श्रावण असाच पार झाला होता. अस्मान फाटल्यासारखं एकसारखं वहात होतं. पहाटे, दुपारी, संध्याकाळी, रात्रभर ! धारा क्षणाचीही उसंत घेत नव्हत्या. वर-खाली करणाऱ्या बऱ्याच वाटा तुडूंब भरलेल्या नाल्यांनी अडवून धरल्या होत्या. आठवड्याभरापूर्वी खालच्या वाडीतल्या काही माणसांनी पर्यायी वाट छाटण्यास सुरवात केली होती. वर गडाच्या भवानी दरवाजापर्यंत येण्यास अजून दहा दिवस तरी लागतील. ही वाट महत्वाची होती. गडाच्या अत्यंत दुर्गम अश्या कड्यातून निघत ती सरळ खाली म्हाळपुरला जाऊन भिडत होती.भवानी दरवाजाच्या मुखातून निघत ती गडाच्या पाठीवरून नागासारखी सळसळत म्हाळपुरच्या महादेव टेकडीपाशी निघायची. खाली वाडीतून ये-जा होत असे. पण पावसाळ्यात बंद असायची. एकतर वरून कोसळणाऱ्या मुसळधारा, निसरडी वाट, डाव्या बाजूला हजारो फूट खोल दरी आणि जंगली श्वापदं. ये-जा करताना वाडीतून एखादा जाणकार, शिकारीत तरबेज वाट्याड्याला सोबत आणावे लागत असे. रायगडाला एक खंदा पर्याय म्हणून महाराजांनी मुद्दाम हा १२ मैल लांब डोंगर महालगडासाठी हेरून ठेवला होता. पाचाडाला पुढच्या बाजूस सोडून, मागच्या बाजूने रायगडावर येण्यास म्हाळपुरातून एक चोरवाट सुरु होत होती. शिबंदी, रसद, असला, असं बरंच काही ने-आण करता येत होती. पण फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच ! राज्याच्या इतिहासात जरी महालगड उल्लेखित नव्हता, तरी एखाद्या कुपीतल्या शिपायासारखा ऐनवेळी शत्रूच्या मानेवर त्याने अनेकदा कट्यार फिरवली होती. राजधानी कडे येणाऱ्या पावलांची चाहूल लागताच, त्याने आपली नजर आणि नखं तीक्ष्ण केली होती. स्वराज्यासाठी लढून डोंगर-दऱ्यात गडप होणारी एक शौर्यमूर्तीच होता तो...! कोणत्याही दिशेने पाहिले, तरी अंगावर गड घेऊन उभी असलेली महालटेकडी, एखाद्या महालासारखी अजस्त्र भासायची. म्हणून तिचं बारसं करताना हे नाव पडलं होतं.
मृगाला सुरवात होण्याआधीच इनायतखानने महालगडाभवती आपला पाश पेरून ठेवला होता. रायगडावर लक्ष असावे म्हणून खास आग्र्याहून त्याला किमान वर्षभर पुरेल एवढी शिबंदी आणि दारुगोळा देऊन याच कामगिरीवर पाठवले होते. दुसरे काहीही न करण्याची सक्खत हिदायत त्याला होती. बादशहासाठी हा गड एखाद्या टकमक टोकासारखे काम करणार होता. शिवाय कोकणात उतरून सागरी मार्गाने अखतातून माल वाहतुकीवर देखील अंमल करता यावा, असा त्याचा एक छुपा मनसुबा देखील होता. गेले तीन महिने इनायत गडाच्या पायथ्याशी लोळण घालून उभा होता. बारा हजार स्वार, तितकंच पायदळ, मोठ्या उखळी तोफा, भरमसाठ दारुगोळा आणि मनात कपट, हे सगळेच हवे तसे उपलब्ध होते. महालगडाखेरीज दुसरी कोणतीच कामगिरी त्याच्या खात्यात नव्हती.
"आबा, खालून शांता आलाय !" संध्याकाळी नजर टोकावर दुर्बीण लावून उभ्या असलेल्या सुर्याजींना वर्दी आली.
