवसेंदिवस त्याची हालत बिकट होऊ लागली. त्यामुळे तो आपलं मन अधिकच कामात गुंतवू लागला. साऱ्या पेडींग केसेस तो उलगडू लागला.
सुलेखा माठलीहून रजा संपताच पारण्याला आली. आलेख, राधेश्याम, आलेख, वलय फिरू लागलं. त्यात अर्जुन..मध्येच .... पण वर्तुळात त्याला स्थान कुठेच नव्हतं. राधेशाम ही परीघाबाहेरील बिंदूगतच राहिला.
.
.
अरे हा नवीन कोण! केंद्रबिंदू बनू पाहतोय व त्रिज्या कितीही कमी जास्त केली तरी परीघ पूर्ण होत नवनवीन वर्तुळ बनवतोय! नवनव्या मापाच्या परिघाचं वर्तुळ पण केद्रबिंदू तोच. तोच केंद्रबिंदू खोडूयात आपण!
ढाब्याच्या फलकावरचा 'लेख' निखळला तरी मनातला आलेख कधीच निखळणार नाही!
सुलेखालेख वेगळं कुणी करुच शकत नाही. पण हा पुन्हा पुन्हा येईलच मग?
'नैनम छिंदन्ती शस्त्राणी....!' आमचे आत्मे एक आहेत....
आज दवाखान्यात महाजन डाॅक्टर एकटे जागत होते. रात्रीचे बारा वाजले असतील. बाहेर अंधारात पौषाची थंडी जणू कुडकुडत होती. आरोग्य केंद्रात एकदम सामसूम. दवाखान्यात अॅडमीट केसेसही नव्हत्या. त्यांचं समोरच्या लिंबाच्या झाडाकडं लक्ष गेलं. कुटुंब नियोजनासाठी केसेस येत. लहान बाळासाठी झाडाला सतत झोका बांधलेला असायचा. तो झोकाच दिसत नव्हता. आता आताशी तर होता. मग आताच कुणी सोडला? महाजन डाॅक्टरांना ड्युटीवर कधीच झोप येत नसे. पण आज गुंगी दाटू लागली. तोच एकच हाका ऐकू येऊ लागल्या.
बाहेर कुणी तरी अनोळखी माणूस जिवांचा आकांत करत डाॅक्टरांना उठवत होता.
" डाॅक्टर साहेब! डाॅक्टर साहेब उठा! लवकर उठा! सुलेखाला वाचवा! क्वाॅटर्सकडे चला!"
महाजन एकदम उठले तोवर तो माणूस जोरात सुलेखाच्या क्वाॅटरकडे धावू लागला. माणूस अनोळखी. महाजन डाॅक्टर गुंगीतच उठले व धावत सुटले. सुलेखाला काय झालं? सुलेखाचा दरवाजा उघडाच. हाॅलच्या पंख्याच्या हूकलाच लिंबाच्या झाडावरच्या झुकत्या डहाळीवरील झोक्याची दोरी.....सुलेखा लाथा झटकतेय! महाजन डाॅक्टरांनी एकच आरोळी मारत सारं केंद्रच काय पण तापीकाठ थरथरवला.
त्यांनी सुलेखास कमरेपासून वर उचललं. पण दोरीचा पक्का बसलेला फास ढिला होईना!
बोलवायला आलेला माणूस जवळच उभा. महाजन डाॅक्टरांनी त्याच्याकडं संतापात ओरडत " मूर्खा बघत काय उभा राहिलास ! पडलेल्या स्टुलावर उभा राहत गळ्यातला फास ढिला कर!"
पण तो माणूस नुसता आकांत करत होता पण मदतीला पुढे येईना. महाजनानी जोरजोरात आरोळ्या मारल्यामुळं इतर सहकारी झोपेतून उठत आले. साऱ्यांनी सुलेखाचा फास ढिला करत उतरवलं. लगेच दवाखान्यात आणत उपचार सुरू केले. तेथून तात्काळ धुळ्याला हलवलं. काही सेकंद जरी उशीर झाला असता तरी सुलेखा परतली नसती. पाच सहा दिवसात सुलेखास डिस्जार्च मिळाला. शिंदेनं सुधीर साहेबांना कळवलं. सुधीर आईस घेत लगोलग माठलीस आला. सुलेखा महामुश्किलीनं बचावली. महाजन डाॅक्टरांनी धुळ्याहून तिला माठलीस परत आणलं. विठ्ठलरावांच्या घरी येताच महाजन डाॅक्टरांचं आलेखच्या फोटोवर लक्ष गेलं. त्यांनी मेंदूवर ताण देत आठवलं. तसं ते आलेखचं कळलं तेव्हा आले होतेच. पण फोटोतला आलेख विसरले होते. आता मात्र त्यांच्या मेंदूच्या घड्या विस्कटल्या जाऊ लागल्या.
