महालगड -२
पहिल्या भागाची लिंक
"बाई माणसाला जपाया लागतं." भट्टी तापवायला आलेला महादेव बोलला. शांताच्या बापाचा बालपणीचा सवंगडी. येऊन बसत होता. वडीलकीच्या नात्याने चार सल्लेही द्यायचा आणि शांता ते ऐकायचाही.
"फक्त पायाला माती लगायचा उशीर ! काय घेऊन यायची घरात, नाही सांगता येत. जपाया लागतं...!"
" काही कळेना झालंय." भट्टीतला वारा कोळश्याला हवा देत जिवंत करू पहात होते. प्रत्येक कोळशाला एक लाल अंगारी किनार होतीच. प्रत्येक सुखाभवती भयाचं सावट फिरतं, अगदी तसंच !
सात-आठ घोड्याच्या टापा त्याच्या अंगणाबाहेर थांबल्या. वर मान करून पाहिलं, तर चंद्रजीची माणसं कमरेला तरवारी टांगून उभी होती.
"तुला बोलावलंय वाड्यावर." गणिमाने फेकलेले तुकडे बोलू लागले.
"कशाला?"
" ते तिथं गेल्यावर कळल की." दोन जण पुढे येऊन शांताची बाखोटी धरू लागले. त्याने जरा डोळे मोठे करताच सरसावलेले हात मागे गेले. महादेवाला तिथेच थांबायला सांगून शांता निघाला. कमरेला एक बारीक तलवार अडकावलीच ! जाताना घराकडे एक नजर वळवली.
वाड्यातल्या देवाडीपाशी चंद्राजी झोपलं झुलत पडला होता. आजूबाजूला त्याचे खाऊन माजलेले पैलवान दिमतीला होतेच. चेहऱ्याने उग्र आणि वागण्याने त्यापेक्षाही जास्त उग्र असे ध्यान बघणाऱ्याला किळस यावे असेच होते. एकाच आईच्या उदरात वाढलेले दोन्ही भाऊ एकमेकांचे हाडवैरी होते. एकाने स्वराज्याची पवित्र पताका हाती धरून स्वधर्म पंढरीची वाट धरलेली, तर दुसरा आजही वतनदारी मिळेल म्हणून परकीय राजवटीची वाट बघत धर्म बाटवत बसलेला. रयतेला आपल्या वाड्याचं पोतेरं समजून ,त्यांना हीन वागणूक देऊन त्यांना आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून त्राहीमाम करून सोडणाऱ्या या नराधमाचा नी:पात करण्याची सोय नव्हती. कारण त्याच्या भावाचे शौर्य आणि पुण्याई.
"दिस-दिस दिसत न्हाईस तू...?" करड्या नजरेने त्याने शांताला सवाल केला.
"हिंडावं लागतया. कुनी खाटल्यावर न्हाई आणून देणार...!" तितक्याच करड्या भाषेत उत्तर आलं.
"कुटं जातो, कवा जातो, कवा येतो...सगळं कळतं आम्हाला शांता...!"
शांता काहीच बोलला नाही. चंद्रजी उठून त्याच्या जवळ आला.
"अंगावरची कातडी सोलून काढली, की कळलं ! जलमभर सगळं खाटल्यावर करायला लागल !"
त्याने शांताच्या कमरेची तलवार काढली आणि त्याच्या मानेवर ठेवली. शांता जराही डळमळला नाही. त्याच्या डोळ्यात अंगार पाहुन क्षणभर चंद्रजीलाच धडकी भरली.
"कशाचा एवढा माज रे...?"
" आमच्या राजाचा...! पण तुला त्यो नाही कळायाचा. त्यासाठी रंगत लाल लागतं. वैऱ्याने फेकलेलं तुकडं खाऊन पांढरं पडलेलं रंगत तुझं...!"
या वाक्याने मात्र तो रागाने फणफणला. त्याने तलवारीची पकड घट्ट करत ती त्याच्या मानेवर फिरवणार, इतक्यात आतून आवाज आला.
" हात आवरा चांद्रजी...!" सगळ्यांच्या नजरा देवडीवर गेल्या. देवडीवर दहा-बारा मावळे हातात तलवारी ,भाले उपसून उभे होते. ते पाहून चंद्राजीला घाम फुटला.