" या अश्या वातावरणाचा ? पाठवा त्याला !" संततधारेत सुद्धा ही लोक गडावरून वर-खाली करत होती. सूर्याजींना कधी-कधी राग येत असे.
"मुजरा मायबाप...!" तिशीतला एक तरुण त्यांच्या मागे येऊन उभा राहिला. रंगाने सावळा असला, तरी कामफत्ते झाल्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं. अंगावर अनेक वळ उमटले होते, पण त्याच्या आनंदाला त्याचे काहीच भान नव्हते. अंगात थकवा होता, पण तो त्याला झुकू देत नव्हता.
" शांता, अरे पोराबाळांचा धनी तू ! ही असली धाडसं अंगाशी येतील? असं करतात का ?"
" असुद्या मायबाप, त्यो खाली गनीम बसलाय आ वासून. जीवाला घोर लागलाय. आनी तुमीबी आहात न काळजीत ?"
" अरे हो, पण असं या वातावरणाचं ? आल्यासरशी रहा, सकाळी बघू..!" सुर्याजीनी टाळ्या दिल्या तसं दोन जण धावून आले.
" वैद्यबोवांकडे न्या याला. रात्री मुक्कामाची सोय करा. सकाळी बघुयात."
खाली वाडीला असणारा धोका लक्षात घेता सुर्याजींनीच हा डाव टाकला होता. जमेल तितका शस्त्रसाठा खाली गावात सोडायचा, आणि गावात लहानश्या तुकड्या तयार करायच्या. इनायतच्या कबिल्यावर रात्रीतून हल्ले चढवून त्याला हैराण करायचं. कुणालाही संशय येता कामा नव्हता. शांता दर दहा-बारा दिवसात गड चालून वर यायचा आणि बरंच सामान खाली घेऊन जात गावकऱ्यांत वाटून द्यायचा. हा त्याचा नित्यक्रम कधीच चुकत नव्हता. वर आला की त्याचा एखाद दिवसाचा मुक्काम ठरलेला असायचा. वर गडावर तो सगळीकडे हिंडत असे. त्याला कोणीही अडवत नसे. कमरेला त्याने स्वतः बनवलेली एक छोटी तलवार असायची. डोक्यावर पागोटे, अंगावर अंगरखा, पावसापासून बचावासाठी एक घोंगडी आणि पाण्याची चरवी, असा अवतार ! खाली गावात त्याची लोहाराची भट्टी होती. बैलगाडीच्या चाकाच्या धावा, घोड्याच्या नाळी, विळ्या, छोटे चाकू, भाल्याची धार, नांगराचा फाळ, असं खूप काही तो आई-बापाकडून शिकला होता. किल्ल्याला वेढा पडल्याने आता ते सामान गडावर घेऊन जायची सोय नव्हती. पण जे काही मिळत होते, त्यावर त्याची गुजरण होत असे.
"असं रात्री-बेरात्री चोरासारखं येत असतं का कुणी ?" मध्यरात्री लाकडी दार धडाधड वाजू लागले. तारा एकदम दचकून उठली होती. चार वेळा खात्री झाल्यानंतर तिने दार उघडले. गावात गनिमाची भुकेली कुत्री हिंडत असायची. पोरी-बाळींना उचकून नेल्याचे एखाद-दोन प्रसंग घडले होते. भर वस्तीत मातीचे घर असल्याने ताराला तसं भय नव्हतं. रात्री झोपताना एक सुरा घेऊन झोपायची. मागचं दार अर्ध उघडंच असायचं.
"काय मामाची पोरगी भित्री ? " दार लावून शांता आत आला.
"असू द्या, बाई माणसाची भीती तुम्हा बाप्यालोकांना न्हाई कळायची !" त्याच्या पाठवरचं ओझं हलकं करत ती म्हणाली. उरलेली रात्र अशीच उलटली.
सकाळी शांता लवकर उठला. तो शेजारी नाही बघून ताराही बाहेर आली. शांता त्याच्या ओट्यावरून रखुमाईची अर्धवट जळून राख झालेली झोपडी बघत होता. तारा त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली.
"तारे, कवा ठाव लागेल या सगळ्याचा ?" त्याने ताराला सहज विचारलं.
