●#शिव
तसे खूप सारे अनुभव आहेत माझ्याकडे लिहिण्यासारखे. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. खरं तर ही केस तुम्हाला सांगू का नको याच्यावर मी खूप विचार केला. आणि शेवटी ठरवलं, तुम्हाला हा अनुभव नक्कीच सांगितला पाहिजे.
माझ्याकडे आलेल्या आजपर्यंतच्या केसेस मधली सगळ्यात क्रूर एक केस जी मी साॅल्व्ह नाही करू शकलो.
या घटनेतून माणसाने खरंच काहीतरी चांगला बोध घ्यायला हवा.
आमच्या गावापासून थोडेच लांब कडगाव म्हणून एक नावाजलेले गाव आहे. पूर्वीच्या काळात गावात शेती आणि दुधा व्यतिरीक्त कसलेच कमाईचे साधन गावामध्ये उपलब्ध नव्हते. ना उद्योगधंदा करायला मोठी बाजारपेठ होती.
हळू हळू दिवस बदलले. गावात स्वतंत्र अशी मोठी बाजारपेठ निर्माण झाली. तालुक्यापासूनचे लोक तिथे वस्तू खरेदीसाठी येऊ लागले.
आता बाजारपेठ म्हटल्यावर सगळ्यात आधी येतो व्यवसाय. आणि व्यवसाय आला की त्याचबरोबर स्पर्धापण येते.
त्या बाजारपेठेमध्ये विकासचे वडीलोपार्जित कपड्यांचे दुकान होते. पेठ चालू झाल्यापासूनचे सगळ्यात जुने त्याचे दुकान होते. हळू हळू पेठ मोठी झाली, तशी अजून नवीन कपड्यांची दुकाने तयार झाली. आधी विकासचे दुकान खूप छान चालायचे. नेहमी लोकांची वर्दळ असायची. नंतर दुसर्या दुकानांमुळे त्याच्या व्यवसायात खूप फरक पडला होता. विकासला म्हणावं तसा नफा मिळत नव्हता व त्यामुळे तो खूप निराश झाला होता. तो सारखा दुकानाच्या टेंन्शन मध्ये राहायला लागला. दुसर्यांच्या दुकानांना मिळणारा प्रतिसाद बघून त्यालापण वाटत होते, माझ्या दुकानाला पण असाच प्रतिसाद मिळाला पाहिजे. त्यासाठी तो काहीपण करायला तयार होता.
त्याची ही अवस्था त्याच्या मित्राला समजली. त्या मित्राच्या ओळखीचा एक मांत्रिक होता. तो एक दिवस विकासला घेऊन त्या मांत्रिकाकडे गेला. विकासने त्या मांत्रिकाला त्याची सगळी स्थिती सांगितली आणि त्याचा व्यवसाय, त्याची परिस्थिती बदलण्यासाठी तो काहीपण करायला तयार आहे, हे पण सांगितले.
मग त्या मांत्रिकाने त्याला एका शक्तीविषयी सांगितले.
ती शक्ती त्याला किती फायद्याची आहे, हे पण पटवून दिले.
त्यामध्ये फायदा त्या मांत्रिकाचा पण होता. त्याला विकास कडून भरपूर पैसे मिळणार होते. आधीच काहीही करण्यासाठी तयार असणारा विकास त्याच्या फायद्यासाठी लगेच तयार झाला.
एका ठराविक दिवशी तो मांत्रिक विकासला घेऊन मावळात गेला. तिथून ती शक्ती सिद्ध करून ते घरी घेऊन आले. एका अंधार्या खोलीत तिची स्थापना केली. मांत्रिकाने त्याचे काम फत्ते केले. आणि खरंच त्या दिवसानंतर विकासचे दिवस फिरले. दिवसेंदिवस विकासची प्रगती होत गेली.
अशातच समोरून चालून विकासला लग्नाचे स्थळ आले. सविता त्या मुलीचे नाव. दिसायला खूप सुंदर होती. त्याचबरोबर ती खूप हुशार होती. विकासला पाहताक्षणी ती आवडली. तिला पण तो आवडला. चांगल्या मुहूर्तावर लग्न करायचे ठरले. लग्न पण मोठ्या धूमधडक्यात पार पडले. नवी नवरी घरात आली.
थोड्याच दिवसात विकासने त्याचे दुकानसुद्धा दोनमजली बांधले.
त्या शक्तीला बसवलेल्या खोलीत सविताला जायला मनाई होती. ती पण तिला घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या खोलीकडे कधी जात नव्हती. ती नेहमी तिच्या नवीन, आनंदी संसाराच्या स्वप्नात मग्न असायची. तिला काय माहिती होतं या आनंदाला कोणाची तरी वाईट नजर लागणार होती.
आशातच एक दिवस काही कामानिमित्त विकासला बाहेरगावी जायला लागणार होते. त्याने त्याच्या वडिलांना त्या शक्तीला रोजचा नैवेद्य ठेवायला सांगीतला आणि तो कामासाठी बाहेरगावी निघून गेला.
तसं दररोजचं नैवेद्याच ताट सविता तयार करायची तसंच आज पण सविताने नैवेद्याच ताट भरलं. ती ते ताट घेऊन बाहेर आली. बाहेर हाॅलमध्ये कोणीच नव्हतं. बहुतेक तिचे सासरे बाहेर गेले होते. ती परत माघारी फिरली. पण परत तिच्या मनात आले, हे रोज कोणाला नैवेद्याचं ताट घेऊन जातात ते बघूया तरी. ती परत त्या खोलीच्या दिशेने गेली. तिने दरवजा उघडला. खोलीतील लाईटस् लावल्या तर समोर पडद्याआड काहीतरी होते. तिने हळूच जावून पडदा बाजूला केला तर ती शक्ती गोट्या स्वरूपात तिच्यासमोर होती. तिने ते नैवद्याच ताट त्याच्या समोर ठेवले. ती शक्ती तिच्याकडे पाहत होती. त्या शक्तीची वाईट नजर तिच्यावर पडली. त्या शक्तीला ती पाहताक्षणी आवडली. इतकी आवडली की त्या शक्तीला आता तिचा उपभोग घ्यायचा होता.