" स्वराज्याच्या एका-एका शिलेदाराच्या रक्ताचा एक-एक थेंब आम्ही जीवानिशी जपतो.
एका काळ्या चमकदार घोड्यावरून नवलमामा खाली उतरले. किल्लेदाराचे अत्यंत विश्वासू. शांताकडे किल्ल्यावरून आणलेली हत्यारं घ्यायला आले होतो. तिथेच त्यांना कळलं, ते तडक वाड्यावर येऊन घडकले.
" हात चालवाल, तर तुम्ही किल्लेदाराचे भाऊ आहेत हे विसरून , असेल तितक्यांची खांडोळी करू ! सोडा त्याला !"
तलवार खाली टाकून चंद्राजी मागे पाऊलभर सरकला. शांताने तलवार उचलून कमरेला खोचली.
" फार काळ टिकायचं न्हाई, तुझं हे राज्य...!" मागे वळून चालू लागलेल्या शांता पुन्हा थांबला.
" हे देवाचं राज्य आहे. त्यो आहे भक्कम, त्याची लाज-आब्रू झाकाय. तू तुझं बघ...! "
धाडकन देवडीची दारं बंद झाली. ताडफडत्या चंद्राजीने बाजूला असलेल्या माठाला जोरात लाथ मारली. पाण्याचा डोह वाड्यातून वहात बाहेर जाऊ लागला. बाजूने मोऱ्या चालत आला.
" सरकार, तुमच्या भावाची फुस हाय याला. त्याचा माज हाय...!"
" अशे लै माजोरडे पाह्यले...!"
"बाकी काही म्हणा, याची कारभारीन मात्र...!" एकदम मोऱ्याचा चेहरा चमकला. चंद्राजीने मिशिवर हात फिरवला.
"पन जरा जपून...! हातात घावलं तर ...!"
" आता त्याचीच वाट पहायची आपण...! हातात घावलं तर...!"
.....
आधीच काळ्या ढगांनी तुडुंब भरलेलं आभाळ, त्यात अवसेची रात्र. एकही चांदणी आज आभाळातून खाली बघायला तयार नव्हती. रात्रीच्या उदरात अंधार एखाद्या भुजंगासारखा दबा धरून बसला होता. आरश्यात पाहून त्याच्याही काळजात धस्स होईल, इतका त्याचा काळोख घनदाट होता. स्वतःची पाऊलं टाकताना सुद्धा त्याला भीती वाटत असेल. बाहेर किल्ल्यावर कडाडणाऱ्या विजा ,यंदा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या होत्या. आजू-बाजूच्या झोपड्यांमध्ये भीतीने मध्येच गांगरून रडणारी बारकी पोरं होती. मध्येच दूर रानातून एखादा कोल्हा कुई देऊन जाई. टिटव्यांना तर काळ आलाच होता. गावतुन राखण करणारे मशालजी पावसामुळे येत नसत. एखादं चुकलेलं जनावर आडोश्याला उभी राहून अंधार सरायची वाट बघत रात्रभर जागं रहात होतं. कुणाला दया आलीच, तर खायची सोय लागून जात होती. यंदाच्या रात्रींत एक भय वाढलं होतं. गडाला घेरून उभ्या असलेल्या फौजा तुकड्या करून गावात घुसून येत होत्या. वाटेवर चिखल आणि मध्यावर दुथडी वाहणारा ओढा असल्याने शक्यतो ते लांबच्या बाजूने येत. आल्यावर गावावर एखाद्या अधाश्यासारखं तुटून पडत. हाती लागेल ते उचलून नेत. गावातील भरली घरं चंद्राजीने आधी हेरून ठेवायची आणि त्याची दिमत फौजांना द्यायची. देव्हाऱ्यातले तांबे-पितळी देव सुद्धा उचलून न्यायलाही हाय-गय होत नव्हती. पडून पावसाने उपकारच केले होते. अंधारात सहसा कुणी छावणी सोडून गावात येत नव्हतं. एक तेवढे उपकार अंधाराने केले होते.
