सुलेखालेख भाग ::-- पहिला
वा.....पा..............
श्रावण अमावास्येची जिकडे-तिकडे धूम होती. गावोगावी बैल पोळा धूम धडाक्यात साजरा होतांना दिसत होता. पडत्या पावसात रात उतरली तसा ड्रायव्हर बन्यानं आपल्या गाडीचा वेग वाढवला. वऱ्हाडातून निघालेली गाडी गुजरातेकडे सरकत होती. स्टॅच्यू आॅफ युनिटी पाहण्यासाठी आठ नऊ पोरांचं टोळकं सुमोनं दिवसभर प्रवास करत होतं.
" गण्या, आता पोटात कावळे ओरडायला लागलेत! एखादा ढाबा पहा!"
" दिनू ,आज तर सुरुवात झालीय ! इतक्यात बाहेरचं जेवण नको! आठ दहा दिवस फिरायचंय! आधी सोबतीचा सिधा आटा आणलाय तर तोच संपवू! मस्त एखाद्या ठिकाणी गाडी थांबवू व खिचडी शिजवू"
" गण्या, काय ती ती खिचडी खातोय! फक्कड काही तरी बनवू"
तोच समोर सुलेमान चिकन सेंटरचा फलक रस्त्यावरच्या झोपडीला दिसला. गाडी थांबवत जिवंत गावठी कोंबडं घेतलं.
" चला, एखाद्या ठिकाणी पुलाव बनवू!"
" अरे आज तर पोळा आहे व बाहेर कमालीचा पाऊस! मग?"
" तू सोबत आणलेलं फरसाण खा! बाकी कुठे व कसं बनवायचं ते आमचं आम्ही बघू!" गणानं सुमीतला डिवचलं.
" गणा मागच्या महिन्यात कंपनीची गाडी आणली होती तेव्हा इथंच कुठं तरी ढाब्यावर थांबलो होतो ,आठवतं का? त्या पोरानं मस्त स्टार्ट अप दिलं होतं.पण टल्ली होऊन नंतर त्याला ससे आणायला पाठवले होते पण तो आला नाही म्हणून संतापात राडा करून बील न देताच कल्टी मारली होती आठवतं का?"
" मग काय विचार आहे तुझा? जायचं तिथं पुन्हा मार खायला?" गणा दिनूवर हसू लागला.
पावसाचा जोर कमी होऊ लागला तसा बाहेर अमावास्येचा काळाकुट्ट अंधार फोफावू लागला .अंकलेश्वर बऱ्हाणपूर हाय वे वरची तुरळक वाहतूक फक्त. एखादं वाहन पास होतांना थोडा प्रकाश दिसे बाकी त्याच्या गाडीचा प्रकाश फिकाच वाटे.
सातपुड्यातून वाहत येत तापीला मिळणारे नाले तट्ट फुगत आडवे येत होते. रस्त्याची तर पावसानं चाळण झालेली. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता तेच कळेना.
"बन्या, गाडी थांबव व मागे घे ! मागं रस्त्यालगत मळा दिसतोय व पत्र्याचं शेड व लाईटही दिसतोय"
" गण्या पहाडी इलाखा आहे, सांभाळ! नाही तरं पुढे एखादा ढाबा पाहू!"
गण्यानं तिकडे दुर्लक्ष करत बन्या ड्रायव्हर व तो उतरत शेडवर आले. एक बाबा जवळच्या बैलांना वैरण घालत होता. बैलांना रंग, गोंडे, झूलीनं सजवलेलं दिसत होतं.
" बाबा, आम्हास इथं जेवण बनवायचंय! होईल का सोय?"
" सोय तर सर्व आहे पहा तुम्हास हरकत नसेल तर!"
पोरांनी गाडीवरची ताडपत्री खोलत स्टोव्ह, पातेलं व सिधा आटा पटापट उतरवला. म्हाताऱ्यानं शेडमधल्या चुलीजवळ झोपडीतली सुकी लाकडं आणली, पाण्याचा हंडा भरून दिला. गणानं सोबत आणलेलं कोंबडं बाबालाच फटकारायला लावलं. तोवर काहींनी चूल पेटवत तयारी केली. कोंबडं फटकारून म्हाताऱ्यानं शेतात अंधारात चाचपडत कांदे, मुळे, कोथंबीर उपटून आणली व तो गावाकडं परतू लागला.
