महालगड -५
भाग 4 लिंक
अंधाराला चिरत तारा निघून गेली. कुठं जायचं माहीत नव्हतं. तिला फक्त शांता दिसत होता. कसाही मिळो, तिचा धनी तिला घरी पाहिजे होता. मनात आलेल्या सगळ्या शंका तिने पावलाखाली चिरडल्या होत्या. कुऱ्हाडीवरची पकड तिच्या निश्चयासारखीच घट्ट होती. पावसाला सुरुवात होत होती. आभाळाचा अवतार अधिकच रुद्र होत होता. पण तिची वाट अडवण्याचे धाडस मात्र त्यात नव्हते. वादळ अगदी तोंडाशी आले होते. पण ती त्यालाही भीक घालत नव्हती. नवऱ्याच्या स्लामतीसमोर ती सगळं काही विसरली होती. वाडी मागे सोडून आता ती गावात आली. सगळीकडे शुकशुकाट होता. ती चंद्राजीच्या वाड्यासमोर येऊन थांबली आणि धाडकन तिने वाड्याच्या दाराला लाथ मारली. आतून फक्त एका कडीच्या भरवश्यावर उभा दरवाजा उघडला गेला. अर्धवट झोपेत असलेले देवडीवरचे रखवालदार जागे झाले. पेटत्या मशाली तिच्याकडे सरसावल्या. पण तिचा अवतार पाहून तिच्यासमोर जाऊन तिला अडवण्याची धज मात्र कुणात झाली नाही.
"माझा धनी कुटं हाये ?"
तिच्या या आवाजाने उरलेला वाडा देखील जागा झाला.
आतला चंद्राजी हातात भाला घेऊन बाहेर आला.
"कोण तू ?"
" शांताची बायको, तारा...!"
क्षणभर चंद्राजी भाम्बवला.
"इथे का आलीयास?" त्याने करड्या आवाजात तिला प्रश्न केला.
" माझा धनी कुटंय ?"
" कोण तुझा धनी ? आता तो आमचा कैदी आहे...!" मिशिवर ताव मारत चंद्राजी म्हणाला." फितुरी केलीय त्याने. रात्री-अपरात्री खानाच्या छावणीत लुटालूट, फौजेची कत्तल, दरोडा घातलाय त्याने! " त्याचा आवाज जास्तच चढू लागला.
" त्यानं जे केलं, हे तू कराया हवं होतं. देश आणि धर्माचा शिपाई हाये त्यो...! सोड त्याला !"
एक एक पाऊल टाकत तारा पुढे सरकू लागली. तिच्या मनात काय होतं, कोणालाही कळलं नाही. आजूबाजूचे रखवालदारही तिच्या कडे तितक्याच सावधपणे पाऊलं टाकत होती. मशालीच्या उजेडात नीटसं काही दिसत नव्हतं. वीज चमकावी, तशी ती चंद्राजीच्या समोर आली आणि तिने कुऱ्हाड त्याच्या मानेला लावली.
"कुटं हाये त्यो..?"
तिचा काहीच नेम नव्हता. तिच्या मनासारखं झालं नाही, तर ही कुऱ्हाड आपलं शिर धडावेगळं करेल, हे त्याला चांगलंच माहिती होतं.
"जागीचं हलू नगंस ! माझ्या धन्याला माज्या समोर आन आधी !"
एका माणसाने मागची खोली उघडली. एवढ्यात शांताला मारून त्याचे पार हाल केले होते. त्याच्या सर्वांगातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. मशालीच्या कोवळ्या उजेडात त्या तारेला स्पष्ट दिसत होत्या. तिचा जीव कळवळला. पण तो जिवंत असल्याचे समाधान देखील तिला वाटलं.
" तारे, तू कशाला आलीस इथे...!" शांता तसा शुद्धीवर होता. रोज पोलादाशी सामना होत असलेला रांगडा गडी होता तो. इतक्याने त्याचं काही फारसं नुकसान झालं नव्हतं.
" तुला न्यायला आले." तिने त्याला धीर दिला.
तारेने चंद्राजीला दारापाशी येण्याचा इशारा केला. शांताही दाराकडे येऊ लागला. तिघांची पाऊलं एकसारखी पडत होती. एवढ्यात कुणी दारही लावलं नव्हतं आणि जागचं हललं देखील नव्हतं. बाहेर आता पावसाची रिपरिप सुरु झाली होती.
"तारे, उगाच फाजीलपण नगं करुस. खानाच्या तावडीत सापडलीस, तर तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं तुकडं पाडील त्यो..!"
" इतकं सोपं न्हाई ते !"
उघड्या दारातून तारा आणि शांताचे पाय बाहेर पडले. तिने लगेचच दाराला बाहेरून कडी घातली.
"तारे, तू नगं ते धाडस करून बसलीस." शांताला नीटसं उभंही रहाता येत नव्हतं.
" तुला त्या लांडग्याच्या तोंडाशी देऊन म्या एकटी गडावर कशी जाणार.तुला जीवे मारलं असतं त्यानं."