" गडाभवती गनीम हाये, तोपातूर हे चालूच राहणार. फौज गडावर अडकल्या हाईत, याला वेसण घालणारं न्हाई कुणी." तिच्या डोळ्यात आपसूक पाणी तरळलं. रखुमाईची एकुलत्या एक नातवाला चांद्रजीच्या नालायक माणसांनी त्या रात्री ओढून नेला होता. दुसऱ्या दिवशी नदीकाठी खांडोळ्या सापडल्या. म्हातारीचा एकमेव आधार तलवारी खाली आला होता. म्हणायला तो सुर्याजीचा सख्खा भाऊ. गणिमाने लालूच दाखवून फिरवलेला ! किल्लेदारी आणि वतन देतो, म्हणून गावात दहशत पसरवून खबऱ्यांचा माग काढत त्यांना संपवायची कामगिरी याला सोपवली होती. दर दोन दिवसांनी गावात हैदोस घाली. जनावरं, लेकी-बाळी बाहेर फिरायला घाबरत होती. धर्म उरला नव्हता. किल्ल्याकडे नजरा लावून मुके प्राणी, तरणी-ताठी पोरं, पोरी-सोरी असाच जीव सोडीत होत्या. त्याच्या मदतीला खानाची मोठी फौज होती. रायगडावरून हुकूम येत होते. ' त्याला जीवे मारण्याचे हुकूम सुटले होते. पण हा सारखाच मृत्यूला हुलकावणी देत आपल्या वाड्यात दडून बसत असे.
"तारे, याचा नायनाट माझ्याच हातून होईल."
" काहीबाही नगं बोलूस. राजस्नी करू दे न्याव याचा ! एकदा गडाच्या फौज खाली आल्या, की कुत्र्यगत पळत सुटेल." तारेची भीती सहाजिक होती. चंद्राची हजारो चांडाळांच्या आहुतीनंतर अवसेला जन्माला आलेलं एक जिवंत पिशाच्च होतं. त्याला माणूस म्हणावं असं काहीच नव्हतं. त्याला माणूसकीशी काही घेणं देणं नव्हतं. त्याला भय नव्हतं. दयेची चाड नव्हती. पापाचा घडा भरून आत्मा कुळशीत झाला होताच, पण रोज त्यात एक पापकर्म अधिक करण्याची त्याला सवय लागली होती.
मामाने मोठ्या थाटात लगीन लावून दिलं होतं. तारा साधी-भोळी होती. पण शूर होती. हत्यारं चालवण्यात पटाईत होती. नवऱ्याच्या खांद्याला-खांदा लावून घन हणायची. तापलेलं लोखंडं ,घनाने आकार देऊन त्याची नक्षीदार ठेवण करायची. कपाळा चंद्रकोर आणि हनुवटीवर चांदणी गोंदवून बापाने मोठ्या कौतुकाने तिला भाच्याला दिली होती. आई-बापाची सगळीच कर्तव्ये मामाने पूर्ण केली होती. लहानपाणी सवंगडी असलेली जोडी आयुष्यभरासाठी आता गोडी-गुलाबीच्या संसारात अडकली होती.
"पाणी देता का जरा ? " अंगणात लाकडं तोडायला उभा असलेल्या शांताच्या कानावर एक खर्जा आवाज पडला.
शांताने वळून पाहिलं. कोणीतरी पिर होता.
" कोण हाईस..?" शांत्याने विचारलं. गणिमाचाच एखादा जासूद असावा !
" तू तारेचा नवरा ना ?" पिराने विचारलं.
"व्हय..! पण तू कोण हाईस?"
" तारी ओळखते मला. आहे का ती ?"
बाहेर कुणीतरी आलंय हे कळताच तारा होती तशी बाहेर आली.
"पिऱ्या...!" पिराला पाहून तारा एकदम चमकली. तिचा मानसभाऊ होता तो !
" ताई ?" त्याच्याही डोळ्यात पाणी तरळलं. घाईघाईने ती भरलेला तांब्या घेऊन बाहेर आली.
"ह्यो पिरा, आमच्या गावातला. बाबानी याला सांभाळलं, मोठं केलं. दर्ग्यात असतो."