" बाबा, तुम्हीपण जेवा आमच्या सोबत!"
" नाही, आज पोळ्याचं घरूनच जेवण करून आलोय! चालू द्या तुम्ही! रात्री इथंच झोपा व सकाळी निघा हवंतर!" म्हणत म्हातारा निघून गेला.
पुलाव शिजायला टाकला तोवर काहींनी सोबत आणलेल्या पार्सलनं प्रोग्राम सुरु केलेला. गणा, सुमीत, दिनू, बाल्या थोडी थोडी रिचवू लागले. मुळा कांदे संपू लागले. ड्रायव्हरला रात्री गाडी चालवायची असल्यानं त्यानं गाडीतच ताणून दिलेली.
पुलाव शिजतोय तोवर अकरा वाजायला आले.
बाहेर पावसाचा जोर पोटातल्या भुकेपेक्षा ही सपाटून वाढलेला. हाय वे वर वाहतूक बिलकूल बंद झाल्यागतच. अंधार धुमारे फुटल्यागत वाढलेला. रातकिडे पावसाच्या आवाजासोबत जुगलबंदी लावत आवाज टिपेला पोहोचवत होते. चुलीतला विस्तव आता काजळी पांघरत सुस्तावू लागला. पुलावचा वास टल्ली झालेल्यांच्या जिभा पान्हाळू लागला.
" दिन्या लेका, बाहेर फिरायला निघणं म्हणजे नुसतं स्पाॅट पाहणंच नसतं! मोकळ्या आकाशाखाली मनसोक्त आनंद लुटणं, पिणं खाणं धमाल करणं यात खरा..."
" गणा, मग मी कुठं काय म्हणतोय?"
" तसं नाही रे! पण तू पोळा असल्याचं सांगत होता? अरे हेच जेवण ढाब्यावर ही करता आलं असतं ,पण असल्या नवख्या ठिकाणी स्वत: करून खाण्यात तर खरी मजा आहे!" गणाची गाडी फुल्ल मोसम पकडत घाट चढत होती.
" गणा, तुला चढायला लागलीय! मी नाही रे सुमीत सांगत होता"
दोन तीन मुलांनी पुलाव काढत चाखण्याला आणला व पुन्हा आवडीनुसार किंगफिशर, आर सी फुटू लागल्या. वास आता जास्तच घुमला.
उत्तरेकडून सातपुडा पर्वतरांगेतून
' टिटिव टिव! टिटिटिव sss टिव...!' आवाज हायवेकडं सरकू लागला.
दिन्या त्या आवाजानं थरकला. तो लिमीटमध्येच होता. तो उठला व बैठकीत मध्ये सरकला. साऱ्यांचे डोळे तांबारत बोबडी वळायला सुरूवात झालेली.
" अय, आता बस करा! चला जेवणं उरकवू!"
" थांब रे काय घाई एवढी? आताशी कुठे किक बसायला लागली! तू त्या समोरून तेवढ्यात आणखी कांदे, मुळे उपटून आण जा!"
टिटवीचा आवाज वर वर चढत जवळच येत असल्यानं दिनू नकार देऊ लागला.
" बाल्या! जा रे सोबत! हा भित्रा टरकतो वाटतो"
बाल्या व दिनू निघाले. रस्त्याच्या कडेला बांधावर मोठमोठाली आंब्यांची झाडं हारीनं अंधारात व पावसात समाधीस्थ झाल्यागत भासत होती. मळ्याच्या पश्चिमेला लागूनच खोल भला मोठा नाला अस्पष्ट जाणवत होता. गाडी थांबली तेव्हा पुढे उतरतीवर फरशी दिसत असल्याचं दिनूला धुंदीत आठवलं.
तोच नाल्याकडून कोल्हेकुई उठली. अंधाऱ्या रात्रीत ओरडणं एकदम भयाण वाटत होता. दिनूच्या अंगावर सरकन काटा आला.
" बाल्या, उरकव, पावसानं ओलं होतोय!" दिनू नाल्याकडचा बांध सोडत दक्षिणेकडच्या आंब्यांच्या बांधाकडं आला. रस्त्याच्या कडेला पाणी फरशीकडं झेपावत असल्याचा आवाज खळाळत होता.
