© ऋषिकेश पाटील
रहस्यमय भयकथा
भाग १ :
मारवा- भाग २
स्वतःकडचं सामान सांभाळत ,चिखलाने भरलेल्या त्या पायवाटेने सुधीर चालत होता. कसरतच होती ती एक प्रकारची. रस्त्याच्या दुतर्फा झाडे, किर्रर्र अंधार आणि पावसाची रिपरिप या सर्वांमुळे वातावरण अधिकच गंभीर होत होत. कसाबसा चालत तो एका छोट्या कड्यापाशी आला. थोडं वैतागूनच तो स्वतःशी म्हणाला ' अरे देवा, रस्ता संपला की काय? आता कस पुढे जायचं. इथे तर धड उजेड नाही आणि चिटपाखरू ही नाही. आपल्याजवळील टॉर्च सांभाळत तो उजव्या बाजूला वळला आणि कड्याला समांतर असणाऱ्या चिंचोळ्या वाटेने पुढे जाऊ लागला. आणखी छोटी चढण कशीबशी चढून वर आल्यानंतर त्याला समोर एक अद्भुत नजरा दिसला. महाकाय समुद्र आणि त्याच्या विशाल लाटा जणू सुधीर ला सादच घालत होत्या. तो थोडा घाबरलाच. रात्रीच समुद्राचं असं रूप त्याने कधी अनुभवलं नव्हतं . चौपाटीची गोष्ट वेगळी असते. इथे भयाण अंधार, अधून मधून येणार जंगली श्वापदांचा आवाज आणि जोडीला असा अजस्र समुद्र हे सगळं कोणालाही भांबावून ठाकणार होत. समुद्राच्या समांतरच किनाऱ्याला एक छोटी वस्ती दिसत होती. काही दिवे जळत होते तिथे. तेवढाच काय तो उजेड बाकी निरव शांतता. हे पाहून सुधीरला थोडासा धीर आला. उतारवणीवरून तो खाली आला आणि त्या घरांच्या दिशेने चालू लागला.
त्या वाडीत एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती. शहर सोडून आपण अगदीच दुर्गम भागात आलोय याची जाणीव सुधीरला आता होऊ लागली. आपली राहण्याची जागा शोधण्यासाठी तो धडपड करू लागला पण ते व्यर्थ होत कारण सर्वांची दार बंद होती आणि बहुतेक सारेच गाढ झोपेत असावेत. अशा वेळी कुणाचं दार वाजवणं म्हणजे देखील एक प्रकारची रिस्कच होती. एक छोट्या चौकात आता सुधीर येऊन पोहोचला. मधोमध एक ध्वजस्तंभ होता व तिथून तीन दिशेला छोट्या वाटा वस्तीमध्ये जात होत्या. त्यापैकीच एक रस्त्याकडेला कौलारु घर आणि वऱ्हांडा दिसत होता. कदाचित चावडी असावी. सुधीर ने आपला मोर्चा तिकडे वळवला. सामान ठेवून एक सुस्कारा टाकला. दिवसभराचा क्षिण आणि पावसाची संततधार यातून आता कुठे त्याला आसरा मिळाला होता. त्याने आजची रात्र त्या पडवी-वजा जागेत काढायची ठरवलं. एका पिशवीतून शाल काढून, जवळील काही पेपर अंथरून उशाला एक बॅग घेत त्याने अंग टाकलं. थकव्यामुळे त्याला लगेचच झोप लागली. त्याची या नवीन गावातील वास्तव्याला आता जणू सुरवातच झाली होती.
"साहेबानू , ओ साहेबानू , उठा उठा! चला. मी हाये, बाबू. चला लवकर. या आवाजाने सुधीर जागा झाला. आजूबाजूला पाहिलं तर आता तांबडं फुटलं होत. सूर्यनारायणाने नुकताच दर्शन दिल होत. डोळे चोळतच सुधीर हातातल्या घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे ६ वाजून गेले होते. अंग झटकटच तो उठला, 'तुम्ही कोण? तुमचं माझ्याकडे काय काम? सुधीरने प्रश्नार्थक स्वरात विचारले. "अहो, मला बाब्या म्हणतात. तुम्ही येणार हे मोठ्या साहेबानी सांगितलं व्हतं. रातच्याला लई वाट बघितली तुमची पण एवढा पाऊस आणि खवळलेला समुद्र बघून वाटलं तुम्ही काय येणार नाही आज, तालुक्याच्या गावात राहाल मुक्कामाला एक रात्री. म्हणून मी परत घरला गेलो. तुम्हाला इथं रात्र काढावी लागली आता माझं काय खर नाही. पैका तर मिळणारच नाही आणि वर शिव्या पण खातय मी." माफ करा हा साहेबानू. असे म्हणत बाबू सामान उचलून बाबू ने सुधीर ला पाठोपाठ येण्यास सांगितले. सुधीर चालू लागला. त्याने बाबू ला माफ केले होते फक्त आता कधी एकदा खोलीवर जातोय आणि फ्रेश होतोय असं झालं होत त्याला. गावात तुरळकच लोक दिसत होती. कदाचित आत्ताच उजाडलं होत त्यामुळे सगळीच मंडळी उठली नसावीत. वस्तीमधली काही घर पार करुन एका आंब्याच्या झाडाखाली एक छोटासा टुमदार कौलारू घर होत. जुन्या धाटणीच कुलूप उघडून बाबूने सामान आत ठेवलं. खिडक्या उघडून दिल्या, जुजबी माहिती सांगितली आणि हंडाभर पाणी हि मागच्या विहरीतून काढून दिल. "साहेब तुम्ही आराम करा हा, दूध आणि चहापत्ती आहे जेवणघरात. मी दुपारच्याला जेवन बी घेऊन येतय. चलतो साहेब. थोडा घुटमळतच बाबू निघाला. सुधीर ने त्याला ताबडतोब १०० रुपये काढून दिले आणि त्याचे आभारही मानले. नमस्कार करत बाबूने पैसे खिशात ठेवले आणि आनंदाने तो निघून गेला.