" अशे कित्येक जण गेलेत तारे, असं मरणाला घाबरून राज्य होत नसतं !"
" आता जास्त बोलायचं न्हाई, गडाकडे निघाय हवं...!"
शांताला चंद्राजीच्या वाड्यावर रात्रभरासाठी ठेऊन खानाची नराधम फौज अजून रानात बाकीच्यांना शोधत फिरत होती. इतर पोरं गडाच्या वाटेला लागायच्या आत त्यांना गाठून कैद करायचं होतं. सुमारे घंटाभर चालून शांता आणि तारा कसेबसे गडाच्या पायथ्याशी पोहोचले. पाऊस असा जोरात नव्हता. पण रिपरिप चिखल करत होती. जरा कुठे वेगळा आवाज झाला, कि झुडपात दडून बसायची. शांताला एव्हाना दम भरू लागला होता. तो सापडल्यापासून त्याचे खूप हाल झाले होते.
एका ठिकाणी तो थांबला.
"तारे ! माझं ऐकशील का ? माझ्याने ह्यो गड नाही सर होणार. मला हिथं राहू दे, तू पुढे हो...!"
" यासाठी न्हाई म्या तुला सोडवून आणलं. जे काही होईल, ते दोघांचं सारखं होऊ दे...!"
दोघांच्या डोळ्यात पाणी तरळलं.नुकतीच सुरवात झालेल्या संसारावर काळे ढग गर्दी करू लागलेत, हे दोघांच्या लक्षात आलं.पिराला पडलेलं स्वप्न ,काळोखात खरं व्हायला लागलं. पण त्याबद्दल दोघंही बोलले नाहीत. शक्य तितकी झपझप पाऊलं टाकत या अरिष्टाला वळसा घालून जाण्याच्या प्रयत्नात दोघे होती. गडाचा पायथा जरी पायाला लागला, तरी त्यांचं अर्ध संकट असंच टळणार होतं. उरलेली रात्र एखाद्या कपारीत काढून , थोडं तांबडं फुटल्यावर वर जाता आलं असतं. ती वाट शांताला अंधारातही ओळखीची होती. त्यात बळ फारसं उरलं नव्हतं. सोबत तारा असल्याने त्याला हुरूप आला होता. आतापर्यंत अनवाणी चालत आल्याने दोघांच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. काटे, धस, दगड-धोंडे सगळंच पायावरून ओवाळून निघालं होतं. झाडं-झुडपं अंगाला लागून कातडी सोलून आली होती. पण दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पदराने बांधून ठेवले होते.
"तारे, हे समदं सरलं, कि नव्याने संसार थाटू."
"व्हय, त्या जनावरांनी आपल्या घराचा पार इस्कृट केलाय. काय बी ठिवलं न्हाई...!" तारेला आपली उध्वस्त झोपडी आठवली.
"हात ठेवलं न ...! पुन्यानंदा उभं करू, तू हाये, मी हाय !"
पुढे सगळा अंधार होता. त्याचं भय कापायचं म्हणून दोघांनी स्वतःला गप्पांमध्ये गुंतवून घेतलं होतं. वाट माहिती नव्हती, तरी तारा पुढे चालत होती. मागून कोणी आलं, तर शांता हातात कुऱ्हाड घेऊन होताच. घसा कोरडा पडला, कि आभाळाकडे तोंड करायचं.घोड्यांच्या टापांचे आवाज काही थांबत नव्हते. कोणत्या दिशेने येत होते,काही कळत नव्हते. पावसामुळे जनावरांचं भय तेवढं नव्हतं.
"तारे, एका रात्री छानसं सपान पडलं बघ..!"
शांताच्या डोळ्यात अजून चमक होती.
"काय ते ?" आता चालायचा वेग थोडा मंदावला होता.
" तुझ्या मांडीवर एक छानसं , गोंडस बाळ...!"
एकदम तारेचे पाय थांबले.
" गनिमाच्या सावलीत ?"
"न्हाई तारे, आपल्या राजाच्या राज्यात...! आपल्या स्वराज्यात...!"
"व्हय...! आपल्या राज्यात...!"
पुढे येऊन ते थांबले. थोड्याश्या अंतरावर त्यांना धूर दिसला. तारेच्या डोळ्यात टचकन पाणी आली. जे घडलं, ते काही वेगळं सांगायची गरज शांताला वाटली नाही.
" तारे, स्वार्थाने एवढं का बिघडावं माणसानं ? आपलं-परकं, मैतर-दुष्मन, देव-धर्म, कायबी दिसत नसतंय व्हय माणसाला...! त्या येड्याला एवढं बी कळत न्हाई, तो त्याच्याच जीवावर उठंल एक दिस."