ती लाईटस् बंद करून बाहेर आली. खोली बंद केली.
सविताने दिवसभर तिचे काम केले. विकास कामानिमित्त बाहेर गेला होता त्यामुळे ती एकटीच तिच्या खोलीमध्ये झोपली होती.
निम्म्या रात्री कसल्याशा आवाजाने ती अचानक जागी झाली. तिने उठून पाहिले तर कुणीच नव्हते. ती परत जाऊन झोपली. काही वेळानंतर अचानक कोणीतरी तिच्या शरीरावर बसलंय, असे तिला जाणवायला लागले. तसे तिने पटकन डोळे उघडले तर एक काळा माणूस तिच्या शरीरावर बसला होता. एक प्रकारचे आसुरी हास्य त्याच्या चेहर्यावरती होते.
ती खूप घाबरली. तिला काही कळायच्या आत त्याने तिच्या पूर्ण शरीराचा ताबा घेतला आणि एका क्षणात तिचं होत्याचं नव्हतं करून टाकलं. ती फक्त तिच्या उघड्या डोळ्यांनी अश्रू ढाळत पाहत होती. काय करणार बिचारी? तिच्या नवर्याच्या चुकीची शिक्षा तिच्या वाट्याला आली होती. आणि ती पण कधी न संपणारी.
तिच्यासोबत रोजच असे घडू लागले होते. विकासने विरोध केला तर त्याच्या विरोधाची शिक्षा त्याला खूप मोठ्या नुकसानीच्या स्वरूपात मिळायची.
सविता खूप काही भोगत होती आणि विकास फक्त पाहत राहू शकत होता पण काहीच करू शकत नव्हता. त्याने त्या मांत्रिकाकडे मदत मागितली, पण दुसर्याच दिवशी त्याला कळले की तो मांत्रिक ह्रदयविकाराच्या झटक्याने मेला म्हणून.
आता तर तो खूप घाबरला होता.तो खूप लोकांकडे गेला पण त्या सगळ्यांनी त्याला हात जोडले.
विकास माझ्याकडे आला. घडला प्रकार सांगून विकासने माझ्यासमोर हात जोडले.
"माझ्या बायकोला वाचवा. मी तुम्हाला हवं ते देईन", असे म्हणून तो गयावया करू लागला.
मी: "लाज नाही का वाटत तुला? एवढा वेळ तुझं ऐकून घेतलं तर मला तुझ्यासारखा समजलास का? तुला मीच काय, तो परमेश्वर पण नाही वाचवणार. तुझ्या चुकीमुळे तुझी बिचारी बायको शिक्षा भोगतेय. आणि कुठल्या तोंडाने देवाकडे आलायस? त्या मांत्रिकाऐवजी देवाच्या दारात गेला असतास तर एवढी वाईट वेळ आली नसती तुझ्यावर."
विकास: "माफ करा मला. माझ्याकडे त्यावेळी स्वतःच्या प्रगतीचा हाच मार्ग होता."
मी : "काय मिळवलेस प्रगती करून? घरच्या लक्ष्मीला त्रास देऊन? थोडी वाट पाहिली असतीस ना तर तिच्या पायगुणाने तशीपण तुझी भरभराट होणारच होती."
विकास: "मी खूप अपेक्षेने आलोय तुमच्याकडे. तुम्हीच काहीतरी उपाय करा."
मी : "तू बर्याबोलाने निघ इथून. नाहीतर माझ्याइतका वाईट कोणीच नाही."
तो रडत बाहेर जायला निघाला पण त्याच्या त्या खोट्या अश्रूंवर मी नाही लक्ष दिले.
तो निघून गेला तरी माझ्या मनातून ही गोष्ट जातच नव्हती. त्या बिचारीने काय वाईट केलंय? त्याची शिक्षा तिला का?
मी तिला वाचवू शकतो.
दुसर्या दिवशी सकाळी मी त्याला हेच सांगायला फोन केला की मी येतोय तुझ्या घरी, तर समोरून कळले की सविता रात्रीच गेली.
हे काय घडले होते त्या बिचारीसोबत? आता मी पण काहीच करू शकणार नव्हतो.
काही दिवसांनी कळले, विकास पण कुठेतरी निघून गेला. नंतर त्याचे आईवडिल ते घर सोडून भाड्याच्या घरात राहायला गेले. शेजारचे लोक अजूनही बोलतात की त्या घरातून मोठमोठ्याने रडण्याचे आवाज ऐकू येतात. सविताचे फक्त शरीर सुटले होते, पण आत्मा अजूनही त्या शक्तीच्या ताब्यात आहे आणि तो ती क्रुरता अजून पण तिच्यासोबत करतोय.
टिप: माणसाला आयुष्यामध्ये सगळंच लवकर, मेहनत न करता हवं असतं. म्हणून माणूस असला वाईट मार्ग निवडतो आणि चूक करून बसतो. आणि मग अश्या स्वरूपाची भयानक शिक्षा भोगतो.
खरं तर कष्टाने मिळालेलं टिकतं आणि असल्या शाॅर्टकटने मिळवलेलं नष्ट होतं.