त्या दिवशी दवाखान्यात आपल्याला गुंगी लागत असतांना बोलवणारा हाच! धावत धावत क्वाॅटरवर नेणारा हाच! आपण सुलेखास वर उचललं व समोर उभ्या असलेल्या याला फास काढण्यासाठी किती आकांत करत बोलवत होतो आपण ! पण तोच आक्रोश करत आपला नाईलाज असल्याचच दर्शवत होता! पण नंतर इतर आले व हा गायब! नंतर उपचाराच्या गडबडीत आपण विसरलोच! म्हणजे सुलेखाला वाचवणारा हाच! का आपणास भास झाला असावा! झोप, स्वप्न, भास आभास हा मानवी मनाचा खेळ! पण झोपेतही सिक्थ सेन्स काम करत असल्यागत आपणास काही तरी जाणवलंय! महाजन अचंब्यात पडले! सिक्थ सेन्स खरा की सुलेखाला वाचवण्यासाठी आलेला तो खरा? मती कुंठीत!
महाजन डाॅक्टराचा स्वत:वरच विश्वास बसेना. तोच सुधीर नेहेते आले. सुलेखानं नेहेते साहेबास पाहिलं व आपली नजर अपराधी भावनेनं चोरली. झोपेत आत्महत्या करायला लावणारा किन्नर आठवला!
झोपेतच जीव तोडून समजावणारा आलेख ही आठवला.
सुलेखा तू जेथे पाहशील तेथे मी आहे! माझ्यात मी! तुझ्यात मी! तू पाहशील त्याच्यात मी!
पण तरी झोपेच्या साम्राज्यात किन्नरानं मती गुंगवत आपल्यावर विजय मिळवलाच व आपण तो निर्णय घेतला.
सुलेखाला भिंतीजवळ उभा राहत भरल्या डोळ्यांनी पाहणारा सुधीर दिसला. ' तू ज्याच्यात पाहशील त्याच्यात मी!'
सुलेखानं सुधीरला जवळ बोलावलं.
" साहेब! उज्वल भविष्य दाखवतांना कुणाच्या साथीनं जगायचं ते मोकळं कधी सांगणार?"
" सुलेखा, ते सांगायचं नसतं! ओळखायचं असतं वा जाणायचं असतं!"
सुलेखानं सुधीरला बिलगत आलेख! आलेख म्हणत हंबरडा फोडला!
दुर्गाबाईनं आपल्या आईस समजावलं व निम्मे जमीन विठ्ठलरावांच्या नावे केली.
" पोरी ,आता ही माती घेऊन मी माती खाणार नाही. माझा आलेखच नाही तर.....!"
पण म्हातारपणाचा आधार म्हणून व दुर्गाबाई व खटाबाईस मनास समाधान वाटावं म्हणून सुधीर व महाजन डाॅक्टरांनी विठ्ठलरावांना समजावलं.
सुधीरनं ढाब्याचा फलकावरील सुलेखालेख नाव नवीन तयार करत ढाब्यास नवीन रुप दिलं व तो सुसज्ज ढाबा लखाजी व विठ्ठलरावाकडं सोपवला.
वऱ्हाडाकडील सहलीची ट्रव्हल्स रात्री अकराच्या सुमारास ढाब्यासमोर उभी राहिली.
" बाबा, आम्हाला हसे खायचेत! काहीही करा!"
" माफ करा शाकाहारी काहीही मिळेल पण मांसाहारीचा आग्रह धराल तर पुढचा ढाबा पहा! आमचा ढाबा बंद करण्याची वेळ झाली."
ढाब्यासमोरील बागेत त्या दिवसापासून ससे कबुतरे मुक्त विहारू लागले.
समाप्त.