आकाशात वीज चमकली नी दिनूला रस्त्यावर फरशीकडं काही तरी पांढरं पांढरं दिसलं. तोच डोळ्यासमोर अंधाराच्या घेरीचं वर्तुळ आलं.दिनू आता फरशीकडं डोळे ताणून ताणून पाहू लागला. पण अंधारात त्याला काहीच दिसेना. तो पुन्हा वीज चमकण्याची अधिरतेनं वाट पाहू लागला. कोल्हेकुई व टिटिव टिव एकत्र सरमिसळत कर्कशता वाढत होती.
" दिन्या चल, आता भरपूर मुळे कांदे उपटले! पुन्हा यायची गरज नाही!" बाल्या बांधाकडं येत बडबडला. पण दिनूची नजर अंधारात एकटक फरशीकडंच स्थीर .तोच पुन्हा चमचमाट व लखलखाट झाला. दिनूला फरशीवर तीन चार ससे आता स्पष्ट दिसले.
" बाल्या समोर फरशीकडं बघ! ससे किती मस्त आहेत!"
" काय सांगतो? कुठं?" पुन्हा वीज चमकली व दिनूनं दर्शवलेल्या दिशेनं बाल्यानं पाहिलं.
तो चमकला.
मुळे व कांदे ठेवत तो गणाला बोलला.
" गणा खाली फरशीवर ससे आहेत. चला पाठलाग करू व पकडू!"
" ऐका रे! रात्रीच्या अंधारात व पावसात काहीही चितंभे करू नका! आपलं आपलं जेवण आटपू व निघू!" दिनू समजावत म्हणाला.
" शांत बस दिनू! ससे सापडले तर सकाळी फक्कड बेत झाला समजा!"
गणानं बाल्याला घेतलं. तोच सुमीत ही मागं गेला. रस्त्यावर हळूच आले. अंधारात पांढरं पांढरं दिसत होतं. पण हे फुल टल्ली. विजा चकाकणं सुरूच होतं. गणा व सुमीतनेही पाहत खात्री केली. ससे रस्त्यावर बसत काही तरी खात होते. गणा, सुमीत व बाला हळूहळू सरकू लागले. पण ससे तरी जागचे हालेनात.
दिनूनं मस्त पुलाव काढत ताव द्यायला सुरुवात केली. बाकी बरळत पितच होते.
अगदी जवळ जाणार तोच सश्यांनी हालचाल टिपली असावी. टुणकन उड्या मारत ते पुढे तुरकले व दोन पायावर उभे राहत कान टवकारत लाल गुजेगत डोळे चमकवू लागले.
" बाल्या, एरवी ससे थोडीही चाहूल लागली तरी धूम ठोकतात. पण हे पावसानं भेदरले असावेत. नक्कीच सापडतील!" गणा टल्ली असुन अंदाज बांधू लागला. पुन्हा ते पुढं सरकले. सशे हळूच उडी मारत रस्त्यानं पुढे सरसावले व थांबत यांच्याकडं पाहू लागले.
फरशीचा दगडी कठडा धरून दोन्ही बाजूला गणा बाल्या व सुमीत पवित्रा घेत उभे. नाला सातपुड्याकडनं बेसुमार पूर येत खळाळत होता. गणानं एकदम धाव घेत सशाचा पाठलाग केला. सशांनी ही वेग पकडला. रस्त्यावरुन हा पाठलाग सुरू झाला. गणा,बाल्या सुम्या ओलेचिंब झाले. पण त्यांना एकच धुंदी चढली. ससे सापडतीलच. आता ते दमलेत. पण ससेच यांना दमवत होते हे त्यांना कळेना.
शेडमध्ये दिनानं भरपेट पुलाव खात गाडीजवळ आला व ड्रायव्हरला उठवलं.
" बन्या ,उठ! पुलाव मस्त झालाय! जेवण करून घे! त्यांचं काही खरं नाही! त्यांचा टांगा पलटी घोडे फरार झालेत! आज इथंच मुक्काम करावा लागेल!"
बन्या शेडजवळ आला. तोंडावर पाणी मारलं व पातेल्याजवळ बसत त्यानंही मुक्कामच करायचा म्हणून मस्त पुलाव चेपला.