किल्ल्याची घडण भक्कम होती. साडेतीन हजार फुटावर बांधलेला महालच होता. गावाच्या उत्तर कडेने जाण्यास एक वाट होती, जिने फौजा, हत्ती, घोडे आणि दाणागोटा वर जाऊ शकत होता. मुलामा देत असताना याच वाटेने राजे तीन-चारदा वर जाताना गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेले होते. किल्ला तयार झाल्यावर महालेश्र्वराच्या दर्शनासाठी माँसाहेब स्वतः पालखीने वर याच वाटेने गेल्या. गावातील इतर मंदिरांचा जीर्णोद्धार ही मासाहेबांनी करवून घेतला होता. महालगड स्वराज्याच्या कुपीतलं एक सुप्त टकमक टोकंच होतं. दक्षिणेकडील कड्याला धरून सरळ कोकणात उतरण्यासाठी वाट होती. पण ती निसरडी असल्याने सहसा कुणी तिथून वर चालून येणारं नव्हतं. याच कारणे बादशाहची गडावर करडी नजर होती. स्वच्छ पौर्णिमेत गडाची सावली गावावर पडत होती.
"शांता, त्या असुराची नजर भयाण आहे. त्यो इतक्या हल्ल्यात घेऊ नगस." शांताच्या मानेला तलवार लागलेली बातमी हा-हा म्हणता गावात वणव्यासारखी पसरली होती. तारेच्या मनात तर तो गेल्यापासून सारखा कोलाहल सुरु होता. शांता घरी येताच लोहारवाडीतून जूने-जाणते म्हातारे घरी यायला लागले.
" त्यो भाड्या कपारीतून वार करणाऱ्या लांडग्यासारखा आहे. अबग्या माणसावर डाव टाकून पार पिळून टाकतुया ! त्यापरीस तिथेच त्याच्या नरडीचा घोट घ्याय पाहिजे व्हता." दुसरा एक जण म्हणाला.
"भ्याचं न्हाई, घरासमोर दिसला की असंल त्या हत्याराने उभा फडायचा...! राजं एक लांडगं मारलं म्हणून मनाचं कडं देतील."
बहादूरांची कमी नव्हती. पंचक्रोशीतली अर्ध्याहून अधिक पोरं स्वतःहून स्वराज्यासाठी कमरेला तलवार आणि पाठीला ढाल लावून उभी होती. पण इथे घोळ वेगळा होता. चंद्रजीची प्रवृत्ती मोठी घातकी होती. पाऊण गाव आधीच त्याच्या मरण्यावर टपलेलं होतं. पण त्याच्या समोर जाऊन त्याला आव्हान देण्याची धज कुणात अजून आली नव्हती. ज्यांनी प्रयत्न केला, तो नंतर गावात दिसला नव्हता. त्याचे खानदान देखील कुठे सापडले नव्हते. एकदा किल्ल्याचा वेढा उठला, की तसाही तो हत्तीच्या पायाखाली तरी जाणार होता, नाहीतर माडकड्यावरून त्याचा कडेलोट तरी ठरलेला होता.
शांताच्या कुशीत पाहुडलेल्या ताराला झोप लागलीच नव्हती. अंगणात कसलासा आवाज सारखाच येत होता. आवाज शिस्तबद्ध होता. जनावरासारखी पाऊलं विस्कटत नव्हती. शांताला उठवावं, तर त्याला गाढ झोप लागली होती. स्वतः उठून बघावं, तर तेवढी हिमंत आता तिच्यात राहिली नव्हती. पहाट झालेली कळावी, म्हणून खिडकीचं उघडं ठेवलेलं दार सारखं वाऱ्यावर हेलकावे खात होतं. दडून तिने पांघरूणाच्या बाहेर तोंड काढलं. खिडकीकडे नजर गेली, तसा तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. एक अत्यंत भयानक काळी आकृती आ वासून खिडकीतून दोघांकडे बघत होती. तिच्या लाल डोळ्यात मृत्यू नाच करत होता. खायला टपलेल्या एखाद्या भुकेल्या श्वापदासारखे त्याच्या तोंडातून लाल लाळ बाहेर येत होती. डोळ्यात कौर्य होते. त्या अंधारात लांब चमकलेल्या विजेत ती आकृती तिला दिसली आणि ती आहे तितक्या दमात जोरात किंचाळली...!
क्रमश:
लेखन : अनुराग वैद्य