खानाच्या फौजेने वाडीत पार धुमाकूळ घातला. चंद्रजीच्या वाड्यातून शांता निस्टल्याने जिव्हारी लागलेला घाव अधिक खोलवर गेला होता. उजाडण्याच्या आत त्यांना शोधणं भाग होतं. या प्रसंगाची खबर जर आग्र्याला पोहोचली, तर आलमगीर आपल्याला हत्तीच्या पायी देईल, याची खानाला पूर्ण खात्री होती. तो यासाठीच छावणी सोडून चंद्राजीच्या वाड्यावर येऊन राहिला होता. गडावर याने तणाव तर वाढलाच, पण पुढची रसद आणि वाडीतून मिळणारा गनिमी पाठिंबा देखील डावावर लागला होता. तातडीने निरोप पाठवून, म्हणून सुर्याजींनी सगळ्यांना गडावर बोलावून घेतले होते. दुर्दैवाने गड लढवण्याची वेळ आलीच, तर सैन्य कमी पडायला नको.
अचानक शांता थांबला.त्याच्या डोळ्यातली चमक वाढली. हाताला असलेला तारेचा हात त्याने सोडला. हात सोडल्याचं तारेला कळताच तिने मागे पाहिलं.
"तारे...! पळ....!!!" त्याचा आवाज खोल गेला. तारा मागे वळली. त्याच्याकडे एकटक बघत राहिली. दुसरा भाला पुन्हा त्याच्या पाठीत घुसला. शांताचा श्वास कोंडला. बाजूच्या एका वेलीला त्याने घट्ट धरलं ,तशी वेल निसटली आणि दोघही निसरड्या पाऊलवाटेवरून खाली घसरले.
आत्तापर्यंत शांततेत त्यांच्या मागावर असलेल्या मशाली पेटल्या. समोर दहा-बारा अधाशी जनावरांचा एक गट उजेडात आला. घसरल्याने भाले अधिकच आत गेले.
"तारे, पळ मागून, यांच्या हाताला लागू नगंस..! तुला माझी आण हाय...!" तारेला काहीच सुचलं नाही. हातातली कुऱ्हाड केव्हाच झुडपात पडली होती...! शांता आणि तारा आयतेच गनिमाच्या तावडीत सापडले.
एखादा दिवस उगवतोच का, हे ही माणसाला कळत नाही. तसंच काहीतरी वाडीच्या लोकांचं झालं होतं. अर्धवट जळालेले संसार आवरत म्हातारी-कोतारी उभी होती. पहाटे पाऊसाने जोर धरल्याने आगीची धग जरा निवळली होती. पण जे जळायचं, ते केव्हाच राख झालं होतं. अंधारात डाव साधल्याने तितकासा प्रतिकार झाला नाही. वाडीतली अधिकांश मंडळी रात्रीच गडाकडे निघाल्याने ती वाचली. वाडी मात्र बेचिराख झाली होती. एकही माणसाला त्यांनी हात लावला नव्हता. जनावरं देखील तशीच जागेवर होती. आगीच्या जबड्यात सापडली, ती गेलीच !
एका मोठ्या लाकडी तांड्याला शांताचं पार्थिव टांगून सैन्याचा एक छोटा ताफा वाडीत दाखल झाला. हाताला मुस्क्या बांधून थकलेली तारा सुद्धा मागून येत होती. ती खूप शांत होती. हुंदके आतल्या-आत होते. शून्यात नजर लावून ती ताफ्यासोबत चालत होती. अंगावरचे कपडे फाटले होती. कपाळाला, हाता-पायाला अतोनात जखमा झाल्या होत्या. पायात वहाणा नव्हत्या. ते पूर्ण चिखलाने माखले होते. केस पूर्ण मोकळे होते.
"अरे काय केलंस हे...!"
ओढ्याच्या वाटेवर तारेला भेटलेली भक्तिन पूढे सरसावली.
"अरे, नायनाट होईल तुझा..!" जग जिंकल्याच्या आविर्भावात असलेल्या चंद्राजीचं तिच्याकडे लक्ष गेलं.
" काय केलं म्हणजे...? शासन केलं..!" तो जोर-जोरात हसू लागला. "उगाच नादाला लागायचं फळ हाय हे."
" आरं मुर्दाडा ! एकट्या-दुकट्याला गाठून मर्दुमकी गाजवतोय व्हय रं ? लक्षात ठिव, ही पोरगी साधी न्हाई..! हे पाप तुझ्या अंगावर उठल्याबिगर रहायचं न्हाई..!"
काही शिपाई तिच्याकडे चालू लागले. चंद्राजीने त्यांना थांबवलं.
आपल्या झोपडीच्या अंगणात तारा उभी राहिली.
"नायनाट होईल तुझा...!" भक्तिनीने खालचा चिखल उचलला आणि चंद्राजीच्या अंगावर फेकला.
उरलेली वाडी जमा झाली होती. पुढचं काय होईल, ते कुणालाच माहीत नव्हतं. वाऱ्याने वेग धरला. इतका, कि वरच्या झाडाच्या फांद्या मोडून पडू लागल्या. ताराला धरून ठेवलेल्यानी तिला सोडलं. आपल्या मोडक्या झोपडीकडे ती चालत गेली. आत गेली. सारी वाडी बघत होती. ती बाहेर आली नाही...!
क्रमश:
लेखन :अनुराग वैद्य