" सुना! हा गणा, बाल्या अजुन आले नाहीत!"
" राहुल ते गेलेत ससे पकडायला! ससे धरुनच परततील"
सुना व राहुलही जेवणासाठी उठले.
" अरे हा बैल सुटला वाटतं! ऊसात घुसून नुकसान करतोय! धरुन बांधा त्याला!"
" सुना, जाऊ दे! मुकाट्यानं जेवण आटपू चल!"
" राहुल्या! बिचाऱ्या शेतमालकानं आपली एवढी सोय करुन दिल्यावर त्याचं नुकसान होतय ऊसाचं ते पाहत राहणं योग्य नाही! थांब मीच धरून बांधतो!" म्हणत सुना तोल सांभाळत कांद्यांच्या शेतातून कमरे एवढ्या वाढलेल्या ऊसाच्या शेतात घुसला. बैलाला चुचकारत शेडकडं आणू लागला. बैल डिरक्या फोडत सुनाच्या पुढं पुढं पळत शेडजवळ आला. राहुल उठला व त्याला धरत शेडमागच्या कोनाड्यात बांधलेल्या बैलाकडं आणू लागला. ते पाहताच कोनाड्यात बांधलेली बैलं अचानक उठत पायानं खालची जमीन उकरत डिरक्या फोडू लागले. खुट्याच्या दावणीला हिसके देत आणलेल्या बैलाकडं कावऱ्या बावऱ्या नजरेन पाहत डुरकावू लागले.
" सुना, मला वाटत हा बैल मालकाचा नसावा!"
" अरे हा! म्हणून बांधलेली बैलं एवढा धुमाकूळ घालत आहेत! जाऊ दे याला रस्त्याकडं हाकलून देऊ!" म्हणत सुना व राहूल त्याला बाहेर हाकलू लागले. पण तोच तो एकदम बिथरला व त्यानं शिंगानं पातेलंच उलटवलं. बन्या थोडक्यात वाचला. तो तसाच उठत उष्ट्या हातानं बाजूला झाला. बैलानं लाथेनं सुनाला दूर उडवलं. तो डिरक्या फोडत शेपटी वर करत कांद्याच्या शेतात घुसला. राहुल, सुना व सोबतीचा मित्र संतापला व ते त्याच्या मागे धावत त्याला बाहेर काढू लागले. तोवर बांधलेल्या बैलांनी धटाधट दोर तोडत वाट दिसेल तिकडे धावत सुटले.
तीन जण सशामागं नाल्याच्या काठानं तर कधी रस्त्यानं पाठलाग करत होती तर बाकी बैलाला शेतातून हुसकावून लावत होती. बैल कधी शेतात तर कधी फरशीवर त्यांना फिरवत होता. बन्या हात धूत गाडीजवळ आला. त्यानं दिनूला उठवण्याचा प्रयत्न केला.
" दिनू, उठ! अरे चल यांचं साऱ्यांचं जेवण बाकी अजून व बैलानं पुलावचं पातेलंच उलटवलं. यांना परत बोलवून गाडीत बसवू व निघू! ही जागा मला काही चांगली दिसत नाही!"
दिनू डोळे चोळत उठला व बन्या सोबत निघू लागला.
" अरे ,कुठं निघालात? पुढे रस्त्यावर अपघात झालाय! रस्ता बंद आहे! शेतमालकानं मुक्काम करायला लावलाय ना? मग इथंच थांबा" फरशीकडून उंच धिप्पाड बाई गाडीजवळ येत म्हणाली.
बन्या तिच्याकडं आ वासून पाहू लागला. ही बया अशा अवेळी अंधारात कशी?
" आ..आप...आपण कोण?" बन्या ततपप करत विचारता झाला.
" मी.....राधे...नाना.... नाही राधी नानी!"
" या वेळेस ...इथं?"
" मी कोण, इथं कशी पेक्षा निघा व सर्वांना गोळा करा! तेच तुमच्या फायद्याचं" आता मात्र बन्यास त्याबाईचा आवाज एकदम पुरूषासारखा भसाडा वाटला.