गरम पाण्याने मस्त अंघोळ करून आपल्यासोबत आणलेल्या गणपतीच्या फोटोला नमस्कार केला आणि घासलेटच्या स्टोव्ह वर चहा बनवून घेतला. चहाचे घोट घेत घेतच तो घर न्याहाळू लागला. छोटच दोन खोल्यांचं घर होत पण तस सुटसुटीत होत. समाधानी सुधीर साठी ते पुरेस होत. खिडकीबाहेर दूरवर हिरवीगार भातशेती दिसत होती. काहीश्या अंतरावर १-२ घर होती ज्यांच्या अंगणात काही जनावर बांधली होती. एकंदरीत मनाला आनंद देणारच वातावरण होत.
कामाची कागदपत्र आणि इतर साहित्याची बॅग घेऊन सुधीर कुलूप लावून घराबाहेर पडला. कामाची जागा वस्तीपासून दूर थोड्या डोंगरकपारीकडे होती अशी त्याला ओझरती माहिती साहेबानी दिली होती. तो त्या मार्गाने चालू लागला. गावात मूलभूतही सोयी-सुविधा दिसत नव्हत्या. कुत्री, मांजर आणि काही कोंबड्या इकडून तिकडे पळताना दिसत होत्या. छोटी मुलं पाठशिवणीचा खेळ खेळताना दिसत होती. काही वृद्ध माणस पारावार बसलेली दिसत होती. तरुण पुरुष व स्त्रिया जास्त दिसत नव्हत्या, बहुदा आत्तापर्यंत शेती अथवा मासेमारी या कामासाठी गेले असावेत. इलेक्ट्रिसिटीची सुविधा फारशी चांगली न्हवती. एकंदरीत कोणती तरी शिक्षा भोगायलाच इकडे पाठवलं आहे असं सुधीरला वाटत होत. पण लवकरात लवकर काम सुरु करयाच म्हणजे आपसुकच त्यात मन लागेल आणि बाकी असुविधाही हळूहळू दूर होतील असा विचार करत तो पुढे चालत होता. कधी एकदा कामाच्या गोष्टी हाती घेतोय आणि घरच्यांनाही खुशाली कळतोय असं त्याला झालं होतंय. तो झपाझप पावले टाकत होता.
वाटेत काही घर लागली तिथली माणस थोड्या प्रश्नार्थक नजेरेनेच सुधीर कडे पाहत होती. थोडं धाडस करून त्यानेच फॅक्टरी कडे जाण्याचा रस्ता विचारला. त्या लोकांनी होकारार्थी मान डोलावली आणि ते आपल्या कामाकडे निघून गेले. सुधीरला जरा अपमानीतच वाटलं पण तो पुढे चालू लागला. थोडं अंतर पार केल्यावर घनदाट झाडीतून पुढे येताच एका धुरकांडीमधून धूर येताना त्याला दिसला. त्याला हायस वाटलं. एकदाची कामाची जागा सापडल्याचा त्याला आनंद झाला. खांद्यावरची बॅग सरसावत सुधीर पुढे झाला. एक अजस्र् दगडी बांधकाम त्याच्या दृष्टीस पडलं. आजूबाजूला बरच औद्योगिक साहित्य, बैलगाडीची चाक आणि इतर वस्तू विखुरलेल्या दिसल्या. बरच गवतही उगवून आलं होत. कसाबसा त्यातून वाट काढत सुधीर मुख्य दरवाजापाशी आला. तिथे कोणीच नव्हत. दार बंद होत पण त्याला कुलूप नव्हत. आत कदाचित कामगार असावेत असं समजून सुधीरने जोराचा धक्का देत तो लोखंडी दरवाजा उघडला. कर्रर्रर्र असा आवाज होऊन दरवाजा उघडला व बाहेरचा उजेड त्या खोलीमध्ये पसरला. मोठी प्रशस्त खोली होती ती. काही कपाट आणि एक टेबले खुर्चीच होते तिथे. पूर्ण दृष्टीक्षेप टाकत सुधीरने एक दीर्घश्वास घेतला. कामाच्या नवीन जागेशी जुळवून घ्यायला तो आता सज्ज होणार होता. आयुष्यातला एक नवीन 'चाप्टर' सुरु होणार होता.
क्रमश: