© ऋषिकेश पाटील
काल्पनिक कथा मारवा- भाग १
तो दिवसच वेगळा होता! हो, खऱ्या अर्थाने वेगळा जो प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी येतोच. प्रोमोशन चा दिवस. सुधीरही आज तो दिवस अनुभवत होता. सरप्राइजच मिळालं होत त्याला खर तर, अन्यथा भर मार्च - एप्रिल उलटून गेल्यावर भर पावसाळ्याची चाहूल लागत असताना बढती आणि त्यात पगारवाढ असा दोन्हीचा सुवर्णयोग जुळून येण म्हणजे दुर्मिळच! ९० च्या दशकातील हा काळ, टेक्नॉलॉजीची चलती तेव्हा नव्हती. मनोरंजन, सेलिब्रेशन यांसारख्या गोष्टींकरिता मोजकीच साधन होती पण आहे यातच समाधान मानून आयुष्याचा आनंद घेणाऱ्या सुधीरसाठी आजचा दिवस अगदीच स्पेशल होता. लहानपणापासूनच वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या शहरात व गावात राहिलेला तो आता कुठे सेटल होतोय असं वाटून मुंबई मधेच आपलं बस्तान बसविण्याची स्वप्न पाहत होता. आज त्याच्या स्वप्नाला बळ मिळणारीच गोष्ट घडली होती. संपूर्ण दिवस आनंदात आणि पुढील गोष्टींचं प्लानिंग करण्यात गेल्यानंतर संध्याकाळी तो घरी आला. एक रूम आणि त्यालाच लागून स्वछतागृह. त्याच्या एकटयासाठी हे घर पुरेस होत. घरी येऊन मस्त अंघोळ करून देवाला दिवा लावल्यानंतर तो थेट फोन बूथवर गेला आणि नाशिक जवळच्या एका छोट्या तालुक्याच्या शहरी राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना फोन केला. तेव्हा एका कॉल चे बरेच चार्जेस लागत असत. तरी आज आनंदाचा क्षण असल्याने तो जरा जास्त वेळच सर्वांशी बोलत राहिला. आपल्या पालकांना झालेला आनंद त्याने फोन कॉल वरूनही इतक्या दुरून टिपून घेतला. बोलणं आवरल्यानंतर तो जवळच्या खानावळीत मनसोक्त जेवण करून आला. स्वीट डिश मध्ये २ गुलाबजाम जास्तच मागून घेतले व छोटूला टीप देखील दिली. बडीशेप चघळत रात्रीच्या थंड हवेचा आस्वाद घेत तो घरी कधी पोहोचला कळलेचं नाही.
घरी आल्यानंतर थोडी घरची आवरा-आवर केल्यानंतर तो गादीवर पडला. दररोज त्याला पडल्या-पडल्या झोप लागत असे पण आजची गोष्ट निराळी होती. बऱ्याच वेळ एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळण घेतल्यानंतर तो उठला. देवाऱ्यात देवासमोर ठेवलेला लिफाफा घेतला आणि पुन्हा तो चाळुन पाहू लागला. खर तर त्याने बढतीतल्या पत्रातील मजकूर नीट पहिलाच नव्हता. मॅनेजर साहेबानी तोंडीच सांगितलेले डिटेल्स आणि तोंडभरून केलेलं कौतुक ऐकून त्याला लेटर पूर्णपणे वाचायचं भानच राहील नव्हतं. लिफाफ्यातून ते लेटर त्याने बाहेर काढलं आणि आता शांतपणे वाचू लागला. " प्रिय सुधीर, तुम्ही आपल्या कंपनीला आत्तापर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे. तुमची कष्ट करण्याची वृत्ती आणि कामाप्रती निष्ठा लक्षात घेता आम्ही तुम्हाला पुढील पदी बढती देत आहोत व तुमची ३०% पगारवाढ हि करीत आहोत. या पदामुळे तुमची जबाबदारी वाढत आहे आणि याचाच भाग म्हणून तुमची बदली आपल्या नवीन प्रोजेक्ट च्या सुरवातीकरीता दुसऱ्या ठिकाणी केली जात आहे". हि ओळ वाचताच सुधीर गोंधळला. आत्तापर्यंतचा हर्ष-उल्हास क्षणातच विरून गेला. त्याला काय करावे सुचेना. घरी आनंदाची बातमी दिल्यानंतर आता बदली झाली आहे हे सांगण्याचा मात्र त्याला धीर होईना. मनात शेकडो विचारांचं काहूर माजलं. आपल्या आवडत्या शहरात सेट होण्याची धडपड चालू असताना बदलीचा विषय आघात करणारा होता. त्यातचं ऑफिस मधील वर-वरच्या चर्चेतून त्याला कळलं होत कि नवीन प्रोजेक्ट सुरु होणारी जागा शहर व उपनगर तर सोडाच पण अगदीच तुरळक मनुष्यवस्ती असणाऱ्या ठिकाणी होती. पूर्ण गोंधळात टाकणाऱ्या विचारांनी बराच वेळ सुधीरला झोप लागली नाही, पहाटे कधी त्याच्या डोळा लागला.
कर्कश ट्रिंग ट्रिंग करणाऱ्या अलार्मने त्याला नेहमीच्या वेळी उठवलच. अंघोळ-देवपूजा आटोपून सुधीरने सरळ ऑफिसचा रस्ता धरला. रस्त्याच्या बाजूला असणारे गरमागरम चहा आणि पोहे जे तो दररोज सकाळी खात असे तेदेखील त्याला आज खुणावत नव्हते. लोकल ने काही वेळातच तो ऑफिस ला पोहोचला. मॅनेजर साहेब अजून आले नव्हते. दिवसाच्या कामाचं प्लांनिंग करत आणि थोडा वेळ वर्तमानपत्र चाळत त्याने थोडा वेळ घालवला. नेहमीसारखा कामाचा उत्साह आज नव्हताच त्याचा खर तर. दुपारी मॅनेजर साहेब आले. ते येताच सुधीरने तडक त्यांच्या केबिन मधेच धडक मारली. थोड्याफार चर्चेनंतर साहेबांनी सुधीरच तिकडे जाण किती महत्वाचं आहे हे पटवून दिल. प्रोमोशन, पगारवाढ या गोष्टींकडे पाहत घरची जबाबदारीही लक्षात घेत हि चालून आलेली संधीच अशी मनाची समजूत घालत सुधीर केबिन बाहेर आला. साहेबाना त्याने होकार कळविला होता. त्याला दुसऱ्या दिवशीच निघायचे होते. केबिन मधून बाहेर पडताना साहेबानी दिलेली चिट्ठी खिशात ठेवून तो लागलीच घरी निघाला. सामानाची तयारी करून त्याला दुसऱ्या दिवशी सकाळच्या ST ने निघायचं होत.
सर्व आवरण्याचा गडबडीत त्याच घरी फोन कारण राहूनच गेलं. एव्हाना टेलीफोन बूथही बंद झाले होते. रात्री उशिरापर्यंत तो आवरत होता. पुढच्या प्रवासाचा विचार करतच तो झोपी गेला. पहाटे उठून पटापट आवरून तो सामानासहीत ST थांब्यावर पोहोचला. वेळेचा तसा तो पक्का असल्याने गाडी मिळण्यात अडचण आली नाही. २ दिवसांचं जागरण आणि मनावर आलेला ताण यामुळे थोड्याच वेळात त्याला झोप लागली. गाडी मार्गक्रमण करू लागली. दुपारी एका ठिकाणी जेवायला थांबल्यानंतरच त्याला जग आली. थोडफार हलकं जेवण घेऊन तो पुन्हा गाडीत येऊन बसला. कंडक्टरना विचारलं अजून किती प्रवास आहे व साधरणतः किती वाजतील पोहचायला याचा अंदाज लावला. ST आता बरेच अंतर कापून घाटमाथ्याला लागली होती. सूर्यास्ताची वेळ होती. सुधीर निसर्गाचा हा नजारा पाहून थोडा सुखावला. बराच वेळ तो बाहेर पाहत होता. साधारण रात्री ८ च्या दरम्यान गाडी स्थानकात आली. तळकोकणातलं एक छोट पण सुंदर तालुक्याचं गाव होत ते. सामान उतरवून सुधीर कॅन्टीन जवळ आला. त्याने चहा घेतला आणि फ्रेश झाला. त्याचा प्रवास इथे संपला नव्हता. साहेबानी दिलेल्या चिट्टीमध्ये दिलेला पत्ता त्याने पुन्हा एकदा वाचला आणि त्यागावची ST मिळते का ते तो पाहू लागला. पण तिथल्या कोणत्याही फलाटावर त्या गावचा मागमूसही नव्हता. अखेरीस त्याने स्टॅन्डच्या बाहेर येऊन काही मोजकेच रिक्षावाले होते त्यांना हा पत्ता विचारला, पण त्यातील कोणी तिकडे जाण्यास तयार होईना. " अरे दादूस , थय एवढ्या रातच्याला कोणी जात नाही हा, हिकडचं कुठंतरी मुक्काम कर आजच्या रातीला. सकाळच्या ला जा. असे एका रिक्षावाल्याने सल्ला दिला. सुधीरला सकाळी वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचायचे होते त्यामुळे त्याने तो सल्ला फारसा मनावर घेतला नाही. आता पावसाचा जोर थोडा वाढला होता. आडोश्याला थांबूनच सुधीर दुसरे एखादे वाहन मिळते का ते पाहत होता. इतक्यात एक रिक्षा त्याच्याजवळ येऊन थांबली. " साहेबानू कुठं सोडू तुम्हाला?" एक साठीतले मामा सुधीरला म्हणाले. सुधीर ने चिट्टीमधला पत्ता सांगताच त्यांनी लगेच त्याला बसायची खूण केली. थोडे पैसे जास्त घ्या हवं तर पण मला सुखरूप तिथे सोडा - सुधीर म्हणाला. 'हो साहेबानू , काळजी करू नका. तुम्ही इथवर आलात आणि ज्या ठिकाणी चालला हात ना ते महत्वाचं असा. मला जास्तीचे पैसे नको. रिक्षावाल्याचा बोलण्याने सुधीरला धीर आला. सुमारे अर्धा तासाचा प्रवास करून ते एका फाट्यावर पोहचले. सरळ डांबरी रस्ता पुढील कोणत्या तरी लांबच्या गावात जात होता. उजवीकडे एका ओढ्याच्या पुलावरून कच्चा ररस्ता दिसत होता. रिक्षा थांबताच सुधीर उतरला, सामान उतरवण्यास त्या काकांनी मदत केली. त्यांचे पैसे देऊन आभार मनातच सुधीर सामानासहित मार्गस्थ झाला. रिक्षा वळवून काका परतीच्या प्रवासाला निघत असताना रिक्षाच्या हेडलाईट च्या प्रकाशात सुधीरने रस्त्याच्या कडेला असणारा तो बोर्ड वाचला- मारवा! हेच त्याच्या चिट्ठीमध्ये लिहिलेलं गाव, त्याच्या कामाच नवीन स्थान. डोक्यात विचारांची कालवाकालव घेऊनच सुधीर त्या ओढ्यावरच्या कच्च्या रस्त्याने स्वतःजवळ असणाऱ्या छोट्या विजेरीच्या उजेडात त्या गावाकडे मार्गस्थ झाला.
. .
क्रमशः
गूढ-भयकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे . आपला अभिप्राय स्वागतार्ह आहे.