" हो हो जातो व आणतो सर्वांना!" बन्या घाबरत म्हणाला व उठून परत झोपलेल्या दिनूस हलवत उठवू लागला. तोवर ती बाई पुन्हा फरशीकडं निघाली.
सुना, राहूल व काशी बैलामागं रस्त्यावर धावतच होते....
दिनू व बन्या गाडीतून उतरले.
”दिन्या, आधी सुना व राहूलला धरून गाडीत बसवू मग गणा बाल्याला शोधू!"
" बन्या, मला झोप येतेय रे खूप!"
" दिन्या मुकाट्यानं सोबत चाल!"
दोघं फरशीकडं निघाले. आता आताच पुढे निघालेली बाई अचानक अंधारात दिसेनाशी झाली. बन्या व दिनू सुना व राहूल मागं निघाले व त्यांना हाका मारत माघारी बोलवू लागले.
.
.
आता टिटवीनं पुन्हा जोर धरला होता. शेडवर शांतता पसरताच आंब्यावरचं दिवांध कोकलू लागलं.
बन्या व दिनू फरशी ओलांडून पुढे जाणार तोच रस्त्यावरच्या लिंबाखाली कुणीतरी आडवं पडलेलं असल्याची हालचाल अंधारात जाणवली.
" कुठं निघालात?"
ओला व्हायला लागलेला बन्या एकाएकी घुमलेल्या आवाजानं घामाघूम झाला.
" मागच्या अमावास्येला ससे आणायला लावले होते त्यांनी! ते ससे आज त्यांना सोडणार नाही! मुकाट्यानं माघारी फिरा! गाडीत बसा व बैलामागं गेलेले गावले तर त्यांना घ्या व लगोलग निघा!"
" आलेख, ऐक! त्यांना मुक्काम करायचाय आज थांबू दे! पोरांनो जा रे शोधा त्यांना!" नाल्याकडून फरशीवर चढत मघाचीच बाई बोलली.
" राधे, जाऊ दे त्यांना? का अडवतोय त्यांना?"
" आलेख! तू प्रश्न खूप विचारतो? इथे मलाच माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत; त्यात तू पुन्हा गुंतावा वाढवतोय!"
" राधे ऐक! निदान यांना तरी सोड! पोरांनो गाडीत बसा व पुढे सुलेखालेख ढाबा आहे तो गाठा! त्यांना 'मोडशी नाल्यावर अपघात झालाय', एवढा निरोप द्या"
" आलेख, तू शांत पड ना! अपघात नाही रे"
बन्या व दिनूची ओली चढ्ढी पुन्हा ओली होऊनही त्यांना गरम वाटू लागलं. बन्या शुद्धीत असल्यानं त्यानं दिनूला हाताशी धरत गाडीकडं धूम ठोकली.
" आलेख, थांबव त्यांना..." पुन्हा भसाडा आवाज जोरात गरजला.
" राधे पुरे आता! त्यांना ढाब्यावर निरोप पोहोचू दे! घरचे वाट पाहत असतील!"
"आलेख तुझी वाट पाहणारे आहेत रे पण माझं कुणीच नाहीत ना!"
बन्यानं दिनूला गाडीत बसवत गाडी स्टार्ट केली व फरशीवरून धूम पळवली. लाईटच्या उजेडात निघायला सांगणारा माणसाचा चेहरा पूर्ण चेंदामेंदा होऊन रक्ताचा पाट वाहतांना दिसला व बन्या घाबरला. मागे बाई गाडीसोबत धावत होती भसाडा आवाज येत होता. पण तरी बन्यानं गाडी सुसाट पळवली. रस्त्यानं ना गणा दिसला, ना सुना ,ना दुसरं कुणीच! तीन चार तास गाडी कुठं पळत होती बन्याला काहीच कळत नव्हतं पण त्याच फरशा, तेच नाले, त्याच नद्या, तीच गावं पुन्हा पुन्हा दिसत होती.
सकाळी पुर्वेला तांबडी आभा फुटताना एका ढाब्या जवळ बन्याची गाडी थांबली. बन्याची खाली उतरण्याची हिम्मत होईना! गाडीतूनच त्याला संधीप्रकाशात समोर नाव दिसलं...' सुलेखालेख ढाबा'
बन्यानं स्टेअरींगवर डोकं टेकवलं.