"असं व्हय...! माफी करा , म्या न्हाई वळकलं." शांता त्याच्यासमोर हात जोडून उभा राहीला.
"हात काय जोडायले पावणे. तुमचं बरोबर आहे. आजूबाजूचं सगळं पाहून सावध राहिलं बरं...!" पिराने पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला.
"पिरा, आज इकडची वाट कुठे चुकला ?" तारेने सहाजिक प्रश्न केला.
"तारे, परवा दर्ग्याला होतो, तेव्हा लई वंगाळ सपन पडलं गं..!" पिरा ओट्यावर बसला.
"काय झालं...? बाबा-माय बरं हाईत न ?"
"आहे व्यवस्थित, गडाला वेढा पडला म्हणून सारखे पिराला साकडं घालीत असतात."
"सपान काय पडलं?" ताराची उत्कंठा वाढत होती.
सगळे घरात आले. तारेने माहेरचं माणूस आलं म्हणून भाकरीचं पीठ काढलं.
"तारे, या पुढंच तुला आणि शांताला जपाय हवं." पिर बोलू लागला. शांताने त्याला शहाळं सोलून दिलं.
" मला सपनात तुमच्यावर काहीतरी सावट आलेलं दिसलं. ते माणूस नव्हतं..."
"काय झालंय ते सांगा पिरबाबा,नका घाबरू..!" शांताने त्याला धीर दिला.
"माणसाला आपला अंत माहित नस्तुया शांता ! तो कसा असेल, कवा असेल, याची भीती मात्र त्याच्या काळजाला घोर लावून असते. कोण किती जगणार, कवा मरणार, हे उपरवाला लिवित असतो. आणि घडतं तसंच !" सगळे ऐकत होते.
" शांता... तारेला दिठ आहे !"
"दिठ...! कशाची, कोणाची ?"
झोपडीत चाललेली खलबतं वारा ऐकत होता. मनात तो ही घाबरून होता. पुढे दैव फिरणार होते, हे पिराने सांगताच दोघांना धडकी भरली. ताराला लहानपणापासून दृष्ट लागत होतीच. पायाला माती लागू नये म्हणून ती एकटीच वहाणा वापरत होती. अगदी लग्न होईपर्यंत तिची आई, रोज संध्याकाळी तिच्यावरून मीठ-मिरची ओवाळून टाकत असे. गल्लीभर खकाना उडायचा. अवसेला तर ती बाहेर निघत नव्हतीच. नाकी-डोळी रेखीव असलेली तिची सावळी काया पटकन कोणाच्याही नजरेत भरायची. म्हणून मामाने खूप विचार करून शांताच्या हातात तिला सोपवली होती. तिला थोडासा ताप भरलेला, कोंबड्याच्या जीवावर उठायचा.
"हे तुझ्या बा न दिलंय." पिराने दोन ताविज काढून दोघांच्या हातावर ठेवले. दोघांनी डोळ्याला लावून ते मुठीत झाकून ठेवले. पिर उठला आणि त्याने दाराच्या एका कडेला मोठा भोपळा बांधला.
" हे काढू नकोसा ! जे काही आहे, याला होईल."
" पण बाबा, ते कोण आहे, कसं आहे ! काहीतरी सांगा."
" ते दिसलं असतं डोळ्याला, तर म्याच त्याचा बेत पहिला असता. तारा आणि तुम्ही जपाया हवंय...!"
ताराला आज विसावं लागलं होतं. बालपण भुर्रकन उडून गेलं होतं. त्यासोबत अंगातील अल्लडपणा आणि खेळही उडाले होते. आजपर्यंत आई-बापाच्या छत्राखाली तिचे दिवस सुखाचे, समाधानाचे होते. पण यापुढे येणारं सगळं काही तिला एकटीला पेलावं लागणार होतं. ते काय होतं, कसं येणार होतं, हे कुणालाच माहीत नव्हतं.
पिराने बाहेर ओट्यावर अंग टाकलं. शांता खिडकीपाशी शांत उभा होता. गडावर विजा चमकत होत्या. नेहमी त्या चंदेरी विजांच्या वलयात चमकून उठणारा गडही आज गप-गार होता.
क्रमश...
लेखन : अनुराग वैद्य