ढाब्यातून एक म्हातारा बाहेर आला.
" बोला, चहा देऊ का?"
बन्या व दिनू भीत भीत खाली उतरले. तोंडावर पाणी मारलं. म्हाताऱ्यानं दिलेला चहा कसाबसा घोटला. थोडी तरतरी येताच बन्या रडत रडतच म्हणाला.
" बाबा मोडशी नाल्यावर अपघात झालाय!"
म्हाताऱ्यानं खाली कपबशा घेत त्यांच्या कडं पाहिलं.
काल अमावास्या होती. सणासुदीचं लोक पिऊन गाडी चालवतात. झाला असावा. पण मोडशी नाला तर जवळच आहे. एवढ्यात माहीत पडायला हवं होतं?"
" बाबा, जवळ नाही हो! तीन चार तास लागतील एवढ्या दूर!"
" मग मोडशी नाला नसावा! दुसऱ्या ठिकाणी असावा!"
" नाही बाबा! अपघात ग्रस्त त्यामाणसानं तेच नाव सांगितलं त्या नाल्याचं?"
" कोण माणूस? जिवंत होता का? मग तर लगेच जावं लागेल!"
बन्या रात्री ची नावं आठवू लागला. बाईचं नाव आठवू लागला. पण नावच आठवेना. तो ताण देऊ लागला. पण आठवेना .तीच गत दिनूची ही. त्याला ही नाव आठवेना.
" बाबा, चला हो सोबत दोन चार माणसांना घेऊन! आमचे सर्व मित्र तिथेच अडकलेत!"
रडणाऱ्या पोरांना पाहताच विठ्ठल उमाळेनं लखा निंबाळेस उठवलं. त्याला सारा प्रकार सांगितला. आणखी दोघांना घेत सर्वजण त्याच गाडीनं मोडशी नाल्याकडं निघाले. मोजून सात आठ मिनीटात ते ठिकाण आलं. बन्या चक्रावला. तीच फरशी, तेच शेड, तोच मळा. मग रात्री चार तास आपण कुठं पळवली गाडी? आता तर पाच सात मिनीटात आलो आपण? पण त्याही पेक्षा मोठा धक्का पुढे होता. फरशीवर चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेला तो माणूस कुठंच नव्हता. रात्रीचं लिंबाचं झाड त्यानं ओळखलं.
" पोरा ,कुठं रे अपघात?"
" बाबा रात्री इथंच होता तो पडलेला! एक बाईही होती! कदाचित कुणीतरी उचलून नेलं असावं!"
"अरे पण दुसऱ्या खाणाखुणा काहीच दिसत नाही!"
" बाबा, मला ही कळत नाही! पण कदाचित पावसानं खुणा वाहून गेल्या असतील! "
तोच शेडकडून शेत मालकच धावत आला. शेडवर रात्रीच्या बाटल्या, उलटं पातेलं....सारा पसारा पडलेला. व ...... उसाच्या शेतात व दूर नाल्यात....एकदम थरार.... शिंगानं सारे शरीर फाडलेलं....लाथेनं चेहरा छिन्न विछीन्न....नाल्यातल्या पाण्यात ही तीच गत. बन्या व दिनूनं हंबरडा फोडत गावाकडं फोन लावले.
बन्या व दिनूस पोलीसांनी ताब्यात घेतलं. रात्री दारू पिऊन भांडण झालं असावं व नशेतल्या मित्रांना शुद्धीतल्या या दोघांनीच काही तरी केलं असावं असा पोलीसांनी संशय व्यक्त करत त्यांना आत घेतलं. दिनूनं तशी कमीच घेतली होती. बन्याला पूर्ण शुद्धीत असणंच गुन्हा वाटू लागला. पण मेंदूला ताण देऊन देऊन ही मोडशी नाला आठवे पण त्या माणसाचं व बाईचं नाव आठवेच ना! दिवसभरात कुणी तरी उचलून अपघात ग्रस्तांना अॅडमीट केलं असावं असं बन्यास वाटत असतांना सायंकाळी ती आशा ही मावळली.
.
.
एका बैलानं नशेतल्या तीन जणांना फाडलं...नशेत नाल्यात बुडालेले वाचले.... दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील दैनिकात बातमी झळकली.
.
.
क्रमश: